Sep 11, 2021

श्री गणेश कवच - प्राकृत


॥ श्री गणेशाय नमः ॥


[ १: नमन ] श्री गणेशदेवा लालितां । मुनितें म्हणे गौरी माता । अहो, अचपल बाल आतां । कळा याची कळों नेदी ॥ १ ॥ जृंभा, सिंदूर थोर स्थूल । साधु-देव-द्रोही खल । यातें हा आतांचि प्रबळ । चिंता याची व्यापी मातें ॥ २ ॥ यातें कीं तें व्यापितील । दैत्य दुष्ट बहु कुटिल । दैत्य नाशन हा अवखळ । रक्षिण्यासि या, द्या कवच-थोर ॥

[ २ : ध्यान ] मुनि म्हणे करावें ध्यान । विनायक हा मृगवदन । सत्ययुगीं दिग्बाहु गहन । मयुर-वाहन त्रेतायुगीं ॥ ४ ॥ सिद्धीदाता श्रीगणनाथ । तदा त्यासि सहा हात । द्वापारीं मात्र चार हात । रक्तरंग, अंगकान्ती ॥ ५ ॥ कलियुगीं भुजा दोन । धवलांग हिमाहून । पुरवी सर्व वर देऊन । रक्षितसे हा सर्वकालीं ॥ ६ ॥ ॥ श्री ॥ ॥ गणेश गौरीचा नंदन । सिद्धीबुद्धीचा दाता पूर्ण । आधीं वंदावा गजवदन । मंगलमूर्तीं मोरया ॥

[ ३ : न्यास ] शिखा रक्षूं हा विनायक । पराहूनि पर, परमात्मक । तनु सुरेख, तैंसें मस्तक । उत्कट, थोर, विशाल ॥ ७ ॥ कश्यप रक्षूं ललाटस्थलीं । महोदर राखूं भ्रुकुटीवल्ली, । भालचंद्र नयन, युगुलीं, । ओष्ट-पल्लव गजास्य ॥ ८ ॥ जिव्हा रक्षूं गजक्रीडन । हनुवटी ही गिरिजानंदन । विनायक रक्षूं वाणी, वचन । विघ्नहंता दन्त माझे ॥ ९ ॥ कान रक्षूं पाशधर्ता । नाक रक्षूं इच्छितें-दाता । मुख रक्षूं गणांचा कर्ता । कंठ माझा गणंजय ॥ १० ॥ स्कंध रक्षूं गजस्कंधन । गणनाथ ह्र्दयांगण । स्तन-भाग विघ्ननाशन । जठर रक्षूं हेरंब ॥ ११॥ पृथ्वीधर रक्षूं पार्श्वभाग । विघ्नहर शुभ, पृष्ठभाग । वक्रतुंड गुप्त, गुह्यांग । सर्वांग रक्षूं महाबल ॥ १२ ॥ गणक्रीड रक्षूं गुडघे जंघा । मंगलमुर्ति उरु-जंघा । घोटे पाय, दैत्यभंगा । एकदंत रक्षूं, महाबुद्धी ॥ १३ ॥ बाहू रक्षीं त्वरित-वरदायका । हात संरक्षीं आशापूरका । नखें, बोटें अरिनाशका । कमलहस्तका रक्षीं सर्व ॥ १४ ॥ सर्व अंगें मयूरेश । विश्वव्यापी विश्वेश । रक्षीं सदा परमेश । नच वदलो स्थान तेंही ॥ १५ ॥ धूम्रकेतु राखो तें स्व-बलें । भलें मागणें केंले अबले । नच केंले न जें सुचलें । तेंहि पुरवीं रक्षका ॥ १६ ॥

[ ४ : दिग्बंध ] समोरोनि देवें आमोदें । मागें राहोनियां प्रमोदें । पूर्वेकडोनि देवें बुद्धीदें । सिद्धीदें रक्षावी आग्नेयी ॥ १७ ॥ दक्षिणेसि राहो उमासुत । नैरृतीस गणेशाच्युत । पश्चिमेस विघ्नहर्तृ । वायव्येसि शूर्पकर्ण ॥ १८ ॥ उत्तर पाळीं निधिरक्षक । ईशान्येस शिवसुत शिवात्मक । दिनभागीं एकदन्तक । विघ्नहर सायं, रात्रौ ॥१९ ॥ रक्षीं पाशांकुशधर । सत्वरजतम-स्मर । राक्षस वेताल असुर । भूतग्रह, वेताल, पिशाचां हातोनि ॥ २० ॥ ज्ञानधर्म, लज्जालक्ष्मी । कुल, कीर्ति तेंविं गृह्लक्ष्मी । धन, धान्य, तैसा देहचि मी । सोयरे, सखे, पुत्रादिक ॥ २१ ॥ आतां सर्वांयुधधरें देवें । पौत्रादिसारें रक्षावें । मयूर-कपिल-पिंगाक्ष देवें । गुरें-मेंढरें संरक्षावीं ॥ २२ ॥ हत्ती, घोडे, सदा-साक्षी । विकट-मूर्ते तूंचि संरक्षी । अंतर्यामीं राहोनि दक्षी । रक्षी हेरंब-देवा तूं ॥ २३ ॥

[ ५ : कवचबंधन ] भूर्जपानीं हें लिहावें । कवच कंठीं मग बांधावे । भय-मुक्त सुबुध्दें व्हावें । यक्ष, राक्षस, पिशाच्चांपासून ॥ २४ ॥

[ ६ : फले ] तिन्हीं संध्या समयांसी । जपतां या कवचासी । वज्र-तनु-लाभ मानवासी । निर्भय जावें रणांगणीं ॥ २५ ॥ यात्राकालीं करावें पाठ । विघ्नें जातीं, फलें साठ । युध्दकालीं आठपट । विजय त्वरें पठन देईं ॥ २६ ॥ सातवेळ जप उपायीं । एकवीस दिनांचे ठायीं । मारणोच्चाटनें फलतीं । तींही आकर्ष-स्तंभन, मोहनादिकरण ॥ २७ ॥ एकवीस वेळां जपतां देखा । एकवीस दिनीं कोणी सखा । तुरुंगमुक्त होतसे सुखा । मोचन पावे यमपाशहि ॥ २८ ॥ राज्ञीराजदर्शन-वेळीं । पढावें तीन वेळां सकाळीं । राजसभा, लोकसभा, बळी । जिंकेल पाठक निश्चयें ॥ २९ ॥

[ ७ : प्राप्ति ] कश्यपें दिलें हें गणेश कवच । मुद्द्लें मांडव्यास वच । मांडव्य देईं मजसी साच । जय, यश, सिद्धी-दायक ॥ ३० ॥

[ ८ : बंधनें ] भक्तिहीनासि हें न द्यावें । श्रद्धावानचि शुभ पावे । कवचें न होतीं राक्षसासुर-गोवें । वेताल दानव, दैत्यादीचें ॥ ३१ ॥ ऐसें संपूर्ण केलें हें । श्रीगणेशपुराणीं पाहे । गणेश कवच जें गूढ आहे । संस्कृतीं तें प्राकृतीं ॥ ३२ ॥


॥ श्री गजाननार्पणमस्तु


Sep 9, 2021

श्री गणपति - स्तोत्र ( प्राकृत )


॥ श्री गणेशाय नमः ॥ 

॥ श्री गुरुचरणारविंदाभ्यां नमः

॥ अथ श्री गणपतिस्तोत्रप्रारंभ:


जयजयाजी गणपति । मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती । स्फूर्ति द्यावी मज अपार ॥ १ ॥ तुझें नाम मंगलमूर्ति । तुज इंद्र, चंद्र ध्याती । विष्णुशंकर तुज पूजिती । अव्यया ध्याती नित्यकाळीं ॥ २ ॥ तुझें नाव विनायक । गजवदना तूं मंगलदायक । सकळ नाम कलिमलदाहक । नामस्मरणें भस्म होती ॥ ३ ॥ मी तव चरणांचा अंकित । तव चरणां माझे प्रणिपात ।  देवाधिदेवा तूं एकदंत । परिसें विज्ञापना एक माझी ॥ ४ ॥ माझा लडिवाळ तुज करणें । सर्वांपरी तूं मज सांभाळणे । संकटांमाझारीं रक्षिणें । सर्व करणें तुज स्वामी ॥ ५ ॥ गौरीपुत्रा तूं गणपती । परिसावी सेवकाची विनंती । मी तुमचा अनन्यार्थी । रक्षिणें सर्वार्थेचि स्वामिया ॥ ६ ॥ तूंच माझा मायबाप । तूंच माझा देवराय । तूंच माझी करिसी सोय । अनाथनाथा गणपति ॥ ७ ॥ गजवदना श्रीलंबोदरा । सिद्धिविनायका भालचंद्रा । हेरंबा शिवपुत्रा । विघ्नेश्वरा अनाथबंधु ॥ ८ ॥ भक्तपालका करीं करुणा । वरदमूर्ति गजानना । परशुहस्ता सिंदूरवर्णा । विघ्ननाशना मंगलमूर्ति ॥ ९ ॥ विश्ववदना विघ्नेश्वरा । मंगलाधीशा परशूधरा । पापमोचना सर्वेश्वरा । दीनबंधु नाम तुझें ॥ १० ॥ नमन माझें श्रीगणनाथा । नमन माझें विघ्नहर्ता । नमन माझे एकदंता । दीनबंधु नमन माझें ॥ ११ ॥ नमन माझें शंभुतनया । नमन माझें करुणालया । नमन माझें गणराया । तुज स्वामिया नमन माझें ॥ १२ ॥ नमन माझें देवराया ।  नमन माझें गौरीतनया ।  भालचंद्रा मोरया । तुझे चरणीं नमन माझें ॥ १३ ॥ नाहीं आशा स्तुतीची । नाहीं आशा तव भक्तीची । सर्व प्रकारें तुझिया दर्शनाची । आशा मनीं उपजलीं ॥ १४ ॥ मी मूढ केवळ अज्ञान । ध्यानीं सदा तुझे चरण । लंबोदरा मज देई दर्शन । कृपा करीं जगदीशा ॥ १५ ॥ मतिमंद मी बालक । तूंचि सर्वांचा चालक । भक्तजनांचा पालक । गजमुखा तूं होशी ॥ १६ ॥ मी दरिद्री अभागी स्वामी । चित्त जडावें तुझिया नामीं । अनन्य शरण तुजला मी । दर्शन देई कृपाळुवा ॥ १७ ॥ हें गणपतिस्तोत्र जो करी पठण । त्यासी स्वामी देईल अपार धन । विद्या सिद्धीचें अगाध ज्ञान । सिंदूरवदन देईल पैं ॥ १८ ॥ त्यासी पिशाच्च भूत प्रेत । न बाधिती कदाकाळांत । स्वामींची पूजा करोनि यथास्थित । स्तुतिस्तोत्र हें जपावें ॥ १९ ॥ होईल सिद्धी षण्मास हें जपतां । नव्हे कदा असत्य वार्ता । गणपतिचरणीं माथा । दिवाकरें ठेविला ॥ २० ॥ ॥ इति दिवाकरविरचितं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम्


Sep 8, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २१ ते २५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ॥२१॥ हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ॥२२॥ हे दयानिधी, मी एक अति सामान्य असा मनुष्य आहे. काम, क्रोधादि षड्रिपु, दुर्वासना यांच्या दुष्टचक्रांत अडकल्याने माझ्या हातून अनेक दुराचरणें घडली. माझ्या सख्या-सोयऱ्यांनी केलेली मदत आणि उपकार मी सोयीस्कररित्या विसरलो. माझ्या अल्प ज्ञानामुळे अहंकाराने मला ग्रासले. सतत क्रोध अनावर झाल्याने अविचारी, विवेकहीनही झालो. परिणामी, मी असंख्य दुष्कृत्यें केली. सर्व दुर्गुण, विकार अंगी असलेला मी हीन-दीन, महापातकी आहे. हे जरी खरे असले, तरी तू करुणामूर्ती आहेस. अनन्यभावानें शरण आलेल्या आपल्या भक्तांस तू नेहेमीच आपल्या कृपाछत्राखाली घेऊन त्यांचा उद्धार करतोस. या त्रैलोक्यांत तुझ्याशिवाय मला कोणीही आश्रयदाता नाही. आश्रितांचे तुम्ही कल्पवृक्ष आहात. त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. मीही आपले अजाण बालक आहे, माझ्या अनंत अपराधांबद्दल मला क्षमा करावी. हे भक्तवत्सला, मला तू अव्हेरू नकोस अन माझ्यावर कृपा कर.

मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ॥२३॥ विहित म्हणजेच वेदशास्त्रसंमत कर्म केल्याशिवाय साधकाची चित्तशुद्धी होत नाही. नित्य आणि नैमित्तिक कर्मांनी चित्ताची मलिनता जाते. हे जरी सत्य असले तरी, हे सद्गुरुराया, माझ्या हातून ना कधी धर्माचरण घडले ना कधी मी तुझी उपासना केली. उपासना म्हणजे अगदी निकट असणे. आपल्या इष्टदेवतेचे श्रद्धेने, भक्तिभावाने केलेले चिंतन-ध्यान म्हणजेच उपासना. जन्म-मरणाच्या ह्या संसृतिचक्रातून सुटका होण्यासाठी कर्म आणि उपासना ही साधना निश्चितच केली पाहिजे. परंतु हे दयाळा, माझ्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ भक्तिभाव, प्रेम नाही. मग मला आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे बरें होणार ? तुला शरण आलेल्यांना तू नेहेमीच अभय देतोस. किंबुहना, तुझी प्रतिज्ञाच आहे तशी ! तेव्हा, तुझ्या कृपाकटाक्षाने मला अंतर्बाह्य शुद्धता लाभावी, हीच प्रार्थना.

नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥२४॥ मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ॥२५॥ कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥ अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी कृतयुगात ध्यान केले जात असे, त्रेतायुगात त्यासाठी यज्ञादिक अनुष्ठानें तर द्वापारयुगी पूजाविधानें केली जात असत. मात्र या कलियुगात नामस्मरण हा परमार्थाचा सहजसोपा उपाय आहे. नामसाधनेस सोवळ्या-ओवळ्याचे नियम नाहीत. सहज जाता येता पण मनापासून घेतलेले नाम परमार्थ, ईश्वरप्राप्ती आदि लाभ देते. चार वेद, सहा शास्त्रें, आणि अठरा पुराणेंदेखील 'अखंड हरिभजनाशिवाय मायेचे निरसन होणे अशक्य आहे.' हेच प्रतिपादित करतात. सद्वर्तन आणि अनन्यभावानें घेतलेले नाम परमानंदाची अनुभूती देते. ब्रह्मर्षी नारदमुनींच्या उपदेशानुसार ' मरा मरा ' या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली असता वाल्या कोळ्याच्या जिव्हेवर ' राम ' नाम अवतरले. अन त्या वाल्या कोळ्याचे वाक्सिद्धी प्राप्त झालेले वाल्मिकी ऋषी झाले. श्री समर्थ रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांसारख्या अनेक सत्पुरुषांनीही नाममहिमाच गायला आहे. कित्येक साधक, सद्भक्त यांनी केवळ नामसाधना करून भगवत्प्राप्ती साध्य केली. मग हे सदगुरो, तू मलाच का तुझ्या कृपेपासून वंचित ठेवले ? तू करुणेचा सागर आहेस. माझ्या हातून असा कुठला अक्षम्य अपराध घडला की तू माझ्याविषयी असा निष्ठुर झाला आहेस? हे दयाळा, मला क्षमा कर आणि या वेद-वेदान्तातील वचनांची प्रचिती दे.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ क्रमश:


Sep 3, 2021

श्रीदत्तात्रेयस्तोत्रं - जयलाभयशस्तोत्रं


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।

प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥१॥
भावार्थ : परमात्मास्वरूप श्री दत्तात्रेय हे भक्तवत्सल असून सदैव कल्याणप्रद वर देणारे आहेत. या भवतापांपासून जे मुक्ती प्रदान करतात आणि भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, ( केवळ स्मरणमात्रें प्रसन्न होणारे असाही एक अर्थ अभिप्रेत आहे. ) अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत. दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् । सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥२॥
भावार्थ : अति कनवाळू असे श्री दत्तप्रभू दीन-दुर्बलांचे बंधू, कृपेचे सागर व सर्व कारणांचे कारण आहेत. जे त्रिविधतापांपासून सर्वांचे रक्षण करतात आणि भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् । नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥३॥
भावार्थ : शरणागतांस नेहेमीच अभय देणारे, दीन-दुःखी लोकांचे कष्ट हरण करणारे असे भक्ताभिमानी श्री दत्तात्रेय प्रत्यक्ष परब्रह्म नारायणस्वरूप आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत.
सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलम् । सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥४॥
भावार्थ : सर्व अरिष्टांचे तात्काळ हरण करणारे, सकल ब्रह्माण्डातील मांगल्य, शुभ ज्यांच्या ठायीं एकवटले आहे, आणि सर्व कष्ट-पीडा यांचा समूळ नाश करणारे असे हे श्री दत्तप्रभू आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत.
शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः । भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥५॥
भावार्थ : भक्तांना पातकरूपी चिखलातून सोडवून विमल करणारे, ज्ञानरुपी दीपाच्या तेजाने अज्ञानतिमिर दूर करणारे आणि भक्तांना कल्याणकारी वरदान देणारे असे हे दत्तप्रभू आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् । तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥६॥
भावार्थ : सर्व प्रकारच्या व्याधींचे उपशमन करणारे, सर्व पीडांचे निवारण करणारे आणि संसारतापातून मुक्त करणारे असे हे दत्तप्रभू आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत.
ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् । आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥७॥
भावार्थ : जे ब्रह्मज्ञानी, सर्व वेद-वेदांत जाणणारे, भक्तांची यश-कीर्ती वृद्धींगत करणारे, सर्व विपदांचे हरण करणारे आणि भक्तांचा उद्धार करणारे असे हे दत्तप्रभू आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत.  
जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकम् । निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥८॥
भावार्थ : या संसार सागरातील जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्तता करणारे, आत्मस्वरुपाचे ज्ञान देऊन निजानंदाची अनुभूती देणारे, मोक्ष-मुक्ती प्रदान करणारे असे हे दत्तप्रभू आहेत. भक्तांनी केवळ स्मरण केले असता जे प्रगट होतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. ते निरंतर आमचे रक्षण करोत. जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् । भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ॥९॥
भावार्थ : हे दत्तप्रभूंचे स्तवन जय, लाभ, यश, भक्तांच्या लौकिक कामना पूर्ण करणारे, तसेच मनोकामनापूर्ती व मोक्ष दोन्ही प्रदान करणारे आहे. श्री दत्तात्रेयांच्या कृपेची प्रचिती पठणकर्त्यास निश्चितच येईल.
इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णम् ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Sep 1, 2021

श्री स्वामी समर्थ प्रार्थना


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥


तुला नित्य ध्यावे, तुझे नाम घ्यावे l असे घेतले वेड हे नित्य जीवे

विपत्त्तीत वा वैभवी दीनानाथा l तुला प्रार्थितो प्रेमभावें समर्था ॥१

तुला नाठवें मी क्षणीं ज्या दयाळा l नुरो अर्थ काही अशा जीवनाला

करी त्वत्पदीं दीन मी लीन माथा l तुला प्रार्थितो प्रेमभावें समर्था ॥२

तुला विस्मरोनि न मी घास घ्यावा l तुला नाठवोनि न मी श्वास घ्यावा

तुझ्या चिंतनी व्यग्र व्हावे अनंता l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥३

जगीं जन्मलो घेऊनी कर्म-ओझें l तया भोगितां रक्षिते नाम तुझे

अशांता करी शांत आता प्रशांता l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥४

तुला सेवितां फक्त सेवा घडावी l नुरो याविना कामना अन्य काही

मला ठाव दे त्वत्पदीं विश्वनाथा l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥५


श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


रचनाकार - श्री. मंगेश करंबेळकर