|| श्री गणेशाय नमः ||
दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.
महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.
|| श्री गुरुदेव दत्त ||
रजकायापि दास्यन्यो राज्यं कुरुपुरे प्रभुः । तिरोऽभूदज्ञदृष्ट्या स श्रीदत्तः शरणं मम ॥६१॥ भावार्थ : ज्या श्रीपादयतींनी आपला भक्त असलेल्या धोब्यालादेखील राज्यप्राप्तीचा वर दिला आणि अज्ञानी लोकांच्या दृष्टीनें जे कुरवपुरांत अदृश्य झालें, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. (लौकिकार्थाने श्रीपाद श्रीवल्लभ जरी अदृश्य झाले असले, तरी श्रद्धावंत भक्तांस ते अजूनही दर्शन देतात, हेच थोरल्या महाराजांना इथे अभिप्रेत आहे.) विश्वासघातिनश्चोरान्स्वभक्तघ्नान्निहत्य यः । जीवयामास भक्तं स श्रीदत्तः शरणं मम ॥६२॥
भावार्थ : ज्या भक्तवत्सल श्रीपादराजांनी, विश्वासघातानें आपल्या भक्ताला ठार करणाऱ्या चोरांचा वध करून आपल्या भक्ताला (वल्लभेश ब्राह्मणास) पुनर्जीवित केले, ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
करञ्जनगरेऽम्बायाः प्रदोषव्रतसिद्धये । योऽभूत्सुतो नृहर्याख्यः श्रीदत्तः शरणं मम ॥६३॥
भावार्थ : जे दत्तात्रेय करंज नगरांत अंबा ह्या विप्र स्त्रीनें भक्तिभावाने केलेल्या शनिप्रदोषव्रताच्या फलप्राप्तीसाठी, तिच्या पोटी नरहरि नामक पुत्ररूपाने जन्म घेते झाले, ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
मूको भूत्वा व्रतात्पश्चाद्वदन्वेदान्स्वमातरम् । प्रव्रजन् बोधयामास श्रीदत्तः शरणं मम ॥६४॥
भावार्थ : जन्मत:च मौन धारण करून, मुंज होताच ज्यांनी तीन वेदांचे पठण केले आणि संन्यासधर्म स्वीकारून आपल्या मातेस उपदेश केला, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. काशीवासी स संन्यासी निराशीष्ट्-वप्रदो वृषम् । वैदिकं विशदीकुर्वन् श्रीदत्तः शरणं मम ॥६५॥ भावार्थ : ज्या नरहरि बटूने काशी नगरांत राहून संन्यासाश्रम स्वीकारला, आणि (स्वतः जगत-गुरु असूनदेखील कृष्णसरस्वतींना गुरु मानून) वेदांच्या वचनांनुसार आचरण करून संन्यासाश्रमाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिली, तसेच परमार्थ साधनेत आवश्यक असे ज्ञान लोककल्याणासाठी प्रकट केले, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. भूमिं प्रदक्षिणीकृत्य सशिष्यो वीक्ष्य मातरम् । जहार द्विजशूलार्तिं श्रीदत्तः शरणं मम ॥६६॥ भावार्थ : ज्या श्रीगुरुंनी आपल्या शिष्यगणांसहित भूमी प्रदक्षिणा करून, (कारंजाला येऊन) आपल्या मातेची भेट घेतली. तसेच पुढे गोदावरी नदीच्या तीरी असलेल्या वासरग्रामी येऊन पोटशूळाची व्यथा असलेल्या एका विप्रास व्याधीमुक्त केले, तेच श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. शिष्यत्वेनोररीकृत्य सायंदेवं ररक्ष यः । भीते च क्रूरयवनाच्छ्रीदत्तः शरणं मम ॥६७॥ भावार्थ : ज्या नृसिंहयतींनी क्रूर यवनामुळे भयभीत झालेल्या सायंदेवाचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्याचे रक्षण केले, तेच श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. प्रेरयत्तीर्थयात्रायै तीर्थरूपोऽपि यः स्वकान् । सम्यग्धर्ममुपादिश्य श्रीदत्तः शरणं मम ॥६८॥ भावार्थ : स्वत: तीर्थक्षेत्रांप्रमाणे पवित्र असूनही, ज्या श्रीगुरुंनी आपल्या भक्तगणांस धर्मशास्त्रांनुसार उपदेश करून तीर्थयात्रेस पाठविले, तेच श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. सशिष्यः पर्यलीक्षेत्रे वैद्यनाथसमीपतः । स्थित्वोद्दधार मूढो यः श्रीदत्तः शरणं मम ॥६९॥ भावार्थ : ज्या नृसिंहयतींनी (सिद्धमुनी ह्या) शिष्यासमवेत परळी या क्षेत्रांत श्रीवैद्यनाथ ज्योतिर्लिंगाजवळ राहून एका मूर्ख ब्राह्मणाचा (गुरुभक्तीचे माहात्म्य सांगून) उद्धार केला, तेच श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. विद्वत्सुतमविद्यं यो आगतं लोकनिन्दितम् । छिन्नजिह्वं बुधं चक्रे श्रीदत्तः शरणं मम ॥७०॥ भावार्थ : एका वेदशास्त्रपारंगत ब्राह्मणाच्या वेदाध्ययन करण्यास असमर्थ असलेल्या पुत्राने जन निंदेला त्रासून श्री क्षेत्र औदुंबर येथे आपली जीभ कापून घेतली असता, (भुवनेश्वरी देवीने त्याला श्री गुरूंचे दर्शन घेण्यास सांगितले) आणि त्यानुसार श्री गुरूंना शरण आलेल्या त्या विप्रपुत्रास नृसिंह स्वामींनी वेदशास्त्रादि विद्या प्रदान करून ज्ञानी केले, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. || श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु || क्रमश:
No comments:
Post a Comment