Sep 11, 2020

श्री स्वामी समर्थ नामपाठ - अभंग १ ते ३


|| श्री गणेशाय नमः || ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||


प.पू.सद्-गुरु श्री. शिरीषदादा कवडे विरचित श्री स्वामी समर्थ नामपाठ 

मराठी अर्थ : ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, राष्ट्रीयपंडित श्री. विनायकराव देसाई


अभंग क्र. १:

ब्रह्मरस चवी, स्वानंद माधवी । स्वामीनाम सेवी, तया पावे ॥१॥

स्वामी मुखे म्हणा, स्वामी मुखे म्हणा । वटमूल जाणा, प्रकटले ॥२॥

नाम घेता वाचे, बंध वासनेचे । दैन्य दुरिताचे, फिटे वेगी ॥३॥

साक्ष बहुतांची, सुकीर्ती नामाची । अमृते संतांची, आणभाक ॥४॥

अर्थ : जो साधक स्वामीनामाचा जप आवडीने करतो, त्याला ब्रह्मरसाची गोडी अनुभवाला येते. आत्मानंदाचा अनुभवरूप वसंत त्याच्या ठायी बहरतो. म्हणूनच मुखाने सतत स्वामीनाम घ्या, असे मी आग्रहाने म्हणते. वटवृक्षाप्रमाणे महान असे श्रीस्वामी तुमच्यापुढे त्यामुळे प्रकट होतील. स्वामीनाम घेतले असता संसारबंधनात टाकणा-या वासना आणि पापाने निर्माण होणारे दैन्य तत्काळ नष्ट होईल. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही. कित्येक संतांची माझ्या या म्हणण्यास साक्ष आहे. स्वामीनामाची उत्तम कीर्ती आजवर अनेक संतांनी उच्चरवाने वर्णिली आहे. त्यांनी प्रतिज्ञापूर्वक जे सांगितले, तेच मी अमृता तुम्हाला प्रेमाने सांगत आहे. (प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांची काव्य नाम-मुद्रा "अमृता" अशी आहे. )


अभंग क्र. २

जन्मोनी संसारी, तोडी येरझारी । वायाचि माघारी, जासी कैंचा ॥१॥

स्वामीनामपाठ, मार्ग पाहे नीट । भक्तिप्रेमपीठ, घरा येई ॥२॥

बैसोनी निवांत, जळेल संचित । क्रियमाण खंत, नुरे काही ॥३॥

अमृतेचे घरा, स्वामीप्रेम झरा । प्रकटला खरा, नामपाठी ॥४॥

अर्थ  : हे मानवा, या पुण्यभूमीत तुला ईश्वरीकृपेने सारासार विचार करू शकणारा मानवजन्म मिळाला आहे. तेव्हा आता तू नामजपाच्या साधनेने जन्ममरणाच्या येरझारा चुकविण्याचा प्रयत्न कर. ते न करता परत परत जन्म-मरण चक्रातच कसा काय अडकतोस? स्वामीनामपाठ हा येरझारा चुकविण्याचा नेटका मार्ग आहे, त्या मार्गाने चालावयास लाग. त्यायोगे तुझ्या अंत:करणात विशुद्ध भक्तिप्रेमाचे प्रकटीकरण होईल. एका जागी बसून निश्चिंत मनाने नामजप कर. त्यामुळे तुझी जन्मोजन्मींची पापे जळून जातील. संचित कर्म शिल्लकच उरणार नाही. शिवाय आत्ता जी कर्मे हातून घडत आहेत, त्या क्रियमाण कर्मांचीही खंत तुला बाळगायला नको. नामजपाने अशा प्रकारे कर्मांचे बंधनच समूळ नष्ट होते. आपला नामजपाचा स्वानुभव सांगताना 'अमृता' (प.पू.श्री.शिरीषदादा कवडे) म्हणते की, या नामपाठाच्या अनुसंधानाने माझ्या घरी म्हणजेच अंत:करणात श्रीस्वामीप्रेमाचा अखंड वाहणारा आणि आल्हाददायक असा झुळुझुळू झराच प्रकट झालेला आहे !

अभंग क्र. ३

नाम संजीवनी, सप्रेम लाधली । तयासी साधली, साम्यकळा ॥१॥

कर्मसाम्यदशे, गुरुकृपावेध । सहज प्रबोध, उदेजला ॥२॥

भक्तियोगस्थिती, परंपरासार । धन्य तोचि नर, प्राप्तकाम ॥३॥

स्वामीकृपामेघ, अमृते वोळला । अखंडचि ठेला, वरुषत ॥४॥

अर्थ : ज्याला प्रेमयुक्त नाम घेण्याची इच्छा हीच जणू संजीवनी औषधी मिळाली, त्याला कर्मसाम्यदशा सहज प्राप्त होते. ( कर्मसाम्यदशा म्हणजे आपल्या पूर्वकर्मांमुळे जी प्रपंच करण्याविषयीची ओढ असते, ती संपून मनातूनच परमार्थ करण्याची ओढ लागणे.) या कर्मसाम्यदशेने, "श्रीगुरूंची भेट कधी होईल?" अशी तीव्र तळमळ लागते. अशाप्रकारे योग्य वेळ आली असता परंपरेने आलेल्या ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंची भेट होऊन त्या भाग्यवान जीवाला त्यांचा कृपानुग्रह लाभतो व आत्मज्ञान उदयाला येते. त्यानंतरच परंपरेचे सार असणारी भक्तियोगाची स्थिती प्राप्त होते. त्या स्थितीत 'काही मिळवावे' अशी इच्छाच माणसाला उरत नाही. 'अमृता' म्हणते की, अशी भक्ती मनात स्थिरावली की, श्रीस्वामींचा कृपा-मेघ आपल्यावर प्रसन्न होतो आणि अखंड कृपावर्षाव करीतच राहातो. हा श्रीस्वामींच्या नाम-संजीवनीचाच अद्भुत प्रभाव आहे.


॥श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ 

क्रमश:


सौजन्य : https://rohanupalekar.blogspot.com/

No comments:

Post a Comment