Sep 13, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ५३ ते ६० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.


महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


थोरल्या महाराजांनी पुढील काही भक्तीरसपूर्ण श्लोकांतून श्री गुरुचरित्र कथासाराचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे. ह्या सुलभ श्लोकांच्या पठणाने संपूर्ण श्रीगुरुचरित्राचे चिंतन-मनन दत्तभक्तांना सहजच करता येते आणि या दिव्य अवतारांच्या लीला वाचून प्रत्येक वेळी एक नवीनच अर्थ ध्यानांत येतो. श्री दत्तमहाराजांच्या लीला आपणांस वारंवार वाचण्यास, अनुभवण्यास मिळोत, हीच त्यांच्या चरणीं प्रार्थना !

 

नामधारक भक्ताय निर्विण्णाय व्यदर्शयत् ।

तुष्टः स्तुत्या स्वरूपं स श्रीदत्तः शरणं मम ॥५३॥

भावार्थ : ( परम सदगुरु दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी ) अत्यंत व्याकुळ झालेल्या नामधारक नावाच्या भक्ताने गुरूंची स्तुती केली असता, त्यांमुळे प्रसन्न होऊन ज्या कृपाळू दत्तप्रभूंनी (त्या नामधारकास ) आपले स्वरूप दर्शन देऊन त्यास तुष्टीभूत केले, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. 


यः कलिब्रह्मसंवादमिषेणाह युगस्थितीः ।

गुरुसेवां च सिद्धाऽऽस्याच्छ्रीदत्तः शरणं मम ॥५४॥

भावार्थ : ज्या परब्रह्माने सिद्धमुनींच्या मुखातून कलि आणि ब्रह्मदेव यांच्या संभाषणाच्या निमित्ताने सर्व युगांचे गुण-स्वभाव-वर्णन केले तसेच गुरुसेवेची महतीही कथन केली, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.  


दुर्वासःशापमाश्रुत्य योऽम्बरीषार्थमव्ययः ।

नानावतारधारी स श्रीदत्तः शरणं मम ॥५५॥

भावार्थ : दुर्वास ऋषींनी शाप दिलेल्या आपल्या अंबरीष नावाच्या भक्तासाठी, जो अविनाशी परमेश्वर या पृथ्वीतलावर अनेक अवतार घेता झाला, असा तो श्री दत्तात्रेय माझा आश्रयदाता आहे. 

अनसूयासतीदुग्धास्वादायेव त्रिरूपतः ।
अवातरदजो योऽपि श्रीदत्तः शरणं मम ॥५६॥

भावार्थ : जो परमात्मा अजन्मा असूनही, केवळ अनसूया सतीच्या दुधाचा स्वाद घेण्यासाठीच तीन रूपांत अवतरला, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. 


पीठापुरे यः सुमतिब्राह्मणीभक्तितोऽभवत् ।

श्रीपादस्तत्सुतस्त्राता श्रीदत्तः शरणं मम ॥५७॥

भावार्थ : पीठापूर नगरीतील सुमती नावाच्या ब्राह्मण स्त्रीचा भक्तिभाव पाहून जो श्रीपादरूपाने तिचा पुत्र व ( भक्तजनांचा ) उद्धारकर्ता झाला, असा तो श्री दत्तात्रेय माझा आश्रयदाता आहे. 


प्रकाशयामास सिद्धमुखात्स्थापनमादितः ।

महाबलेश्वरस्यैष श्रीदत्तः शरणं मम ॥५८॥

भावार्थ : ज्या श्रीपादांनी सिद्धमुनींच्या मुखातून महाबळेश्वर शिवलिंगाच्या प्रतिष्ठापनेची कथा आरंभापासून सांगितली आणि त्या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य जनकल्याणासाठी प्रकाशित केले, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. 


चण्डाल्यपि यतो मुक्ता गोकर्णे तत्र योऽवसत् ।

लिङ्गतीर्थमये त्र्यब्दं श्रीदत्तः शरणं मम ॥५९॥

भावार्थ : ज्या परमपावन गोकर्ण क्षेत्रांत महापापिणी चांडाळ स्त्रीलाही सत्वर मुक्ती मिळाली, अशा त्या तेजस्वी शिवलिंगमय तीर्थस्थानी ज्यांनी तीन वर्षे वास्तव्य केले, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.   


कृष्णाद्वीपे कुरुपुरे कुपुत्रं जननीयुतम् ।

यो हि मृत्योरपाच्छ्रीपाच्छ्रीदत्तः शरणं मम ॥६०॥

भावार्थ : ज्या श्रीपादश्रीवल्लभ स्वामींनी आपल्या कुरवपूर येथील कृष्णा नदीच्या द्वीपातील वास्तव्यात, आपल्या मातेसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या एका मंदबुद्धी पुत्रास अभयदान दिले, असे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.


|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||


क्रमश:

 

No comments:

Post a Comment