Oct 15, 2019

श्री साई चरित्रामृत - ३


ll श्री गणेशाय नमः ll श्री सद्‌गुरु साईनाथाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ll


संतश्रेष्ठ श्री साईबाबा यांचे आचरण आणि  शिरडीतील काही अद्भूत घटना 


साईचरित्रकार हेमाडपंत लिहितात, "जेव्हा धर्माचार्यांचे मानखंडण होते, कोणीही धर्माची आज्ञा मानत नाही, योग्य आचारविचारांकडे सामान्य जनांचे दुर्लक्ष होते. तेव्हा ईशाज्ञेनें संत अवतार घेतात." व्हावया वर्णाश्रमधर्मरक्षण । करावया अधर्माचे निर्दळण । दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण । क्षिती अवतरण संतांचे ।। शिरडी गावाची पुण्याई खरोखर थोर होती, त्यामुळेच साईंसारखे रत्न इथे वास्तव्यास आले. हा दुस्तर संसार ज्यांनी जिंकला होता, शांती हाच ज्यांचा अलंकार होता असे ज्ञानाचे भांडार, वैष्णवांचे माहेरघर साईनाथ शिरडी ग्रामीं आले. साई स्वतः कधीही प्रवचन वा वेदांतावर विवेचन देत नसत. तर केवळ या शाब्दिक उपदेशापेक्षा स्वतःच्या आचरणांतून व अनुभवांतून तें भक्तांना बोध देत असत. सत्‌पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन । या दासगणूंच्या रचनेंप्रमाणे त्यांचे वर्तन होते. भागवत पुराणांत भगवंत सांगतात, "जो माझी सेवा करतो,माझे भजन करतो व मला अनन्यपणें शरण येतो. तो होय मद्रूप जाण ! म्हणजेच तो भक्त माझेच रूप असतो."  श्री साईबाबाही हाच उपदेश करत असत. अनन्यभावें जर कोणी ईश्वराचे नामस्मरण करीत असेल, तर तो साईकृपेस नेहेमीच पात्र ठरत असे.

एकदा शिरडीस एक रोहिला आला. बाबांच्या दर्शनानें व वर्तनानें तो भारावून गेला. त्यानेही बाबांबरोबर मशिदीतच मुक्काम ठोकला. तो एखाद्या रेड्यासारखा शरीराने धष्टपुष्ट होता. तो कोणाचेही ऐकत नसे आणि त्याला हवें तसेच वागत असे. दिवस असो वा रात्र अथवा मशिदीत वा चावडीत कुठेही असो, तो रोहिला कुराणांतील कलमें मोठ्या आणि अत्यंत आवेशपूर्ण आवाजांत म्हणत असे. अगदी मध्यरात्रींही त्याचें उच्च स्वरांत कलमें म्हणणे चालू असे. साईमहाराज तर शांतीची प्रत्यक्ष मूर्तीच होते. परंतु, दिवसभर उन्हातान्हांत शेतांत काबाडकष्ट करणाऱ्या शिरडीवासियांना त्या वेळी-अवेळी सतत चालू असलेल्या खड्या आवाजातील कवनांमुळे अतिशय त्रास होऊ लागला.अगदी रात्रीही तें निवांत झोपू शकत नव्हतें. साईंना मात्र त्या रोहिल्याच्या मोठ्या आवाजाचा त्रास होत नव्हता. पण शिरडीतील गावकऱ्यांची 'इकडे आड,तिकडे विहीर' अशी अवस्था झाली होती. बाबांनीही आपल्याला पाठीशी घातलें आहे, हे पाहून आधीच अतिशय स्वैर वागणारा तो रोहिला अजूनच चढेल आणि ताठर झाला. लोकांशी सतत उद्दामपणें बोलू लागला, तसेच त्याचे वर्तनही अतिशय बेफाम होऊ लागले. अखेर, रात्रंदिन ती सतत किरकिर ऐकून गावकऱ्यांचा संयम संपला आणि तें सर्व त्या रोहिल्याच्या विरोधात गेले.  साईमहाराज शरणागतांसी कायम पाठीशीच घालत असत, त्यामुळें सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन या रोहिल्यास आपण समजवावें अशी विनंती करू लागलें. परंतु बाबा मात्र उलट 'हा रोहिला माझा अतिशय आवडता आहे, त्याला तुम्ही काही त्रास देऊ नका.' असें गावकऱ्यांसच सांगू लागले. आणिक वर "त्या रोहिल्याचे असे सतत भजन करणें माझ्यासाठी अतिशय हितकारक आहे, अन्यथा त्याची खाष्ट बायको रोहिली इथें येऊन मला अतिशय त्रास देईल. जेव्हा हा स्वतःच थकेल, मग आपणहूनच त्याचा हा घोष थांबेल." असेही साईनाथ गावकऱ्यांस वदलें. हे ऐकून गावकऱ्यांचा नाईलाज झाला आणि ते परतलें. हा रोहिला जरी वेडा पीर वाटत असला, तरी तो त्याच्या निजधर्मानुसार अत्यंत आनंदात कलमें पढत असे. भगवंताचे असे सतत नामस्मरण करणें, साईबाबांस आवडायचे. खरे पाहतां, ओलें-कोरडे मागून खाणारा तर कधी काही मिळाले नाही तर उपाशीही राहणारा अशा त्या रोहिल्याचे ना लग्न झालें होते, ना त्यास बायको होती. पण, जयासी हरिनामाचा कंटाळा । बाबा भीती तयाच्या विटाळा । म्हणती उगा कां रोहिल्यास पिटाळा । भजनीं चाळा जयातें ॥ केवळ याचसाठी त्यांनी रोहिल्यास कधीही कलमें पढण्यांस प्रतिबंध केला नाही. ग्रामस्थांचे गाऱ्हाणे त्यांनी ऐकून घेतलें नाही आणि ‘मद्भक्ता यत्र गायंति’ । तिष्ठें तेथें मी उन्निद्र स्थितीं । सत्य करावया हे भगवदुक्ति । ऐसी प्रतीति दाविली ॥          

साईबाबा आपल्या भक्तांस नामस्मरणाचे महत्त्व समजावें म्हणून आपल्या सन्मुख नामसप्ताह करून घ्यायचे. दासगणू महाराज बाबांचे परमभक्त होते. असेच एकदा, साईंनी दासगणूस नामसप्ताहाचा प्रारंभ करण्याची आज्ञा केली. त्यावर दासगणू महाराज "बाबा, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे, पण सप्ताहाची समाप्ती होताच मला विठ्ठल दर्शन झाले पाहिजे." असे म्हणताच बाबांनीही भावार्थी भक्त असल्यास विठ्ठल अवश्य प्रकटतो, असे निक्षून सांगितले. त्या सप्ताहाची समाप्ती होताच दासगणूंस शिरडीत विठ्ठल दर्शन होऊन साईनाथांची प्रचिती आली होती.

एखाद्या शिष्याचे आचरण कसे असावें, हे लोकांना कळण्यासाठी साईबाबांनी एक लीला केली. श्रोतें हो, मोहिद्दीनने साईंना कुस्तीत हरविलें ती कथा पूर्वीच वर्णन केली आहे. त्यानंतर साधारण पाच वर्षांनी अहमदनगर निवासी जव्हारअल्ली आपल्या शिष्यांसहीत राहात्याला आला. वीरभद्राच्या देवळाजवळची एक मोकळी बखळ पाहून त्या फकिराने तेथेच तळ ठोकला. राहात्यातील एक तरुण रहिवासी, भागू सदाफळ त्या जव्हारअल्लीचा सेवक झाला. जव्हारअल्ली मोठा विद्वान होता. कुराण शरीफ वगैरेंचा त्याचा दांडगा अभ्यास असून, त्यास तें मुखोदगत होते. अनेक परमार्थी,स्वार्थी आणि भाविक लोक त्याला शरण आले होते. तिथें त्याने इदगा बांधावयास प्रारंभ केला, पण काही काळानंतर त्यानें वीरभद्रदेव बाटविला, असा आरोप त्या जव्हारअल्लीवर आला. त्याला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलें आणि तो इदगा बंद पडला. राहाते गाव सोडून तो शिरडीला आला आणि बाबांजवळ मशिदीत राहू लागला. जव्हारअल्ली मृदुभाषी होता, त्याच्या त्या गोड बोलण्यानें सगळा शिरडी गाव त्याच्या भजनी लागला. तो साईबाबांनादेखील 'तू माझा चेला हो !' असे म्हणू लागला. श्रीसाईही मोठे विनोदी आणि खट्याळ होते. त्यांनी होकार देताच जव्हारअल्लीला अतिशय आनंद झाला. त्या फकिराचे दैव खरोखर बलवान होते. अन्यथा, ज्याचा सर्वत्र डंका गाजतो, असा शिष्य त्याला लाभला नसता. पुढें तो श्रींना राहाते गावी घेऊन गेला. खरी वस्तुस्थिती अशी होती की गुरूला या शिष्याच्या थोरवीची आणि ज्ञानाची काहीच जाणीव नव्हती. शिष्याला मात्र गुरूचा उणेपणा पुरतां ज्ञात होता. तरीदेखील गुरूचा केव्हाही अनादर न करता साईंनी आपलें शिष्य-धर्माचे कर्तव्य पूर्णपणें पार पाडले. त्यांनी जव्हारअल्लीने केलेली प्रत्येक आज्ञा गुर्वाज्ञा म्हणून वरचेवर झेलली. त्याच्या घरीं पाणीसुद्धा भरले. अशाप्रकारे बाबा राहात्यास जाऊन बरेच दिवस लोटले. त्यांमुळे ते शिरडीला आता अंतरलें, असे शिरडीकरांस वाटू लागले. शिरडीतील साईंच्या अनेक शिष्यांस बाबांच्या वियोगाचें दु:ख असह्य झाले. शेवटी, सर्वांनी विचार विनिमय करून राहात्यास जाऊन बाबांस शिरडीत परत आणण्याचा निश्चय केला. मग काही भक्त राहात्यास त्या इदग्याजवळ गेलें आणि बाबांना शिरडीस परतण्याची प्रार्थना करू लागलें. परंतु साईबाबा मात्र, "हा फकीर भलताच रागीट आहे. तुम्ही काही त्याच्या नादी लागू नका. तो मला कधीही सोडणार नाही. तो माझा गुरु एवढ्यांतच गावातून इथे येईल आणि तुम्ही मला न्यायला आला आहात, असे कळतांच क्रोधायमान होईल. तेव्हा तुम्ही सत्वर इथून निघा." असे त्यांस सांगू लागले. इतक्यांत तो जव्हारअल्ली तिथें आला, व शिरडीकरांस म्हणाला,"तुम्ही या पोराला परत शिरडीस घेऊन जाण्यासाठी आला असाल, तर उगाच या फंदात पडू नका." अर्थात असे जरी तो त्या ग्रामस्थांस आरंभी बोलला, तरी त्या भक्तांना पाहून तो मनात कचरला होता. अखेर, " मलाही या मुलाबरोबर शिरडीला घेऊन चला." असे म्हणू लागला. अशा रितीनें, त्या जव्हारअल्लीसह साई शिरडीत परत आले. त्या जव्हारअल्लीच्या भ्रमाचा भोपळा पुढें लवकरच फुटला. एकदा, देवीदास बुवा आणि जव्हारअल्ली यांच्यात शास्त्रीय वादविवाद रंगला, त्यांत बैरागीबुवांनी त्या फकीरास वादात जिंकले आणि त्याला शिरडीतून हाकलून लावले. तो जव्हारअल्ली मग वैजापुरांत जाऊन राहिला. त्यानंतर कित्येक वर्षांनी शिरडीला परत येऊन त्याने साईनाथांना नमस्कार केला. तोपर्यंत त्याचा आपण गुरु आणि साई चेला, ह्या भ्रमाचे पुरतें निरसन झालें होते. बाबांनीही त्या पश्चात्तापग्रस्त फकिराचे पूर्ववत स्वागत करून त्याचा सत्कार केला.

ऐसी बाबांची अगाध लीला । निवाड होण्याचा तेव्हां झाला । परी तो गुरु आपण चेला । भाव हा आदरिला तेथवर ॥तयाचें गुरुपण तयाला । आपुलें चेलेपण आपणाला । हा तरी एक उपदेश एथिला । स्वयें आचरिला साईनाथें ॥




बाबांची ती निर्विषय स्थिती पाहून लहान-थोर सर्वच चकित होत असत. मशिदीत राहण्यापूर्वी साईमहाराज तकियात राहत असत. बराच काळ तें तिथें रमले होते. पायांत घुंगरू बांधून,खंजिरीच्या तालावर बाबा नाचत आणि प्रेमानें मधुर गाणेही म्हणत. आरंभी, साईंना दीपोत्सवाची अतिशय आवड होती. दीप लावण्यासाठी तेल मागायला तें स्वतःच दुकानदारांकडे जात. टमरेल हातांत घेऊन साई वाणी आणि तेली यांच्या दुकानांत जाऊन तेलाची भिक्षा मागत असत. नंतर मशिदीत येऊन ते तेल पणत्यांत भरीत असत आणि त्या पणत्यांच्या प्रकाशात देवळें आणि मशिद उजळून टाकत असत. त्यांचा हा दीपराधनेचा क्रम खंड न पडतां काही दिवस चालला होता. दिपवाळी दिवशींही ह्या दीपोत्सवासाठी बाबा चिंध्या काढून वाती वळत असत आणि मशिदींत दीप प्रज्वलित करीत. परंतु, बाबा रोजच हे फुकटचें तेल मागायला येतात, ही त्या दुकानदारांस कटकट वाटू लागली. एके दिवशी त्या सर्वांनी कपटी योजना करण्याचे ठरविले. नित्यनियमानुसार साईमहाराज जेव्हा तेल मागायला गेले, तेव्हां आपल्या योजनेनुसार त्या वाणी आणि तेल्यांनी तेल त्यांस दिले नाही, सर्वांनीच बाबांस तेल देण्यास नकार दिला. करुणेचा पुतळा साई निमूटपणें परत मशिदीत आले. त्यांनी तें कोरडेच कांकडे पणत्यांत ठेवले. तेलाशिवाय बाबा आतां दिवे कसे लावणार ? याची वाणी लोक मौज पाहत होते. बाबांनी मशिदीच्या जोत्यावरील टमरेल उचलून घेतले. महत्प्रयासानें सांजवात लागेल इतकें, अगदी इवलेसे तेल त्यांत शिल्लक होते. बाबांनी त्या तेलात पाणी घातलें आणि तें पिऊन टाकले. अशा प्रकारे ते थोडेसे तेल ब्रह्मार्पण करून बाबांनी निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यांत ओतून सुके कांकडे पूर्ण त्यांत भिजविले आणि त्यांना काडी ओढून लावली. तो काय महदाश्चर्य ! सर्व पणत्या पेटल्या. पाण्यावर उजळलेल्या त्या पणत्या पाहून वाणी लोकांनी आश्चर्यानें तोंडात बोटें घातली आणि बाबांना तेल न दिल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. तेल नाकारणारे व्यापारी । मशिदीत आले झडकरीं । लोटांगण श्री चरणांवरी । पाहा तयांनी घातले ।। परंतु, बाबांच्या मनात मात्र त्यांच्याबद्दल काहीही रागद्वेष नव्हता. अशा रीतीने, पणत्या सारी रात्र अखंड उजळत राहिल्या, सारें ग्रामस्थ जन हा साईनाथांचा चमत्कार पाहून दंग झाले. 

अनेक थोर विभूतीं, संतमंडळींकडून असे चमत्कार घडलें आहेत. अशा घटना केवळ लोकांच्या उद्धारासाठीच आणि ईश्वराठायीं श्रद्धा वाढावी यासाठीच असतात. साईबाबांसारखे संतश्रेष्ठ ज्यांचे वर्णन करतांना चारही वाणी आणि चारही वेद यांनी हार मानली, तसेच षटशास्त्रें आणि पुराणें ज्यांचे गुणवर्णन करण्यास असमर्थ ठरली आहेत, अशा त्यांच्या लीला अगाध आहेत.  


क्रमश: 


No comments:

Post a Comment