Oct 1, 2019

श्री साई चरित्रामृत - २


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सद्गुरू साईनाथाय नमः ।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।।


श्री साईबाबांचे शिरडीतील सुरुवातीचे वास्तव्य आणि दिनक्रम 


शिरडीत आल्यावर साईबाबा मशिदीत राहू लागले. बाबांच्या शिरडीतील पुनरागमनाच्या साधारणपणें १०-१२ वर्षे  आधी देवीदास नावाचे एक वैरागी सत्पुरुष मारुतीच्या देवळांत वास्तव्यास होते. साई त्यांच्याबरोबर काही काळ घालवीत असत. कधी त्यांची बैठक चावडीत तर कधी मारुतीरायाच्या मंदिरात असे. अशाप्रकारे लहर येईल तेथे स्वच्छंदपणे बाबा राहत असत.पुढे जानकीदास नावाचे महानुभावी गोसावी शिरडीत आले. त्या जानकीदासांबरोबर साई महाराज नित्य गप्पा- गोष्टी करत असत किंवा मग जेथे साई असत तिथे जानकीदास येत असत. उभयतांसी मोठे प्रेम । बैठकी होती नित्यनेम । ऐसा तयांचा समागम । सुख परम सकळिकां ।। 

तरुणवयांत साई डोक्याचे केस सबंध राखीत व डोके कधीच मुंडवीत नसत. तसेच त्यांचा पोशाखही एखाद्या पहिलवानाप्रमाणे असे. बाबा जेव्हा राहात्याला जात असत, तेव्हा झेंडू, जाई, जुई वगैरेंची रोपें आणीत आणि आपल्या हातांनी उजाड जागेत लावीत. त्या रोपांस नित्य पाणीही घालीत असत. बाबांचे भक्त वामनराव गोंदकर व तात्याबा कोते पाटील त्यासाठी मातीचे दोन कच्चे घडे दररोज पुरवीत असत. विहिरीवरील कुंडीमधून पाणी त्या घड्यांत भरून बाबा ते घडें खांद्यावर वाहून आणीत असत आणि रोपांस आपल्या हातांनी पाणी शिंपीत असत. संध्याकाळ होताच ते घडें निंबातळीं ठेवीत असत. ठेवण्याचाच अवकाश तेथ । जागचे जागीच भंगूनि जात । उदयीक तात्या आणूनि देत । घडें तयांप्रत नूतन ।। तीन वर्षे हाच उद्योग करून बाबांनी त्या उजाड जागेंत बाग फुलवली. त्याच जागी नंतर सुयोगाने साठे वाडा उभा राहिला व सुरुवातीला साईभक्तांच्या राहण्यासाठी फारच उपयुक्त ठरला. 

पुणतांबे येथील गंगागीर नावाचे एक महाप्रसिद्ध वैष्णव आणि ब्रह्मचर्याश्रमी यांचे शिरडीस वरचेवर आगमन होत असे.प्रथम जेव्हा दोन्ही हातांत मातीच्या घागरी भरून रोपांसाठी विहिरीवरून पाणी वाहतांना साईबाबांना त्यांनी पाहिले, तेव्हा गंगागीरांस मोठे आश्चर्य वाटले. परंतु समारोसमोर भेट होताच,गंगागीरबुवा स्पष्टपणे म्हणाले, " या शिरडीचे भाग्य खरोखर धन्य आहे. हा खांदा आज पाणी वाहतोय खरा, पण ही मूर्ती सामान्य नाहीं. या भूमीचे काही पुण्य होतें, म्हणूनच हे श्रेष्ठ रत्न इथें आले."

तसेच आणिक एक महाविख्यात संत आनंदनाथ यांचेही 'हे साईनाथ अद्भुत कार्य करतील.' असेच भाकित होतें. अक्कलकोटवासी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे आनंदनाथ शिष्य होते. एकदा शिरडी येथील माधवराव देशपांडे, दगडू गायके, नंदराम मारवाडी व भागचंद मारवाडी अशी काही भक्त मंडळी आनंदनाथ महाराजांच्या दर्शनास येवले येथील त्यांच्या मठांत गेली होती. तेथून ते सर्व  परत येत असतांना आनंदनाथ महाराज त्यांच्या बैलगाडीत बळेच बसले आणि " मलाही शिरडीस यावयाचे आहे. " असे म्हणून शिरडीस आले. तिथे साईबाबांना समक्ष पाहून ते म्हणाले, " अहो ! हा प्रत्यक्ष हिरा आहे हिरा... आज जरी हा उकिरड्यावर राहतोय, तरी हा हिरा आहे, गारगोटी नव्हें ! माझे हे बोल ध्यानांत ठेवा, पुढें तुम्हांस याची प्रचिती येईल." आनंदनाथांनी जेव्हा हे उद्गार काढले तेव्हा, बाबांचे केवळ पोरवय होते. असे भविष्य वर्तवून आनंदनाथ महाराज येवल्यास परतले. 

खरोखर, प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार असलेले हे संत स्वतः निर्विकार असून जगताचा उद्गार आणि कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात. पुढे काही कालांतराने एक आश्चर्यकारक घटना घडली. मोहिद्दीन तांबोळी नावाच्या पहिलवानाबरोबर साईबाबांचा काही बेबनाव होऊन त्यांची कुस्ती जुंपली. त्यांत बाबा हरले. तेव्हापासून मग निश्चय करून बाबांनी आपला पोशाखच बदलला. साईंनी त्यानंतर अंगावर कफनी ओढली, लंगोट लावला आणि डोक्याला एक फडका गुंडाळला. गोणपाटाचे बसण्यासाठी आसन केले, गोणाचेच अंथरूण केले. असे फाटके तुटके नेसून त्यांतच ते समाधान मानू लागले. ह. भ. प. दासगणू महाराज विरचित भक्तिसारामृत या ग्रंथात अध्याय २६ मध्ये याविषयीं थोडी वेगळी कथा आहे. त्यानुसार बाबांचे गुरु गोपाळराव देशमुख यांनी आपल्या डोक्याचे फडके काढून बाबांच्या डोक्यांस बांधले आणि शिरडीकडे जाण्याची आज्ञा केली. चांद पाटील यास जेव्हा साई प्रथम भेटले, तेव्हाही त्यांचा पोशाख कफनी आणि डोक्यावर टोपी असाच होता. त्यावरून ही कथा जास्त योग्य वाटते.असो. गंगागीरांच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्यांना तालीमबाजीची फार आवड होती. एकदा कुस्ती खेळतांना एका सिद्धपुरुषाचे अनुग्रहपर शब्द कानीं पडले,आणि त्यांस वैराग्य प्राप्त झाले. संसारावर पाणी सोडून गंगागीर परमार्थ भजनाला लागले. पुणतांब्याजवळ गोदावरी नदीच्या दोन प्रवाहांमधील बेटावर गंगागीर बुवांचा मठ आणि शिष्यही आहेत. 

पुढें साईनाथ कोणी काही विचारले तर उत्तर देत व स्वतः आपण कोणाबरोबर बोलत नसत. दिवसा त्यांची बैठक निंबाखाली असे, तर कधी गावाच्या सीमेवरच्या ओढ्याजवळील बाभूळीच्या सावलीत बसत. "गरिबी अव्वल बादशाही । अमीरी से लाख सवाई । गरिबों का अल्ला भाई ।" अक्षयीं साई वदत कीं ।।


बायजाईची साई भक्ती आणि बाबांचे भिक्षाटन 


Image result for sai satcharitra adhyay 8

त्या शिरडींत काही लोक मात्र बाबांचे श्रेष्ठपण जाणत होते. तात्या कोते यांची आई, बायजाबाई डोक्यावर टोपलीत भाजी-भाकरी घेऊन रानांत जात असे. भर दुपारी रानावनांत कोस न कोस अंतर चालत, दाट झाडें-झुडपें यांत ह्या वेड्या फकिरांस शोधत फिरत असे. त्यांच्या पाया पडून आपल्या हातांनी बाबांस भाजी-भाकरी वा घरून आणलेलें खास अन्न भरवीत असे. साईंनी अन्न ग्रहण केल्याशिवाय बायजाई जेवत नसें. त्या माऊलीच्या सत्त्वाची किती थोरवी गावी,बरें ! गणपतराव कोते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी बायजाबाई ह्या उभयंतांची बाबांवर अपार श्रद्धा होती. फकीरचि देव त्या उभयतांचा । भावार्थियाचाच देव कीं ।। हे धार्मिक,सहृदयी आणि सात्विक दाम्पत्य जेव्हा श्री साईबाबांच्या प्रथम भेटीस गेले, त्या प्रसंगाचे वर्णन श्री. कवडे महाराजांनीं आपल्या 'श्री संत साईमहाराज यांचे चरित्र' या पुस्तकांत अत्यंत सुरेख केले आहे. ते म्हणतात, "सौ. बायजाबाई दर्शनास येताच महाराज तात्काळ उठून उभे राहिले. चुकलेल्या वासराला अचानक आपली माय दिसावी, तसे तें सौ. बायजाबाईंकडे आशाळभूतपणें पाहू लागले. जणू पूर्वजन्मींचा संबंध ते या जन्मी निश्चित करत होते." साईबाबा नेहेमीच ध्यानस्थ असत. बायजाई पान मांडून टोपलीतले अन्न त्यांत वाढत असे. साई कधी खात तर कधी बायजाबाई प्रयत्न करून त्यांस खाऊ घालत असे. हा क्रम बरेच दिवस चालला होता. पुढें बाबांनी रान सोडले आणि ते गावांत येऊन राहू लागले. मशिदीत वास्तव्यास आल्यावर साईबाबांनी भिक्षा मागण्यास प्रारंभ केला. अशा रितीने बायजाईचे बाबांना शोधत राना-वनांत फिरण्याचे कष्ट वाचले. पाटील दाम्पत्यांनी हा बाबांस जेवू घालण्याचा / नैवैद्य अर्पण्याचा नेम आजन्म चालविला. तो तसाच त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने, तात्या कोते पाटील यांनीही चालू ठेवला. श्री साईबाबांच्या समाधीनंतरही कोते घराण्यांतून आजही श्रींस नेवैद्य जात आहे. 

श्रेष्ठ संत श्री साई यांचे आचरण एखाद्या फकीराप्रमाणे होते. ते सर्वकाळ आत्मानंदात रंगलेले असत. सुरुवातीच्या काळांत बाबा भिक्षेकरी होऊन "पोरी, आण गें चतकुर भाकरी !" असे म्हणत ठराविक घरासमोर उभे राहून भिक्षा मागत. ठराविक ऐशा पाच घरीं । बाबा मागत भाकरी । त्यांतून अन्न उरलें जरी । खाऊ घालीत श्वानांसी ।। श्री. गणपतराव व बायजाबाई कोते पाटील, राधाबाई गोंदकर पाटील, श्री. संताजी शेळके पाटील, नंदराम शेट मारवाडी आणि श्री अप्पाजी कोते पाटील ह्या भाग्यवानांच्या दारी श्रीसाई भिक्षा मागत असत. एका हातांत टमरेल आणि दुसऱ्या हातात फडक्याची चार टोकें एकत्र करून भिक्षेसाठी बनवलेली झोळी घेऊन स्वतः दररोज ठरलेल्या घरी फिरत असत. शिजलेला भात किंवा भाकरी यासाठी झोळी तर भाजी, दूध,ताक यांसारख्या कुठल्याही पातळ पदार्थांसाठी टमरेलाचा उपयोग करीत असत. यदृच्छेनें जे जे अन्न मिळत असे, त्यांवरच तें संतुष्ट असत. श्रीसाई भिक्षासुद्धा नियमित मागत नसत. कधी एका वेळेस तर कधी दिवसातून दहा-बारा वेळांही भिक्षा मागत असत. मशिदीमध्ये एक पसरट मातीचे वा दगडाचे भांडे होते. मिळालेले अन्न साईबाबा त्या भांड्यात ठेवीत असत. त्यांतच कावळे, कुत्रें येऊन खात असत. मशिद व त्यापुढील अंगण झाडणारीसुद्धा त्यांतील दहा-बारा भाकरीं घेऊन जात असे. कोणालाही बाबांनी कधी अन्न खाण्यास वा घेऊन जाण्यास मज्जाव केला नाही. आरंभी हा वेडा फकीर । येचि नामें जनां महशूर । तुकडें मागुनि भरी जो उदर । कैंचा बडिवार तयाचा ।। श्री साईबाबांचा हा क्रम समाधीच्या आदल्या दिवसापर्यंत चालू होता. 


क्रमश:


No comments:

Post a Comment