Mar 18, 2017

श्री स्वामी समर्थ स्तवन


॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः॥
नाही जन्म नाही नाम । नाही कुणी माता पिता । प्रगटला अदभुतसा । ब्रह्मांडाचा हाच पिता ॥१॥ नाही कुणी गुरुवर । स्वयें हाच सुत्रधार । नवनाथी आदिनाथ । अनाथांचा जगन्नाथ ॥२॥ नरदेही नरसिंह । प्रगटला तरुपोटी । नास्तिकाच्या कश्यपूला । आस्तिकाची देण्यागती ॥३॥ कधी चाले पाण्यावरी । कधी धावे अधांतरी । यमा वाटे ज्याची भीती । योगीश्वर हाच यती ॥४॥ कधी जाई हिमाचली । कधी गिरी अरवली । कधी नर्मदेच्या काठी । कधी वसे भीमातटी ॥५॥ कालीमाता बोले संगे । बोले कन्याकुमारीही । अन्नपूर्णा ज्याचे हाती । दत्तगुरु एकमुखी ॥६॥ भारताच्या कानोकानी । गेला स्वये चिंतामणी । सुखी व्हावे सारे जन । तेथे धावे जनार्दन ॥७॥ प्रज्ञापुरी स्थिर झाला । माध्यान्हीच्या रविप्रत । रामानुज करी भावे । स्वामी पदा दंडवत ॥८॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री स्वामी समर्थ मानसपूजा


|| श्रीगणेशाय नम: ||


नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ती रूपम ||

ब्रह्मस्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||

कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हाविण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||

पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती  ||

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||

शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवू या मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा ||

प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||

ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||

दही दूध शुद्धोदकाने तयाला || पंचामृत स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुताऱ्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती

म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली  ||

महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळे ना जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता  ||

अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||

सुगंधित भाळी टिळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||

शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||

चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधित हा धूप नानाप्रतिचा ||

पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची || १४ ||

हृदयमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||

करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||

निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||

पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||

पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||

प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||

नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||

हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||

मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अंतरी स्वामी देव || २२ ||


श्री दत्तमहाराजार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ll  ll स्वामी ॐ ll



Mar 17, 2017

श्री स्वामीं समर्थ प्रार्थना


।। श्री गणेशाय नमः ।। 

।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः।।


भाव नाही अंतरी, कोरडा पाषाणापरी ।

स्वामी समर्था तुजसी, प्रार्थू कैशापरी ||१||


तव नामाचे प्रेम, नाही मम अंतरी ।

काम क्रोध मोहे, मी विटाळल्यापरी ||२||


रुप तुझे पाहू ऐसी, न निर्मलता दृष्टीपरी ।

कृपा तुझी पावू, नाही सद्गुण एकही परी ||३||


मग कैशा परी आळवू, तुम्हां समर्था तरी ।

स्वामी कथितो तुम्हां परी, दयाळू तव कृपेची ना सरी ||४||


कृष्णदास शरणी जाण, स्वामी उभवी कृपाकरी ||


।। श्री गुरुदत्तात्रेयायर्पणमस्तु ।। 

।। श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ ।।



Mar 16, 2017

श्री नृसिंहसरस्वती महाराज मनोहर पादुका श्री क्षेत्र नृसिंहवाडी


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि । 

अमरेश्वरातें पुसोनि । निघते झाले तये वेळीं ॥ ७३ ॥ 

श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी । 

विनविताति करुणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥ ७४ ॥ 

नित्य तुमचे दर्शनेसीं । तापत्रय हरती दोषी । 

अन्नपूर्णा तुम्हांपाशीं । केवीं राहूं स्वामिया ॥ ७५ ॥ 

येणेपरी श्रीगुरुसी । योगिनी विनवीती भक्तीसी । 

भक्तवत्सलें संतोषी । दिधला वर तया वेळीं ॥ ७६ ॥ 

श्रीगुरु म्हणती तयांसी । सदा असो औदुंबरेसी । 

प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचे येथेचि असे ॥ ७७ ॥ 

तुम्ही रहावे येथे औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी । 

अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥ ७८ ॥ 

कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर । 

अमरापुर पश्चिम तीर । आम्हा स्थान हेचि जाणा ॥ ७९ ॥ 

प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत । 

मनकामना होय त्वरित । तुम्ही त्यांसी साह्य व्हावें ॥ ८० ॥ 

तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी । 

पूजा करिती जे तत्परी । मनकामना पुरती जाणा ॥ ८१ ॥ 

येथे असे अन्नपूर्णा । नित्य करिती आराधना । 

तेणें होय कामना । चतुर्विध पुरुषार्थ ॥ ८२ ॥ 


- गुरुचरित्र अध्याय १९ 



Mar 1, 2017

श्री दत्त महाराज पालखी


।। श्री गणेशाय नमः ।।

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।


कुणीतरी न्या हो मज तया गाणगापुरी

मूर्ती अदृष्य परी पद दाखवा ती गोजीरी ।। १।।


सुस्नान करुनी मी भीमा अमरजा तीरी

धन्य होईन प्रदक्षिणे तया पिंपळ उंबरी ।। २।।


चार घटिका कुंडाशी त्या पाराशी थांबुन

लीला चरित्र ते गुरु कौतुक आठवीन ।। ३ ।।


भक्त सोयरे देखीन तया डोळ्यात साठवीन

भूमी पावित्र चुंबुन तेथ नतमस्तक होईन ।। ४ ।।


तया पादुका वरी माझा जीव ओवाळीन

तया पालखीच्या भोई मी चरणी लोळीन ।। ५।।


तया चैतन्य प्रवाही ऋणी याचक होईन

कण विभुती होत अवघा जन्म हा देईन ।। ६।।


कली असुनी जन्म ब्रह्मपदासी मिरवीन

अर्थ ऐसा मी माझ्या भक्तीने बदलीन ।। ७ ।।


।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।