Sep 14, 2026

श्रीपंचश्लोकिगणेशपुराणम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीविघ्नेशपुराणसारमुदितं व्यासाय धात्रा पुरा,      तत्खण्डं प्रथमं महागणपतेश्चोपासनाख्यं यथा । संहर्तुं त्रिपुरं शिवेन गणपस्यादौ कृतं पूजनम्,      कर्तुं सृष्टिमिमां स्तुतः स विधिना व्यासेन बुद्ध्याप्तये ॥१॥ भावार्थ - पूर्वी ब्रह्मदेवाने व्यासमुनींना श्रीविघ्नेश अर्थात श्रीगणेश पुराणाचे सार सांगितले होते. श्रीमत महागणपतीच्या पूजेच्या अर्थाचा हा पहिला खंड आहे. त्रिपुराचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी प्रथम गणपतीची पूजा केली. तसेच ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी आणि तदनंतर व्यासमुनींनी ज्ञानप्राप्तीसाठी श्रीगणरायाची यथोचित स्तुती केली.  सङ्कष्ट्याश्च विनायकस्य च मनोः स्थानस्य तीर्थस्य वै,      दूर्वाणां महिमेति भक्तिचरितं तत्पार्थिवस्यार्चनम् । तेभ्यो यैर्यदभीप्सितं गणपतिस्तत्तत्प्रतुष्टो ददौ,      ताः सर्वा न समर्थ एव कथितुं ब्रह्मा कुतो मानवः ॥२॥  भावार्थ - संकष्टी आणि विनायक चतुर्थी, श्रीगणेशाचे मंत्र, स्थान, तीर्थ, दुर्वांकुर यांचे माहात्म्य तसेच श्रीगणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पूजनाचे माहात्म्य वर्णन करणारे हे भक्तिचरित्र आहे. श्रीगणेशभक्तांच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या गणरायाने त्यांच्या सर्व अभीष्ट मनोकामना पूर्ण करून त्यांना संतुष्ट केले. त्याच्या कृपावैभवाचे पूर्ण वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवही करू शकत नाही, मग तिथे सामान्य मानवाचा काय निभाव लागणार ?    क्रीडाकाण्डमथो वदे कृतयुगे श्वेतच्छविः काश्यपः,      सिंहाङ्कः स विनायको दशभुजो भूत्वाथ काशीं ययौ । हत्वा तत्र नरान्तकं तदनुजं देवान्तकं दानवम्,      त्रेतायां शिवनन्दनो रसभुजो जातो मयूरध्वजः ॥३॥ भावार्थ - आता मी श्रीगणेशाच्या क्रीडाकांडाचे वर्णन करतो. सत्ययुगात दहा भुजा असलेले, श्वेतकांतिमान, सिंहध्वज असलेले कश्यपपुत्र विनायक अर्थात महोत्कट काशीनगरांत गेले. तेथे त्यांनी नरांतक आणि त्याचा धाकटा भाऊ देवांतक या असुरांचा वध केला. पुढे त्रेतायुगात षड्बाहू शिवपुत्र मयूरध्वज या रूपात ते अवतरित झाले. हत्वा तं कमलासुरं च सगणं सिन्धुं महादैत्यपम्,      पश्चात् सिद्धिमती सुते कमलजस्तस्मै च ज्ञानं ददौ । द्वापारे तु गजाननो युगभुजो गौरीसुतः सिन्दुरम्,      सम्मर्द्य स्वकरेण तं निजमुखे चाखुध्वजो लिप्तवान् ॥४॥ भावार्थ - श्रीगणेशाने कमलासुर आणि महादैत्यपती सिंधूचा त्याच्या सैन्यासहित वध केला. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना सिद्धी आणि बुद्धी नावाच्या आपल्या दोन कन्या दिल्या तसेच ज्ञानही दिले. पुढे द्वापारयुगात ते गौरीपुत्र आणि विशाल बाहु असलेल्या गजाननरूपांत अवतरित झाले. मूषकध्वज धारण करणाऱ्या गजाननाने आपल्या हातांनी सिंदुरासुराचा वध केला आणि (सिंदुर) स्वतःच्या मुखाला/अंगाला लावला.  गीताया उपदेश एव हि कृतो राज्ञे वरेण्याय वै,      तुष्टायाथ च धूम्रकेतुरभिधो विप्रः सधर्मर्धिकः । अश्वाङ्को द्विभुजो सितो गणपतिर्म्लेच्छान्तकः स्वर्णदः,      क्रीडाकाण्डमिदं गणस्य हरिणा प्रोक्तं विधात्रे पुरा ॥५॥ भावार्थ - श्रीगणेशाने संतुष्ट होऊन राजा वरेण्य यास गणेश-गीतेचा उपदेश केला. पुढे, म्हणजेच कलियुगात श्रीगणपती द्विभुज, धर्मशील विप्ररूपांत धुम्रकेतू म्हणून अवतरित होतील. त्यांच्या ध्वजावर अश्वचिन्ह असेल. हा अवतार म्लेच्छांचा नाश करणारा आणि सुवर्ण प्रदान करणारा म्हणून वर्णिला आहे. श्रीगणपतीच्या या क्रीडाकांडाचे माहात्म्य पूर्वी भगवान श्रीहरि विष्णूंनी ब्रह्मदेवांना कथन केले होते. एतच्छ्लोकसुपञ्चकं प्रतिदिनं भक्त्या पठेद्यः पुमान् । निर्वाणं परमं व्रजेत् स सकलान् भुक्त्वा सुभोगानपि ॥ भावार्थ - जो मनुष्य दररोज या पाच श्लोकांचे श्रद्धापूर्वक पठण करेल, त्याच्या सर्व अभीष्ट मनोकामना पूर्ण होऊन त्याचे इह-परत्र परमकल्याण होईल.    ॥ इति श्रीपंचश्लोकिगणेशपुराणम् ॥


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.