॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
नमस्कार दत्तभक्तहो ! परब्रह्मस्वरूप श्री दत्तमहाराजांची कुठल्याही स्वरूपांत थोडीफार सेवा घडावी, याच हेतूने श्रीदत्ताशिष या ब्लॉगची निर्मिती झाली. श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचे आणि एकूणच दत्त संप्रदायांतील विविध ग्रंथ, स्तोत्र-मंत्र, व्रत-वैकल्य, विविध उपासना यांबरोबरच या संप्रदायांतील अनेक थोर संतपुरुष यांची महती/ संकलित माहिती या ब्लॉगवर दत्तभक्तांना सहजपणे उपलब्ध व्हावी, हेच त्यावेळी प्रामुख्याने उद्दिष्ट होते. हे सर्व लेख प्रकाशित करतांना प्रत्येकवेळी मूळ स्रोतांचा, लेखकांचा आवर्जून उल्लेख करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. श्रीदत्तमहाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आपला उत्तम प्रतिसादही या संकल्पास मिळत गेला.
पुढें दत्तभक्तांच्या आग्रहानुसार संस्कृतमध्ये रचलेली काही दिव्य स्तोत्रं-मंत्र यांचा भावार्थ सर्वांना कळावा आणि समजून उमजून उपासना घडावी यासाठी काही लेखन घडले. त्याचप्रमाणे श्रीगुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, श्रीगुरुलीलामृत, श्रीगजानन विजय, श्री साई सत्चरित्र यांसारख्या परम प्रासादिक ग्रंथांविषयी केलेले क्वचित थोडेफार चिंतनपर लेखही प्रकाशित केले. त्या भक्तवत्सल अत्रिनंदनाची घडलेली ही अत्यल्प लेखनसेवा ही केवळ आणि केवळ त्यांच्या कृपाशीर्वादस्वरूपाने घडली अशीच सदैव भावना असल्याने, ' इदं न मम् ' अशीच भूमिका आजवर घेतली आहे. त्यांमुळे अनेकदा कित्येक वाचकांनी या ब्लॉगवरील लेखन इतरत्र वापरले गेले आहे, हे निदर्शनास आणून दिल्यावरही आजपर्यंत कधीच खंत वाटली नाही. काही वर्षांपूर्वी श्रीशंकर भट्टलिखित आणि प. पू. हरिभाऊ निटूरकर जोशीमहाराज अनुवादित श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ वाचला आणि आपणही श्रीपाद श्रीवल्लभांच्या या लीला साररूपांत लिहाव्यात असे वाटले. जेणेकरून भाविकांच्या मनांत मूळ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा प्रासादिक ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण होईल. प्रभूंच्या प्रेरणेने या ब्लॉगवर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचे अध्याय १ ते १२ प्रकाशितही झाले. अनेक भाविकांनी ते आवडल्याची पोचही दिली. हे सर्व अध्याय इथे उपलब्ध आहेत. हे सर्व लेखन करतांना ग्रंथकारांच्या मूळ दिव्य रचनेस कधीही धक्का लागू न देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. जाणता-अजाणता काही चूक झाल्यास अथवा त्रुटी राहिल्यास ती सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मात्र श्रीदत्ताशिष ब्लॉगच्या काही वाचकांनी हा व्हिडीओ निदर्शनास आणून दिल्यावर मन व्यथित झाले.
या व्हिडीओतील मूळ अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ११ हा या ब्लॉगवर वाचू शकता.
मुळातच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षरसत्य आणि दिव्य स्पंदनाने भरलेला ग्रंथ आहे, याची ग्वाही श्रीपाद प्रभूंचे कृपांकित श्रीशंकर भट्ट व हरिभाऊ निटूरकर यांनी असंख्य वेळा दिली आहे. तसेच प्रत्येक अध्यायांची फलश्रुतीही त्यांनी स्पष्टपणे कथिली आहे. त्यामुळे या परम प्रासादिक ग्रंथाच्या मूळ मजकूरातील आशयांत बदल करण्याचा अधिकार आपल्यासारख्या सर्व-सामान्य भाविकांना नक्कीच नाही.
अर्थात ऐहिक सुखाची कामना हेच बहुधा आपले मागणे असते आणि त्यांत गैर काही नाही. मात्र, '१०० वर्षाने आला हा योग, अमुक हा वार संपण्यापूर्वी हा अध्याय ऐका, घरातून वाईट शक्तीचा नाश होईल, २४ तासांत आनंदाची बातमी कळेल ' अशी या अध्यायाची फलश्रुती ठामपणे सांगणे म्हणजे भाविक दत्तभक्तांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मूळ चरित्रग्रंथातदेखील या अध्यायाची ही अशी फलश्रुती स्वतः ग्रंथकारांनी कुठेच सांगितलेली नाही, तर दुर्गुणांपासून मुक्ती असे या अध्याय पठणाचे फल अधिकारी महात्म्यांनी कथित केले आहे. मग माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीने केवळ साररूपांत लिहिलेल्या या अध्यायाविषयी अशी ग्वाही देणे, हे खचितच योग्य नाही.
यासाठीच काही गोष्टी इथे स्पष्ट कराव्यात, असे वाटले.
- सर्वप्रथम, श्रीदत्ताशिष ब्लॉगचा या 'God blessings-marathi' चॅनेलशी कुठलाही संबंध नाही.
- या चॅनेलच्या ताई या अधिकारी व्यक्ती असतीलही, मात्र या ब्लॉगवरील कुठलेही लेखन इतरत्र कुठल्याही स्वरूपांत पुनर्प्रकाशित करावयाचे असल्यास ते मूळ स्वरूपांतच करावे, मूळ स्रोताचा - श्रीदत्ताशिष ब्लॉगचा उल्लेख करणे अथवा न करणे हे अर्थातच प्रत्येकाच्या स्वभावगुणांवर वा मनोवृत्तीवर अवलंबून आहे. भाविक-भक्तांच्या श्रद्धेचा असा गैरफायदा कदापिही घेतला जाऊ नये, यासाठीच हा आग्रह आहे.
श्रीदत्तमहाराज परमकृपाळू आणि भक्तवत्सल आहेत, हे खरे दत्तभक्त पूर्णपणे जाणतात. ' मला शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच !' असे स्मरतां क्षणीच प्रसन्न होणाऱ्या या ब्रह्माण्डनायकाचे ब्रीदच आहे, आणि याची अनेक दत्तभक्तांनी पुरेपूर अनुभूती घेतली आहे. अहो म्हणूनच, मनापासून केलेला नमस्कार ते प्रेमाने स्वीकारतात. आपल्या भक्ताचा अनन्य शरणागत भाव पाहून ते तात्काळ कृपा करतात, भाविकांच्या शुद्ध आचरणाने प्रसन्न होतात आणि गुरुवाक्य प्रमाण मानणाऱ्या सद्भक्तांचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण सहजच करतात, अशी ग्वाही अनेक संत-सज्जन-महापुरुषांनी स्वानुभवाने दिली आहे. सर्व साधकांच्या हृदयांत अशी निर्मळ दत्तभक्ती अखंड प्रवाहित राहू दे, हीच त्या अनसूयात्मजाच्या पावन चरणीं सदिच्छा!
शेवटी, थोरल्या महाराजांच्या करुणात्रिपदीमधील पुढील पदाने या लेखनप्रपंचाचा विराम घेत आहे. तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ॥ निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ॥ भगवान दत्तमहाराजांची आपल्या सर्वांवर सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना ! ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment