Aug 27, 2016

॥ श्रीगुरू दत्तात्रेय धावा ॥


|| श्री गणेशाय नमः ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


गुरुराया, नरहरी दत्तात्रेया, येई येई बा, करुणासागरा, पुरुषोत्तमा, नरहरी कल्पद्रुमा, अठरा पुराणा, तव महिमा, न कळे निगमागमा, पतितपावना, करुणालया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१ ||


तापत्रयाने, तापविले, देह माझे कष्टविले, कोठे विश्रांती, नाढळे, चरण तुझे सापडले, आता कृपेची, करी छाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२ ||


कामक्रोधादी, अहंकार, उठती वारंवार, अंगी मातला, अविचार पडला, अंधकार, स्त्रिया पुत्रांची, बहुमया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||३||


वर्णू मी तव कीर्ती, लवलाही, रजकाला पाछाई, दिधली क्षणात त्वा, तू काही, तूची बापमाई, अघटीत घटना तुझी, बा सखया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||४ ||


नवस करुनी तुला, निघाला, धनिक उदिमा गेला, लाभ चौगुणी, त्या झाला, चोरांनी मारिला, तस्कर वधूनिया, उठविसी तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||५ || 


अन्न भक्षिता, उठे शूळ, विप्र करी तळमळ, प्राण त्यागिता, तात्काळ, आणविसी आपणाजवळ, अन्नची औषध दे, भक्षाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||६ || 


करवीर क्षेत्रीचा, द्विजपुत्र, विद्येवीण अपवित्र, जिव्हा छेदुनिया, अहोरात्र, करी भुवनेश्वरीस्तोत्र, देशी चौदाही, विद्या तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||७ || 


अन्नपूर्णा तुज, करजोडी, पक्वान्ने बहु वाढी, घेवड्या शेंगाची, तुज गोडी, भला दिनाचा गडी, देशी घागर भरून,पुतळया तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||८ ||


शिरोळ ग्रामीची, द्विजनारी, पुत्र समंध मारी, ठेवी कलेवर, औदुंबरी, म्हणे पाव श्रीहरी, उठविसी तात्काळ पुत्र तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||९ || 


वांझ महिशीचे, दुग्ध पिसी, विप्रस्त्री सुखविसी, पतिता मुखी वेद, बोलविसी, द्विजगर्वा छेदिसी, नकळे कवणाला, तव चर्चा, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१०||


त्रिविक्रम भारती, करी निंदा, म्हणे हा दांभिक धंदा, विश्वरूप तया, मुकुंद, दाखविसी गोविंदा, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||११ ||


माहूर पुरीचा, रोगी पती, घेउनी निघाली, सती मार्गी, मरण आले, तयाप्रती, करी बहू काकुळती, देशी अभय तिच्या, सौभाग्या, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१२ || 


सत्कर्माचरणी, बहुश्रुत, नेमे वरिले चित्त, परान्न भक्षाया, उदित, स्त्री बहु तळमळीत, आज्ञा देऊनिया, दांपत्या विपरीत, देखे जाया, आली बा भेटाया, तव पाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१३ ||


तीन पात्रांची, सामुग्री, ब्राह्मण भिक्षा करी, छाटी झाकुनिया, अन्नावरी, जेविले सह्स्त्रचारी, कीर्ती झाली, बा जगत्रया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१४ ||


साठ वर्षांची, म्हातारी, वंध्या पदर पसरी, करुणा आली बा, तुज नरहरी, देशी पुत्रकुमारी, समर्थ दुखःचि तू, हराया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१५ ||


श्वेतकुष्टाने, व्यापिला, ब्राह्मण धावत आला, रक्षी रक्षी म्हणे, दयाळा, शुष्ककाष्ट द्रुम केला, निर्मल झालिबा, तत्काया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१६ ||


तंतुक भक्त तुझी, करी सेवा, म्हणे पावगा देवा, दर्शन श्रीशैल्या, महादेवा, करवि ये केशवा, माता पिता तू, गुरुराया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१७ ||


देवा दिपवाळीचे, दिवशी, अष्टरूप झालासी, भिक्षा आठ गृही, तू घेसी, दीनबंधू म्हणविसी, करीशी भक्तासी, बहु माया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१८ || 


गाणगग्रामीचा, कुलवाडी, मार्गी उभा कर जोडी, आडवा पुढे पडे, घडो घडी, पीक हजारो खंडी, देसी शूद्राला, स्वामीया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१९ || 


सायंदेव पंत, निजभक्त, तव भजनी आसक्त, दिधले तयासी बा, नीज तक्त, अशा कथा अनंत, शेषादिक थकले, गुणगाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२० || 


केवळ मतिमंद, मी पातकी, बहु जन्माचा दुःखी, वसंत आत्मजा, करा सुखी, कृपादृष्टी अवलोकी, ठेवा हात शिरी, करा दया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२१ || 


|| श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतीमहाराजार्पणमस्तु ||


No comments:

Post a Comment