Aug 11, 2016

कन्यागत महापर्वकाल - सिंहस्थ - कुंभमेळ्याइतकीच पवित्र दैवी पर्वणी


|| हर हर गंगे ॥ हर हर कृष्णे ॥


दर १२ वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाल हा  सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू होणार असून तो १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत असा १३ महिने सुरू राहणार आहे. यामध्ये एकूण ६२ पर्वकाळ आहेत. त्यातील ६ मुख्य पर्वकाळ आहेत. गुरू जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे कुंभमेळा साजरा होतो. गुरू जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा गोदावरी नदीच्या किनारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ महापर्वकाळ साजरा होतो. अगदी तसेच गुरू जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कृष्णा नदीच्या किनारी नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. गेल्या हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. कन्यागत म्हणजे कन्येमध्ये गेलेला. भारतामध्ये प्रतीवर्षी सर्वत्र लहान मोठे असे नद्यांचे मेळे सुरु असतात. त्यातील २५० हून अधिक मेळे प्रसिद्ध आहेत. गुरु हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक़्काम ठोकून असतो. त्यावेळी देशाच्या विविध भागांमध्ये नद्यांच्या किनारी उत्सव सुरु असतात. या नद्यांच्या उत्सवांनाच महापर्वकाल असे म्हणतात. अशा वेळी जिथे महापर्वकाल असतो त्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण झालेले आहे अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते. जणूकाही भक्तांची आर्तता पाहून गंगा नदी स्वत:हून त्यांना भेटायला तेथील नदीमध्ये येवून वास करते अशी ही महापर्वकालाची संकल्पना आहे. या महापर्वकालालाच सिंहस्थ, कुंभमेळा, पुष्कर स्नान, कन्यागत महापर्वकाल इ. नावांनी ओळखले जाते.   

          सह्याद्री पर्वतावर धोम महाबळेश्वर नावाची एक पर्वतरांग आहे. या डोंगरावर श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे १२२० मीटर एवढ्या उंचीवर वसलेले आहे. येथेच सात नद्यांचे उगम मंदिर आहे. आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा येथे उगम होतो. या ठिकाणापासून पाण्याचे स्त्रोत सुरु होतात. आता तिथे कुंडे बांधली आहेत. या सात कुंडांची नावे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती अशी आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरु असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रुपाने वास करुन असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही. गायत्री कुंडातून साठ वर्षातून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गायत्रीचे दर्शन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच होऊ शकते.

          गंगा भागिरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगा कुंडातून जलस्त्रोत सुरु होतो आणि तो सतत वर्षभर सुरु राहतो. गुरु कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केला की पुन्हा गंगा कुंड कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडे राहते. बारा वर्षांनंतर गुरुने कन्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश केला की गंगा कुंडातून जलप्रवाह सुरु होतो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात.  


No comments:

Post a Comment