व्यर्थ हट्टि मी सांडुनी त्रपा । बाहतों तुला ज्या नये कृपा । रंक पापि मी तूं रमापती । तैं कशी मशीं होय संगती ॥१॥
माझे अंगणीं घेवडा नसे । वांझमहिषिचे दूधही तसें । वाळतें जरी दारिं या मढें । धांवतें तुझें चित्त रोकडें ॥२॥
असतीच निंदा मदंतरीं । होति फावती तूज बा तरी । जाहला न विद्यामद मला । फावती कशी होय बा तुला ॥३॥
ताडिते जरी चोर हें शिर । धांवता तरी हो मुनीश्वर । गांजती जरी क्रूर सुंदरी । बाहतास तूं बा मला तरी ॥४॥
बा दिवाळिचा ये जरी क्षण । ये त्वदागमा योग्य कारण । राज्य असतां तूं पहावया । येसि बा नसें तें कपाळिं या ॥५॥
कर्में माझिया आण घातली । बा तुला तरी ती करी खुली । दीधल्या विना येसि ना जरी । अर्पि सत्य सर्वस्व ते करीं ॥६॥
कामकाक हा त्वत्पदीं वसे । यास्तव तुझा आगम नसे । भक्तमानसहंस शीघ्र या । कामकाक जाईल उडोनिया ॥७॥माझि आण दत्ता असे तुला । दाविं पाउला कीर्तनीं मला । जीवनाविना मीन तळमळें । तुजविणें तसा येथ मी लोळे ॥८॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
स्रोत : प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामीमहाराजांचा पदसंग्रह
No comments:
Post a Comment