Jul 18, 2019

श्री साई चरित्रामृत - १


||श्री गणेशाय नमः ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः | गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः||

|| श्री सद्गुरू साईनाथाय नमः ||


विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांचे " भारत म्हणजे महामानवांचा सागर ! महान पुण्यतीर्थ ! " हे वाक्य किती यथार्थ आहे. त्यातही महाराष्ट्रास ज्ञानदेवादी संत महात्म्यांची थोर परंपरा आहे. " ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होतो, त्या त्या वेळी मी पुन्हा धर्मस्थापना करण्यासाठी स्वतः जन्म घेतो." असे भगवंतांनी भगवदगीतेत वचन दिले आहे. तसेच भागवत पुराणांत संत हे माझीच प्रतिमा आहेत हे भगवान श्रीकृष्णांनी वारंवार सांगितले आहे. आधुनिक संत चूडामणी श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज हे जगभर मान्यता पावलेले दैवत आहे. ह्या महान अवतारी विभूतीच्या अवतारकार्याचा संपूर्ण ठाव लागणे केवळ अशक्यच ! श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर ऊर्फ हेमाडपंत विरचित ' श्री साई सच्चरित्र ' ह्या पवित्र ग्रंथात श्री साईनाथांच्या अनेक लीलांचा समावेश केला आहे. प्रत्यक्ष स्वतः श्री साईनाथांनी हेमाडपंतांस ह्या अत्यंत प्रभावशाली  ग्रंथलेखनाची साशीर्वाद अनुमती दिली होती. ह्या ग्रंथरचनेच्या प्रेरणेविषयी हेमाडपंत लिहितात : 

वर्षानुवर्षे बाबांची लीला । पाहोनि लागला मनासी चाळा । बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा । भोळ्या प्रेमळांकारणे ।।

होऊनिया प्रत्यक्ष दर्शन । निवाले नाहींत ज्यांचे नयन ।तयांसी बाबांचे माहात्म्यश्रवण । पुण्य पावन घडावे ।।

अशी ग्रंथलेखनाची इच्छा झाली तरी साईनाथांचा आशीर्वाद लाभल्याखेरीज हे लेखन निर्विघ्न होणार नाही हे जाणून हेमाडपंतांनी माधवराव देशपांडे यांस बाबांची अनुज्ञा घेण्याची विनवणी केली. त्यानुसार माधवरावांनी बाबांची प्रार्थना करताच साईनाथांनी त्यांचा भावार्थ जाणून " कथावार्तादि अनुभवांचा ।संग्रह  साचा करावा ।। दफ्तर ठेवा बरे आहे ।त्याला माझें पूर्ण सहाये । तो तर केवळ निमित्त पाहें  । लिहावें माझें मींचि कीं ।।" असा ग्रंथरचनेस आशीर्वाद दिला. आपल्या चरित्र गाथेबद्दल साईनाथ आश्वासन देतांना सांगतात, 

वरी एक सांगतो शामा । प्रेमें घेईल जो मन्नामा ।तयाच्या मी सकळ कामा ।पुरवीं प्रेमा वाढवी ।।

मग जो गाई वाड़ेंकोडें । माझें चरित्र माझें पवाड़े ।तयाचिया मी मागें पुढें ।चोहिंकड़े उभाचि ।।

कोणीही केल्या माझें कीर्तन । तयासी देईन आनंदघन ।नित्य सौख्य समाधान ।सत्य वचन मानावे ।।

जो मजलागी अनन्य शरण । विश्वासयुक्त करी मदभजन । माझें चिंतन माझे स्मरण । तयाचे उद्धरण ब्रीद माझें ।।

सारांश, हा ग्रंथ साईनाथ महाराजांच्या प्रसादाचे फळ आहे आणि भाविकांना आजही ह्या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केले असता निश्चितच प्रचिती येत आहें. 

अशाच काही कथांचा आपण ह्या साई चरित्रामृतात आस्वाद घेऊ या.   


साईबाबांचे शिरडीस प्रथम आगमन 


साईबाबा इ .स. १८५४ च्या सुमारास शिरडीस प्रथम दृष्टीस पडले ते तेथील निंबवृक्षातळीं ! शिरडीची एक ग्रामवासी, नाना चोपदाराची वृद्ध आई यांनी बाबांविषयी सांगितले होते की साधारण १६ वर्षांचा एक अतिशय तेजस्वी,गोरा-गोमटा आणि देखणा तरुण निंब वृक्षाखाली बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. 

पाहुनि सुंदर बाळरूप ।लोकां मनी विस्मय अमूप । कोंवळ्या वयांत खडतर तप । शीत आतप समसाम्य ।।

वय कोंवळे नवल स्थिती । ग्रामस्थ सकळ विस्मय पावती । गावोगावींचे लोक येती । दर्शननिमित्ती मुलाच्या ।।

त्यावेळीं बाबांचे तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून सर्व जन आश्चर्यचकित होत असत. दिवस-रात्र, ऊन-पाऊस कशाचीही पर्वा न करतां बाबा निंबवृक्षाखालीच अहर्निश वास्तव्यास होते. त्यांचे ते गोमटे रूप पाहून सर्वांच्या अंतरी प्रेम दाटत असे. 

बाह्यात्कारीं दिसे पोर । परी कृतीने थोरांहुनी थोर । वैराग्याचा पूर्णावतार । आश्चर्य फार सकळिकां ।।

मूर्तिमंत वैराग्याची ती बालमूर्ती पाहून हे आहेत तरी कोण ? कोणत्या पवित्र कुळांत ह्यांचा जन्म झाला असेल बरें ? ह्यांचे माता - पिता, गाव तरी कुठले असेल ? असे प्रश्न शिरडीवासियांस पडत होते. 

आणि एके दिवशी खंडोबाचे वारे अंगात आलेल्या दोघां-चौघांना लोक ह्या बालमूर्तीबद्दल विचारू लागले. देवाने सांगितले, " कुदळी आणा आणि ह्या ठिकाणी खणा, म्हणजे तुम्हांला या पोराचा ठावठिकाणा मिळेल." खंडोबारायानें सांगितल्याप्रमाणें निंबातळीं खणल्यावर तेथे विटांचा थर आढळला. त्याखाली असलेली जात्याची तळी दूर सारल्यावर खाली भुयारांत एका गोमुखी पाटाभोवती चार समया तेवत असलेल्या आढळल्या. ह्या स्थळीं ह्या मुलाने बारा वर्षे तप केले आहे, असे देवाने गावकऱ्यांस सांगितले. याबाबत लोकांनी खोदून खोदून विचारले असतां, 

बाबा म्हणे हें माझ्या गुरूंचे स्थान । अति पवित्र हे माझे वतन । आहे तैसेचि करा हें जतन । माना मदवचन  एवढें ।।

गुरुवार आणि शुक्रवारी । सूर्यास्ती सारवूनिया वरी । ऊद जाळील जो क्षणभरी । देईल श्रीहरि सुख तया ।।


Related image

ही साईमुखींची अक्षरें आहेत. बाबांचे म्हाळसापती आदि भक्त आणि शिरडीचे ग्रामस्थ जन ह्या पवित्र स्थानांस बाबांच्या गुरूंचे समाधिस्थान म्हणून वंदन करीत असत. तदनंतर ही बालमूर्ती सामान्य नव्हे, याची गावकऱ्यांना खात्री पटू लागली. 

बाबांचे हे असामान्यत्व प्रथम जाणले ते गणपतराव कोते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी बायजाबाई या भाविक दांपत्याने. हे दांपत्य सदहृदयीं,सात्विक,धार्मिक आणि परोपकारी होते. वैराग्याचा पूर्ण अवतार असलेल्या ह्या बालमूर्तीस पाहून पाटील दांपत्याच्या अंत:करणांत वात्सल्याचा भाव जागृत झाला. बाबांच्या वरवर दिसणाऱ्या चमत्कारिक वर्तनामुळें काही लोक त्यांना ' वेडा फकीर ' म्हणत असत. गावांतील कर्मठ, तेली अशा काही लोकांचा बाबांना प्रथमपासूनच विरोध होता. मात्र पाटील दांपत्याने पहिल्याच दर्शनापासून साईबाबांचे जे पाय धरले ते अगदी अखेरच्या क्षणांपर्यंत ! पुढें काही काळ शिरडीत वास्तव्य करून बाबा गुप्त झाले. 


चांद पाटील यांच्या वरातीसोबत शिरडीत बाबांचे पुनरागमन    


काही काळानंतर देवीदास नावाचे वैरागी शिरडीत वास्तव्यास आले.एकदा धूपखेडेगावीचा ग्रामाधिकारी  चांद पाटील, औरंगाबाद इथे कांही कामानिमित्त गेला होता. त्यावेळीं त्याची एक घोडी तिथे हरवली. महिना - दोन महिनें अथक शोध करूनही ती घोडी काही त्याला परत मिळाली नाही. त्यामुळें निराश होऊन चांद पाटील परत धूपखेड्यांस जाण्यास निघाला. पाठीवर खोगीर घेऊन तो मार्गक्रमण करत असता एका आंब्याच्या झाडाखाली कफनी आणि टोपी परिधान केलेला एक फकीर त्यास दिसला. तो तेजस्वी फकीर पाहून चांद पाटील सहजच नमस्कार करावयास पुढे आला. तेंव्हा, तो तरुण फकीर चिलीम भरत होता. ' हे खोगीर कसले आहे ?' असे विचारले असता चांदभाईने आपल्या हरवलेल्या घोडीची इत्यंभूत हकीकत त्या फकीरास सांगितली. मग तो फकीर म्हणे जा शोध त्या नाले । घोडे सापडले तात्काळ ।। अत्यंत आश्चर्यचकित झालेला चांद पाटील परत फकीरापाशी आला. फकिराने त्यास घटकाभर विश्रांती घ्यावी व ही चिलीम पिऊन मार्गस्थ व्हावे असे सुचवले. त्यानुसार चांदभाई तिथे बसला. पुढे त्या फकिराने हातांतील चिमटा मातीत खुपसून अग्नी आणि छापी भिजवण्यासाठी सटका जमिनीत मारून पाणी निर्माण केले. अशा रीतीने ती चिलीम तयार करून फकीराने स्वतःही ओढली आणि चांद पाटलासही प्यावयास दिली. हे सर्व अनुभवून हा फकीर कुणी तरी दैवी विभूती आहे, याची त्या पाटलांस खात्री पटली. त्याने त्या फकीरास आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते स्वीकारून तो तरुण फकीर दुसऱ्या दिवशी धूपखेड्यांस चांद पाटील ह्याच्या घरी गेला आणि काही काळ तिथेच राहिला. पुढें चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याचा विवाह ठरला. भावी वधू शिरडी येथील होती, त्यामुळे विवाहासाठी चांदभाईच्या वऱ्हाडासोबत बाबाही शिरडीस आले. खंडोबाच्या देवळापाशी म्हाळसापतीच्या खळ्यांत हे वऱ्हाड उतरले. हे तरुण फकीर जेव्हा गाडीतून उतरले, तेव्हा प्रथम भगत म्हाळसापतीच्या दृष्टीस पडले. तें तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून भगत आदराने ' या साई ! ' असे म्हणून स्वागतास सामोरा आला. त्यानंतर सर्व लोकही त्यांस साई - साई असे संबोधू लागले आणि अशा रितीने साईंचे ते नामाभिधान झाले. असो काही दिवसानंतर, लग्न झाले वऱ्हाड  परतलें । बाबा एकटेचि मागें राहिले । राहिले ते राहुनि गेले  । भाग्य उदेलें शिरडीचें ।।  


क्रमश: 


No comments:

Post a Comment