Mar 14, 2019

श्री क्षेत्र गाणगापूर


श्री गुरुचरित्र ह्या वेदतुल्य ग्रंथामध्ये श्री दत्तप्रभूंच्या पहिल्या दोन अवतारांच्या, अर्थात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती ह्या दोन दिव्य विभूतींच्या चरित्राचे वर्णन आहे. त्यातील अठ्ठेचाळीसाव्या अध्यायांत गुरुचरित्रकार श्री क्षेत्र गाणगापूर माहात्म्य सांगतात. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे वास्तव्य जवळ जवळ दोन तप होते. नामधारकाने श्री नृसिंहसरस्वती गुरूंनी पृथ्वीवरची इतर सर्व तीर्थक्षेत्रे सोडून गाणगापूर ह्या क्षेत्राचीच का निवड केली असे विचारले असता, सिद्धमुनींनी त्यास ह्या क्षेत्राचे स्थानमाहात्म्य सांगितले. 

एकदा अश्विन वद्य चतुर्दशी ह्या दीपावलीच्या दिवशी श्री गुरूंनी आपल्या सर्व शिष्यांस आज आपण  ' त्रिस्थळी यात्रा ' करू या असे सांगितले. आपल्याला आता काशी, प्रयाग व गया येथें तीर्थयात्रेस जायचे आहे, असे समजून शिष्य तयारी करून येतो असे म्हणू लागले. तेव्हा श्री गुरू हसून आपल्या शिष्यांस म्हणाले," तुम्हांला तयारी करण्याची काहीच आवश्यकता नाही. येथे अमरजा संगमाजवळच सर्व तीर्थक्षेत्रे आहेत." श्री गुरु त्यावेळी सर्व शिष्यांसमवेत भीमा - अमरजा संगमी आले व त्यांनी त्या संगमात स्नान केले. ह्या पवित्र संगमावर जे ' षटकूल ' नावाचे जे तीर्थ आहे ते प्रयागासमान पवित्र आहे.  भीमा - अमरजा ह्या दोन नद्यांचा जो संगम आहे त्याचे गंगा - यमुना ह्यांच्या प्रयाग येथील संगमाएवढेच महत्त्व आहे. ह्या ठिकाणी भीमा नदी उत्तरेकडे वाहत आहे, म्हणूनच ह्या ठिकाणी स्नान केल्यास प्रत्यक्ष काशी क्षेत्रात स्नान करून जे पुण्य मिळेल, त्याच्या १०० पटींने पुण्य येथील स्नानांत मिळेल. इतके तीर्थवर्णन करून श्री गुरु पुढे म्हणाले, " शिवाय ह्या ठिकाणी अष्टतीर्थेही आहेत. त्यांचे माहात्म्य मी तुम्हांस सांगतो. " 

अमरजा नदीचे माहात्म्य सांगतांना श्री गुरु शिष्यांस म्हणाले, " साक्षात श्री शिव शंकरांनी इंद्रास दिलेल्या संजीवनी उदक कुंभातील कांही उदक पृथ्वीवर पडले व तेथून जो प्रवाह झाला तीच ही अमरजा नदी. कार्तिक किंवा माघ महिन्यांत ह्या संगमात भक्तीने स्नान केल्यास मनुष्यांस या जन्मी सुख मिळून अंती मोक्ष निश्चित मिळतो."  

त्यानंतर श्री गुरुंनी संगमस्थानी असलेल्या पिंपळाच्या वृक्षासमोर असलेले ' मनोरथ ' तीर्थ दाखवले आणि सांगितले, " हा पिंपळ प्रत्यक्ष कल्पवृक्ष असून ह्या तीर्थात स्नान केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच ह्या अश्वत्थ वृक्षाखाली आम्ही सदैव वास्तव्य करतो.  ह्या अश्वत्थाची पूजा करून तुम्ही ' संगमेश्वर ' येथे श्री शिव शंकरांची मनोभावे पूजा करा, जेणे करून तुम्हांस धन, धान्य व पुत्र प्राप्ती होईल."

तसेच ' वाराणसी '  हे काशीक्षेत्रासमान तीर्थक्षेत्रही श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी शिष्यांस दाखविले व त्यासंबंधित भारद्वाज गोत्राच्या एका ब्राह्मणाची कथाही सांगितली. त्यानंतर श्री गुरु ' पापविनाशी ' क्षेत्री आले असता, त्यांची रत्नाई नावाची बहीण तिथे आली. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तिला पूर्वीच कुष्ठनिवारणासाठी ह्या स्थळीं येण्यांस सांगितले होते. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार तिने तीन रात्री त्या पापविनाशी तीर्थात स्नान केले आणि तिचे सर्व कोड नाहीसे झाले. सिद्धमुनीं नामधारकास सांगतात, " त्यावेळी आपण तिथेच  होतो व श्री गुरूंच्या कृपेने तीर्थात स्नान करून रत्नाई व्याधीमुक्त झाली, हे आम्ही प्रत्यक्ष पहिले आहे."

यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज सर्व शिष्यांस घेऊन ' कोटितीर्थ ' ह्या तीर्थस्थानी आले व त्या तीर्थाचे माहात्म्य ' इथे जो भक्त मनोभावे दान करील, त्यांस कोटीपटीने दान केल्याचे पुण्य मिळेल.' असे सांगितले. 

' रुद्रपाद ' ह्या तीर्थाचे वर्णन करतांना त्याचा महिमा प्रत्यक्ष गया तीर्थक्षेत्रासमान आहे, असे  वर्णन करून तदनंतर श्री गुरूंनी शिष्यांना  ' चक्रतीर्थ ' दाखविले.  येथे स्नान करून केशवाचे पूजा केल्यास द्वारका तीर्थक्षेत्राच्या चौपट पुण्य प्राप्त होते, असे सांगितले. 

पुढें श्री नृसिंह सरस्वती स्वामी शिष्यांसहित ' मन्मथ ' क्षेत्री आले. इथे स्नान करून जवळच असलेल्या कल्लेश्वरांची पूजा केल्यास भक्तजनांची वंशवृद्धी होऊन अष्टैश्वर्ये प्राप्त होतील असा या तीर्थाचा महिमा त्यांनी सर्वांस सांगितला. तसेच संपूर्ण श्रावण महिना कल्लेश्वरांस अभिषेक केल्यास व कार्तिक महिन्यात दीपाराधना केल्यास भक्तांना अनंत पुण्य प्राप्त होते इतके ह्याचे स्थान महत्त्व आहे. 

ह्या पवित्र स्थळीं श्री नृसिंहसरस्वती महाराज ह्यांनी वास्तव्य केले, ह्यांत नवल ते काय ? 

अजूनही श्री गुरु गुप्त रूपांत गाणगापुरी आहेत अशी ग्वाही देऊन गुरुचरित्रकार सांगतात,

आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों मठीं सदा प्रेमीं । गौप्यरुपें अवधारा ॥ अ. ५१, ओवी १४ ॥ 

तसेच प्रत्यक्ष श्री गुरूंनी  " आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निरुते दृष्टी पडती गरुत्मते खूण तुम्हा सांगेन "  अ. ४८, ओ. ३८ ॥ असे वचन दिले आहे. आज ५०० वर्षांनंतरही हे पक्षी गाणगापूरात दिसतात.

दत्तमहाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या स्थानांस सर्व दत्तभक्तांनी अवश्य भेट द्यावी.   




No comments:

Post a Comment