Jan 21, 2018

परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजरचित स्तोत्रांची फलश्रुती


घोरसंकट निवारण स्तोत्र

आकस्मिक संकटांचे सहज निवारण होण्यासाठी

श्री दत्तात्रेय कवच

सर्व शारीरिक संरक्षण यासाठी

श्री दत्त स्तोत्र

राग कमी होणे, मन:शांती व रक्तदाबाचा विकार कमी होण्यासाठी

श्रीपादवल्लभ स्तोत्र

देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी

अपराधक्षमापन स्तोत्र

नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र

पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फळ मिळते.

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र (६३वा श्लोक)

भगवदभक्त संतान प्राप्तीसाठी

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र (६६ वा श्लोक)

पोटदुखी कमी होण्यासाठी

श्री सप्तशती गुरुचरित्र

घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनोकामनापूर्तीसाठी, तसेच श्री गुरुचरित्र वाचनाचे फळ मिळते.

श्री दत्तलीलामृताब्धिसार

घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनोकामनापूर्तीसाठी

श्री दत्तमाहात्म्य

घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनोकामनापूर्तीसाठी

वासुदेवमननसार

प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे

सार्थ बालाशिष स्तोत्र

लहान मुलांना , कुमाराना व कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून मुक्त करणारे हे स्तोत्र आहे

मंत्रात्मक श्लोक

विविध मनोकामनापूर्तीसाठी

चाक्षुषोपनिषद

डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी उपयुक्त

महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला श्लोक

मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं ।

वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम् ।।

मामज्ञं मत्तमर्भं भवदवसुवहं वासनासर्वसंघे ।

मात: पात: सुतस्ते वहरहसि हरे देशिके शिष्यशिष्यम् ।।

श्री टेम्ब्ये स्वामी महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला हा श्लोक आहे श्री सदगुरु कृपा प्राप्त होण्यासाठी रोज म्हणावा.


Jan 19, 2018

श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज




श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती निमित्त श्री. रोहन उपळेकर यांनी लिहिलेला लेख :


त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा


आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !!

भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी वाशीम जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला. 

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात 'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,

अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।

रुतूं देईना पायी कांटा रे ॥

शरणांगता जना पाठिसी घालुनी ।

कळिकाळासी मारी सोटा रे ॥

अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते. 

प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात, 

त्रैलोक्याचा राजा ।

नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु.॥

नांदे अमरापूर ग्रामीं ।

कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥

नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।

त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥

श्रीधरविभु निजकैवारी ।

भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!

। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।


लेखक - रोहन विजय उपळेकर

( http://rohanupalekar.blogspot.in/ )


संकलन : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार समूह 

( https://www.fb.com/shreeswamisamarth )


Jan 13, 2018

भेटी लागी


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


भेटी लागी माझे मन उतावीळ |

कधी मी पाऊले पाहीन डोळा || धृ ||


ऐसे कृष्णा तीरी ।वृक्ष औदुंबर |

ऐसा जगदोध्दार देव कोठे || १ ||


धन्य येथिल जन | भावार्थी सज्जन |

वैकुंठचि जाण प्रत्यक्ष हे || २ ||


स्वर्गीचे सुरवर । वांच्छितात जन्म |

पहाया चरणयुग्म अखंडित || ३ ||


श्रीमद् दत्तात्रेय । येथे नांदताहे |

नृसिंह सरस्वती ये यती रूपे || ४ ||


पाहूनिया वासु ।श्रीदत्तपादुका |

आल्हादाने देखा नाचतसे || ५ ||



Dec 11, 2017

श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


अनसूयात्रिसम्भूत दत्तात्रेय महामते ।

सर्वदेवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ १॥


शरणागतदीनार्ततारकाऽखिलकारक ।

सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ २॥


सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज ।

सर्वसङ्कटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ३॥


स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।

भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ४॥


सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।

योऽभीष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ५॥


य एतत्प्रयतः श्लोकपञ्चकं प्रपठेत्सुधीः ।

स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ॥ ६॥

।। इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं श्रीदत्तस्तोत्रं सम्पूर्णम् ॥


Dec 3, 2017

श्रीगुरुचरित्र अध्याय - ४ ( श्रीदत्त-जन्म )


श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II ऐशी शिष्याची विनंती I ऐकोन सिद्ध काय बोलती I साधु-साधु तुझी भक्ति I प्रीति पावो गुरुचरणीं II १ II ऐक शिष्यचूडामणी I धन्य धन्य तुझी वाणी I आठवतसे तुझिया प्रश्नीं I आदि-मध्य-अवसानक II २ II प्रश्न केला बरवा निका I सांगेन तुज विवेका I अत्रिऋषीच्या पूर्वका I सृष्टीउत्पत्तीपासोनि II ३ II पूर्वी सृष्टि नव्हती कांही I जलमय होतें सर्वांठायीं I 'आपोनारायण ' म्हणोनि पाहीं I वेद बोलती याचिकारणें II ४ II आपोनारायण आपण I सर्वां ठायीं वास पूर्ण I बुद्धि संभवे प्रपंचगुण I अंड निर्मिलें हिरण्यवर्ण II ५ II तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें I रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें I 'हिरण्यगर्भ' नाम पावलें I देवतावर्ष एक होतें II ६ II तेंचि ब्रह्मांड देखा I फुटोनि शकलें झालीं द्वैका I एक आकाश एक भूमिका I होऊनि ठेलीं शकलें दोनी II ७ II ब्रह्मा तेथें उपजोन I रचिलीं चवदाही भुवनें I दाही दिशा मनस वचन I काळकामक्रोधादि सकळ II ८ II पुढें सृष्टि रचावयासी I सप्त पुत्र उपजवी मानसीं I नामें सांगेन परियेसीं I सातै जण ब्रह्मपुत्र II ९ II मरीचि अत्रि आंगिरस I पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ I सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ I सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण II १० II सप्त पुत्रांमधील 'अत्रि' I तेथूनि पीठ गुरुसंतति I सांगेन ऐक एकचित्तीं I सौभाग्यवंता नामधारका II ११ II अत्रिऋषीची भार्या I नाम तिचें 'अनसूया ' I पतिव्रताशिरोमणिया I जगदंबा तेचि जाण II १२ II तिचें सौंदर्यलक्षण I वर्णूं शके ऐसा कोण I जिचा पुत्र चंद्र आपण I तिचें रूप केवीं सांगों II १३ II पतिसेवा करी बहुत I समस्त सुरवर भयाभीत I स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित I म्हणोनि चिंतिती मानसीं II १४ II इंद्रादि सुरवर मिळूनि I त्रिमूर्तीपाशीं जाऊनि I विनविताति प्रकाशोनि I आचार अत्रिऋषीचा II १५ II इंद्र म्हणतसे स्वामियां I पतिव्रता स्त्री अनसूया I आचार तिचा अगम्य I काय सांगों विस्तारोनि II १६ II पतिसेवा करी भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मेसीं I अतिथीपूजा महाहर्षी I विमुख नव्हे कवणे काळीं II १७ II तिचा आचार देखोनि I सूर्य भीतसे गगनीं I उष्ण तिसी लागे म्हणोनि I मंद मंद तपतसे II १८ II अग्नि झाला अति भीत I शीतळ असे वर्तत I वायु झाला भयचकित I मंद मंद वर्ततसे II १९ II भूमि आपण भिऊनि देखा I नम्र जाहली तिचिया पादुका I शाप देईल म्हणोनि ऐका I समस्त आम्ही भीतसों II २० II नेणों घेईल कवण स्थान I कवण देवाचें हिरोन I एखादिया वर देतांचि क्षण I तोही आमुतें मारुं शके II २१ II त्यासि करावा उपावो I तूं जगदात्मा देवरावो I जाईल आमुचा स्वर्गठावो I म्हणोनि तुम्हां सांगो आलों II २२ II न कराल जरी उपाव यासी I सेवा करूं आम्ही तिसी I तिच्या द्वारी अहर्निशीं I राहूं चित्त धरुनि II २३ II ऐसें ऐकोनि त्रयमूर्ति I महाक्रोधें कापती I चला जाऊं कैसी सती I पतिव्रता म्हणताति II २४ II व्रतभंग करूनि तिसी I ठेवूनि येऊं भूमीसी I अथवा वैवस्वतालयासी I पाठवूं म्हणोनि निघाले II २५ II वास पाहावया सतीचें I त्रयमूर्ति वेष धरिती भिक्षुकाचे I आश्रमा आले अत्रीचे I अभ्यागत होऊनि II २६ II ऋषि करावया गेला अनुष्ठान I मागें आले त्रयमूर्ति आपण I अनसूयेसी आश्वासून I अतिथि आपण आलों म्हणती II २७ II क्षुधेंकरुनि बहुत पीडोन I आलों आम्ही ब्राह्मण I त्वरित द्यावें सती अन्न I अथवा जाऊं आणिका ठायां II २८ II सदा तुमच्या आश्रमांत I संतर्पण अभ्यागत I ऐकिली आम्ही कीर्ति विख्यात I म्हणोनि आलों अनसूये II २९ II इच्छाभोजनदान तुम्ही I देतां म्हणोनि ऐकों आम्ही I ठाकोनि आलों याचि कामीं I इच्छाभोजन मागावया II ३० II इतुकें ऐकोनि अनसूया I नमन केलें अतिविनया I बैसकार करूनियां I क्षालन केलें चरण त्यांचे II ३१ II अर्घ्य पाद्य देऊनि त्यांसी I गंधाक्षतापुष्पेसीं I सवेंचि म्हणतसे हर्षी I आरोगण सारिजे II ३२ II अतिथि म्हणती तये वेळी I करोनि आलों आपण आंघोळी I ऋषि येतील बहुतां वेळीं I त्वरित आम्हांसी भोजन द्यावें II ३३ II वास पाहोनि अतिथींतें I काय केलें पतिव्रतें I ठाय घातले त्वरितें I केला तेथें बैसकार II ३४ II बैसवोनियां पाटावरी I घृतेसीं पात्राभिधार करी I घेवोनि आली अनसूया नारी I शाक पाक तये वेळीं II ३५ II तिसी म्हणती अवो नारी I आम्ही अतिथि आलों दूरी I देखोनि तुझें रूप सुंदरी I अभीष्ट मानसीं आणिक वसे II ३६ II नग्न होऊनि आम्हांसी I अन्न वाढावें परियेसीं I अथवा काय निरोप देसी I आम्ही जाऊं नाहीं तरी II ३७ II ऐकोनि अतिथींचे वचन I अनसूया करी चिंतन I आले विप्र पहावया मन I पुरुष कारणिक होतील II ३८ II पतिव्रताशिरोमणी I विचार करी अंतःकरणीं I अतिथि विमुख, तपोहानि I पतिनिरोप केवी उल्लंघूं II ३९ II माझें मन असे निर्मळ I काय करील मन्मथ खळ I पतीचें असे जरी तपफळ I तारील मज म्हणतसे II ४० II ऐसें विचारूनि मानसीं I तथास्तु म्हणे तयासी I भोजन करा स्वचित्तेंसी I वाढीन नग्न म्हणतसे II ४१ II पाकस्थाना जाऊनि आपण I चिंतन करी पतीचे चरण I वस्त्रें फेडूनि झाली नग्न I म्हणे अतिथि बाळें माझीं II ४२ II नग्न होऊनि सती देखा I घेऊनि आली अन्नोदका I तंव तेचि जाहलीं बाळकां I ठायांपुढें लोळतीं II ४३ II बाळकें देखोनि अनसूया I भयचकित होऊनियां I पुनरपि वस्त्रें नेसूनियां I आली तयां बाळकांपाशीं II ४४ II रोदन करिताति तिन्ही बाळें I अनसूया राहवी वेळोवेळें I क्षुधार्त झालीं केवळें I म्हणोनि कडे घेतलें II ४५ II कडे घेवोनि बाळकांसी I स्तनपान देतसे हर्षी I एका सोडोनी एकासी I निवारण करीं क्षुधेचें II ४६ II पाहें पां नवल काय घडलें I त्रयमूर्तीचे बाळक झाले I स्तनपानमात्रें क्षुधा गेली I तपफळ ऐसें पतिव्रतेचें II ४७ II ज्याचे उदरी चवदा भुवने I सप्त समुद्र वडवान्न I त्याची क्षुधा निवारण I पतिव्रतास्तनपानमात्रें II ४८ II चतुर्मुख ब्रह्मयासी I सृष्टि रचणें अहर्निशी I त्याची क्षुधा स्तनपानेसीं I केवीं झाली निवारण II ४९ II भाळाक्ष कर्पूरगौर I पंचवक्त्र काळाग्निरुद्र I स्तनपान करवी अनसूयासुंदर I तपस्वी हो अत्रि ऐसा II ५० II अनसूया ऐशी अत्रीची रमणी I न होती मागें ऐकिली कवणीं I त्रयमूर्तीची झाली जननी I ख्याति झाली त्रिवभूनी II ५१ II कडे घेवोनि बाळकांसी I खेळवीतसे तिघांसी I घालूनि बाळकां पाळणेसीं I पर्यंदे गाई तये वेळीं II ५२ II पर्यंदे गाय नानापरी I उपनिषदार्थ अतिकुसरीं I अतिउल्हासें सप्त स्वरीं I संबोखीतसे त्रिमूर्तीसी II ५३ II इतुकें होतां तये वेळीं I माध्यान्हकाळीं अतिथिवेळीं I अत्रिऋषि मन निर्मळीं I आले आपुले आश्रमा II ५४ II घरांत आला अवलोकित I तंव देखिली अनसूया गात I कैंची बाळें ऐसें म्हणत I पुसतसे तयेवेळीं II ५५ II तिणें सांगितला वृत्तांत I ऋषि ज्ञानें असे पहात I त्रिमूर्ति हेचि म्हणत I नमस्कार करीतसे II ५६ II नमस्कारितां अत्रि देखा I संतोष विष्णु-पिनायका I आनंद झाला चतुर्मुखा I प्रसन्न झाले तये वेळीं II ५७ II बाळें राहिली पाळणेंसी I निजमूर्ति ठेले सन्मुखेंसी I साधु-साधु अत्रिऋषि I अनसूया पतिव्रता II ५८ II तुष्टलों तुझिये भक्तीसी I वर माग जे इच्छिसी I अत्रि म्हणतसे सतीसी I जें वांछिसी तें माग आतां II ५९ II अनसूया म्हणे अत्रीसी I प्राणेश्वरु तूंचि होसी I देव पातले तुमचे भक्तीसी I पुत्र मागा तुम्ही आतां II ६० II तिघे बाळक आमच्या घरीं I राहावे आमुच्या पुत्रांपरी I हेंचि मागणें निर्धारीं I त्रिमूर्ति असावे एकरूप II ६१ II ऐसें वचन ऐकोनि I वर दिधला मूर्ती तिन्हीं I राहतीं बाळकें म्हणोनि I आपण गेले निजालयासी II ६२ II त्रिमूर्ति राहिले तिचे घरी I अनसूया पोशी बाळकांपरी I नामें ठेविलीं प्रीतिकरीं I त्रिवर्गाचीं परियेसा II ६३ II ब्रह्मामूर्ति 'चंद्र' झाला I विष्णुमूर्ति 'दत्त' केवळा I ईश्वरातें 'दुर्वास' नाम ठेविलें I तिघे पुत्र अनसूयेचे II ६४ II दुर्वास आणि चंद्र देखा I उभे राहूनि माताभिमुखा I निरोप मागती कवतुका I जाऊं तपा निजस्थाना II ६५ II दुर्वास म्हणे अहो जननी I आम्ही ऋषि अनुष्ठानी I जाऊं तीर्थे-आचरणीं I म्हणोनि निरोप घेतला II ६६ II चंद्र म्हणे अवो माते I निरोप द्यावा आम्हां त्वरितें I चंद्रमंडळीं वास आमुतें I नित्य दर्शन तुम्हांचरणीं II ६७ II तिसरा दत्त विष्णुमूर्ति I असेल तुम्हांतें धरोनि चित्तीं I त्रिमूर्ति निश्चित म्हणोनि सांगती I हें मनीं धरावें तुम्हीं II ६८ II त्रयमूर्ति तोचि जाण दत्त I ' सर्वं विष्णुमयं जगत् ' I राहील धरोनि तुमचें चित्त I श्रीविष्णुमूर्ति दत्तात्रेय II ६९ II त्रयमूर्ति ऐक्य होऊन I दत्तात्रेय राहिला आपण I दुर्वास चंद्र निरोप घेऊन I गेले स्थाना आपुलाले II ७० II अनसूयेच्या घरीं देखा I त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका I नाम दत्तात्रेय ऐका I मूळपीठ श्रीगुरूचें II ७१ II ऐसेपरी सिद्ध देखा I सांगे कथा नामधारका I संतोषेंकरूनि प्रश्र्न ऐका I पुसतसे सिद्धासी II ७२ II जय जया सिद्ध योगीश्वरा I भक्तजनाच्या मनोहरा I तारक संसारसागरा I ज्ञानमूर्ति कृपासिंधु II ७३ II तुझेनि प्रसादें मज I ज्ञान उपजलें, सतीकाज I तारक आमुचा योगिराज I विनंति माझी परियेसा II ७४ II दत्तात्रेयाचा अवतारू I सांगितला पूर्वापारू I पुढें मागुती अवतार जाहले गुरु I कवणेपरी निरोपावे II ७५ II विस्तारुनि बाळकासी I सांगावें स्वामी प्रीतीसीं I श्रीगुरूमूर्ति अवतार जाहले कैसी I अनुक्रमें निरोपावें II ७६ II म्हणे सरस्वती गंगाधरू I पुढील कथेचा विस्तारू I ऐकतां होय मनोहरु I सकळाभीष्टे साधती II ७७ II

IIइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रैमूर्ति-अवतारकथनंनाम चतुर्थोSध्यायः II 

II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II