अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II१२II कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II१३II कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II१४II पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II१५II शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I ' पंचगंगा ' ऐसी ख्याति I महापातक संहारी II१६II ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II१७II अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II१८II वृक्ष असे औदुम्बरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II१९II
काशी, प्रयाग यांसारख्या अतिपावन क्षेत्रांइतकेच या तीर्थाचे माहात्म्य अपार आहे, म्हणूनच श्रीगुरुंनी तिथे वास केला. कृष्णा - पंचगंगा संगमस्थान हे अतिशय श्रेष्ठ आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या पंचगंगेतील पाच नद्या पुराणकाळापासून प्रसिद्ध आहेत. यांत स्नान केल्यास महापातकांचा नाश होतो. अशी ही अतिपावन पंचगंगा आणि कृष्णा-वेणी या सात नद्यांच्या संगमामुळे इथे ‘षट्कूळ’ तीर्थ झाले आहे - अर्थात सहा तीर म्हणजेच नदीचे काठ असलेले तीर्थ. कृष्णा-वेणीचे दोन तीर, पंचगंगेचे दोन काठ आणि संगम झाल्यानंतर पुढे वाहणाऱ्या नदीचे दोन तट असे हे एकूण सहा तीर असलेल्या या ‘षट्कूळ’ तीर्थी कल्पतरूसमान औदुंबर वृक्ष आहे. या संगमाजवळ कृष्णेच्या दक्षिण तीरावर कुरवपूर (सध्याचे कुरुंदवाड) वसलेले आहे. नामधारका, हे कुरवपूर म्हणजे कुरुक्षेत्रच आहे. कृष्णा नदीच्या पूर्वतीरावर अमरापूर (सध्याचे औरवाड) नावांचे गांव आहे. येथेच ‘अमरेश्वर’ नामक अतिशय जागृत असे शिवलिंग आहे.
जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II२०II अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II२१II अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II२२II प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II२३II सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II२४II याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II२५II
महान तीर्थक्षेत्र वाराणसी येथील गंगा नदी जशी अतिपवित्र आहे, त्याचप्रमाणे पंचगंगा - कृष्णा संगमाचे महत्त्व आहे. अमरेश्वराजवळ चौसष्ट योगिनी असून, तिथे निर्गुण शक्तितीर्थ नामक प्रख्यात तीर्थ आहे. अमरेश्वर साक्षात काशीविश्वनाथ असून या शिवलिंगाचे श्रद्धेने पूजन केले असता, मनुष्य अमर होतो. माघ महिन्यांत प्रयाग येथे स्नान केल्यास विशेष पुण्यफळ प्राप्त होते. अमरापुर येथील संगमात केवळ एकदा स्नान केल्यास त्या माघस्नानाच्या शतपट पुण्य मिळते. अर्थात हे स्थान प्रयागासम असून तेथे वास करणारा अमरेश्वर प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप आहे. त्यांमुळे तिथे निर्गुणस्वरूपी कोटितीर्थे आहेत. वेणी नदीसहित दक्षिणेकडे वाहणारी कृष्णा ही साक्षात भागिरथीच आहे.
अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II२६II उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II२७II औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II२८II ' पापविनाशी ' ' काम्यतीर्थ ' I तिसरें सिद्ध 'वरदतीर्थ ' I अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II२९II पुढें संगम-षट्कूळांत I ' प्रयागतीर्थ ' असे ख्यात I ' शक्तितीर्थ ' ' अमरतीर्थ ' I ' कोटितीर्थ ' परियेसा II३०II तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II३१II कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II३२II ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II३३II काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्यावया नाही उपमा I दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II३४II साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II३५II भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II३६II

या पावन संगमस्थानी असंख्य तीर्थे आहेत. त्यांचे महत्त्व पुराणांत वर्णिले आहे, इतके हे स्थान प्राचीन आहे. या कृष्णाकाठी आठ मुख्य तीर्थे आहेत. उत्तर दिशेकडून येणारी कृष्णा जिथे पश्चिमाभिमुख होते, तेथे ‘शुक्लतीर्थ’ आहे. या तीर्थांत स्नान केले असता ब्रह्महत्येचे पातक दूर होते. औदुंबर वृक्षाच्या - अर्थात मनोहर पादुका मंदिरासमोरच ‘पापविनाशी’, ‘काम्यतीर्थ’ आणि ‘वरदतीर्थ’ अशी तीन तीर्थे असून त्या तीर्थांमधील अंतर प्रत्येकी चार चार हात आहे. पुढें, संगमस्थानच्या षट्कुळांत ‘प्रयागतीर्थ’, ‘शक्तितीर्थ’, ‘अमरतीर्थ’ आणि ‘कोटितीर्थ’ अशी चार तीर्थे आहेत. अशा या गुप्त असणाऱ्या पवित्र तीर्थांना प्रकट करण्यासाठीच श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाऱाज तिथे बारा वर्षे राहिले. नामधारकास या सप्त नद्यांच्या संगमाचे माहात्म्य सांगताना सिद्ध म्हणतात, “ या स्थानी केवळ एकदा स्नान केले असता ब्रह्महत्यादि महापातकेही नष्ट होतात आणि भाविकांच्या सर्व इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. या क्षेत्राच्या केवळ दर्शनानेच सर्व अभिप्सीत पूर्ण होतात, मग स्नानाच्या पुण्यफळाचे काय अन किती वर्णन करू ? आणि हा औदुंबर तर साक्षात् कल्पतरु आहे. श्रीगुरूमहाराजांच्या तेथील वास्तव्यामुळेच ही पवित्र तीर्थे प्रकट झाली आणि आजही असंख्य भक्तजन या पवित्र क्षेत्रास भेट देऊन इहपर सौख्याचा लाभ घेत आहेत.”
दत्तभक्तहो, नृसिंहवाडीच्या कणाकणांत दत्तमहाराजांचे अस्तित्व आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी ही सर्व अघहारी तीर्थे आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी किंवा मुमुक्षूंसाठी प्रगट केली आहेत. तेव्हा, कधीही दत्तमहाराजांच्या कृपेने श्रीनृसिंहवाडीस भेट देण्याचा योग आला, तर या क्षेत्रातील तीर्थस्नानाचा अवश्य लाभ घ्यावा अथवा किमान या पुण्यदायक तीर्थांचे दर्शन तरी आवर्जून घ्यावे.
असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II३७II तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II३८II सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II३९II तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II४०II एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II४१II ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II४२II
श्रीनृसिंहसरस्वती महाराज कृष्णेच्या पश्चिमतीरावर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली राहत होते. भिक्षेसाठी ते पूर्वतीरावरील अमरापुर गांवात जात असत. त्या ग्रामी वेदशास्त्रसंपन्न, नित्य विहित कर्माचरण करणारा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत दरिद्री होता, तरीही परान्न न घेता केवळ कोरडी भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करीत असे. त्या परिस्थितीतही तो दररोज पंचमहायज्ञ करीत असे आणि घरी आलेल्या अतिथींचेही यथोचित आदरातिथ्य करीत असे. त्याची पत्नीही साध्वी, पतिव्रता होती, आणि सर्वदा पतीच्या वचनांनुसार वागत असे. त्या सद्वर्तनी ब्राह्मणाच्या दारात एक घेवड्याचा वेल होता. प्रचंड वाढलेल्या त्या वेलांस भरपूर शेंगा येत असत. एखाद्या दिवशी जर त्या विप्रास पुरेशी भिक्षा मिळाली नाही, तर त्या घेवड्याच्या शेंगा शिजवून त्याचे कुटुंब उदरपूर्ती करत असत.
वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II४३II भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II४४II भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्वासिती गुरु संतोषीं I गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II४५II
अन एके दिवशी त्याची पुण्याई फळास आली. श्रीनृसिंहसरस्वती महाराज त्या सात्त्विक वृत्तीच्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. साक्षात श्रीगुरु आपल्या घरी भिक्षेसाठी आलेले पाहून, त्या ब्राह्मणास साहजिकच खूप आनंद झाला. मोठ्या भावभक्तीने त्याने श्रीगुरुंचे स्वागत केले, त्यांना बसण्यासाठी आदरपूर्वक आसन घातले. सर्व पूजासाहित्य आणून अतीव श्रद्धेने त्याने श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे षोडशोपचारांनी पूजन केले. त्या दिवशी नेमकी त्याला विशेष भिक्षा मिळाली नव्हती, त्यांमुळे दारातल्या घेवड्याचीच भाजी त्या भाविक दाम्पत्याने श्रीगुरुंना भोजनात वाढली. भक्तवत्सल श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी भावभक्तीने दिलेली ती भिक्षा स्वीकारली आणि प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला,” आता तुझा दारिद्र्य-दोष गेला बरें !” आणि श्रीगुरु तेथून निघाले.
दत्तभक्तहो, शुद्धभावानें केलेली कुठलीही सेवा दत्तप्रभू आनंदाने स्वीकारतातच. श्री नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीने वाढलेल्या जोंधळ्याच्या कण्या आनंदाने ग्रहण केल्या, गाणगापूर येथील विप्र स्त्रीने सद्गुरुंच्या वचनावर श्रद्धा ठेवून वांझ म्हशीची धार काढली आणि तिने ते दूध तापवून नृसिंहसरस्वती महाराजांना भिक्षा म्हणून दिले. त्याचाही स्वामींनी स्वीकार केला. या काही फार मोठ्या सेवा नव्हेत, पण ही गुरुसेवा करतांना त्यांच्या ठायी जो उत्कट भक्तीभाव, अर्पण भाव होता, त्यामुळेच श्रीगुरू प्रसन्न झाले.
तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II४६II तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II४७II
त्या ब्राह्मणाच्या दारात असलेला घेवड्याचा वेल प्रचंड वाढलेला होता, त्याने सर्व अंगण व्यापून टाकले होते. त्या वेलाचे मूळच श्रीगुरुंनी तोडून टाकले आणि ते संगमावर निघून गेले.
विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II४८II आम्हीं तया यतीश्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II४९II ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II५०II
महाराजांनी घेवड्याचा वेल उपटलेला पाहताच त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अत्यंत दुःख झाले. या दारांत असलेल्या घेवड्यामुळेच कित्येक दिवशी त्या ब्राह्मणाच्या परिवाराची उदरपूर्ती झाली होती. आता मात्र श्रीगुरुंनी तो घेवड्याचा वेलच मूळापासून उपटला होता, त्यामुळे उद्विग्न होऊन ती ब्राह्मणपत्नी आणि त्याचे पुत्र दुःख करू लागले व म्हणू लागले, “ असे कसे आमचे नशीब वाईट आणि काय हे कुठल्या जन्मीचे प्रारब्ध ! आम्ही त्या यतीश्वरांचा असा काय अपराध केला होता, म्हणून त्यांनी आमच्या तोंडचा घास हिरावून मातीत टाकला.” अशाप्रकारे ती ब्राह्मणपत्नी आक्रोश करू लागली. परंतु तो ब्राह्मण मात्र तारतम्य जाणणारा होता. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणें सर्व काही घडत असते, हे तो जाणून होता. श्रीगुरुंवर त्याचा पूर्णतः विश्वास होता, श्रद्धा होती. त्यांमुळे त्याच्या पत्नीने श्रीगुरुंना दोष दिलेला त्याला मुळीच आवडले नाही.
दत्तभक्तहो, थोडा विचार करा. बहुतांश वेळा कुटुंबाची उदरपूर्ती करणारा तो घेवड्याचा वेल गुरुमहाराजांनी तोडून टाकला आहे. आज रात्री, कदाचित दुसऱ्या दिवशीही आपल्या मुलाबाळांच्या, पत्नीच्या आणि स्वतःच्याही पोटात एखादा घास जाईल याची शाश्वती नाही. त्याही वेळेला या गुरुभक्ताची अशी गाढ श्रद्धा आहे की साक्षात त्रिमूर्तीस्वरूप स्वामींचे पवित्र चरण आपल्या घराला लागले आहेत ना, मग आपले निश्चितच कल्याण होणार. किती ती अनन्यशरणागतता अन किती तो श्रीगुरुंवर दृढ विश्वास ! आणि मग या निजभक्ताचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण - दैन्यहरण श्रीगुरुमहाराज का नाही करणार बरें?
भाग्यवशात् त्या निजजनतारक श्रीदत्तात्रेयप्रभूंनी आपली अशी परिक्षा घेतली असती, तर त्या प्रसंगी आपण कसे वागलो असतो? त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे उद्विग्न झालो असतो, त्रागा केला असता? का मग त्या सत्त्वगुणी ब्राह्मणाप्रमाणे ' तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I' असा श्रीगुरुंवर अढळ विश्वास ठेवला असता?
म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II५१II विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II५२II ' आयुरन्नं प्रयच्छति ' I ऐसें बोले वेदश्रुति I पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II५३II चौऱ्यांशी लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II५४II रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II५५II पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II५६II आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II५७II बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II५८II तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II५९II
तो ब्राह्मण आपल्या पत्नीस म्हणाला,” जे काही ज्या ज्या वेळी घडते, ती ईश्वरी योजना असते. हे सारे विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. या संपूर्ण चराचराला व्यापून टाकणारा तो जगन्नियंता आहे. या अखिल सृष्टीची उत्पत्ति-स्थिती-लय करणाराही तोच आहे. लहान मुंगीपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांनाच तोच जगदीश्वर आहार पुरवितो. ‘तोच परमात्मा सर्वांना आयुष्य आणि अन्न देतो.’ हे वेदवचन आहे. सिंहाचा आहार हत्ती, तो कसा त्याला मिळतो? याचा जरा विचार करून बघ. चौऱ्याऐंशी लक्ष जीव आणि स्थावर जंगम या सर्वांचा आहार प्रथम निर्माण करून तद्नंतरच ईश्वराने त्यांची उत्पत्ती केली. श्रीमंत-निर्धन असा भेदभाव न करता तो समदृष्टी ठेऊन सर्व सृष्टीचे पोषण करतो. आपले पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळते. तेव्हा, आपले पूर्वजन्मीचे सुकृत अथवा दुष्कृत जसे असेल ते भोगणे प्राप्त आहे. उगाच इतरांना का दोष द्यावा बरें ? आपलेच दैव खडतर असेल तर दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. आपण जे पेरले असेल तेच फळ आपल्याला मिळते, त्यासाठी उगाच इतरांना का दोष द्यावा ? तू या अज्ञानसागरांत बुडून त्या सर्वश्रेष्ठ यतीश्वरांनी आपला ग्रास हिरावून घेतला असे म्हणतेस, मात्र आपल्या संचिताचा विचार तू करीत नाहीस. तो निजजनतारक असून आपल्या घरी भिक्षेसाठी आला, त्याच्या कृपेने आपला दारिद्र्य दोष गेला, आता तोच आपल्याला तारील.
सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता I परो ददातीति कुबुद्धिरेषा I स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः II असे वचन आहे. अर्थात आपल्याला सुख अथवा दुःख देणारा दुसरा कोणी नसतो, मुळात इतरांमुळे आपणास सुख अथवा दुःख प्राप्त होते, असे मानणे हीच दुर्बुद्धी आहे. सर्व प्राणिमात्र आपापल्या कर्मसूत्रांत बांधले गेले आहेत. तो ब्राह्मण पंचमहायज्ञ, अतिथीपूजन आणि वेदोक्त आचरण करणारा होता, त्याची वृत्ती सात्त्विक होती. म्हणूनच त्याला हे तत्त्वज्ञान कळले होते.
येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II६०II तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II६१II काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II६२II म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II६३II नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II६४II
अशी पत्नी आणि मुलांची समजूत घालून श्रीगुरूंनी उपटून टाकलेला तो घेवड्याचा वेल त्याने कृष्णा नदींत फेकून दिला. त्या वेलाचे मूळ फार मोठे व जमिनीत खोलवर रुतलेले होते. ते काढण्यासाठी तो विप्र ती जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ उपटून काढताच तिथे त्याला एक द्रव्याने भरलेला कुंभ आढळला. ते धन पाहून अर्थातच त्या सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही आणि ते मोठ्या कृतज्ञताभावाने म्हणू लागले, “ हे काय नवलच घडले ! यतीमहाराज आम्हांवर प्रसन्न झाले, म्हणूनच त्यांनी हा वेल तोडून टाकला आणि आम्हांला हा द्रव्यघट सापडला. ते कोणी सामान्य नर नसून साक्षात योगीश्वर आहेत, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. आमचे दैन्य दूर करण्यासाठीच ते आमच्या गृही आले होते. आता आपण सत्वर त्यांच्या दर्शनाला जाऊ.”
नारायणस्वरूपी दत्तमहाराज गृहीं आल्यावर जगन्माता लक्ष्मीदेवी आपसूक तिथे येणारच, नाही का ? श्रीगुरु हे भावप्रिय आहे. माझ्या भक्तांचा मी उद्धार करणारच, असे त्यांचे ब्रीद आहे. त्यामुळे अंतःकरणपूर्वक केलेल्या अल्प सेवेच्या बदल्यात भक्तांचे इहपर कल्याण असा त्यांचा अनाकलनीय हिशोब असतो.
जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II६५II श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II६६II ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II६७II ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II६८II
मग तो ब्राह्मण उत्तम पूजासाहित्य घेऊन आपल्या पत्नी-मुलांसह संगमावर गेला, श्रीगुरुमहाराज तिथे होतेच. त्या दाम्पत्याने श्रीगुरुंची उत्तम प्रकारे पूजा केली आणि घरी घडलेले सर्व वर्तमान त्यांना सांगितले. तसेच आपण अज्ञानवशात श्रीगुरुंना दोष दिला त्याबद्दल त्यांची क्षमायाचनादेखील केली. परमकृपाळू गुरूंनी त्यांना क्षमा तर केलीच, पण ‘ तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल, तुम्ही पुत्रपौत्रांसह नांदाल,’ असे शुभाशीर्वादही दिले. पुढें, श्रीगुरुं त्यांना म्हणाले, “ तुम्ही ही धनप्राप्तीची गोष्ट कोणालाही सांगू नका. माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केले तर तुमची संपत्ती नाहीशी होईल.” असे शुभ दत्ताशिष प्राप्त होऊन ते ब्राह्मण पती-पत्नी परत गेले. श्रीगुरुकृपा अशी असते, त्यांच्या केवळ दर्शनानेच दैन्य निवारण होते.
दत्तभक्तहो, श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणाला, ‘ तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II’ ही जी सूचना दिली, कारण त्या वेळी त्यांना प्रकट व्हायचे नव्हते, लोकोपद्रव टाळायचा होता.
ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II७१II सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II७२II गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II७३II ज्यावर श्रीगुरुंची कृपा होते, त्याच्या दारिद्र्य व पापाचा क्षणार्धांत नाश होतो. अहो, कल्पवृक्षाचा आश्रय घेतल्यावर दारिद्र्य कसे बरें त्याच्या घरी राहील? जो मनुष्य दैवहीन असेल त्याने श्रीगुरुंना अनन्यभावें शरण जावे. श्रीगुरुकृपेने तो सहजच भवसागर तरून जाईल आणि सर्वांना पूज्य होईल. जो कोणी श्रीगुरुंची अंतःकरणपूर्वक भक्ती करेल, त्याचे इहपर कल्याण होईल आणि त्याच्या घरी अष्टैश्वर्ये, लक्ष्मी अखंड नांदेल.
खरें पाहता, ब्राह्मण परिवाराच्या उदरपूर्तीचे साधन असलेला घेवड्याचा वेल उपटून श्रीगुरुंनी त्यांच्या संयमाची एक प्रकारे परीक्षाच घेतली. परंतु त्या ब्राह्मणाचे सदाचरण, श्रीगुरुंवर असलेली अढळ श्रद्धा यांमुळे श्री नृसिंहसरस्वती महाराज प्रसन्न झाले आणि फलस्वरूप त्या ब्राह्मणास सुवर्णमोहरांचा कुंभ मिळाला.
दत्तभक्तहो, आपल्याही जीवनांत असंख्य आपदा-विपदा येतात, कित्येकदा चढ-उतारांस सामोरे जावे लागते, अपमान-दुःखाचे प्रसंग येतात. अशा वेळी साहजिकच त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे आपलीही दत्तमहाराजांवर असलेली श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते. मात्र हीच आपली कसोटीची वेळ असते. “ यांतच माझे कल्याण आहे, भक्तवत्सल श्रीगुरु माझा उद्धार निश्चित करतीलच!” अशी त्या आचारसंपन्न ब्राह्मणाप्रमाणे दृढ श्रद्धा ठेवल्यास स्मर्तृगामी दत्तमहाराज त्वरित धावून येतील आणि आपल्या मनीचा भाव जाणून घेऊन मस्तकी कृपाहस्त ठेवतील, हे निःसंशय !
सिद्धमुनी नामधारकास सांगतात, “ श्रीगुरुंचा महिमा हा असा आहे. तू मनोभावे गुरुभक्ती कर. त्यायोगे, जणू कामधेनूच तुझ्या घरी सदैव वास करेल.”
गंगाधराचा पुत्र श्रीगुरूचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे. श्रोतें हो, पुढील कथामृतसार तुम्ही एकाग्र मनाने श्रवण करावे.
II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II
श्री क्षेत्र औदुंबर येथून निघून भगवान् श्रीगुरूंनी दक्षिण दिशेकडे प्रस्थान केले. त्यांनी कृष्णाकाठच्या अनेक तीर्थयात्रा केल्या. कृष्णामाता साक्षात् विष्णूचे रूप आहे तर वेणीमाता ही भगवान शंकरांचे रूप आहे, असे पद्मपुराणांत वर्णिले आहे. ह्या दोन हरिहरस्वरूप असणाऱ्या नद्यांचा पंचनद्यांसह झालेला अत्यंत मनोहर, पुण्यदायक आणि ब्रह्महत्यादि पंचपातकांचा नाश करणाऱ्या अष्टतीर्थांनी युक्त असा संगम पाहून श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या अतिपवित्र संगमाच्या पश्चिम तीरावरील औदुंबर वृक्षातळी वास करून बारा वर्षे राहिले. या संदर्भात प. प. थोरले स्वामीमहाराजांनी एक अतिशय सुरेख अन समर्पक रूपक केले आहे. श्री टेम्ब्ये स्वामी म्हणतात. “ अष्टप्रकृतींच्या समन्वयाने साकारलेल्या या देहांत आदिमाया चित्शक्ती आणि जीवात्मा यांच्या संगमस्थानी अर्थात अती मनोहर अशा आज्ञाचक्राच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरंध्रांत श्रीगुरूमहाराज विराजमान झाले.”
परमात्मस्वरूप श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज आपल्या मनोहर स्वरूपांत तिथे स्थापित आहेत. ‘ तया औदुंबरातळीं । श्रीगुरुवास सर्वकाळीं । काम्य होत तात्काळीं । आराधितां श्रीगुरुसी ॥’ अशी ग्वाही श्रीगुरुचरित्रकारांनी दिली आहे. प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती महाराज, नारायण स्वामी, सनकादिक मंडळी, सद्गुरु गुळवणी महाराज, सद्गुरु मामा महाराज अशा अनेक थोर संत महापुरुषांनादेखील श्रीदत्तप्रभूंनी, श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे दर्शन दिले आहे, साक्षात्कार दिला आहे. तसेच आजही साक्षात श्रीदत्तप्रभू या पावन स्थानीं मुमुक्षूंना आश्वासन देत, सकाम भक्तांच्या इष्ट मनोकामनांची पूर्ती करत आणि संत-महात्म्यांना परमानंदाचे वरदान देत सदैव वास्तव्य करत आहेत. औदुंबरवृक्षातळीं गुप्तरूपाने वास करणाऱ्या श्रीगुरुंची आराधना केल्यास प्रचिती अवश्य येतेच.
अमरापूर येथील ब्राह्मणाच्या दैन्यहरणाच्या कथेचेही हेच तात्पर्य आहे की विशुद्ध आचरण, सत्त्वगुणयुक्त विचार आणि चराचराला व्यापून टाकणाऱ्या त्या परमशक्तीवर प्रगाढ विश्वास यांमुळेच गुरुकृपा प्राप्त होते. आचारसंपन्न, वैदिक आणि श्री गुरुमहाराजांवर दृढ श्रद्धा असलेल्या भक्तिमान ब्राह्मण दाम्पत्यास ‘ तुम्ही भूलोकी पुत्र-पौत्रांसह ऐश्वर्यारोग्य भोगून अंती निश्चितपणे मुक्ती पावाल.’ असा आशीर्वाद त्या परमात्म्याने दिला. श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे पूजन करतांना, भिक्षा म्हणून घेवड्याची भाजी भोजनात देतांना त्या ब्राह्मणाची जी उत्कट भक्तिभावना होती, त्यांमुळे श्रीगुरु प्रसन्न झाले आणि ‘ तुझे दैन्य जाईल.’ असे त्यांनी आश्वासन दिले. अर्थातच त्यानंतर स्वामींनी त्या ब्राह्मण परिवाराच्या क्षुधाशांतीचे मुख्य साधन असलेल्या घेवड्याचा वेल तोडून त्याची कसोटीही घेतली. ‘ सकल विश्वाचा जनक, पालक आणि संहारक अशा परमेश्वराची श्रीमंत व निर्धन या सर्वांवरच कृपादृष्टी असते. कर्तुमकतुम् अन्यथा कर्तुमचें सामर्थ्य असलेले श्रीगुरुच आपले तारणहार आहेत.’, असा दृढभाव असलेला तो सात्विक वृत्तीचा ब्राह्मण त्या परमात्म्याच्या परिक्षेत सहजच उत्तीर्ण झाला. त्या अल्प गुरुसेवेनेच त्याचे इहपर कल्याण झाले. ‘ ऋण तरि मुष्टी पोहे I त्याच्या व्याजांत हेमनगरी ती I मुदलात मुक्ति देणे I ही कोण्या सावकारिची रीती II’ या कविवर्य मोरोपंतांच्या उक्तीचीच ही प्रचिती नव्हें काय ? थोडक्यांत सांगायचे तर परमेश्वराला निष्काम भावनेने काही समर्पण केले असता ते निश्चितच ‘सुवर्ण’ होऊन परत मिळते, याची खात्री बाळगावी.
दत्तभक्तहो, कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्रातील हा अध्याय आपणही श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने नित्यपाठांत ठेवू या. दत्तमहाराजांच्या कृपेनें श्रीक्षेत्र श्रीनृसिंहवाटिका आणि इतरही अनेक श्रीदत्तक्षेत्रांच्या दर्शनाचा, सेवेचा लाभ आपणां सर्वांना मिळावा आणि अमरापूरच्या ब्राह्मणाप्रमाणेच आपल्या ठायीं अनन्य गुरुभक्ती असावी, सर्वकाही अनुकूल असतांना आपल्या मनीं नेहेमीच आपल्या आराध्याप्रति कृतज्ञताभाव असावा तसेच प्रारब्धवशांत विपरीत परिस्थिती आली तरी त्यावेळी आपली श्रीगुरुचरणांवरील पकड अधिक दृढतेने घट्ट व्हावी, हीच त्या भक्तवत्सल-दयाघन श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-श्रीदत्तप्रभूंच्या मनोहर चरणीं प्रार्थना !!!
II श्रीगुरुदेवदत्त II
II श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II
II शुभं भवतु II
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥