Sep 13, 2024

' योगिराज ' श्रीथोरले स्वामीमहाराज आणि प्रासादिक मंत्रोपासना


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगुरुः शरणम् ॥ ॥ ॐ श्रीमद् अमृतमूर्तये श्रीदत्तवासुदेवाय नमः ॥ श्रीतुंगभद्रेच्या तीरावर वसलेल्या हावनूर नामक गावाचा परिसर अत्यंत रमणीय व शांत आहे. श्रीदत्त संप्रदायासाठी या स्थळाचे विशेष महत्व असे की श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा विसावा चातुर्मास शके १८३२ अर्थात इ. स. १९१० साली इथेच केला होता. त्यावेळी हावनूर येथील प्रसिद्ध अशा श्रीत्रिपुरान्तकेश्वराच्या मंदिरामध्ये श्रीटेम्बेस्वामीमहाराज वास्तव्यास होते.  याच चातुर्मासात घडलेली श्रीटेम्बेस्वामीमहाराजांची ही अदभूत लीला - एका सोमवारी श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनहेतूने काही भक्त मंडळी हावेरी स्टेशनवर उतरून बैलगाडीने हावनूरला जाण्यास निघाली. त्यांतीलच एका भक्ताची पत्नी मात्र पायीच मार्गक्रमण करत होती. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा तिचा संकल्प व नवस होता. असे असले तरी बरोबरच्या मंडळींनी फारच आग्रह केला तर ती काही अंतर बैलगाडीत बसून पुढील प्रवास पायीच करत असे.  साधारण काही अंतराचा प्रवास झाल्यावर, या सर्व स्वामीभक्तांना दोन तेजस्वी बटू सामोरे आले आणि हात जोडून त्या सर्वांना त्यांनी अति विनीत होऊन प्रार्थना केली," श्रीस्वामीमहाराजांच्या रूपाने या भूतलावर अवतरलेल्या श्रीदत्तगुरुमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपण सर्व भक्तमंडळी हावनूरला निघालेले आहात. हावनूर अजून बरेच दूर आहे. इथवरच्या प्रवासाच्या श्रमाने तुम्ही फार दमलेले दिसत आहात. तेव्हा, आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात येऊन आपण सर्वांनी भोजन आणि थोडी विश्रांती घेतली तर आम्हांला फार धन्यता वाटेल." खरोखरच ती सर्व भक्तमंडळीं थकलेली होती आणि अत्यंत क्षुधाग्रस्तही झाली होती. त्याक्षणी आपल्या सद्‌गुरूंनीच या बटूंना पाठविलेले आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे अर्थातच त्या सर्वांनी त्या दोन बटूंची ती प्रेमळ विनवणी तत्काळ मान्य केली आणि ते सर्वजण त्या बटूंच्या पाठोपाठ त्यांच्या आश्रमात गेले.  अनेक लहान-मोठ्या इमारती असलेले त्या आश्रमाचे आवार अतिशय प्रशस्त होते. त्या बटूंनी सर्व लोकांना विहिरीवर नेऊन हातपाय धुण्यास पाणी काढून दिले. त्या शीतल जलाने सर्वच भक्तमंडळींचा थकवा क्षणांत नाहीसा झाला. त्यानंतर समोरच असलेल्या श्रीगणेश मंदिरात जाऊन त्या सर्वांनी विघ्नहर्त्याचे मोठ्या मनोभावें दर्शन घेतले. थोड्याच वेळांत, त्या बटूंनी त्यांना भोजनमंदिरामध्ये नेले. त्या दालनांत हिरव्यागार केळीची लांबरुंद पाने मांडलेली होती. सभोवती सुरेख रांगोळ्या काढलेल्या होत्या व समोर सुवासिक उदबत्त्या लावलेल्या होत्या. हा थाट पाहून त्या सर्व भक्तमंडळींचे चित्त प्रसन्न झाले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर त्या दोन हसतमुख बटूंनी त्यांना अतिशय सुग्रास अन्नपदार्थ वाढावयास सुरुवात केली. त्या अतिशय सात्विक, स्वादिष्ट भोजनाने सर्वच तृप्त झाले. भोजनोत्तर त्या बटूंनी सर्वांना त्रयोदशगुणी विडेही दिले.  काही काळ त्या पवित्र स्थानी थांबून सर्वांनी विश्रांती घेतली आणि त्या बटूंचा निरोप घेऊन ती सर्व भक्तमंडळी आपल्या पुढील प्रवासासाठी हावनूरला जाण्यास निघाली. काही पावले चालून गेल्यावर त्या मंडळींनी सहजच मागे पाहिले अन काय आश्चर्य ! काही क्षणांपूर्वी ते ज्या आश्रमांत होते, जिथे त्या सर्वांनी पोटभर जेवण केले तो आश्रम, ते दोन बटू, ते गणरायाचे मंदिर असे तिथे आता काहीच तेथे नव्हते. तर त्या ठिकाणी केवळ बैलगाडीचा मार्ग अन आजूबाजूचा शेत परिसर होता. हा अद्‌भूत प्रकार पाहून ती सर्वच मंडळी दिङ्मूढ झाली. हा भास म्हणावा तर सर्वांनाच कसा झाला ? तसेच त्या सर्व भक्तमंडळींची उदरपूर्तीही झाली होती, म्हणजेच जे घडले ते सत्य होते हे निश्चितच ! संपूर्ण प्रवास मार्गात हाच विचार सर्वांच्या मनांत घोळत होता. यथावकाश सायंकाळी ही सर्व मंडळी श्रीक्षेत्र हावनूर येथे पोहोचली. ते सर्वच भक्तगण आता श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनासाठी उत्सुक होते. शुचिर्भूत होऊन त्या सर्वांनी त्यांच्या सद्‌गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. सत्संग सोहळ्यानंतर त्यातील एका भक्ताने टेम्बेस्वामीमहाराजांना दुपारी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि " हा काय अघटित प्रकार होता ?  त्या पाठीमागचे सत्य काय ? हे जाणून घेण्यास आम्ही सर्व उत्सुक आहोत." अशी प्रार्थना केली. त्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्य, कुतूहल, आणि भीतीयुक्त भाव पाहून श्रीस्वामीमहाराज मंद स्मित करत उत्तरले, " तुमचा भक्तिभाव, दृढ श्रद्धा यांमुळे प्रसन्न होऊन त्या भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी ही लीला केली. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक रूपे धारण करणारे अत्रिपुत्र श्री दत्तात्रेय आपल्या सामर्थ्याने मनःकल्पित विश्व निर्माण करतात आणि ते विलीनही करतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते." दत्तभक्तहो, श्रीस्वामीमहाराजांनी हे सर्व त्या परब्रह्माने घडविले, असे जरी त्या भक्तमंडळींना सांगितले असले तरी, सर्वांतर्यामी स्वामींनीच आपल्या भक्तांना सृष्टीच्या उत्पत्ती-स्थिती-विलयाचा हा चमत्कार दाखविला, हे निःसंशय! श्रीस्वामीमहाराजांच्या चरित्राचे मनन, चिंतन केले असता त्यातील सर्वात् महत्त्वाचा पहिला पैलू म्हणजे  ' देव आणि भक्तांचे ऐक्य ' आपल्याला सहज लक्षांत येतो. श्रीसंतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी त्यांच्या अभंगांतून  “देव ते संत, संत ते देव" आणि  " भक्त तोचि देव, देव तोचि भक्त," असे वर्णन करून हे रहस्य प्रकट केले आहेच. अशा अनेक प्रसंगामध्ये श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराज आपल्याला करुणासागर व भक्तवत्सल स्वरूपांत दिसतात. त्यांच्या चरित्रातील असंख्य लीला अनुभवतांना आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज या दोन श्री दत्तप्रभूंच्या अवतारानंतर झालेल्या  ' योगिराज ' या श्रीदत्तावताराचीच प्रचीती येत राहते. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा ज्या भक्ताच्या पत्नीचा संकल्प होता, तिच्याकडेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी श्रीस्वामीमहाराजांनी भिक्षा ग्रहण केली आणि आशीर्वाद म्हणून त्या सौभाग्यवतीस पुढील तीन मंत्रांचा जप करण्यास सांगितले.  संपत्तीवर्धक श्लोक दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियं ।  ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्र्याच्छ्रीप्रदोऽवतु ॥ भावार्थ - दरिद्री ब्राह्मणाच्या घरी घेवड्याची भाजी खाऊन ज्यांनी त्याला विपुल संपत्ती दिली, ते लक्ष्मी प्रदान करणारे श्रीदत्तदेव दारिद्र्यापासून माझे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - १८) संततिवर्धक श्लोक दूरीकृत्य पिशाचार्तिं जीवयित्वा मृतं सुतम् ।  योऽभूदभीष्टदः पातु स नः संतानवृद्धिकृत् ॥ भावार्थ - साध्वीची पिशाचपीडा दूर करून ज्यांनी तिच्या मृतपुत्राला जिवंत केले व त्या ब्राह्मण स्त्रीचे मनोरथ पुरविले, ते वंशवेल वाढविणारे भगवान दत्तात्रेय आमचे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - २०, २१) सौभाग्यवर्धक श्लोक जीवयामास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युहा ।  मृत्युंजयः स योगींद्रः सौभाग्यं मे प्रयच्छतु ॥ भावार्थ - पतिव्रतेचा पति मृत असतां ज्यांनी त्याला जिवंत केले, ते मृत्यूचा नाश करणारे मृत्युंजय योगिराज मला सौभाग्य देवोत.(श्रीगुरुचरित्र, अध्याय - ३०, ३१, ३२)

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराजांच्या कृपेने या दिव्य आणि प्रासादिक मंत्रांचे अनुष्ठान करून पुढे त्या माऊलीस संपत्ती, संतती, सौभाग्य, दत्तमहाराजांची सेवा आदि सहजच प्राप्त तर झालेच, खेरीज तिला अखेरीस सायुज्य मुक्तीचा लाभदेखील झाला.


॥ श्री गुरुदेव दत्त ॥  संदर्भ : श्रीथोरले स्वामीमहाराज - श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती टेम्बेस्वामीमहाराज यांचे चरित्र लेखक : द. सा. मांजरेकर आणि डॉ. केशव रामचंद्र जोशी

Aug 26, 2024

अवतार गोकुळीं हो


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्‌गुरुम् ॥ 

 

अवतार गोकुळीं हो । जन तारावयासी ॥ लावण्यरूपडें हो । तेजःपुंजाळराशी ॥ उगवलें कोटिबिंब । रवि लोपला शशी ॥ उत्साह सुरवरां । महाथोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाईकांता ॥ आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥धृ.॥  कौतुक पहावया । माव ब्रह्मयानें केली ॥ वत्सेंही चोरुनीयां । सत्यलोकासी नेलीं ॥ गोपाळ गाई वत्सें । दोंहीं ठायीं रक्षिलीं ॥ सुखाचा प्रेमसिंधू । अनाथाची माऊली ॥२॥  चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी ॥ मेघ जो कडाडीला । शिळा वर्षल्या धारीं ॥ रक्षिलें गोकुळ हो । नखीं धरिला गिरी ॥ निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ॥३॥  वसुदेवदेवकीचे । बंध फोडिली शाळ ॥ होऊनियां विश्व-जनिता । तया पोटिंचा बाळ ॥ दैत्य हे त्रासियेले । समूळ कंसासी काळ ॥ राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ॥४॥  तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून ॥ पांडवसाह्यकारी । आडलिया निर्वाणीं ॥ गुण मी काय वर्णू । मति केवढी वाणी ॥ विनवितो दास तुका । ठाव मागे चरणीं ॥५॥ *************************************************** ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरगळां वैजयंती माळा ॥धृ.॥  चरणकमळ ज्याचें अतिसुकुमार । ध्वजवज्रांकुश ब्रीदाते तोडर ॥१॥  नाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥२॥  मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटी । मोहियेलें मानस कोंदियेली दृष्टी ॥३॥  जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥४॥  एका जनार्दनीं देखियेलें रूप । रूप पाहों जातां झालें द्‌रूप ॥५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

***************************************************


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


॥ श्री गुरुदेव दत्त ॥


Aug 15, 2024

श्री स्वामी स्वरूपानंदकृत श्रीभावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय


महती ज्ञानेश्वरीची । प्राकृतग्रंथीं अनुपम साची ॥ ध्रु०॥ रत्ने शब्दाब्धीचीं । वेंचुन रचना केली जियेची ॥१ 

उपमा उपमेयांची । गर्दी, ज्याला गोडी सुधेची ॥२ 

आठवण करवित साची । शुचिपण ज्याचें गोदावरीची ॥३ 

वाणी दासगणूची । कुंठित झाली गति शब्दांची ॥४ 

श्री संतकवि दासगणु महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीचे माहात्म्य किती सुरेख शब्दांत वर्णिले आहे. श्री ज्ञानेश्वरी - अवघ्या मराठी जनांची माउली असलेल्या ज्ञानदेवांची साक्षात वाङ्मय-मूर्ती ! प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तिनाथ महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या आणि माऊलींप्रमाणेच कृपेचा, मायेचा वर्षाव करणाऱ्या या दिव्य-पावन ग्रंथाच्या पठण-मनन-चिंतनाने भाविकांचे परम कल्याणच होते, अशी ग्वाही अनेक अधिकारी महात्म्यांनी दिली आहे. असंख्य भक्तांनी याची प्रचितीही अनुभवलीही आहे.

तथापि, या ग्रंथाची प्राकृत भाषा, ज्ञानदेवांच्या दृष्टांतांतील गुढार्थ, ग्रंथवाचनासाठी लागणारा वेळ आणि अशाच इतर अनेक कारणांमुळे कित्येक भाविकांची, श्रद्धाळूंची इच्छा असूनही ते याचा वाचनलाभ घेऊ शकत नाही अथवा ही प्रासादिक श्रीज्ञानेश्वरी वाचूनही त्यांना पूर्णतः समाधान मिळत नाही. यासाठीच, सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांनी श्रीज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या घेऊन भावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठाची रचना केली आहे.

आम्हां सामान्य जनांवर कृपा करण्यासाठीच जणू भगवती श्री ज्ञानदेवी अतिशय सुलभ होऊन प्रकटली आहे.

या श्रीज्ञानेश्वरीला अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन श्रीसंत एकनाथ महाराजांनीही दिव्यानुभव घेतला होता. म्हणूनच, संत एकनाथ अभंग गाथेमध्ये श्रीज्ञानदेवांच्या या वाङ्मय विग्रहाची स्तुती करतांना ते लिहितात - भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत हे दिव्य स्तोत्र नित्य पठणांत ठेवल्यास भाविकांचे इह-पर कल्याण होणारच, यात तिळमात्र शंका नाही.


सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत श्रीभावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 29, 2024

॥ म्हणे गजानन ॥ - श्री. गणेश वि. रामदासीकृत श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता श्री गजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्मसमंधाचा ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजानन भक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

" म्हणे गजानन " या स्वरमालिकेतून श्री. गणेश वि. रामदासी यांनी या श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण अत्यंत रसाळ वाणींत केले आहे. अतिशय सुमधुर असे हे मनन प्रत्येक गजानन भक्ताने आवर्जून श्रवण करावे, असेच झाले आहे.



॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 2, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १२


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती, हे मयूरेश्वरा विमलकीर्ती तू माझ्या हृदयांत वास करून हा ग्रंथ कळसास ने (हा ग्रंथ सुफळ संपूर्ण व्हावा).॥१॥ तू ज्ञानबुद्धीचा दाता आहेस, तूच भक्तांचे मनोरथ पूर्ण करतोस. हे गणराया, ह्या विघ्नरूपी पर्वतांचा तूच संहार करतोस.॥२॥ तू साक्षात चिंतामणी आहेस, (तत्कारण तुझे भक्त) जे काही इच्छितात, ते सर्व काही तू आपल्या भक्तांना देतोस, असे पुराणांत वर्णिले आहे.॥३॥ हे एकदंता, लंबोदरा, पार्वतीसुता, भालचंद्रा आणि सिंदुरारि माझ्या मनांतील अवघ्या चिंता दूर कर.॥४॥ असो. अकोल्यात बच्चूलाल अग्रवाल नावाचा एक धन-कनक संपन्न असा गृहस्थ होता. तो अतिशय उदारही होता.॥५॥ त्यानें कारंजा ग्रामीं घडलेली लक्ष्मणपंत घुडे यांची हकीकत (इतर लोकांकडून) कर्णोपकर्णी ऐकली होती. त्यामुळें तो जरा साशंक झाला होता.॥६॥ तिथें काय खरें आणि काय खोटें घडलें असावें, असा तो मनी विचार करत असे. आणि एके दिवशी (गजानन) महाराज अकोल्यास आले.॥७॥ त्यावेळीं हा आपला भक्त आहे हे जाणून साक्षात्कारी गजानन स्वामी बच्चुलालाच्या घरीं आलें आणि (घराबाहेरील) ओट्यावर स्थानापन्न झाले.॥८॥ (समर्थांचे आगमन झालेले पाहून) बच्चूलालास अतिशय आनंद झाला आणि तो समर्थांस म्हणाला," गुरूराया, आज मला आपलें पूजन करण्याची इच्छा आहे."॥९॥ त्याचे हे बोलणें ऐकून समर्थांनी आपल्या मानेनेच होकार दिला. श्रोतें हो, (या पूजनास) आपली संमती असल्याचेच हें साक्षात द्योतक होते.॥१०॥ बच्चुलालानें सत्वर पूजेची तयारी केली. त्या ओट्यावर अतिशय आदरपूर्वक त्याने (समर्थांचे) षोडशोपचारी पूजन आरंभिले.॥११॥ प्रथम त्याने समर्थांच्या सर्वांगास विविध प्रकारची उटणीं लावून मंगलस्नान घातलें. त्यानंतर त्यांस भरजरी पितांबर वस्त्र म्हणून परिधान केलें.॥१२॥ अंगावर बहुमोल अशी काश्मिरी शालजोडीही पांघरली. एक जरीकाठीचा रेशमी रुमाल आणून मस्तकास बांधला.॥१३॥ गळ्यांत गोफ आणि हातांत सुवर्ण सलकडींही घातली. दोन्ही हातांच्या दहाही बोटांत निरनिराळ्या अंगठ्या घातल्या.॥१४॥ स्वामींच्या डाव्या हातात हिऱ्याची बहुमूल्य अशी पौची घातली. तसेच रत्नजडित हार महाराजांच्या कंठी त्यावेळीं विशेष खुलून दिसत होता.॥१५॥ नैवेद्यासाठी म्हणून जिलबी, राघवदास पेढे (समर्थांपुढे) ठेवले. एका लहान तबकांत त्रयोदश गुणी विडेदेखील ठेवले.॥१६॥ (स्वामींस) अष्टगंध, अर्गजा, अत्तर आदी सुवासिक द्रव्यें लावली. तसेच गुलाबपाणीही त्यांच्या अवघ्या तनूवर शिंपडले.॥१७॥ शेवटी एका सुवर्णाच्या ताटांत फार मोठी, अनेक रुपये होन मोहोरांची दक्षिणा ठेवली.॥१८॥ त्या दक्षिणेची एकूण किंमत काढली तर खरोखर दहा हजार झाली असती. अश्या थोर दक्षिणेचे किती वर्णन करू बरें ?॥१९॥ (त्यानंतर) श्रींपुढे श्रीफळ ठेवलें आणि अत्यंत विनयपूर्वक (बच्चुलालाने) प्रार्थना केली, " महाराज, माझ्या मनीं इथे एक राममंदिर बांधावयाची इच्छा आहे.॥२०॥ गुरुराया, उत्सवासाठी ह्या माझ्या ओट्यावर मंडप उभारला तरी फारच अडचण होते.॥२१॥ हे ज्ञानवंता, माझें हे मनोरथ पूर्ण कर." असे म्हणून अनन्यभावानें त्याने आपला माथा (स्वामी) चरणांवर ठेवला.॥२२॥ त्यावर संत गजानन (त्याला) ' श्रीजानकीजीवन तुझा हा हेतू पूर्ण करेल.' असा आशीर्वाद देते झाले.॥२३॥ असो. आज हे सर्व अलंकार घालून मला पोळ्याचा बैल बनवला आहेस. तू असें का बरें केलेस ? याचे मला कारण सांग बघू.॥२४॥ मी काही पोळ्याचा बैल अथवा दसऱ्याचा घोडा नाही. मला या सर्व दागदागिन्यांचा काय उपयोग आहे? ते मला सांग बरें.॥२५॥ अरे, हे सर्व मज विषासमान आहे. मला ह्या वस्तूंचा स्पर्शदेखील नको. अरे, या अशा नसत्या उपाधींस माझ्या मागे लावू नकोस.॥२६॥ किंवा मग बच्चुलाला, तू किती धनवान आहेस, हे दाखविण्यासाठी असे हे प्रदर्शन केले आहेस का? ते मला सर्व सांग पाहू.॥२७॥ अरे, ज्याला जे आवडते तेच त्याला द्यावें. मी तर एक वेडापिसा संन्याशी आहे, जो गांवभर नागवा फिरत असतो.॥२८॥ बच्चुलाला, हें अवघें (ऐश्वर्य) तुझें तुला लखलाभ असो. तुम्हां प्रापंचिकांसच या द्रव्याची गरज असते.॥२९॥ अरे, माझा जगतनियंता परमेश्वर भीमा नदीच्या तीरी एका विटेवर उभा आहे. तो काय मला हे सर्व वैभव देण्यास समर्थ नाही का ?॥३०॥ असे म्हणून (महाराजांनी) आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून चहू बाजूंस फेकून दिले. अगदी वस्त्रांचीही तीच गती झाली.॥३१॥ केवळ दोन पेढे खाऊन गजानन महाराज तिथून निघून गेलें. हा सर्व घडलेला प्रकार पाहून, अकोल्यांतील अनेक लोकांना वाईट वाटले.॥३२॥ त्यावेळीं तिथे कारंजा येथील काही लोक उपस्थित होते. तें आपापसांत  बोलू लागले, " आपला लक्ष्मण खरोखरच दुर्दैवी आहे. त्याने आपल्या घरी बच्चुलालाप्रमाणेच (महाराजांचे) पूजन केलें खरें, परंतु मनांत धनाचा मोह असल्यामुळें दक्षिणा अर्पण करतांना कचरला.॥३३-३४॥ त्यानें भक्ती नसतांना केवळ वरवरचें भाषण केलें. (अंतर्ज्ञानी) समर्थांस त्याचे हे वागणे समजणे अशक्य होते काय ?॥३५॥ दांभिकांची पूजा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडेच असतात. तें महावस्त्र म्हणून केवळ अक्षता अर्पण करतात.॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' (खडीसाखर नैवेद्यास अर्पण करतो.) असें म्हणून भुईमुगाचा एखादा कुचका दाणा पुढें आणून ठेवतात.॥३७॥ अशा दांभिक पूजनाचे फळंही अर्थात त्याच स्वरूपांत मिळते. लक्ष्मणाचा सर्वनाश त्याच्या या अशाच कृतीने झाला, हेच खरें !॥३८॥ हा बच्चुलाल मात्र धन्य झाला. ज्याप्रमाणें तो बोलला, अगदी तसेंच, एका जवाहूनही वेगळें नाही असेच त्याचे वर्तन होते. (महाराजांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक त्यानें पूजन केलें.)॥३९॥ आतां त्याच्या या वैभवाला कधीही ओहोटी लागणार नाही. अहो, एकदा संतकृपेस जो पात्र ठरला, तो सर्वदा सुखीच होत असतो."॥४०॥ त्यानंतर बच्चुलालांनीं संपूर्ण अकोला शहरांत समर्थांचा शोध घेतला, परंतु त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.॥४१॥ असो. शेगांवच्या मठामध्यें गजानन महाराजांचा पितांबर नावाचा एक शिंपी जातीचा शिष्य होता.॥४२॥ त्याने (समर्थांची) खूप सेवा केली होती. त्याच्या त्या तपश्चर्येला अखेर फळ आले. श्रोतेंहो, एके दिवशी मठांत एक गोष्ट घडली. ती आतां ऐका.॥४३॥ पितांबर एक साधेसे, अतिशय जीर्ण झालेलें धोतर नेसला होता. तें पाहून गुरुवर त्यास म्हणाले," अरे, तुझे नांव पितांबर आहे, पण तुला नेसण्यासाठी धड धोतरही नाही. वेड्या! तुझ्या उघड्या पार्श्वभागास सर्व स्त्री-पुरुष बघत आहेत, तो तरी जरा झाक बरें !॥४४-४५॥ आपलें नाव सोनुबाई सांगायचे आणि हातांत साधा कथिलाचा वाळाही घालावयास नसावा अथवा प्रत्यक्ष गंगाबाई नाव असतांना जीव मात्र तहानेनें तडफडत असावा, असाच खरोखर तुझा हा प्रकार आहे. (हे तू नेसलेलें) फाटकें धोतर केवळ पोतेरा म्हणून उपयोगीं येईल.॥४६-४७॥ तेच (धोतर) तू नेहेमी नेसतोस आणि आपलें ढुंगण जगाला दाखवतोस. तेव्हा नेसण्यासाठी हा दुपेटा (मी) तुला देतों, तो घे.॥४८॥ बाळा, माझ्या शब्दाचा मान राखून तू हा दुपेटा नेसत जा आणि कोणी काहीही केलें तरी हा नेसणें सोडू नकोस."॥४९॥ पितांबराने तो दुपेटा नेसला खरा, पण (त्याचे हे कृत्य) इतरांना सहन झालें नाही. स्वार्थीपणानें भाऊच आपल्या भावाला घातक ठरतो.॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार खरें पाहतां बोलावयासच नको. श्रोतेहो, गटाराचें दार उघडलें की घाण मात्र सुटतेच (हेच खरें !).॥५१॥ श्री गजानन स्वामींचे असंख्य भक्त असले तरी, अधिकारी भक्त मात्र दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होते.॥५२॥श्रोतें हो, ज्याप्रमाणें अरण्यांत निरनिराळें अनेक वृक्ष असलें तरी क्वचितच कुठेतरी एखादा चंदनाचा वृक्ष नजरेस पडतो.॥५३॥ त्याचप्रमाणें त्यांच्या शिष्यमंडळींत (उत्तम शिष्य फार कमी) होतें. तेथील काही शिष्य पितांबरास उगाचच निरर्थक टोचून बोलू लागले.॥५४॥अरे पितांबरा, समर्थांना जे घालण्यास उपयोगी आलें असते, तें वस्त्र तू स्वतः परिधान करून बसला आहेस. हेच का तुझें शिष्यपण ? ॥५५॥ तुझी समर्थांवर कशी भक्ती आहे तें अगदीच कळून आलें. तू खरोखर खुशालचंदच आहेस. त्यामुळे ह्या मठांत सद्गुरुंचा अपमान होत आहे, तेव्हा तू इथे राहू नकोस.॥५६॥ त्यावर पितांबर उत्तरला, " मी काही गुरुंचा अपमान केला नाही, तर उलट त्यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांचा मानच ठेवला.॥५७॥हें वस्त्र त्यांनी स्वतः मला दिलें आणि नेसावयास सांगितले. मी ही (त्यांनी सांगितल्याप्रमाणें) तेंच परिधान केले. मग ही अवज्ञा कशी बरें झाली ?"॥५८॥ अशी 'भवति न भवति' अर्थात वादविवाद होऊन शिष्यांत तणाव आणि दुरावा निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी श्री गजानन स्वामींनी एक निर्णय घेतला.॥५९॥ गुरूवर पितांबरास म्हणाले, " तू आतां येथून निघून जावेस. मूल जाणतें झाल्यावर आई त्याला दूर ठेवतें.॥६०॥ पितांबरा, माझी तुझ्यावर अखंड कृपा आहे. तेव्हा तू आता ह्या भूमीवर भ्रमण कर आणि अज्ञ जनांना योग्य मार्ग दाखव."॥६१॥ (नाइलाजानें अखेर पितांबरानें समर्थांस) साष्टांग नमस्कार केला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे पाहत तो (जड अंत:करणानें) मठ सोडून निघाला.॥६२॥ (मार्गक्रमण करत करत) पितांबर कोंडोली नावाच्या गावांत आला आणि तेथील एका वनांतील आंब्याच्या वृक्षाखाली बसला. त्याच्या मनांत निजगुरूंचे चिंतन सतत चालू होते.॥६३॥ तो रात्रभर तिथेच बसून होता. सूर्योदय झाल्यावर मात्र तिथे मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला, त्यामुळें तो अखेर त्या झाडावर जाऊन बसला.॥६४॥ परंतु त्या आम्रवृक्षावरदेखील असंख्य मुंग्या आणि मुंगळें होतें. पितांबर सर्व लहान-मोठ्या फांद्यावर जाऊन आला खरा, पण बसण्यासाठी (मुंगळ्यांचा त्रास होणार नाही अशी) निवांत जागा त्याला त्या झाडावर काही सापडली नाही. त्याचे हे कृत्यच तेथील गुराख्यांना कौतुकास्पद वाटलें. ॥६५-६६॥ तें आपापसांत बोलू लागले, हा एखाद्या माकडाप्रमाणें ह्या वृक्षावर का फिरतो आहे ? ह्याचे कारण काही कळत नाही.॥६७॥ हा अगदी लहान-सहान फांद्यांवरही निर्भयपणें फिरून आला. मात्र कुठेही खाली पडला नाही, हे खरें तर आश्चर्यच आहे.॥६८॥ त्यांवर दुसरा (गुराखी) म्हणाला, " ह्यांत काहीच आश्चर्य वाटायचे कारण नाही. श्री गजानन महाराजांच्या शिष्यांच्या अंगी असे सामर्थ्य असते, हे नक्की. त्यामुळें हा त्यांचा शिष्य खचितच असावा. चला, हा इथें आल्याचा वृत्तांत आपण गावांत जाऊन सर्वांना सांगू या."॥६९-७०॥ गुराख्यांकडून हे वृत्त कळल्यावर, कोंडोलीचे ग्रामस्थ त्या आंब्याच्या वृक्षाजवळ आले आणि तिथे कोण आले आहे हे पाहू लागलें.॥७१॥ (पितांबरास पाहून) गावकरी आपापसांत बोलू लागले, हा खरे तर एखादा ढोंगी मनुष्य असावा आणि उगाचच आपण गजानन महाराजांचा शिष्य असल्याचे भासवत आहे.॥७२॥ भास्कर पाटील नावाचा गजानन महाराजांचा एक थोर शिष्य होता खरा, परंतु त्याचा नुकताच अडगांव या गावांत अंत झाला. ॥७३॥ आणि तसेही समर्थांचे शिष्य चांगले बर्फी, पेढे खायचे सोडून इथे मुद्दामहून उपवास करण्यासाठी कशाला येतील बरें ? ॥७४॥ तरीही एकदा याला विचारावे आणि त्याचे म्हणणे प्रथम ऐकून मग काय खरें अन काय खोटें ते ठरवावें. उगाचच तर्क करणे, योग्य नाही.॥७५॥ मग एक गांवकरी पुढे आला आणि " तू कोण आहेस? इथे कुठून आणि कशासाठी आला आहेस ? तुझा गुरु कोण आहे ?" असे (अनेक प्रश्न) पितांबरास विचारू लागला.॥७६॥ पितांबर त्यावर उत्तरला, " मी शेगांवचा असून माझे नाव पितांबर शिंपी आहे. तसेच श्री गजाननस्वामींचा मी शिष्य आहे. त्यांची मला पर्यटन करण्यासाठी आज्ञा झाली, म्हणून मग भ्रमण करीत मी इथवर आलो आणि ह्या वृक्षाखाली (विश्रांतीसाठी) बसलो. पण या आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळें होते, म्हणून मी झाडावर चढलो आणि एका फांदीवर जाऊन बसलो."॥७७-७९॥ त्याचे हे बोलणें ऐकून ग्रामस्थ चांगलेच संतापले आणि म्हणू लागले, अरे, असे थोर संतांचे नाव घेऊन उगाच अशा चेष्टा करू नकोस.॥८०॥ काय तर म्हणे, मी खरें म्हणजे राजाची आवडती राणी आहे पण पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजूरी करण्यास इथे आले.॥८१॥ त्या (कोंडोली) गावांचा जो देशमुख होता, त्याचे नाव श्यामराव होते. तो म्हणू लागला, " अरे सोंगाड्या, आतां माझे बोलणे ऐक.॥८२॥ स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. त्यांचे नाव (गुरु म्हणून) सांगून उगाच त्यांना बट्टा लावू नको.॥८३॥ अरे वेड्या, एकदा त्यांनी केलेला चमत्कार ऐक जरा ! (वसंत) ऋतू नसतांना देखील त्यांनी आंब्याच्या झाडाला फळें आणली होती.॥८४॥ समर्थांनी तर फळें निर्माण केली. तू नुसतीं पाने तरी आणून दाखव. नाही तर या ठिकाणी तुझी काही धडगत नाही.॥८५॥ हा जो बळीराम पाटलाच्या (शेतातील) वठलेला शुष्क आंब्याचा वृक्ष आहे, तो आत्ता या क्षणी आमच्या डोळ्यांदेखत (हिरव्यागार पानांनी बहरलेला असा) पर्णयुक्त करून दाखव.॥८६॥ तू जर असे नाही करू शकलास, तर नक्कीच आमचा मार खाशील आणि जर तू सत्य बोलत असशील तर आम्हांस वंद्य होशील.॥८७॥ कारण सद्‌गुरुंचे शिष्य काही अंशी तरी त्यांच्याच योग्यतेचे असतात, अशी या जगती वदंता आहे.॥८८॥ आता अजिबात उशीर न करतां हे आंब्याचे झाड हिरवेगार कर पाहू." तें बोलणें ऐकून पितांबर अतिशय घाबरला.॥८९॥ आणि (दीनपणे) बोलू लागला, " माझा सारा वृत्तांत ऐकून घ्यावा. लोक हो, हिरे आणि गारा एकाच खाणीत सापडतात.॥९०॥ तसेच श्री गजाननस्वामींच्या शिष्यांमध्ये मी गार आहे, असे समजा. मात्र मी यत्किंचितही खोटें बोललो नाही.॥९१॥ या जगांत गारेवरून त्या खाणीस काही कमीपणा येत नाही. माझ्या गुरूंच्या नांवास मी चोरून कसे ठेवू बरें ?"॥९२॥ त्यावर श्यामराव उत्तरला, " तू आता उगाच बाष्कळ बडबड करू नकोस. शिष्यांवर संकट ओढवलें तर ते त्यांच्या सद्‌गुरुंचा धांवा करतात.॥९३॥ मग त्यांचा तो शिष्य जरी योग्य अधिकारी नसला, तरी सद्‌गुरुंचा प्रभाव (कृपासामर्थ्य) आपल्या शिष्यांना सहाय्यभूत  होतो."॥९४॥ श्रोतें हो, त्यावेळीं पितांबराची अवस्था खरोखर इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली. बिचारा अतिशय चिंतातुर झाला आणि त्याला काहीच सुचेनासे झाले.॥९५॥ त्या वठलेल्या आंब्याच्या झाडापाशी अवघेंच गांवकरी आपल्या बायकां-मुलांसह जमलें आणि आता पुढें काय घडणार हे पाहू लागलें.॥९६॥ अखेर निरुपाय होऊन पितांबरानें आपलें हात जोडलें आणि आपल्या सद्‌गुरुरायांचे मन:पूर्वक स्तवन सुरु केलें.॥९७॥ हे स्वामी समर्था गजानना, हे ज्ञानरूपी आकाशांतील नारायणा, तुझ्या चरणीं दृढ श्रद्धा असलेल्या (या भक्ताच्या) रक्षणासाठी आतां यावेळीं धावून ये.॥९८॥ हे भक्तपाला, माझ्यामुळें तुला कमीपणा येऊ पाहतो आहे. (मी सदैव भक्तांच्या पाठीशी उभा आहे) या आपल्या वचनासाठी या आंब्याच्या झाडास पालवी फुटू दे.॥९९॥ आता माझी सारी भिस्त तुमच्यावरच आहे. हे आई, माझ्यावर तू कृपा कर. नाहीतर इथे माझा प्राण जायची वेळ आली आहे.॥१००॥ प्रल्हादाचे बोल सत्य करण्यासाठी नरहरी भगवान खांबात प्रगटलें. संत जनाबाईस सुळांवर चढवलें असतां त्या सुळांचेच पाणी झाले.॥१०१॥ संत जनाबाईंचा भार त्या विठ्ठलावर, ईश्वरावर होता तर माझा सर्व विश्वास केवळ तुझ्यावरच आहे. संत आणि देवांमध्ये काहीच अंतर नसते.॥१०२॥ ईश्वर हाच संत असतो तर संत साक्षात त्या परमेश्वराचेच रूप असतात. सर्व लोक मला मी गजानन स्वामींचा शिष्य आहे असे म्हणतात.॥१०३॥ खरे तर माझे असे काहीच महत्व नाही. हे अवघें सामर्थ्य तर तुझ्याच ठायीं आहे. या जगीं फुलांमुळेच दोऱ्याचे महत्त्व असते.॥१०४॥ तें फुल तूच आहेस मी केवळ दोरा आहे. तू कस्तुरी तर माझी योग्यता मातीइतकीच आहे, हे सत्य आहे. हें संकटही तुझ्यामुळेंच माझ्यावर आलेले आहे.॥१०५॥ तेव्हां आता माझा अंत पाहू नकोस रें, गुरुराया ! (या तुझ्या भक्तासाठी) धावत ये आणि या वठलेल्या वृक्षास कोवळी पालवी (तुझ्या कृपेनें) फुटू दे."॥१०६॥ (आपल्या सद्‌गुरुंची अशी प्रार्थना करून) पितांबर तिथे जमलेल्या सर्व लोकांस म्हणाला, " लोक हो, माझ्या सद्‌गुरुंचा नामगजर करा. हे शेगांवच्या अवलिया, जय जय गजानन साधूवर असा त्यांचा जयजयकार करा."॥१०७॥ तेव्हा सर्व गांवकरी (समर्थांचा) जयजयकार करू लागले. (तो काय आश्चर्य !) त्या वठलेल्या वृक्षास पालवी फुटू लागली. त्या अगाध चमत्कारास सर्व लोक आपल्या डोळ्यांसमक्ष घडत असलेले पाहू लागले.॥१०८॥ काही लोक म्हणू लागले, हे तर कदाचित आपणांस पडलेलें स्वप्न असावें, (खरेच जागें आहोत हे जाणण्यासाठी) तेव्हा आपल्याला हातांनी चिमटा घेऊन पाहू या. ॥१०९॥ आणि चिमटे घेऊन पाहिले असता हे स्वप्न नसून सत्य आहे, हे त्यांना उमगले. तेव्हा ही नक्कीच नजरबंदी असावी, असे काही जण बोलू लागलें.॥११०॥ गारुड्यांच्या खेळांत कशी वाद्येंच सर्पाप्रमाणे भासतात आणि कश्या मातीच्या खापऱ्या (नजरबंदीमुळे) आपल्या दृष्टीस रुपयांप्रमाणे दिसू लागतात, नाही का ?॥१११॥ परंतु जेव्हा त्या पानांस तोडून पहिले असतां त्या फांदीतून पांढराशुभ्र चीक बाहेर येऊ लागला, तेव्हा हा भ्रम नव्हें, याची (सर्व गांवकऱ्यांस) जाणीव झाली.॥११२॥ अशा रितीने वाळलेल्या वृक्षास पालवी फुटली, अशी तिथे जमलेल्या सर्वांची खात्री झाली. ' श्री गजानन माऊली हे खरोखर महासंत आहेत,'  हे निःसंशय ! (असे ते सर्वजण म्हणू लागले.)॥११३॥ आता मात्र या पितांबराविषयीं मनांत काहीच संशय घेऊ नये, हा श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे हेच सत्य आहे. ह्याला आता आपण गावांत घेऊन जाऊ या.॥११४॥ ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी धावत येते, त्याप्रमाणेच आपल्या ह्या भक्ताच्या निमित्ताने का होईना कधी तरी श्री गजानन महाराजांचे कोंडोलीस आगमन होईल.॥११५॥ असा सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि पितांबरास मोठ्या थाटामाटांत गावांत नेले. अशा प्रकारे दिव्य चमत्कार झाल्यावर सर्वच लोकांचा भाव दृढ झाला.॥११६॥ श्री (रामदास स्वामी) समर्थांनीही अशाच प्रकारें आपला कल्याण नामक शिष्य जगत्कल्याणासाठीच डोमगांवीं पाठवला होता.॥११७॥ श्री गजानन स्वामींनीही जणू तशीच कृपा केली, त्यामुळे आपल्या या कोंडोली गावाचे भाग्य फळफळलें हे मात्र खरें !॥११८॥ श्रोतेहो, ते आंब्याचे झाड अजूनही (श्री गजानन कृपेची साक्ष देत) कोंडोलीत आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत ह्या आम्रवृक्षाला फळेही भरपूर येतात.॥११९॥ कोंडोलीच्या ग्रामस्थांचीही पितांबरावर दृढ श्रद्धा जडली. अर्थात, हिरकणी कुठल्याही स्थानीं असली तरी मौल्यवानच असते.॥१२०॥ लवकरच, पितांबराचा मठ त्या कोंडोलीत झाला आणि त्याच्या अंतिम क्षणांपर्यंत तो तिथेच कार्यरत राहिला.॥१२१॥ आतां इकडे शेगांवांत एके दिवशी महाराज आपल्या मठांत उदास होऊन बसले.॥१२२॥ त्यांचे सर्व शिष्य हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागले, " महाराज आज आपण चिंताग्रस्त का दिसत आहात ?॥१२३॥ तेव्हा, महाराज गंभीर स्वरांत तिथे जमलेल्या लोकांना म्हणाले, " आमचा लाडका भक्त कृष्णा पाटील, जो आम्हांला दररोज चिकण-सुपारी आणून देत असे, तो आता वैकुंठवासी झाला. त्याची आम्हांला आज आठवण झाली. त्याचा मुलगा राम तर अजून लहान आहे, मग ये ठायीं आता आम्हांला चिकण-सुपारी कोण आणून देणार ?॥१२४-१२५॥ राम मोठा झाल्यावर माझी सेवा करीलच, पण तोपर्यंत मी काही या मठांत राहायला तयार नाही."॥१२६॥ असे महाराज बोलताच, सर्वांनाच चिंता वाटू लागली. महाराजांचा आता येथून जाण्याचा विचार दिसत आहे. तेंव्हा, आपण काहीही करून त्यांचे मन वळविले पाहिजे. चला, आपण सर्वजण मिळून महाराजांचे चरण धरून प्रार्थना करू.॥१२७-१२८॥ असा सर्वानुमते विचार करून सर्व मंडळी मठांत आली. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती या सर्व भक्तमंडळींनी महाराजांचे पाय धरले, आणि महाराजांना विनवणी करत म्हणाले, " महाराज, आम्हांला सोडून तुम्ही अन्यत्र कोठेही राहू नये. कृपा करून या मठाचा तुम्ही त्याग करू नका."॥१२९-१३०॥ या शेगांवांत तुमची जिथे इच्छा असेल, तिथे राहा. मात्र हे गांव सोडण्याचे मनांत आणू नका."॥१३१॥ तो महाराज गर्जून म्हणाले, " तुमच्या या गावांत दुफळी आहे. त्यामुळें, मला इथे राहण्यासाठी कोणाचीच जागा नको.॥१३२॥ तेव्हा, कोणाच्याच मालकीची नसेल अशी जागा मला तुम्ही दिल्यासच, मी या शेगांवीं राहीन."॥१३३॥ महाराजांचे हे वचन ऐकून अवघी मंडळी चिंताग्रस्त झाली आणि ही मागणी करून समर्थांनी आपल्याला मोठ्याच पेंचात टाकले असे ते सर्व विचार करू लागले.॥१३४॥ महाराज तर आपल्यापैकी कोणाच्याही जागेंत राहाण्यास तयार नाहीत, आणि हे सरकार समर्थांसाठी जागा देईल, याची खात्री वाटत नाही.॥१३५॥ आपल्या महाराजांची योग्यता, महती हे सरकार मुळीच जाणत नाही. शेवटीं, बंकटलाल विनयतेनें बोलता झाला, " महाराज, अशा संकटात आम्हांला घालू नका. हे परक्याचे राज्य आहे. त्यामुळें, सरकार धार्मिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून देईल, याची काही शक्यता वाटत नाही.॥१३६-१३७॥ तेंव्हा, आमच्यापैकी कुणाच्याही जागेची तुम्ही मागणी करा. आम्हां सर्वांचीच आपल्याला आनंदाने जागा देण्याची तयारी आहे."॥१३८॥ त्यावर महाराज बोलले, " काय हे तुमचे अज्ञान ! या सर्व जमिनींची मालकी खरें तर पूर्णतः त्या सच्चिदानंदाची आहे.॥१३९॥ या भूमीवर असे कित्येक राजे आले आणि गेले. तेव्हा, ही सर्व जागा निश्चितच सरकारी नाही. या सर्व जमिनींचा खरा मालक तो पांडुरंगच आहे.॥१४०॥ आतां, व्यावहारिकदृष्ट्या मालकपण राजास प्राप्त होते खरें ! पण ते महत्वाचे नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहा.॥१४१॥ प्रयत्न केल्यास जागा अवश्य मिळेल. आता काही बोलू नका. हरी पाटलाच्या हाताला यश येईल, याविषयीं काहीही शंका मनांत बाळगू नका."॥१४२॥ मग ती सर्व मंडळी हरी पाटलाकडे आली आणि त्याच्याशी विचार-विनिमय करून महाराजांच्या मठाच्या जागेसाठी अर्ज दिला.॥१४३॥ बुलढाणा जिल्ह्याचा एक करी नामक सर्वाधिकारी होता. त्याने अर्जाची योग्य तपासणी करून समर्थांच्या मठासाठी एक एकर जागा मंजूर केली.॥१४४॥ आणि म्हणाला, " मंडळी, तुम्ही दोन एकर जागेसाठी अर्ज केला आहे खरा, पण मी सध्या तुम्हांला एक एकर जागा देत आहे.॥१४५॥ तुम्ही ती जागा एका वर्षांत व्यवस्थित विकसित केल्यास मी आणखी एक एकर जागा तुमच्या मठासाठी मंजूर करीन. जेणेंकरून तुमची ही दोन एकर जागेची मागणी मान्य होईल."॥१४६॥ या सरकारी ठरावाची अजूनही दप्तरीं नोंद आहे. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे, हे निःसंशय !॥१४७॥ मग हरी पाटील, बंकटलाल आदि भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले. (समर्थांवर सर्वांचीच श्रद्धा असल्यामुळें) बराच द्रव्यनिधी थोड्या कालावधीत जमला आणि मठाचे काम सुरु झाले.॥१४८॥ यापुढील सर्व वृत्त इत्थंभूतपणे पुढच्या अध्यायांत कथन होईल. सत्पुरुषाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर सदैव तत्पर असतो, हेच खरें !॥१४९॥ डोंगरगांवचा विठू पाटील, वाडेगांव येथील लक्ष्मण पाटील आणि शेगांवचे रहिवासी जगु आबा आदि मंडळींनी वर्गणी गोळा करण्यात पुढाकार घेतला.॥१५०॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ तुम्ही सावध चित्त होऊन ऐका. त्यामुळें तुमचे निश्चितच निजकल्याण होईल. ॥१५१॥ 
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jun 27, 2024

श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं - समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥ श्री पंढरीनाथ महाराज की जय ॥ जय जय पांडुरंग हरि

॥ ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय


कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं । कलाङ्काङ्क्तेजोधिकामोदिवक्त्रम् । खलानीशवादापनोदार्थदीक्षम् । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥१॥ भावार्थ : या कलियुगामध्ये अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार घेतला आहे, शीतल परंतु कलंकित असलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबापेक्षाही अधिक आनंददायी आणि आल्हाददायक असा ज्यांचा मुखचंद्रमा आहे, तसेच दुष्ट आणि अविहित कर्मे करणाऱ्यांचा वृथा अभिमान दूर करून त्यांना सदाचरण-सन्मार्ग दाखविण्यास जे समर्थ आहेत अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥१॥  अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं । पदाम्भोजतेज: स्फ़ुरद्दिक्प्रदेशम् । विधीन्द्रादिदेवै: सदास्तुयमानं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥२॥ भावार्थ : अलंकापुरी नगरीत अतिशय शोभायमान अशा सिंहासनावर जे पद्मासनात स्थित आहेत, ज्यांच्या पावन चरण कमळांच्या सभोवती असलेल्या दिव्य तेजाने सर्व दिशा उजळल्या आहेत आणि ब्रह्मदेव-इंद्रादिदेव ज्यांची नित्य स्तुती करत असतात अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥२॥ गदाशङ्खचक्रादिर्भिर्भाविताङ्गम् । चिदानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् । यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥३॥ भावार्थ : ज्यांच्या चरणद्वयांवर शंख, चक्र, गदा आदि शुभ चिन्हें प्रगट झालेली आहेत, जे सदासर्वदा सच्चिदानंदस्वरूपी चैतन्यरूपांत लीन असतात आणि जे यम-दमादि अष्टांग योगामध्ये प्रवीण आहेत, अशा ( मानव रूपांतील श्रीहरि विष्णु असलेल्या ) सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥३॥ लुलायस्यवक्त्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं । प्रतिष्ठानपुर्यांसुधीसंघसेव्यम् । चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥४॥ भावार्थ : धर्मपीठ असणाऱ्या पैठण नगरीतील समस्त विद्वान ब्रह्मवृंदांच्या सभेत ज्यांनी रेड्याच्या मुखातून साक्षात ऋचा म्हणवून दाखविल्या आणि चारही वेद, तंत्रशास्त्र, आगमनिगमादि यांचे संपूर्ण ज्ञान असलेल्या, सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥४॥ सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं । निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्त्वम् । महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥५॥ भावार्थ : पंढरीनाथ अर्थात श्रीपांडुरंगाच्या दिव्य चरणरूपी कमळांतील भ्रमराप्रमाणे जे नित्य श्रीहरींचे गुणगान करतात, सद्‌गुरु श्रीनिवृत्तिनाथांच्या अनुग्रहानें ज्यांना परमात्मास्वरूप-तत्त्वांची प्राप्ती झाली आहे, आणि श्रेष्ठ अशा इंद्रायणी तीरावरील पावन भूमीवर जे वास करतात, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥५॥  रणे कृष्णबीभत्सुसंवादभूतो --। रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरीवै । कृर्तिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥६॥ भावार्थ : महाभयंकर महायुद्धाच्या रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये जो श्रीमद्‌भगवतगीतारूपी संवाद झाला, ते मूळ संस्कृतमध्ये असलेले महान तत्त्वज्ञान सामान्यजनांना प्राकृत मराठीत सुबोध व्हावे यासाठी ज्यांनी श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ रचला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥६॥ चिराभ्याससंयोगसिद्धैर्बलाढय: । बृहदव्याघ्रशायी महान् चांगदेव: । निरीक्ष्याग्रकुड्यागतंवीतगर्व: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥७॥ भावार्थ : दीर्घकाळ केलेल्या परिपाठाने अनेक योगसिद्धी प्राप्त केलेले, बलाढ्य व महान योगी चांगदेव भीमकाय अशा वाघावर स्वार होऊन आपल्या भेटीस येत आहेत, ही वार्ता जेव्हा श्री ज्ञानदेवांना समजली, त्यावेळीं ते आपल्या भावंडांसह स्वतः एका भिंतींवर बसले होते. त्याच जड, निर्जीव अशा भिंतीस ज्यांनी चेतना, गती दिली आणि चांगदेवांचे गर्वहरण केले, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥७॥ क्वचित्तीर्थयात्रामिषेणिति नित्वा । स्वयंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णो: । यत: प्रेषित: खेचरो नामदेव: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥८॥ भावार्थ : भगवान महाविष्णुंच्या स्वयंवेद्य-परमात्मस्वरूप तत्त्वाची ज्याला पूर्णत: जाणीव, उपरती झाली नव्हती, आणि ज्याची अद्यापि सगुण-साकाराठायीं प्रीती होती, अशा भक्त नामदेवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्यांनी सत्संगाचा अनुभव दिला, तसेच पुढें त्या संत नामदेवांस सद्‌गुरु विसोबा खेचर यांच्याकडे पाठवून अद्वैताचा साक्षात्कारही घडविला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥८॥ 

स्तवं भावभक्त्या दिभिः सौख्य देयं । पठन्तोऽर्थ जातं ह्य वाप्यापि विष्णोः । पदं यान्ति ते ज्ञानदेवस्य नित्यं । भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता:   भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता: भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ताः ॥९॥ भावार्थ : श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या स्तवनाचा जे दृढ श्रद्धा, भाव-भक्तीने नित्य पाठ करतील, त्यांना अपार सौख्यप्राप्ती होईल आणि पठणकर्त्यांस चारही पुरुषार्थ व श्रीहरि विष्णुंच्या कृपेचा लाभ होईल. तसेच, त्या भक्तांना श्रीज्ञानदेवांच्या दिव्य चरणीं शाश्वतपद प्राप्त होईल आणि अंतकाळी ते संसारसागर सहज तरून जातील. ॥९॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

  

Jun 17, 2024

अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली l पालखीत शोभते योगीराज माऊली, प्रेमाची साऊली l दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो l दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll धृ. ll घुमवूया नाद, देऊया साद l स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद l गुलालात या पहा निघाली, विश्वाची साऊली l हो माझी योगीराज माऊली ll१ll दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll टाळ मृदुंगाचा गजर करुया l स्वामी समर्थांचे नाम घेऊया l तालावरती ह्रदयाच्या हो भक्तांची माऊली l हो माझी योगीराज माऊली ll२ll दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll पालखी सुखाची, आली दाराशी l नाम समर्थांचे, भिडले आकाशी l भक्तांच्या गजरात निघाली, ह्रदयाची साऊली l हो माझी योगीराज माऊली ll३ll दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


May 15, 2024

श्रीगजानन माहात्म्य - अध्याय १५ ते २१


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अध्याय १५ ॥ 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय व्यंकटेशा वासुदेवा । मनमोहना हे माधवा । शेषशयना केशवा । गोविंदा दामोदरा नमितो तुज ॥१॥ करी पूर्ण मनोरथ । तूंची हाकिला अर्जुन रथ । अनाथांचा तूं नाथ । सखा तूंची भाविकांचा ॥२॥ असो तुज नमस्कार । हीन दीन मी पामर । जन कल्याणास्तव अवतार । अनंत रुपे नटलासी ॥३॥ भक्तवत्सला दयाघना । दावी सखयां तव चरणां । नामी रंगवी ही रसना । कवनांते या गोड करी ॥४॥ टिळक बाळ गंगाधर । राजकारणी अति चतुर । कीर्ति जाहली दूरवर । स्वातंत्र्य संग्राम गाजविला ॥५॥ लोकमान्य नर केसरी । जनतेचे हे पुढारी । शस्त्र लेखणी हीच खरी । इंग्रजांसी झुंजला ॥६॥ शिवजयंती उत्सवासी । टिळक आले अकोल्यासी । पाचारण केले गजाननासी । मंचकावरती बसविले ॥७॥ खापर्डे, दामले, कोल्हटकर । विद्वान वक्ते असतीं थोर । जनसमुह लोटला अपार । भाग्य खचित त्या नगरीचे ॥८॥ कोणा वाटे गजानन । मध्येच गातील भजन । परी धरूनी ते मौन । सभेंमाजी ते बैसती ॥९॥ राष्ट्रोद्धार हाच खरा । करवी हातें गंगाधरा । भोगीले ज्याने कारागारा । स्वातंत्र्य लढ्या कारणे ॥१०॥ पटवर्धन अप्पा साचे । राहणारे ते आळंदीचे । स्नेही तेच टिळकांचे । आले असती उत्सवासी ॥११॥ वऱ्हाडप्रांती अकोल्यासी । सभा झाली वैशाख मासी । अक्षय्य तृतीयेच्या दिवशी । सुयोग पर्वणीचा साधला ॥१२॥ सभा यशस्वी झाली खरी । टिळक गेले कारागारी । टिकास्त्र सोडिले इंग्रजांवरी । शुद्ध भाव तो अंतरीचा ॥१३॥ भूत-भविष्य-वर्तमान । जाणती हे गजानन । जन असती हे सामान्य । कर्तव्याची ना जाण तयां ॥१४॥ टिळक असता कारागारी । गजानन देती प्रसाद भाकरी । खापर्ड्यासी वदती जा सत्वरी । टिळका कारणे ती द्यावया ॥१५॥ मुंबईस गेले कोल्हटकर । प्रसाद घेऊनी भाकर । टिळक न करिती अव्हेर । कृपाप्रसाद तो स्वीकारिला ॥१६॥ मंडाल्याच्या तुरुंगात । गीतारहस्य लिहिला ग्रंथ । गजाननाचा वरदहस्त । शिरी खचितची राहिला ॥१७॥ कोल्हापूरचे करवीर । गोविंदसुत श्रीधर । काळे उपनांव साचार । गरीबीतच ते वाढले ॥१८॥ शिक्षण तेही जेमतेम । परी बुद्धी ती उत्तम । यश धंद्यामाजी हा भ्रम । द्रव्यार्जनांची नच शक्यता ॥१९॥ टोगो यामा दोघेजण । मित्र यांचे खचित जाण । सवें यांच्या विद्यार्जन । थोर गुण हा लाभला ॥२०॥ नसे कुणाची ती मदत । घरी गरीबी अत्यंत । तयां मनीं हीच खंत ।  मित्र एक भंडाऱ्यासी ॥२१॥ श्रीधराने पत्र टाकून । सविस्तर कळवी वर्तमान । मनांत होते ते कथन । मित्रासी त्या निवेदिले ॥२२॥ मित्र शिक्षक साचार । श्रीधरावरी प्रेम अपार । मजकूर वाचूनी करी विचार । मनीं निर्धार तो करीतसे ॥२३॥ ठरविती दोघे कोल्हापूर । शहर असे ते गुलजार । पत्रोपत्री व्यवहार । निश्चित तो जाहला ॥२४॥ घ्यावे गजाननाचे दर्शन । शेगांवी त्या जाऊन । रेल्वेमार्गावर ते जाण । भावना अंतरीची जाहली ॥२५॥ सद्‌गुरुचरणीं ज्यांचा भाव । पैलतीरा लावी नांव । स्टेशन ते शेगांव । गाठिलें हो त्या दोघांनी ॥२६॥ आले दोघे ते मठांत । गजानना जोडीले हात । जाणिती सकल ते संत । आशीर्वच तयांसी लाभला ॥२७॥ विचार न करणे आता । शांत ठेवा आपुल्या चित्ता । सुयश तयां चिंतीता । कार्य सफल ते जाहले ॥२८॥ लौकिकास पात्र श्रीधर । ग्राम लाभे कोल्हापूर । संत साक्षात परमेश्वर । सुपंथ भक्तास दाविती ॥२९॥ दर्शनाचा योग येतां । उचित घडले तत्त्वतां । दयाघना सिद्धहस्ता । शिरी आपल्या ठेवा सदा ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य पंचदशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १६ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ परशु असे शस्त्र हाती । कुमार जमदग्नीचा म्हणती । सपरशुराम माता ती । रेणुका ती मृगाचली ॥१॥ ताडीले तिने दुष्टांसी । संरक्षण दिले द्विजांसी । परी आता कां निष्ठुर होसी । माते अव्हेरिसी बालका ॥२॥ गजाननाचा भक्त एक । नाम त्याचे पुंडलीक । महान हा भाविक । मुंडगांवी राहतसे ॥३॥ शेगांवाची करी वारी । गजानना ध्यायी अंतरी । कृपा तीच तयांवरी । सद्‌गुरुची त्या जाहली ॥४॥ भागाबाई नामे ठाकरीण । राहत होती तिथे जाण । दंभाचार माजवून । भोंदित असे सकलांना ॥५॥ वदली ती पुंडलीका । जन्म तुझा रे फुका । शेगांवासी जासी कां? । सद्‌गुरु मानिसी वेड्यासी ॥६॥ ताप तुझा झाला बरा । म्हणुनी करिसी येरझारा । खातो कुणाच्याही घरा । पिशापरी तो राहतो ॥७॥ गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी । वेदांतासी जाणुनी । नित्य जो रंगे हरिचिंतनी । गुरु तोच खरा जाणावा ॥८॥ भागाबाई जशी सांगे । नादी तिच्या तसा लागे । अंजनगावी तिच्या संगे । जाऊ म्हणे कीर्तनासी ॥९॥ केजाजीच्या शिष्यातें । गुरु करणे ठरले होते । ऐसे मनीं येताची ते । जाण्या सिद्धची जाहले ॥१०॥ जाऊ म्हणे ती सकाळला । म्हणुन पुंडलीक झोपला । स्वप्न रात्री पडले त्याला । दिगंबर पुरुष उभा दिसे ॥११॥ शेगांवीचे गजानन । देती तयांसी दर्शन । मन जाई आनंदून । कानी तयांचे बोलता ॥१२॥ माजविती दंभाचार । लागती नादी नारी नर । वृत्ती त्यांची ती कठोर । ऐशासी गुरु का मानावे? ॥१३॥ तुझी असेल जी जी आस । पुरवीन मी तियेस । पुंडलीका लागला ध्यास । शेगांवीच्या अवलियाचा ॥१४॥ निरखून पाहता तो योगी । आला असे आपणालागी । अंजनगावचा तो ढोंगी । पुरुष तयां तो जाणवला ॥१५॥ नित्य व्हावया दर्शन । पादुका घेई तो मागून । करावया नित्य पूजन । मनीं निर्धार ठरविला ॥१६॥ पादुका तयां देऊन । महाराज पावले अंतर्धान । पुंडलीका जाग येऊन । सभोवार पाहू लागला ॥१७॥ पहाट होता खरी । भागाबाई तो उभी दारी । चाल म्हणे ती सत्वरी । अंजनगावासी जावया ॥१८॥ पुंडलीक तिज वदला । गजानन गुरु केला । पाठीराखा तो मला । दुजा न करणे गुरु असे ॥१९॥ शामसिंग मुंडगांवचा । भक्त तोही गजाननाचा । मार्ग धरी शेगांवचा । दर्शना कारणें सद्‌गुरुंच्या ॥२०॥ परतुनी जातां आपल्या गावी । महाराज वदले भेट घ्यावी । बाळाभाऊस सांगती नेण्या लावी । पादुका पुंडलीकासी द्यावया ॥२१॥ सद्‌गुरु आज्ञा घेऊन । शामसिंग गेला परतून । पादुका पुंडलीका देऊन । निघून गेला तो तेथूनी ॥२२॥ राजाराम नामे ब्राह्मण । धंदा सराफी दुकान । कृपा संतांची ती जाण । पुत्र दोन ते लाभले ॥२३॥ गोपाळ, त्र्यंबक नामे त्यांची । श्रद्धा देवावरी साची । सेवा तीच गजाननाची । भक्तिभावें त्र्यंबक करी ॥२४॥ इच्छा झाली तयां मनींं । द्यावी महाराजां मेजवानी । आवडीचे पदार्थ करोनी । भोजन आणिले गुरुराया ॥२५॥ विचार तैसा कवराचा । झुणका भाकरी देण्याचा । निर्धार होई मनाचा । स्टेशनावरी तो पातला ॥२६॥ वेळ झाला येण्या फार । गाडी निघून गेली दूर । दुसऱ्या गाडीस भरपूर । वेळ होता जाण्यासी ॥२७॥ परी न ढळला मानस । जाणे मनीं शेगांवास । झुणका भाकरी गजाननांस । कवर गेला द्यावयासी ॥२८॥ वाट पाही योगीराणा । गेला तोची दर्शना । न करिताची भोजनां । महाराज असती आसनी ॥२९॥ कवरासी त्या पाहून । हर्षित झाले गजानन । झुणका भाकरी मागून । घेती सद्‌गुरु खावया ॥३०॥ आनंदले दयाघन । कवरासी दिले अभिवचन । कार्य तव सफल जाण । होईल ऐसे सांगती ॥३१॥ भक्त मनीं आनंदला । माथा चरणीं त्याने ठेविला । परतुनी घरी गेला । तार आली असे गृहीं ॥३२॥ नोकरीचे बोलावणे । सत्य झाले गुरुकृपेनें । जो भजे तयां उणे । नच कांहीं घडतसे ॥३३॥ ऐसे येती अनुभव । जिथे भक्तिचा अभाव । तिथे कैसा हा प्रभाव । पहावया मिळेल हो? ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य षोडशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १७ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय लक्ष्मीरमणा । शेषशायीं नारायणा । वैकुंठीचा तूंचि राणा । भक्तांकारणे प्रगटसी ॥१॥ प्रल्हादास्तव नरहरी । स्तंभामाजी श्रीहरी । हिरण्यकश्यपू असूरी । पोट विदारुनी मारिला ॥२॥ उग्ररुप तव जरी । प्रल्हादाचा कैवारी । घेसी तयां अंकावरी । भक्त सखा तूंची खरा ॥३॥ तैसी कृपा असो देवा । मुंगी साखरेचा रवा । गोड करूनी घेई सेवा । हीच विनंती तुज असो ॥४॥ भक्त प्रिय गजानना । अकोल्यासी त्या जाणा । स्वयें देऊनी दर्शना । तयां गृहीं राहसी ॥५॥ कृष्णा बापू चापडगांवी । बच्चुलालाने भेट घ्यावी । जीजाई पंडीत आणिक नवी । भक्त मंडळी असती तव ॥६॥ खटाऊच्या गिरणीत । समर्थ येती अकोल्यात । मुक्कामासी अवचित । कल्पना नसता कुणांसही ॥७॥ विष्णुसा नामें सावकार । ग्राम ज्याचे मलकापूर । घेऊनी यावे हा निर्धार । महाराजांसी आपुल्या गृहीं ॥८॥ म्हणून गेला अकोल्यास । विनविता झाला भास्करास । जो गजाननाचा शिष्य खास । केले बोलणे तयां सवे ॥९॥ दिले तयासी वचन । मलकापुरी येईन घेऊन । महाराजांसी निश्चित जाण । समाधान झाले विष्णुसाचे ॥१०॥ भास्कर विनवी सद्‌गुरुसी । जाणे असे मलकापुरासी । परी नकार देती त्यासी । अट्टाहासे तो बैसला ॥११॥ आग्रहास्तव गजानन । गाडीत बैसले जाऊन । वस्त्ररहित पाहून । कुजबुज जन करीत ते ॥१२॥ महाराज उठले तेथून । नजर त्यांची चुकवून । डबा बायकांचा पाहून । त्याच ठायीं बैसले ॥१३॥ मूर्ति पाहूनी दिगंबर । स्त्रिया घाबरल्या फार । ओढिली साखळी अखेर । कथिला वृत्तांत पोलिसाला ॥१४॥ येई अधिकारी पोलिसाचा । हात धरी महाराजांचा । यत्न त्याचा उतरविण्याचा । परी न मानिती गजानन ॥१५॥ अधिकारी गेला स्टेशनासी । सांगितला वृत्तांत मास्तरासी । स्टेशनमास्तर डब्यापाशी । घेऊन आला त्वरीत तो ॥१६॥ योगीराज गजानन । बघता द्रवले त्याचे मन । वदे जरी हे नग्न । सोडून द्यावे हो यांजला ॥१७॥ असती हे संत थोर । साक्षात भगवंत अवतार । असे खचित मी लाचार । गुन्हेगार नसती खरे ॥१८॥ अती आदरे केले नमन । महाराजा घेतले उतरून । पुढे जठार साहेब येऊन । खटला तयांवरी भरला असे ॥१९॥ व्यंकटराव अकोल्याचे । देसाई घराणे त्यांचे । कामानिमित्त येणे त्यांचे । आले असती त्या ठायीं ॥२०॥ मंडळी जमली तिथे फार । खटला ऐकण्या बंगल्यावर । देसाई नामें गृहस्थ थोर । जठार साहेबा विचारती ॥२१॥ काय असे इथे आज । समोर दिसती महाराज । आणि इतरही समाज । जमण्या हें कारण काय असे ॥२२॥ जठार वदती तयांसी । कसे न ठावे तुम्हांसी । चालविणे आहे खटल्यासी । गजाननांवरी जो भरला असे ॥२३॥ देसाई झाले मनीं खिन्न । विनंती करिती कर जोडून । भगवत् मूर्ति गजानन । खटला नका हा चालवू ॥२४॥ गजानन हा योगीराणा । वंदनीय असती अवघ्यांना । चूक झाली असे जाणा । इथे तयांसी आणविले ॥२५॥ शिष्य भास्कर सवे आला । खुर्ची दिली बसण्या त्यांला । जठार वदती स्वामींला । वस्त्राविणे फिरणे योग्य नसे ॥२६॥ महाराज होते आसनी । जठारास वदती हासुनी । गुन्हेगार आम्ही कायद्यानी । योग्य वाटे ते करा ॥२७॥ तयां वदती आपण । चिलम भरावी न लावी क्षण । ऐसे ऐकता वचन । भानावरती ते आले ॥२८॥ पांच रुपये भास्कराला । जठारांनी दंड केला । निकाल तो ऐसा दिला । महाराजा ठेविले विवस्त्र म्हणुनी ॥२९॥ एकदां अकोल्यास गजानन । असता मेहताब येऊन । एकमेका आलिंगन । देते झाले त्या ठायीं ॥३०॥ हिंदु आणि मुसलमान । भेद न त्या ठायीं जाण । कराया जन-कल्याण । सिद्धपुरुष ते खचितची ॥३१॥ नंतर गेले अकोटासी । भेट द्याया नरसिंहजीसी । जाऊनि बसती विहिरीपासी । आंत डोकावून पाहती ॥३२॥ वदती घडावे स्नान । आंत सोडूनी बसती चरण । पाणी येई उफाळून । स्नान घडले संतांसी ॥३३॥ या रे या रे सारे जण । तीर्थांमाजी करी स्नान । सकलां करिती पावन । अधिकार तोचि सद्‌गुरुंचा ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य सप्तदशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १८ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा । कुंडले कानी किरीट माथा । पितांबर कटी जगन्नाथा । अनंत रूपे नटलासी ॥१॥ द्वारका मथुरा वृंदावन । तुझ्या कृपेने झाले पावन । खेळगडी ते गोपगण । जगज्जीवना श्रीहरी ॥२॥ दळू लागला जनीसी । वेड लाविले मीरेसी । उभा ठाकला पंढरीसी । पुंडलीकास्तव विठ्ठला ॥३॥ युगानुयुगे भक्तगण । तिथे येती घ्यायां दर्शन । दीनानाथ दयाघन । पतितपावन तूंच की ॥४॥ बायजा नामे भक्तिण । दैवत तिचे गजानन । जातीने ती माळीण । मुंडगांव ग्राम तिचे ॥५॥ बालपणी लग्न झाले । भाग्यात होते लिहिले । संसार सुख ना लाभले । षंढ पती तिचा असे ॥६॥ माता-पित्या दुःख अती । करून द्यावा दुसरा पती । विचार येई ऐसा चित्ती । भुलाई शिवरामा वदतसे ॥७॥ शिवराम पिता त्यांवर । पत्नीस वदे न सोडी धीर । नशीबीच नसेल संसार । दोष तिचा काय असे ॥८॥ करून पाहू उपचार । भोलाई होई निरुत्तर । तारुण्याचा अवसर । बायजा सुंदर, रुपवती ॥९॥ थोरला दीर तिज पाहून । कामुक होई त्याचे मन । बायजा सवें भाषण । सप्रेमें तो करी सदा ॥१०॥ प्रयत्न केले अती त्याने । नाकारीले तयां बायजाने । पती पत्नी नाते जोडणे । कदापिही मान्य नसे ॥११॥ नित्य काळ हरी स्मरणीं । घातला असे बायजानी । मिठी घातली चरणीं । लाज राखावी प्रभूवरा ॥१२॥ जेष्ठ दीर बायजापासी । हेतू वाईट धरून मानसी । रात्रीच्या समयासी । उन्मत्त होऊनी पातला ॥१३॥ बायजा होई लाचार । परी धरुनिया धीर । सोडा म्हणे अविचार । पित्यासमान मज तुम्ही ॥१४॥ अंगावरी टाकतां हात । पडला माडीवरून त्याचा सुत । बायजा जाऊनी धावत । बालकां घेई उचलूनी ॥१५॥ खोक पडली डोक्यास । बायजा लावी औषधास । करणीचे फळ दिरास । मिळालेच ना म्हणतसे ॥१६॥ भुलाबाई आणि शिवराम पिता । शेगांवी येती तत्त्वतां । महाराजांसी विचारता । होई भाकीत बायजाचे ॥१७॥ जरी लग्न करिसी बायजाचे । पुत्र नाही नशिबी हिचे । कल्याण करणे जरी तिचे । घेऊनी जावे स्वग्रामीं ॥१८॥ जेवढे पुरुष असती कोणी । बंधू पिता समजूनी । वागणे तिचे तूं मानी । विधीलिखित सत्य हे ॥१९॥ बायजेसी झाला आनंद । नामस्मरणी परमानंद । ध्यानींमनीं तो श्रीरंग । पुंडलीका सवे राही सदा ॥२०॥ पुंडलीका समवेत । येई बायजा शेगांवात । पुंडलीक गजानन भक्त । मुंडगांव हे ग्राम त्याचे ॥२१॥ नित्य करिती दोघे वारी । गजाननाच्या दरबारी । शुद्धभाव तो अंतरी । जन निंदा ती होत असे ॥२२॥ ही राहील जन्मभरी । वृत्ती सदा ब्रह्मचारी । जनांबाई पंढरपूरी । ऐशापरी ती राहिली ॥२३॥ खामगांवला भक्त थोर । होता राजाराम कवर । फोड झाला दुर्धर । डॉक्टर अधिकारी आणविला ॥२४॥ बहुत केले उपचार । आराम नसे तीळभर । कवराने टाकिला भार । सद्‌गुरु गजाननांवरी ॥२५॥ रात्रीच्या त्या समयासी । ब्राह्मणरूपे दारासी । हाक मारी कवरासी । परी ओळख कुणा नच त्यांची ॥२६॥ तीर्थ अंगारा घेऊन । आलो शेगांवाहून । फोडासी द्यावा लावून । तीर्थ पाजून हो द्यावे ॥२७॥ देऊन तीर्थ अंगारा । गेला ब्राह्मण माघारा । फोड तो फुटला खरा । अंगारा तो लावतांची ॥२८॥ पंढरपुरा गेले जन । सवे होते गजानन । पाटील मंडळी सज्जन । सुख सोहळा तो पाहती ॥२९॥ सर्व गेले दर्शनासी । सोडूनी मागे बापुन्यासी । तो वदला गजाननासी । दर्शन मजला घडवा हो ॥३०॥ गजाननाने केली मात । स्वयें होती पंढरीनाथ । बापुन्यास पडे भ्रांत । कैसे अघटीत घडले हे ॥३१॥ मृत श्वान जागविले । भक्तगणां सुखविले । कार्य ऐसे थोर झाले । कृपेने तव गजानना ॥३२॥
॥ इतिश्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य अष्टादशोsध्यायः समाप्तः
*********************
॥ अध्याय १९ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय नंदनंदना मुकुंदा । परमानंदा आनंदकंदा । व्रजभूषणा गोविंदा । नमन तुजला श्रीधरा ॥१॥ करुणाघना राधारमणा । दीनवत्सला दयाघना । ब्रजपाला राजीवनयना । मागणे एकच तुजप्रति ॥२॥ शेगांवासी मज न्यावे । चरणीं  संतांच्या घालावे । अभयदान मज द्यावे । प्रासादिक हे लिहावया ॥३॥ शेगांवी असता संत । आला दर्शना काशीनाथ । खंडेरावाचा हा सुत । गद्रे घराण्यांत जन्मला ॥४॥ कृपा जाहली तयांवर । घरी आली असे तार । मन झाले असे आतूर । खामगांवा जावयांसी ॥५॥ तार घेऊन हातात । उभा शिपाई दारात । मजकूर पाहता त्यांत । समाधान तयां वाटले ॥६॥ हुद्दा मुनसफीचा खास । मिळाला असे हो तयांस । मोर्शी नामे ग्रामांस । जाणे लागले तयांसी ॥७॥ गजानन येती नागपूरी । बुटी गोपाळराव यांचे घरी । घराणें हे परोपकारी । संतसेवा ब्रीद साचे ॥८॥ शेगांवचे भक्तगण । महाराज जातां दुःखी मन । आणावे तयां परतून । इच्छा त्यांची तीच असे ॥९॥ शेगांवीचे लोक आले । बुटी-सदनासी ते गेले । सद्‌गुरुचरण वंदीले । गोपाळ, हरी पाटलाने ॥१०॥ वदती गजानन पाटलासी । घेऊन चला शेगांवासी । इथे न गमे आम्हांसी । सांगती ते सकळ जन ॥११॥ बुटी-गृहीं भोजन । घेऊनी निघती गजानन । आशीर्वच तयां देऊन । घरी गेले रघुजीच्या ॥१२॥ राजे रघुजी असती थोर । लौकिक तयांंचा दूरवर । केला महाराजां पाहुणचार । रामटेक मुक्काम गाठला ॥१३॥ घेऊनी रामाचे दर्शन । शेगांवी गेले गजानन । हरी पाटलासी घेऊन । समागमे भक्तांच्या ॥१४॥ धार कल्याणचे रंगनाथ । स्वामी आले शेगांवात । अध्यात्मातुनी संकेत । देत असती एकमेकां ॥१५॥ वासुदेवानंद सरस्वती । कृष्णा तटाकी ज्यांची महती । कर्म योगी ज्यांची प्रिती । सिद्ध योगी तोही असे ॥१६॥ येणार इथे भेटायासी । सांगती गजानन बाळासी । प्रेमभाव हृदयासी । ज्ञानसंपन्न तो कर्मठ ॥१७॥ स्वामी येताचि आदर । कथित केला समाचार । हर्ष झालासे अपार । हरिहर भेट ती जाहली ॥१८॥ करुनी गजानना वंदन । गेले योगेश्वर परतून । मार्ग त्यांचा असे भिन्न । आपणाहूनी खचितची ॥१९॥ सांगती बाळाभाऊसी गजानन । ईश्वर भक्तिचे मार्ग तीन । व्रत वैकल्ये अनुष्ठान । हीच अंगे कर्माची ॥२० शुद्धभाव लीनता । अंगी असावी तत्त्वतां । भजनीं पूजनी आस्था । नामस्मरण हे सत्यचि ॥२१॥ योगी मुनी जे भूवरी । कर्म मार्ग हा आचरी । तयां योगे श्रीहरी । होऊनी त्यांचा राहिला ॥२२॥ साळुबाई भक्त थोर । ग्राम तिचे वैजापूर । वाडेंघोडें माहेर । गजानन दरबारी राहिली ॥२३॥ वेदविद्येचा जाणता । गजानन ज्ञानसविता । वैदिक कुणी वेद म्हणता । चुकताची सद्‌गुरु सांगती ॥२४॥ आत्माराम वेदसंपन्न । सेवेसी अर्पिले जीवन । गजानन सेवेकारण । एकनिष्ठ भक्त तो ॥२५॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुजा नारायण जामकर । दूधच ज्याचा आहार । भक्त तीन जाहले ॥२६॥ मोरगांवी मारुतीपंत । पीक होते शेतांत । रक्षण पिकाचे करण्याप्रत । तिमाजी नामे एक होता ॥२७॥ रास होती खळ्यांत । तिमाजी झाला निद्रित । गाढवे येऊनी खात । असती धान्य ते खळ्यांतील ॥२८॥ गजानने केली लीला । जागविले तिमाजीला । गाढवे पाहता घाबरला । महाराज अदृष्य जाहले ॥२९॥ तिमाजी सांगे मालकासी । मारुतीपंत ना रागविले त्यासी । गजानन सांगती येता दर्शनासी । प्रकार घडला तो तैसा ॥३०॥ शके अठराशे सोळात । महाराज आले बाळापुरात । स्वारी बैसली आनंदात । बैठकीसमोर सुखलालाच्या ॥३१ ॥ मूर्ति होती दिगंबर । भाविक करिती नमस्कार । आला पोलीस हवालदार । मारु लागला महाराजा ॥३२॥ त्याचा परिणाम तो झाला । आप्त गेले स्वर्गाला । हवालदारही ना राहिला । पंधरा दिवसातच स्वर्गवासी ॥३३॥ पंढरपुरी येती गजानन । चंद्रभागेचे केले स्नान । विठ्ठलाचे दर्शन । घेतले मंदिरी जाऊनी ॥३४॥ जोडूनिया करां । विनविले रुक्मिणीवरां । आता द्यावा आसरा । चरणांपासी पांडुरंगा ॥३५॥ हरी पाटील त्यावेळी । होते तिथे सद्‌गुरुजवळी । आणिकही ती मंडळी । विठ्ठल दरबारी असती ते ॥३६॥ डोळ्यांतूनी वाहें पाणी । गजानना पाहिले सर्वांनी । आले शेगांवी परतुनी । चिंता मनीं वाटतसे ॥३७॥ सोडणार गजानन संगत । जाहले हे सर्वां श्रृत । मनीं सकलांच्या ती खंत । भक्त येती दर्शना ॥३८॥ गणेश चतुर्थीचे दिवशी । महाराज वदले सकलांसी । आता गणपती बोळविण्यासी । यावे तुम्ही मठांत ॥३९॥ चतुर्थीचा तो दिवस । आनंदात काढिला खास । बाळाभाऊच्या धरिले करास । आसनावरी ते बैसवले ॥४०॥ शके अठराशे बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवासरी प्रहर दिवसाला ॥४१॥ प्राण रोधिता शब्द केला । 'जय गजानन' ऐसा भला । सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवात संत तो ॥४२॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकोनविंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २० ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी शारङ्गधरा । शिरावरी या ठेवी करां । जगन्नायका विश्वंभरा । सर्व सूत्रें तुझे हाती ॥१॥ दीनानाथा श्रीपती । कुंठीत झाली असे मती । द्यावी सख्या अनुमती । कार्य हे करावया ॥२॥ पाप ताप भवभय । हारी आता देई अभय । मी वासरु तू गाय । प्रेमे पान्हा पाजी तूं ॥३॥ शामसुंदरा श्रीधरा । पतितपावना परम उदारा । पितांबर कटी मुकुटी तुरा । कंठी हार ते शोभती ॥४॥ मनां लागली हुरहुर । समाधिस्थ ते झाल्यावर । नसे द्यावया कुणी धीर । हळहळती सकळ नरनारी ॥५॥ तुटली म्हणती कुणी नाती । ऐसे कितीक जन बोलती । परी तीच असे भ्रांती । अदृष्य असती त्याच ठायीं ॥६॥ श्री गजानन शेगांवात । स्वप्नी देती दृष्टांत । भक्तालागी सुखवित । अनुभव हाची येत असे ॥७॥ कोठाडे नामे गणपत । राहत होता शेगांवात । रायली म्हणुनी कंपनीत । एजंट होता दुकानाचा ॥८॥ नित्य नेम दर्शनाचा । ‘गजानन गजानन’ बोले वाचा । परिपाठ हाच तयांचा । मठामाजी जात असे ॥९॥ अभिषेक करूनी समाधीस । भोजन घालावे ब्राह्मणांस । विजयादशमी मुहूर्तास । सिद्धता ती करी सर्व ॥१०॥ कांता वदे अन्नदान । नेहमीच करितां आपण । उद्या आहे मोठा सण । लक्ष प्रपंची असूं द्यावे ॥११॥ रात्रीस पडले तिला स्वप्न । मूर्ति गजानन पुढे नग्न । होत आहे हे प्रयोजन । यासी न अडथळा आणणे ॥१२॥ खर्च नसे अनाठायीं । ब्राह्मणां वाटणे गायीं । परमार्थ करणे ठायीं ठायीं । या सम पुण्य दुजे नसे ॥१३॥ पतीस झाली ती सांगती । आनंद न मावे त्याच्या चित्ती । पालटली तिची ती मती । कुविचार मनीं नच राहिला ॥१४॥ लक्ष्मण हरी जांजळास । अनुभव आला असे खास । बोरीबंदर स्टेशनास । संन्यासी रूपाने भेटले ॥१५॥ आजानुबाहू परमहंस । दृष्टी नासाग्री दिसे खास । बोलले असती लक्ष्मणास । गजाननाचा शिष्य अससी तूं ॥१६॥ कां होसी रे हताश । नच कळे हे आम्हांस । काळजी असे तुझी त्यास । पुण्यतिथी केलीस साजिरी ॥१७॥ पुत्रशोक बापटासी । असून आला प्रसादासी । खास म्हणून गेहासी । सत्य असेच ते सांग ना? ॥१८॥ लक्ष्मण होतसे कष्टी । खुणेच्या ऐकोनी गोष्टी । समर्थ देती तयां पुष्टी । परी कोण असेल ते कळेना ॥१९॥ आदरें केला नमस्कार । गुप्त झाले योगेश्वर । स्टेशन तेच बोरीबंदर । ध्यानीं मनीं लक्ष्मणाच्या ॥२०॥ भेट देती अनेकांना । शुद्धभाव जे ठेविती मनां । तयांंची पुरवी कामना । संत गजानन अवलिया ॥२१॥ माधव मार्तंड असे जोशी । कळंबचा तो रहिवासी । रेव्हिन्यू ऑफिसर पदविसी । ठेवी गजाननावर भरंवसा ॥२२॥ गुरुवार होता दिन । वाटे घ्यावे दर्शन । शेगांवासी जाऊन । परतून जावे स्वग्रामां ॥२३॥ शिपाई कुतुबुद्दीन । बोलला तयां कर जोडून । आले आभाळ भरून । गाडीत जाणे बरे नव्हे ॥२४॥ मन नदीस होता पूर । तरी होऊ म्हणे नदीपार । दमणी करवी तयार । शेगांवी जाण्याकारणे ॥२५॥ झंझावात सुटला वारा । वर्षा होई पडल्या गारा । उडवू पाहे वारा छपरा । घाबरले ते मानसी ॥२६॥ पुरामाजी केले रक्षण । आले धावूनी गजानन । पैलतीरी पोचवून । रक्षण केले स्मरतांची ॥२७॥ अनेकांच्या अनेक व्यथा । निवारिल्या सद्‌गुरुनाथा । तूच कैवारी दीनानाथा । अनन्यभावें भजता तुज ॥२८॥ तीर्थ-अंगारा गुणकारी । नित्य करितां तिथे वारी । जिथे गजानन हृदयांतरी । पावन होती ते भक्तगणां ॥२९॥ खऱ्या खऱ्या संतांची । सेवा न जाई वाया साची । परी निष्ठा मानवाची । जडावी लागे सत्यची ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य विंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २१ ॥
॥ श्रीगणेशाय नमः॥ जय जय अनंता अद्वैता । अविनाशा भगवंता । भवभयहरणा गुणातिता । ब्रह्मांडनायका नमितो तुज ॥१॥ तूंच अससी सर्वांठायीं । नतमस्तक हे तुझिया पायीं । नारद तुंबरु तुजला ध्यायीं । जगज्जीवना जगत्पते ॥२॥ हातें घडता पातकांसी । तूंच निवारण करिसी त्यासी । धाव वेगी हृषीकेशी । भक्तवत्सला दीनबंधो ॥३॥ पतितपावन तुजला म्हणती । सतेज सुंदर लख लख कांती । चक्र सुदर्शन धरीले हाती । संहारक तूं दुष्टांचा ॥४॥ जो जो येई भेटण्यासी । चिंता नेसी तूं लयासी । जे जे आवडे देसी त्यासी । पूर्णानंद तू व्यंकटेशा ॥५॥ पाप-पुण्याची वासना । उपजविसी तूंच नारायणा । पसायदान देई या दीना । कळस अध्याय गोड करी ॥६॥ स्तोत्र कथा तुझे गाणे । गाती भक्तगण आवडीने । गजाननाची  ही स्तवने । भाव पुष्पे ही समर्पिली ॥७॥ आता असावे सावधान । कळस अध्याय हा करिता कथन । कर्ता करविता गजानन । निमित्तासी कारण दास असे ॥८॥ एकनिष्ठा असे ज्याची । सेवा करण्या गजाननाची । सार्थकता त्या जीवनाची । कृपाप्रसाद तो लाभता ॥९॥ बांधित असता मंदिर । काम करिता शिखरावर । खाली पडला एक मजूर । हाताखालचा गवंड्याच्या ॥१०॥ तीस फुटावरून खाली । देहयष्टी ती कोसळली । घडीव चिरे त्या स्थलीं । तयां वाचविती गजानन ॥११॥ एक बाई रजपुताची । राहणार ती जयपूरची । बाधा तिजला भूताची । तयां कारणे ती आली ॥१२॥ दत्तात्रयाचा दृष्टांत झाला । ती असता जयपूरला । जाई तूं रामनवमीला । शेगांवी गजानन दर्शनासी ॥१३॥ दृष्टांत झाला म्हणून । आली मुलांस घेऊन । उत्सव असता संपन्न । सभा मंडपी ती बैसली ॥१४॥ खांब तिथे दगडाचे । उभे असती मंडपाचे । भाग्य उजळण्या त्या साध्वीचे । खांब तिथे कोसळला ॥१५॥ खांब अंगावरी पडला । इजा मुळी न झाली तिला । लोकांनी तो उचलिला । वाचले प्राण त्या बाईचे ॥१६॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । परमभक्त गजाननाचा । रहिवासी तो शेगांवचा । घरी गेले गजानन  ॥१७॥ गोसाव्याचा असे वेष । मागती तयां भोजनांस । देती सद्‌गुरु हाकेस । दारासी तो पातला ॥१८॥ निरखून पाहता गोसाव्यासी । स्वामी गजानन दिसती त्यासी । धरुनिया हातासी । पाटावरती बसविले ॥१९॥ सुग्रास दिले भोजन । गोसावी पावला समाधान । आशीर्वच तयां देऊन । अंतर्धान ते पावले ॥२०॥ श्रीगजानन चरित्र । असे हे परम पावन पवित्र । निष्ठा सबळ पाहिजे मात्र । अनुभव तोची यावया ॥२१॥ गजानन चरित्र अवतरणिका । उमजावी ही अनेका । यातील आशय थोडका । अध्याय एकविसावा हा असे ॥२२॥ मंगलाचरण प्रथमोध्यायी ।  गुरुदेवाच्या वंदन पायी । निवेदन या ठायीं । सार तेच या असे ॥२३॥ माघ वद्य सप्तमीसी । संत गजानन शेगांवासी । देविदास सदनापासी । प्रगट पहा ते जाहले ॥२४॥ बंकटा सदनीं राहिले । मनोवांच्छीत पुरविले । अकस्मात निघून गेले । चिंता मनीं बंकटाच्या ॥२५॥ टाकळीकरांच्या कीर्तनांत । भाविकां दिसले संत । पितांबराकडुनी तुंब्यात । पाणी तयांंनी भरविले ॥२६॥ पुढील अध्यायी अनेका । चमत्कार येती भाविकां । पार लावी जीवन नौका । संत-कृपा तीच खरी ॥२७॥ बालक असतां अज्ञान । माता करी संगोपन । तयांपरी गजानन । भक्तगणांते सांभाळी ॥२८॥ दृढ धरा मनींं भाव । रक्षण करितां हाच देव । श्री गजानन दयार्णव । मनोरथ पूर्ण करितसे ॥२९॥ गजानना प्रिय दुर्वांकुर । एकवीस अध्याय हेच सार । भाव पुष्प चरणांवर । सद्‌गुरुंच्या या वाहिले ॥३०॥ होऊनिया शुचिर्भूत । आसनावरी व्हावे स्थित । श्रद्धाभाव ठेऊनी मनांत । चरित्र पाठ हा करावाची ॥३१॥ माधव तनय पार्वती कुमार । ग्राम ज्याचे मेहकर । मुक्काम हल्ली नागपूर । कळस अध्याय संपविला ॥३२॥ पौष वद्य द्वादशी गुरुवार । कालयुक्त नाम संवत्सर । श्रीगजानन माहात्म्य साकार । कृपेने तयांच्या जाहले ॥३३॥ श्रीगजानना सद्‌गुरुनाथा । तव चरणीं विनम्र माथा । शिरी ठेवी कृपाहस्ता । अभय दान हे मागतसे ॥३४॥ माता पिता दीन बंधू । कृपा सागर करुणा सिंधू । योगी महात्मा गजानन साधू । वंदन भावें तयांप्रती ॥३५॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकविंशोsध्याय: समाप्तः ॥
॥ शुभं भवतु ॥
॥श्रीगजानन महाराजार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

श्रीगजानन माहात्म्य :


श्रीगजानन माहात्म्य - अध्याय ८ ते १४


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अध्याय ८ ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय यमुनातटविहारा मधुसूदना । पतित पावना करुणाघना । गोपसखा नंदनंदना । ब्रजभूषणा जगत्पते ॥१॥ त्रिभुवननायका गोपगणा । क्षणही ना गमे तुझ्या विना । राधारमणा कुंजवना । धेनु चारिल्या स्वयें तूंचि ॥२॥ कृपा करी यदुनाथा । नम्र चरणीं तुझिया माथा । मार्ग दाखवी दीन अनाथा । हेच मागणे तुजप्रति ॥३॥ तव कृपा असता खरी । स्वानंदाच्या उठती लहरी । लिखाण करण्या हितकारी । होईल पुढती निश्चये ॥४॥ कुकाजीस आले मरण । खंडूजी झाला मनीं खिन्न । भावांभावांत भांडण । भाऊबंदकी सुरू झाली ॥५॥ देशमुख आणि पाटील । दुही हीच गांवातील । वाद वाढता त्यांतील । विकोपास भांडण जात असे ॥६॥ ऐसाच काही घडला प्रकार । खंडू पाटला पडे विचार । गजाननावरी सर्व भार । टाकूनि दर्शना गेला असे ॥७॥ ठेवून पायावरी शिर । भावेंं केला नमस्कार । कृपादृष्टी आम्हांवर । असू द्यावी, वदतसे ॥८॥ जाणुनिया भावनेसी । धरिले त्यासी हृदयासी । करीतसे सांत्वनासी । दयार्णव होऊनी ॥९॥ नाही भिण्याचे कारण । जावे आता परतून । पाटील निर्दोषी म्हणून । सिद्ध त्यांनी करविले ॥१०॥ गजानना विनंती करी । खंडू पाटील राहण्या घरी । नेतां झाला सत्वरी । इच्छा त्यांची पाहुनिया ॥११॥ महाराज असतां सदनास । ब्राह्मण करिती मंत्रघोष । वसती स्थान तेलंगणास । अकस्मात येती शेगांवी ॥१२॥ मंत्र म्हणता चूक झाली । सद्‌गुरूंनी ती दर्शविली । वेदवाणी पटविली । निजासनी बैसुनिया ॥१३॥ वदते झाले ब्राह्मणांसी । वैदिक झाला तुम्ही कशासी । निरर्थक साधनेसी । करणे योग्य नसेची हो ॥१४॥ पोट भरण्यां जरी ज्ञान । सत्य करावे विद्यार्जन । म्हणवितां जरी ब्राह्मण । कर्मठ म्हणुनी वावरा ॥१५॥ स्पष्ट करुनी उच्चार । गजानन वदती ते स्वर । न लावता उशीर । चकित केले विप्रांना ॥१६॥ दिसावया परमहंस । विद्वत्ता त्या अंगी खास । द्यावया जीवन मुक्तीस । सिद्धयोगी हा असे ॥१७॥ खंडु पाटला बोलाविले । हस्ते त्याच्या दान दिले । ब्राह्मण ते संतोषिले । गेले सोडून शेगांव ते ॥१८॥ महाराजही कंटाळले । गांवात राहुन त्या भले । पाटलाच्या मळ्यांत आले । शिव मंदिर ते पाहुनी ॥१९॥ मंदिराशेजारी ओट्यावर । सावली असे थंडगार । निंबवृक्ष बहरला वर । आसन तिथे घातले ॥२०॥ जागा असे ती छान । रमले असे तिथे मन । झोपडी द्यावी रे करून । वदते झाले कृष्णाजीसी ॥२१॥ असता पाटील सेवेत । घडली गोष्ट अद्भुत । दहावीस गोसावी तितक्यांत । त्या ठायींं हो पातले ॥२२॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आहोत आम्ही शिष्य साचे । मानस आमुचे भोजनांचे । निवेदिते ते जाहले ॥२३॥ शिरा-पुरीचे भोजन । मागते झाले सर्वजण । राहू म्हणती दिवस तीन । नंतर पुढती जाणे असे ॥२४॥ आज नसे अन्नदान । हजर असे भाकरी चून । त्याच आपण घेऊन । करा भोजन मळ्यांत हो ॥२५॥ भोजनोत्तर बैसले जन । सुरु झाले निरूपण । कुणा न रुचले प्रवचन । शब्दच्छल तो व्यर्थची ॥२६॥ कुजबुज ती सुरु झाली । ब्रह्मगिरीच्या कानी गेली । थोर याहून गुरुमाऊली । श्रद्धास्थान आम्हांसी ते ॥२७॥ गोसावी तो रागावला । समर्थांंपासी आला भला । चिलमीमाजी गांजा भरला । भास्कर देतसे गजानना ॥२८॥ चिलम घेती गजानन । ठिणगी पडली पलंगी जाण । पेट घेई पांघरूण । धूर निघू लागला ॥२९॥ क्षणात भडकला अंगार । समर्थां वदला भास्कर । उतरा खाली सत्वर । सद्‌गुरुनाथा गजानना ॥३०॥ तों ते वदती भास्करासी । आणा इथे ब्रह्मगिरीसी । नैनं छिन्दन्ति श्लोकासी । सत्य करून दाखवायां ॥३१॥ गुरू आज्ञा ती मानुन । भास्कर करी पाचारण । ब्रह्मगिरी घाबरून । वदतसे तयांला नच न्यावें ॥३२॥ धरूनी त्याचा तो कर । भास्कर ओढी फरफर । गजाननासमोर । आणून उभा करितसे ॥३३॥ नैनं दहति पावक: । खरे करावे शब्द देख । गोसाव्यास त्या धाक । पडला असे खचितचि ॥३४॥ क्षमा मागे समर्थांंची । ना ओळखले मी तुम्हांसी । सद्‌गुरुवरा गुणराशी । नतमस्तक तो जाहला ॥३५॥

॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य अष्टमोsध्याय: समाप्तः ॥

*********************
॥ अध्याय ९ ॥ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ रुक्मिणीवरा पांडुरंगा । भक्तवत्सला श्रीरंगा । चरणांपाशी चंद्रभागा । सेवेसी तुझ्या वाहते ॥१॥ करिता तियेचे स्नान । करी पापांचे क्षालन । मनोभावेंं वंदुन । भक्तचिंतनी रमती ते ॥२॥ मज द्यावे वरदान । लिहवी हे गुणगान । सिद्धपुरुष गजानन । भावेंं सुमने वाहतो ॥३॥ परीस स्पर्शता लोहातें । सुवर्णच तो करी त्यातें । संतकृपा दान ते । कल्याण भक्तांचे करितसे ॥४॥ म्हणून मागणे हे सदया । दया असावी प्रभूराया । जडजीवा या ताराया । महिमा सद्‌गुरुंचा वर्णवी ॥५॥ एकदा शेगांवी टाकळीकर । गोविंदबुबा कीर्तनकार । हरिदास हे असती थोर । शिव मंदिरी पातले ॥६॥ लौकिक होता मोट्यांचा । जिर्णोद्धार मंदिराचा । धनिक तो शेगांवचा । भाविक तोही सत्य असे ॥७॥ मंदिरात येता कथेकरी । घोडा बांधिला सामोरी । येता जवळी लाथ मारी । चावा तोचि घेत असे ॥८॥ स्थिर न राही क्षणभर । तटा तटा तोडी दोर । पळून जाई वारंवार । जवळ न येऊ देई कोणा ॥९॥ लोखंडाच्या साखळया । असती बांधावया भल्या । विसरून त्या राहिल्या । टाकळी नामे ग्रामासी ॥१०॥ रात्र झाली असे फार । झोपण्या गेले कीर्तनकार । चोहिकडे पसरला अंधार । टीव टीव टिटव्या करिती त्या ॥११॥ भयाण वाटे परिसर । कुणी न दिसे रस्त्यावर । तितक्या माजी योगेश्वर । येते झाले त्या ठायासी ॥१२॥ घोडा होता उभा शांत । महाराज झोपले पायांत । भजन वाचे गण गणात । वृत्ती रंगुनी गेली असे ॥१३॥ शंका येई एक मनीं । घोडा वाटे जाईल सुटोनी । म्हणुनी गोविंदबुवा मधुनी । येऊन पाहती घोड्यासी त्या ॥१४॥ घोडा होता उभा शांत । नवल वाटले तयांप्रत । जवळ जाऊनी पाहत । दृष्टी पडले गजानन ॥१५॥ केला समर्थांसी नमस्कार । ठेवूनी पायांवरी शिर । चित्ता करूनिया स्थिर । स्तवन मानसी करितसे ॥१६॥ भाग्य तेची फळा आले । खट्याळ घोड्यासी आकळीले । (श्लोक)' सखा सोयरा तूं असे या दीनाचा । उजळोनी देई मार्ग हा जीवनाचा ‘ ॥१७॥ जोडोनिया कर । बुवा निघाले सत्वर । नित्याचा व्यवहार । करावया कारणे ॥१८॥ दूरदूरचे येती जन । गजाननाचे घ्यावया दर्शन । मनीं पावती समाधान । प्रसाद लाभतां संतांचा ॥१९॥ बाळापुरचे दोघेजण । सद्‌गुरुचरणीं होती लीन । नवस केला तो विसरून । गेला ऐसे जाणवले ॥२०॥ दुसऱ्याही वारीसी येता जाण । गांजा गेले विसरून । समर्थ तेच बोलून । दाखविते हो जाहले ॥२१॥ बाळकृष्ण नामे रामदासी । राहत होता बाळापुरासी । सज्जनगडी दर्शनासी । नित्य नेमे जात असे ॥२२॥ पत्नी राही ती सांगाती । चंदनाच्या चिपळ्या हाती । नामस्मरणीं रंगुनी जाती । ऐसा नित्यक्रम असे ॥२३॥ सदा करी अन्नदान । अतिथी विप्रा तोषवून । निजग्रामीं येती परतून । पुरूषार्थासी साधण्या ॥२४॥ वृद्धापकाळ पुढती येता । होईल कैसे सद्‌गुरुनाथा । सेवा तुमची न होणे आता । शक्य वाटते या मनींं ॥२५॥ विचार ऐसा येता मनींं । वृत्ती होई दीनवाणी । अश्रु तळपती लोचनीं । ध्यानसमाधी लागली ॥२६॥ स्वप्नीं येऊनी रामदास । वदते झाले बाळकृष्णास । घरीच करणे उत्सवास । दर्शनास येईन मी ॥२७॥ तेव्हापासून बाळापुरा । उत्सव नवमीचा होई साजरा । नववे दिवशी दोन प्रहरा । दर्शन देती गजानन ॥२८॥ वाट पाहता समर्थांची । दिसे मूर्ति तीच साची । ऐशापरी आस त्याची । पुरविते ते जाहले ॥२९ ॥ वचनाची त्या झाली पूर्ती । गजानन ते निघून जाती । समाधान पावला चित्ती । बाळापुरासी विप्र तो ॥३०॥ गजाननरूप रामदास । श्रद्धा भावें दर्शनास । लागो मना तोच ध्यास । अगाध लीला तयांची हो ॥३१॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य नवमोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १० ॥ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ अनंतरूपा नारायणा । तूंच रक्षिसी भक्तगणा । नच कोणी तुझ्याविना । जगज्जीवना मज आता ॥१॥ देवाधिदेव गजानन । वदें गाती गुणगान । चरणीं भावेंं वंदुन । कृपाप्रसाद मागतसे ॥२॥ गजाननाच्या आले मनीं । रहावे अमरावतीस जाऊनी । आत्माराम-सदनीं । येऊनिया ते राहिले ॥३॥ आत्माराम पुरुष थोर । होता त्याचा अधिकार । ग्रामामाजी उदार । प्रभु घराणे असे त्यांचे ॥४॥ येता गृहीं गजानन । घातले तयां मंगल स्नान । केले भक्तिभावें पूजन । हार कंठी घातला ॥५॥ पंचपक्वान्नाचे भोजन । देऊनी केले तृप्त मन । दक्षिणा ती देऊन । चरणीं मस्तक ठेविले ॥६॥ दर्शनाकारणे येती जन । दर्शन घेता समाधान । कित्येकांना ते चरण । स्पर्श करावयां मिळेचि ना ॥७॥ अती जाहली असे दाटी । करिती भाविक लोटा लोटी । घालावया हार कंठी । भाग्याविणे न घडत असे ॥८॥ जिथे जिथे इच्छा होई । गजानन स्वयें जाई । तयां लागी पुण्याई । खचित लाभावी लागते ॥९॥ खापर्डे गृहस्थ यांचे घरी । महाराजांची गेली स्वारी । वकिली सनद हीच खरी । अपार संपत्ती देत असे ॥१०॥ षोडशोपचारे झाले पूजन । आशिष देती गजानन । सदन झाले ते पावन । समर्थ चरण लागतांची ॥११॥ ज्यांच्या ज्यांच्या मनीं भाव । तयां भेटला हा देव । कुणी असो रंकराव । सकल समान हो त्या ठायींं ॥१२॥ राहून तिथे काही दिवस । महाराज येती शेगांवास । त्याच ठायीं मुक्कामास । मंदिरी शिवाच्या राहिले ॥१३॥ कळले असे पाटलांस । कृष्णाजी येई दर्शनास । विनवी चालण्या मळ्यांस । परी तिथेची ते राहिले ॥१४॥ सर्वांचे जाणुनी मन । केले असे समाधान । होईल आपुली इच्छा पूर्ण । ऐसे वाचे वदले ते ॥१५॥ हरी पाटील नारायण । तैसे इतरही सर्वजण । होती पदीं त्या लीन । कृपाप्रसाद लाभावया ॥१६॥ सखाराम असोलकरासी । पाटील मागती जागा मठासी । पटले ते महाराजांसी । पावन भूमि तीच हो ॥१७॥ परशराम सावजी, भास्कर । गणेश आप्पा, पितांबर । अनेक भक्त असती थोर । महाराजांसन्निध सेवेसी ॥१८॥ बाळाभाऊ भक्त खरा । सोडूनिया घरा-दारा । गजाननाचा आसरा । घ्यावया तिथेची राहिला ॥१९॥ स्वार्थसाधू भक्तगण । महाराजां सांगती विनवून । द्यावे यासी घालवून । नच ठेवावे जवळी हो ॥२०॥ गजानन घेती हाती काठी । मार मारती बाळापाठी । सत्य ठरली ती कसोटी । वळ ना उठला अंगावरी ॥२१॥ कळला त्याचा अधिकार । लाभला शिष्य हाची थोर । जैसा सुवर्णा सोनार । कस लावूनी पहातसे ॥२२॥ बाळापुरचा सुकलाल । मारवाडी अग्रवाल । त्याची गाय खट्याळ । मारकुंडी फार असे ॥२३॥ मोकाट फिरे गांवात । धान्य खाई दुकानांत । जन जाहले अतित्रस्त । हाती न सापडे कुणाच्याही ॥२४॥ कुणी म्हणती या गायीला । घेऊन जावे शेगांवला । जसा घोडा शांत झाला । कृपा गजानन करतील ॥२५॥ फासे टाकूनी धरली गाय । गाडीत घातली, बांधिले पाय । शेगांवी न्यावया उपाय । ग्रामस्थांनी केले असे ॥२६॥ दृष्टी पडता गजाननाची । वृत्ती पालटली धेनुची । दोरखंडे सोडण्या तिची । महाराज स्वयें येती पुढे ॥२७॥ खाली घालुनिया मान । चाटु लागली ती चरण । अग्रवाल करी दान । गजाननासी त्या गायीचे ॥२८॥ कारंज्याचा लक्ष्मण । विप्र एक धनवान । पोटी रोग असह्य जाण । कीर्ती ऐकून येतसे ॥२९॥ पत्नी तयाची जाई शरण । गजानना मागे वरदान । पतीचे वाचवा प्राण । शमवा ह्या यातना ॥३०॥ आंबा होता समर्थांं करी । तोच फेकला अंगावरी । खाया देई पतीस सत्वरी । व्याधीमुक्त तो व्हावया ॥३१॥ आज्ञेचे करी पालन । झाला रोग निवारण । कृपाळू तो दयाघन । गजानन धन्वंतरी ॥३२॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य दशमोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ११ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ अलौकिक ही तुझी कृती । सुरनर तुजला भावें पूजिती । ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ति । सगुण उपासक गजानन ॥१॥ भोलानाथ गंगाधर । गिरिजापती उमाशंकर । हरहर शंभो हे महेश्वर । करुणासागर विश्वनाथ तूं ॥२॥ महाराजांचा परिवार । पाटील मंडळी पितांबर । प्रिय भक्त तो भास्कर । कुत्रा तयासी चावला ॥३॥ श्वान होते पिसाळलेले । तेणे लोक तेच भ्याले । उपचार भास्कारावरी केले । सर्व ठरले निरर्थक ॥४॥ भास्कर म्हणे गजानन । हाच माझा वैद्य जाण । मजला जावे घेऊन । तेच करणे योग्य असे ॥५॥ गजाननापासी तयां नेले । वृत्तांतासी ऐकविले । हसून महाराज वदले । भोग भोगावा तो लागेचि ॥६॥ प्रारब्ध भोग तो होता । झाला तो कुत्रा चावता । कृपादृष्टी ती होता । मृत्यू टळे भास्करासी ॥७॥ केली होती संत सेवा । तोच लाभला त्यासी मेवा । अंतरीच्या शुद्धभावा । पुरावा हाची योग्य असे ॥८॥ शिवरात्रीसी त्र्यंबकेश्वर । दर्शना येती योगेश्वर । शिष्यांसहित साधुवर । पंचवटीसी राहती ॥९॥ राहिले तिथे काही दिवस । परतुनी आले शेगांवास । भेटूनी शामसिंगास । येऊ म्हणती अडगांवा ॥१०॥ असतां उत्सव रामनवमी । शामसिंग शेगांव ग्रामीं । येताच संधी नामी । गजानना नेई अडगांवा ॥११॥ असता तिथे समर्थ स्वारी । भक्तगणांचा कैवारी । भास्करास त्या ताडण करी । अपराधी तो म्हणोनिया ॥१२॥ जन वदती सोडा तयासी । चुकला जरी कर्तव्यासी । दृढभाव त्या चरणांपासी । सद्‌गदीत तो जाहला ॥१३॥ बाळाभाऊस देववी मार । म्हणुनिच घडला हा प्रकार । करा याचा काही विचार । गजानन वदलें कौतुकें ॥१४॥ पाटील भास्करां कारणे । दोन दिवस इथे राहणे । इहलोक सोडूनी जाणे । लागेल ऐसे संत वदती ॥१५॥ संतवाणी खरी झाली । मुक्ती भास्करां मिळाली । द्वारकेश्वरांजवळी । समाधी तयां देवविली ॥१६॥ अन्नदान भंडाऱ्यासी । अडगांवी ग्रामवासियांसी । घ्यावया प्रसादासी । कावळे येती अती तेथे ॥१७॥ त्रस्त होती जन हाकतां । कावळे ते अन्न खाता । कृपाच तंव दयावंता । क्षणांत तयां पाठविले ॥१८॥ वदले काय ते संत ऐका । आज आले उद्या नका । नका देऊ जनां मोक्का । तुम्हां ताडन करावया ॥१९॥ तेव्हापासून नच आले । कावळे त्या स्थानी भले । संतवचन मानिले । महानता तीच संतांची ॥२०॥ पडला असतां दुष्काळ । नद्या विहिरीत नव्हते जळ । हताश होती जन सकळ । सुरुंग लाविले विहिरीसी ॥२१॥ आंत होता कारागीर । खडक फोडेना ती पहार । जाहला तो लाचार । उपाय त्याचा चालेना ॥२२॥ सुरूंगाची ती किमया । खडक फोडण्या त्या ठायां । एरंड पुंगळ्या सोडाया । काम तिथे हो चालले ॥२३॥ गणु नामे कारागीर । विहिरीमाजी धरूनी धीर । बसला असतां फुटला बार । स्फोट भयंकर जाहला ॥२४॥ गजाननकृपें वाचला । गणु सुखरूप राहिला । कपार तोंडी धोंडा भला । येऊन पडला त्या ठायीं ॥२५॥ गजाननाचा धावा केला । म्हणुनीच गणु तो वाचला । ऐसा योगी लाभला । भक्त तारण्या संकटी ॥२६॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकादशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १२ ॥ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय अंबे रेणुके माते । छत्र शिरावर असता ते । काय उणे त्या भक्तातें । लेकरें तुझे ते सर्वची ॥१॥ कुणी ज्ञानी, कुणी अज्ञान । सकला मानिसी तूं समान । भवाब्धीमाजी तारून । नेसी माते तूंच तयां ॥२॥ सकल चिंता वाहसी । मंगलदायिनी तूं होसी । हांकेसरसी धावसी । रक्षण करिसी सकलांचे ॥३॥ तूंच करवी सेवेते । दीन दयाळे मम हाते । कार्य चालवी हे पुढते । आशीर्वच तव राहू दे ॥४॥ अकोल्यासी बच्चुलाल । रामभक्त अग्रवाल । सुटता तयांचा तोल । गजानना तूं सावरीसी ॥५॥ महाराज येता अकोल्यास । वदते झाले बच्चुलालास । सावकार असता तूं खास । चिंता कासया करितोसी ॥६॥ जे जे आहे तुझ्या मनीं । आले असे ते मम ध्यानीं । करवूनी घेईल कैवल्यदानीं । सत्य हेचि मान तूं ॥७॥ अससी खरा दानशूर । घडावें वाटते कार्य थोर । रामाचे बांधी मंदिर । इच्छा हीच तव असे ॥८॥ ऐकता सद्‌गुरुवाणी । बैसविले तयां आसनी । मनोभावें तयां पुजूनी । आशिर्वाद तो घेतला ॥९॥ महाराजा दिधले दान । ताटी भरुनी सुवर्ण । गजानन लाविती परतून । कार्य तयांचे ते करविण्या ॥१०॥ पितांबर तो शिष्य त्यांचा । असे शिंपी जातीचा । लाभ त्या संतसेवेचा । भाग्य त्याचे थोर ते ॥११॥ महाराज सांगती जाण्या दूर । दुःखी तो जाहलां फार । सुटला वाटे आधार । आज्ञा म्हणुनी तो जातसे ॥१२॥ कोंडोली नामे ग्रामासी । निघाला असे तो प्रवासी । सुकल्या आम्रवृक्षापासी । येऊनिया तो बैसला ॥१३॥ ध्यानीं मनीं गजानन । नित्याचे ते चिंतन । गजाननाचे भजन । मनोभावें तो करीत असे ॥१४॥ मुंगळे असती तिथे फार । म्हणुन चढला झाडावर । जिकडे तिकडे अंधार । वनांतरी तो राहिला ॥१५॥ उदया येता दिनमणी । पाहिले तयां गुराख्यांनी । वार्ता कळविली जाऊनी । ग्रामवासी जनतेसी ॥१६॥ तयां पाहावया जमले जन । मुखे चाले नामस्मरण । गजाननाचा शिष्य जाण । कळून आले सकलांसी ॥१७॥ खरे खोटे जाणण्यासी । परिक्षाच ते घेता त्याची । सांगती हरित करण्यासी । वृक्ष तोचि पाटलाचा ॥१८॥ सद्‌गुरुचे करितां स्मरण । पल्लवी फुटली ती नवीन । पाहतां सकल ते जन । करिती वंदन पितांबरासी ॥१९॥ केला तयाचा बहुमान । गाती जन गुणगान । सकलांसी श्रृत वर्तमान । गजानन शिष्य सत्य असे ॥२०॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य द्वादशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १३ ॥ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ संत महात्मे या भूवरी । भक्तगणांचे कैवारी । सगुणरूप हे ईश्वरी । जनकल्याणास्तव असे ॥१॥ गोपसखा श्रीहरी । पावा अधरी तो धरी । धेनु चारिता वनांतरी । वत्स न करिती पयपाणा ॥२॥ करी आता कृपादान । कोण मज तुजवाचून । देई मज अवधान । सेवा कार्य हे कराया ॥३॥ कुणी सज्जन, कुणी दुर्जन । कुणी नास्तिक, भाविक जन । मठां कारणे जमविती धन । सद्‌गुरुचरणीं भाव असे ॥४॥ गजानन थोर संत । लीला त्यांच्या अघटीत । येईल जे मनांत । तेच करुनी ते दाविती ॥५॥ तेजोमय दिनमणी । गजानन कैवल्यदानीं । तिमिरा घालवोनी । प्रकाशमय अवनी करितसे ॥६॥ समर्थ बसती ज्या ठायीं । परकोट उभारून तो होई । अन्नछत्र पाणपोई । तयां ठायीं नित्यची ॥७॥ सद्‌गुरु पाहती काज । सोहळा पहावया आज । शेगांवी जातां सहज । पहावया मिळतसे आपणासी ॥८॥ भक्तगणांच्या जे मनीं । तेच आले सर्व घडोनी । सहाय्य केले सरकारानी । ज्या ज्या परी गरज भासे ॥९॥ येता कांही अडथळे । समर्थ वदतां ते टळे । गजानन कृपेमुळे । सहज साध्य ते होतसे ॥१०॥ इथे होती चमत्कार । घडले कांही जे प्रकार । केले असती सादर । संतवचना मानुनी ॥११॥ सवडद नामे गांवात । गंगाभारती होता राहत । कुष्ठरोगी अति त्रस्त । संतदर्शना तो पातला ॥१२॥ डोके ठेविले पायांवर । चापट बसली गालावर । उभा ठाकला जोडीले कर । कृपा सद्‌गुरुची व्हावया ॥१३॥ लाथा बुक्क्या थापडा खाई । संत गजानन कृपा होई । थुंकले महाराज त्या ठाई । मलम मानुनी तो लाविला ॥१४॥ घाण वाटली ती जनांला । जन बोलती टोचुनी त्याला । खंत नसे तयां मनाला । व्याधीरहित तो जाहला ॥१५॥ गंगाभारती वदे जनां । व्यर्थ न करावी कुचंबणा । थुंकी नसे हा मलम जाणा । विनम्र भावें सांगतसे ॥१६॥ स्नानास बसती गजानन । तेथील माती ती आणून । तिचेच करूनी लेपन । पूर्ववत तो जाहला ॥१७॥ सुगंध असे मातीस । भारती सांगे त्या जनांस । सत्य न वाटे कुटाळास । प्रत्यय तयासी दाखविला ॥१८॥ कुटाळ तो शरण आला । वंदिले गजानन चरणांला । गर्व त्याचा तो निमाला । संत कृपेने सहजची ॥१९॥ नित्य नेम गोसाव्याचा । एकतारीवर भजनांचा । त्याच नामीं रंगली वाचा । संतुष्ट गजानन ते जाहले ॥२०॥ कुष्ठरोगी झाला बरा । पत्नी आली न्यावया घरा । त्यागिले त्याने संसारा । काळ तिथेची घालविला ॥२१॥ अनेक भक्तां कितीतरी । चमत्कार होती नानापरी । लिहावे ऐसे वाटे जरी । ग्रंथ वाढेल त्या कारणे ॥२२॥ रोग साथीचे जरी येती । गजानन तयां निवारिती । मनीं असता श्रद्धा-भक्ती । कल्याण तयांचे होत असे ॥२३॥ धरी मनींं शुद्ध भाव । कृपा करी सद्‌गुरुराव । स्थान पूज्य शेगांव । विदर्भ पंढरी सत्य जाणा ॥२४॥ रोग साथीचे येती । गजानन तयां निवारिती । मनीं असतां भक्ती । दर्शना जाती जन शेगांवी ॥२५॥ शामसिंग मुंडगांवचा । लाभ घेण्या दर्शनाचा । मार्ग धरी शेगांवचा । दरबारी त्या पातला ॥२६॥ चरणांवरी ठेविला माथा । वदतां झाला सद्‌गुरुनाथा । मुंडगांवी चालावे आता । इच्छा मम ही पुरवावी ॥२७॥ महाराज ग्रामीं त्या जाती । चतुर्दशी रिक्त ती तिथी । अन्नदान करावे चित्तीं । बेत तयांने ठरविला ॥२८॥ महाराज वदती पौर्णिमेला । जेवू घाली सर्वांला । न मानिती वचनाला । सिद्धता ती जाहली ॥२९॥ भोजनांसी जमले जन । पात्रांवर वाढले अन्न । आकाश ते आले भरून । मेघगर्जनां जाहल्या ॥३०॥ वर्षा झाली जोरदार । अन्नाचं केल मातेरं । शामसिंग तो लाचार । शरण गेला गजानना ॥३१॥ भंडारा झाला दुसरे दिवशी । प्रसाद मिळाला सर्वांसी । संतोष पावला मानसी । कृपाप्रसाद लाभला ॥३२॥ मुंडगांवचा पुंडलीक । भोकरे नांवाचा भक्त एक । असे अति भाविक । वारी शेगांवाची नित्य करी ॥३३॥ वारीसी जातां ज्वर आला । रस्त्याने ना चालवे त्याला । आळवी मनीं सद्‌गुरुला । ग्राम शेगांव ते गाठले ॥३४॥ गजानना घातले दंडवत । पुंडलिक होई व्याधीरहित । आनंदले त्याचे चित्त । गंडांतर टळले खचितची ॥३५॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य त्रयोदशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १४ ॥ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय राघवा रामराया । सती कौसल्यातनया । दीनवत्सला तव पायां । भाव पुष्पां या वाहतसे ॥१॥ आजानुबाहू धनुर्धर । अससी कृपेचा सागर । दुष्ट संहारण्या अवतार । भार वाहसी भक्तांचा ॥२॥ कृपा करी रघुनाथा । अनाथांच्या नाथा । सुरस लिहावी कथा । दासाच्या या हातुनी ॥३॥ खेर्डा ग्रामी एक ब्राह्मण । असे सदाचार संपन्न । प्रपंच परमार्थ साधुन । कार्य आपुले करितसे ॥४॥ घरी येती पाहुणे फार । घेई अवघ्यांचा समाचार । सर्वांवरी परोपकार व्रत । हेचि तो चालवी ॥५॥ कर्जाचा वाढला भार । येई घरी सावकार । परी फेडण्या कर्ज लाचार । जीवनासी तो त्रासला ॥६॥ मनीं करूनी विचार । सोडीले त्यानें घरदार । तीर्थाटनां सत्वर । जावया कारणे निघतसे ॥७॥ स्टेशनावर घेता तिकिटासी । गृहस्थ भेटला एक त्यासी । वदला तयां कुठे जासी । स्थिर चित्ता ठेव तू ॥८॥ तीर्थाटनां जरी जासी । प्रथम वंदी संतांसी । गजानन असता शेगांवासी । थोर महात्मा खचितची ॥९॥ विचार न करी अंतरी । जाई आता सत्वरी । उगीच भलते कांहीं तरी । मनीं चिंतणे बरे नसे ॥१०॥ अकस्मात भेटला ब्राह्मण । मनीं वाटे असेल कोण । गेला असे गोंधळून । आला असे तो शेगांवा ॥११॥ दर्शन घेतले महात्म्याचे । कथिले सर्व तयां साचे । हेतू जे जे असती मनींचे । शंका निरसन जाहली ॥१२॥ स्टेशनावर भेटले कोण । घेतले कां तयां जाणून । जा आता घरी परतून । हेच सांगणे तुज असे ॥१३॥ आत्महत्या करू पाहसी । होते जाणे हिमालयांसी । त्रासुनिया जीवनासी । करणे हे कां योग्य असे ॥१४॥ धन आहे मळ्यासी । बाभळीच्या त्या बुडासी । नशीब तुझे उदयासी । येण्या संधी ही पातली ॥१५॥ होता रात्रीचे दोन प्रहर । खोदण्या जाई सत्वर । जा न करावा उशीर । परतुनी तयां लाविले ॥१६॥ जैसे तयां सांगितले । तैसे त्या विप्रें केले । सत्य वचन ते झाले । द्रव्यघट तो सांपडला ॥१७॥ शेगांवी तो परत गेला । दान-धर्म बहू केला । प्रेमानंदे नाचला । कृपाप्रसादे संताच्या ॥१८॥ सोमवती पर्वकाळ पाहून । करावे नर्मदा स्नान । सवें घ्यावे गजानन । भक्तगणां वाटतसे ॥१९॥ बंकटलाल, मारुती चंद्रभान । सवें तयांंच्या गजानन । ऐसे अनेक भक्तगण । ओंकारेश्वरी त्या पोहोचले ॥२०॥ नर्मदेचे अवघे घाट । स्त्री पुरुषांनी भरले दाट । ना मिळे जावया वाट । गर्दी अपार ती लोटली ॥२१॥ नावेमाजी बसून । निघाले ते सर्वजण । खेडीघाट स्टेशन । जवळ तेची करावया ॥२२॥ नर्मदेच्या मध्यंतरी । नाव आदळली खडकावरी । खोच पडली तीज भारी । आंत पाणी ते शिरले ॥२३॥ घाबरले सर्वजण । परी शांत होते गजानन । मुखे चालले नामस्मरण । गण गण गणात बोते हो ॥२४॥ आम्ही न आपले ऐकले । म्हणुनि का ऐसे झाले । अपराधी आम्ही आहोत भले । वाचवा वाचवा प्राण हे ॥२५॥ स्तवन केले नर्मदेचे । गजाननाने स्वयें वाचे । पाणी ओसरले साचे । नाव पूर्ववत जाहली ॥२६॥ नर्मदेने घेतला वेष । कोळीण रुप धरी खास । लाविली नांव तीरास । अवघ्यांनी ती पाहिली ॥२७॥ चित्रकुटचे नाथ माधव । शिष्य त्यांचे सदाशिव । तात्या असे टोपण नाव । दर्शनास आले शेगांवी ॥२८॥ गजानन बैसले जेवणांस । पाचारी नाथ शिष्यास । उशीर झाला तुम्हांस । येण्यास हो या ठायांसी ॥२९॥ माधवनाथ गुरु त्यांचे । भाग्य लाभले भोजनाचे । राहिले सेवन तांबुलाचे । विडा नेऊनी द्या त्यांना ॥३०॥ वानवळे नाम त्यांचे । शिष्य माधवनाथाचे । स्मरण करिता त्यांचे । भेट हीच हो साक्षात ॥३१॥ ॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य चतुर्दशोsध्यायः समाप्तः ॥ ॥ शुभं भवतु ॥
॥श्रीगजानन महाराजार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥