Feb 26, 2025

महाशिवरात्री पंचोपचार शिवपूजन - व्रतकथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमः शिवाय ॥

  देवांचेही देव महादेव ज्यांना पाच मुख, दहा भुजा, तीन नेत्र आहेत. ज्यांच्या हातांत शूल, कपाल, खट्टांग, तलवार, खेटक, पिनाक नांवाचें धनुष्य असून त्यांचे रूप महाभयंकर आहे. मात्र भोळा सांब भक्तवत्सल, दयाळू असून अल्पसेवेने प्रसन्न होऊन अभय व वरदान देणारे आहेत. ज्यांनी सर्वांगाला भस्मोद्धूलन केलें असून अनेक सर्प धारण केले आहेत. ज्यांच्या भाळी चंद्रकला आणि नीलकंठात कपालमाला शोभत आहे. ज्यांची मेघाप्रमाणें नीलकांति असून जे कोटीसूर्यासारखे दैदीप्यमान आहेत आणि ज्यांच्या सभोवती प्रमथादि गण आहेत असे जगदगुरु श्रीशंकर कैलासशिखरावर असतांना जगन्माता पार्वतीने त्यांना एक प्रश्न विचारला, “ हे देवेशा शंकरा, जें व्रत केलें असतां सर्व पापें नष्ट होतात आणि इष्ट मनोरथ पूर्ण होऊन अंती सायुज्य मुक्ती लाभते, असें उत्तम व्रत मला सांगा. हे परमेश्वरा, आपण मला पूर्वी अनेक व्रतें, तिथींचे निर्णय, अनुष्ठानें, दानें, धर्मकृत्यें, तसेच नानाप्रकारच्या तीर्थयात्रा यांविषयी सांगितले आहेच. परंतु सर्व पापांचा क्षय करणारें व भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे असें अत्यंत शीघ्र फलदायी व्रत मला सांगा.” आदिशक्तीने जगत्कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न ऐकून सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले, आणि म्हणाले, “ हे उमे, जें अत्यंत गुप्त आहे, जें मनुष्याला भोग आणि मोक्ष देणारें असून मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलें नाहीं असें सर्व व्रतांमध्यें उत्तम व्रत आता मी तुला सांगतों. या व्रताच्या केवळ श्रवणमात्रानें सर्व पापें नाश पावतात. माघ महिन्याच्या कृष्णपक्षांतील विद्ध नसलेली जी चतुर्दशी असते, तिला महाशिवरात्रि असे म्हणतात. या दिवशी शिवोपासना केल्यास तिचे फळ सर्व यज्ञांपेक्षाही उत्तमोत्तम मिळते. या शिवरात्रिव्रतानें जें पुण्य प्राप्त होतें, तें नानाप्रकारचीं दानें, यज्ञ, तपश्चर्या व कित्येक व्रतें करूनही प्राप्त होत नाहीं. किंबुहना, शिवरात्रीसारखें पापांचा नाश करणारें दुसरें व्रतच नाहीं. हें व्रत जाणतां घडो अथवा अज्ञानानें घडो, त्यानें मोक्षप्राप्ति अवश्य होतेच. हे व्रत ज्यांच्या हातून घडते, ते मुक्त होऊन शिवलोकाला जातात.

माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी महादेव सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने प्रगट होतात. या सृष्टीत जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्‍तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला शिवलिंगाची पाच विशेष मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्‍त होतो.
॥ ॐ सद्योजाताय नमः, ॐ वामदेवाय नमः, ॐ अघोराय नमः, ॐ ईशानाय नमः आणि ॐ तत्पुरुषाय नमः असे हे पाच मंत्र आहेत.
हे वरानने, ही शिवरात्रि सर्वमंगलकारिणी असून सर्व अशुभांचा नाश करणारी व भाविकांना त्वरित भोग-मोक्ष देणारी आहे. हे शिवरात्रिव्रत नरकयातना कसे दूर करते आणि शिवलोकाची प्राप्ती करून देते, याविषयीची पूर्वी घडलेली पौराणिक कथा तुला सांगतों, ती तू एकाग्रचित्ताने ऐक. 
पूर्वीच्या कल्पांत प्रत्यंत देशांतील पर्वताच्या मूलप्रदेशांत एक व्याध राहत होता. तो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचें पालन करीत असे. हा अत्यंत बलवान, धनुर्धारी, बद्धगोधांगुलित्राण अर्थात चर्माचे हातमोजे घालत असून सदैव मृगयेविषयीं आसक्त असे. एकदा त्याने गांवातील वाण्यांकडून उधार घेतलेले द्रव्य परत न केल्याने त्या वाण्यांनीं त्याला शिवाच्या मंदिरांत कोंडून ठेवला. कर्मधर्मसंयोगाने तो दिवस माघ कृष्ण चतुर्दशीचा होता. त्यामुळे, सूर्योदयीं त्याला महादेवाचें दर्शन तर घडलेंच तसेच त्यादिवशी व्रतस्थ भक्तांचें सदोदित शिव-शिव असे नामस्मरणराचें श्रवणही घडलें. बराच काळ त्याने त्या सर्व वाण्यांना, “ तुमचे ऋण मी लवकरच चुकते करेन.” अशी विनवणी केली आणि अखेर त्यांनी त्याला बंधमुक्त केले. नंतर तो धनुष्य घेऊन दक्षिणमार्गानें बाहेर निघाला आणि अरण्यात जात असतांना लोकांचा उपहास करूं लागला. तो बोलू लागला, “ आज नगरामध्यें सर्व लोक ‘शिव-शिव’ असा सतत नामगजर कशासाठी करत आहेत?” मनांत असा विचार करत तो व्याध शिकारीसाठी एखादा वन्य प्राणी दिसतो का? हे पाहू लागला. हरिण, सूकर, चितळे यांच्या पावलांच्या ठशांचा वेध घेत घेत तो लुब्धचित्त होऊन पर्वतासह अरण्यांत भटकू लागला. संध्याकाळ झाली तरी, त्यादिवशी एकही प्राणी त्याने लावलेल्या जाळ्यात सापडला तर नाहीच, शिवाय मृग, डुकर, चितळ हे तर कोठेंही दिसेनात, त्यामुळे तो व्याध अगदींच निराश झाला व एवढ्यांत सूर्यनारायणदेखील अस्तास गेला. दिवसभरांत अन्नाचा कणही त्याच्या पोटांत गेला नव्हता. अत्यंत क्षुधार्त झालेल्या त्याने विचार केला कीं रात्रीं या अरण्यातीलच जलाशयाच्या आसपास राहावे, आणि पाणी पिण्यासाठी जे वन्यचर येतील त्यांची शिकार करावी, आणि मग त्यायोगेच आपले व कुटुंबाचे उदरभरण करावे. मग त्याने तेथील एका सरोवराच्या तीरावर आपले जाळे पसरलें आणि तिथेच कोठेतरी लपून बसण्यासाठी जागा शोधू लागला. शिकारीसाठी त्याने जिथे ते जाळे लावले होते, त्याच्या मध्यभागी एक मोठें स्वयंभु शिवलिंग होतें व जवळच एक मोठा थोरला बेलाचा वृक्षही होता. त्या झाडावरच तो व्याध चढला आणि पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी स्पष्ट दिसावेत म्हणून त्या बेलवृक्षाचीं पानें तोडून खाली फेंकूं लागला, तीं भाग्यवशात त्या शिवलिंगावर पडूं लागलीं. सकाळपासून त्या दिवशी कोंडून ठेवल्यामुळे त्याला भोजन मिळालें नव्हते, मृगयेसाठी त्या रात्री जागरणही  घडलें. याप्रमाणे रात्रीचा एक प्रहर निघून गेला. तेव्हढ्यांत त्याला एका प्राण्याची चाहूल लागली. त्याने परत थोडी बिल्वपत्रे तोडली, अनावधानानेच, त्याच्याही नकळत तो सकाळी मंदिरात ऐकलेल्या शिव नामाचा उच्चार करीत होताच. अशा रितीने त्याच्या हातून महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरींची शिवपूजा घडली. त्या यामपूजेच्या प्रभावाने त्या व्याधाच्या एक चतुर्थांश पातकांचा नाश झाला. त्यावेळी त्या तळ्याकाठी एक गर्भार हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली त्या पारध्यास दिसली. तो तिरकमठा सावरून शरसंधान करणार इतक्यांत ती मृगी दिव्यवाणीने त्याला म्हणाली, “ हे व्याध्या  ! मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस ? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस.” 
त्या हरिणीचे ते मनुष्यवाणीतील बोल ऐकून तो पारधी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “ हे मृगी, मी आणि माझे कुटुंब क्षुधेने अत्यंत पीडित असून मला ऋणमुक्तीसाठी द्रव्य संपादन करायचे आहे. म्हणूनच, मी तुला मारतो आहे. मी आजपर्यंत अनेक उत्तम, मध्यम, कनिष्ठप्रतीचे असे असंख्य जीव मारले परंतु त्या सर्व श्वापदांमध्यें अशी वाणी मात्र कधीं ऐकली नाही. तुला पाहून माझ्या हृदयांत करुणा निर्माण झाली आहे. तू कोण आहेस? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले ?”
त्यावर ती मृगी दिव्यवाणीत म्हणाली, “ हे व्याधश्रेष्ठा, माझा पूर्वजन्म वृत्तांत तुला सांगतें. मी पूर्वी स्वर्गाचा राजा इंद्र याच्या दरबारातील एक अप्सरा होतें. अनुपम रूप, लावण्य व सौभाग्य यांमुळे मी अत्यंत गर्विष्ठ झाले आणि हिरण्याक्ष नांवाच्या सामर्थ्यशाली दानवाशी मी विवाह केला. त्याच्याशीं सवहर्तमान मीं यथेच्छ भोग भोगले. त्या दुष्टाच्या सहवासामुळे मी उमापती महादेवाची आराधनाही करेनाशी झाले. मी दररोज शंकरापुढे प्रेक्षणीय असें नृत्य करीत असें. मात्र एके दिवशी भोगलालसेमुळे माझा तो नित्यनेम चुकला. आणि ‘ मज हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥’ तेव्हा मी अनन्य शरणागत होऊन प्रार्थना केली, “ हे शाप व अनुग्रह देण्यास समर्थ असणाऱ्या देवाधिदेवा, माझा भर्ता मला प्राणांहून प्रिय आहे, तो एक महाबलवान् दैत्य आहे. त्याच्या सहवासात मी शिवार्चन करणे सोडून दिले. मला क्षमा करा.” तेव्हा त्या परम दयाळू कैलासपतीने मला उ:शाप दिला, “ तू बारा वर्षे मृगी होऊन राहशील, जेव्हा एक व्याध तुझ्यावर शरसंधान करील त्यावेळीं तुला पूर्व जन्माचें स्मरण होईल व नंतर शंकराचें दर्शन घेऊन तू मोक्ष पावशील.” 
हे पूर्वजन्म कथन करून ती हरिणी पुढे म्हणाली, “ हे व्याध्या, मला आता तू सोडून दे. या स्थितीत माझा वध करणें योग्य नाहीं. हे लुब्धका, काही वेळांत दुसरी एक पुष्ट मृगी येईल, तिची शिकार केल्यास सहकुटुंब तुझें यथेच्छ भोजन घडेल. तसेच हे व्याधा, या तळ्यावर पाणी पिण्याकरितां दुसरा मृग प्रातःकाळी येईल, तो तुझ्या क्षुधाशमनार्थ नक्कीच उपयोगीं पडेल. अथवा मी घरीं जाऊन गर्भ प्रसवून मुलेबाळें माझ्या कुटुंबाच्या स्वाधीन करून इथे पुनः शपथपूर्वक येईन.” तिचें तें भाषण ऐकून व्याध मनांत आश्चर्यचकित झाला. मात्र तरीही तो त्या गर्भिण हरिणीस म्हणाला, " तू म्हणतेस ते कदाचित खरेही असेल. मात्र जर दुसरी मृगी किंवा मृग आला नाहीं, व आता मी सहज शिकार करू शकत असलेल्या तुलाही सोडली तर माझेच नुकसान होईल. कारण माझा आत्मा व विशेषतः कुटुंबाचे प्राण क्षुधेनें अत्यंत व्याकुळ झाले आहेत. परंतु प्रातःकाळीं तूं परतून येशील अशी ज्या योगे मला खात्री वाटेल, अशी तू शपथ घे. कारण पृथ्वी, वायु, सूर्य आदि सर्व देव-देवता ह्या सत्यास साक्षी असतात. त्यामुळे ज्यांना इहलोक व परलोक साधावयाचा असेल, त्यांनीं सदैव सत्याचे पालन करावे.”
त्याचे ते भाषण ऐकून गर्भाधाराने वेदनाग्रस्त झालेल्या हरिणीनें सत्य शपथ घेतली ती अशी - हे व्याधा, पुनः मी जर न येईन तर, वेदविहित कर्मे न करणाऱ्या, अनेक दुराचरण करणाऱ्या, आणि देवाचें द्रव्य, गुरूचें द्रव्य व ब्राह्मणाचें हरण करणाऱ्यांना जे पाप लागेल ते मला लागेल. असें मृगीचें भाषण ऐकून तो व्याध प्रसन्न झाला आणि त्यानें धनुष्यबाण ठेवून हरिणीला तत्काळ सोडून दिली. तिच्या त्या उक्तिप्रभावानें व लिंगाच्या पूजेनें व्याधाच्या पापाचा अजून एक चतुर्थांश भाग तत्काळ दूर झाला. हे गिरिजे, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजेच मध्यरात्रीं शिव-शिव असें स्मरण करित असल्यामुळे त्या पारध्याला झोप आली नाहीं. 
एवढ्यांत दुसरी एक सुंदर हरिणी तेथें येत असल्याचे पाहून तो आनंदला. त्याने परत थोडी बेलाची पानें हातांनीं तोडून तीं दक्षिणभागीं टाकलीं आणि पुन्हा एकदा तीं बिल्वपत्रे शिवलिंगावर पडलीं. मग व्याधानें तिला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला आणि तो तिर सोडणार, हे त्या हरिणीने पहिले आणि ती म्हणे ‘ व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥’ हें तिचें भाषण ऐकून तो व्याध चकित होऊन क्षणमात्र विचार करू लागला, “पहिल्या हरिणीची जशी वाणी होती तशीच हिचीही आहे, हिलाही सर्व शास्त्रज्ञान अवगत असणार.” असे चिंतन करून तो त्या हरिणीला म्हणाला, “ तू धन्य आहेस !  तू पुनः येशील अशी सत्य प्रतिज्ञा कर आणि जा."
त्या हरिणीने सांगितलेली अनेक धर्मवचने ऐकून त्या व्याध्यास संतोष झाला आणि त्याने तिला सोडून दिले. त्या रात्री अतिशय थंडीनें, क्षुधेनें व गृहचिंतेनें त्याला झोंप लागली नाहीं, मुखी शिव नाम होतेच. मग तो सहज पुन्हा बेलाची पाने तोडू लागला.
थोड्याच वेळांत तिथे एक मृग आला. पहिल्या हरिणीने सांगितले होते, तसेच घडत असलेले पाहून तो पारधी हर्षित झाला. त्याने धनुष्याची प्रत्यंचा कानापर्यंत ओढून शरसंधान केलें, आणि आतां तो बाण सोडणार एवढ्यांत त्या हरिणानें व्याधाला पाहिलें. 
तोही मृग मनुष्यवाणींत बोलू लागला, “ हे व्याधा, इथे दोन हरिणी आल्या होत्या का ? त्या कोणत्या मार्गाने गेल्या ? तूं त्यांना मारले तर नाही ना ? माझी एक भार्या प्राणासारखी व दुसरी प्राण देणारी आहे. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व त्यांचे सांत्वन करून येतो.” हें त्याचें भाषण ऐकून व्याध विचार करूं लागला, “ हा हरिणसुद्धां सामान्य नव्हे, ही कोणीतरी सर्वोत्कृष्ट देवताच असावी.” मग तो त्या मृगास म्हणाला, “ दोन हरिणी माझ्यापाशीं शपथ घेऊन याच मार्गाने गेल्या. त्यांनींच तुला पाठविला असें वाटतें. आतां मी तुला त्वरित मारतों.”  
तेव्हा मृगाने विचारले, “ व्याध्या, त्या दोघींनीं तुझ्यापाशीं कोणती सत्यप्रतिज्ञा केली, कीं तुला विश्वास वाटून तूं दोघींनाही सोडून दिलेस ?” असा प्रश्न करतांच व्याधानें त्यां दोन्ही हरिणींनी सांगितलेले शास्त्रार्थ ज्ञान त्या मृगास कथन केले. ते ऐकून त्या हरिणास अत्यानंद झाला आणि तो बोलू लागला, “ हे व्याध्या, मी आता जाऊन माझी सर्व कर्तव्ये पूर्ण करून तसेच माझ्या सुहृदांची आज्ञा घेऊन शपथपूर्वक परत येईन.” त्याने सांगितलेले पापफळांचे सर्व निरूपण ऐकून व्याधाने त्यालाही जाऊ दिले. हे अपर्णे, तो हरिणही जालपाशांतून सुटल्यामुळे संतुष्ट होऊन जलप्राशन करून पुनः अरण्यांत गेला. त्या व्याधानें पुन्हा पहाटेच्या प्रहरीं बेलाची पानें तोडून शिवलिंगावर टाकलीं. अज्ञानानें का होईना, शिवरात्रीदिवशीं त्या व्याधाला उपोषण-जागरण घडलें व बिल्वपत्रांनी शिवपूजाही घडली, त्याच्या प्रभावानें सूर्योदयीं तो सर्व अघांतून तत्काळ मुक्त झाला. एवढ्यांत दुसरी एक मृगी तेथें आली. तिच्यासोबत तिचे एक लहानसे पाडस होते.  तिला पाहून व्याध्याने पुन्हा एकदा बाण धनुष्याला लावला, ते पाहून ती हरिणी दिव्यवाणीत बोलू लागली, “ हे व्याध्या, तू धर्मवचन जाणतोस. तू हा बाण सोडू नकोस, धर्माचे पालन कर. शास्त्रार्थानुसार मी अवध्य आहे, हे तुला ज्ञात आहे. एखादा धर्मशील राजा मृगयेसाठी निघाला तरी, निद्रिस्त, मैथुनासक्त, स्तनपान करणारा, किंवा व्याधिपीडित हरिण अथवा अन्य वन्य प्राणी तसेच लहान पाडसयुक्त हरिणी यांची कधीच शिकार करत नाहीं. सांप्रतकाळी, तू कदाचित् धर्म सोडून जर मला मारीत असलास तरी काही काळ जरा थांब. मी घरीं जाऊन माझें हे पाडस माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांभाळण्यास देते. आणि तुझ्याकडे परत येते. मग तू मला मार. मी जर दिलेले हे वचन पाळले नाही तर वेदादिक शास्त्रांत वर्णिलेली अनेक पापे मला लागतील.” हें तिचें भाषण ऐकून व्याध मनात विस्मित झाला आणि त्यानें त्या हरिणीलाही सोडले. त्या मृगीला आनंद झाला आणि आपल्या पिल्लासोबत ती अरण्यांत दिसेनाशी झाली.
तो व्याधही मग त्याच्या घरीं जाण्यासाठी निघाला. वाटेत जाता जाता त्या सत्यवादी हरिणांनी सांगितलेली धर्मशास्त्रातील वचनें आठवू लागला आणि या मृगांची व अन्य प्राण्यांची  नित्य हत्या करणारा मी कोणत्या गतीला जाईन बरें, असा मनोमन विचार करू लागला. तो व्याध आपल्या गृहीं परतला, त्यावेळी एक वेळच्या भोजनापुरतें सुद्धां अन्न किंवा मांस त्याने आणले नाही, हे पाहून घरातील सर्वचजण निराश झाले. त्या व्याध्याची लहान मुले, इतर सदस्य आता भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते. व्याधाचा मात्र जंगलातील त्या हरिणांनी घेतलेल्या शपथवाक्यांवर पूर्णतः विश्वास होता. “ मनुष्यवाणीने बोलणारी ती सर्व हरिणे धर्मात्मेच असून ते निश्चितच येतील, आपण मात्र यापुढे धर्मसंमत वागायचे आणि त्या मृग परिवाराची शिकार करायची नाही.” असा त्याने निश्चय केला. 
इकडे धर्मवचन ऐकून शपथांवर व्याधानें सोडलेला तो हरिण आपल्या आश्रमांत परतला. लवकरच पहिल्या हरिणीची प्रसूती होऊन तिने पाडसाला जन्म दिला. दुसर्‍या हरिणीने पतीला संतुष्ट केले. तिसऱ्या हरिणीने तिच्या लहानग्यास स्तनपान केले. अशा रितीने सर्वांचा निरोप घेऊन तो मृग आणि त्या तीन हरिणी सत्याचे पालन करीत त्या व्याध्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. तात्पर्य, पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे धर्मसंबंधाने मनोहर विचार करून कर्तव्याचे पालन करीत ते मृग कुटुंब तो व्याध जिथे होता, तिथे आले. 
व्याधाला पाहून तो मृग म्हणाला, “ व्याध्या, तू प्रथम मला मार, नंतर माझ्या या स्त्रियांना आणि त्यानंतर माझ्या मुलांना मार. आतां उशीर करूं नको. मृगांची हत्या केलीस म्हणून तुला कांहीं दोष लागणार नाहीं. कारण तुला तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ करायचा आहे. त्यायोगें आम्हांसही  मुक्तीचा लाभ होईल.”
त्या सत्यपालक मृगाचे हे बोल ऐकून तो व्याध म्हणाला, “ हे मृगराज, तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. मी तुमची शिकार करणार नाही. हे हरिणश्रेष्ठा, धर्माचा उपदेश करणारे तुम्ही सर्वचजण माझे गुरु आहात. आजपासून मी शस्त्रास्त्रे टाकली आणि धर्माश्रय घेतला.” 
तो मृग परिवार मात्र “ आम्ही शपथ घेतल्याने वचनबद्ध आहोत, आता आम्ही परत जाणार नाही. तू आम्हांस लवकर मार.” असे वारंवार म्हणू लागला. ते पाहून पश्चात्तापग्रस्त त्या व्याधानें बाणासह आपले धनुष्य तत्काल मोडून टाकलें व मृग परिवाराला त्याने नमन केले आणि त्रास दिल्याबद्दल क्षमाही मागितली.  
तोच अद्भुत घडले! स्वर्गातील देवांनीं दुंदुभी वाजविली. त्यावेळीं आकाशांतून दिव्य पुष्पवृष्टि होऊं लागली, आणि  शिवदूत त्या ठिकाणी उत्तम विमान घेऊन आले. त्या व्याध्यास ते शिवदूत दिव्यवाणीत म्हणाले, “ हे सत्त्वशीला, या विमानांत बसून तू सशरीर स्वर्गास जा. शिवरात्रिव्रताच्या प्रभावानें तुझें सर्व पाप क्षयाला गेलें. तुला महाशिवरात्रीच्या दिवशीं उपोषण घडलें, रात्रौ जागरण घडलें. अजाणतां कां होईना, दर प्रहरीं शिवाची यामपूजा घडली, त्या पुण्ययोगानें तुला आता शिवलोकीची प्राप्ती होईल.” 
पुढें ते शिवदूत वदले, “ हे धर्मपालक, सत्यवचनी मृगराजा, तूं आणि तुझ्या या तीनही स्त्रिया व पुत्र यांसहवर्तमान तुम्ही नक्षत्रपदाला जा. तें नक्षत्र तुझ्या नांवानें ( मृगशीर्ष नामाने) प्रसिद्ध होईल.” शिवदूतांचे हे भाषण ऐकून तो व्याध व तो मृग परिवार दिव्य विमानांत बसून नक्षत्रलोकाला गेले. 
हे पार्वती, त्या दोन हरिणींचा मार्ग तर अद्यापि स्पष्ट दिसतो व त्याच्या पृष्ठभागीं मण्याप्रमाणे एक नक्षत्र (व्याध) आणि त्याखाली तीन मोठीं तेजःपुंज नक्षत्रे आहेत, त्याला मृगशीर्ष असें म्हणतात. अग्रभागी दोन पाडसे, तर पृष्ठभागी तिसरी मृगी यांसहित मृगशीर्षांजवळ आलेला हा मृगराजा अद्यापही आकाशांत विराजमान दिसतो. व्याधाला शिवरात्रीदिवशीं सहजीं घडलेलें उपोषण, रात्रौ जागरण, व शिवपूजनही घडलें त्याचें असे फळ मिळाले. नकळत घडलेल्या व्रताचें जर एवढे फळ तर मग जे लोक भक्तिभावानें शुभकारक असें शिवरात्रीचें व्रत विधिपूर्वक, उपोषण-जागरणासह करतात त्याचें फल किती वर्णावे? जन्मोजन्मी केलेल्या पातकांचा नाश करणारें महाशिवरात्रीसारखें दुसरें प्रभावी व्रत नाहीं. सहस्र अश्वमेध केल्याने अथवा वाजपेय यज्ञ केल्याने जेवढे फळ प्राप्त होते, तेंच या महाशिवरात्रिव्रतानें प्राप्त होतें यांत संशय नाहीं. माघमासीं प्रयागांत स्नान करणारांला जें पुण्य लाभते व वैशाखांत द्वारावतींत स्नान करणारांला जें फळ मिळते, तपसि (ब्रह्मचाऱ्यानें) पालाशदंड घेतला असतां अथवा कार्तिकामध्यें माधवासमोर गयेस जाऊन विष्णुपदावर पिंड दिल्याने जी फलप्राप्ती होते, तोच लाभ हे महाशिवरात्रित्रत करणाऱ्या भाविकाला खरोखर प्राप्त होईल.  
॥ इति श्रीलिंगपुराणे महाशिवरात्रिव्रतकथा संपूर्णा ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

श्रीशिवोपासना : -

Feb 19, 2025

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अखिल संतमंडळींना वरदान देणाऱ्या श्रीधरा, हे करुणेच्या सागरा, हे गोप-गोपींना अतिप्रिय असणाऱ्या गोपाळा, हे तमालनीळा श्रीहरी माझ्यावर कृपा कर.॥१॥ तुझ्या ईशत्वाची कसोटी घेण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवाने यमुनातीरावरील गोकुळातील सर्व गाई-वासरें चोरली, तेंव्हा तू आपली निजलीला दाखविलीस आणि स्वतःच गाई-वासरांचे रूप घेतलेस. अशा रितीनें, तू त्या सृष्टीकर्त्यालाच आपलें परब्रह्मस्वरूप दाखविलेस.॥२-३॥ यमुनेत वास्तव्य करणाऱ्या दुष्ट कालियाचे मर्दन केले. मात्र, त्याला अभय देऊन रमणकद्वीपास स्थलांतर करण्यास सांगितले आणि सर्व गोप-गोपी भयमुक्त केलेस.॥४॥ हे वासुदेवा, असाच माझ्या दुर्दैवाचा समूळ नाश करून या दासगणूलादेखील सर्वत: निर्भय करावे.॥५॥ हे श्रीहरी, मी तुझा एक अज्ञानी, काहीही योग्यता नसलेला असा भक्त आहे. मी तुझ्या कृपाप्रसादास देखील पात्र नाही. तरीही हे प्रभू, तुम्ही माझ्यावर कृपा करा.॥६॥ आणि हे जरी सत्य असलें, तरी तू माझा अंत पाहू नकोस. हे परमेश्वरा, तुझा केवळ एक कृपाकटाक्ष टाकून माझ्या अवघ्या चिंता दूर कर.॥७॥ श्रोतें हो, आतां एकाग्र चित्त करा. बंकट, हरी, लक्ष्मण, विठू, जगदेव आणि इतर काही भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले.॥८॥ भाविक जनांनी मोठ्या आनंदाने वर्गणी दिली. मात्र काही टवाळखोर कुत्सितपणें बोलू लागले, " तुमच्या या साधू महाराजांना वर्गणीची गरज का भासली ?॥९॥ गजानन महाराज हे अशक्यही सहजप्राय शक्य करून दाखविणारे महान संतपुरुष आहेत, असा तुमचा विश्वास आहे ना ? मग त्यांच्या मठबांधणीसाठी वर्गणी मागण्याची गरज काय ?॥१०॥ अहो, प्रत्यक्ष कुबेर त्यांचा भंडारी आहे ना ? मग तुम्ही उगाच का असे दारोदारी वर्गणी मागत फिरत आहात ? कुबेरावरच हुंडी काढा, म्हणजे तुमचे काम होईल."॥११॥ त्या टवाळ लोकांचे हे बोलणें ऐकून जगदेव हसत म्हणाला," केवळ तुमचे भलें व्हावे, हेच हे वर्गणीरूपी दान मागण्याचे कारण आहे.॥१२॥ हे मठ उभारणीचे शुभ कार्य मुळातच श्री गजानन महाराजांसाठी नाहीच मुळी ! तर तुमचे कल्याण होण्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.॥१३॥ हे अवघें त्रैलोक्य त्या स्वामी गजाननाचेच आहे, तोच त्यांचा मठ आहे. त्यांचा बाग-बगीचा म्हणजे या भूतलांवरील सर्व वनराई ! ही धरां हाच त्यांचा पलंग आहे.॥१४॥ अहो, अष्टसिद्धी ज्याच्या घरीं दासी होऊन राबत असतात, त्याचे अवघें वैभव खचितच निराळें आहे. त्याला तुम्ही दिलेल्या देणगीची आवश्यकताच नाही.॥१५॥ त्या प्रत्यक्ष सूर्यनारायणाला, या नभांत तळपणाऱ्या भास्कराला अंधाराचा नाश करण्यासाठी कधी एखादा दिवा आपला प्रकाश देतो काय ?॥१६॥ तो रवी स्वतःच इतका दैदीप्यमान, तेजस्वी आहे की त्याला त्या दीपाची मुळीच गरज नाही. सार्वभौमपद भूषविणारे का कधी शिपाई/जासूद होतील काय ?॥१७॥ मात्र, मनुष्याची ऐहिक वैभप्राप्तीची अभिलाषा या पुण्यकृत्यानें अवश्य फळास येईल.॥१८॥ औषधाचे प्रयोजन हे रोग परिहार करण्यासाठी असते. ते काही प्राणासाठी नसते, हे प्रथम लक्षांत घ्या.॥१९॥ रोग हा शरीरास हानिकारक असतो. त्यापासून प्राणास मुळीच भय नसते. खरें तर, प्राणास जन्म-मरणाचेही भय नसते.॥२०॥ त्याचप्रमाणें, तुमच्या या समृद्धीचे, ऐहिक वैभवाचे रक्षण होण्यासाठी या पुण्यरूप औषधीचे सेवन करणे जरुरी आहे.॥२१॥ अशी संपन्नता हे जर शरीर मानल्यास अनाचार अर्थात दुष्कृत्यें म्हणजे त्या शरीरास होणारे रोग आहेत. त्या व्याधींचा समूळ नायनाट केवळ ही पुण्यरूप औषधीं घेतली असता होईल.॥२२॥ म्हणूनच लोकहो, कुठल्याही शंका मनांत ना आणता या पुण्यसंचयाची ही पर्वणी साधून घ्या. हे पुण्यबीज या भूमीत पेरा, आणि सहस्रपटींनी ही  आपली संपत्ती वृद्धिंगत करा.॥२३॥ कुठलेही बीज जर खडकावर पेरले, तर ते निःसंशय वाया जाते. त्या खडकावर ते बीज कधीच अंकुरित होऊ शकत नाही, हे अवश्य लक्षात घ्यावें.॥२४॥ त्याचप्रमाणें, कुकर्मे, दुष्ट वासना यांही खडकांप्रमाणेच असतात. तेथे जर बीज पेरले, तर शंकारूपी किडे-पांखरें ते सर्व बीज खातात.॥२५॥ थोर संतांच्या सेवेइतकें इतर दुसरें कुठलेही पुण्यकर्म नाही. आणि स्वामी गजानन हे तर सर्व संतांचे मुगुटमणी आहेत.॥२६॥ संतकार्यासाठी काही दान केले असता त्याचे अगणित पटींनी फळ मिळते. जमिनीत एखादे बीज पेरले तरी त्यापासून अनेक कणसें निर्माण होतात.॥२७॥ त्या कणसांचे असंख्य दाणे हे केवळ एका बीजापासून तयार झालेले असतात. सज्जनहो, पुण्याचेही अगदी त्याचप्रमाणे आहे, हे कधीही विसरू नका.॥२८॥ हे बोलणें ऐकून कुत्सित खरोखरच निरुत्तर झाले. जिथे परमसत्य असे श्रेष्ठ तत्त्व असते, तिथे तर्कास मुळीच वाव नसतो.॥२९॥ कुशल, चतुर नेता असल्यावर वर्गणी विपुल प्रमाणात गोळा होते. एखाद्या क्षुल्लक व्यक्तीकडून मात्र हे वर्गणीचे कार्य सफल होणे शक्य नाही.॥३०॥ असो. मंजूर झालेल्या जागेवर कोट बांधण्याचे कार्य त्वरेनें सुरु झाले. सर्व शेगांववासी झटू लागल्यावर कशाची कमी पडणार ?॥३१॥ शेगांवी हे कोटाचे बांधकाम सुरु असतांना दगड, चुना, रेती आदि सामान गाड्यांतून आणले जात होते.॥३२॥ त्यावेळी समर्थांची स्वारी जुन्या मठातच वास्तव्यास होती. एकदा, त्यांच्या मनांत एक विचार आला.॥३३॥ आपण स्वतः तिथे बसल्याशिवाय मठाचे बांधकाम झपाट्यानें होणार नाही. असा विचार करून समर्थांनी काय केले ते श्रोतेहो, तुम्ही आता ऐका.॥३४॥ तिथेच असलेल्या एका रेतीच्या गाडीवर समर्थ जाऊन बसले. त्या गाडीचा वाहक, गाडीवान महार होता, तो पटकन त्या गाडीवरून खाली उतरला.॥३५॥ ते पाहून महाराज त्याला म्हणाले, " का रे बाबा, तू खाली उतरलास ? आम्ही परमहंस आहोत, आम्हांस विटाळ वगैरेंची बाधा होत नाही.॥३६॥ त्यावर तो महार म्हणाला, " महाराज, या गाडीवर तुमच्या शेजारी बसणे हे मला काही योग्य वाटत नाही.॥३७॥ मारुतीराया रामभक्ती करून रामस्वरूपास प्राप्त झाला, पण तो कधीच श्रीरामांच्या शेजारी बसला नाही. तर तो नेहेमीच श्रीरामांपुढे आपले दोन्ही हात जोडून एखाद्या दासाप्रमाणे उभा राहिला."॥३८॥ ( त्यावर महाराज हसत बोलले,) बरें बापा ! जशी तुझी इच्छा. माझी त्यास काहीच हरकत नाही. बैलांनो, तुम्ही आता तुमच्या गाडीवाल्याच्या मागोमाग नीट चला.॥३९॥ समर्थांच्या आज्ञेचे बैलांनीही पालन केले. गाडीवान त्यांना हाकत नसला तरी मार्गांत कुठेही न बुजता, ते बांधकामाच्या ठिकाणीं अगदी व्यवस्थित आले.॥४०॥ मग समर्थ गाडीवरून खाली उतरले आणि त्या जागेच्या मध्यभागीं येऊन बसले. त्याच ठिकाणीं, त्यांची भव्य समाधी बांधली गेली.॥४१॥ ही जागा सर्व्हे क्रमांक सातशेमध्यें असून भूखंड क्रमांक त्रेचाळीस आणि पंचेचाळीस यांचा त्यांत समावेश आहे.॥४२॥ महाराज येऊन ज्या ठिकाणी बसले, तीच जागा मध्यभागीं यावी असे बांधकाम कारभाऱ्यांना वाटले. त्याकरिता, त्या  कुशल कारभाऱ्यांनी त्या दोन क्रमांकाच्या भूखंडातून थोडी जागा घेऊन मठाचा मध्य साधला.॥४३-४४॥ सध्या केवळ एक एकर जमीन मंजूर झाली होती, त्यामुळे समाधीमध्य साधण्यासाठी बांधकाम करतांना जागा थोडी कमी पडली.॥४५॥ मात्र मध्य म्हणून तीच जागा निश्चित झाल्यानें मंजूर झालेल्या जागेपेक्षा अकरा गुंठे जागा जास्त घेतली आणि त्यावर त्या कारभाऱ्यांनी बांधकाम केले.॥४६॥ जागा व्यवस्थित विकसित केल्यास, तुम्हांला आणखी एक एकर जागा मंजूर करून देऊ, असे अधिकार्‍यांनीं पुढारी मंडळींना वचन दिले होते. म्हणूनच, हे अकरा गुंठे जास्त जागा घेऊन त्यावर बांधकाम करण्याचे त्यांनी धाडस केले. मात्र, एका दुर्जनाने हे वृत्त अधिकाऱ्यांस कळविल्याने हे प्रकरण विकोपास गेले.॥४७-४८॥ त्यांमुळे, पुढारी मंडळीं थोडी चिंताग्रस्त झाली. त्या नेते मंडळीतील, हरी पाटील यांनी समर्थांना प्रार्थना केली, " महाराज, या अकरा गुंठे जास्त घेतलेल्या जागेचा तपास करण्यासाठी एक जोशी नामक अधिकारी येणार आहे."॥४९-५०॥ तेव्हा, या जागेबद्दल जो काही तुम्हांस दंड झाला आहे, तो अवश्य माफ होईल. तुम्ही निश्चिन्त राहा, अशी समर्थांनी हसत हरी पाटलाला ग्वाही दिली.॥५१॥ श्री समर्थांनीं प्रेरणा दिल्यानें, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या त्या जोशी नामक अधिकाऱ्याने असा अहवाल सादर केला -॥५२॥ गजानन संस्थेला हा जो काही दंड आकारला गेला आहे, तो योग्य नव्हे. यास्तव, हा दंड त्यांना परत द्यावा.॥५३॥ मी स्वतः शेगांवांत जाऊन सर्वथा चौकशी करून आलो आहे. या प्रकाराबद्दल हा जो काही दंड सुनावला गेला आहे, तो उचित नाही.॥५४॥ तेव्हा, हा दंड त्वरित माफ करण्यात यावा, असा त्याने हुकूम दिला. हे जेव्हा हरी पाटलाला कळलें, तेव्हा त्याला फार आनंद झाला.॥५५॥ आणि तो म्हणू लागला - समर्थांचे वचन कधीच खोटें होत नाही. माझ्यावर नुकतेच एक अरिष्ट आले होते, त्यात एका महाराने माझ्यावर खोटें आरोप केले होते.॥५६॥ त्यावेळी, मी महाराजांना साकडे घातले असता त्यांनी मला आश्वस्त केले होते की तू मुळीच घाबरू नकोस. तुझ्या एका केसालादेखील या संकटाचा धक्का बसणार नाही.॥५७॥ आणि अखेर समर्थवचनाप्रमाणेच सारे काही घडून आले. आजही अगदी तसाच प्रकार पुन्हा घडला आहे.॥५८॥ समर्थांचे बोल खोटें झाले आहेत, हे आजवर कधीच कोणीही ऐकले नाही. असो. शेगांवांतील सर्व लोक स्वामींच्या भक्तीत रंगून गेले.॥५९॥ आतां, नव्या जागी मठ स्थापन झाल्यावर तिथे कुठल्या घटना अर्थात समर्थांचे काय काय चमत्कार झाले, हे मी कथन करतो.॥६०॥ मेहेकरच्या जवळ सवडद नामक गांव आहे. तेथील गंगाभारती गोसावी नावाचा एक ग्रामस्थ या नवीन मठांत आला.॥६१॥ त्याला महारोग झाला होता. त्यामुळे, त्याचे अवघे अंग कुजून गेले होते आणि दोन्ही पायांना जागोजागी भेगा पडल्या होत्या.॥६२॥ त्याच्या शरीरावरील सर्व त्वचा लालसर झाली होती आणि सारी बोटें झडून गेली होती. कानाच्या पाळ्या सुजल्या होत्या आणि सर्वांगास दुर्गंधी येत होती.॥६३॥ अशा त्या महारोगामुळे गंगाभारती अतिशय त्रासला होता. त्याच्या कानी समर्थांची कीर्ति आली, अन तो शेगांवास आला.॥६४॥ श्रोते हो, त्या महारोगग्रस्त गोसाव्याला सर्व लोक अडवू लागले आणि बोलू लागले, " तुला रक्तपिती आहे, तेव्हा तू महाराजांच्या दर्शनासाठी जवळ जाऊ नकोस.॥६५॥ महाराज दिसतील अशा ठिकाणी तू उभा राहा आणि दुरूनच त्यांचे दर्शन घेत जा. त्यांचे चरण धरण्यासाठी कधीही तू त्यांच्या समीप जाऊ नकोस.॥६६॥ हा रोग अतिशय स्पर्शजन्य आहे, असे सर्व वैद्य आणि डॉक्टर सांगतात. तेव्हा ही गोष्ट तू अवश्य लक्षांत ठेव.॥६७॥ मात्र एके दिवशी, गंगाभारती तिथे असलेल्या सर्व लोकांची नजर चुकवून ( कोणाला काही कळायच्या आत ) अतिशय त्वरेनें समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आला.॥६८॥ आणि त्याने समर्थांच्या चरणांवर आपले मस्तक ठेविले. लोकहो, त्याच क्षणीं महाराजांनी त्याच्या डोक्यावर अति जोरानें एक चापट मारली.॥६९॥ त्यामुळें गोंधळलेला गंगाभारती उभा राहिला, अन समर्थांना न्याहाळू लागला. तोच, स्वामी आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या थोबाडीत मारली.॥७०॥ त्याला अनेक मुस्काटांत तर मारल्याच, शिवाय आणिक एक लाथही मारली. पुढे, महाराज खाकरले आणि आपला बेडका त्याच्या अंगावर थुंकले.॥७१॥ आपल्या अंगावर पडलेल्या या बेडक्यास गंगाभारतीने समर्थांचा पावन प्रसाद मानला.॥७२॥ तो आपल्या हातात घेऊन एखाद्या मलमाप्रमाणे सर्वांगास चोळू लागला.॥७३॥ हा सर्व प्रकार तिथेच असलेला एक टवाळ पाहत होता. तो गोसाव्यास बोलू लागला. -॥७४॥ अरे बापा, आधीच तुझे हे रोगग्रस्त शरीर नासले आहे. आणि वर महाराज हा अमंगळ बेडका तुझ्या अंगावर थुंकले.॥७५॥ जो तू प्रसाद मानून अवघ्या शरीरास चोळला. तू आधी साबण लावून तुझे अंग स्वच्छ धुवून टाक.॥७६॥ हे असे वेडे पीर या भूमीवर भ्रमण करू लागतात. काही अंधश्रद्धाळू लोक त्यांना संत-साधू मानू लागतात.॥७७॥ अर्थातच त्याचा परिणाम विपरीत होऊन असंख्य धर्मबाह्य कृत्ये घडली जातात. त्यांमुळे, या समाजाची अधोगती होते.॥७८॥ आता, तुझेच उदाहरण घे ना ! तू तज्ञ वैद्यांकडून औषध न घेता या वेडयापिशाकडे धावत आलास.॥७९॥ त्याचे हे कुत्सित बोलणें ऐकून गोसाव्यास हसू आले आणि तो म्हणाला," अरे, तुम्ही इथेच तर चुकता. थोडा विचार केल्यास सर्व प्रकार ध्यानांत येईल.॥८०॥ संतपुरुषाच्या ठायीं अमंगल, अपवित्र असे किंचितही राहत नाही, हे निश्चित ! जिथे कस्तुरी असते, तिथे दुर्गंधी कधीही असू शकत नाही.॥८१॥ तुला हा जरी साधारण बेडका दिसत असला तरी प्रत्यक्षात हे गुणकारी मलम आहे. तसेच, याला कस्तुरीप्रमाणे सुवास येत आहे.॥८२॥ तुझ्या मनी संशय असल्यास, माझ्या अंगास तू हात लावून पाहू शकतोस. मग तुला खरा प्रकार ध्यानात येईल.॥८३॥ या बेडक्यात थुंकी नावालाही नाही. ही सर्वथैव औषधी आहे, हे निश्चित ! कुठल्याही बेडक्यास मलम मानण्याइतका मी काही वेडा नाही.॥८४॥ तुझा समर्थचरणीं भाव नसल्यामुळे तुला हा केवळ बेडकाच दिसला. समर्थांची थोरवी तू मुळी जाणलीच नाही.॥८५॥ तुला जर याची खात्रीच करावयाची असेल, तर आतां उगाच वेळ घालवू नकोस. समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तिथे माझ्यासोबत एकदाच चल.॥८६॥ प्रतिदिवशी समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तेथील ओली माती मी माझ्या सर्वांगास लावतो.॥८७॥ असे आपापसांत बोलून, ते दोघेही स्वामींच्या स्नान करावयाच्या स्थळीं गेले. तो काय आश्चर्य ! त्या कुत्सितास अगदी गोसाव्याने कथन केल्याप्रमाणेच अनुभव आला.॥८८॥ महाराजांच्या स्नानस्थळाची माती त्या दोघांनीही आपल्या हाती घेतली खरीं ! मात्र गोसाव्याच्या हातात असलेली माती औषधी होऊन बसली.॥८९॥ त्या टवाळखोर मनुष्याच्या हातात मात्र केवळ ओली मातीच आली अन तिला किंचित्‌ दुर्गंधीही येत होती.॥९०॥ हा अनुभव घेतल्यावर मात्र तो कुटाळ विलक्षण गोंधळून गेला आणि आपल्या सर्व कुत्सित वल्गना सोडून समर्थांना अनन्यभावाने शरण गेला.॥९१॥ असो. या महारोगी गोसाव्यास कुणीही जवळ बसू देत नव्हते. त्यांमुळे, हा सर्वांपासून कुठेतरी दूर बसून स्वामींपुढे भजन करीत असे.॥९२॥ गंगाभारतीचा आवाज पहाडी, सुमधुर, सुरेल तर होताच, तसेच त्याला गायनकलेचे विशेष ज्ञानही होते.॥९३॥ असेच पंधरा दिवस गेले आणि चमत्कार झाला. त्या गंगाभारतीच्या रोगाचे स्वरूपच पालटलें. त्याच्या सर्वांगाचा लालसरपणा हळूहळू जाऊ लागला.॥९४॥ सर्व भेगा भरून यायला लागल्या आणि त्याचे हात-पाय पूर्ववत झाले. श्रोतेहो, त्याच्या तनूस येणारी दुर्गंधीही पूर्णतः दूर झाली.॥९५॥ त्या गोसाव्याने अत्यंत भक्तिभावाने केलेले ते भजन ऐकून समर्थ प्रसन्न होत असत. प्रत्येक जीवमात्रांस गायन हे आवडतेच.॥९६॥ गंगाभारतीची अनसूया नामक पत्नी आपल्या पतीस परत घरी घेऊन जाण्यासाठी शेगांवीं आली.॥९७॥ त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा पुत्र संतोषभारती हादेखील आला होता. " आपण आता आपल्या गांवी परतावे. (श्री गजानन महाराजांच्या कृपेनें) तुमची सर्व व्याधी आता बरी झाली आहे, हे मी स्वतः बघितले. समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी आहेत, हे सर्वथा सत्य आहे." अशी तिने तिच्या पतीस हात जोडून विनवणी केली.॥९८-९९॥ " बाबा, तुम्ही गजानन महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या गांवी चला. इथे शेगांवात राहणे आता पुरे झाले." असा मुलगाही आपल्या पित्यास तसेच आग्रह करू लागला.॥१००॥ त्यावर गंगाभारती त्या दोघांना म्हणाला," तुम्ही मला अशी हात जोडून विनवणी करू नका. आजपासून मी खचितच तुमचा आप्तेष्ट नाही.॥१०१॥ ही जी अनाथांची माऊली अर्थातच आपले स्वामी गजानन महाराज जे इथे वास करतात, त्यांनी चापट मारून माझी धुंदी उतरवली, मला वास्तवाची जाणीव करून दिली.॥१०२॥ अंगाला राख फासली आहे, परंतु तुझें सारें चित्त मात्र संसारातच गुंतले आहे. संन्यासी म्हणून हे जे भगवे वस्त्र धारण केले आहेस, त्याची तू अशा रीतीनें अवलेहना केलीस.॥१०३॥ असे सांकेतिक शब्दांत मला समजाविले अन थापट्या मारून सत्याची जाणीव करून दिली. आता, माझे डोळे उघडले आहेत. या संसाराचा मला पुन्हा संबंध नको.॥१०४॥ अरे संतोषभारती बाळा, तू आता इथे न थांबता तुझ्या आईस घरीं घेऊन जा. तुम्ही दोघांनीही सत्वर सवडद ग्रामीं परत जावे.॥१०५॥ ही तुझी माता आहे. तिची तू अखेरपर्यंत सेवा कर. तिला तुझ्यापासून दूर करू नकोस.॥१०६॥ मातापित्यांची सेवा करणारा श्रीहरीस अत्यंत प्रिय असतो. पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर्श नेहेमी आपल्यापुढे ठेवावा.॥१०७॥ मी सवडदला परत आल्यास पुन्हा पूर्ववत रोगग्रस्त होईन. म्हणून तुम्ही दोघांनीही मला घरी येण्याचा आग्रह करू नका.॥१०८॥ आजपर्यंत तुमच्यासाठी सर्व काही केले. आतां मात्र परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. या मिळालेल्या नरजन्माचा काहीतरी उपयोग करून घेतो.॥१०९॥ आतापर्यंत संसारात केवळ रमल्यामुळें हा नरजन्म वायाच गेला म्हणायचा. या संसृतीचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराजांनी मला दाखविला आहे, त्यामुळे हा चौर्‍यांशींचा फेरा सहजच चुकेल.॥११०॥ मला ही विरक्ती केवळ समर्थांच्या कृपेने आली आहे. या परमार्थरूपी खिरीमध्ये तुम्ही ही मोह-मायेची माती टाकू नका रे !"॥१११॥ अशा प्रकारे गंगाभारतीने आपल्या कुटुंबीयांची समजूत काढली आणि पत्नीला मुलासह सवडदाला परत पाठविले. तो स्वतः मात्र समर्थचरणीं शेगांवातच राहिला.॥११२॥ समर्थांची स्तुती-भक्तीपर अनेक पदें तो अत्यंत तन्मयतेने म्हणत असे. श्रोतेहो, त्याला गायन कलेचे विशेष ज्ञान होतेच.॥११३॥ दररोज सायंकाळी तो एकतारा घेऊन समर्थांच्या जवळ बसत असे आणि भजन-गायन करीत असे.॥११४॥ त्याचे ते भक्तिरसपूर्ण स्वरांतील भजन ऐकून सर्वच भक्तजनांचे मन हर्षित होत असे. सुस्वर गायन सर्वांनाच अपार सुख-समाधान देते.॥११५॥ या गंगाभारतीचा रोग समूळ नष्ट झाला आणि तो पूर्ववत निरोगी झाला. पुढें, श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचे पालन करीत तो मलकापुरास गेला.॥११६॥ असो. एकदा पौष महिन्यांत झ्यामसिंग शेगांवी आला आणि समर्थांना त्याने, " आपण माझ्या गांवी यावे." अशी प्रार्थना केली.॥११७॥ मागें मी माझ्या अडगांव येथील भाच्याच्या घरीं चलावे, असे आपणास विनविले होते. तेव्हा हे समर्था तुम्ही मला वचन दिले होते की मी काही दिवसांनंतर नक्की तुझ्या गृहीं येईल. मात्र आतां तू मला आग्रह करू नये.॥११८-११९॥ त्या घटनेला आता बरेच दिवस होऊन गेले आहेत. तेव्हा, हे दयाळा तुम्ही आता मुंडगांवीं माझ्या घरी यावे. मीही आपला भक्त आहे, म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करावी.॥१२०॥ माझ्या गृहीं, मुंडगांवी आपण काही दिवस वास करावा. मी तिथें अवघीं सिद्धता, तजवीज करून आपणांस घेऊन जाण्यास आलो आहे.॥१२१॥ तेव्हा, साधुवर्य गजानन झ्यामसिंगासह मुंडगांवी आले. त्या थोर सत्पुरुषाचे दर्शन घेण्यासाठी भाविक स्त्री-पुरुषांची अनिवार गर्दी लोटली. त्या आनंद सोहळ्याचे वर्णन करणे, सर्वथा अशक्य आहे.॥१२२॥ त्यावेळी, झ्यामसिंगाने फार मोठा भंडारा घातला. गोदावरीच्या तीरावर वसलेले ते मुंडगांव जणू दुसरे पैठणच भासू लागले.॥१२३॥ पैठणनगरीत जसे थोर संत एकनाथ प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे मुंडगांवीं श्री गजानन महाराज (शोभू लागले.) भजनी मंडळींच्या अनेक दिंड्या तिथे भजन करण्यासाठी आल्या.॥१२४॥ आचारी भंडाऱ्याचा महाप्रसाद करण्यासाठी स्वयंपाक करू लागले. अर्ध्याहून अधिक पाकसिद्धी झालीही अन तेव्हाच महाराज झ्यामसिंगास म्हणाले, " अरे झ्यामसिंगा, आज चतुर्दशी आहे. ही रिक्त तिथी समजली जाते. या भंडाऱ्याच्या प्रसादाच्या पंक्ती पौर्णिमेला ( म्हणजेच उद्या ) होऊ दे."॥१२५-१२६॥ त्यावर झ्यामसिंग म्हणाला, " महाराज, सर्व स्वयंपाक तयार तर झालेला आहे. शिवाय आपला प्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकही इथे जमले आहेत."॥१२७॥ ( ते बोलणे ऐकून ) स्वामी उत्तरले," व्यवहारदृष्टीने केलेले तुझे हे बोलणें सर्वथा योग्य आहे खरें ! मात्र हे असे होणे त्या जगदीश्वराला मान्य नाही. झ्यामसिंगा, लोकांस हा अन्नप्रसाद मिळेल असे वाटत नाही. तुम्हां प्रापंचिक लोकांना आपण ठरवल्याप्रमाणेच सर्व घडावे असे वाटते.॥१२८-१२९॥ पुढें, भोजनाच्या पंक्ती बसल्यावर एकाएकी आकाश ढगांनी भरून आले आणि मेघांचा कडकडाट सुरु झाला.॥१३०॥ वीजाही चमकू लागल्या, सोसाट्याचा झंझावात सुटला. त्या वाऱ्याच्या जोराने जंगलातील झाडे उन्मळून पडू लागली.॥१३१॥ काही क्षणांतच सगळीकडे पाणीच पाणी झाले, आणि प्रसादाचे ते सर्व अन्न वाया गेले. हे पाहून झ्यामसिंगाने महाराजांस अशी प्रार्थना केली - महाराज, आता उद्यां तरी आजच्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती न येवो. गुरुराया, इथे जमलेल्या अवघ्या मंडळींची (घडलेल्या प्रकारामुळे) पार निराशा झाली आहे.॥१३२-१३३॥ या पर्जन्याचे संकट आता दूर करा. सध्या तर पावसाळ्याचाही काळ नाही, अवकाळी आलेल्या या पावसाने आमचे नुकसानच होईल.॥१३४॥ अवेळी हा असा पाऊस पडला तर शेतातील पिकांचा सर्वनाश होईल. अन मग सर्व लोक मलाच दोष देत बोलतील, हा भंडारा घालून झ्यासिंगाने चांगलेच पुण्यकार्य केले, ज्यांमुळे आमचे तर नुकसान झाले. पुण्यकर्म करण्याची ही कुठली पद्धत ?॥१३५-१३६॥ त्याचे ते बोलणे ऐकून महाराज आश्वासक स्वरांत म्हणाले, " झ्यामसिंगा, असा चिंतीत होऊ नकोस. उद्या हा पाऊस तुझे काहीच नुकसान करणार नाही.॥१३७॥ मी आताच हे पर्जन्याचे संकट दूर करतो, असे म्हणत पुण्यपुरुष गजानन महाराज आकाशाकडे ( दिव्यदृष्टीने ) पाहू लागले. तो काय आश्चर्य ! आभाळ क्षणांत निरभ्र झाले.॥१३८॥ आकाशातील काळे मेघ दूर गेले आणि ( सूर्यनारायणाचे दर्शन होऊन ) सगळीकडे लख्ख ऊन पडले. हा चमत्कार अवघ्या एका क्षणांत झाला. खरोखर संतांचे सामर्थ्य अगाध असते.॥१३९॥ मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला तो भंडारा मोठ्या उत्साहांत साजरा झाला. श्रोतेहो, त्या मुंडगांवीं अजूनही नित्यनियमाने हा भंडारा साजरा केला जातो.॥१४०॥ ( महाराजांच्या त्या सद्भक्ताने ) झ्यामसिंगाने मुंडगांवांत असलेली त्याची सर्व मालमत्ता श्री गजानन महाराजांच्या चरणीं अर्पण केली.॥१४१॥श्रोतेहो, त्या मुंडगांवात समर्थांचे अनेक भक्त रहात होते. त्यापैकी एक होता पुंडलीक भोकरे, या तरुण मुलाची समर्थ चरणीं दृढ श्रद्धा होती.॥१४२॥ हा उकिरड्या नामक कुणब्याचा एकुलता एक, तरुण मुलगा होता. तो महाराजांचा निस्सीम भक्त होता.॥१४३॥ लोकहो, वऱ्हाडप्रांती जर मूल जगत, वाचत नसेल तर नवस बोलून नवजात शिशूचे हे उकीर्डा असे नाव ठेवतात. या प्रांतात तसा रिवाज आहे.॥१४४॥ जसा तेलंगणा प्रांतात पेंटय्या, महाराष्ट्रांत केर-पुंजा अशी नांवे ठेवण्याचा प्रघात आहे. त्याच रितीनुसार, वऱ्हाडांत उकीर्डा असे बालकाचे नाव ठेवतात.॥१४५॥ हा पुंडलीक वद्य पक्षांत नित्यनियमाने शेगांवींची वारी करीत असे. अशाप्रकारे, ( दर पंधरा दिवसांनी ) नित्य समर्थांच्या दर्शनास येत असे.॥१४६॥ ( पांडुरंगभक्त ) वारकरी लोक ज्याप्रमाणें इंद्रायणीं नदीच्या तीरावर वसलेल्या देहू-आळंदी इथे प्रत्येक वद्य पक्षांत ( ज्ञानेश्वर-तुकोबा माऊलींच्या ) दर्शनासाठी जातात. अगदी त्याचप्रमाणें, हा वऱ्हाडांतील भक्त दर वद्य पक्षांत शेगांवांत येऊन गजानन महाराजांचे अत्यंत भक्तिभावानें दर्शन घेत असे.॥१४७-१४८॥ असो. एकदा वऱ्हाडात ग्रंथिक ज्वराच्या रोगाची साथ पसरली. त्यांपासून वाचण्यासाठी गावकरी गांव सोडून जाऊ लागले.॥१४९॥ या तापाची लक्षणें अशी होती की हा संसर्ग झालेल्या मनुष्यास प्रथम थंडी वाजते. तापाने अंगही तापते आणि डोळेही अत्यंत लालबुंद होतात.॥१५०॥ तसेच, कुठल्याही सांध्याच्या स्थानी ग्रंथी म्हणजे गाठ उठते. अशी गाठ येताच वातदोष प्रचंड वाढतो.॥१५१॥ त्यांमुळे, रोग्याला शुद्ध राहत नाही आणि तो असबंद्ध बडबड करू लागतो. शरीराची लाहीलाही होऊन बेशुद्धही पडतो.॥१५२॥ असा हा अत्यंत विपरीत रोग पूर्वी भारतखंडात नव्हता. तर युरोपांत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता.॥१५३॥ तेथील साथ इकडे आली आणि गांवोगांवी पसरली. त्या भयंकर साथीपासून वाचण्यासाठी लोक घरेंदारें सोडून दूर वनांत जाऊन राहू लागले.॥१५४॥ त्या दुर्धर साथीचा संसर्ग मुंडगांवातही होऊ लागला. त्याच दरम्यान, पुंडलीकाच्या वारी आली आणि तो शेगांवास निघाला.॥१५५॥ घरी असतांनाच त्याला थोडीफार कणकण जाणवू लागली होती, पण त्याने त्याबद्दल कुणालाच सांगितले नाही. नित्य शेगांवची वारी करण्यासाठी तो त्याच्या वडिलांसोबत निघाला.॥१५६॥ साधारण पाच कोस अंतर चालून झाल्यावर त्याला बराच जोराचा ताप आला आणि थकव्यामुळे त्याला एक पाऊलदेखील चालवेना.॥१५७॥ त्याच्या काखेत एक गाठही आली आणि त्याला अशक्तपणा जाणवू लागला. त्याची ही अवस्था पाहून त्याचे वडील त्यास विचारू लागले, " बाळा पुंडलीका,  असे का करतो आहेस ? तू ठीक आहेस ना?" ॥१५८॥ त्यावर पुंडलीक त्याच्या वडिलांना म्हणाला, " बाबा, मला ताप आला आहे आणि कांखेत एक गोळाही उठला आहे.॥१५९॥ माझी सर्व शक्ती क्षीण होऊन मी अगदी गळून गेलो आहे. आतां मला अजिबात चालवत नाही. माझे दुर्दैव पहा कसे माझ्या वारीच्या आड आले आहे अन आता माझी ही वारी कशी पूर्ण होणार ?॥१६०॥ हे स्वामी दयाघना, माझ्या वारीत खंड पाडू नकोस. तू भक्तवत्सल, कृपानिधी आहेस, तुझ्या दिव्य चरणांचे दर्शन मला होऊ दे.॥१६१॥ माझ्या वारीची सांगता झाल्यानंतर मला खुशाल ताप येऊ दे अथवा माझे शरीर पडू दे. मला त्याची किंचितही पर्वा नाही.॥१६२॥ हे गुरुराया, ही वारी हाच माझा पुण्यठेवा आहे. मात्र ही साथ एखाद्या वैऱ्याप्रमाणे या माझ्या वारीचा नाश करू पाहत आहे. तेव्हा, या संकटापासून तिचे रक्षण करा. ( माझी वारी निर्विघ्नपणें पार पडू द्या. ) ॥१६३॥ शरीरात शक्ती असेल तरच परमार्थ यथार्थ घडतो. मुलाची अशी अतीव कष्टदायक अवस्था पाहून पुंडलीकाचे वडीलही अत्यंत चिंतातुर झाले.॥१६४॥ त्या पित्यास अश्रू अनावर झाले आणि तो परमेश्वरचरणीं प्रार्थना करू लागला, " देवा, हा माझा एकुलता एक पुत्र आहे. माझ्या वंशाचा हा दिवा तू हिरावू नकोस." ॥१६५॥ तेव्हा उकीर्डा आपल्या मुलास म्हणाला," बाळा, आता तुला बसावयास एखादी गाडी अथवा घोडे पाहू का ?" ॥१६६॥ त्यावर पुंडलीक म्हणाला," माझी ही वारी पायीच पूर्ण झाली पाहिजे. मी आता उठत-बसत, हळूहळू जमेल तसे शेगांवास जाण्याचा प्रयत्न करतो.॥१६७॥ मार्गांत जरी मला मृत्यू आल्यास तरी माझे शव तरी तुम्ही शेगांवास न्या. ( हीच माझी शेवटची इच्छा आहे.) आणि तुम्ही मुळीच शोक करू नका, हेच माझे सांगणे आहे.॥१६८॥ अशा प्रकारे, कसातरी बसत-उठत मोठ्या कष्टाने पुंडलीक शेगांवला आला आणि आपल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्याने मोठ्या भक्तिभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला.॥१६९॥ तोच समर्थांनी एक अदभूत लीला केली. त्यांची स्वतःची काख त्यांनी एका हाताने जोर लावून दाबली.॥१७०॥ आणि पुंडलीकास प्रेमपूर्वक म्हणाले, " तुझे गंडांतर आता पूर्ण टळले आहे. तू यत्किंचितही काळजी करू नकोस." ॥१७१॥ महाराजांनी हे उद्गार काढता क्षणीच पुंडलीकाच्या काखेतील गाठ जगाच्या जागीच विरून गेली आणि त्याचा तापही तात्काळ उतरला.॥१७२॥ अशक्तततेने त्याच्या शरीराला थोडासा कंप मात्र राहिला होता. तेव्हा, समर्थांसाठी पुंडलीकाच्या आईने नैवेद्य वाढून आणला.॥१७३॥ त्या नैवेद्याचे दोन घास समर्थांनी खाल्ले आणि तत्क्षणीच पुंडलीकाच्या शरीराचे कांपरें बंद झाले.॥१७४॥ पुंडलीक अगदी पूर्ववत आरोग्यवंत झाला, केवळ थोडासा अशक्तपणा राहिला. गुरुभक्तीचेच हे खरोखर फळ त्याला मिळाले. शंकेखोर मनुष्यांनी याचा जरूर विचार करावा.॥१७५॥ साक्षात्कारी गुरुची श्रद्धेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. कामधेनू तुमच्या घरीं असेल तर तुमच्या सर्व इच्छा का नाही पूर्ण होणार ?॥१७६॥ वारीची सांगता करून पुंडलीक मुंडगांवला परतला. हे चरित्र जो मनोभावें वाचेल त्याचे गंडांतर गुरुकृपेने अवश्य टळेल.॥१७७॥ हे संतचरित्र म्हणजे कपोलकल्पित कहाणी नव्हें, तर ही भक्तांच्या सत्य अनुभवांची खाण आहे. या संतकथेविषयीं मनांत थोडाही अविश्वास आणू नका.॥१७८॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ भाविकांस कल्याणप्रद होवो, हेच परमेश्वराजवळ मागणे ! ॥१७९॥
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोSध्यायः समाप्तः ॥  
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 12, 2025

श्रीगजानन महाराज मालामंत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या  सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करत त्यांचे जीवन कृतार्थ करतात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. अर्थात ' सदाचाररत सद्‌भक्ता । फळ लाभे बघता बघता ॥' हे मात्र भाविकांनी अवश्य लक्षांत ठेवावे.

या ब्रह्माण्डनायकाचा मालामंत्रही प्रभावी असून, त्याचे श्रद्धापूर्वक पठण केल्यास भाविकांना तात्काळ श्रीगजाननकृपेची अनुभूती येते.      ॐ इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदम् । समूळ्हमस्य पांसुरे ॥  भावार्थ : ऋषि दयानन्द यांनी या ऋचाचा अर्थ थोडक्यांत असा सांगितला आहे, “यो वेवेष्टि व्याप्नोति चराचरं जगत् स विष्णु:” अर्थात् या चराचर जगतामध्ये जो विद्यमान, व्यापक परमात्मा आहे, तोच हा श्रीहरी विष्णु आहे.  त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः । अतो धर्माणि धारयन् ॥ भावार्थ : त्या वामन बटूरूपी श्रीहरी परमात्म्यानेच आकाशातील त्रिपादव्याप्त स्थानांत त्रैलोक्य निर्माण केले आणि तिथे तो धर्मरूपाने सर्वदा स्थित आहे.    तद्‌विष्णोः परमं पदं सदा पश्यंति सूरयः । दिवीव चक्षुराततम् ॥  भावार्थ : ज्याप्रमाणे आपण सामान्य चक्षूंनी आकाशातील सूर्यनारायण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्याचप्रमाणे ऋषीमुनी-योगीजन-संत-महात्मे त्यांच्या दिव्य ज्ञानचक्षूंनी श्रीविष्णूंच्या श्रेष्ठस्थानास सहज पाहू शकतात अर्थात परमेश्वराच्या चरणीं म्हणजेच परमपदांस प्राप्त होतात.   ॐ नमो भगवते गजाननाय दर्शनमात्रदुःखदहनाय विदेहदेहदिगम्बराय आनंदकंदसच्चिदानंदाय परमहंसाय अवधूताय मनोवांच्छितफलप्रदाय अयोनिसंभवमहासिद्धाय ॥ "गण गण गणात बोते” महामंत्राय । सर्वमंत्रयंत्रतंत्रस्वरुपाय । सर्वसम्पुटपल्लवस्वरुपाय । ॐ नमो महापुरुषाय स्वाहा ( नमः ) ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥