Oct 25, 2021

दत्त दिगंबर दैवत माझे


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


दत्त दिगंबर दैवत माझे l हृदयी माझ्या नित्य विराजे ॥धृ.

अनसूयेचे सत्त्व आगळे l तिन्ही देवही झाली बाळें l त्रैमूर्ती अवतार मनोहर l दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे ॥१ तीन शिरे, कर सहा शोभती l हास्य मधुर शुभ वदनावरती l जटाजूट शिरी, पायी खडावा l भस्मविलेपित कांती साजे ॥२ पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती l आनंदाचे आसू झरती l सारे सात्विक भाव उमलती l हळूहळू सरते मीपण माझे ॥३


गीतकार : सुधांशु

गायक, संगीतकार : आर.एन.पराडकर



Oct 19, 2021

श्री महालक्ष्मी-अष्टकं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ इन्द्र उवाच ॥

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥१॥ नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि । सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥२॥ सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि । सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥३॥ सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि । मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥४॥ आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरी । योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥५॥ स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे । महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥६॥ पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि । परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥७॥ श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते । जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥८॥ महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥ एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥ त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥ इतीन्द्रकृतं श्रीमहालक्ष्म्यष्टकम् संपूर्णम् ॥


Oct 7, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ५


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

शालिवाहन शके अठराशें, बहुधान्य नामक सवंत्सरी चैत्र कृ. त्रयोदशीस मंगळवारी पूर्णब्रह्म सगुणमूर्ती कैवल्य पूर्णावतारी निजानंदी निमग्न झाले. ' शुद्ध स्वस्तिकासन घालोनि । संपूर्ण जनांसि सौख्याशीर्वचनी । परमानंदरूपी संतोषवोनि । स्वरूपीं समाधिस्थ जहाले ॥' लौकिक प्रपंचदृष्टीनें श्री स्वामी समर्थ जरी अदृश्य झाले असले, तरी परमार्थ-ब्रह्मरूपे ते सर्वत्र आहेत. आजही ते आपल्या भक्तांना अधिकारपरत्वे सगुण-निर्गुण दर्शन देतात. अगदी उदाहरणादाखल म्हणून, शुद्धभक्तिप्रिय ते श्रीपति । पूर्ववचनाची ठेवूनि स्मृती । समाधीनंतर नीलेगांवी प्रकटती । भाऊसाहेबांस दर्शन द्यावया ॥ योगीराज समर्थ मंगळवारी समाधिस्थ झाले तरी त्यांनी पुढें पांचव्या दिवशी शनिवारी भाऊसाहेब जहागिरदार यांना नीलेगांवी जाऊन दर्शन दिले होते. महारूद्ररावांनादेखील अशीच प्रचिती आली. स्वामी समर्थांच्या वियोगाने त्यांचे मन-प्राण व्याकुळ झाले होते. पूर्णब्रह्म स्वामीराजांविण । शून्य भासे विश्व संपूर्ण । अक्कलकोट दिसे भयानक जाण । असेच त्यांना भासू लागले होते. त्या उद्विग्न मन:स्थितीतच महारूद्रराव एकदा श्रीगिरि-व्यंकटेश दर्शनासाठी गेले होते, तिथेच त्यांना श्री समर्थांचा दृष्टांत झाला. श्री स्वामीराजांच्या आज्ञेनुसार, ते तात्काळ अक्कलकोट नगरीस आले आणि श्रीचरणीं मागुनि क्षमा । पूजिले त्रयमूर्ति-पुरुषोत्तमा । अर्थात त्यांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे दर्शन घेऊन विधीपूर्वक पूजनही केले. श्री दत्तजयंतीचा उत्सव त्यावेळी समीप आला होता. अक्कलकोट संस्थानातून वार्षिक उत्सवांसाठी नेमणूक मिळत असे, मात्र त्या वर्षी महागाईने कळस गाठला होता. महर्गतेच्या त्या संकटामुळे श्री दत्तजयंतीची पूजा-अर्चा, प्रसाद आदि विधीवत समारंभ कसा होणार, हाच गहन प्रश्न स्वामीभक्तांपुढे होता. अन् तेव्हाच महारूद्ररावांना त्या योगीराज संकल्पसिद्धीदात्याने दृष्टांत देऊन धीपुरी जाण्यास सांगितले. श्री स्वामी महाराज हेच ज्यांचे सर्वस्व होते, अशा भक्तशिरोमणी महारूद्ररावांनी अपार अर्थसाह्य केल्यामुळें त्यावर्षीदेखील श्री दत्तमहाराजांच्या जयंतीचा उत्सव यथायोग्य पार पडला. तेव्हापासून, प्रतिवर्षी देशपांडे मंडळी श्रीदत्तजयंती उत्सव प्रसंगी अक्कलकोट येथे येत असत आणि भरपूर दान दक्षिणा देऊन स्वामींचे परमभक्त चोळाप्पा यांचे पुत्र कृष्णाप्पा आणि जावई पुजारी श्रीपाद भट यांच्या मदतीनें पूजनोत्सव थाटामाटांत करीत असत. तसेच, महारूद्रराव समाधीचे पूजन । रूद्राभिषेके करिती जाण । द्विजवर्य वेदघोष मंत्र पढून । षोडशोपचारें पूजिती ॥ त्या समारंभात महानैवेद्य, भजन-कीर्तन, ब्राह्मण-भोजन, उपस्थित स्वामीभक्त आणि ग्रामस्थ यांच्यासाठी महाप्रसाद आदि अनेक कार्यक्रमही उत्साहांत होत असत. महारूद्ररावांचे चार पुत्र रघूत्तमराव, गणपतराव, बापूराव आणि अण्णा हेदेखील धर्मशील, स्वामीभक्त आणि दानशूर होते. अशा रितीने, केजकर-देशपांडे मंडळींची स्वामीचरणीं असलेली श्रद्धा अधिकच वृद्धींगत होऊ लागली. त्यानंतर, प्रत्येक वर्षी महारूद्रराव सहपरिवार अक्कलकोटास एक-दोनदा श्री स्वामी-समाधी दर्शनासाठी येत असत आणि अनेक धार्मिक कार्यांसाठी विपुल धनदान करीत असत. श्री स्वमर्थ चरणीं त्यांची अवीट, पूर्ण, निरंतर भक्ती होती, त्यांचे अंतःकरण शुद्ध, उदार होते. ' हरिगुरुलीला करितां श्रवण । प्रेमाश्रुपात वाहे यन्नयनीं ' अशी त्यांची भावपूर्ण अवस्था होत असे. पुढें, महारूद्ररावांना संसार विरक्ती आणि वैराग्यता आली. त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारून संन्यास दीक्षा घेतली व श्री चिदानंदस्वामी आणि श्री स्वामी समर्थांचे चरणदास अशी संन्यस्थ नामें धारण केली. समस्त जन त्यांना केजकर स्वामी उर्फ सदगुरु नानासाहेब महाराज असे संबोधू लागले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनें त्यांना अनेक धार्मिक अनुष्ठानें, तसेच काशी, प्रयाग गया क्षेत्रादिक तीर्थयात्रा करण्याचे महद्भाग्य लाभले. काशीयात्रा करून आल्यावर त्यांनी श्रींच्या समाधीचे भागीरथीच्या पावन जलाने यथाविधी पूजन केले. त्या शुभप्रसंगी देशपांडे मंडळींनी श्री स्वामीनामाचा जप, महानैवेद्य, महाप्रसाद अशी थोर समाराधनाही केली. स्वामीभक्तहो, त्या परमात्म्याची पूर्ण कृपादृष्टी असता काय उणें पडणार बरें ?
सद्भाग्यवंत केजकर स्वामींची श्री समर्थांच्या ठायीं पराकोटीची निष्ठा होती. त्यांना श्री दत्तात्रेय स्वामींचे दर्शन होत असे. ' शुद्ध अंतःकरणांत प्रकटे तें । परमेश्वरस्वरूप गुरुबोधें ' हे वचन सर्वथा सत्यच आहे. त्यांनी पुढें अनेक वर्षे ही श्री स्वामीसेवा केली. असेच एकदा मार्गशीर्ष महिन्यांत श्री दत्तजयंती उत्सवासाठी ते अक्कलकोटास आले. केजकर देशपांडे मंडळींही त्यावेळीं उपस्थित होती. नित्याप्रमाणें, श्री दत्तमहाराज जयंतीचा उत्सव उत्तमरित्या पार पडला. मात्र, त्यानंतर केजकर स्वामींची प्रकृती बिघडली. अनेक वैद्योपचार घेऊनही, ती दिवसोंदिवस अधिकच खालावू लागली. एके दिवशी, श्री नानासाहेब महाराजांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे पुजारी आणि इतर थोर भक्तांना विनंती केली, स्वामी समर्थांच्या चरणांजवळ । माझी समाधि करा हो जन प्रांजळ । मी समर्थांचा पूर्ण दास केवळ । अनंत जन्मींचा असे हो ॥. त्यांची ही कळकळीची प्रार्थना ऐकून सर्व भक्तगण हेलावले. पुढे काही दिवसांतच, शके १८१७ साली पौष वद्य नवमीस, गुरुवारी प्रातःकाळी त्यांनी आपला देह विसर्जन करून इहलोकीची यात्रा पूर्ण केली. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेनें आणि केजकर स्वामींच्या इच्छेनुसार त्यांच्या पुत्रांनी या परमभाग्यवंत भक्ताची समाधी श्रींच्या आद्य प्रिय मठांत बांधली. सभामंडपाच्या उजव्या बाजूस । समर्थांच्या गाईचा जेथें समाधिवास । त्या गौस्थानाच्या शेजारी विदेह-निवास । झाला केजकर स्वामींचा ॥. त्या मनोहर समाधीस्थानी त्यांच्या पुत्रांनी सुंदरसे शिवलिंग बांधले. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते. ज्यांची समाधि सर्वकाळ । जाहली समर्थांच्या चरणांजवळ । धन्य धन्य भाग्योदय पुण्य प्रबळ । फळले शेवटी गुरूरूपीं ॥, असे धन्य ते थोर स्वामीभक्त जे श्री समर्थांच्या चरणकमलीं रंगले.
स्वामीभक्तहो, आजही केजकर देशपांडे घराणे श्रीं स्वामी समर्थांच्या भक्तीची ही परंपरा श्रद्धापूर्वक जपत असून नुकतीच श्री सदगुरु नानासाहेब महाराजांची १२५वी, अमृत महोत्सवी पुण्यतिथी केज येथील मठांत भक्तिमय वातावरणांत संपन्न झाली. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' हे त्यांचे वर्णन सर्वथा यथायोग्यच आहे. प्रत्यक्ष त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास एकदा अवश्य भेट द्यावी.

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Oct 4, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २६ ते ३०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ॥२६॥
हे स्वामी समर्था, तुझ्याच अस्तित्वामुळे ही चराचर सृष्टी आकारास आली. हे सच्चिदानंदघनस्वरूप, स्वयंसिद्ध चैतन्य जे या चराचर विश्वाचा आधार आहे, ते तूच आहेस. तुझ्याच आधारामुळे या विश्वात सुसूत्रता आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारा तूच तर तो परमात्मा आहे. त्या चिद्‌घन परमात्म्याची अभिन्न शक्ति म्हणजेच माया. ' सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।' हे तर वेदवचन आहे. वडाचे बीज किती सूक्ष्म असते, परंतु त्याच्या गर्भात वडाच्या वृक्षाची शक्ती साठवलेली असते. त्यातूनच प्रचंड वटवृक्ष निर्माण होतो. या दृश्य विश्वात जे काही जड, स्थावर आहे ते सर्व या मूळमायेचा पसारा आहे आणि हे सच्चिदानंदघना, मूळ संकल्प असणाऱ्या या मूळमायेचा आधार तूच तर आहेस. हे सर्वगामी, ह्या समस्त चराचर सृष्टीत तूच चैतन्य रूपाने वास करतोस. या दहाही दिशांत, अखिल त्रैलोक्यात खरोखर तूच भरलेला आहेस.
चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ॥२७॥
' स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण । हे चारी पिंडीचे देह जाण ॥' असे शास्त्रवचन आहे. पंचमहाभूतांनी बनलेला हा स्थूल देह चर्मचक्षूंना दिसतो. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाच पंचकांनी सूक्ष्म देह बनतो. वेदश्रुतींच्या तत्त्वांनुसार कारण देह अज्ञानरूप आहे, तर ज्ञान म्हणजेच महाकारण देह होय. श्री समर्थ रामदास स्वामी या चार देहांचे निरूपण करतांना म्हणतात - स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देह अनुक्रमे जागृती, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या या अवस्थांमध्ये कार्यरत असतात. जागृतीमध्ये दृश्य पदार्थांचा अनुभव घेता येतो. स्वप्नावस्था म्हणजे मिथ्या-वृथा विषयांचा अनुभव असतो. तर सुषुप्ती अवस्थेत आनंदाचा भोग असतो. परमार्थामध्ये विशिष्ट साधना झालेल्या साधकास तुर्यावस्थेत ब्रह्मज्ञान अनुभवता येते, मात्र या अवस्थेत मायेचा प्रभाव असल्याने भक्तांस विमल परमानंद प्राप्त होत नाही. परब्रह्म निर्मळ, निराकार आणि शाश्वत तर माया चंचल आणि चपळ आहे. त्यामुळे साधक मनांत साशंक होतो. हे परब्रह्मा, तूच या स्वानंद, सुखादी चार अवस्थांचा आम्हांला अनुभव देऊन पूर्वकर्मांनुसार सुख-दु:ख भोगावयास लावतो. आमचा अहंकार तुझ्या स्वकाराने समूळ नष्ट करून आत्मानंदाची अनुभूती देतो. देहाहंकार जेव्हा विरून जातो, तेव्हाच परमात्मस्थिती प्राप्त होते. ' अहं ब्रह्मास्मि ' असे साधकास ज्ञान झाले की तुझ्या परमात्मस्वरूपाचे प्रबोधन करतो.
जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ॥२८॥
हे सर्वेश्वरा, आम्ही या मायेच्या भवपाशात पूर्णतः गुंतत जातो आणि निजरूप विसरतो. कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार अनेक योनींतून जन्म घेत या जन्म-मरणाच्या चक्रांत पुन्हा पुन्हा अडकतो. हे गुरुराया, केवळ तूच या भवबंधनातून पैलपार नेऊ शकतो. तुझ्या नामसंकीर्तनाचा महिमा वेदशास्त्र, श्रुती-स्मृतींनाही अगम्य आहे. तुझ्या नामस्मरणाने मनःशांति लाभते. अनन्य भक्तिभावाने तुझे नित्य चिंतन केल्यावर परमानंदाची प्राप्ती नक्की होतेच. तुझा कृपाकर आमच्या मस्तकीं सदैव ठेव.
ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ॥२९॥
हे चैतन्यघना, आदि-अंतरहित असा तू या चराचराचा आधार आहेस. प्रकाश आणि आनंद यांच्याही पैलाड असणाऱ्या हे परब्रह्मा तूच या चराचराला आधार देतोस. तुझ्या निर्विकल्प आणि निरूपाधिक स्वरूपाचे वर्णन करतांना चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणेदेखील मौन झाली. यास्तव, तुला वेदगुरूही म्हणतात. हे भक्तवत्सला, तू भक्तांच्या अंतःकरणात सदा सर्वदा विराजमान असतोस आणि तूच या सकल विश्वाला गुप्तरूपानें व्यापून असणारा अमूर्त परमात्मा आहेस. स्वयंप्रकाशी, नित्य शुद्ध, निरहंकार परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप असते आणि शरीरात आत्मरूपाने त्याचा अंश असतो, याची अनुभूती समर्थकृपेने आनंदनाथ महाराजांनी घेतली होती.
भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ॥३०॥
कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे चार मार्ग ईश्वरप्राप्तीचे साधन आहेत. साधकाने कुठल्याही मार्गाने उपासना केली असेल तरी त्याचे फळ एकच असते ते म्हणजे भगवत्स्वरूपाचे ज्ञान, त्या परमात्म्याची प्राप्ती ! भक्तीमार्ग तसा सोपा, सुलभ वाटत असला तरी त्याचे वर्म जाणणे आवश्यक आहे. भक्ती ही बाभळीच्या वनातील वाट आहे. त्यात खाच-खळगे, काटे खूप आहेत. मात्र, अनन्य शरणागत भाव, अकृत्रिम प्रेम आणि शुद्ध अंतःकरण असल्यास हा भक्तीमार्ग साधकास परमात्म्याच्या अगदी जवळ नेतो. निष्काम भक्तीनें आपल्या मायारहित, बंधनरहित आत्मस्वरूपाचे ज्ञान तर होतेच, पण “अंते मतिः सा गतिः ” या उक्तीनुसार जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातूनही सुटका होते. या कलियुगात हेच फळ नामसंकीर्तनाने प्राप्त होते. कीटकाला जसे भ्रमराचे म्हणजे भुंग्याचे ध्यान लागले की तो स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे निःसंग आणि निर्मळ वृत्तीने अखंड नामस्मरण करणारा साधक परब्रह्मस्वरूप पावतो. श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्वामी समर्था, विशुद्ध भावभक्ती करणे हेच विनासायास साधन असले, तरी तुझे केवळ नाम घेतल्याने परम परमार्थ सहज प्राप्त होईल. आमचे संचित आणि क्रियमाण थोडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या कृपेने या दुस्तर भवसागरातून आम्ही सहज तरून जाऊ.
' हम गया नही, जिंदा है ।' हे अभिवचन देणारे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ नेहेमीच आपल्या भक्तांना अभय देतात. समाधिस्थ होतांनादेखील श्री स्वामी समर्थांनी भगवद्-गीतेतील श्रीकृष्ण भगवंतानी दिलेल्या वचनाचाच पुनरुच्चार केला होता - अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ भक्त आणि भगवंताचे सर्वोच्च पातळीवरचे नाते हा श्लोक सूचित करतो. अर्थात जे भक्त अनन्यभावानें माझे निरंतर चिंतन करतात, नित्य माझी उपासना करतात अशा माझ्या भक्तांचा मी सदैव योगक्षेमाचा भार वाहतो.

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Oct 1, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ४


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेमुळे महारूद्ररावांचे गंडांतर टळले. ते व्याधीमुक्त होऊन आरोग्यवंत झाले. त्यावेळी त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमरावांनी श्री स्वामी चरणीं दशसहस्त्र रौप्यमुद्रिका अर्पण करण्याचा आपला मानस सांगितला, त्यावर समर्थांनी हसून आपल्या श्वेतवर्ण मनोहर दिव्य पादुका त्यास प्रसाद म्हणून दिल्या आणि केज येथील त्यांच्या घराच्या उकीरड्याच्या स्थानीं त्यांची स्थापना करावयास सांगितली. त्या ब्रह्मनायकाच्या भक्तवत्सलतेची अनुभूती महारूद्ररावांना अनेक वेळा आली होतीच, आणि आता तर त्यांची सेवा, भक्ती जणू फळाला आली होती. त्याकाळीं, हरिश्चंद्र शेणवी नामक अत्यंत भक्तिमान, निर्लोभी आणि सदाचारी असे स्वामीभक्त मुंबईस राहत असत. त्यांची श्रीदत्तात्रेय चरणीं अत्यंत श्रद्धा असून ते वारंवार अक्कलकोटास दर्शनासाठी येत असत. स्वामीभक्तांना हव्या तश्या लहान-मोठ्या पादुका तयार करून ते श्री स्वामी चरणांना लावून सिद्ध करीत असत आणि नित्यपूजेसाठी देत असत. त्यासाठी ते कोणाकडूनही मूल्य अथवा द्रव्य घेत नसत, हीच त्यांची स्वामीसेवा होती. - पुष्कळ पादुका सिद्ध करून । मोल ना घेता कोणापासून । सहस्रावधि अर्पितसे । असे ते स्वामीभक्तिपरायण हरिश्चंद्रजी त्यावेळीं श्वेत पाषाणाच्या पादुका घेऊन श्री स्वामी समर्थांच्या समोर बसले होते. स्वामीआज्ञेनुसार त्यांनी त्याच पादुका अत्यंत संतोषपूर्वक रघूत्तमरावांना अर्पण केल्या. - हरिश्चंद्रे रघूत्तमासि पादुका । अर्पिल्यावरी पूजा नैवेद्य दक्षिणदिका । ब्राह्मण-भोजन करुनि संतुष्ट लोकां । गेली देशपांडे मंडळी केजेस

लवकरच, एका सुमुहूर्तावर महारूद्ररावांनी केज येथे आपल्या घराच्या उकीरड्याच्या स्थानी विशाल मठ बांधण्यास प्रारंभ केला. सुंदर, रमणीय आणि भव्य अशा या मठात तीन बाजूंस दोन खणी सोपें काढून आवारांत विपुल जल असलेली एक विहीरही बांधली. पुढें, शुभदिनीं वैदिक, याज्ञीक पंडितांना पाचारण करून देशपांडे मंडळींनी विधिपूर्वक श्री स्वामींच्या प्रासादिक पादुकांची प्रतिष्ठापना केली. स्वामीभक्तहो, या विशेष समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्री स्वामी समर्थांनी ज्यांचा आपले पुत्र म्हणून उल्लेख केला, ज्यांना पादुकास्वरूप ‘आत्मलिंग’ प्रसादरूपाने दिले आणि श्री स्वामीप्राप्ती, श्री स्वामीचिंतन हेच ज्यांच्या जगण्याचे ध्येय होते असे हरिभाऊ म्हणजेच स्वामीसुत यांचे कनिष्ठ बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार यांना त्यावेळीं श्री समर्थांनी, नानासाहेब केजकरांबरोबर खास पाठविले होते. या शुभप्रसंगी प्रत्यक्ष त्या सर्वेश्वराच्या आज्ञेनें सच्चिदानंद स्वामीकुमार आणि ब्रह्मचारीबुवा अक्कलकोटाहून आले होते.

अशा रीतीने, ब्रह्मांडनायकाच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थांचा मठ श्री महारूद्रराव देशपांडे केजकर उर्फ सद्गुरू नानासाहेब महाराज यांनी आपल्या ग्रामीं स्थापन केला. तिथे, महान दत्तभक्त हरिश्चंद्र यांनी अर्पण केलेल्या या मनोहर पादुका पूर्वाभिमुख असून मठाचा नगारखाना उत्तराभिमुख आहे. श्री स्वामी महाराजांची पंचधातूंची अतिशय सुरेख मूर्तीही तिथे स्थापन केली आहे. - निरालस्य शुद्ध भक्तिपूर्वक । पूजा नित्य नैवेद्यादीक । आरती, भजन त्रिकाल सम्यक । होतसे मठांत समर्थांच्या अजूनही, केज येथील या देशपांडे घराण्याने श्री स्वामी समर्थांच्या सेवेची परंपरा जपली आहे. या श्री स्वामी समर्थ संस्थानात अनेक हरिदास, पुराणिक आणि विद्वज्जन तसेच असंख्य स्वामी-सेवेकरी, भक्तगण इथे सतत दर्शन, महोत्सव आदि धार्मिक कार्यांसाठी येत असतात. त्याचबरोबर, अनेक सामाजिक उपक्रमही या संस्थानातर्फे राबविले जातात.

अक्कलकोट येथील सुमारें एकवीस वर्षांच्या वास्तव्यांत श्रीदत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, भक्तांचे इहपर कल्याण केले. श्री देव मामलेदार, श्री साईनाथ, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज आदि अनेक सिद्धपुरुष स्वामी संप्रदायांत महत्वाचे स्थान राखून आहेत. तसेच, श्री आनंदनाथ महाराज, चोळाप्पा, बाळाप्पा, स्वामीसुत, श्री बीडकर महाराज अशा अनेक थोर अलौकिक शिष्यांनी श्री स्वामींचे कार्य आजही भक्तिपूर्वक सुरु ठेवले आहे. हा परब्रह्माचा मूर्तिमंत अविष्कार शके १८०० ( इ.स. १८७८ ) मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास समाधिस्थ झाला. श्रीमद्दत्तात्रेय-स्वमिराजें निरुपाधि । विदेही निजानंदी घेतली समाधि । वास्तविक पाहतां, त्या लीलाधराची हीदेखील एक लीलाच म्हणावयास हवी. आपल्याला आज त्यांचे सदेह स्वरूप दिसत नसले, तरी त्यांच्या निर्गुण निराकार स्वरूपाची अनुभूती आजही एकनिष्ठ भक्तांना, श्रद्धावंतांना निश्चितच येते. महारूद्ररावांनासुद्धा समर्थांच्या समाधीनंतर असाच दृष्टांत झाला.

क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.