Dec 12, 2024

शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥















पंचप्राण काकड आरती, तत्वात्मक ज्योती, लावुनी तत्वात्मक ज्योती, ओवाळीला गुरुत्रयमूर्ती ।

ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥धृ.॥ कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमी, नरहरी अनादि संगमी । राहे गुरुवर तरुतळी, राहे यतिवर तरुतळी तो हा माझा कुलस्वामी । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥१॥ द्वारी चौघडा वाजे, वाजंत्री वाजती, कर्णे वाजंत्री वाजती । नाना घोषे गर्जती, नाना वाद्ये गर्जती, भक्त स्वानंदे स्तविती । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥२॥ इंद्रादि सुरवर, पन्नग दर्शनास येती, श्रींचे दर्शनास येती । नारद मुनिवर, किन्नर तुंबरे आळविती, सुस्वरे आळविती । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥३॥ पाहुनी सिंहासनी आदिमूर्ती सावळी, चिन्मय आदिमूर्ती सावळी । श्रीगुरुभक्त तन्मय, श्रीगुरुभक्त निर्भय, श्रीपदां ओवाळी । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥४॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Dec 11, 2024

श्रीगुरुचरित्र सारामृत अर्थात श्रीगुरुचरित्राचा गद्यानुवाद


॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्‌गुरुभ्यो नमः ॥ अथ ध्यानम् बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् । ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे ह्रदि मुदा ध्येयं सदा योगिभिः ॥ दत्तभक्तहो, श्रीगुरुचरित्राची प्रासादिकता तर सर्वश्रुत आहेच. ' श्रुतं हरति पापानि ' अर्थात वेद, पुराणें आणि प्रासादिक ग्रंथ श्रवण केल्याने पाप हरते, हे वेदवाक्य आहे. श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. श्री गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधर यांनी प्रत्यक्ष श्री गुरूंच्या, श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून लिहिलेले आहे, त्यामुळे तो वरदग्रंथही आहे. अर्थात प्रत्यक्ष श्रीगुरुंचा वर या ग्रंथास प्राप्त झाला असल्याने तो सर्वथैव सिद्धीप्रद आहे. त्यांतील दिव्य अक्षरांतून शुभ स्पंदने निर्माण होत असतात, त्यांमुळे त्यांचे पठणमात्रें फळ मिळतेच. परंतु ही ईश्वर आराधना केवळ श्रवण, वाचन करणे यापुरतीच मर्यादित न ठेवता त्याचे मनन करावे, त्यातून योग्य तो बोध घ्यावा, यासाठी हा अल्प प्रयास ! दत्तभक्तांना संपूर्ण श्रीगुरुचरित्राचा गद्यानुवाद इथे वाचता येईल.


*** श्रीगुरुचरित्र सारामृत ***

भगवान दत्तमहाराजांची कुठल्या ना कुठल्या रूपांत सतत सेवा घडावी, व त्या भक्ताभिमानी, शरणागतवत्सल परब्रह्मानेही ही सेवा त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावी, आणि आपल्या सर्वांवर त्यांची सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना !

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Dec 9, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - श्रीगुरुदेवदत्त जन्माध्याय


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
श्रीगुरुसंतती मूळपीठ । कवण स्थलीं झाले प्रकट । - गुरुपरंपरेची ही कथा अत्यंत प्रासादिक आहे. पूर्णब्रह्म हे निर्विकल्प, निरंजन आणि भेदत्रयवर्जित होते. निराकार आणि निरुपाधिक असलेल्या त्या परमात्म्यास अनेक स्वरूपांत प्रगट व्हावे, अशी इच्छा झाली. अनादि स्वयंभू प्रमाण । वेद साक्षात नारायण । पिंड ब्रह्मांड झाले निर्माण । साद्यन्त वर्णी यथार्थ तें ॥ या बुद्धीयुक्त अस्तित्वास हिरण्यगर्भ असे म्हणतात. पंचमहाभूतांच्या कमी-अधिक प्रभावाने जी सृष्टी निर्माण होते, त्यालाच स्थूलसृष्टी असे संबोधतात आणि या समस्त जीवसृष्टीतील नाम, रूप, आकृती, स्थावर आणि जंगम या सर्वांशी तादाम्यता साधणाऱ्या त्या परमात्म्याचेच विराट असे नाम आहे. रजोगुणापासून ब्रह्मदेव या सृष्टीतील सर्जनशक्तीचे कार्य करतात. सत्वगुणापासून श्रीहरि भरण, पोषण आणि संगोपनाचे कार्य करतात. तर तमोगुणापासून महेश्वर संहरणशक्तीचे कार्य करतात. विधात्याचे जे अनेक मानसपुत्र झाले, त्यांत सप्तऋषी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांतील ब्रह्मज्ञानी अत्रि ऋषी परमश्रेष्ठ होते. त्यांची अनसूयानामक पत्नी वेदाचरणी पतिव्रता होती. पुत्रप्राप्तीसाठी अत्रिऋषींनी अनसूयेसह कुलाद्रि पर्वतावर उग्र तपश्चर्या केली. निर्विध्या नदीच्या तीरी एका पायावर उभे राहून प्राणायामादि करून त्यांनी एकाग्रतेने तप केले. महासती अनसूया एकनिष्ठतेने त्यांची सेवा करत असे. शंभर वर्षांनंतर त्या उग्र तपाने अत्रिऋषींच्या मस्तकांतून अग्नीच्या ज्वाला प्रगट होऊ लागल्या. " या भयंकर दाहापासून आमचे संरक्षण करावे. ", अशी त्यावेळी महेंद्रादिक सुरवरांनी त्रिदेवांची प्रार्थना केली. त्यांना अभयवचन देत ब्रह्मदेव हंसावर, श्रीविष्णु गरुडावर आणि शूलपाणि नंदीवरआरूढ होऊन अत्रिऋषींच्या आश्रमीं पोहोचले. कृपावलोकने हास्यवदन । भक्तवत्सल सुप्रसन्न । ऋषीनें प्रेमे विलोकून । साष्टांग नमन केले तयां ॥ अत्रि-अनसूयेने त्रिदेवांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले, तेव्हा प्रसन्न होऊन त्रिदेवांनी, अथास्मदंशभूत निर्विकल्प । केवल पूर्णब्रह्म स्वरूप । लोकविख्यात ज्ञानदीप । पुत्र होईल असे आशीर्वचन दिले. श्रीमदभागवतात वर्णिलेली श्रीदत्तजन्माची कथाही मोठी सौख्यप्रद आहे. पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी श्रेष्ठ अशा विशुद्धसत्वरूपाच्या नित्यदर्शनासाठी मोठे अनुष्ठान आरंभिले. तेव्हा, श्रीहरि विष्णु प्रसन्न झाले आणि त्यांनी त्रिदेव एकत्र आले तरच असे दर्शन शक्य होईल, असे नारदमुनींना सांगितले. हे कार्य साधण्यासाठी नारदमुनी भूमंडळी संचार करीत करीत अत्रिऋषींच्या आश्रमी आले. ऋषींनी त्यांचे योग्य आदरातिथ्य-पूजन केले. त्यावेळी अत्रिमुनींनी देवी अनसूयेला पिण्यासाठी पाणी मागितले. अनसूया तेव्हा हातात मुसळ घेऊन तांदूळ कांडीत होती. पतिसेवाआज्ञातत्पर । मुसल थांबविले वरचेवर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधलें सुपात्री आणूनी ॥ अनसूयेचे पतिव्रतासामर्थ्य इतके की तिने मुसळ वरच्यावर ठेवले आणि पतिदेवांना पाणी आणून दिले. हे पाहून नारदमुनींस महदाश्चर्य वाटले. तत्क्षणीं त्यांना त्रिदेवांच्या एकत्रीकरणाची एक युक्ती सुचली. नारदऋषि कलहप्रिय । जगत्कल्याणार्थ हिंडती अक्षय । हरि गुरु नारायण जय जय । मुखें उच्चारित निघाले ॥ एके दिवशी हरिप्रिया लक्ष्मी आणि ब्रह्मदेवपत्नी सावित्री या दोघी शिवशक्ती पार्वतीला भेटावयास कैलासभुवनास आल्या होत्या. जगन्माता उमेने त्या दोघींचे यथायोग्य आदरातिथ्य केले. एकमेकींशी लीलाविनोद करीत त्या एकमेकींची चौकशी करू लागल्या. त्यावेळी अकस्मात नारदमुनी त्या स्थानीं आले. नारदमुनींना उत्तम सिंहासनी बसवूनत्या त्रिदेवींनी त्यांचे पूजन केले अन मधुर स्वरांत त्या तिघींनी नारदमुनीस विचारले, या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथामति । विदित व्हावें आम्हांला ॥ तेव्हा त्या कलहप्रिय ब्रह्मर्षि नारदमुनींनी त्यांना महा साध्वी अनसूया हीच या ब्रह्मांडांत सर्वोपम पतिव्रता-शिरोमणी आहे, हे सांगितले. महर्षी अत्रिंची पत्नी अनसूया ही तिच्या नावाप्रमाणेच असूयाविरहित असून पतिसेवेत सदा तत्पर, कुशल गृहस्थाश्रमीं, अभ्यागतांचे उत्तम आदरातिथ्य करणारी आहे. त्या सतीच्या केवळ दर्शनाने अखिल सुरवरच नव्हे तर पापी जनही पावन होतात. अशा प्रकारें, सतीचे गाऊनि यश । क्षोभविले लावुनि कलहास । उमारमासावित्रीस ॥ आणि मग अखंड भगवतचिंतन करीत नारद तिथून निघाले. अशाप्रकारे कळ लावून नारदमुनींनी तिथून गमन केले खरें! मात्र तिन्ही देवी अत्यंत क्रोधायमान झाल्या आणि आपापल्या पतीजवळ जाऊन " अखिल ब्रह्मांडातील श्रेष्ठ महापतिव्रता अशी अनसूयेची महती आपणांस सहन होत नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी करावे." अशी त्यांनी तक्रार केली. या कलहाचे मुख्य कारण नारदमुनी आहेत, हे त्रिदेवांनी अंतर्ज्ञानाने जाणले. मात्र स्त्रीहट्टापुढे त्यांचे तरी काय चालणार ? मग ब्रह्मा, विष्णु आणि शिव तिघेही ब्राह्मणांचे रूप घेऊन भूमंडळी अत्रि ऋषींच्या आश्रमीं आले. अत्रि-अनसूया हे उभयंता सर्वकाळ अतिथींचे पूजन-सन्मान करून त्यांस भोजन देत असत. ऐशा पुण्यश्रमीं अतिथीत्रय म्हणजेच त्रिदेव आले आणि महासाध्वी अनसूयेस म्हणाले, " आम्ही अतिशय क्षुधार्त असून आम्हांस इच्छाभोजन द्यावे." त्यांचे वचन ऐकून अनसूयेने त्यांना उत्तम आसन दिले आणि त्यांचे षोडशोपचारे पूजन केले. तदनंतर तिने विविध पक्वान्नांनी भरलेली पानें मांडून अतिथींना भोजन करण्याची प्रार्थना केली. मात्र त्यावर तुमचे लावण्य स्वरूप देखुनी । अभिलाषा उपजली मनीं । वाढावें तुम्ही वस्त्र त्यागुनी । ऐसे अतिथी बोलती ॥ नाहीतर आम्ही तुझे सत्त्व घेऊन जाऊ, अशी ब्राह्मणवेषांतील त्रिदेवांनी विचित्र मागणी केली. त्यावेळी ब्रह्मविद्वर, त्रिकाल-ज्ञानी अत्रि ऋषींनी हे अतिथी म्हणजेच साक्षात विधिहरिहर आहेत, हे ओळखले. मग सती अनसूयेने निजदैवताचे अर्थात पतीदेव अत्रिऋषींचे ध्यान केले आणि त्यांचे चरणतीर्थ घेऊन ते अतिथींवर सिंचन केले. तात्काळ ते त्रिदेव लहान, गोजिरवाणी बालके झाली. विगतवसन होउनी सती । घेतलीं बालकें अंकावरती । तों स्तनीं दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेंकरा ॥ ती अतिसुंदर, लोभस बालकें पाहून अत्रि-अनसूया या दोघानांही परमानंद झाला आणि हे तीन पुत्र देऊन ईश्वराने आपले वरदान पूर्णत्वास नेले, असेच त्यांना वाटले. आश्रमांतील सर्व आबाल-वृद्ध अनसूया सतीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून अचंबित झाले.
अत्रिआश्रमांत पुत्रजन्माचा महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होऊ लागला. महापतिव्रता अनसूया सुंदर नवीन वस्त्र नेसून ध्वजा, तोरणें उभारू लागली. तेथील सर्व योगी-मुनीजन मंगलवाद्यांच्या गजरांत सुरेख गीत गाऊ लागले. चतुर्मुख ब्रह्मा जो अनेक ब्रह्मांडांची उत्पत्ति करतो, ज्याचे सर्व वेद हिरण्यगर्भ, स्रष्टा असे स्तवन करतात, तो ब्रह्मदेव अत्रिसदनीं तान्हें शिशु होऊन पाळण्यांत लोळू लागला. जनार्दन अर्थात महाविष्णु जो अनंतसृष्टीचे पालन करतो, जो कैवल्यमोक्षदायी आहे आणि ज्याचा महिमा पुराणें, वेद-व्यासादि गातात तो हरी अत्रिआश्रमीं पाळण्यांत लहान बालक होऊन रडू लागला. कैलासराणा नीलकंठ, शिवशंकर ज्याचा रुद्रमहिमा वेद-पुराणें, स्मृतिशास्त्रेंही सर्वत्र गातात, तो अखंड ब्रह्मानंद अत्रिबाळ होऊन मंद हास्य-रुदन करू लागला. आपल्या या तिन्ही पुत्रांना पाळण्यांत घालून महासती अनसूया मोठ्या ममत्वाने जोजवू लागली. असा त्या स्थानीं मोठा आनंदसोहळा सुरु होता.
इतक्यांत एक नवल वर्तले! देवर्षि नारदमुनी अकस्मात तिथे आले आणि त्रैमूर्ति बालस्वरूपांत पाहून हसू लागले. अत्रिऋषि अनसूया । पूजुनी म्हणती देवर्षिराया । आपण बैसविले निजठायां । केली दया समर्थे ॥ पुढे, नारदमुनी सत्वर देवलोकी गेले. त्यांना पाहून सुरवरस्त्रिया विनवित म्हणाल्या, " गेले कित्येक दिवस आमचे पती स्वस्थानीं आले नाहीत. तुम्हांस त्यांचा काही ठावठिकाणा माहित असेल तर, आम्हांस सांगावे." " तुमचे पती अत्रिआश्रमांत । बाल होऊनी लोळती पाळण्यांत ।" असे नारदमुनींनी सांगताच त्या तिन्ही देवी क्रोधायमान झाल्या आणि देवर्षींसह सत्वर भूलोकी अत्रि ऋषींच्या आश्रमांत आल्या. तिथे त्रिदेवांना बालकस्वरूपांत पाहून त्यांचा राग अनावर झाला अन मंत्र जपुनि त्वां केलें कपटें । आमच्या पुरुषांसी धाकटें । पतिव्रतालक्षण चेटकें । शोभे नेटकें तुझे तुज ॥ असे अनसूयेस मोठ्या त्वेषयुक्त स्वरांत बोलू लागल्या. त्या तिन्ही देवस्त्रियांचे ते गर्व-द्वेष आणि अहंभावयुक्त वचन ऐकून ती पतिव्रताशिरोमणी अनसूया अति मधुर स्वरांत त्यांना म्हणाली, " देवींनो, तुमचे पती हे बहुरूपी आहेत, हे तुम्ही जाणता. तुम्हीही अखिल त्रैलोक्यांत महान पतिव्रता म्हणून विख्यात आहात. त्या सामर्थ्याने तुम्ही बालकरूपांतील आपापल्या पतींना ओळखून घेऊन जा." अनसूयेचे हे वचन ऐकून रमा, उमा आणि सावित्री तिघीहीजणी धावतच पाळण्याजवळ गेल्या खऱ्या, मात्र त्या तिन्ही गोजिरवाण्या अत्रिनंदनांचे रूप पाहून, हुंकार ऐकून, अथवा त्यांना उचलून कडेवर घेऊनही, यांतील ब्रह्मा कोण ? श्रीहरिविष्णु कुठले आणि शंभो महादेव कोण? हे काही त्या ओळखू शकल्या नाहीत. अंतर्बाह्य मर्यादा खुणें । स्वपतीस जाणणे न ओळखणे । हे काय पतिव्रतेचे लक्षण म्हणावें काय ? असा विचार करून त्या तिघीहीजणी तेव्हा मनोमन ओशाळल्या. मग सावित्री, लक्ष्मी, उमा या तिघीही जणी अनसूयेची क्षमा मागत म्हणाल्या, " हे अनसूये, तू पतिव्रताधर्म निपुण असून साक्षात जगन्माता आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आमच्या पतीचे दान द्यावे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो." त्यावर अनसूया हसतहसत उत्तरली," सुरांगना हो, मी या तिन्ही बालकांचे आनंदाने पालन करते. तुम्हीही इथे तुमच्या पतीसह वास्तव्य करावे." असे बोलून ती त्या तिन्ही बालकांस स्तनपान करू लागली. जरी मोठें हे देवत्रय । कोठून मिळे त्यांना सुसतीचे पय । हाचि जाणूनि अभिप्राय । स्तनपान करिती अवश्य ते ॥ असा हा पुत्रसोहळा पहाण्यासाठी आकाशांत सुरवरांच्या विमानांची दाटी झाली अन ते त्या अनसूयेच्या पुत्रांवर सुवर्णपुष्पांची वृष्टी करू लागले. अशाप्रकारे, कृतयुगांत अत्रि आश्रमी ब्रह्मकैवल्य, पुरुषोत्तम गुरु प्रकटले. मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ ब्रह्मावतार 'सोम' नांवानें, रुद्रावतार 'दुर्वास' नामानें तर विष्णुस्वरूप 'दत्त' नामानें जगतविख्यात झाले. प्रत्यक्ष ईश्वर आपले पुत्र झाले, हे पाहून अनसूया-अत्रि अतिशय आनंदले. तेव्हा त्या तिन्ही देवस्त्रियांनी सती अनसूयेस वारंवार नमन केले आणि " कृपा करून आमच्या पतींचे आम्हांस दान द्यावे," अशी प्रार्थना केली. मग त्या महापतिव्रता अनसूयेने पतीचरणांचे तीर्थ त्या तीन बालकांवर शिंपडले अन त्रिदेवांना तात्काळ पूर्वरूप प्राप्त झाले व तिन्ही बाळेंही तशीच पाळण्यांत राहिली. हे पाहून सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरार्य झाले एकत्र ॥ अशा रितीने, त्रैमूर्तींनी अत्रि महर्षींना दिलेले वरदान फलस्वरूप झाले. तदनंतर ब्रह्मा-सावित्री, श्रीहरि-लक्ष्मी, अन शिव-गिरीजा त्या पुण्यशील दांपत्यास शुभाशिष देऊन स्वस्थानीं गेले. कालांतराने सोम चंद्रमंडळात वास करू लागला, तर दुर्वास तीर्थयात्रा करण्यासाठी प्रयाण करते झाले, अन त्रयदेवात्मक योगीश्वर दत्त अत्रि-अनसूयेजवळ राहिले. विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व-एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ दकारोSज्ञानदग्धा च । तकारस्तत्त्वमव्ययं । दत्तस्मरणमात्रेण । पुनर्जन्म न विद्यते ॥ अर्थात त्या दत्तप्रभूंच्या - विधि-नारायण-हर यांच्या या अपूर्व त्रैमूर्तिस्वरूपाचे नित्य ध्यान-पूजन केले असता साधकांस भुक्ति-मुक्ती सहज प्राप्त होते.  
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...