Mar 7, 2025

श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

कोणत्याही स्तोत्राचा अथवा मंत्रांचा पाठ करतांना किमान त्यातील शब्दार्थ जाणून घेऊन पाठ करावा. असा नित्यपाठ केल्याने काही काळाने साधकाचे उपासनाबळ वृद्धिंगत होते. सद्‌गुरुंच्या कृपेने मग त्या स्तोत्र/मंत्रांचा भावार्थ ध्यानांत येऊ लागतो आणि त्या ध्यानाने साधनामार्गावर योग्य दिशेने वाटचाल होऊ लागते. असा भावार्थ गोचर झाला की त्या भगवद्भक्ताची आराधना फलदायी होते. श्री स्वामी समर्थ मालामंत्राचे नित्यपठण ही अशीच एक प्रभावी उपासना आहे. अनेक स्वामीभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे. या दिव्यमंत्राचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न - ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥

आदिमाया आदिशक्ती या मालामंत्राचे माहात्म्य सांगत आहे. जगत्कल्याणासाठी प्रत्यक्ष श्रीनारायणांनी हा सर्वश्रेष्ठ मालामंत्र कथन केला.

ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥

हे भगवंता श्रीस्वामी समर्था, केवळ स्मरणमात्रें संतुष्ट होणाऱ्या, योगींमुनींनाही वंदनीय असणाऱ्या दत्तनाथा तुम्हांला मी नमन करतो. ज्ञान व आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे, ज्यांना तीन डोळे आहेत (जे शिवस्वरूप आहेत), या विश्वाचे जे ईश्वर आहेत, या चराचराला ज्यांनी व्यापले आहे, बालक, वेडा किंवा पिशाच यांच्याप्रमाणे ज्यांचा कधी कधी वेष असतो, जे महान योगी आहेत, जे परमात्मास्वरूप आहेत, जे विश्वाला चैतन्य देणारे आहेत, जे अक्षर-अविनाशी आहेत, जे मायाविकारांपासून अलिप्त आहेत, जे दोषरहित-सर्वगुणसंपन्न आहेत, जे या जगताचे मूळ आधार आहेत, जे श्रीहरी विष्णुस्वरूप आहेत, जे कारुण्यसिंधू आहेत, जे सनातन अर्थात अनादिसिद्ध आहेत अशा श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.


सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥

ज्यांची कृपा झाल्यास सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात, सर्व दुरितें जळून जातात, सकल संचितकर्मांचा दोष नाहीसा होतो आणि सर्व विघ्नांचे सहज निवारण होते अशा श्रीस्वामीसमर्थांना नमन असो.

ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा

यानंतर तंत्रशास्त्रातील बीजांचे वर्णन केले असून त्याद्वारे विशिष्ट अभिप्सीत प्राप्तीसाठी श्री स्वामी महाराजांची प्रार्थना केली आहे.

जे संसारबंधनातून मुक्त करणारे आहेत (ॐ), जे परम ऐश्वर्य देणारे आहेत (श्रीं), जे निजजनतारक असून धर्मस्वरूप आहेत (स्वां), जे नित्य यश देणारे आहेत (मीं), जे या संसारचक्राचा छेद करणारे आहेत (सं), जे आत्मज्ञान देणारे आहेत (मं), जे विरक्ति देणारे आहेत (ओमर्थ), जे या मनुष्यजन्माच्या इतिकर्तव्यतेचे प्रबोधन करतात (नं), जे महाभय दूर करतात (मों), आणि जे केवळ भावाचे भुकेले असून भक्तजनांच्या चित्तात सदैव वास करतात त्या श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.  

परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: )

हे भगवन्, परक्यांनी केलेल्या वाईट कृत्यांना माझ्यापासून दूर ठेव. परमंत्रांना शांत कर. परयंत्रांचा नाश कर. ग्रहाभूतादि-पिशाच्चपीडा यांचे निवारण कर. दारिद्र्याला दूर पळव. (मानसिक-शारिरीक) दुःख हरण कर. माझे जीवन सुख-शांती यांनी सदैव बहरलेले ठेव. सर्व संकटांपासून संरक्षण कर. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, सर्पदोषादि सकल दोषांचा समूळ नाश कर. माझ्यातील अहंकाराचे उच्चाटन कर. माझे मन-चित्त आणि बुद्धी तुझ्या चरणीं स्थिर कर. हे परमात्मन महादेवा, अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडधीशा, स्वामी समर्था श्रीगुरुराया तुला त्रिवार नमन असो.


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर