॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय नमः ॥
सतेज दुसरा रवि हरीसमान यांचे बल ।
वशिष्ठ-सम सर्वदा त्वदिय चित्त ते निर्मल ॥
असें असुनिया खरे, वरिवरि पिसा भासतो ।
तया गुरु गजाननां प्रति सदा गणू वंदितो ॥
संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे, संतकवी श्रीदासगणू महाराजांनी केलेले हे वर्णन किती यथार्थ आहे. जगत्कल्याणासाठी, सामान्य जनांच्या उद्धारासाठी तो निर्गुण, निराकार परमात्मा संत-महात्मे, सत्पुरुष यांच्या स्वरूपांत सगुण साकार रूप घेऊन या भूतलावर अवतरीत होतो. विदेहि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज असेच साक्षात् ब्रह्मस्वरुप होते, हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या जीवनचरित्रातील अनेक लीला याची साक्ष देतात.
संतकवी श्रीदासगणूविरचित ‘ श्री गजानन विजय ' या प्रासादिक ग्रंथातील अठराव्या अध्यायात श्री गजानन महाराजांनी आपला सद्भक्त बापुना काळे यांस साक्षात विठ्ठलरूपांत दर्शन दिले, ही कथा वर्णन केली आहे. भगवंताच्या भेटीसाठी आपल्या या भक्ताची तळमळ, ध्यास पाहून त्या कृपाळू माऊलीने प्रत्यक्ष विठ्ठल-दर्शनाचा लाभ त्यास घडवला. अशा अनेक भक्तांना त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेच्या स्वरूपांत दर्शन दिले आणि त्यांची श्रद्धा दृढ केली.
श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त, त्यांची अशीच एक लीला आज आपण पाहू या. शेगांवचे परशुराम देशमुख परम भाविक गृहस्थ होते. त्यांची श्री गजानन महाराजांवर अतिशय दृढ श्रद्धा होती. एकदा गजानन स्वामी आपल्या काही भक्तांसह विटखेड येथील श्री दत्तप्रभूंच्या जागृत स्थानाच्या दर्शनासाठी निघाले. दत्तभक्त असलेले परशुराम देशमुखही त्यावेळी महाराजांच्या सोबत होते.
भक्तवत्सल दत्तमहाराज आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतात, याची प्रचिती देणारे विटखेड हे पवित्र क्षेत्र आहे. या स्थानाची महती अशी - शेगांवातील पाटील घराण्यांत एक थोर दत्तभक्त होते. ते नित्यनियमाने दत्तप्रभूंच्या क्षेत्राची वारी करत असत. हा क्रम कित्येक वर्षे चालू होता. पुढें, वृद्धापकाळ आला, शरीरही थकले. त्यादरम्यानच्या अशाच एका वारीत त्यांनी अत्यंत करुणाभावानें दत्तमाऊलीला प्रार्थना केली, “ हे प्रभो, गेली अनेक वर्षे आपण माझ्याकडून ही वारीची सेवा करवून घेतली. आता, वृद्धावस्थेमुळे पुढील वारी होईल होईल, असे वाटत नाही. हे अत्रिसुता, तुम्ही अंतर्यामी आहात. तुमच्या दर्शनाचा लाभ मला अखंड लाभो, हेच तुझ्या चरणीं मागणे !” त्याच रात्री दत्तप्रभूंनी त्या भक्ताला स्वप्नदृष्टांत दिला. दत्तमहाराज स्वतः तिथे प्रकटले आणि त्या दत्तभक्तास अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, “ वत्सा, तुझ्यावर माझी कृपा नेहेमीच राहील. ही दत्तमूर्ती घे, अन तुझ्या पूजेत नित्य ठेव. यापुढें तुझ्या घरीच तुला सदैव माझे दर्शन होईल. तुला आता ही वारी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, घरी जाईपर्यंत ही मूर्ती तू कोठेही भूमीवर ठेवू नकोस.”
आपल्या इष्टदेवतेचा हा कृपाप्रसाद मिळाल्याने ते दत्तभक्त अतिशय आनंदित झाले आणि ती सुरेख अशी दत्तमूर्ती घेऊन सत्वर शेगांवी येण्यास निघाले. दत्तात्रेयांच्या आज्ञेचे पालन करीत त्यांनी ती दत्तमूर्ती कोठेही भूमीवर ठेवली नाही. मात्र, विटखेड इथे येताच त्यांना या गोष्टीचे पूर्णतः विस्मरण झाले आणि काही कारणाकरिता अगदी अनावधानाने त्यांनी ती दत्तमूर्ती जमिनीवर ठेवली. ‘ईश्वरेच्छा बलियसी !’... हेच खरें, अर्थात त्या भगवंतांच्या लीलेला कोण बरें जाणू शकणार ? पाटलांनी ती दत्तमूर्ती भूमीवर ठेवताच ती मूर्ती जमिनीत गुप्त झाली. ते पाहताच, त्या दत्तभक्तांना दुःखावेगाने अश्रू अनावर झाले अन ते पुनः पुनः दत्तप्रभूंची करुणा भाकू लागले. करुणासागर दत्तात्रेयांनी पुन्हा एकदा त्यांना दर्शन दिले आणि अत्यंत वत्सलतेने बोलू लागले, “ अरे तू दुःखी होऊ नकोस. मी सदैव या स्थानीं वास करेन. तू दररोज इथे येऊन माझे दर्शन घेत जा.” एव्हढें बोलून दत्तमहाराज गुप्त झाले. आजही या ठिकाणी दत्तभक्तांना महाराजांच्या कृपेची अनुभूती येते.
तर अशा या जागृत क्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी श्री गजानन महाराज बैलगाडीत बसून आपल्या भक्तांसह निघाले. तिथे पोहोचताच दत्तस्थानापासून काही अंतरावरच त्या सर्वांनी बैलगाड्या लावल्या, अन ते अनसूयानंदनाच्या दर्शनास पायीं निघाले. परशुराम देशमुख यांस महाराजांना तिथे एकटे सोडून दर्शनास जाणे योग्य वाटले नाही. त्यांमुळे श्री गजानन समर्थांनी वारंवार आग्रह करूनही ते इतर भक्तांसोबत गेले नाही अन हात जोडून महाराजांना म्हणाले, “ हे सद्गुरो, माझ्यासाठी तुम्हीच दत्तप्रभू आहात. तुमचे केलेले नित्य पूजन, तुम्हांला मनोभावें केलेले नमन श्री दत्तात्रेयांच्या चरणीं रुजू होते, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.” परशुराम देशमुखांचा तो निर्मळ भाव जाणून श्री गजानन महाराजांनी त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांचे सगुण दर्शन घडवले.
“शेगावकर श्री संत चरित्रामृत” या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन करतांना ग्रंथकार लिहतात -
“ तो तेथे अद्भुत लीला जाहली । जोगीवेशी अकस्मात मूर्ती आली ॥ ... हेच ते गंगापूरचे दत्त म्हणुनी । नमस्कार घाल सद्गुरुस ॥”
त्यावेळी, दत्तमहाराजांच्या सोबत चार श्वानही होते. परम भाग्यवंत अशा परशुराम देशमुखांनी दत्तप्रभूंच्या चरणीं मोठ्या भक्तिभावाने माथा टेकला अन अत्यंत श्रद्धेने आपल्या आराध्यदेवतेचे दर्शन घेतले. पुढे, श्री दत्तात्रेय अन दोन श्वान अदृश्य झाले. उरलेले दोन श्वान श्री गजानन महाराजांबरोबर शेगांवास आले. त्यापैकी एकाला महाराज ‘मोतीराम’ म्हणून हाक मारीत असत अन तो समर्थांचा अत्यंत लाडका होता.
आजही, श्री गजानन महाराज त्यांच्या भक्तांना दर्शन देतात, प्रचिती देतात मात्र त्यासाठी आपला भावही निर्मळ हवा. श्री गजानन बावनीमधील, ‘गजाननाच्या अद्भुत लीला । अनुभव येती आज मितीला ’ या ओव्यांचा अनुभव असंख्य भक्तांनी खरोखर घेतला आहे.
संदर्भ : श्रीगजानन आचार्यपीठ
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचावे असे काही -
No comments:
Post a Comment