Sep 30, 2021

श्री स्वामी समर्थ नवपदी















॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


मंगलमूर्ती तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

दीनोद्धारा दीनदयाळा l जगत्पालका तव शरणं ॥१

करुणामूर्ती तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

भक्तपालका भक्तवत्सला l भक्तोद्धारक तव शरणं ॥२

महन्मंगला तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

सर्वात्मका सर्वेश्वरा l संचारेशा तव शरणं ॥३

सत्चितघना तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

विद्याधीशा विद्याधरा l ज्ञानसागरा तव शरणं ॥४

सर्वांभूते तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

ब्रह्मनायका ब्रह्मानंदा l सहजसुंदरा तव शरणं ॥५

विश्वचेतना तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

विश्वरक्षका विश्वभूषणा l विश्वमोहना तव शरणं ॥६

पंचेश्वरजनका तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

करुणाघना करुणालया l आदिस्वरूपा तव शरणं ॥७

श्रीगुरुनाथा तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

कृपावंता कृपावत्सला l कृपामूर्ती तव शरणं ॥८

राजराजसा तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l

जय जगदीशा जय परमेशा l श्री गुरुराया तव शरणं ॥९


॥ श्री स्वामीसमर्थार्पणमस्तु


Sep 22, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ३


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे आपल्या कुलस्वामींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे महारूद्रराव गेले असता, श्री विठ्ठलमूर्तीच्या जागी त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या अक्कलकोटनिवासी योगिश्वरांच्या कृपेनें हा अद्वैताचा साक्षात्कार घडल्यावर महारूद्ररावांची त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली अन आपली श्रीगुरुदेवमूर्ति कधी एकदा पाहीन, असा ध्यास लागला. पुढें काही दिवसांनी अक्कलकोटास जाण्याचा योग आला आणि श्री स्वामी समर्थ हेच आपले कुलदैवत रुक्मिणीकांत श्रीजनार्दन आहेत असा भाव ठेवून त्यांनी महाराजांना लोटांगण नमन घातले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांत असतांना काही ठराविक भक्तमंडळींच्या गृहीं वारंवार येत असत. तेथील ग्रामजोशी बाळकृष्णबुवा हे त्या भाग्यवंत भक्तांपैकीच एक होते. ते विद्वान, वैष्णव आणि ज्योतिषी असून अनेक लोक आपले कार्य प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या घरी सतत येत असत. त्याशिवाय स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरगावांहून येणारी गणपतराव अरब आदि अनेक मंडळीही बाळकृष्णबुवांच्याच घरी मुक्कामास राहत असत. हैदराबादचे हे गणपतराव अरब हे मराठी, पण त्यांच्याकडे निजामाचा अरब रिसाला होता. त्यामुळे, त्यांना अरब नाव पडले. हे श्री दत्तभक्त होते. सदाचारी, विद्यासंपन्न आणि सुस्वभावी असे बाळकृष्णबुवा अत्यंत अगत्यपूर्वक सर्वांचे आतिथ्य करीत असत. त्यांच्याच गृही महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसहित उतरले. मनोभावें श्री स्वामीराजांचे पूजन करून त्यांनी सहस्र-भोजन समाराधना केली. शुक्ल पक्षींच्या चंद्रकलासम । श्रीस्वामीसमर्थ चरणीं निरुपम । महारूद्ररावांची शुद्धभक्ति नि:सीम । जडली सप्रेम सर्वदा ॥ अशा रीतीने श्री समर्थांचे कल्याणप्रद असे आशीर्वचन घेऊन अत्यंत समाधानाने महारूद्रराव आपल्या घरीं केज येथे परतले. ते श्री नृसिंह-मुनींचे नित्य स्मरण करीत असत. अक्कलकोटाहून घरीं आल्यावर पुढे चार-आठ दिवसांतच महारूद्ररावांना पुनः श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती आली. त्यांच्या जागेंत काही काम सुरु होते, आणि तिथेच त्यांना द्रव्याचें हांडे सापडले. विपुल अशा धनसंपत्तीचा लाभ झाल्याने सर्व देशपांडे मंडळी अत्यंत आनंदित झाली. दिवसोंदिवस भाग्यकाळ वृद्धिंगत होऊ लागला, ' जगन्नाथ स्वामी सदाशिव कृपाल । साह्य होतां काय उणे ' या उक्तीची प्रचिती येऊ लागली आणि महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थ चरणीं भक्ती अधिकच दृढ होऊ लागली. गृहस्थाश्रमीं असूनही त्यांची आपल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा होती, आपल्या या आराध्यदैवतास ते अनन्यभावें शरण आले होते. असेच एकदा, महारूद्रराव सहपरिवार श्री महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले आणि नेहेमीप्रमाणेच श्री बाळकृष्णबुवांच्या गृहीं मुक्कामास उतरले. नित्यनियमांनुसार, श्री दत्तगुरु स्वामी समर्थांचे दर्शन झाले खरें, मात्र त्यावेळीं महारूद्ररावांना ज्वर येऊन वायुप्रकोप झाला. वैद्योपचार घेऊनही उतार पडण्याची काहीच चिन्हें दिसेनात आणि बघतां बघतां त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली. ते या आजारांतून वाचतील अशी काहीच लक्षणें दिसत नव्हती. देशपांडे कुटुंबियांचा आता मात्र धीर खचला आणि श्री स्वामी समर्थांनाच आता शरण जावें, त्याशिवाय आता कुठलाच मार्ग नाही असा विचार त्या सर्वांनी केला. तेव्हा, महारूद्ररावांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमराव त्या जगत्सूत्रधारक समर्थांकडे आले आणि अत्यंत चिंतीत होऊन ' आमचे पित्याची घातली घटिका । त्यावीण आमचा प्रपंच लटिका । प्राप्त व्हावी कृपारूप अंजनगुटिका । ' अशी त्यांची करुणा भाकली. ' हे दयासागरा, तुम्हीच सर्वथा आमचे मायबाप आहात, असे म्हणत त्याने श्रीमद्दत्तात्रेय स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे चरण दृढतेने धरले. त्याची प्रार्थना ऐकून करुणाघन कळवळले आणि आश्वासक स्वरांत म्हणाले, " अरे तुझ्या पित्यास लवकरच बरें वाटेल आणि तो व्याधीमुक्त होईल. तू अजिबात चिंता करू नकोस, सत्वर आपल्या स्वस्थानीं जा." समर्थांचे ते अमृतवचन ऐकताच रघूत्तमरावांस संतोष वाटला आणि स्वामींचा तीर्थप्रसाद घेऊन ते धावतच आपल्या बिऱ्हाडीं परतले. आपल्या पित्यास ते तीर्थ देऊन ते स्वामीनाम जपू लागले. अन काय आश्चर्य ! महारूद्ररावांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ' आठ चार दिवसांत आला शुभ प्रत्यय । महारूद्ररावांची प्रकृति झाली निरामय ' स्वामीभक्तहो, त्या पूर्णप्रतापी योगीश्वराची कृपा असता अशक्य काय ते सांगा बरें ? महारूद्ररावांना आरोग्यप्राप्ती झाल्यामुळे देशपांडे कुटुंबीय अतिशय सुखावले. रघूत्तमराव सत्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना अनन्यभावानें वंदन करून म्हणाले, " हे दयाघना, आपल्या आशीर्वादाने माझ्या पित्यावर आलेले गंडांतर दूर झाले. ते व्याधीमुक्त होऊन त्यांना आरोग्यता लाभली. स्वामी, मला आपल्या चरणीं दहा सहस्त्र रौप्यमुद्रा अर्पण करण्याची इच्छा आहे, आपण त्यास अनुमती द्यावी." त्यांचे हे बोल ऐकून त्या ब्रह्मांडनायकास हसू आले आणि अत्यंत प्रसन्नतेने ते म्हणाले, " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.


Sep 21, 2021

दत्तात्रेय हा स्मरां सुखे हो चतुराक्षरी मंत्र


श्री नृसिंहवाडी पालखी पद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


दत्तात्रेय हा स्मरां सुखे हो चतुराक्षरी मंत्र l परब्रह्म हा विष्णु दिगंबर अनसूया पुत्र ॥धृ.

दश नादाहूनि परता अक्षय परमामृतकंद l दयाळ व्यापक हा योगीं ध्यातीं मुनिवृंद l

दचके ज्याचे नाम ऐकता महाकाळ लौंद l दर्शन होता क्षणमात्रेची जीव परमानंद ॥१

तारक आहे भक्त जनांसी ज्ञानाचा दाता l तात मात हा विश्वप्रजेचा दुष्टांचा हंता l

तामस राजस सत्त्व गुणांचा भेदभाव हर्ता l तापत्रय हो सज्ज निमाले ही ज्याची सत्ता ॥२

त्रैमूर्तिचे मूळ अनादी परम फार सूत्र l त्रैयात्मक निजसरस्वतीचे केले सर्वत्र l

त्रय नादाहूनि बिन्दुक लावुनि निर्मल निजतंत्र l त्रैलोक्याचा पालनकर्ता स्मरतां अणुमात्र ॥३

यत्नानेको भेद जयाची बोलूची नयें l यम नियमाचे अष्टांगादि नेणति अभिप्राये l

यत्र यत्र सो नेती नेती म्हणता अनुमाये l यदा तदा तो सन्मुख जेथे नाथ कृपा होये ॥४

दत्तात्रेय हा स्मरां सुखे हो चतुराक्षरी मंत्र l परब्रह्म हा विष्णु दिगंबर अनसूया पुत्र

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Sep 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - २


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

मोगलाई प्रांतात आंबे-जोगाईनजिक केज नांवाचे छोटेसे गांव आहे. तेथे महारुद्र देशपांडे नामक ऋग्वेदी ब्राह्मण जहागिरदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचाही वरदहस्त त्यांच्या घराण्यांवर होता. महारूद्ररावांना दोन कनिष्ठ बंधू होते. एके काळीं काही कारणांनी त्यांचे निजाम-सरकारांतील उत्पन्न जप्त झाले होते. ते सोडविण्यासाठी या तीन बंधूंनी विशेषतः महारूद्ररावांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांस यश आले नाही. त्याकाळी, बीड प्रांतात श्रीरामानंद बीडकर महाराज हे साधुपुरुष प्रसिद्ध होते. परब्रह्मस्वरूप अक्कलकोट स्वामी समर्थांचे ते कृपांकित शिष्य होते. महारूद्ररावही त्यांच्या दर्शनास वारंवार जात असत. असेच, एकदा ते दर्शनासाठी गेलें असता, त्यांनी बीडकर महाराजांस आपलें अडलेले कार्य पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांवर त्या संतपुरुषानें महारूद्ररावांना अक्कलकोट येथे जाऊन तेथील परमहंस स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असे सांगितले. श्री स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्न पुन्हा लवकरच सुरु होईल असा त्यांनी विश्वास दिल्यानंतर महारूद्रराव ह्यांस आशेचा किरण दिसु लागला. त्यानुसार, लवकरच ते अक्कलकोटास रवाना झाले. महाराज त्यावेळीं विरुपाक्ष मोदींच्या गृहीं आहेत हे समजताच श्रीफलादि पूजा साहित्य घेऊन ते समर्थांच्या दर्शनास निघाले. देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पून । घातले प्रेमे साष्टांग नमन । तदा महारूद्ररावांचे हृद्गत जाणून । अवधूत निरंजन वदले - " तुम्ही चार मनोरे आहेत तेथे जावें, म्हणजे तुमचे शेत सोडुन देऊ..!! ". हे आशीर्वचन ऐकताच महारूद्ररावांना श्री स्वामी समर्थांच्या अंतर्साक्षीत्वाची प्रचिती आली आणि स्वामींचरणी त्यांची श्रद्धा दृढ झाली. त्याच दिवशी भोजन झाल्यावर स्वामींची आज्ञा घेऊन ते हैद्राबादेस निघाले. समर्थांच्या वचनांवर त्यांचा विश्वास होताच, तेव्हा वंदूनि श्रीदत्त-दिगंबरपदांस । त्वरेकरूनि निघाले ।


त्यावेळी हैद्राबाद येथील निजाम सरकार दरबारी उच्चपदस्थ मुख्य अधिकारी असलेले श्री शंकरराय राजा राजराया हे श्री स्वामी समर्थांचे खास भक्त होते. श्री स्वामी महाराजांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन महारूद्ररावांस सहाय्य करावे असे सांगितले. आपल्या सद्‌गुरुंची अर्थात श्रीस्वामी समर्थ महाराजांची ही आज्ञा प्रमाण मानून शंकरराय राजा राजराया यांनी महारूद्रराव यांना त्यांची जहागिरीची सनद आणि मानमरातब पूर्ववत मिळवून दिले. अशाप्रकारे हैद्राबाद शहरी येताच अगदीच अनपेक्षितरित्या त्यांचे उत्पन्नाचे अडलेले काम सहजच पूर्ण झाले. याच कार्यासाठी पूर्वी अनेक प्रयत्न-साधने केली होती, द्रव्यही खर्चले होते, परंतु बराच काळ वाट पाहूनही यश काही आले नव्हते. मात्र तेच श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होताच, अगदीच विनासायास साधले गेले. श्री स्वामीकृपेची अशी प्रचिती येताच, महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थांच्या ठायीं श्रद्धा, भक्ती अधिकच दृढ झाली. स्वामीभक्तहो, ' विश्वास: फलदायक: ' असे शास्त्रवचन आहे. अर्थात विश्वासच फलद्रूप होतो, याचा पुरेपूर अनुभव देशपांड्यांना आला. पूर्ववत उत्पन्न मिळताच, महारूद्रराव त्वरित अक्कलकोटास आले. श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांनी सर्व वृत्तांत कथिला. मूळच्याच भक्तिवंत असलेल्या महारूद्ररावांनी समर्थांचे श्रद्धापूर्वक पूजन केले, त्यांना महानैवेद्य अर्पण केला आणि भरपूर दानधर्मही केला. काही दिवस अक्कलकोट नगरीत राहून ते केजधारुरास परतले.

पुढें काही दिवसांनी, महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या कुलदेवतेच्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी, भूलोकीचे वैकुंठ अर्थात पंढरपूर येथे आले. चंद्रभागेत स्नान करून ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना ' तो विटेवरी विठ्ठल-पांडुरंग-मूर्ति नसून । दिसले संन्यासी दैदीप्यमान । विटेवर उभे कटीवर हस्त ठेवून ।' असा अनुभव आला. मंदिरातील विठ्ठलमूर्तीच्या स्थानी त्यांना श्री अक्कलकोटस्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या यतींद्रमूर्तीच्या मनोहर दर्शनाने देशपांडे यांना अतिशय हर्ष झाला आणि अपूर्व अशी चित्तशांती त्यांनी अनुभवली. आपले कुलस्वामी पंढरीनाथ विठ्ठल आणि यतीश्वर अभिन्न स्वरूप असून एकाच परब्रह्माचे मूर्तिमंत चैतन्याविष्कार आहेत, हेच समजाविण्यासाठी योगीराज श्री स्वामी समर्थांनी सहज लीलेने हा चमत्कार महारूद्ररावांना दाखविला. पुढें, षोडषोपचारें श्रीविठ्ठल पूजन, यथाशक्ति ब्राह्मणभोजनादि करून देशपांडे आपल्या ग्रामीं परतले. मात्र, अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असा त्यांना ध्यास लागला. - महारूद्ररावांचे चित्ती । तळमळ लागली दर्शन-प्रीति । केव्हां पाहीन श्रीगुरुदेवमूर्ति । स्वामीसमर्थ जगदीश

क्रमश:
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत


Sep 15, 2021

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय ५ आणि उत्तरपूजन


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥


अध्याय ५

॥ श्रीदत्त ॥ सूत म्हणाले, " शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा, हा परमेश्वर ( दत्तात्रेय ) आहे. हे मुनिश्रेष्‍ठ हो, पुन्हा आदराने त्यांची महती श्रवण करा.॥१॥ गोदावरीतटी राहणारा हरिशर्मा नामक एक ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म ( पानथरी ), आठ वर्षांचा क्षय, तीन वर्षांचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा दमायुक्त अतिसार व चार महिन्यांपासून भगंदर हे विकार झाले होते.॥२-३॥ शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली त्याची सोळा वर्षांची पत्नी, परम दत्तभक्त विष्णुदत्तांना शरण गेली,॥४॥ व त्यांना म्हणाली, "हे ब्राह्मणदेवा, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत."॥५॥ त्या साध्वी स्त्रीने अशाप्रकारे प्रार्थना केली असता, दयाळू विष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करुन त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यदत्तव्रत करविते झाले.॥६॥ त्या व्रतप्रभावानें, क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर विष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या ह्रदयाला स्पर्श करुन उपनिषन्मंत्राचा जप केला.॥७॥ त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा लाभ करुन घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला.॥८॥ याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक, तुष्‍टी देणारे, पुष्‍टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे."॥९॥ वेदधर्मा म्हणाले, "हे दीपका, असे सूतांच्या मुखातून श्रवण करुन, नैमिष्यारण्यातील महर्षींनी, एकाग्रचित्त होऊन, श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत केले.॥१०॥ हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे, एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या चरणकमलांचे ध्यान करू लागले.॥११॥ नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे, असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले.॥१२॥ उदय पावणार्‍या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणार्‍या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत.॥१३॥ नेत्र मिटून ते ब्राह्मण शांतपणे, ह्रदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करु लागले.॥१४॥ आम्हांला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असतांना, मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो, नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत्स्वरुप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करु लागले.॥१५॥ ऋषी म्हणाले, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णाश्रमचिह्न धारण करणारेही नाही, तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरुप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे.॥१६॥ आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, व सत्य असे तेजोमय रुप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात.॥१७॥ तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् ! हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरुप आहे आणि तू सर्वात्मा आहेस.॥१८॥ तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरुपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या आठ रुपांनी जगन्मय तूच भासत आहेस.॥१९॥ तुझे अत्यंत गूढ असे स्वरुप, सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रुप आम्ही काही प्रमाणांत जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे."॥२०॥ वेदधर्मा ऋषी पुढे कथन करू लागले. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्‍ट झालेले परमात्मा दत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी दाखवून मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले,॥२१॥ "हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादि साधनानुष्‍ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्‍ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्‍ट तो वर मागून घ्या."॥२२-२३॥ त्यावेळी शौनकादि ऋषी म्हणाले, "हे महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरुपाचे ज्ञान करुन देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर. कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे ? आपणच आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरी योग्य असा अनुग्रह करा."॥२४॥ तेव्हा श्रीसत्यदत्त म्हणाले, "जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले, ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे.॥२५॥ हे उत्तम अनुष्‍ठानशील ब्राह्मणहो ! तुम्ही या जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणार्‍या माझ्या परमानंदस्वरुप श्रेष्‍ठपदाला प्राप्त व्हाल, यात शंका नाही.॥२६॥ तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्‍ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशांत स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील.॥२७॥ या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षू पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्‍ट असेल, ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने प्राप्त होईल."॥२८॥ श्रीवेदधर्मामुनी म्हणाले," दीपका,याप्रमाणे बोलून, स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी, देवाधिदेव श्रीदत्तराज एकदम अंतर्धान पावले. हे अवलोकन करुन शौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले.॥२९॥ वत्सा श्रीदीपका, असा ज्या श्रीप्रभूंचा प्रभाव आहे अशा, शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणार्‍या सर्वेश्वर श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करुन तूही परमानंदाला प्राप्त हो."॥३०॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा पाचवा अध्याय आहे.
॥ इति सत्यदत्त व्रतोपाख्याने पंचमोध्यायः ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीदत्त ॥ 
**********************************************************
उत्तरपूजन 

अध्याय कथा वाचन पूर्ण झाल्यावर, 
॥ अनेन यथा शक्ति श्री सत्यदत्त व्रतकथा वाचनेन नैवेद्यसाहित पूजनेन श्री दत्तात्रेय: साङग: सपरिवार: प्रियताम् ॥ 
हा मंत्र म्हणून उत्तर पूजन करावे. 
नंतर, दीपारती अथवा कर्पूरारती करावी. 

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ॥ दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व । कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व । 
योग याग तप दान नेणती असताही अपूर्व । सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ॥१॥
अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती । भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलती त्रयमूर्ति । 
नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदति । परिसुनि होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र । ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तो उपेंद्र । 
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारका योगीन्द्र । वासुदेव यच्चरण चिंतूनि हो नित्यातंद्र ॥३॥ 

त्यानंतर, श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचित घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् म्हणावे. 
॥ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ॥
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ॥
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् । भीतिं क्लेशं त्वं हराऽऽशु त्वदन्यम् ॥
त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं
घोरकष्टोद्धारणस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ यस्या स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु । न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तम् अच्युतम् ॥ अशी श्री दत्तात्रेयांची प्रार्थना करावी. 
॥ ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥  






॥ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ॥ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु