Aug 27, 2016

॥ श्रीगुरू दत्तात्रेय धावा ॥


|| श्री गणेशाय नमः ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


गुरुराया, नरहरी दत्तात्रेया, येई येई बा, करुणासागरा, पुरुषोत्तमा, नरहरी कल्पद्रुमा, अठरा पुराणा, तव महिमा, न कळे निगमागमा, पतितपावना, करुणालया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१ ||


तापत्रयाने, तापविले, देह माझे कष्टविले, कोठे विश्रांती, नाढळे, चरण तुझे सापडले, आता कृपेची, करी छाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२ ||


कामक्रोधादी, अहंकार, उठती वारंवार, अंगी मातला, अविचार पडला, अंधकार, स्त्रिया पुत्रांची, बहुमया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||३||


वर्णू मी तव कीर्ती, लवलाही, रजकाला पाछाई, दिधली क्षणात त्वा, तू काही, तूची बापमाई, अघटीत घटना तुझी, बा सखया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||४ ||


नवस करुनी तुला, निघाला, धनिक उदिमा गेला, लाभ चौगुणी, त्या झाला, चोरांनी मारिला, तस्कर वधूनिया, उठविसी तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||५ || 


अन्न भक्षिता, उठे शूळ, विप्र करी तळमळ, प्राण त्यागिता, तात्काळ, आणविसी आपणाजवळ, अन्नची औषध दे, भक्षाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||६ || 


करवीर क्षेत्रीचा, द्विजपुत्र, विद्येवीण अपवित्र, जिव्हा छेदुनिया, अहोरात्र, करी भुवनेश्वरीस्तोत्र, देशी चौदाही, विद्या तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||७ || 


अन्नपूर्णा तुज, करजोडी, पक्वान्ने बहु वाढी, घेवड्या शेंगाची, तुज गोडी, भला दिनाचा गडी, देशी घागर भरून,पुतळया तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||८ ||


शिरोळ ग्रामीची, द्विजनारी, पुत्र समंध मारी, ठेवी कलेवर, औदुंबरी, म्हणे पाव श्रीहरी, उठविसी तात्काळ पुत्र तया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||९ || 


वांझ महिशीचे, दुग्ध पिसी, विप्रस्त्री सुखविसी, पतिता मुखी वेद, बोलविसी, द्विजगर्वा छेदिसी, नकळे कवणाला, तव चर्चा, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१०||


त्रिविक्रम भारती, करी निंदा, म्हणे हा दांभिक धंदा, विश्वरूप तया, मुकुंद, दाखविसी गोविंदा, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||११ ||


माहूर पुरीचा, रोगी पती, घेउनी निघाली, सती मार्गी, मरण आले, तयाप्रती, करी बहू काकुळती, देशी अभय तिच्या, सौभाग्या, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१२ || 


सत्कर्माचरणी, बहुश्रुत, नेमे वरिले चित्त, परान्न भक्षाया, उदित, स्त्री बहु तळमळीत, आज्ञा देऊनिया, दांपत्या विपरीत, देखे जाया, आली बा भेटाया, तव पाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१३ ||


तीन पात्रांची, सामुग्री, ब्राह्मण भिक्षा करी, छाटी झाकुनिया, अन्नावरी, जेविले सह्स्त्रचारी, कीर्ती झाली, बा जगत्रया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१४ ||


साठ वर्षांची, म्हातारी, वंध्या पदर पसरी, करुणा आली बा, तुज नरहरी, देशी पुत्रकुमारी, समर्थ दुखःचि तू, हराया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१५ ||


श्वेतकुष्टाने, व्यापिला, ब्राह्मण धावत आला, रक्षी रक्षी म्हणे, दयाळा, शुष्ककाष्ट द्रुम केला, निर्मल झालिबा, तत्काया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१६ ||


तंतुक भक्त तुझी, करी सेवा, म्हणे पावगा देवा, दर्शन श्रीशैल्या, महादेवा, करवि ये केशवा, माता पिता तू, गुरुराया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१७ ||


देवा दिपवाळीचे, दिवशी, अष्टरूप झालासी, भिक्षा आठ गृही, तू घेसी, दीनबंधू म्हणविसी, करीशी भक्तासी, बहु माया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१८ || 


गाणगग्रामीचा, कुलवाडी, मार्गी उभा कर जोडी, आडवा पुढे पडे, घडो घडी, पीक हजारो खंडी, देसी शूद्राला, स्वामीया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||१९ || 


सायंदेव पंत, निजभक्त, तव भजनी आसक्त, दिधले तयासी बा, नीज तक्त, अशा कथा अनंत, शेषादिक थकले, गुणगाया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२० || 


केवळ मतिमंद, मी पातकी, बहु जन्माचा दुःखी, वसंत आत्मजा, करा सुखी, कृपादृष्टी अवलोकी, ठेवा हात शिरी, करा दया, नरहरी दत्तात्रेया येई येई बा, गुरुराया, स्वामी दत्तात्रेया, येई येई बा ||२१ || 


|| श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतीमहाराजार्पणमस्तु ||


Aug 11, 2016

कन्यागत महापर्वकाल - सिंहस्थ - कुंभमेळ्याइतकीच पवित्र दैवी पर्वणी


|| हर हर गंगे ॥ हर हर कृष्णे ॥


दर १२ वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाल हा  सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू होणार असून तो १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत असा १३ महिने सुरू राहणार आहे. यामध्ये एकूण ६२ पर्वकाळ आहेत. त्यातील ६ मुख्य पर्वकाळ आहेत. गुरू जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे कुंभमेळा साजरा होतो. गुरू जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा गोदावरी नदीच्या किनारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ महापर्वकाळ साजरा होतो. अगदी तसेच गुरू जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कृष्णा नदीच्या किनारी नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. गेल्या हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. कन्यागत म्हणजे कन्येमध्ये गेलेला. भारतामध्ये प्रतीवर्षी सर्वत्र लहान मोठे असे नद्यांचे मेळे सुरु असतात. त्यातील २५० हून अधिक मेळे प्रसिद्ध आहेत. गुरु हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक़्काम ठोकून असतो. त्यावेळी देशाच्या विविध भागांमध्ये नद्यांच्या किनारी उत्सव सुरु असतात. या नद्यांच्या उत्सवांनाच महापर्वकाल असे म्हणतात. अशा वेळी जिथे महापर्वकाल असतो त्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण झालेले आहे अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते. जणूकाही भक्तांची आर्तता पाहून गंगा नदी स्वत:हून त्यांना भेटायला तेथील नदीमध्ये येवून वास करते अशी ही महापर्वकालाची संकल्पना आहे. या महापर्वकालालाच सिंहस्थ, कुंभमेळा, पुष्कर स्नान, कन्यागत महापर्वकाल इ. नावांनी ओळखले जाते.   

          सह्याद्री पर्वतावर धोम महाबळेश्वर नावाची एक पर्वतरांग आहे. या डोंगरावर श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे १२२० मीटर एवढ्या उंचीवर वसलेले आहे. येथेच सात नद्यांचे उगम मंदिर आहे. आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा येथे उगम होतो. या ठिकाणापासून पाण्याचे स्त्रोत सुरु होतात. आता तिथे कुंडे बांधली आहेत. या सात कुंडांची नावे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती अशी आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरु असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रुपाने वास करुन असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही. गायत्री कुंडातून साठ वर्षातून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गायत्रीचे दर्शन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच होऊ शकते.

          गंगा भागिरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगा कुंडातून जलस्त्रोत सुरु होतो आणि तो सतत वर्षभर सुरु राहतो. गुरु कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केला की पुन्हा गंगा कुंड कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडे राहते. बारा वर्षांनंतर गुरुने कन्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश केला की गंगा कुंडातून जलप्रवाह सुरु होतो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात.  


Jul 29, 2016

॥ श्रीगुरुचरित्र अध्याय ५२ - अवतरणिका ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविन्दाभ्यां नमः

॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः I गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ॐ ॥

श्रोते व्हावे सावधान I श्रीगुरुचरित्राध्याय एकावन्न I ऐकोनि नामधारकाचे मन I ब्रह्मानंदी निमग्न पै ॥१॥ सेवूनि गुरूचरित्रामृत I नामधारक तटस्थ होत I अंगी घर्म-पुलकांकित I रोमांचही ऊठती ॥२॥ कंठ झाला सद्‌गदित I गात्रे झाली संकपित I विवर्ण भासे लोकांत I नेत्री वहाती प्रेमधारा ॥३॥ समाधिसुखे न बोले I देह अणुमात्र न हाले I सात्विक अष्टभाव उदेले I नामधारक-शिष्याचे ॥४॥ देखोनि सिद्ध सुखावती I समाधि लागली यासी म्हणती I सावध करावा मागुती I लोकोपकाराकारणें ॥५॥ म्हणोनि हस्ते कुरवाळिती I प्रेमभावें आलिंगिती I देहावरी ये ये म्हणती I ऐक बाळा शिष्योत्तमा ॥६॥ तूं तरलासि भवसागरी I रहासी ऐसा समाधिस्थ जरी I ज्ञान राहील तुझ्या उदरीं I लोक तरती कैसे मग ॥७॥ याकारणें अंतःकरणी I दृढता असावी श्रीगुरुचरणीं I बाह्य देहाची रहाटणी I शास्त्राधारें करावी ॥८॥ तुवां विचारिले म्हणोनि I आम्हां आठवली अमृताची वाणी I तापत्रयाते करी हानि I ऐशी अनुपम्या प्रगटली ॥९॥ तुजमुळे आम्हां आठवले I तुवां आम्हां बरवें केलें I त्वांही एकाग्रत्वे ऐकिलें I आता हेंच विस्तारी ॥१०॥ नामधारका ऐशियापरी I सिद्ध सांगती परोपरी I मग तो नेत्रोन्मीलन करी I कर जोडोनि उभा ठाके ॥११॥ म्हणे कृपेचे तारुं I तूंचि या विश्वास आधारू I भवसागर पैलपारु I तूंचि करिसी श्रीगुरुराया ॥१२॥ ऐसे नामधारक विनवीत I सिद्धाचे चरणी लागत I म्हणे श्रीगुरूचरित्रामृत I अवतरणिका मज सांगा ॥१३॥ या श्रीगुरूचरित्रामृती I अमृताहूनि परमामृती I भक्तजनांची मनोवृत्ति I बुडी देवोनि स्थिरावली ॥१४॥ मी अतृप्त आहे अजूनि I हेचि कथा पुनः सुचवोनि I अक्षयामृत पाजूनि I आनंदसागरी मज ठेवा ॥१५॥ बहु औषधींचे सार काढोन I 'त्रैलोक्यचिंतामणी' - रसायण I संग्रह करिती विचक्षण I तैसे सार मज सांगा ॥१६॥ ऐकोनि शिष्याची प्रार्थना I आनंद सिद्धाचिया मना I म्हणती बाळका तुझी वासना I अखंड राहो श्रीगुरूचरित्री ॥१७॥ श्रीगुरूचरित्राची ऐका I सांगेन आतां अवतरणिका I प्रथमपासूनि सारांश निका I एकावन्नाध्यायपर्यंत ॥१८॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण I मुख्य देवतांचे असे स्मरण I श्रीगुरूमूर्तीचे दर्शन I भक्ताप्रती जाहलें ॥१९॥ द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती I चारी युगांचे भाव कथिती I श्रीगुरुसेवा दीपकाप्रती I घडली ऐसे कथियेले ॥२०॥ नामधारका अमरजासंगमा I श्रीगुरू नेती आपुले धामा I अंबरीष दुर्वास यांचा महिमा I तृतीयाध्यायी कथियेला ॥२१॥ चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती I छळावया त्रैमूर्ति येती I परी तियेचे पुत्र होती I स्तनपान करिती आनंदे ॥२२॥ पंचमी श्रीदत्तात्रेय धरी I स्वयें अवतार पीठापुरी I ' श्रीपाद-श्रीवल्लभ ' नामधारी I तीर्थयात्रेसी निघाले ॥२३॥ सहाव्यांत लिंग घेऊनि I रावण जातां गोकर्णी I विघ्नेश्वरें विघ्न करूनि I स्थापना केली तयाची ॥२४॥ गोकर्णमहिमा असंख्यात I रायाप्रती गौतम सांगत I चांडाळी उद्धरिली अकस्मात I सातव्या अध्यायी वर्णिती ॥२५॥ माता पुत्र जीव देत होतीं I तयांप्रती गुरु कथा सांगती I शनिप्रदोष व्रत देती I ज्ञानी करिती अष्टमीं ॥२६॥ नवमाध्यायीं रजकाप्रती I कृपाळू गुरु राज्य देती I दर्शन देऊं म्हणती पुढती I गुप्त झाले मग तेथें ॥२७॥ तस्करीं मारिला भक्त ब्राह्मण I तस्करां वधिती श्रीगुरु येऊन I ब्राह्मणाला प्राणदान I देती दशमाध्यायांत ॥२८॥ " माधव " ब्राह्मण करंजपुरीं I " अंबा " नामें त्याची नारी I 'नरसिंह-सरस्वती ' तिचे उदरीं I एकादशीं अवतरले ॥२९॥ द्वादशाध्यायी मातेप्रति I ज्ञान कथूनि पुत्र देती I काशीक्षेत्रीं संन्यास घेती I यात्रा करिती उत्तरेची ॥३०॥ माता-पित्यांतें करंजपुरी I भेटोनि येती गोदातीरीं I कुक्षिव्यथेच्या विप्रावरी I कृपा करिती त्रयोदशीं ॥३१॥ क्रूर यवनाचें करूनि शासन I सायंदेवास वरदान I देती श्रीगुरु कृपा करून I चौदाविया अध्यायीं ॥३२॥ पंचदशीं श्रीगुरूमूर्ति I तीर्थे सांगती शिष्यांप्रती I यात्रे दवडूनि गुप्त होती I वैजनाथी श्रीगुरू ॥३३II षोडशीं ब्राह्मणा गुरुभक्ति I कथूनि दिधली ज्ञानशक्ति I श्रीगुरू आले भिल्लवडीप्रती I भुवनेश्वरी-संनिध ॥३४॥ भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण I जिव्हा छेदोनि करी अर्पण I त्यास श्रीगुरुंनीं विद्या देऊन I धन्य केला सप्तदशीं ॥३५॥ घेवडा उपटूनि दरिद्रियाचा I कुंभ दिधला हेमाचा I वर्णिला प्रताप श्रीगुरूचा I अष्टादशाध्यायांत ॥३६॥ औदुंबराचें करूनि वर्णन I योगिनींस देऊनि वरदान I गाणगापुरास आपण I एकुणविंशीं श्रीगुरू गेले ॥३७॥ स्त्रियेचा समंध दवडून I पुत्र दिधले तिजला दोन I एक मरतां कथिती ज्ञान I सिद्धरुपें विसाव्यांत ॥३८॥ तेचि कथा एकविंशीं I प्रेत आणिलें औदुंबरापाशीं I श्रीगुरू येऊनि तेथे निशीं I पुत्र उठविती कृपाळू ॥३९॥ भिक्षा दरिद्र्या-घरी घेती I त्याची वंध्या महिषी होती I तीस करून दुग्धवती I बेविसाव्यांत वर दिधला ॥४०॥ तेविसाव्यांत श्रीगुरूस I राजा नेई गाणगापुरास I तेथे उद्धरती राक्षस I त्रिविक्रम करी गुरुनिंदा ॥४१॥ भेटों जाती त्रिविक्रमा I दाविती विश्वरूपमहिमा I विप्र लागे गुरुपादपद्मा I चोविसाव्यांत वर देती ॥४२॥ म्लेंछापुढें वेद म्हणती I विप्र ते त्रिविक्रमा छळती I त्याला घेऊनि सांगातीं I गुरूपाशी आला पंचविशीं ॥४३॥ सव्विसाव्यांत तया ब्राह्मणा I श्रीगुरू सांगती वेदरचना I त्यागा म्हणती वादकल्पना I परी ते उन्मत्त नायकती ॥४४॥ सत्ताविशीं आणूनि पतिता I विप्रासीं वेदवाद करितां I कुंठित करोनि शापग्रस्ता I ब्रह्मराक्षस त्यां केलें ॥४५॥ अष्टाविंशीं तया पतिता I धर्माधर्म सांगोनि कथा I पुनरपि देऊनि पतितावस्था I गृहाप्रती दवडिला ॥४६॥ एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव I त्रिविक्रमा कथिती गुरुराव I राक्षसा उद्धरी वामदेव I हा इतिहास तयांतचि ॥४७॥ त्रिंशाध्यायीं पति मरतां I तयाची स्त्री करी बहु आकांता I तीस श्रीगुरू नाना कथा I कथूनि शांतवूं पहाती ॥४८॥ एकतिसाव्यांत तेचि कथा I पतिव्रतेचे धर्म सांगतां I सहगमनप्रकार बोधिता I तें स्त्रियेतें जगद्‌गुरु ॥४९॥ सहगमनीं निघतां सती I श्रीगुरूस झाली नमस्कारिती I आशीर्वाद देवोनि तिचा पति I बत्तिसाव्यांत उठविला ॥५०॥ तेत्तिसाव्यांत रुद्राक्षधारण I कथा कुक्कुट-मर्कट दोघेजण I वैश्य-वेश्येचें कथन I करिती रायातें पराशर ॥५१॥ रुद्राध्यायमहिमा वर्णन I चौतिसाव्यांत निरुपण I राजपुत्र केला संजीवन I नारद भेटले रायातें ॥५२॥ पंचत्रिंशत्प्रसंगांत I कचदेवयानी कथा वर्तत I आणिक सोमवारव्रत I सीमंतिनीच्या प्रसंगें ॥५३॥ छत्तिसीं ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा I स्त्रियेनें नेलें परान्नभोजना I कंटाळूनि धरिती श्रीगुरूचरणा I त्याला कर्ममार्ग सांगती ॥५४॥ सप्तत्रिंशीं नाना धर्म I विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म I प्रसन्न होऊनि वर उत्तम I देती श्रीगुरु तयातें ॥५५॥ अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण I तिघांपुरतें शिजवी अन्न I जेविले बहु ब्राह्मण I आणिक गांवचे शूद्रादि ॥५६॥ सोमनाथाची गंगा युवती I साठ वर्षांची वंध्या होती I तीस दिधली पुत्रसंतति I एकुणचाळिसावे अध्यायीं ॥५७॥ नरहरीकरवीं शुष्ककाष्ठा I अर्चवूनि दवडिलें त्याच्या कुष्ठा I शबरकथा शिष्य-वरिष्ठां I चाळिसाव्यांत सांगती ॥५८॥ एकेचाळिशीं सायंदेवा- I हस्ते घेती श्रीगुरू सेवा I ईश्वर पार्वतीसंवाद बरवा I काशीयात्रा निरुपण ॥५९॥ पुत्रकलत्रेसीं सायंदेव I येऊनि करिती श्रीगुरूस्तव I त्याला कथिती यात्राभाव I वरही देती एकेचाळिसीं ॥६०॥ बेचाळिसीं अनंतव्रत I धर्मराया कृष्ण सांगत I तेचि कथा सायंदेवाप्रत I सांगोनि व्रत करविती ॥६१॥ त्रेचाळिसीं तंतुकार भक्तासी I श्रीपर्वत दावूनि क्षणेंसीं I शिवरात्रि-पुण्यकथा त्यासी I विमर्षण राजाची कथियेली ॥६२॥ चव्वेचाळिसीं कुष्ठी ब्राह्मण I आला तुळजापुराहून I त्याला करवूनि संगमी स्नान I कुष्ठ नासूनि ज्ञान देती ॥६३॥ कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास I श्रीगुरू भेटती नरहरी कवीस I आपुला शिष्य करिती त्यास I पंचेचाळिसावे अध्यायी ॥६४॥ शेचाळिसीं दिवाळी सण I गुरूसी आमंत्रिती सात जण I तितुकीं रूपे धरुनि आपण I गेले, मठिंही राहिले ॥६५॥ सत्तेचाळिसीं शूद्रशेतीं I त्याचा जोंधळा कापूनि टाकिती I शतगुणे पिकवूनि पुढती I आनंदविलें तयातें ॥६६॥ अठ्ठेचाळिसीं श्रीगुरूमूर्ति I अमरजासंगममाहात्म्य कथिती I स्नान करवूनि दवडिती I कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचें ॥६७॥ ईश्वरपार्वती-संवाद शुद्ध I मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध I नामधारका सांगे सिद्ध I एकूणपन्नासावे अध्यायीं ॥६८॥ म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती I भक्तीस्तव त्याचे नगरा जाती I पुढे श्रीपर्वतीं भेटों म्हणती I पन्नासावे अध्यायीं ॥६९॥ एकावन्नांत गुरुमूर्ति I देखोनियां क्षितीं पापप्रवृत्त्ति I उपद्रवितील नानायाती I म्हणोनि गुप्तरूपें रहावे ॥७०॥ ऐसा करूनि निर्धार I शिष्यांसी सांगती गुरुवर I आजि आम्ही जाऊ पर्वतावर I मल्लिकार्जुनयात्रेसी ॥७१॥ ऐसें ऐकूनि भक्तजन I मनीं होती अति उद्विग्न I शोक करिती आक्रंदोन I श्रीगुरूचरणीं लोळती ॥७२॥ इतुकें पाहूनि गुरुमूर्ति I वरदहस्तें तया कुरवाळिती I मद्‌भजनीं धरा आसक्ति I मठधामीं राहोनियां ॥७३॥ ऐसें बोधूनि शिष्यांसी I गुरु गेले कर्दळीवनासी I नाविकमुखें सांगूनि गोष्टीसी I निजानंदीं निमग्न होती ॥७४॥ ऐसें अपार श्रीगुरूचरित्र I अनंत कथा परम पवित्र I त्यांतील एकावन्न अध्याय मात्र I प्रस्तुत कथिले तुजलागीं ॥७५॥ सिद्ध म्हणे नामधारका I तुज कथिली अवतरणिका I श्रीगुरू गेले वाटती लोकां I परी गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥७६॥ कलियुगीं अधर्म वृद्धि पावले I म्हणोनि श्रीगुरू गुप्त झाले I भक्तजनांला जैसे पहिले I तैसेच भेटती अद्यापि ॥७७॥ हे अवतरणिका सिद्ध माला I श्रीगुरू भेटती जपे त्याला I जैसा भावार्थ असे आपुला I तैसी कार्ये संपादिती ॥७८॥ नामधारका तूं शिष्य भला I अवतरणिकेचा प्रश्न केला I म्हणोनि इतिहाससारांशाला I पुनः वदलों सत्शिष्या ॥७९॥ पूर्वी ऐकिलें असेल कानीं I त्यांतें तात्काळ येईल ध्यानीं I इतरां इच्छा होईल मनीं I श्रीगुरूचरित्रश्रवणाची ॥८०॥ ऐसी अवतरणिका जाण I तुज कथिली कथांची खूण I इचें सतत करितां स्मरण I कथा अनुक्रमें स्मरतसे ॥८१॥ ऐसें वदे सिद्धमुनि I नामधारक लागे चरणीं I विनवीतसे कर जोडोनि I तुझे वचनें सर्वसिद्धि ॥८२॥ आता असे विनवणी I श्रीगुरू-सप्ताहपारायणीं I किती वाचावे प्रतिदिनीं I हें मज सांगा श्रीगुरुराया ॥८३॥ सिद्ध म्हणती नामधारका I तुवां प्रश्न केला निका I परोपकार होईल लोकां I तुझ्या प्रश्नेंकरोनियां ॥८४॥ अंत:करण असतां पवित्र I सदाकाळ वाचावें गुरुचरित्र I सौख्य होय इहपरत्र I दुसरा प्रकार सांगेन ॥८५॥ सप्ताह वाचावयाची पद्धती I तुज सांगों यथास्थिती I शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं I सप्ताह करितां बहु पुण्य ॥८६॥ दिनशुद्धि बरवी पाहून I आवश्यक स्नानसंध्या करून I पुस्तक वाचावयाचें स्थान I रंगवल्लादि शोभा करावी ॥८७॥ देशकालादि संकल्प करून I पुस्तकरुपी श्रीगुरुचें पूजन I यथोपचारेंकरून I ब्राह्मणासही पूजावें ॥८८॥ प्रथम दिवसापासोन I बसावया असावें एक स्थान I अतत्वार्थ भाषणी धरावें मौन I कामादि नियम राखावे ॥८९॥ दीप असावे शोभायमान I देव-ब्राह्मण-वडिलां वंदून I पूर्वोत्तर मुख करून I वाचनीं आरंभ करावा ॥९०॥ सप्त संख्या अध्याय प्रथम दिनीं I अष्टादश द्वितीय दिनीं I अष्टाविंशति तृतीय दिनीं I चतुर्थ दिवशीं चौतीस पैं ॥९१॥ सदतीसपर्यंत पांचवे दिनीं I त्रेचाळीसवरी सहावे दिनीं I सप्तमीं एकावन्न वाचोनि I अवतरणिका वाचावी ॥९२॥ नित्य पाठ होतां पूर्ण I करावें उत्तरांग-पूजन I श्रीगुरुतें नमस्कारून I उपाहार कांहीं करावा ॥९३॥ याप्रकारें करावें सप्त दिन I रात्रीं करावें भूमिशयन I सारांश शास्त्राधारेंकरून I शुचिर्भूत असावें ॥९४॥ एवं होतां सप्त दिन I ब्राह्मणसुवासिनी-भोजन I यथाशक्त्या दक्षिणा देऊन I सर्व संतुष्ट करावे ॥९५॥ ऐसें सप्ताह-अनुष्ठान I करीतां होय श्रीगुरूदर्शन I भूतप्रेतादि-बाधा निरसन I होवोनि, सौख्य होतसे ॥९६॥ ऐसें सिद्धाचें वचन ऐकोनि I नामधारक लागे चरणीं I म्हणे बाळाची आळी पुरवोनि I कृतकृत्य केलें गुरुराया ॥९७॥ श्रोते म्हणती वंदूनि पायीं I श्रीगुरू केली बहु नवलाई I बाळका अमृत पाजी आई I तैसें आम्हां पाजिलें ॥९८॥ प्रति अध्याय एक ओंवी I ओंविली रत्नमाळा बरवी I मनाचे कंठीं घालितां, पदवी I सर्वार्थाची पाववी ॥९९॥ सिद्धाचें वचन रत्नखाणी I त्यांतूनि नामधारक रत्नें आणी I एकावन्न भरोनि रांजणीं I भक्त-याचकां तोषविलें ॥१००॥ किंवा सिद्ध हा कल्पतरू I नामाधारकें पसरिला करू I यांच्छा करोनि परोपकारु I भक्तांकरितां बहु केला ॥१०१॥ किंवा सिद्धमुनि बलाहक I नामधारक शिष्य चातक I मुख पसरोनि बिंदू एक I मागतां अपार वर्षला ॥१०२॥ तेणें भक्तां अभक्तां फुकाचा I सकळां लाभ झाला अमृताचा I हृदयकोश खळजनांचा I पाषाणसमही पाझरे ॥१०३॥ श्रीगुरुरायाचे धरुं चरण I सिद्धमुनीतें करूं वंदन I नामधारका करूं नमन I ऐसें करीं नारायणा ॥१०४॥ श्रीगुरुरूपी नारायणा I विश्वंभरा दीनोद्धारणा I आपण आपली दावूनि खुणा I गुरुशिष्यरूपें क्रीडसी ॥१०५॥

॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे एकपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम द्विपंचाशत्तमोSध्यायः ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


आवडे दत्तभक्तांसी ...

Jul 16, 2016

॥ नमस्काराष्टक ॥


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र प्रारंभ: I 


सदा प्रार्थितो श्रीगुरूच्या पदासी I 

धरितो शिरी वंदितो आदरेसी I 

धरोनी करी तारी या बाळकासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।१।।


मती हीन मी दीन आहे खरा हो I 

परी दास तुझा करी पांखरा हो I 

जसे लेकरू पाळीते माय कुशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।२।।


लडिवाळ मी बाळ अज्ञान तुझा I 

गुरुवाचुनी पांग फेडील माझा I 

तुझ्यावीण दुजा कुणी ना आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।३।।


पिता माय बंधु सखा तूची देवा I 

मुले मित्रही सोयरे व्यर्थ हेवा I 

कळोनी असे भ्रांती होई आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।४।।


चरित्रे गुरूची करी नित्य पाठ I

जया भक्ती लागे पदी एकनिष्ठ I 

तयाचे कुळी दीप सज्ञानराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।५।।


बसे उंबरासन्निधी सर्वकाळ I 

जनी काननी घालवी नित्यकाल I 

तया सदगुरुचे नाम कल्याणराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।६।।


श्रमोनी गुरूपाशी तो म्लेंच्छ आला I

तया स्फोटरोगातुनी मुक्त केला I 

कृपेने तसे स्वामी पाळी आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।७।।


सती अनसूया सुधी आदिमाता I 

त्रयमूर्ती ध्यानी मनी नित्य गाता I 

हरे रोगपीडा दारिद्रसी नाशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।८।।


करोनी मनी निश्चयो अष्टकांचा I 

जनानो करा पाठ दत्तस्तुतीचा I 

करी माधवाच्या सुता रामदासी I

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।९।।

।।इति श्रीगुरू श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र संपूर्णम II


Jul 15, 2016

Gurucharitra Adhyay 51 श्रीगुरुचरित्र अध्याय - ५१


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्योः नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजानें श्रीगुरुसी । नेलें होतें नगरासी ॥ १ ॥ तेथूनि आले गाणगाभुवनासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । करुणावचन-अमृतेंसी । श्रीगुरुचरित्र आद्यंत ॥ २ ॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥ ३ ॥ राजाची भेटी घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुल्या मनीं । गौप्य रहावें म्हणोनियां ॥ ४ ॥ प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥ ५ ॥ म्हणोनि आतां गौप्य व्हावें । लौकिकमतें निघावें । पर्वतयात्रा म्हणोनि स्वभावें । निघाले श्रीगुरु परियेसा ॥ ६ ॥ गौप्य राहिले गाणगापुरीं । प्रकट दावणें लोकाचारी । निघाले स्वामी श्रीपर्वतगिरी । शिष्यांसहित अवधारा ॥ ७ ॥ भक्तजन बोळवीत । चिंता करिताति बहुत । श्रीगुरु त्यांसी संबोखित । राहावविती अतिप्रीतीं ॥ ८ ॥ दुःख करिती सकळ जन । लागताति श्रीगुरुचरण । स्वामी आम्हांतें सोडुन । केवीं जातां यतिराया ॥ ९ ॥ तूं भक्तजनांची कामधेनु । होतासी आमुचा निधानु । आम्हां बाळकां सोडून । जातां म्हणोन विनविताति ॥ १० ॥ नित्य तुझे दर्शनीं । दुरितें जातीं पळोनि । जे जे आमुची कामना मनीं । त्वरित पावे स्वामिया ॥ ११ ॥ बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता । तूंचि आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताति ॥ १२ ॥ ऐसें नानापरी विनविती । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । संबोखिती अतिप्रीतीं । न करावी चिंता म्हणोनि ॥ १३ ॥ आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों मठीं सदा प्रेमीं । गौप्यरुपें अवधारा ॥ १४ ॥ जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांसी प्रत्यक्ष दिसों आम्ही । लौकिकमतें अविद्याधर्मी । जातो श्रीशैल्ययात्रेसि ॥ १५ ॥ प्रातःस्नान कृष्णातीरी । पंचनदी-संगम औदुंबरी । अनुष्ठान बरवें त्या क्षेत्रीं । माध्याह्नीं येतो भीमातटीं ॥ १६ ॥ संगमी स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणी । चिंता न करा अंतःकरणी । म्हणोनि सांगती प्रीतिकरें ॥ १७ ॥ ऐसें सांगती समस्तांसी । अनुमान न धरा हो मानसीं । गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसो आम्ही त्रिवाचा ॥ १८ ॥ जे जन भक्ति करिती । त्यांवरी आमुची अतिप्रीती । मनःकामना पावे त्वरिती । ध्रुव वाक्य असे आमुचें ॥ १९ ॥ अश्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष । संगमी असे प्रत्यक्ष । जें जें तुमच्या मनीं अपेक्ष । त्वरित साध्य पूजितां ॥ २० ॥ कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचे जेथ स्थान । पादुका ठेवितों निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥ २१ ॥ विघ्नहर चिंतामणी । त्यांतें करावें अर्चनी । चिंतिलें फळ तत्क्षणीं । पावाल तुम्ही अवधारा ॥ २२ ॥ समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । अष्टतीर्थे असतीं विशेख । आचरावीं मनोभावें ॥ २३ ॥ संतोषकर आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । भक्तजन जें इच्छिती । त्वरित पावे परियेसा ॥ २४ ॥ ऐसें सांगोनि तयांसी । निघाले स्वामी श्रीपर्वतासी । भक्त परतोनि मठासी । आले चिंतीत मनांत ॥ २५ ॥ चिंतीत निघती मठांत । तेथे दिसती श्रीगुरुनाथ । लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रिमूर्ति ॥ २६ ॥ यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । सत्य जाणा हो निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥ २७ ॥ सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥ २८ ॥ दृष्टांत दाखवोनि भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥ २९ ॥ शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य व्हावें मल्लिकार्जुनीं ॥ ३० ॥ निरोप देतां श्रीगुरुमूर्ती । आणिलीं पुष्पें शेवंती । कमळ कल्हार मालती । कर्दळीपर्णे वेष्टोनि ॥ ३१ ॥ आसन केले अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पवित्र । श्रीगुरु शिष्यां सांगत । जावें तुम्हीं ग्रामासी ॥ ३२ ॥ दुःख करिती सकळी । त्यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न करावा दुजा तुम्हीं ॥ ३३ ॥ लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टांती दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥ ३४ ॥ ऐेसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथूनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ३५ ॥ ' कन्यागतीं ' बृहस्पतीसी । ' बहुधान्य ' नाम संवत्सरेसी । सूर्य चाले ' उत्तर-दिगंते ' सी । संक्रांति ' कुंभ ' परियेसा ॥ ३६ ॥ ' शिशिर ' ऋतु , ' माघ ' मासीं । ' असित पक्ष ' , ' प्रतिपदे ' सी । ' शुक्रवारीं ' पुण्यदिवशीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥ ३७ ॥ श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज-मठासी । पावतां खूण तुम्हांसीं । प्रसादपुष्पें पाठवूं ॥ ३८ ॥ येतील पुष्पें शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंडिती । लक्ष्मी वसो तुमच्या घरीं ॥ ३९ ॥ आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ ४० ॥ नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ ४१ ॥ व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ४२ ॥ ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥ ४३ ॥ ऐसें सांगोनि शिष्यांसी । श्रीगुरु जहाले अदृश्येसी । चिंता करिती बहुवसी । अवलोकिताति गंगेंत ॥ ४४ ॥ ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं आले नावेकर । तेही सांगती विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले म्हणोनि ॥ ४५ ॥ शिष्यवर्गाचें मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । होतों आम्हीं पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वरा ॥ ४६ ॥ संन्यासी वेष दंड हातीं । नाम ' नृसिंहसरस्वती ' । निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगिजे म्हणोनि ॥ ४७ ॥ आम्हां सांगितलें मुनीं । आपण जातों कर्दळीवनीं । सदा वसो गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥ ४८ ॥ भ्रांतपणें दुःख करितां । आम्ही देखिले दृष्टांता । जात होतें श्रीगुरुनाथ । सुवर्णपादुका त्यांचे चरणीं ॥ ४९ ॥ निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुलाले स्थानासी । सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥ ५० ॥ प्रसादपुष्पें आलिया । शिष्यें घ्यावीं काढोनियां । ऐसें आम्हां सांगोनियां । श्रीगुरु गेले अवधारा ॥ ५१ ॥ ऐसें नावेकरी सांगत । प्रसादपुष्पें वाट पहात । समस्त राहिले स्थिरचित्त । हर्षे असती निर्भर ॥ ५२ ॥ इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्पें आलीं चारी । मुख्य शिष्य प्रीतिकरीं । काढोनि घेती अवधारीं ॥ ५३ ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य ते कोण श्रीगुरुसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा पुष्पें कोण लाधले ॥ ५४ ॥ सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । गाणगापुरीं असतां ऐका । शिष्य गेले आश्रमासी ॥ ५५ ॥ आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । त्यांची नामें परियेसीं । सांगेन ऐकें विस्तारें ॥ ५६ ॥ कृष्ण-बाळसरस्वती । उपेंन्द्र-माधवसरस्वती । पाठविते झाले अतिप्रीतीं । आपण राहिलों समागमें ॥ ५७ ॥ गृहस्थधर्मे शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत । त्रिवर्ग आले श्रीपर्वता । आपण होतों चवथावा ॥ ५८ ॥ साखरे नाम ' सायंदेव ' । कवीश्वर-युग्म पूर्व । ' नंदी ' नामा, ' नरहरि ' देव । पुष्पें घेतलीं चतुर्वगीं ॥ ५९ ॥ श्रीगुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । तेंचि पुष्प माझें पूजनीं । म्हणोनि पुष्प दाखविलें ॥ ६० ॥ ऐसी श्रीगुरुची महिमा । सांगतां असे अनुपम्या । थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे ऐकतां ॥ ६१ ॥ श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥ ६२ ॥ ऐसें श्रीगुरुचें चरित्र । पुस्तक लिहिती जे पवित्र । अथवा वाचिती ऐकती श्रोत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥ ६३ ॥ धर्म-अर्थ-काम-मोक्ष । त्यासी साध्य होती प्रत्यक्ष । महानंद उभयपक्ष । पुत्रपौत्री नांदती ॥ ६४ ॥ ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीष्ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥ ६५ ॥ म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर । लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ ६६ ॥ श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता । याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ ६७ ॥ अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं । धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ ६८ ॥ पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ ६९ ॥ चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ ७० ॥ म्हणोनि सरस्वती-गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥ ७१ ॥ 

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनिजानंदगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा