Jul 29, 2024

॥ म्हणे गजानन ॥ - श्री. गणेश वि. रामदासीकृत श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता श्री गजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्मसमंधाचा ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजानन भक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

" म्हणे गजानन " या स्वरमालिकेतून श्री. गणेश वि. रामदासी यांनी या श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण अत्यंत रसाळ वाणींत केले आहे. अतिशय सुमधुर असे हे मनन प्रत्येक गजानन भक्ताने आवर्जून श्रवण करावे, असेच झाले आहे.



॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 2, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १२


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती, हे मयूरेश्वरा विमलकीर्ती तू माझ्या हृदयांत वास करून हा ग्रंथ कळसास ने (हा ग्रंथ सुफळ संपूर्ण व्हावा).॥१॥ तू ज्ञानबुद्धीचा दाता आहेस, तूच भक्तांचे मनोरथ पूर्ण करतोस. हे गणराया, ह्या विघ्नरूपी पर्वतांचा तूच संहार करतोस.॥२॥ तू साक्षात चिंतामणी आहेस, (तत्कारण तुझे भक्त) जे काही इच्छितात, ते सर्व काही तू आपल्या भक्तांना देतोस, असे पुराणांत वर्णिले आहे.॥३॥ हे एकदंता, लंबोदरा, पार्वतीसुता, भालचंद्रा आणि सिंदुरारि माझ्या मनांतील अवघ्या चिंता दूर कर.॥४॥ असो. अकोल्यात बच्चूलाल अग्रवाल नावाचा एक धन-कनक संपन्न असा गृहस्थ होता. तो अतिशय उदारही होता.॥५॥ त्यानें कारंजा ग्रामीं घडलेली लक्ष्मणपंत घुडे यांची हकीकत (इतर लोकांकडून) कर्णोपकर्णी ऐकली होती. त्यामुळें तो जरा साशंक झाला होता.॥६॥ तिथें काय खरें आणि काय खोटें घडलें असावें, असा तो मनी विचार करत असे. आणि एके दिवशी (गजानन) महाराज अकोल्यास आले.॥७॥ त्यावेळीं हा आपला भक्त आहे हे जाणून साक्षात्कारी गजानन स्वामी बच्चुलालाच्या घरीं आलें आणि (घराबाहेरील) ओट्यावर स्थानापन्न झाले.॥८॥ (समर्थांचे आगमन झालेले पाहून) बच्चूलालास अतिशय आनंद झाला आणि तो समर्थांस म्हणाला," गुरूराया, आज मला आपलें पूजन करण्याची इच्छा आहे."॥९॥ त्याचे हे बोलणें ऐकून समर्थांनी आपल्या मानेनेच होकार दिला. श्रोतें हो, (या पूजनास) आपली संमती असल्याचेच हें साक्षात द्योतक होते.॥१०॥ बच्चुलालानें सत्वर पूजेची तयारी केली. त्या ओट्यावर अतिशय आदरपूर्वक त्याने (समर्थांचे) षोडशोपचारी पूजन आरंभिले.॥११॥ प्रथम त्याने समर्थांच्या सर्वांगास विविध प्रकारची उटणीं लावून मंगलस्नान घातलें. त्यानंतर त्यांस भरजरी पितांबर वस्त्र म्हणून परिधान केलें.॥१२॥ अंगावर बहुमोल अशी काश्मिरी शालजोडीही पांघरली. एक जरीकाठीचा रेशमी रुमाल आणून मस्तकास बांधला.॥१३॥ गळ्यांत गोफ आणि हातांत सुवर्ण सलकडींही घातली. दोन्ही हातांच्या दहाही बोटांत निरनिराळ्या अंगठ्या घातल्या.॥१४॥ स्वामींच्या डाव्या हातात हिऱ्याची बहुमूल्य अशी पौची घातली. तसेच रत्नजडित हार महाराजांच्या कंठी त्यावेळीं विशेष खुलून दिसत होता.॥१५॥ नैवेद्यासाठी म्हणून जिलबी, राघवदास पेढे (समर्थांपुढे) ठेवले. एका लहान तबकांत त्रयोदश गुणी विडेदेखील ठेवले.॥१६॥ (स्वामींस) अष्टगंध, अर्गजा, अत्तर आदी सुवासिक द्रव्यें लावली. तसेच गुलाबपाणीही त्यांच्या अवघ्या तनूवर शिंपडले.॥१७॥ शेवटी एका सुवर्णाच्या ताटांत फार मोठी, अनेक रुपये होन मोहोरांची दक्षिणा ठेवली.॥१८॥ त्या दक्षिणेची एकूण किंमत काढली तर खरोखर दहा हजार झाली असती. अश्या थोर दक्षिणेचे किती वर्णन करू बरें ?॥१९॥ (त्यानंतर) श्रींपुढे श्रीफळ ठेवलें आणि अत्यंत विनयपूर्वक (बच्चुलालाने) प्रार्थना केली, " महाराज, माझ्या मनीं इथे एक राममंदिर बांधावयाची इच्छा आहे.॥२०॥ गुरुराया, उत्सवासाठी ह्या माझ्या ओट्यावर मंडप उभारला तरी फारच अडचण होते.॥२१॥ हे ज्ञानवंता, माझें हे मनोरथ पूर्ण कर." असे म्हणून अनन्यभावानें त्याने आपला माथा (स्वामी) चरणांवर ठेवला.॥२२॥ त्यावर संत गजानन (त्याला) ' श्रीजानकीजीवन तुझा हा हेतू पूर्ण करेल.' असा आशीर्वाद देते झाले.॥२३॥ असो. आज हे सर्व अलंकार घालून मला पोळ्याचा बैल बनवला आहेस. तू असें का बरें केलेस ? याचे मला कारण सांग बघू.॥२४॥ मी काही पोळ्याचा बैल अथवा दसऱ्याचा घोडा नाही. मला या सर्व दागदागिन्यांचा काय उपयोग आहे? ते मला सांग बरें.॥२५॥ अरे, हे सर्व मज विषासमान आहे. मला ह्या वस्तूंचा स्पर्शदेखील नको. अरे, या अशा नसत्या उपाधींस माझ्या मागे लावू नकोस.॥२६॥ किंवा मग बच्चुलाला, तू किती धनवान आहेस, हे दाखविण्यासाठी असे हे प्रदर्शन केले आहेस का? ते मला सर्व सांग पाहू.॥२७॥ अरे, ज्याला जे आवडते तेच त्याला द्यावें. मी तर एक वेडापिसा संन्याशी आहे, जो गांवभर नागवा फिरत असतो.॥२८॥ बच्चुलाला, हें अवघें (ऐश्वर्य) तुझें तुला लखलाभ असो. तुम्हां प्रापंचिकांसच या द्रव्याची गरज असते.॥२९॥ अरे, माझा जगतनियंता परमेश्वर भीमा नदीच्या तीरी एका विटेवर उभा आहे. तो काय मला हे सर्व वैभव देण्यास समर्थ नाही का ?॥३०॥ असे म्हणून (महाराजांनी) आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून चहू बाजूंस फेकून दिले. अगदी वस्त्रांचीही तीच गती झाली.॥३१॥ केवळ दोन पेढे खाऊन गजानन महाराज तिथून निघून गेलें. हा सर्व घडलेला प्रकार पाहून, अकोल्यांतील अनेक लोकांना वाईट वाटले.॥३२॥ त्यावेळीं तिथे कारंजा येथील काही लोक उपस्थित होते. तें आपापसांत  बोलू लागले, " आपला लक्ष्मण खरोखरच दुर्दैवी आहे. त्याने आपल्या घरी बच्चुलालाप्रमाणेच (महाराजांचे) पूजन केलें खरें, परंतु मनांत धनाचा मोह असल्यामुळें दक्षिणा अर्पण करतांना कचरला.॥३३-३४॥ त्यानें भक्ती नसतांना केवळ वरवरचें भाषण केलें. (अंतर्ज्ञानी) समर्थांस त्याचे हे वागणे समजणे अशक्य होते काय ?॥३५॥ दांभिकांची पूजा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडेच असतात. तें महावस्त्र म्हणून केवळ अक्षता अर्पण करतात.॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' (खडीसाखर नैवेद्यास अर्पण करतो.) असें म्हणून भुईमुगाचा एखादा कुचका दाणा पुढें आणून ठेवतात.॥३७॥ अशा दांभिक पूजनाचे फळंही अर्थात त्याच स्वरूपांत मिळते. लक्ष्मणाचा सर्वनाश त्याच्या या अशाच कृतीने झाला, हेच खरें !॥३८॥ हा बच्चुलाल मात्र धन्य झाला. ज्याप्रमाणें तो बोलला, अगदी तसेंच, एका जवाहूनही वेगळें नाही असेच त्याचे वर्तन होते. (महाराजांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक त्यानें पूजन केलें.)॥३९॥ आतां त्याच्या या वैभवाला कधीही ओहोटी लागणार नाही. अहो, एकदा संतकृपेस जो पात्र ठरला, तो सर्वदा सुखीच होत असतो."॥४०॥ त्यानंतर बच्चुलालांनीं संपूर्ण अकोला शहरांत समर्थांचा शोध घेतला, परंतु त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.॥४१॥ असो. शेगांवच्या मठामध्यें गजानन महाराजांचा पितांबर नावाचा एक शिंपी जातीचा शिष्य होता.॥४२॥ त्याने (समर्थांची) खूप सेवा केली होती. त्याच्या त्या तपश्चर्येला अखेर फळ आले. श्रोतेंहो, एके दिवशी मठांत एक गोष्ट घडली. ती आतां ऐका.॥४३॥ पितांबर एक साधेसे, अतिशय जीर्ण झालेलें धोतर नेसला होता. तें पाहून गुरुवर त्यास म्हणाले," अरे, तुझे नांव पितांबर आहे, पण तुला नेसण्यासाठी धड धोतरही नाही. वेड्या! तुझ्या उघड्या पार्श्वभागास सर्व स्त्री-पुरुष बघत आहेत, तो तरी जरा झाक बरें !॥४४-४५॥ आपलें नाव सोनुबाई सांगायचे आणि हातांत साधा कथिलाचा वाळाही घालावयास नसावा अथवा प्रत्यक्ष गंगाबाई नाव असतांना जीव मात्र तहानेनें तडफडत असावा, असाच खरोखर तुझा हा प्रकार आहे. (हे तू नेसलेलें) फाटकें धोतर केवळ पोतेरा म्हणून उपयोगीं येईल.॥४६-४७॥ तेच (धोतर) तू नेहेमी नेसतोस आणि आपलें ढुंगण जगाला दाखवतोस. तेव्हा नेसण्यासाठी हा दुपेटा (मी) तुला देतों, तो घे.॥४८॥ बाळा, माझ्या शब्दाचा मान राखून तू हा दुपेटा नेसत जा आणि कोणी काहीही केलें तरी हा नेसणें सोडू नकोस."॥४९॥ पितांबराने तो दुपेटा नेसला खरा, पण (त्याचे हे कृत्य) इतरांना सहन झालें नाही. स्वार्थीपणानें भाऊच आपल्या भावाला घातक ठरतो.॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार खरें पाहतां बोलावयासच नको. श्रोतेहो, गटाराचें दार उघडलें की घाण मात्र सुटतेच (हेच खरें !).॥५१॥ श्री गजानन स्वामींचे असंख्य भक्त असले तरी, अधिकारी भक्त मात्र दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होते.॥५२॥श्रोतें हो, ज्याप्रमाणें अरण्यांत निरनिराळें अनेक वृक्ष असलें तरी क्वचितच कुठेतरी एखादा चंदनाचा वृक्ष नजरेस पडतो.॥५३॥ त्याचप्रमाणें त्यांच्या शिष्यमंडळींत (उत्तम शिष्य फार कमी) होतें. तेथील काही शिष्य पितांबरास उगाचच निरर्थक टोचून बोलू लागले.॥५४॥अरे पितांबरा, समर्थांना जे घालण्यास उपयोगी आलें असते, तें वस्त्र तू स्वतः परिधान करून बसला आहेस. हेच का तुझें शिष्यपण ? ॥५५॥ तुझी समर्थांवर कशी भक्ती आहे तें अगदीच कळून आलें. तू खरोखर खुशालचंदच आहेस. त्यामुळे ह्या मठांत सद्गुरुंचा अपमान होत आहे, तेव्हा तू इथे राहू नकोस.॥५६॥ त्यावर पितांबर उत्तरला, " मी काही गुरुंचा अपमान केला नाही, तर उलट त्यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांचा मानच ठेवला.॥५७॥हें वस्त्र त्यांनी स्वतः मला दिलें आणि नेसावयास सांगितले. मी ही (त्यांनी सांगितल्याप्रमाणें) तेंच परिधान केले. मग ही अवज्ञा कशी बरें झाली ?"॥५८॥ अशी 'भवति न भवति' अर्थात वादविवाद होऊन शिष्यांत तणाव आणि दुरावा निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी श्री गजानन स्वामींनी एक निर्णय घेतला.॥५९॥ गुरूवर पितांबरास म्हणाले, " तू आतां येथून निघून जावेस. मूल जाणतें झाल्यावर आई त्याला दूर ठेवतें.॥६०॥ पितांबरा, माझी तुझ्यावर अखंड कृपा आहे. तेव्हा तू आता ह्या भूमीवर भ्रमण कर आणि अज्ञ जनांना योग्य मार्ग दाखव."॥६१॥ (नाइलाजानें अखेर पितांबरानें समर्थांस) साष्टांग नमस्कार केला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे पाहत तो (जड अंत:करणानें) मठ सोडून निघाला.॥६२॥ (मार्गक्रमण करत करत) पितांबर कोंडोली नावाच्या गावांत आला आणि तेथील एका वनांतील आंब्याच्या वृक्षाखाली बसला. त्याच्या मनांत निजगुरूंचे चिंतन सतत चालू होते.॥६३॥ तो रात्रभर तिथेच बसून होता. सूर्योदय झाल्यावर मात्र तिथे मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला, त्यामुळें तो अखेर त्या झाडावर जाऊन बसला.॥६४॥ परंतु त्या आम्रवृक्षावरदेखील असंख्य मुंग्या आणि मुंगळें होतें. पितांबर सर्व लहान-मोठ्या फांद्यावर जाऊन आला खरा, पण बसण्यासाठी (मुंगळ्यांचा त्रास होणार नाही अशी) निवांत जागा त्याला त्या झाडावर काही सापडली नाही. त्याचे हे कृत्यच तेथील गुराख्यांना कौतुकास्पद वाटलें. ॥६५-६६॥ तें आपापसांत बोलू लागले, हा एखाद्या माकडाप्रमाणें ह्या वृक्षावर का फिरतो आहे ? ह्याचे कारण काही कळत नाही.॥६७॥ हा अगदी लहान-सहान फांद्यांवरही निर्भयपणें फिरून आला. मात्र कुठेही खाली पडला नाही, हे खरें तर आश्चर्यच आहे.॥६८॥ त्यांवर दुसरा (गुराखी) म्हणाला, " ह्यांत काहीच आश्चर्य वाटायचे कारण नाही. श्री गजानन महाराजांच्या शिष्यांच्या अंगी असे सामर्थ्य असते, हे नक्की. त्यामुळें हा त्यांचा शिष्य खचितच असावा. चला, हा इथें आल्याचा वृत्तांत आपण गावांत जाऊन सर्वांना सांगू या."॥६९-७०॥ गुराख्यांकडून हे वृत्त कळल्यावर, कोंडोलीचे ग्रामस्थ त्या आंब्याच्या वृक्षाजवळ आले आणि तिथे कोण आले आहे हे पाहू लागलें.॥७१॥ (पितांबरास पाहून) गावकरी आपापसांत बोलू लागले, हा खरे तर एखादा ढोंगी मनुष्य असावा आणि उगाचच आपण गजानन महाराजांचा शिष्य असल्याचे भासवत आहे.॥७२॥ भास्कर पाटील नावाचा गजानन महाराजांचा एक थोर शिष्य होता खरा, परंतु त्याचा नुकताच अडगांव या गावांत अंत झाला. ॥७३॥ आणि तसेही समर्थांचे शिष्य चांगले बर्फी, पेढे खायचे सोडून इथे मुद्दामहून उपवास करण्यासाठी कशाला येतील बरें ? ॥७४॥ तरीही एकदा याला विचारावे आणि त्याचे म्हणणे प्रथम ऐकून मग काय खरें अन काय खोटें ते ठरवावें. उगाचच तर्क करणे, योग्य नाही.॥७५॥ मग एक गांवकरी पुढे आला आणि " तू कोण आहेस? इथे कुठून आणि कशासाठी आला आहेस ? तुझा गुरु कोण आहे ?" असे (अनेक प्रश्न) पितांबरास विचारू लागला.॥७६॥ पितांबर त्यावर उत्तरला, " मी शेगांवचा असून माझे नाव पितांबर शिंपी आहे. तसेच श्री गजाननस्वामींचा मी शिष्य आहे. त्यांची मला पर्यटन करण्यासाठी आज्ञा झाली, म्हणून मग भ्रमण करीत मी इथवर आलो आणि ह्या वृक्षाखाली (विश्रांतीसाठी) बसलो. पण या आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळें होते, म्हणून मी झाडावर चढलो आणि एका फांदीवर जाऊन बसलो."॥७७-७९॥ त्याचे हे बोलणें ऐकून ग्रामस्थ चांगलेच संतापले आणि म्हणू लागले, अरे, असे थोर संतांचे नाव घेऊन उगाच अशा चेष्टा करू नकोस.॥८०॥ काय तर म्हणे, मी खरें म्हणजे राजाची आवडती राणी आहे पण पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजूरी करण्यास इथे आले.॥८१॥ त्या (कोंडोली) गावांचा जो देशमुख होता, त्याचे नाव श्यामराव होते. तो म्हणू लागला, " अरे सोंगाड्या, आतां माझे बोलणे ऐक.॥८२॥ स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. त्यांचे नाव (गुरु म्हणून) सांगून उगाच त्यांना बट्टा लावू नको.॥८३॥ अरे वेड्या, एकदा त्यांनी केलेला चमत्कार ऐक जरा ! (वसंत) ऋतू नसतांना देखील त्यांनी आंब्याच्या झाडाला फळें आणली होती.॥८४॥ समर्थांनी तर फळें निर्माण केली. तू नुसतीं पाने तरी आणून दाखव. नाही तर या ठिकाणी तुझी काही धडगत नाही.॥८५॥ हा जो बळीराम पाटलाच्या (शेतातील) वठलेला शुष्क आंब्याचा वृक्ष आहे, तो आत्ता या क्षणी आमच्या डोळ्यांदेखत (हिरव्यागार पानांनी बहरलेला असा) पर्णयुक्त करून दाखव.॥८६॥ तू जर असे नाही करू शकलास, तर नक्कीच आमचा मार खाशील आणि जर तू सत्य बोलत असशील तर आम्हांस वंद्य होशील.॥८७॥ कारण सद्‌गुरुंचे शिष्य काही अंशी तरी त्यांच्याच योग्यतेचे असतात, अशी या जगती वदंता आहे.॥८८॥ आता अजिबात उशीर न करतां हे आंब्याचे झाड हिरवेगार कर पाहू." तें बोलणें ऐकून पितांबर अतिशय घाबरला.॥८९॥ आणि (दीनपणे) बोलू लागला, " माझा सारा वृत्तांत ऐकून घ्यावा. लोक हो, हिरे आणि गारा एकाच खाणीत सापडतात.॥९०॥ तसेच श्री गजाननस्वामींच्या शिष्यांमध्ये मी गार आहे, असे समजा. मात्र मी यत्किंचितही खोटें बोललो नाही.॥९१॥ या जगांत गारेवरून त्या खाणीस काही कमीपणा येत नाही. माझ्या गुरूंच्या नांवास मी चोरून कसे ठेवू बरें ?"॥९२॥ त्यावर श्यामराव उत्तरला, " तू आता उगाच बाष्कळ बडबड करू नकोस. शिष्यांवर संकट ओढवलें तर ते त्यांच्या सद्‌गुरुंचा धांवा करतात.॥९३॥ मग त्यांचा तो शिष्य जरी योग्य अधिकारी नसला, तरी सद्‌गुरुंचा प्रभाव (कृपासामर्थ्य) आपल्या शिष्यांना सहाय्यभूत  होतो."॥९४॥ श्रोतें हो, त्यावेळीं पितांबराची अवस्था खरोखर इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली. बिचारा अतिशय चिंतातुर झाला आणि त्याला काहीच सुचेनासे झाले.॥९५॥ त्या वठलेल्या आंब्याच्या झाडापाशी अवघेंच गांवकरी आपल्या बायकां-मुलांसह जमलें आणि आता पुढें काय घडणार हे पाहू लागलें.॥९६॥ अखेर निरुपाय होऊन पितांबरानें आपलें हात जोडलें आणि आपल्या सद्‌गुरुरायांचे मन:पूर्वक स्तवन सुरु केलें.॥९७॥ हे स्वामी समर्था गजानना, हे ज्ञानरूपी आकाशांतील नारायणा, तुझ्या चरणीं दृढ श्रद्धा असलेल्या (या भक्ताच्या) रक्षणासाठी आतां यावेळीं धावून ये.॥९८॥ हे भक्तपाला, माझ्यामुळें तुला कमीपणा येऊ पाहतो आहे. (मी सदैव भक्तांच्या पाठीशी उभा आहे) या आपल्या वचनासाठी या आंब्याच्या झाडास पालवी फुटू दे.॥९९॥ आता माझी सारी भिस्त तुमच्यावरच आहे. हे आई, माझ्यावर तू कृपा कर. नाहीतर इथे माझा प्राण जायची वेळ आली आहे.॥१००॥ प्रल्हादाचे बोल सत्य करण्यासाठी नरहरी भगवान खांबात प्रगटलें. संत जनाबाईस सुळांवर चढवलें असतां त्या सुळांचेच पाणी झाले.॥१०१॥ संत जनाबाईंचा भार त्या विठ्ठलावर, ईश्वरावर होता तर माझा सर्व विश्वास केवळ तुझ्यावरच आहे. संत आणि देवांमध्ये काहीच अंतर नसते.॥१०२॥ ईश्वर हाच संत असतो तर संत साक्षात त्या परमेश्वराचेच रूप असतात. सर्व लोक मला मी गजानन स्वामींचा शिष्य आहे असे म्हणतात.॥१०३॥ खरे तर माझे असे काहीच महत्व नाही. हे अवघें सामर्थ्य तर तुझ्याच ठायीं आहे. या जगीं फुलांमुळेच दोऱ्याचे महत्त्व असते.॥१०४॥ तें फुल तूच आहेस मी केवळ दोरा आहे. तू कस्तुरी तर माझी योग्यता मातीइतकीच आहे, हे सत्य आहे. हें संकटही तुझ्यामुळेंच माझ्यावर आलेले आहे.॥१०५॥ तेव्हां आता माझा अंत पाहू नकोस रें, गुरुराया ! (या तुझ्या भक्तासाठी) धावत ये आणि या वठलेल्या वृक्षास कोवळी पालवी (तुझ्या कृपेनें) फुटू दे."॥१०६॥ (आपल्या सद्‌गुरुंची अशी प्रार्थना करून) पितांबर तिथे जमलेल्या सर्व लोकांस म्हणाला, " लोक हो, माझ्या सद्‌गुरुंचा नामगजर करा. हे शेगांवच्या अवलिया, जय जय गजानन साधूवर असा त्यांचा जयजयकार करा."॥१०७॥ तेव्हा सर्व गांवकरी (समर्थांचा) जयजयकार करू लागले. (तो काय आश्चर्य !) त्या वठलेल्या वृक्षास पालवी फुटू लागली. त्या अगाध चमत्कारास सर्व लोक आपल्या डोळ्यांसमक्ष घडत असलेले पाहू लागले.॥१०८॥ काही लोक म्हणू लागले, हे तर कदाचित आपणांस पडलेलें स्वप्न असावें, (खरेच जागें आहोत हे जाणण्यासाठी) तेव्हा आपल्याला हातांनी चिमटा घेऊन पाहू या. ॥१०९॥ आणि चिमटे घेऊन पाहिले असता हे स्वप्न नसून सत्य आहे, हे त्यांना उमगले. तेव्हा ही नक्कीच नजरबंदी असावी, असे काही जण बोलू लागलें.॥११०॥ गारुड्यांच्या खेळांत कशी वाद्येंच सर्पाप्रमाणे भासतात आणि कश्या मातीच्या खापऱ्या (नजरबंदीमुळे) आपल्या दृष्टीस रुपयांप्रमाणे दिसू लागतात, नाही का ?॥१११॥ परंतु जेव्हा त्या पानांस तोडून पहिले असतां त्या फांदीतून पांढराशुभ्र चीक बाहेर येऊ लागला, तेव्हा हा भ्रम नव्हें, याची (सर्व गांवकऱ्यांस) जाणीव झाली.॥११२॥ अशा रितीने वाळलेल्या वृक्षास पालवी फुटली, अशी तिथे जमलेल्या सर्वांची खात्री झाली. ' श्री गजानन माऊली हे खरोखर महासंत आहेत,'  हे निःसंशय ! (असे ते सर्वजण म्हणू लागले.)॥११३॥ आता मात्र या पितांबराविषयीं मनांत काहीच संशय घेऊ नये, हा श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे हेच सत्य आहे. ह्याला आता आपण गावांत घेऊन जाऊ या.॥११४॥ ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी धावत येते, त्याप्रमाणेच आपल्या ह्या भक्ताच्या निमित्ताने का होईना कधी तरी श्री गजानन महाराजांचे कोंडोलीस आगमन होईल.॥११५॥ असा सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि पितांबरास मोठ्या थाटामाटांत गावांत नेले. अशा प्रकारे दिव्य चमत्कार झाल्यावर सर्वच लोकांचा भाव दृढ झाला.॥११६॥ श्री (रामदास स्वामी) समर्थांनीही अशाच प्रकारें आपला कल्याण नामक शिष्य जगत्कल्याणासाठीच डोमगांवीं पाठवला होता.॥११७॥ श्री गजानन स्वामींनीही जणू तशीच कृपा केली, त्यामुळे आपल्या या कोंडोली गावाचे भाग्य फळफळलें हे मात्र खरें !॥११८॥ श्रोतेहो, ते आंब्याचे झाड अजूनही (श्री गजानन कृपेची साक्ष देत) कोंडोलीत आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत ह्या आम्रवृक्षाला फळेही भरपूर येतात.॥११९॥ कोंडोलीच्या ग्रामस्थांचीही पितांबरावर दृढ श्रद्धा जडली. अर्थात, हिरकणी कुठल्याही स्थानीं असली तरी मौल्यवानच असते.॥१२०॥ लवकरच, पितांबराचा मठ त्या कोंडोलीत झाला आणि त्याच्या अंतिम क्षणांपर्यंत तो तिथेच कार्यरत राहिला.॥१२१॥ आतां इकडे शेगांवांत एके दिवशी महाराज आपल्या मठांत उदास होऊन बसले.॥१२२॥ त्यांचे सर्व शिष्य हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागले, " महाराज आज आपण चिंताग्रस्त का दिसत आहात ?॥१२३॥ तेव्हा, महाराज गंभीर स्वरांत तिथे जमलेल्या लोकांना म्हणाले, " आमचा लाडका भक्त कृष्णा पाटील, जो आम्हांला दररोज चिकण-सुपारी आणून देत असे, तो आता वैकुंठवासी झाला. त्याची आम्हांला आज आठवण झाली. त्याचा मुलगा राम तर अजून लहान आहे, मग ये ठायीं आता आम्हांला चिकण-सुपारी कोण आणून देणार ?॥१२४-१२५॥ राम मोठा झाल्यावर माझी सेवा करीलच, पण तोपर्यंत मी काही या मठांत राहायला तयार नाही."॥१२६॥ असे महाराज बोलताच, सर्वांनाच चिंता वाटू लागली. महाराजांचा आता येथून जाण्याचा विचार दिसत आहे. तेंव्हा, आपण काहीही करून त्यांचे मन वळविले पाहिजे. चला, आपण सर्वजण मिळून महाराजांचे चरण धरून प्रार्थना करू.॥१२७-१२८॥ असा सर्वानुमते विचार करून सर्व मंडळी मठांत आली. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती या सर्व भक्तमंडळींनी महाराजांचे पाय धरले, आणि महाराजांना विनवणी करत म्हणाले, " महाराज, आम्हांला सोडून तुम्ही अन्यत्र कोठेही राहू नये. कृपा करून या मठाचा तुम्ही त्याग करू नका."॥१२९-१३०॥ या शेगांवांत तुमची जिथे इच्छा असेल, तिथे राहा. मात्र हे गांव सोडण्याचे मनांत आणू नका."॥१३१॥ तो महाराज गर्जून म्हणाले, " तुमच्या या गावांत दुफळी आहे. त्यामुळें, मला इथे राहण्यासाठी कोणाचीच जागा नको.॥१३२॥ तेव्हा, कोणाच्याच मालकीची नसेल अशी जागा मला तुम्ही दिल्यासच, मी या शेगांवीं राहीन."॥१३३॥ महाराजांचे हे वचन ऐकून अवघी मंडळी चिंताग्रस्त झाली आणि ही मागणी करून समर्थांनी आपल्याला मोठ्याच पेंचात टाकले असे ते सर्व विचार करू लागले.॥१३४॥ महाराज तर आपल्यापैकी कोणाच्याही जागेंत राहाण्यास तयार नाहीत, आणि हे सरकार समर्थांसाठी जागा देईल, याची खात्री वाटत नाही.॥१३५॥ आपल्या महाराजांची योग्यता, महती हे सरकार मुळीच जाणत नाही. शेवटीं, बंकटलाल विनयतेनें बोलता झाला, " महाराज, अशा संकटात आम्हांला घालू नका. हे परक्याचे राज्य आहे. त्यामुळें, सरकार धार्मिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून देईल, याची काही शक्यता वाटत नाही.॥१३६-१३७॥ तेंव्हा, आमच्यापैकी कुणाच्याही जागेची तुम्ही मागणी करा. आम्हां सर्वांचीच आपल्याला आनंदाने जागा देण्याची तयारी आहे."॥१३८॥ त्यावर महाराज बोलले, " काय हे तुमचे अज्ञान ! या सर्व जमिनींची मालकी खरें तर पूर्णतः त्या सच्चिदानंदाची आहे.॥१३९॥ या भूमीवर असे कित्येक राजे आले आणि गेले. तेव्हा, ही सर्व जागा निश्चितच सरकारी नाही. या सर्व जमिनींचा खरा मालक तो पांडुरंगच आहे.॥१४०॥ आतां, व्यावहारिकदृष्ट्या मालकपण राजास प्राप्त होते खरें ! पण ते महत्वाचे नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहा.॥१४१॥ प्रयत्न केल्यास जागा अवश्य मिळेल. आता काही बोलू नका. हरी पाटलाच्या हाताला यश येईल, याविषयीं काहीही शंका मनांत बाळगू नका."॥१४२॥ मग ती सर्व मंडळी हरी पाटलाकडे आली आणि त्याच्याशी विचार-विनिमय करून महाराजांच्या मठाच्या जागेसाठी अर्ज दिला.॥१४३॥ बुलढाणा जिल्ह्याचा एक करी नामक सर्वाधिकारी होता. त्याने अर्जाची योग्य तपासणी करून समर्थांच्या मठासाठी एक एकर जागा मंजूर केली.॥१४४॥ आणि म्हणाला, " मंडळी, तुम्ही दोन एकर जागेसाठी अर्ज केला आहे खरा, पण मी सध्या तुम्हांला एक एकर जागा देत आहे.॥१४५॥ तुम्ही ती जागा एका वर्षांत व्यवस्थित विकसित केल्यास मी आणखी एक एकर जागा तुमच्या मठासाठी मंजूर करीन. जेणेंकरून तुमची ही दोन एकर जागेची मागणी मान्य होईल."॥१४६॥ या सरकारी ठरावाची अजूनही दप्तरीं नोंद आहे. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे, हे निःसंशय !॥१४७॥ मग हरी पाटील, बंकटलाल आदि भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले. (समर्थांवर सर्वांचीच श्रद्धा असल्यामुळें) बराच द्रव्यनिधी थोड्या कालावधीत जमला आणि मठाचे काम सुरु झाले.॥१४८॥ यापुढील सर्व वृत्त इत्थंभूतपणे पुढच्या अध्यायांत कथन होईल. सत्पुरुषाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर सदैव तत्पर असतो, हेच खरें !॥१४९॥ डोंगरगांवचा विठू पाटील, वाडेगांव येथील लक्ष्मण पाटील आणि शेगांवचे रहिवासी जगु आबा आदि मंडळींनी वर्गणी गोळा करण्यात पुढाकार घेतला.॥१५०॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ तुम्ही सावध चित्त होऊन ऐका. त्यामुळें तुमचे निश्चितच निजकल्याण होईल. ॥१५१॥ 
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jun 27, 2024

श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं - समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥ श्री पंढरीनाथ महाराज की जय ॥ जय जय पांडुरंग हरि

॥ ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय


कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं । कलाङ्काङ्क्तेजोधिकामोदिवक्त्रम् । खलानीशवादापनोदार्थदीक्षम् । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥१॥ भावार्थ : या कलियुगामध्ये अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार घेतला आहे, शीतल परंतु कलंकित असलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबापेक्षाही अधिक आनंददायी आणि आल्हाददायक असा ज्यांचा मुखचंद्रमा आहे, तसेच दुष्ट आणि अविहित कर्मे करणाऱ्यांचा वृथा अभिमान दूर करून त्यांना सदाचरण-सन्मार्ग दाखविण्यास जे समर्थ आहेत अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥१॥  अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं । पदाम्भोजतेज: स्फ़ुरद्दिक्प्रदेशम् । विधीन्द्रादिदेवै: सदास्तुयमानं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥२॥ भावार्थ : अलंकापुरी नगरीत अतिशय शोभायमान अशा सिंहासनावर जे पद्मासनात स्थित आहेत, ज्यांच्या पावन चरण कमळांच्या सभोवती असलेल्या दिव्य तेजाने सर्व दिशा उजळल्या आहेत आणि ब्रह्मदेव-इंद्रादिदेव ज्यांची नित्य स्तुती करत असतात अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥२॥ गदाशङ्खचक्रादिर्भिर्भाविताङ्गम् । चिदानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् । यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥३॥ भावार्थ : ज्यांच्या चरणद्वयांवर शंख, चक्र, गदा आदि शुभ चिन्हें प्रगट झालेली आहेत, जे सदासर्वदा सच्चिदानंदस्वरूपी चैतन्यरूपांत लीन असतात आणि जे यम-दमादि अष्टांग योगामध्ये प्रवीण आहेत, अशा ( मानव रूपांतील श्रीहरि विष्णु असलेल्या ) सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥३॥ लुलायस्यवक्त्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं । प्रतिष्ठानपुर्यांसुधीसंघसेव्यम् । चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥४॥ भावार्थ : धर्मपीठ असणाऱ्या पैठण नगरीतील समस्त विद्वान ब्रह्मवृंदांच्या सभेत ज्यांनी रेड्याच्या मुखातून साक्षात ऋचा म्हणवून दाखविल्या आणि चारही वेद, तंत्रशास्त्र, आगमनिगमादि यांचे संपूर्ण ज्ञान असलेल्या, सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥४॥ सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं । निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्त्वम् । महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥५॥ भावार्थ : पंढरीनाथ अर्थात श्रीपांडुरंगाच्या दिव्य चरणरूपी कमळांतील भ्रमराप्रमाणे जे नित्य श्रीहरींचे गुणगान करतात, सद्‌गुरु श्रीनिवृत्तिनाथांच्या अनुग्रहानें ज्यांना परमात्मास्वरूप-तत्त्वांची प्राप्ती झाली आहे, आणि श्रेष्ठ अशा इंद्रायणी तीरावरील पावन भूमीवर जे वास करतात, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥५॥  रणे कृष्णबीभत्सुसंवादभूतो --। रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरीवै । कृर्तिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥६॥ भावार्थ : महाभयंकर महायुद्धाच्या रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये जो श्रीमद्‌भगवतगीतारूपी संवाद झाला, ते मूळ संस्कृतमध्ये असलेले महान तत्त्वज्ञान सामान्यजनांना प्राकृत मराठीत सुबोध व्हावे यासाठी ज्यांनी श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ रचला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥६॥ चिराभ्याससंयोगसिद्धैर्बलाढय: । बृहदव्याघ्रशायी महान् चांगदेव: । निरीक्ष्याग्रकुड्यागतंवीतगर्व: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥७॥ भावार्थ : दीर्घकाळ केलेल्या परिपाठाने अनेक योगसिद्धी प्राप्त केलेले, बलाढ्य व महान योगी चांगदेव भीमकाय अशा वाघावर स्वार होऊन आपल्या भेटीस येत आहेत, ही वार्ता जेव्हा श्री ज्ञानदेवांना समजली, त्यावेळीं ते आपल्या भावंडांसह स्वतः एका भिंतींवर बसले होते. त्याच जड, निर्जीव अशा भिंतीस ज्यांनी चेतना, गती दिली आणि चांगदेवांचे गर्वहरण केले, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥७॥ क्वचित्तीर्थयात्रामिषेणिति नित्वा । स्वयंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णो: । यत: प्रेषित: खेचरो नामदेव: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥८॥ भावार्थ : भगवान महाविष्णुंच्या स्वयंवेद्य-परमात्मस्वरूप तत्त्वाची ज्याला पूर्णत: जाणीव, उपरती झाली नव्हती, आणि ज्याची अद्यापि सगुण-साकाराठायीं प्रीती होती, अशा भक्त नामदेवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्यांनी सत्संगाचा अनुभव दिला, तसेच पुढें त्या संत नामदेवांस सद्‌गुरु विसोबा खेचर यांच्याकडे पाठवून अद्वैताचा साक्षात्कारही घडविला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥८॥ 

स्तवं भावभक्त्या दिभिः सौख्य देयं । पठन्तोऽर्थ जातं ह्य वाप्यापि विष्णोः । पदं यान्ति ते ज्ञानदेवस्य नित्यं । भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता:   भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता: भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ताः ॥९॥ भावार्थ : श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या स्तवनाचा जे दृढ श्रद्धा, भाव-भक्तीने नित्य पाठ करतील, त्यांना अपार सौख्यप्राप्ती होईल आणि पठणकर्त्यांस चारही पुरुषार्थ व श्रीहरि विष्णुंच्या कृपेचा लाभ होईल. तसेच, त्या भक्तांना श्रीज्ञानदेवांच्या दिव्य चरणीं शाश्वतपद प्राप्त होईल आणि अंतकाळी ते संसारसागर सहज तरून जातील. ॥९॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

  

Jun 17, 2024

अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली l पालखीत शोभते योगीराज माऊली, प्रेमाची साऊली l दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो l दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll धृ. ll घुमवूया नाद, देऊया साद l स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद l गुलालात या पहा निघाली, विश्वाची साऊली l हो माझी योगीराज माऊली ll१ll दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll टाळ मृदुंगाचा गजर करुया l स्वामी समर्थांचे नाम घेऊया l तालावरती ह्रदयाच्या हो भक्तांची माऊली l हो माझी योगीराज माऊली ll२ll दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll पालखी सुखाची, आली दाराशी l नाम समर्थांचे, भिडले आकाशी l भक्तांच्या गजरात निघाली, ह्रदयाची साऊली l हो माझी योगीराज माऊली ll३ll दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


May 15, 2024

श्रीगजानन माहात्म्य - अध्याय १५ ते २१


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अध्याय १५ ॥ 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय व्यंकटेशा वासुदेवा । मनमोहना हे माधवा । शेषशयना केशवा । गोविंदा दामोदरा नमितो तुज ॥१॥ करी पूर्ण मनोरथ । तूंची हाकिला अर्जुन रथ । अनाथांचा तूं नाथ । सखा तूंची भाविकांचा ॥२॥ असो तुज नमस्कार । हीन दीन मी पामर । जन कल्याणास्तव अवतार । अनंत रुपे नटलासी ॥३॥ भक्तवत्सला दयाघना । दावी सखयां तव चरणां । नामी रंगवी ही रसना । कवनांते या गोड करी ॥४॥ टिळक बाळ गंगाधर । राजकारणी अति चतुर । कीर्ति जाहली दूरवर । स्वातंत्र्य संग्राम गाजविला ॥५॥ लोकमान्य नर केसरी । जनतेचे हे पुढारी । शस्त्र लेखणी हीच खरी । इंग्रजांसी झुंजला ॥६॥ शिवजयंती उत्सवासी । टिळक आले अकोल्यासी । पाचारण केले गजाननासी । मंचकावरती बसविले ॥७॥ खापर्डे, दामले, कोल्हटकर । विद्वान वक्ते असतीं थोर । जनसमुह लोटला अपार । भाग्य खचित त्या नगरीचे ॥८॥ कोणा वाटे गजानन । मध्येच गातील भजन । परी धरूनी ते मौन । सभेंमाजी ते बैसती ॥९॥ राष्ट्रोद्धार हाच खरा । करवी हातें गंगाधरा । भोगीले ज्याने कारागारा । स्वातंत्र्य लढ्या कारणे ॥१०॥ पटवर्धन अप्पा साचे । राहणारे ते आळंदीचे । स्नेही तेच टिळकांचे । आले असती उत्सवासी ॥११॥ वऱ्हाडप्रांती अकोल्यासी । सभा झाली वैशाख मासी । अक्षय्य तृतीयेच्या दिवशी । सुयोग पर्वणीचा साधला ॥१२॥ सभा यशस्वी झाली खरी । टिळक गेले कारागारी । टिकास्त्र सोडिले इंग्रजांवरी । शुद्ध भाव तो अंतरीचा ॥१३॥ भूत-भविष्य-वर्तमान । जाणती हे गजानन । जन असती हे सामान्य । कर्तव्याची ना जाण तयां ॥१४॥ टिळक असता कारागारी । गजानन देती प्रसाद भाकरी । खापर्ड्यासी वदती जा सत्वरी । टिळका कारणे ती द्यावया ॥१५॥ मुंबईस गेले कोल्हटकर । प्रसाद घेऊनी भाकर । टिळक न करिती अव्हेर । कृपाप्रसाद तो स्वीकारिला ॥१६॥ मंडाल्याच्या तुरुंगात । गीतारहस्य लिहिला ग्रंथ । गजाननाचा वरदहस्त । शिरी खचितची राहिला ॥१७॥ कोल्हापूरचे करवीर । गोविंदसुत श्रीधर । काळे उपनांव साचार । गरीबीतच ते वाढले ॥१८॥ शिक्षण तेही जेमतेम । परी बुद्धी ती उत्तम । यश धंद्यामाजी हा भ्रम । द्रव्यार्जनांची नच शक्यता ॥१९॥ टोगो यामा दोघेजण । मित्र यांचे खचित जाण । सवें यांच्या विद्यार्जन । थोर गुण हा लाभला ॥२०॥ नसे कुणाची ती मदत । घरी गरीबी अत्यंत । तयां मनीं हीच खंत ।  मित्र एक भंडाऱ्यासी ॥२१॥ श्रीधराने पत्र टाकून । सविस्तर कळवी वर्तमान । मनांत होते ते कथन । मित्रासी त्या निवेदिले ॥२२॥ मित्र शिक्षक साचार । श्रीधरावरी प्रेम अपार । मजकूर वाचूनी करी विचार । मनीं निर्धार तो करीतसे ॥२३॥ ठरविती दोघे कोल्हापूर । शहर असे ते गुलजार । पत्रोपत्री व्यवहार । निश्चित तो जाहला ॥२४॥ घ्यावे गजाननाचे दर्शन । शेगांवी त्या जाऊन । रेल्वेमार्गावर ते जाण । भावना अंतरीची जाहली ॥२५॥ सद्‌गुरुचरणीं ज्यांचा भाव । पैलतीरा लावी नांव । स्टेशन ते शेगांव । गाठिलें हो त्या दोघांनी ॥२६॥ आले दोघे ते मठांत । गजानना जोडीले हात । जाणिती सकल ते संत । आशीर्वच तयांसी लाभला ॥२७॥ विचार न करणे आता । शांत ठेवा आपुल्या चित्ता । सुयश तयां चिंतीता । कार्य सफल ते जाहले ॥२८॥ लौकिकास पात्र श्रीधर । ग्राम लाभे कोल्हापूर । संत साक्षात परमेश्वर । सुपंथ भक्तास दाविती ॥२९॥ दर्शनाचा योग येतां । उचित घडले तत्त्वतां । दयाघना सिद्धहस्ता । शिरी आपल्या ठेवा सदा ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य पंचदशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १६ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ परशु असे शस्त्र हाती । कुमार जमदग्नीचा म्हणती । सपरशुराम माता ती । रेणुका ती मृगाचली ॥१॥ ताडीले तिने दुष्टांसी । संरक्षण दिले द्विजांसी । परी आता कां निष्ठुर होसी । माते अव्हेरिसी बालका ॥२॥ गजाननाचा भक्त एक । नाम त्याचे पुंडलीक । महान हा भाविक । मुंडगांवी राहतसे ॥३॥ शेगांवाची करी वारी । गजानना ध्यायी अंतरी । कृपा तीच तयांवरी । सद्‌गुरुची त्या जाहली ॥४॥ भागाबाई नामे ठाकरीण । राहत होती तिथे जाण । दंभाचार माजवून । भोंदित असे सकलांना ॥५॥ वदली ती पुंडलीका । जन्म तुझा रे फुका । शेगांवासी जासी कां? । सद्‌गुरु मानिसी वेड्यासी ॥६॥ ताप तुझा झाला बरा । म्हणुनी करिसी येरझारा । खातो कुणाच्याही घरा । पिशापरी तो राहतो ॥७॥ गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी । वेदांतासी जाणुनी । नित्य जो रंगे हरिचिंतनी । गुरु तोच खरा जाणावा ॥८॥ भागाबाई जशी सांगे । नादी तिच्या तसा लागे । अंजनगावी तिच्या संगे । जाऊ म्हणे कीर्तनासी ॥९॥ केजाजीच्या शिष्यातें । गुरु करणे ठरले होते । ऐसे मनीं येताची ते । जाण्या सिद्धची जाहले ॥१०॥ जाऊ म्हणे ती सकाळला । म्हणुन पुंडलीक झोपला । स्वप्न रात्री पडले त्याला । दिगंबर पुरुष उभा दिसे ॥११॥ शेगांवीचे गजानन । देती तयांसी दर्शन । मन जाई आनंदून । कानी तयांचे बोलता ॥१२॥ माजविती दंभाचार । लागती नादी नारी नर । वृत्ती त्यांची ती कठोर । ऐशासी गुरु का मानावे? ॥१३॥ तुझी असेल जी जी आस । पुरवीन मी तियेस । पुंडलीका लागला ध्यास । शेगांवीच्या अवलियाचा ॥१४॥ निरखून पाहता तो योगी । आला असे आपणालागी । अंजनगावचा तो ढोंगी । पुरुष तयां तो जाणवला ॥१५॥ नित्य व्हावया दर्शन । पादुका घेई तो मागून । करावया नित्य पूजन । मनीं निर्धार ठरविला ॥१६॥ पादुका तयां देऊन । महाराज पावले अंतर्धान । पुंडलीका जाग येऊन । सभोवार पाहू लागला ॥१७॥ पहाट होता खरी । भागाबाई तो उभी दारी । चाल म्हणे ती सत्वरी । अंजनगावासी जावया ॥१८॥ पुंडलीक तिज वदला । गजानन गुरु केला । पाठीराखा तो मला । दुजा न करणे गुरु असे ॥१९॥ शामसिंग मुंडगांवचा । भक्त तोही गजाननाचा । मार्ग धरी शेगांवचा । दर्शना कारणें सद्‌गुरुंच्या ॥२०॥ परतुनी जातां आपल्या गावी । महाराज वदले भेट घ्यावी । बाळाभाऊस सांगती नेण्या लावी । पादुका पुंडलीकासी द्यावया ॥२१॥ सद्‌गुरु आज्ञा घेऊन । शामसिंग गेला परतून । पादुका पुंडलीका देऊन । निघून गेला तो तेथूनी ॥२२॥ राजाराम नामे ब्राह्मण । धंदा सराफी दुकान । कृपा संतांची ती जाण । पुत्र दोन ते लाभले ॥२३॥ गोपाळ, त्र्यंबक नामे त्यांची । श्रद्धा देवावरी साची । सेवा तीच गजाननाची । भक्तिभावें त्र्यंबक करी ॥२४॥ इच्छा झाली तयां मनींं । द्यावी महाराजां मेजवानी । आवडीचे पदार्थ करोनी । भोजन आणिले गुरुराया ॥२५॥ विचार तैसा कवराचा । झुणका भाकरी देण्याचा । निर्धार होई मनाचा । स्टेशनावरी तो पातला ॥२६॥ वेळ झाला येण्या फार । गाडी निघून गेली दूर । दुसऱ्या गाडीस भरपूर । वेळ होता जाण्यासी ॥२७॥ परी न ढळला मानस । जाणे मनीं शेगांवास । झुणका भाकरी गजाननांस । कवर गेला द्यावयासी ॥२८॥ वाट पाही योगीराणा । गेला तोची दर्शना । न करिताची भोजनां । महाराज असती आसनी ॥२९॥ कवरासी त्या पाहून । हर्षित झाले गजानन । झुणका भाकरी मागून । घेती सद्‌गुरु खावया ॥३०॥ आनंदले दयाघन । कवरासी दिले अभिवचन । कार्य तव सफल जाण । होईल ऐसे सांगती ॥३१॥ भक्त मनीं आनंदला । माथा चरणीं त्याने ठेविला । परतुनी घरी गेला । तार आली असे गृहीं ॥३२॥ नोकरीचे बोलावणे । सत्य झाले गुरुकृपेनें । जो भजे तयां उणे । नच कांहीं घडतसे ॥३३॥ ऐसे येती अनुभव । जिथे भक्तिचा अभाव । तिथे कैसा हा प्रभाव । पहावया मिळेल हो? ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य षोडशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १७ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय लक्ष्मीरमणा । शेषशायीं नारायणा । वैकुंठीचा तूंचि राणा । भक्तांकारणे प्रगटसी ॥१॥ प्रल्हादास्तव नरहरी । स्तंभामाजी श्रीहरी । हिरण्यकश्यपू असूरी । पोट विदारुनी मारिला ॥२॥ उग्ररुप तव जरी । प्रल्हादाचा कैवारी । घेसी तयां अंकावरी । भक्त सखा तूंची खरा ॥३॥ तैसी कृपा असो देवा । मुंगी साखरेचा रवा । गोड करूनी घेई सेवा । हीच विनंती तुज असो ॥४॥ भक्त प्रिय गजानना । अकोल्यासी त्या जाणा । स्वयें देऊनी दर्शना । तयां गृहीं राहसी ॥५॥ कृष्णा बापू चापडगांवी । बच्चुलालाने भेट घ्यावी । जीजाई पंडीत आणिक नवी । भक्त मंडळी असती तव ॥६॥ खटाऊच्या गिरणीत । समर्थ येती अकोल्यात । मुक्कामासी अवचित । कल्पना नसता कुणांसही ॥७॥ विष्णुसा नामें सावकार । ग्राम ज्याचे मलकापूर । घेऊनी यावे हा निर्धार । महाराजांसी आपुल्या गृहीं ॥८॥ म्हणून गेला अकोल्यास । विनविता झाला भास्करास । जो गजाननाचा शिष्य खास । केले बोलणे तयां सवे ॥९॥ दिले तयासी वचन । मलकापुरी येईन घेऊन । महाराजांसी निश्चित जाण । समाधान झाले विष्णुसाचे ॥१०॥ भास्कर विनवी सद्‌गुरुसी । जाणे असे मलकापुरासी । परी नकार देती त्यासी । अट्टाहासे तो बैसला ॥११॥ आग्रहास्तव गजानन । गाडीत बैसले जाऊन । वस्त्ररहित पाहून । कुजबुज जन करीत ते ॥१२॥ महाराज उठले तेथून । नजर त्यांची चुकवून । डबा बायकांचा पाहून । त्याच ठायीं बैसले ॥१३॥ मूर्ति पाहूनी दिगंबर । स्त्रिया घाबरल्या फार । ओढिली साखळी अखेर । कथिला वृत्तांत पोलिसाला ॥१४॥ येई अधिकारी पोलिसाचा । हात धरी महाराजांचा । यत्न त्याचा उतरविण्याचा । परी न मानिती गजानन ॥१५॥ अधिकारी गेला स्टेशनासी । सांगितला वृत्तांत मास्तरासी । स्टेशनमास्तर डब्यापाशी । घेऊन आला त्वरीत तो ॥१६॥ योगीराज गजानन । बघता द्रवले त्याचे मन । वदे जरी हे नग्न । सोडून द्यावे हो यांजला ॥१७॥ असती हे संत थोर । साक्षात भगवंत अवतार । असे खचित मी लाचार । गुन्हेगार नसती खरे ॥१८॥ अती आदरे केले नमन । महाराजा घेतले उतरून । पुढे जठार साहेब येऊन । खटला तयांवरी भरला असे ॥१९॥ व्यंकटराव अकोल्याचे । देसाई घराणे त्यांचे । कामानिमित्त येणे त्यांचे । आले असती त्या ठायीं ॥२०॥ मंडळी जमली तिथे फार । खटला ऐकण्या बंगल्यावर । देसाई नामें गृहस्थ थोर । जठार साहेबा विचारती ॥२१॥ काय असे इथे आज । समोर दिसती महाराज । आणि इतरही समाज । जमण्या हें कारण काय असे ॥२२॥ जठार वदती तयांसी । कसे न ठावे तुम्हांसी । चालविणे आहे खटल्यासी । गजाननांवरी जो भरला असे ॥२३॥ देसाई झाले मनीं खिन्न । विनंती करिती कर जोडून । भगवत् मूर्ति गजानन । खटला नका हा चालवू ॥२४॥ गजानन हा योगीराणा । वंदनीय असती अवघ्यांना । चूक झाली असे जाणा । इथे तयांसी आणविले ॥२५॥ शिष्य भास्कर सवे आला । खुर्ची दिली बसण्या त्यांला । जठार वदती स्वामींला । वस्त्राविणे फिरणे योग्य नसे ॥२६॥ महाराज होते आसनी । जठारास वदती हासुनी । गुन्हेगार आम्ही कायद्यानी । योग्य वाटे ते करा ॥२७॥ तयां वदती आपण । चिलम भरावी न लावी क्षण । ऐसे ऐकता वचन । भानावरती ते आले ॥२८॥ पांच रुपये भास्कराला । जठारांनी दंड केला । निकाल तो ऐसा दिला । महाराजा ठेविले विवस्त्र म्हणुनी ॥२९॥ एकदां अकोल्यास गजानन । असता मेहताब येऊन । एकमेका आलिंगन । देते झाले त्या ठायीं ॥३०॥ हिंदु आणि मुसलमान । भेद न त्या ठायीं जाण । कराया जन-कल्याण । सिद्धपुरुष ते खचितची ॥३१॥ नंतर गेले अकोटासी । भेट द्याया नरसिंहजीसी । जाऊनि बसती विहिरीपासी । आंत डोकावून पाहती ॥३२॥ वदती घडावे स्नान । आंत सोडूनी बसती चरण । पाणी येई उफाळून । स्नान घडले संतांसी ॥३३॥ या रे या रे सारे जण । तीर्थांमाजी करी स्नान । सकलां करिती पावन । अधिकार तोचि सद्‌गुरुंचा ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य सप्तदशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १८ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा । कुंडले कानी किरीट माथा । पितांबर कटी जगन्नाथा । अनंत रूपे नटलासी ॥१॥ द्वारका मथुरा वृंदावन । तुझ्या कृपेने झाले पावन । खेळगडी ते गोपगण । जगज्जीवना श्रीहरी ॥२॥ दळू लागला जनीसी । वेड लाविले मीरेसी । उभा ठाकला पंढरीसी । पुंडलीकास्तव विठ्ठला ॥३॥ युगानुयुगे भक्तगण । तिथे येती घ्यायां दर्शन । दीनानाथ दयाघन । पतितपावन तूंच की ॥४॥ बायजा नामे भक्तिण । दैवत तिचे गजानन । जातीने ती माळीण । मुंडगांव ग्राम तिचे ॥५॥ बालपणी लग्न झाले । भाग्यात होते लिहिले । संसार सुख ना लाभले । षंढ पती तिचा असे ॥६॥ माता-पित्या दुःख अती । करून द्यावा दुसरा पती । विचार येई ऐसा चित्ती । भुलाई शिवरामा वदतसे ॥७॥ शिवराम पिता त्यांवर । पत्नीस वदे न सोडी धीर । नशीबीच नसेल संसार । दोष तिचा काय असे ॥८॥ करून पाहू उपचार । भुलाई होई निरुत्तर । तारुण्याचा अवसर । बायजा सुंदर, रुपवती ॥९॥ थोरला दीर तिज पाहून । कामुक होई त्याचे मन । बायजा सवें भाषण । सप्रेमें तो करी सदा ॥१०॥ प्रयत्न केले अती त्याने । नाकारीले तयां बायजाने । पती पत्नी नाते जोडणे । कदापिही मान्य नसे ॥११॥ नित्य काळ हरी स्मरणीं । घातला असे बायजानी । मिठी घातली चरणीं । लाज राखावी प्रभूवरा ॥१२॥ जेष्ठ दीर बायजापासी । हेतू वाईट धरून मानसी । रात्रीच्या समयासी । उन्मत्त होऊनी पातला ॥१३॥ बायजा होई लाचार । परी धरुनिया धीर । सोडा म्हणे अविचार । पित्यासमान मज तुम्ही ॥१४॥ अंगावरी टाकतां हात । पडला माडीवरून त्याचा सुत । बायजा जाऊनी धावत । बालकां घेई उचलूनी ॥१५॥ खोक पडली डोक्यास । बायजा लावी औषधास । करणीचे फळ दिरास । मिळालेच ना म्हणतसे ॥१६॥ भुलाबाई आणि शिवराम पिता । शेगांवी येती तत्त्वतां । महाराजांसी विचारता । होई भाकीत बायजाचे ॥१७॥ जरी लग्न करिसी बायजाचे । पुत्र नाही नशिबी हिचे । कल्याण करणे जरी तिचे । घेऊनी जावे स्वग्रामीं ॥१८॥ जेवढे पुरुष असती कोणी । बंधू पिता समजूनी । वागणे तिचे तूं मानी । विधीलिखित सत्य हे ॥१९॥ बायजेसी झाला आनंद । नामस्मरणी परमानंद । ध्यानींमनीं तो श्रीरंग । पुंडलीका सवे राही सदा ॥२०॥ पुंडलीका समवेत । येई बायजा शेगांवात । पुंडलीक गजानन भक्त । मुंडगांव हे ग्राम त्याचे ॥२१॥ नित्य करिती दोघे वारी । गजाननाच्या दरबारी । शुद्धभाव तो अंतरी । जन निंदा ती होत असे ॥२२॥ ही राहील जन्मभरी । वृत्ती सदा ब्रह्मचारी । जनांबाई पंढरपूरी । ऐशापरी ती राहिली ॥२३॥ खामगांवला भक्त थोर । होता राजाराम कवर । फोड झाला दुर्धर । डॉक्टर अधिकारी आणविला ॥२४॥ बहुत केले उपचार । आराम नसे तीळभर । कवराने टाकिला भार । सद्‌गुरु गजाननांवरी ॥२५॥ रात्रीच्या त्या समयासी । ब्राह्मणरूपे दारासी । हाक मारी कवरासी । परी ओळख कुणा नच त्यांची ॥२६॥ तीर्थ अंगारा घेऊन । आलो शेगांवाहून । फोडासी द्यावा लावून । तीर्थ पाजून हो द्यावे ॥२७॥ देऊन तीर्थ अंगारा । गेला ब्राह्मण माघारा । फोड तो फुटला खरा । अंगारा तो लावतांची ॥२८॥ पंढरपुरा गेले जन । सवे होते गजानन । पाटील मंडळी सज्जन । सुख सोहळा तो पाहती ॥२९॥ सर्व गेले दर्शनासी । सोडूनी मागे बापुन्यासी । तो वदला गजाननासी । दर्शन मजला घडवा हो ॥३०॥ गजाननाने केली मात । स्वयें होती पंढरीनाथ । बापुन्यास पडे भ्रांत । कैसे अघटीत घडले हे ॥३१॥ मृत श्वान जागविले । भक्तगणां सुखविले । कार्य ऐसे थोर झाले । कृपेने तव गजानना ॥३२॥
॥ इतिश्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य अष्टादशोsध्यायः समाप्तः
*********************
॥ अध्याय १९ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय नंदनंदना मुकुंदा । परमानंदा आनंदकंदा । व्रजभूषणा गोविंदा । नमन तुजला श्रीधरा ॥१॥ करुणाघना राधारमणा । दीनवत्सला दयाघना । ब्रजपाला राजीवनयना । मागणे एकच तुजप्रति ॥२॥ शेगांवासी मज न्यावे । चरणीं  संतांच्या घालावे । अभयदान मज द्यावे । प्रासादिक हे लिहावया ॥३॥ शेगांवी असता संत । आला दर्शना काशीनाथ । खंडेरावाचा हा सुत । गद्रे घराण्यांत जन्मला ॥४॥ कृपा जाहली तयांवर । घरी आली असे तार । मन झाले असे आतूर । खामगांवा जावयांसी ॥५॥ तार घेऊन हातात । उभा शिपाई दारात । मजकूर पाहता त्यांत । समाधान तयां वाटले ॥६॥ हुद्दा मुनसफीचा खास । मिळाला असे हो तयांस । मोर्शी नामे ग्रामांस । जाणे लागले तयांसी ॥७॥ गजानन येती नागपूरी । बुटी गोपाळराव यांचे घरी । घराणें हे परोपकारी । संतसेवा ब्रीद साचे ॥८॥ शेगांवचे भक्तगण । महाराज जातां दुःखी मन । आणावे तयां परतून । इच्छा त्यांची तीच असे ॥९॥ शेगांवीचे लोक आले । बुटी-सदनासी ते गेले । सद्‌गुरुचरण वंदीले । गोपाळ, हरी पाटलाने ॥१०॥ वदती गजानन पाटलासी । घेऊन चला शेगांवासी । इथे न गमे आम्हांसी । सांगती ते सकळ जन ॥११॥ बुटी-गृहीं भोजन । घेऊनी निघती गजानन । आशीर्वच तयां देऊन । घरी गेले रघुजीच्या ॥१२॥ राजे रघुजी असती थोर । लौकिक तयांंचा दूरवर । केला महाराजां पाहुणचार । रामटेक मुक्काम गाठला ॥१३॥ घेऊनी रामाचे दर्शन । शेगांवी गेले गजानन । हरी पाटलासी घेऊन । समागमे भक्तांच्या ॥१४॥ धार कल्याणचे रंगनाथ । स्वामी आले शेगांवात । अध्यात्मातुनी संकेत । देत असती एकमेकां ॥१५॥ वासुदेवानंद सरस्वती । कृष्णा तटाकी ज्यांची महती । कर्म योगी ज्यांची प्रिती । सिद्ध योगी तोही असे ॥१६॥ येणार इथे भेटायासी । सांगती गजानन बाळासी । प्रेमभाव हृदयासी । ज्ञानसंपन्न तो कर्मठ ॥१७॥ स्वामी येताचि आदर । कथित केला समाचार । हर्ष झालासे अपार । हरिहर भेट ती जाहली ॥१८॥ करुनी गजानना वंदन । गेले योगेश्वर परतून । मार्ग त्यांचा असे भिन्न । आपणाहूनी खचितची ॥१९॥ सांगती बाळाभाऊसी गजानन । ईश्वर भक्तिचे मार्ग तीन । व्रत वैकल्ये अनुष्ठान । हीच अंगे कर्माची ॥२० शुद्धभाव लीनता । अंगी असावी तत्त्वतां । भजनीं पूजनी आस्था । नामस्मरण हे सत्यचि ॥२१॥ योगी मुनी जे भूवरी । कर्म मार्ग हा आचरी । तयां योगे श्रीहरी । होऊनी त्यांचा राहिला ॥२२॥ साळुबाई भक्त थोर । ग्राम तिचे वैजापूर । वाडेंघोडें माहेर । गजानन दरबारी राहिली ॥२३॥ वेदविद्येचा जाणता । गजानन ज्ञानसविता । वैदिक कुणी वेद म्हणता । चुकताची सद्‌गुरु सांगती ॥२४॥ आत्माराम वेदसंपन्न । सेवेसी अर्पिले जीवन । गजानन सेवेकारण । एकनिष्ठ भक्त तो ॥२५॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुजा नारायण जामकर । दूधच ज्याचा आहार । भक्त तीन जाहले ॥२६॥ मोरगांवी मारुतीपंत । पीक होते शेतांत । रक्षण पिकाचे करण्याप्रत । तिमाजी नामे एक होता ॥२७॥ रास होती खळ्यांत । तिमाजी झाला निद्रित । गाढवे येऊनी खात । असती धान्य ते खळ्यांतील ॥२८॥ गजानने केली लीला । जागविले तिमाजीला । गाढवे पाहता घाबरला । महाराज अदृष्य जाहले ॥२९॥ तिमाजी सांगे मालकासी । मारुतीपंत ना रागविले त्यासी । गजानन सांगती येता दर्शनासी । प्रकार घडला तो तैसा ॥३०॥ शके अठराशे सोळात । महाराज आले बाळापुरात । स्वारी बैसली आनंदात । बैठकीसमोर सुखलालाच्या ॥३१ ॥ मूर्ति होती दिगंबर । भाविक करिती नमस्कार । आला पोलीस हवालदार । मारु लागला महाराजा ॥३२॥ त्याचा परिणाम तो झाला । आप्त गेले स्वर्गाला । हवालदारही ना राहिला । पंधरा दिवसातच स्वर्गवासी ॥३३॥ पंढरपुरी येती गजानन । चंद्रभागेचे केले स्नान । विठ्ठलाचे दर्शन । घेतले मंदिरी जाऊनी ॥३४॥ जोडूनिया करां । विनविले रुक्मिणीवरां । आता द्यावा आसरा । चरणांपासी पांडुरंगा ॥३५॥ हरी पाटील त्यावेळी । होते तिथे सद्‌गुरुजवळी । आणिकही ती मंडळी । विठ्ठल दरबारी असती ते ॥३६॥ डोळ्यांतूनी वाहें पाणी । गजानना पाहिले सर्वांनी । आले शेगांवी परतुनी । चिंता मनीं वाटतसे ॥३७॥ सोडणार गजानन संगत । जाहले हे सर्वां श्रृत । मनीं सकलांच्या ती खंत । भक्त येती दर्शना ॥३८॥ गणेश चतुर्थीचे दिवशी । महाराज वदले सकलांसी । आता गणपती बोळविण्यासी । यावे तुम्ही मठांत ॥३९॥ चतुर्थीचा तो दिवस । आनंदात काढिला खास । बाळाभाऊच्या धरिले करास । आसनावरी ते बैसवले ॥४०॥ शके अठराशे बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवासरी प्रहर दिवसाला ॥४१॥ प्राण रोधिता शब्द केला । 'जय गजानन' ऐसा भला । सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवात संत तो ॥४२॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकोनविंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २० ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी शारङ्गधरा । शिरावरी या ठेवी करां । जगन्नायका विश्वंभरा । सर्व सूत्रें तुझे हाती ॥१॥ दीनानाथा श्रीपती । कुंठीत झाली असे मती । द्यावी सख्या अनुमती । कार्य हे करावया ॥२॥ पाप ताप भवभय । हारी आता देई अभय । मी वासरु तू गाय । प्रेमे पान्हा पाजी तूं ॥३॥ शामसुंदरा श्रीधरा । पतितपावना परम उदारा । पितांबर कटी मुकुटी तुरा । कंठी हार ते शोभती ॥४॥ मनां लागली हुरहुर । समाधिस्थ ते झाल्यावर । नसे द्यावया कुणी धीर । हळहळती सकळ नरनारी ॥५॥ तुटली म्हणती कुणी नाती । ऐसे कितीक जन बोलती । परी तीच असे भ्रांती । अदृष्य असती त्याच ठायीं ॥६॥ श्री गजानन शेगांवात । स्वप्नी देती दृष्टांत । भक्तालागी सुखवित । अनुभव हाची येत असे ॥७॥ कोठाडे नामे गणपत । राहत होता शेगांवात । रायली म्हणुनी कंपनीत । एजंट होता दुकानाचा ॥८॥ नित्य नेम दर्शनाचा । ‘गजानन गजानन’ बोले वाचा । परिपाठ हाच तयांचा । मठामाजी जात असे ॥९॥ अभिषेक करूनी समाधीस । भोजन घालावे ब्राह्मणांस । विजयादशमी मुहूर्तास । सिद्धता ती करी सर्व ॥१०॥ कांता वदे अन्नदान । नेहमीच करितां आपण । उद्या आहे मोठा सण । लक्ष प्रपंची असूं द्यावे ॥११॥ रात्रीस पडले तिला स्वप्न । मूर्ति गजानन पुढे नग्न । होत आहे हे प्रयोजन । यासी न अडथळा आणणे ॥१२॥ खर्च नसे अनाठायीं । ब्राह्मणां वाटणे गायीं । परमार्थ करणे ठायीं ठायीं । या सम पुण्य दुजे नसे ॥१३॥ पतीस झाली ती सांगती । आनंद न मावे त्याच्या चित्ती । पालटली तिची ती मती । कुविचार मनीं नच राहिला ॥१४॥ लक्ष्मण हरी जांजळास । अनुभव आला असे खास । बोरीबंदर स्टेशनास । संन्यासी रूपाने भेटले ॥१५॥ आजानुबाहू परमहंस । दृष्टी नासाग्री दिसे खास । बोलले असती लक्ष्मणास । गजाननाचा शिष्य अससी तूं ॥१६॥ कां होसी रे हताश । नच कळे हे आम्हांस । काळजी असे तुझी त्यास । पुण्यतिथी केलीस साजिरी ॥१७॥ पुत्रशोक बापटासी । असून आला प्रसादासी । खास म्हणून गेहासी । सत्य असेच ते सांग ना? ॥१८॥ लक्ष्मण होतसे कष्टी । खुणेच्या ऐकोनी गोष्टी । समर्थ देती तयां पुष्टी । परी कोण असेल ते कळेना ॥१९॥ आदरें केला नमस्कार । गुप्त झाले योगेश्वर । स्टेशन तेच बोरीबंदर । ध्यानीं मनीं लक्ष्मणाच्या ॥२०॥ भेट देती अनेकांना । शुद्धभाव जे ठेविती मनां । तयांंची पुरवी कामना । संत गजानन अवलिया ॥२१॥ माधव मार्तंड असे जोशी । कळंबचा तो रहिवासी । रेव्हिन्यू ऑफिसर पदविसी । ठेवी गजाननावर भरंवसा ॥२२॥ गुरुवार होता दिन । वाटे घ्यावे दर्शन । शेगांवासी जाऊन । परतून जावे स्वग्रामां ॥२३॥ शिपाई कुतुबुद्दीन । बोलला तयां कर जोडून । आले आभाळ भरून । गाडीत जाणे बरे नव्हे ॥२४॥ मन नदीस होता पूर । तरी होऊ म्हणे नदीपार । दमणी करवी तयार । शेगांवी जाण्याकारणे ॥२५॥ झंझावात सुटला वारा । वर्षा होई पडल्या गारा । उडवू पाहे वारा छपरा । घाबरले ते मानसी ॥२६॥ पुरामाजी केले रक्षण । आले धावूनी गजानन । पैलतीरी पोचवून । रक्षण केले स्मरतांची ॥२७॥ अनेकांच्या अनेक व्यथा । निवारिल्या सद्‌गुरुनाथा । तूच कैवारी दीनानाथा । अनन्यभावें भजता तुज ॥२८॥ तीर्थ-अंगारा गुणकारी । नित्य करितां तिथे वारी । जिथे गजानन हृदयांतरी । पावन होती ते भक्तगणां ॥२९॥ खऱ्या खऱ्या संतांची । सेवा न जाई वाया साची । परी निष्ठा मानवाची । जडावी लागे सत्यची ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य विंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २१ ॥
॥ श्रीगणेशाय नमः॥ जय जय अनंता अद्वैता । अविनाशा भगवंता । भवभयहरणा गुणातिता । ब्रह्मांडनायका नमितो तुज ॥१॥ तूंच अससी सर्वांठायीं । नतमस्तक हे तुझिया पायीं । नारद तुंबरु तुजला ध्यायीं । जगज्जीवना जगत्पते ॥२॥ हातें घडता पातकांसी । तूंच निवारण करिसी त्यासी । धाव वेगी हृषीकेशी । भक्तवत्सला दीनबंधो ॥३॥ पतितपावन तुजला म्हणती । सतेज सुंदर लख लख कांती । चक्र सुदर्शन धरीले हाती । संहारक तूं दुष्टांचा ॥४॥ जो जो येई भेटण्यासी । चिंता नेसी तूं लयासी । जे जे आवडे देसी त्यासी । पूर्णानंद तू व्यंकटेशा ॥५॥ पाप-पुण्याची वासना । उपजविसी तूंच नारायणा । पसायदान देई या दीना । कळस अध्याय गोड करी ॥६॥ स्तोत्र कथा तुझे गाणे । गाती भक्तगण आवडीने । गजाननाची  ही स्तवने । भाव पुष्पे ही समर्पिली ॥७॥ आता असावे सावधान । कळस अध्याय हा करिता कथन । कर्ता करविता गजानन । निमित्तासी कारण दास असे ॥८॥ एकनिष्ठा असे ज्याची । सेवा करण्या गजाननाची । सार्थकता त्या जीवनाची । कृपाप्रसाद तो लाभता ॥९॥ बांधित असता मंदिर । काम करिता शिखरावर । खाली पडला एक मजूर । हाताखालचा गवंड्याच्या ॥१०॥ तीस फुटावरून खाली । देहयष्टी ती कोसळली । घडीव चिरे त्या स्थलीं । तयां वाचविती गजानन ॥११॥ एक बाई रजपुताची । राहणार ती जयपूरची । बाधा तिजला भूताची । तयां कारणे ती आली ॥१२॥ दत्तात्रयाचा दृष्टांत झाला । ती असता जयपूरला । जाई तूं रामनवमीला । शेगांवी गजानन दर्शनासी ॥१३॥ दृष्टांत झाला म्हणून । आली मुलांस घेऊन । उत्सव असता संपन्न । सभामंडपी ती बैसली ॥१४॥ खांब तिथे दगडाचे । उभे असती मंडपाचे । भाग्य उजळण्या त्या साध्वीचे । खांब तिथे कोसळला ॥१५॥ खांब अंगावरी पडला । इजा मुळी न झाली तिला । लोकांनी तो उचलिला । वाचले प्राण त्या बाईचे ॥१६॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । परमभक्त गजाननाचा । रहिवासी तो शेगांवचा । घरी गेले गजानन  ॥१७॥ गोसाव्याचा असे वेष । मागती तयां भोजनांस । देती सद्‌गुरु हाकेस । दारासी तो पातला ॥१८॥ निरखून पाहता गोसाव्यासी । स्वामी गजानन दिसती त्यासी । धरुनिया हातासी । पाटावरती बसविले ॥१९॥ सुग्रास दिले भोजन । गोसावी पावला समाधान । आशीर्वच तयां देऊन । अंतर्धान ते पावले ॥२०॥ श्रीगजानन चरित्र । असे हे परम पावन पवित्र । निष्ठा सबळ पाहिजे मात्र । अनुभव तोची यावया ॥२१॥ गजानन चरित्र अवतरणिका । उमजावी ही अनेका । यातील आशय थोडका । अध्याय एकविसावा हा असे ॥२२॥ मंगलाचरण प्रथमोध्यायी ।  गुरुदेवाच्या वंदन पायी । निवेदन या ठायीं । सार तेच या असे ॥२३॥ माघ वद्य सप्तमीसी । संत गजानन शेगांवासी । देविदास सदनापासी । प्रगट पहा ते जाहले ॥२४॥ बंकटसदनीं राहिले । मनोवांच्छीत पुरविले । अकस्मात निघून गेले । चिंता मनीं बंकटाच्या ॥२५॥ टाकळीकरांच्या कीर्तनांत । भाविकां दिसले संत । पितांबराकडुनी तुंब्यात । पाणी तयांंनी भरविले ॥२६॥ पुढील अध्यायी अनेका । चमत्कार येती भाविकां । पार लावी जीवन नौका । संत-कृपा तीच खरी ॥२७॥ बालक असतां अज्ञान । माता करी संगोपन । तयांपरी गजानन । भक्तगणांते सांभाळी ॥२८॥ दृढ धरा मनींं भाव । रक्षण करितां हाच देव । श्री गजानन दयार्णव । मनोरथ पूर्ण करितसे ॥२९॥ गजानना प्रिय दुर्वांकुर । एकवीस अध्याय हेच सार । भाव पुष्प चरणांवर । सद्‌गुरुंच्या या वाहिले ॥३०॥ होऊनिया शुचिर्भूत । आसनावरी व्हावे स्थित । श्रद्धाभाव ठेऊनी मनांत । चरित्र पाठ हा करावाची ॥३१॥ माधव तनय पार्वती कुमार । ग्राम ज्याचे मेहकर । मुक्काम हल्ली नागपूर । कळस अध्याय संपविला ॥३२॥ पौष वद्य द्वादशी गुरुवार । कालयुक्त नाम संवत्सर । श्रीगजानन माहात्म्य साकार । कृपेने तयांच्या जाहले ॥३३॥ श्रीगजानना सद्‌गुरुनाथा । तव चरणीं विनम्र माथा । शिरी ठेवी कृपाहस्ता । अभय दान हे मागतसे ॥३४॥ माता पिता दीन बंधू । कृपा सागर करुणा सिंधू । योगी महात्मा गजानन साधू । वंदन भावें तयांप्रती ॥३५॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकविंशोsध्याय: समाप्तः ॥
॥ शुभं भवतु ॥
॥श्रीगजानन महाराजार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

श्रीगजानन माहात्म्य :