Jan 14, 2022

श्री शंकर स्वामीरचित श्रीनृसिंहवाडीचा महिमा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री  गुरुवे  नम: ॥ श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये ॥


श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला । ऐकुनी घेई गुरूच्या मुला ॥ कृष्णावेणी, पंचगंगेच्या पुण्यसंगमावरी । सदा शोभे ही पावनपुरी ॥ दत्तराज-नरसिंहसरस्वती-त्रिमूर्ती-विधिहरी । विलासती येथें कृष्णातीरी ॥ कल्पवृक्ष औदुंबर प्रभुवरी शीतल छाया धरी । विराजती गुरूवर निजमंदिरी ॥ पदकमळें ज्यांची घनःश्यामसुंदर । निजपदस्वरूपी स्वयेंच ते गुरूवर ॥ सच्चिदानंदघन व्यापक सर्वेश्वर । या नृसिंहसरस्वती स्वामींचा आश्रय आहे हिला ॥

म्हणोनि महिमा जगीं जाहला श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला

दीनदयार्णव अंबामाधवनंदन श्रीगुरुयती । कल्पतरू कामधेनु शोभती ॥ भावभक्तिनें जे नर त्यांच्या पादुकांसि पूजिती । राहुनी तेथें उपासिती ॥ प्रदक्षिणा घालती, तयांचे चरित्रही वाचिती । नवविधा भजनें आराधिती ॥ कामना तयांच्या असतील, ज्या ज्या मनीं । त्या सकळ पुरविती, श्रीगुरु चिंतामणी ॥ प्रभुकृपें लाभती सुत वंध्येलागुनी श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला

दारिद्र्यासि धन, आरोग्य मिळे, रोग असे त्याजला । टळें अपमृत्युही तो या स्थळा ॥ कुष्ठी, अपस्मारी, अंध, बहिरे, हृदयशूळी, पांगळे । मंदमति, मूक होती चांगले ॥

धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चारी पुरुषार्थचि आगळे । या स्थळीं तेही लाभती सगळे ॥ श्रीगुरुपादुकार्चनी फळ, सौख्य-समृद्धी मिळे । दैन्य, अघ, तापत्रय मावळे ॥ ज्या ठायीं षड्गुणाधिपती श्रीवल्लभ । अघटित घटनापटू दत्तगुरु स्वयंप्रभ ॥ कवणास काय कधी तेथ असे दुर्लभ । दीनसहोदर भक्तवत्सल देव जगी गाजला ॥ तो जिथे शंकरासि लाधला श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Jan 12, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३६ ते ४०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ॥३६॥ शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥
गुरुस्तवनाच्या महतीचे वर्णन करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - स्वामीभक्तांनो, श्री स्वामीकृपा प्राप्त होण्यासाठी मी तुम्हांस एक सहज सोपा उपासनामार्ग सांगतो. हे गुरुस्तवन स्तोत्र अत्यंत श्रद्धेनें आणि त्यांतील बोध, अर्थ जाणून घेऊन वाचावे. अनुप्रमाण म्हणजे एखाद्या गोष्टीचे यथार्थ ज्ञान होणे. अत्यंत नि:शंक मनाने, या स्तवनातील शब्द, वचनें यांचा यथायोग्य अर्थ जाणून घेऊन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थांवर दृढ श्रद्धा ठेवून या दिव्य स्तोत्राचे अकरा वेळा आवर्तन करावे. अंतःकरण पवित्र ठेवून जो या स्तवनाचे भक्तिभावाने पठण करेल, त्या भक्ताच्या सर्व इष्ट मनोकामना श्री समर्थांच्या कृपेने फलद्रुप होतील. हे त्रिवार सत्य आहे.
'त्रिवाचा' या शब्दाचा एक अर्थ असा आहे की तीन वेळा उच्चारलेले वचन, जे सत्यरूप असते. थोडा वेगळा आणि आध्यात्मिक अर्थ पाहू जाता, ‘ त्रिवाचा ’ हा शब्द वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या तीन वाणींना दर्शवितो. आपल्या वाणीचं व्यक्त रूप अर्थात प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी म्हणजे वैखरी आहे. तर मनातील विचार, मनातल्या मनात केलेले बोलणे असे मध्यमा हे वाणीचे अंतर्मनातलं रूप आहे, तर पश्यंती म्हणजे आपल्या विचारांचे सुप्त रूप अथवा स्फुरण होय. थोडक्यात, ईशस्तवन अथवा नामस्मरण जर मोठ्याने केले जे आपणही ऐकू शकतो आणि आजूबाजूचेही जन ऐकू शकतील तर ते वैखरी वाणीतील स्तवन होय. तेच मध्यम स्वरांत केलेले स्तवन जे आपण ऐकू शकतो मात्र बाजूला बसलेली व्यक्ती ऐकू शकत नाही, ते मध्यमा वाणीतील स्तवन होते. योगीपुरुष, उच्च कोटीचे साधक हे मात्र ईशस्तवन अथवा परमेश्वराच्या नामाचा जप करत नाहीत तर त्यातून नामजपाची धून ऐकतात. अर्थात नामाचा जप न होता ते त्यांच्या श्वासातच तद्रूप झालेले असते. असा जप त्या सिद्धपुरुषांच्या रोमारोमांत अविरत, अखंड सुरु असतो आणि हाच जप त्यांना परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करवून देतो. अर्थात श्री आनंदनाथ महाराजांसारखे सिद्ध योगी आणि श्री स्वामी समर्थांचे कृपांकित थोर शिष्य ज्यांनी त्या परमानंदाची अनुभूती वारंवार घेतली आहे, त्यांनी आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांनाही श्री स्वामींच्या कृपेचा लाभ व्हावा यासाठी किती सहज-सुलभ तरीही अमौलिक असा हा श्रीगुरुस्तवनाचा ठेवा दिला आहे. श्री आनंदनाथ महाराजांचे स्मरण-वंदन करून आपणही श्री स्वामी समर्थांचे हे स्तवन नित्य पठणांत ठेवावे आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरही राहो हीच प्रार्थना करू या !

हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ॥३८॥ जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ॥३९॥ हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ॥४०॥
श्री स्वामी समर्थांचे हे लघु स्तवन स्तोत्र अतिशय प्रभावी असून या भवसागरातून तरून जाण्याचा सुलभ मार्ग आहे. ईश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी केवळ त्याला अनन्यभावाने शरण जाणे आवश्यक आहे. अर्थात पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जो हे स्तवन पठण करेल, तो या जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सहजच मुक्त होईल. आपल्यासारखे सामान्य जन सहसा सकाम भक्ती करतात, म्हणजेच काही ठराविक इच्छापूर्ती, सांसारिक कामना आदि गोष्टींसाठी स्वामींची उपासना करतात. तर थोर तपस्वी, योगी-मुनी यांचे केवळ ' हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ' असेच मागणे असते. संकल्पसिद्धीदाते श्री समर्थ मात्र ह्या दोन्ही प्रकारच्या भक्तांवर नेहेमीच आपल्या कृपेचा वर्षाव करतात. हे पूर्णतः जाणणारे श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - नित्यनियमाने या स्तवनाचे पठण केले असता, श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येईल. दत्तप्रभूंच्या वरदानाने भक्तांच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होतील आणि हा संसार तरून जाण्यासाठी शक्तिसुद्धा प्राप्त होईल. जिथे या प्रासादिक स्तोत्राचे पठण होईल, तिथे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांचा वास असेल अर्थातच तेथील वातावरण प्रसन्न, मंगलमय आणि पवित्र होईल. याचकरिता स्वामीभक्तहो, सूक्ष्म जीव ते मानव अशा चौऱ्यांशी लक्ष योनींच्या या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी त्या अवधूत दत्तात्रेयांचे हे स्तोत्र श्रद्धापूर्वक नित्य वाचा. योगीश्वर श्री स्वामी हे स्वतःच सत्य संकल्पाचे मूळ आहे. अशक्यप्राय आणि अतर्क्य गोष्टीसुद्धा स्वामी कृपेने सहज शक्य होतात. सर्व लौकिक आणि कर्मबंधने नष्ट करून मोक्ष प्रदान करणारे हे श्रीसद्‌गुरु आहेत. तेव्हा, शरणागतकवच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही, अशी ग्वाहीही श्री आनंदनाथ महाराज देतात.

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Jan 10, 2022

तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


होता ब्राह्मण
भार्ययासह पुरा आला तिच्या उदरा ।
मौनत्वें करितो विचित्र मग जो नानाविलासे हरा मौंजीबंधन झालीया तदुपरीं काशीपुरा चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥१ गंगास्नान निरंतरा करितसे कालत्रया साधुनीं । चिन्मुद्रा करितो दृढासनी वसे काशीस ध्यातो मुनी येती थोर यतीं नमुनी म्हणती आम्हासि तो आगळा । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥२ वृद्ध कृष्ण सरस्वती यतिवरा सर्वांसी मानी भला । त्यातें वंदूनि बोलतो निजगुजां संन्यास देणे मला चतुर्थाश्रम घेऊनि गुरुचिये आज्ञे स्वयें चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥३ काषायांबर दंड हस्तकमलीं कमंडलु मेखला । भस्मोद्धुलित केवळा शशीकला रुद्राक्षमाळा गळा तीर्थाला करुनी पुनित सकळा पृथ्वीवरीं चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥४ मेरू सव्य करूनियां मनगती जातो कसा निर्गुणी । मायामोह त्यजुनि निर्मळ मनें तीर्थें बहू वंदुनी सुक्षेत्रापुर गाणगाप्रति गुरू तात्काळ जो पातला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥५ स्थाने उत्तम शोधुनी त्रिभुवनीं नाहीं असे पाहुनीं । आला सत्वर पावला कुरुपुरीं एकांत राहे वनीं रजकें जाऊनि वंदिता प्रतिदिनीं राज्यास्पदी स्थापिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥६ होती ब्राह्मणि साठ वर्षे तिजसी कन्या-कुमारही दिधला । वांझ महिषीसी दुभविले फुलविले शुष्क काष्ठही तीराला अंत्यजामुखी वेदहीं पढविला त्रिविक्रमा भेटला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥७ त्रैमूर्ती अवतार हा यतिवरा वेषा धरी मानवा । त्यासी जे नर लोक मूढ म्हणती होई यमा बांधवा जाणे कुंभजवंशी तो गुरुपदी कृष्णातटी पाहिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥८ एवं हे गुरूअष्टक प्रतिदिनी त्रिकाळ जे पठती । पापे नासती पुण्य पावति अतीं कीर्ती बहू वाढती विद्या गोधन संतती दृढमतीं सत्त्वें गुणे राहती । एवं नित्य करिती जे गुरुस्तुती अंति गती पावती तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥९


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Dec 31, 2021

कृष्णेच्या हो तीरा, उभा मंदिरा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा l

कृष्णेच्या हो तीरा, उभा मंदिरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥धृ.

हाच त्रिभुवना पालनहारा, मूर्त ब्रह्मा-विष्णु-महेश्वरा l वसतो औदुंबरा, गाणगापुरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांची विघ्नें हरणारा, त्रिविधताप दुरी करणारा l

अखंड करी संचारा, दत्त हा खरा, शंख-चक्र-गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्तांसाठी कल्पतरू हा, नसे समाप्ती या अवतारा l अविनाशी हो खरा, तू निरंतरा, शंख-चक्र-गदाधरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 



Dec 29, 2021

हेचि मागणे गुरूराया...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

श्रीराम समर्थ


सदगुरूराया तुजपाशी । आलो काही मागावयासी । ठाव देई चरणापाशी । हेचि मागणे गुरूराया ॥१ कान तुझी कथा ऐको । नेत्र तुझे रूप देखो । जिव्हा नामस्मरणी टिको । हेचि मागणे गुरुराया ॥२ मत्सर कोणाचा न व्हावा । मनी ताठा नुपजावा । नम्रता येवो स्वभावा । हेचि मागणे गुरूराया ॥३ कोणाचीही नको निंदा । लबाडीचा नको धंदा । भजनाच्या लावी छंदा । हेचि मागणे गुरूराया ॥४ उपजोनी सात्विक भावा । नरदेह सार्थकी लावावा । सोलीव आनंद लुटावा । हेचि मागणे गुरुराया ॥५ दोषाची मी असे खाण । परी तुझा म्हणवितो जाण । कृपेची न पडो वाण । हेचि मागणे गुरूराया ॥६ देह तूचि देही तूच । जगत्रयी अवघा भरला तूच । चित्तास देई चिंतन हेच । हेचि मागणे गुरूराया ॥७ पुढे तूचि मागे तूच । आत बाहेरी अससी तूच । आता आणी प्रचितीस । हेचि मागणे गुरूराया ॥८ आता करितो तुजसी नमन । नमना वीण काही न आन । नमन 'न मन' नामस्मरण । हेचि मागणे गुरूराया ॥९


घडो मजसि संगती सतत सज्जनांची हरी जडो मन पदी पडो तव कथा ही कानावरी

असोच रसना सदा रत तुझ्या सुनामामृती करोत कर सर्वदा भजन हे तुझें निश्चिती

- जय जय रघुवीर समर्थ -


श्री महाराज म्हणतात -

राम नाम, अन्नदान, सगुणाची भक्ती । हीच परमार्थ साधण्याची युक्ती

मुखात नाम, हाती काम, कर्ता राम । हेच साधनात साधन जाण


श्रीराम श्रीराम श्रीराम


सौजन्य :- चैतन्योपासना, श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर (संस्थान)