Sep 15, 2021

श्री स्वामी समर्थ आरती - पंचप्राण हे आतुर झाले


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।

सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥धृ.

हरी हर संगे ब्रह्मदेवही, खेळे तव भाळी पुनव हासते प्रसन्नतेने मुख चंद्राचे वरी ।

लाजविती रवि तेजाला, तव नयनांच्या ज्योती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥१

पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जगजेठी । 

अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥२ धर्माचरणी पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत्कर्माचा यज्ञ घडावा, झिजवुनि ही यष्टी ।

सन्मार्गाने  सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥३ अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा । पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।

अल्पचि भिक्षा घालुनि, स्वामी न्यावे मज संगती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥४



Sep 13, 2021

संक्षिप्त रुद्राध्याय - श्री शिवलीलामृत


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनी परायण । सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥१॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती । त्यांच्या पुण्यास नाही मिती । त्रिजगती तेचि धन्य ॥२॥ जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण । तो शंकरचि त्याचे दर्शन । घेता तरती जीव बहू ॥३॥ अष्टोत्तरशत माळा । सर्वदा असावी गळा । एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजिता भाग्य विशेष ॥४॥ पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक । सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करिता ॥५॥ नित्य रुद्राक्षपूजन । तरी केले जाणिजे शिवार्चन । रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयी ॥६॥ काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥७॥ असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करिता अनुष्ठान । दोघांसी झाले नंदन । शिवभक्त उपजतांचि ॥८॥ राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम । दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानी ॥९॥ आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत । बोलती शिवनामावळी नित्य । पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥१०॥ आश्चर्य करिती राव प्रधान । यांस का नावडे वस्त्रभूषण । करिती रुद्राक्षभस्मधारण । सदा स्मरण शिवाचे ॥११॥ विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रे भूषणे लेवविती । ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥१२॥ शिक्षा करिता बहुत । परी ते न सांडिती आपुले व्रत । राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावे काय आता ॥१३॥ तो उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर । सवे वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥१४॥ ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनि ॥१५॥ राव प्रधान सामोरे धावती । साष्टांग नमूनि घरासी आणिती । षोडशोपचारी पूजिती । भाव चित्ती विशेष ॥१६॥ समस्तां वस्त्रे भूषणे देऊन । राव विनवी कर जोडून । म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचे ॥१७॥ नावडती वस्त्रे अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर । वैराग्यशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासी ॥१८॥ पुढे हे कैसे राज्य करिती । हे आम्हांसी गूढ पडिले चित्ती । मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती । दाखविले भद्रसेने ॥१९॥ यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे का झाले शिवभक्त । यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥२०॥ पूर्वी काश्मीर देशात उत्तम । महापट्टण नंद्रिग्राम । तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचे ॥२१॥ त्या ग्रामीचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप । ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥२२॥ जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसे तिजवरी विराजे छत्र । रत्‍नखचित याने अपार । भाग्या पार नाही तिच्या ॥२३॥ दास दासी अपार । घरी माता सभाग्य सहोदर । जिचे गायन ऐकता किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥२४॥ वेश्या असोन पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वता । त्याचा दिवस न सरता । इंद्रासही वश्य नव्हे ॥२५॥ परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत । सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेसी ॥२६॥ अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळे शिव पूजीत । ब्राह्मणहस्ते अद्भुत । अभिषेक करवी शिवासी ॥२७॥ याचक मनी जे जे इच्छीत । ते ते महानंदा पुरवीत । कोटि लिंगे करवीत । श्रावणमासी अत्यादरे ॥२८॥ ऐक भद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून । त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन । नाचू शिकविले कौतुके ॥२९॥ आपुले जे का नृत्यागार । तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर । कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीने ॥३०॥ करी शिवलीलापुराणश्रवण । तेही ऐकती दोघेजण । सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढे ॥३१॥ महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेकरून । त्यांच्या गळा कपाळी जाण । विभूति चर्ची स्वहस्ते ॥३२॥ एवं तिच्या संगतीकरून । त्यांसही घडतसे शिवभजन । असो तिचे सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥३३॥ सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला । त्याचे स्वरूप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवा ॥३४॥ पूजा करोनि स्वहस्तकी । त्यासी बैसविले रत्‍नमंचकी । तो पृथ्वीमोलाचे हस्तकी । कंकण त्याच्या देखिले ॥३५॥ देखता गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण । विश्वकर्म्याने निर्मिली जाण । मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥३६॥ सौदागरे ते काढून । तिच्या हस्तकी घातले कंकण । येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥३७॥ पृथ्वीचे मोल हे कंकण । मीही बत्तीसलक्षणी पद्मिण । तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झाले मी ॥३८॥ तयासी ते मानले । सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले । सूर्यप्रभेहूनि आगळे । तेज वर्णिले नवजाय ॥३९॥ लिंग देखोनि ते वेळी । महानंदा तन्मय झाली । म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनी वंदी लिंगाते ॥४०॥ म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी । कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी । सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हे ॥४१॥ म्हणे या लिंगापाशी माझा प्राण । भंगले की गेले दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझे ॥४२॥ येरीने अवश्य म्हणोन । ठेविले नृत्यागारी नेऊन । मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकी ॥४३॥ तिचे कैसे आहे सत्त्व । धैर्य पाहे सदाशिव । भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥४४॥ त्याच्या आज्ञेकरून । नृत्यशाळेस लागला अग्न । जन धावो लागले चहूकडोन । एकचि हांक जाहली ॥४५॥ तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी । येरी उठली घाबरी । तव वातात्मज चेतला ॥४६॥ तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून । कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥४७॥ नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर । यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवा ॥४८॥ माझे दिव्यलिंग आहे की जतन । महानंदा घाबरी ऐकोन । वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले ॥४९॥ सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन । मी आपुला देतो प्राण । लिंगाकारणे तुजवरी ॥५०॥ मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथे जाती ज्वाळा । सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥५१॥ अति लाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग । उडी घातली सवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥५२॥ ऐसे देखता महानंदा । बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा । लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥५३॥ रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । ह्रदयी चिंतिले शिवध्यान । हर हर शिव म्हणवून । उडी निःशंक घातली ॥५४॥ सूर्यबिंब निघे उदयाचळी । तैसा प्रगटला कपाळमौळी । दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटी पाळी भक्तांते ॥५५॥ वरचेवरी कंदुक झेलीत । तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात । महानंदेसी झेलूनि धरीत । ह्रदयकमळी परमात्मा ॥५६॥ म्हणे जाहलो मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान । ती म्हणे हे नगर उद्धरून । विमानी बैसवी दयाळा ॥५७॥ माताबंधूसमवेत । महानंदा विमानी बैसत । दिव्यरूप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥५८॥ पावली सकळ शिवपदी । जेथे नाही आधिव्याधी । क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैची तेथे ॥५९॥ जेथे वोसणता बोलती शिवदास । ते ते प्राप्त होय तयास । शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथे पावली ॥६०॥ हे कथा परम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास । म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥६१॥ कंठी रुद्राक्षधारण । भाळी विभूति चर्चून । त्याचि पूर्वपुण्येकरून । सुधर्म तारक उपजले ॥६२॥ हे पुढे राज्य करतील निर्दोष । बत्तीस लक्षणी डोळस । शिवभजनी लाविती बहुतांस । उद्धरतील तुम्हांते ॥६३॥ अमात्यसहित भद्रसेन । गुरूसी घाली लोटांगण । म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरी जन्मले ॥६४॥ भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षै करिती । आयुष्यप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥६५॥ ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख । हे सभा सकळिक । दुःखार्णवी पडेल पै ॥६६॥ भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान । तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झाली असता जाण पा ॥६७॥ आजपासोनि सातवे दिवशी । मृत्यु पावेल या समयासी । राव ऐकता धरणीसी । मूर्च्छा येऊनि पडियेला ॥६८॥ करूनिया हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर । मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥६९॥ याकरिता भद्रसेन अवधारी । अयुत रुद्रावर्तने करी । शिवावरी अभिषेकधार धरी । मृत्यु दूरी होय साच ॥७०॥ अथवा शत घट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून । रुद्रे उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करी ॥७१॥ नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण । क्षोणीपाळा करी सप्तदिन । राये धरिले दृढ चरण । सद्‌गद होवोनि बोलत ॥७२॥ सकळ ऋषिरत्नमंडित पदक । स्वामी तू त्यात मुख्य नायक । काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनी ॥७३॥ तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण । तुजसवे जे आहेत ब्राह्मण । आणीक सांगसी ते बोलावून । आताचि आणितो आरंभी ॥७४॥ मग सहस्त्र विप्र बोलावून । ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण । न्यासध्यानयुक्त पढून । गुरूपासून जे आले ॥७५॥ ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन । सहस्त्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥७६॥ स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून । रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिले ॥७७॥ शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशी माध्याह्नी आला चंडांश । मृत्युसमय येता धरणीस । बाळ मूर्च्छित पडियेला ॥७८॥ एक मुहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिले समस्त । परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥७९॥ रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन । त्यासी पुसती वर्तमान । वर्तले तेचि सांगत ॥८०॥ एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर । विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारिखे ॥८१॥ तो मज घेऊनि जात असता । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वता । पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळभवांडी दुजी नसे ॥८२॥ ते महाराज येऊन । मज सोडविले तोडोनि बंधन । त्या काळपुरुषासी धरून । करीत ताडण गेले ते ॥८३॥ ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर । भद्रसेन करी जयजयकार । ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रू नेत्री आले ॥८४॥ अंगी रोमांच दाटले । मग विप्रचरणी गडबडा लोळे । शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमने वर्षती ॥८५॥ चंद्रानना धडकती भेरी । नाद न माये नभोदरी । असो भद्रसेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥८६॥ षड्रस अन्ने शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रे देत । अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥८७॥ ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता । ऐसा अति आनंद होत असता । तो अद्भुत वर्तले ॥८८॥ की निर्दैवासी सापडे चिंतामणी । की क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी । तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी । नारदमुनी पातला ॥८९॥ तो नारद देखोनि तेचि क्षणी । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी । दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखता ॥९०॥ पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन । धावोनि धरिती चरण । ब्रह्मानंदे उचंबळले ॥९१॥ दिव्य गंध दिव्य सुमनी । षोडशोपचारे पूजिला नारदमुनी । राव उभा ठाके कर जोडोनी । म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू ॥९२॥ त्रिभुवनी गमन तुझे सर्व । काही देखिले सांग अपूर्व । नारद म्हणे मार्गी येता शिव । दूत चौघे देखिले ॥९३॥ दशभुज पंचवदन । तिही मृत्यु नेला बांधोन । तुझ्या पुत्राचे चुकविले मरण । रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥९४॥ तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा । शिवे वीरभद्र मुख्य पाठविला । मज देखता मृत्यूसी पुसू लागला । शिवसुत ऐका ते ॥९५॥ तो सार्वभौम होईल तत्त्वता । रुद्रमहिमा तुज ठाऊक असता । शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वता । कैसा आणीत होतासी ॥९६॥ मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून । तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होते ॥९७॥ ते महत्पुण्ये निरसूनि सहज । दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य । मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधे कष्टी बहू ॥९८॥ मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत । हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळत घडला हा ॥९९॥ ऐसे नारद सांगता ते क्षणी । राये पायावरी घातली लोळणी । आणीक सहस्त्र रुद्र करूनी । महोत्साह करीतसे ॥१००॥ शतरुद्र करिता निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । हा अध्याय पढता निर्दोष । तो शिवरूप याचि देही ॥१०१॥ तो येथेचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थे तरती बहुत । असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥१०२॥ आनंदमय शक्तिनंदन । राये शतपद्म धन देऊन । तोषविला गुरु संपूर्ण । ऋषींसहित जाता झाला ॥१०३॥ हे भद्रसेनआख्यान जे पढती । त्यासी होय आयुष्य संतती । त्यांसी काळ न बाधे अंती । वंदोनि नेती शिवपदा ॥१०४॥ एवं महापापपर्वत तत्त्वता । भस्म होती श्रवण करिता । हा अध्याय त्रिकाळ वाचिता । गंडांतरे दूर होती ॥१०५॥ मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन । युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळी ॥१०६॥ मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना । शिवअनुष्ठान रुद्रध्याना । करिता महारुद्र तोषला ॥१०७॥ शेवटी शिवपदासी पावून । राहिले शिवरूप होऊन । हा अकरावा अध्याय जाण । स्वरूप एकादश रुद्रांचे ॥१०८॥ हा अध्याय करिता श्रवण । एकादश रुद्रा समाधान । की हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिले फळ देणार ॥१०९॥ मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न । पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥११०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । संक्षिप्त एकादशाध्याय हा ॥१११॥

॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


श्री गणेशकवचं


॥ श्री गणेशाय नमः ॥


गौर्युवाच । एषोऽतिचपलो दैत्यान्बाल्येऽपि नाशयत्यहो । अग्रे किं कर्म कर्तेति न जाने मुनिसत्तम ॥१॥ दैत्या नानाविधा दुष्टाः साधुदेवद्रुहः खलाः । अतोऽस्य कण्ठे किञ्चित्त्वं रक्षार्थं बद्धुमर्हसि ॥२॥

मुनिरुवाच ।

ध्यायेत्सिंहहतं विनायकममुं दिग्बाहुमाद्ये युगे त्रेतायां तु मयूरवाहनममुं षड्बाहुकं सिद्धिदम् । द्वापारे तु गजाननं युगभुजं रक्ताङ्गरागं विभुम् तुर्ये तु द्विभुजं सिताङ्गरुचिरं सर्वार्थदं सर्वदा ॥३॥ विनायकः शिखां पातु परमात्मा परात्परः । अतिसुन्दरकायस्तु मस्तकं सुमहोत्कटः ॥४॥ ललाटं कश्यपः पातु भृयुगं तु महोदरः । नयने भालचन्द्रस्तु गजास्यस्त्वोष्ठपल्लवौ ॥५॥ जिह्वां पातु गणक्रीडश्चिबुकं गिरिजासुतः । वाचं विनायकः पातु दन्तान् रक्षतु विघ्नहा ॥६॥ श्रवणौ पाशपाणिस्तु नासिकां चिन्तितार्थदः । गणेशस्तु मुखं कण्ठं पातु देवो गणञ्जयः ॥७॥ स्कन्धौ पातु गजस्कन्धः स्तनौ विघ्नविनाशनः । हृदयं गणनाथस्तु हेरंबो जठरं महान् ॥८॥ धराधरः पातु पार्श्वौ पृष्ठं विघ्नहरः शुभः । लिङ्गं गुह्यं सदा पातु वक्रतुण्डो महाबलः ॥९॥ गणक्रीडो जानुसङ्घे ऊरु मङ्गलमूर्तिमान् । एकदन्तो महाबुद्धिः पादौ गुल्फौ सदाऽवतु ॥१०॥ क्षिप्रप्रसादनो बाहू पाणी आशाप्रपूरकः । अङ्गुलीश्च नखान्पातु पद्महस्तोऽरिनाशनः ॥११॥ सर्वाङ्गानि मयूरेशो विश्वव्यापी सदाऽवतु । अनुक्तमपि यत्स्थानं धूम्रकेतुः सदाऽवतु ॥१२॥ आमोदस्त्वग्रतः पातु प्रमोदः पृष्ठतोऽवतु । प्राच्यां रक्षतु बुद्धीश आग्नेयां सिद्धिदायकः ॥१३॥ दक्षिणास्यामुमापुत्रो नैरृत्यां तु गणेश्वरः । प्रतीच्यां विघ्नहर्ताऽव्याद्वायव्यां गजकर्णकः ॥१४॥ कौबेर्यां निधिपः पायादीशान्यामीशनन्दनः । दिवाऽव्यादेकदन्तस्तु रात्रौ सन्ध्यासु विघ्नहृत् ॥१५॥ राक्षसासुरवेतालग्रहभूतपिशाचतः । पाशाङ्कुशधरः पातु रजःसत्त्वतमः स्मृतिः ॥१६॥ ज्ञानं धर्मं च लक्ष्मीं च लज्जां कीर्ति तथा कुलम् । वपुर्धनं च धान्यं च गृहान्दारान्सुतान्सखीन् ॥१७॥ सर्वायुधधरः पौत्रान् मयूरेशोऽवतात्सदा । कपिलोऽजादिकं पातु गजाश्वान्विकटोऽवतु ॥१८॥ भूर्जपत्रे लिखित्वेदं यः कण्ठे धारयेत्सुधीः । न भयं जायते तस्य यक्षरक्षःपिशाचतः ॥१९॥ त्रिसन्ध्यं जपते यस्तु वज्रसारतनुर्भवेत् । यात्राकाले पठेद्यस्तु निर्विघ्नेन फलं लभेत् ॥२०॥ युद्धकाले पठेद्यस्तु विजयं चाप्नुयाद्द्रुतम् । मारणोच्चाटकाकर्षस्तम्भमोहनकर्मणि ॥२१॥ सप्तवारं जपेदेतद्दिनानामेकविंशतिम् । तत्तत्फलवाप्नोति साधको नात्रसंशयः ॥२२॥ एकविंशतिवारं च पठेत्तावद्दिनानि यः । कारागृहगतं सद्योराज्ञा वध्यं च मोचयेत् ॥२३॥ राजदर्शनवेलायां पठेदेतत्त्रिवारतः । स राजसं वशं नीत्वा प्रकृतीश्च सभां जयेत् ॥२४॥ इदं गणेशकवचं कश्यपेन समीरितम् । मुद्गलाय च ते नाथ माण्डव्याय महर्षये ॥२५॥ मह्यं स प्राह कृपया कवचं सर्वसिद्धिदम् । न देयं भक्तिहीनाय देयं श्रद्धावते शुभम् ॥२६॥ यस्यानेन कृता रक्षा न बाधास्य भवेत्क्वचित् । राक्षसासुरवेतालदैत्यदानवसम्भवा ॥२७॥

इति श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे बालक्रीडायां षडशीतितमेऽध्याये गणेशकवचं सम्पूर्णम् ॥


श्री गणेश कवच - प्राकृत


Sep 11, 2021

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ५


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
हे अज, अजित, अद्वया सच्चिदानंदा, करुणालया हा दासगणू तुझ्या पायां पडतो. तू मला आतां अभय दे.॥१॥ हे देवा, मी अतिशय हीन-दीन,पातकी मनुष्य आहे.मला कोणताही अधिकार नाही, सर्व बाजूंनी मी लाचार आहे.॥२॥ परंतु अत्यंत हीन-दीनांवर थोर नेहेमीच कृपा करतात.पहा बरे, श्रीशंकरानें आपल्या अंगास खरोखर विभूति लावली आहे.॥३॥ तो हीनांचा हीनपणा थोरांस काही कमीपणा आणत नाही. नारायणा, हे सर्व लक्षात घेऊन हा गणू तुझ्या पदी ठेवावा.॥४॥ लेकराचे सर्व लाड आई नक्कीच पुरविते.त्याप्रमाणेच ह्या दासगणूचें सर्व ओंझे तुझ्याच शिरीं आहे.॥५॥ तुझ्याच इच्छेने सारे घडते. त्यामुळे जे करशील ते मला मान्य आहे, पण तुझ्या अंतरी दया असूं दे, हीच प्रार्थना.केवळ तुझ्याच जोरावर दासगणूच्या साऱ्या उड्या आहेंत.॥६॥ गजानन महाराज शेगांवीं असतांना नित्य नवनवीन यात्रेकरू येत असत.त्यांच्या भक्तीस सीमा नव्हती.त्या भक्तियात्रेचे वर्णन तरी कोठवर करावे ?॥७॥ महाराजांची कीर्ती व महिमा फारच वाढला, तो दूर करण्यासाठी गजानन साधुवर वनांत भटकू लागले.॥८॥ तें महिनोंमहिने वनातच राहू लागले.तसेच महाराज हवे तिथेच बसून रहात. अशाप्रकारे आपुलें चरित्र ते कोणासही एवढेसुद्धा उमगू देत नव्हते.॥९॥ श्रोतेहो, एकदा महाराज पिंपळगांवाला गेले असतांना तिथे काय घडले त्याची गोष्ट ऐका.॥१०॥ त्या पिंपळगांवच्या वेशीजवळच असलेल्या अरण्यांत एक शंकरांचें, जुनें पुराणें हेमाडपंती मंदिर होते.॥११॥ अशा त्या मंदिरात साक्षात्कारी गजानन माऊली येती झाली अन तें शिवशंभोच्या गाभाऱ्यात पद्मासन लावून बसले.॥१२॥ सूर्यास्ताच्या वेळी त्या गांवचे गुराखी आपापल्या गुरांचे कळप घेऊन गांवाकडे निघाले होते.॥१३॥ महादेवाच्या मंदिरापुढेंच एक लहान ओढा होता.तिथेच आपल्या गाई-गुरांना पाणी पाजण्यासाठी सर्व गुराखी आले.॥१४॥ त्यातील काही जण सहजच शिव-महादेवाला नमस्कार करण्यासाठी मंदिरांत गेले. गाभाऱ्यात श्रीसमर्थांस पाहून ते आश्चर्यचकित झाले.॥१५॥ आजपर्यंत ह्या मंदिरात सूर्यास्ताच्या वेळी कुणीही पुरुष समाधी अवस्थेत बसलेला आपण पाहिला नाही,अशी ती मुले आपापसांत बोलु लागली.॥१६॥ कांहीं गुराखी बाहेर येऊन इतरांस बोलावूं लागले.तर काही जण तिथेच सत्पुरुषाच्या समोर बसून राहिले.॥१७॥ पण तो साधुपुरुष काहीच बोलेना,अथवा त्याने आपले डोळेही उघडले नाहीत.त्या गुराखी बालकांना त्याचे कारण काहीच कळेना.॥१८॥ कोणी म्हणे, हा साधू पुरुष अतिशय थकलेला दिसतो आहे.काही बोलण्याचीही त्याच्यात शक्तीच मुळी उरलेली नाही.॥१९॥ तर कोणी म्हणे, हा खरोखर उपाशी दिसत आहे. आपण त्याला खायला थोडी भाकरी देऊ या.॥२०॥ असे म्हणून त्यांनी समर्थांच्या मुखासमोर थोडी भाकरी धरली. मुळातच भाविक असलेली ती गुराखी बालके समर्थांस हलवून जागे करण्याचा प्रयत्न करू लागली.॥२१॥ परंतु तो साधू काही जागा झाला नाही वा त्याने मुखातून एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे त्या गुराखी बालकांना विशेष नवल वाटले.॥२२॥ यांवर ती गुराखी मुले आपापसांत चर्चा करू लागली.ह्या साधू पुरुषाची स्थिती मुळीच कळत नाही.जरी ह्यांस मेलेला म्हणावे तर हा व्यवस्थित बसलेला आहे.॥२३॥ ह्यांचे अंगही थंडगार पडलेले नसून छान गरम आहे,यावरून हा सत्पुरुष जिवंत आहे का याची शंकाच नको.॥२४॥ काही जण हे मायावी रुप धारण केलेले भूत आहे असे म्हणू लागले.त्यावर काही जण शिवापुढे कधीही भूत येत नाही हे सत्य आहे असे म्हणु लागले.॥२५॥ काही बालके हा निश्चितच स्वर्गीचा देव असावा व त्याच्या दर्शनाचा आपल्याला लाभ झाला हेच आपले भाग्य होय असे बोलू लागली.॥२६॥ आपण सर्व मिळुन आतां ह्या सत्पुरुषाचे पूजन करू या.त्यांच्या स्नानाकरिता ओढ्याचे पाणी घेऊन येऊ या.॥२७॥ ती बालके ओढ्यावर गेली व त्यांनी पाणी पिण्याच्या भांड्यातून पाणी आणून समर्थांच्या पायांवर अत्यंत भक्तिभावाने घातले.॥२८॥ कोणी वन्यपुष्पें आणून त्यांची माळ तयार केली. ती माळ त्या गुराख्यांनीं साधूच्या कंठामध्यें घातली.॥२९॥ तर कोणी वडाच्या पानावर कांदाभाकर नेवैद्य म्हणून समर्थांसमोर ठेवली.॥३०॥ त्यानंतर गुराख्यांनीं श्रींना सद्भावे आदरपूर्वक नमन केले. समर्थांच्या पुढें बसून कांहीं वेळ भजनही केले.॥३१॥ असा तिथे आनंदोत्सव चालला होता, इतक्यात एक गुराखी बालक बोलला,'अरे आपणांस खूप उशीर झाला आहे,आता गावांत गेले पाहिजे.॥३२॥ सूर्यास्तदेखील होऊन गेला आहे, त्यामुळे मुले गाई-गुरांना घेऊन अजून रानांतून परत का आली नाहीत असे लोक बोलत असतील.॥३३॥ कदाचित आपणांस शोधत या वनांतदेखील येतील. घरातील तान्ही वांसरेंसुद्धा एव्हाना आपल्या आईसाठी हुंबरत असतील.॥३४॥ आपण ह्या साधू पुरुषाविषयी गांवांत जावून सांगू या, म्हणजे गावातील चतुर व वडीलधाऱ्या माणसांस सर्व कळेल.'॥३५॥ हे गुराखी बालकांस पटले व ते सर्व तिथून गावांत निघून गेले. त्यांनी मंदिरातील हे वृत्त सर्व गावकऱ्यांस सांगितले.॥३६॥ श्रोतेहो, पुढें प्रातःकाळीं गांवातील काही मंडळी समर्थांस पहाण्यासाठी त्या गुराखी बालकांबरोबर (मंदीरात)आली.॥३७॥ समर्थ आदल्या दिवशी जसे समाधिस्थ बसले होते, त्याच स्थितीत अजूनही असल्याचे त्यांनी पाहिले.नेवैद्य म्हणुन जी भाकरी त्यांच्यापुढे ठेवली होती, त्या भाकरीलादेखील त्यांनी स्पर्श केला नव्हता. ती जशीच्या तशीच होती.॥३८॥ हे पाहून हा कोणी तरी योगी पुरुष असावा व सध्या या शंकरांच्या मंदिरात आला आहे असे ते गांवकरी म्हणूं लागले.॥३९॥ तर प्रत्यक्ष शिव आपल्याला दर्शन देण्यास ह्या पिंडीच्या बाहेर आले आहेत व आपण ह्यांस गांवांत नेऊ या, असे काही जण बोलू लागले.॥४०॥ ह्या साधू पुरुषाची जेव्हा समाधी उतरेल,तेव्हाच ते काही बोलतील. पण ती समाधी उतरण्यास अजून वेळ आहे,तोपर्यंत ह्यांस त्रास देऊं नका.॥४१॥ बंगालमध्ये जालंदरनाथ एका गर्तेत बारा वर्षे समाधिस्थ होऊन स्थिर राहिले होते, हे तर सर्व जगविख्यातच आहे.॥४२॥ अशी काही काळ तिथे भवति न भवति झाली. शेवटी त्या ग्रामस्थांनी एक पालखी आणली अन समर्थांची मूर्ति त्या पालखीत उचलून ठेवली.॥४३॥ हे सज्जनहो,गावांतील सर्व स्त्री-पुरुष त्या पालखीबरोबर चालत होते आणि पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता.॥४४॥ गावांतील बालके/लोक अधून मधून महाराजांना तुळशीफुलें वाहत होती.उधळलेल्या गुलालानें समर्थाचें अंग लाली लाल झाले होते.॥४५॥ घंटाघडयाळें यांचा नाद होत होता.अवघे लोक उंच स्वरात 'जय जय योगिराज मूर्ति' असे भजन करत होते.॥४६॥ अशा रीतीने ती मिरवणूक गावांतील मारुतीच्या मंदिरांत आली.श्री सद्‌गुरुनाथांस एका भव्य पाटावर आणून बसवले गेले.॥४७॥ तो दिवसही मावळला.(समर्थ अजूनही समाधीमग्नच होते.) मग आपण आता उपवास करून समर्थांपुढे स्तवन करण्यास बसावे असा विचार ते गांवकरी लोक करू लागले.॥४८॥ असा जो ते विचार करतच होते,तोंच श्रीसद्‌गुरुमूर्ति, योग्यांचे मुगुटमणी गजानन महाराज समाधीतून बाहेर आले.॥४९॥ मग काय विचारतां ? सर्वांनाच अतिशय आनंद झाला.प्रत्येक स्त्रीपुरुष स्वामींच्या चरणांवर माथा ठेऊ लागले.॥५०॥ ज्यानें त्यानें अन्नाची पात्रें वाढून आणली व मारुतीच्या मंदिरांत श्रींच्या नेवैद्याची धूम-गडबड सुरु झाली.॥५१॥ श्री समर्थांनी त्या अवघ्या नेवैद्याचा थोडाफार स्वीकार केला.गांवातील गल्लोगल्लीत हे वृत्त सहजच श्रुत झाले.॥५२॥ पुढें दुसर्‍या मंगळवारीं पिंपळगांवचे काही गांवकरी नेहेमीप्रमाणेच शेगांवी बाजारासाठी आले.॥५३॥ आमच्याही पिंपळगावी एक सिद्धपुरुष अवलिया आले आहेत असे त्यांनी सहजच भाविकतेने शेगांवच्या लोकांस सांगितले.॥५४॥ ते अवलिया एक थोर अधिकारी पुरुष असून प्रत्यक्ष श्रीहरीच आहेत. आमची पिंपळगांव नगरी त्या साधू पुरुषाचे पाय लागल्याने धन्य झाली आहे.॥५५॥ आम्ही खरोखर त्या योगीश्वरांला कोठेही जाऊ देणार नाही. आपल्यां घरी (दैवयोगाने)अमुल्य ठेवा चालून आला तर त्यास कधी कुणी सोडतं का ?॥५६॥ जिकडे तिकडे शेगांवच्या बाजारांत हीच वार्ता पसरली. बंकटलालासही तें अवलियाचें वर्तमान कळले.॥५७॥ (ते ऐकून लगेचच)बंकटलाल पत्‍नीसहित पिंपळगांवी गेला. श्री समर्थांस हात जोडुन पुन्हा पुन्हा विनवूं लागला.॥५८॥ आपण लगेचच येतो असे म्हणुन घरांतून निघून गेलात.त्यासही आतां पंधरा दिवस उलटून गेले. महाराज,तुम्ही हे कृपा करून लक्षात घ्या हो.॥५९॥ गुरुराया, तुमच्याशिवाय माझे सदन उदास दिसते. शेगांवचे अवघे जनदेखील चिंतातुर झाले आहेत.॥६०॥ मी आपणांसाठीं गाडी आणली आहें. हे ज्ञानजेठी आपण कृपा करून शेगांवीं चला. माय-लेकरांची अशी ताटातुट होणे हे कांही बरे नाही.॥६१॥ हे दयाळा,त्या शेगांव शहरांत आपले नित्य दर्शन घेणारे कित्येक भक्त उपोषित राहिले असतील.॥६२॥ तुम्ही शेगांवीं आला नाहीत तर मी ह्या तनुचा खरोखर त्याग करेन.हे गुरुवर्या,आमचा हा हट्ट कोण तुमच्याशिवाय पुरवणार बरे?॥६३॥ बंकटलाल असे बोलल्यावर महाराज गाडीत बसले व पिंपळगांव सोडुन शेगांवी जाण्यास निघाले.॥६४॥ जसा पूर्वी गोकुळातून श्रीकृष्णाला घेऊन जाण्यासाठी अक्रूर आला होता, तसाच बंकटलालही समस्त पिंपळगावातील लोकांस अक्रूर भासला.॥६५॥ पिंपळगांवच्या लोकांस बंकटलाल समजावू लागला,' तुम्ही मनांत दु:ख्खी होऊ नका.साधू महाराज कोठेही लांब जात नाही आहेत.॥६६॥ तुम्ही हवे तेव्हा दर्शनांस येऊन आपल्या मनीषा पूर्ण करां.मात्र या अमोल मूर्तीला तिच्या मूळ स्थानीच असू द्यावे.॥६७॥ पिंपळगांवातील बहुतेकांचा बंकटलाल हाच सावकार होता,त्यांमुळे त्याच्या बोलण्याच्या विरोधात जाण्याची कुळांची हिम्मत नव्हती.॥६८॥ चुरमुर्‍याचे लाडू खात अवघे पिंपळगांव स्वस्थ राहिले. गाडींत बसून महाराज शेगांवास जाण्यास निघाले.॥६९॥ शेगांवच्या रस्त्यास लागल्यावर श्री गुरुमूर्ति बंकटलालास विचारू लागली, दुसर्‍याचा माल बळजबरीने न्यायचा हीच का सावकाराची रीत आहे?॥७०॥ तुझ्या घरीं येण्यास मनातून मला खूप भय वाटतें.तुझ्या घराची रीत काही बरी नाही, हे मी पाहतो आहे.॥७१॥ प्रत्यक्ष लोकमाता श्री लक्ष्मी जी महाविष्णूंची पत्नी आहें, जिची अगाध सत्ता (ह्या विश्वावर) आहें. तिलाही तू कोंडून ठेवले आहेस.॥७२॥ तिथे माझा पाड कसा लागणार ? असा विचार करून मी पळुन गेलो. श्री जगदंबेचे हाल पाहून माझें चित्त भयभीत झाले.॥७३॥ (समर्थांचे) असे बोलणे ऐकून बंकटलालास हसूं आले. त्यावर त्याने अतिशय विनम्रतेने काय उत्तर दिले ते तुम्ही शांत चित्ताने ऐका.॥७४॥ बंकट बोलू लागला, हे गुरुनाथा, माझ्या कुलूपास जगन्माता घाबरली नसून,केवळ आपला तिथे वास होता म्हणूच ती (माझ्या घरी) स्थिर झाली.॥७५॥ जिथे बाळ असते, तिथेच आई रहाते.तेव्हा इतरांची पर्वा कशाला ?आपल्या चरणसेवेपेक्षा जास्त मला धनाचे काही महत्व नाही.॥७६॥ खरें तर तेंच माझें श्रेष्ठ धन आहे,म्हणूनच मी इथे आलो. माझें घरदेखील आता माझें नसून ते सर्वस्वीं आपलेच आहे.॥७७॥ घरमालकाला कधी शिपाई अडवतो का ? जशी तुमच्या मनीं इच्छा होईल, तसेच तुम्ही वागावें.॥८०॥ माझी आपणांस इतकीच विनंती आहें की तुम्ही केवळ शेगांवीं वास्तव्य करावे.गाय जशी वनांत (चरावयास) जाते,तरीही पुन्हा आपल्या घरीच येते.॥७९॥ तुम्हींही तसेच करावे(ही प्रार्थना).अवघ्या जगांस उद्धरावें, परंतु आम्हांस विसरू नका व आपण शेगांवी वरचेवर यावे.॥८०॥ अशा रीतीने समजूत घालून श्री गजानन महाराजांस शेगांवात परत आणले. तिथे काही दिवस राहून महाराज पुन्हा निघून गेले.॥८१॥ ती कथा मी आतां इथे सांगतो,ती तुम्ही ऐकावी.श्रोतेहो, त्या वर्‍हाड प्रांतीं अडगांव नावाचे एक गांव होते.॥८२॥ प्रातःकाळीं दयाघन अवघ्या शेगांवकरांची नजर चुकवून त्या गावांस जाण्यास निघाले.॥८३॥ महाराजांची चालण्याची गती वायूसमान होती.(तो वेग पाहून)अंजनीपुत्र मारूतीच जणु आला आहे,असे वाटे.॥८४॥ तो वैशाख महिना होता. सूर्य आपल्या सोळा कलांनी तप्त झाला होता. क्वचित, कुठेतरी पाणी (जलाशयांत शिल्लक)राहिले होते, असा प्रखर उन्हाळा होता.॥८५॥ अशा त्या माध्यान्ही हे योगयोगेश्वर साधू गजानन महाराज अकोली गांवी आले.॥८६॥ त्यावेळी काय घडले, ह्याची कथा (श्रोतेहो) तुम्ही ऐका.समर्थांना तहान लागली होती,चारही दिशांना शोधूनही त्यांना तेव्हा पाणी कुठेही दिसले नाही.॥८७॥ अंगातून घामाच्या धारां वारंवार वाहू लागल्या होत्या.पाण्यावाचून समर्थांचे ओठही सुकून गेले होते.॥८८॥ अशा त्या दुपारी, भास्कर नावाचा शेतकरी आपल्या शेतांत (नांगरट करून) पाळी करत होता.॥८९॥ खरे पाहतां शेतकरी हे सर्वांत मुख्य आहेत. कारण कृषीवल हे निश्चितच या जगाचे अन्नदाता आहेत.॥९०॥ असे मोठेंपण अंगी असूनही अत्यंत दारुण यातना ते सहन करतात. बिचार्‍यांना कडक ऊन्हातान्हांत तहान-भूक विसरून काम करावे लागते.॥९१॥ त्यावेळी त्या अकोली गावांच्या परिसरात जलाचे अत्यंत दुर्भिक्ष्य होते.एक वेळ तूप मिळणे सहज शक्य होते,परंतु पाण्याचा मात्र अभावच होता.॥९२॥ भास्करानें शेतांत येतांना स्वत:साठी गांवांतून मातीच्या घागरीतून पाणी आणले होते.॥९३॥ खाण्यासाठी भाकरीची शिदोरी अन डोक्यावर पाण्याची घागर घेऊन तो नेहमी शेतांत येत असे.॥९४॥ भास्करानें ती घागर एका झाडाखाली ठेवली होती. त्या ठिकाणीं समर्थांची स्वारी आली आणि भास्करास पाणी मागू लागली.॥९५॥ समर्थ भास्कराला म्हणाले,"अरे,मला खूप तहान लागली आहे. तेव्हां मला पिण्यास तू पाणी दे. मला नाही असे तू म्हणू नकोसं.॥९६॥ बाबां रे ,पाणी पाजण्याचें पुण्य अतिशय श्रेष्ठ आहे.(कारण) पाण्यावांचून प्राणाचें रक्षण होणें अशक्य आहें.॥९७॥ मुख्या रस्त्यांवर धनिक लोकं पाणपोया उभारतात.ह्याचे कारण नक्की काय असावे असा तू विचार करून बघ म्हणजे तुला त्याचे महत्व कळून येईल."॥९८॥ भास्कर त्यांवर उत्तरला,"तू तर एक धडधाकट नंगा धूत दिगंबर आहेस.तुला पाणी दिले तर कसला पुण्यलाभ होणार?॥९९॥ अनाथ-पंगू-दुबळ्यां लोकांसाठीं जर काही केले तर ह्या पुण्याच्या गोष्टीं शोभतात अथवा जो समाजहितासाठीं झटतों त्यांस साह्य करावे.॥१००॥ असे शास्त्राचें वचन आहें. तुझ्यासारख्या रिकामटेकड्यास (कांहीही काम न करणाऱ्यांस ) जर आम्ही पाणी पाजले तर तें उलटें पापच होय.॥१०१॥ केवळ भूतदयेच्या तत्वांसाठी कधी कोण सर्प पाळतो का ? अथवा एखाद्या चोराला आपल्या घरांत कोणी जागा देतो काय?॥१०२॥ घरोघरी भीक मागून तूं हे तुझे शरीर पुष्ट केलेंस. आपल्या वर्तनाने तू खरोखर धरणीस भार झाला आहेस.॥१०३॥ ही पाण्याची घागर सकाळीं मीं माझ्यासाठीं डोक्यावरून वाहून आणली आहे.त्या आयत्या पिठावर तू रेघोटया तूं ओढूं नकोस.॥१०४॥ तू कितीही विनवणी केलींस तरी मी काही तुला पाणी कांही देणार नाही. तेव्हा अरे चांडाळा,तू येथून आपलें काळें (तोंड घेऊन) चल चालू लाग.॥१०५॥ तुझ्यासारखे निरुद्योगी आमच्यांत जागोजागी जन्मले आहेत,म्हणूनच आम्ही चारही खंडात अभागी झालों आहोत."॥१०६॥ भास्कराचें ते बोलणे ऐकून समर्थ थोडेसे हसले अन तिथून निघून गेले.॥१०७॥ थोडया दूर अंतरावर तिथे एक विहीर होती. स्वामीरायांनीं अखेर तिकडे धाव घेतली.॥१०८॥ स्वामी तिकडे जाऊं लागतांच भास्कर मोठ्याने त्यांना बोलला,"अरे वेड्या, उगाचच तिकडे कशाला जातोस ?॥१०९॥ ती विहीर कोरडी व ठणठणीत आहें.अरे मूर्खा,ह्या अवघ्या एक कोसांत पाणी कुठेच नाही,हेच सत्य आहे."॥११०॥ त्यावर समर्थ बोलले,' तुझे बोलणे सत्य आहें,जरी त्या विहिरींत पाणी नाहीं तरी मी प्रयत्न करतो.॥१११॥ तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्यासाठी जर हैराण झालें असतील आणि ते मी डोळ्यांनी पाहूनसुद्धा जर स्वस्थ बसलो तर समाजहितासाठीं मी काय चांगल्या गोष्टी केल्या हे सांग बरे ? आपला हेतू शुद्ध असल्यावर तो जगत्स्वामी परमेश्वर नक्की सहाय्य करतो.'॥११२-११३॥ समर्थ विहिरीपाशीं आले, पण त्या विहिरीत एक थेंबभरसुद्धा पाणी नव्हते.तें हताश होऊन एका झाडाजवळ असलेल्या दगडावर बसले.॥११४॥ त्यांनी डोळे मिटून ध्यान केले आणि मनांत नारायण म्हणजेच जो सच्चिदानंद, दयाघन, दीनांचा उद्धार करणारा जगद्‌गुरु आहे त्याचे स्मरण करू लागले.॥११५॥ समर्थ म्हणाले,हे परमेश्वरा, हे वामना, वासुदेवा, प्रद्युम्ना, राघवा व हे विठ्ठला, नरहरी, देवा ही अवघी आकोली पाण्यावांचून त्रस्त झाली आहे. देवा अरे,विहिरींतूनदेखील कुठेही ओल राहिलेली नाही.॥११६-११७॥ अवघे मानवी प्रयत्न हरले आहेत.म्हणुन हे जगन्माउले तुला मी या विहिरीस पाणी द्यावे अशी प्रार्थना करतो.॥११८॥ तुझी करणी अघटीत आहे. जे घडण्यास अशक्य आहें, ते ही तुझ्या कृपेने घडते हे सत्य आहे. पांडुरंगा ! तूं जळत्या वणव्यांत मांजरांचे रक्षण केले आहेस.॥११९॥ तुझा भक्त प्रल्हाद याचे बोलणे खरे करण्यासाठी हे जगदोद्धारा, तू खांबात प्रगट झालास.तू गोकुळांत असतांना बारा गांव जाळणाऱ्या अग्नीस गिळले होते.॥१२०॥ तसेच हे मुरारी,तू तुझ्या करांगुलीच्या नखावर (गोवर्धन)पर्वत उचललास.ह्या तिन्ही जगतात तुझ्या कृपेची सर कोणालाही येत नाही.॥१२१॥ ठाणेदार दामाजीपंत यांच्यासाठी तू महार झालास.तर चोख्यासाठीं तू गुरे ओढलीस,त्या माळ्याच्या पाखरांचे रक्षण केलेस.॥१२२॥ भक्त उपमन्यूसाठीं तू विशाल असा क्षीरसमुद्रही दिलास.नामदेवाला जेव्हा मारवाड प्रांती तहान लागली,तेव्हाही तू चमत्कार केलास.त्या निर्जल अशा विहिरीस तू केवळ नाम्यासाठीं सजल केलेस, हे लक्षात घे.॥१२३-१२४॥ अशी परमेश्वरांस विनवणी केल्यावर विहिरीस अत्यंत वेगवान प्रवाहशाली असा झरा फुटला व विहीर क्षणांतच भरली गेली.॥१२५॥ जगन्नाथाचे कृपासहाय्य झाल्यावर काय होत नाही बरे? ईश्वरी सत्ता अगाध असते,जे घडण्यास अशक्य असते तेच सहज घडवते.॥१२६॥ श्री समर्थांनी ते जल प्राशन केले, तें भास्करानें पाहिलें.त्याचें चित्त गोंधळून गेले.त्याचा काहीच तर्क चालेनासा झाला.॥१२७॥ बारा वर्षे तर या विहिरीस काहीच पाणी नव्हते, तिलाच एका घटकेत यानें जलमय केले खरे!॥१२८॥ यावरुन हा कोणीतरी, खरोखरच साक्षात्कारी आहे, मात्र मुद्दामून एखाद्या वेड्यासारखा फिरतो हें आतां कळून चुकले.॥१२९॥ भास्कर शेतीचें काम सोडून धावतच आला. समर्थांचे चरण त्याने घट्ट पकडले व तोंडाने स्तोत्र पठण आरंभिले.॥१३०॥ हे नरदेहधारी परमेश्वरा, दयासागरा या लेकरावर कृपा करा. मी तुमचेच अर्भक आहे.॥१३१॥ तुमचे श्रेष्ठत्व न जाणतां मी तुम्हांला टाकून बोललो, याचा मला आतां पश्चात्ताप होतो आहे. तरी तुम्ही त्यासाठी मला क्षमा करा हो.॥१३२॥ गवळणी जरी टाकून बोलल्या तरी चक्रपाणी कधी त्यांच्यावर रागावला नाही.हे दयाळा, तुझ्या ह्या बाह्य वेषांमुळे मी फ़सलो.॥१३३॥ हा चमत्कार दाखवून तूंच त्याचें निरसनदेखील केलेस.हे भगवंता, तुझे देवपण कृतीनेंच खरोखर कळलें.॥१३४॥ तसाच तुझा अधिकारदेखील किती थोर आहे ते मला या जलाच्या कृतीनें नक्कीच कळले आहें.॥१३५॥ आतां काहीही झाले तरी हें सद्‌गुरुनाथा मी काही तुम्हाला सोडणार नाही. एकदा आई भेटल्यावर लेंकरानें (तिला सोडुन)इतर कुठेही राहू नयें हेच खरे नाही का?॥१३६॥ ही प्रपंच माया खोटी आहे हे आज मला कळून आले. आतां या दीन अर्भकास परत दूर करू नका.॥१३७॥ भास्करास श्रीसमर्थ म्हणाले,'असा तू तुझ्या मनी दुःखित होऊ नकोस.आतां गांवांतून पाण्याची घागर तू डोक्यावर वाहून आणु नकोस.॥१३८॥ तुझ्यासाठीं हें पाणी मी विहिरींत निर्माण केले.आतां तुला कसलीच उणीव उरली नाही.मग तू हा प्रपंच का बरे त्यागतो आहेस? ॥१३९॥ हे जल तुझ्याकरितां आलें आहे, आतां तू हा बगीचा फ़ुलव.' त्यावर भास्कर उत्तरला,'हे आमीष तुम्ही मला दाखवू नका.॥१४०॥ माझी निश्चयरूपी ही विहीर अगदी कोरडी ठणठणीत होती. दयाळा, आजवर त्यांत एकही पाण्याचा थेंब नव्हता.॥१४१॥ ती विहीर फोडण्यासाठी तुम्हीच तर हा प्रयत्‍न केला.हा खडक फोडण्यासाठी साक्षात्काररूपी सुरुंग जणू लावला.॥१४२॥ त्यामुळेच तर हा खडक फुटला आणि भावारूपी उदक (ह्या विहिरीस )लागलें. आतां मी निःशंकपणे भक्तिपंथाचा मळा फुलवीन.॥१४३॥ हे माझे आई,तुझ्या कृपेंमुळेच ह्या वर्तनरूपी मातीत सन्नीतीची फळझाडें लावीन.॥१४४॥ मी जिकडे तिकडे सत्कर्माचीं फुलझाडें लावीन.आतां ह्या क्षणिक बैलवाडे यांचा संबंध नको.'॥१४५॥ श्रोतेहो, पहा बरे, अगदी क्षणभरच संतसंगति भास्करांस घडतांच त्याला किती उपरती झाली.याचा तुम्ही जरूर विचार करा हो.॥१४६॥ निश्चितच खर्‍या संताचें दर्शन हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ असते. श्री तुकाराम महाराजांनी "संतचरणरजा" चे एका अभंगात वर्णन केलें आहें.॥१४७॥ तो अभंग पहावा अन मनांत विचार करावा आणि स्वतःच्या हितासाठीं त्याचा अनुभव घ्यावा.॥१४८॥ विहिरीस पाणी लागलें ही वार्ता आसपास पसरल्यावर अवघें लोकं स्वामींच्या दर्शनास धावतच येऊ लागले.॥१४९॥ ज्याप्रमाणें मधाचा सुगावा लागतांच मधमाश्या धाव घेतात वा साखरेचा रवा पाहून मुंग्या धांवून येतांत.॥१५०॥ त्याचप्रमाणे श्रोतेहो,तिथे अपार जनसमूह जमला अन त्यांनी त्यावेळी विहिरीचें पाणी पिऊन पाहिलें.॥१५१॥ तें जल अतिशय निर्मळ,शीत अन मधुर होतें. जणू काही अमृताहूनही गोड असे ते पाणी होते. सारे लोक श्री गजानन महाराजांचा जयजयकार करुं लागले.॥१५२॥ असो. पुढें अडगांवास परत ना जातां भास्कारांस बरोबर घेऊन सिद्धयोगी श्रीगजानन महाराज शेगांवी आले.॥१५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नामें ग्रंथ संतमहिमा जाणून घेण्यासाठी अवघ्या जगांस आदर्शभूत होवो.॥१५४॥शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गणेश कवच - प्राकृत


॥ श्री गणेशाय नमः ॥


[ १: नमन ] श्री गणेशदेवा लालितां । मुनितें म्हणे गौरी माता । अहो, अचपल बाल आतां । कळा याची कळों नेदी ॥ १ ॥ जृंभा, सिंदूर थोर स्थूल । साधु-देव-द्रोही खल । यातें हा आतांचि प्रबळ । चिंता याची व्यापी मातें ॥ २ ॥ यातें कीं तें व्यापितील । दैत्य दुष्ट बहु कुटिल । दैत्य नाशन हा अवखळ । रक्षिण्यासि या, द्या कवच-थोर ॥

[ २ : ध्यान ] मुनि म्हणे करावें ध्यान । विनायक हा मृगवदन । सत्ययुगीं दिग्बाहु गहन । मयुर-वाहन त्रेतायुगीं ॥ ४ ॥ सिद्धीदाता श्रीगणनाथ । तदा त्यासि सहा हात । द्वापारीं मात्र चार हात । रक्तरंग, अंगकान्ती ॥ ५ ॥ कलियुगीं भुजा दोन । धवलांग हिमाहून । पुरवी सर्व वर देऊन । रक्षितसे हा सर्वकालीं ॥ ६ ॥ ॥ श्री ॥ ॥ गणेश गौरीचा नंदन । सिद्धीबुद्धीचा दाता पूर्ण । आधीं वंदावा गजवदन । मंगलमूर्तीं मोरया ॥

[ ३ : न्यास ] शिखा रक्षूं हा विनायक । पराहूनि पर, परमात्मक । तनु सुरेख, तैंसें मस्तक । उत्कट, थोर, विशाल ॥ ७ ॥ कश्यप रक्षूं ललाटस्थलीं । महोदर राखूं भ्रुकुटीवल्ली, । भालचंद्र नयन, युगुलीं, । ओष्ट-पल्लव गजास्य ॥ ८ ॥ जिव्हा रक्षूं गजक्रीडन । हनुवटी ही गिरिजानंदन । विनायक रक्षूं वाणी, वचन । विघ्नहंता दन्त माझे ॥ ९ ॥ कान रक्षूं पाशधर्ता । नाक रक्षूं इच्छितें-दाता । मुख रक्षूं गणांचा कर्ता । कंठ माझा गणंजय ॥ १० ॥ स्कंध रक्षूं गजस्कंधन । गणनाथ ह्र्दयांगण । स्तन-भाग विघ्ननाशन । जठर रक्षूं हेरंब ॥ ११॥ पृथ्वीधर रक्षूं पार्श्वभाग । विघ्नहर शुभ, पृष्ठभाग । वक्रतुंड गुप्त, गुह्यांग । सर्वांग रक्षूं महाबल ॥ १२ ॥ गणक्रीड रक्षूं गुडघे जंघा । मंगलमुर्ति उरु-जंघा । घोटे पाय, दैत्यभंगा । एकदंत रक्षूं, महाबुद्धी ॥ १३ ॥ बाहू रक्षीं त्वरित-वरदायका । हात संरक्षीं आशापूरका । नखें, बोटें अरिनाशका । कमलहस्तका रक्षीं सर्व ॥ १४ ॥ सर्व अंगें मयूरेश । विश्वव्यापी विश्वेश । रक्षीं सदा परमेश । नच वदलो स्थान तेंही ॥ १५ ॥ धूम्रकेतु राखो तें स्व-बलें । भलें मागणें केंले अबले । नच केंले न जें सुचलें । तेंहि पुरवीं रक्षका ॥ १६ ॥

[ ४ : दिग्बंध ] समोरोनि देवें आमोदें । मागें राहोनियां प्रमोदें । पूर्वेकडोनि देवें बुद्धीदें । सिद्धीदें रक्षावी आग्नेयी ॥ १७ ॥ दक्षिणेसि राहो उमासुत । नैरृतीस गणेशाच्युत । पश्चिमेस विघ्नहर्तृ । वायव्येसि शूर्पकर्ण ॥ १८ ॥ उत्तर पाळीं निधिरक्षक । ईशान्येस शिवसुत शिवात्मक । दिनभागीं एकदन्तक । विघ्नहर सायं, रात्रौ ॥१९ ॥ रक्षीं पाशांकुशधर । सत्वरजतम-स्मर । राक्षस वेताल असुर । भूतग्रह, वेताल, पिशाचां हातोनि ॥ २० ॥ ज्ञानधर्म, लज्जालक्ष्मी । कुल, कीर्ति तेंविं गृह्लक्ष्मी । धन, धान्य, तैसा देहचि मी । सोयरे, सखे, पुत्रादिक ॥ २१ ॥ आतां सर्वांयुधधरें देवें । पौत्रादिसारें रक्षावें । मयूर-कपिल-पिंगाक्ष देवें । गुरें-मेंढरें संरक्षावीं ॥ २२ ॥ हत्ती, घोडे, सदा-साक्षी । विकट-मूर्ते तूंचि संरक्षी । अंतर्यामीं राहोनि दक्षी । रक्षी हेरंब-देवा तूं ॥ २३ ॥

[ ५ : कवचबंधन ] भूर्जपानीं हें लिहावें । कवच कंठीं मग बांधावे । भय-मुक्त सुबुध्दें व्हावें । यक्ष, राक्षस, पिशाच्चांपासून ॥ २४ ॥

[ ६ : फले ] तिन्हीं संध्या समयांसी । जपतां या कवचासी । वज्र-तनु-लाभ मानवासी । निर्भय जावें रणांगणीं ॥ २५ ॥ यात्राकालीं करावें पाठ । विघ्नें जातीं, फलें साठ । युध्दकालीं आठपट । विजय त्वरें पठन देईं ॥ २६ ॥ सातवेळ जप उपायीं । एकवीस दिनांचे ठायीं । मारणोच्चाटनें फलतीं । तींही आकर्ष-स्तंभन, मोहनादिकरण ॥ २७ ॥ एकवीस वेळां जपतां देखा । एकवीस दिनीं कोणी सखा । तुरुंगमुक्त होतसे सुखा । मोचन पावे यमपाशहि ॥ २८ ॥ राज्ञीराजदर्शन-वेळीं । पढावें तीन वेळां सकाळीं । राजसभा, लोकसभा, बळी । जिंकेल पाठक निश्चयें ॥ २९ ॥

[ ७ : प्राप्ति ] कश्यपें दिलें हें गणेश कवच । मुद्द्लें मांडव्यास वच । मांडव्य देईं मजसी साच । जय, यश, सिद्धी-दायक ॥ ३० ॥

[ ८ : बंधनें ] भक्तिहीनासि हें न द्यावें । श्रद्धावानचि शुभ पावे । कवचें न होतीं राक्षसासुर-गोवें । वेताल दानव, दैत्यादीचें ॥ ३१ ॥ ऐसें संपूर्ण केलें हें । श्रीगणेशपुराणीं पाहे । गणेश कवच जें गूढ आहे । संस्कृतीं तें प्राकृतीं ॥ ३२ ॥


॥ श्री गजाननार्पणमस्तु