।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री दत्तात्रेयाय नमः ।।
।। श्री स्वामीं समर्थाय नमः ।।
विश्वमाया तू मम अंबिके ll निजभक्त हो जाण पाळके ll
निर्गुणे तुला कैसे आठवू ll निज हृदयी कोठे साठवू ll१ll
काय ते मुनी कष्टती सदा ll तुजविणे नसे जाण फायदा ll
धीपुरी खरा वास करुनी ll रूप दाविले पाप मर्दनी ll२ll
भक्त हे तुझे तूच रक्षिसी ll प्रेम देवोनी नित्य पोषिसी ll
काय मी वंदू शेष शीणला ll कैसे बोलवू सांग त्या मुला ll३ll
चारी वेद ते नेति म्हणती ll तेथे हो खरी अल्पही मती ll
तूच बोलसी जग कारणा ll देऊनी तरी नाम तारणा ll४ll
म्हणुनी स्तविता तुज माय हो ll दावि दावि तू आजि पाय हो ll
रूप ते जसे गुण हा तसे ll योगी ध्यान ते नित्य पाहतसे ll५ll
आकृती कशी निर्गुण तरी ll मूर्ति ही तुझी जाण साजिरी ll
स्वामी माय तू सत्य लेकरा ll रक्षिसी खरे करूनि आसरा ll६ll
बहुत तारिले भक्त या जनी ll धरुनी रूप ते सगुण कारणी ll
दुरित जाळुनि भव तारिले ll नामी भक्त ते जाण हो भले ll७ll
म्हणूनिया तुला देव नमिती ll पाय वंदुनी सौख्य पावती ll
तीच तू खरी धीपुरी बरी ll पाय लाउनी जग उद्धरी ll८ll
कितीक तारिले जड ते बहु ll पाप जाळुनी दिधले नऊ ll
ऐसे गे तुला कैसे आठवू ll शेषपुष्ठिसी ठाव हा मऊ ll९ll
बाळ हा तुझा तुज आठवी ll विश्वजननी हृदयी साठवी ll
पावतो जना भक्ती करीता ll कलियुगी हो पायी सरिता ll१०ll
भक्ती करीता मुक्ती ही खरी ll स्वामीद्वारीची जाण पायरी ll
नवनिधी हे हात जोडिती ll द्वारी ते उभे नित्य कष्टती ll११ll
काय हो उणे तुझिया घरा ll पाव पाव तू आजि लेकरा ll
धरिले बाळ पाय अंतरी ll वचन देऊनी बोलली खरी ll१२ll
सत्य ते करी आजि तत्वता ll माझे देऊनी मज रक्षिता ll
बद्री ते खरी नाम पावली ll बोरी म्हणती जन हो भली ll१३ll
पावन जनी स्नान करिता ll पळून जाय ते दुरित तत्वता ll
स्वामी पायी ती वास पावली ll तारण्या जना कलियुगी भली ll१४ll
म्हणुनिया जनी जावे तत्वता ll वेळ हा असा जाईल हाता ll
चुकल्या तरी वेळ ही बरी ll करिल बा पुढे जाण घाबरी ll१५ll
काळ दंड तो चुकणे तरी ll स्वामीद्वारीची नमी पायरी ll
सावध तुला करितो मुला ll घेई घेई रे घेई दाखला ll१६ll
आपण तरुनी कूळ तारिसी ll प्रेमभावे हे स्तोत्र वाचिसी ll
दुःख ते तुझे वाचिता बरे ll जाईल खरे प्रेम पाझरे ll१७ll
कामना मनी धरुनी जरी ll वाचिती तया पावे लवकरी ll
एक शत ते आठ हो बरे ll पाठ करीता दुःख ते सरे ll१८ll
जन तरती घेतल्या करी ll भवनौका हो नाम लौकरी ll
म्हणूनिया तुम्हा सांगतो सुखे ll भक्ती ती करा स्वामींची सुखे ll१९ll
स्तोत्र वाचिता पावे लौकरी ll तीन काळ ते साधी लौकरी ll
तीन मंडळे दुःख ते हरे ll नित्य वाचिता भव हा तरे ll२०ll
पुत्र संतती सौख्य पावती ll स्वामी भक्ती हो केलिया प्रिती ll
धनधान्य ते गृही साठवे ll द्वारी झुलती गाईचे थवे ll२१ll
अश्वकुंजरी वन दाटले ll मुक्ती ठाव हा पायी की झुले ll
चुकती जरी जन फासती ll येईल पुढे काय वेळ ती ll२२ll
म्हणुनि सांगतो तुमच्या हिता ll ठेवा भाव हो पायी तत्वता ll
तारण्या तुम्हा साधन बरे ll कलियुगी हा स्वामी अवतरे ll२३ll
आनंदनाथ तो भक्ती करिता ll सांगतो खरे तुमच्या हिता ll
घेतल्या जरी सौख्य पावती ll स्तोत्र वाचिता साधिती गती ll२४ll
ll अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।। श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ll
ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.