May 16, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ८


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वसुदेव आणि देवकीच्या नंदना, हे गोप-गोपींचे मन संतुष्ट करणाऱ्या तसेच दुष्ट दानवांचे निर्मूलन करणाऱ्या श्रीहरी माझ्यावर तू कृपा कर. II१II कर्म आदींचे अनुष्ठान वा पराकोटीची भक्ती हे जरी तुझ्या प्राप्तीचे साधन असले, तरी त्यासाठी मी पूर्णतः अपात्र आहे. II२II तुझी ज्ञान प्रदान करणारी सर्व शास्त्रें देवभाषा म्हणजेच संस्कृत भाषेत आहेत. हे हरी, त्यांचा अर्थ मी कसा समजावून घेऊ ? हे तू सांग बरे. II३II मला संस्कृत भाषा अवगत नाही. शिवाय माझी बुद्धीही मंद आहे. कमळपुष्पातील मधुरस बेडूकास कधी मिळतो का ? II४II हे श्रीपती, अन्नदान करून तुझी प्राप्ती करावी असे ठरविले, तरी दारिद्र्य गाठीशी बांधल्यामुळें धनाचा माझ्याकडे निश्चितच अभाव आहे.II५II जरी मला तीर्थयात्रा करावी असे वाटले तरी शरीर सामर्थ्य नाही. तसेच आतां तर दृष्टीसही अंधत्व आले आहे.॥६॥ हे चक्रपाणी, असा सर्वच बाजूंनी मी हीनदीन आहे. दरिद्री मनुष्याचे सर्व मनोरथ मनांतल्या मनातच जिरून जातात.॥७॥ हे सारे व्यावहारिक दृष्टीनें जरी खरे असले तरी तुझी कृपा झाल्यावर (मनुष्य) स्वानंदाच्या सागरी सर्वकाळ पोहत राहतो.॥८॥ तुझ्या कृपेची महती इतर सर्व गोष्टींहून आगळी वेगळी आहे. ढगांतून बरसणाऱ्या पाण्याचे कधी पैसे द्यावे लागत नाही.॥९॥ मेघवर्षावाने ज्याप्रमाणे तळीं विहिरी तुडुंब भरतात, त्याचप्रमाणे हे पांडुरंगा, (तुझी कृपा झाल्यास) शुष्क खडकांस देखील पाण्याचे पाट फुटतात. ॥१०॥ अशा त्या तुझ्या कृपेचा हा दासगणू खरोखर भुकेला आहे. त्या कृपेचा एखादा तरी घास तू माझ्या मुखांत घाल. ॥११॥ त्यामुळें मी तृप्त होईन आणि अवघीच सुखे मला प्राप्त होतील. अमृताचा एखादा कणही मिळाला तरी सारे रोग नाहीसे होतात. ॥१२॥ असो. मागील अध्यायांत देशमुख आणि पाटील ह्या घराण्यांत कशी दुफळी होती हे आपण पहिले. ॥१३॥ जिथे जिथे ही दुफळी असते, तिथे तिथे सर्व गोष्टींची ती होळीच करते. ह्या वैरभावाने अवघ्या सुखांची जणू राखरांगोळीच होत असते. ॥१४॥ ज्याप्रमाणें क्षयरोग शरीराला यमसदनास नेतो, त्याचप्रमाणे हा दुफळीचा रोग समाजास लयाला नेतो. सर्व प्रयत्न तिथे व्यर्थ ठरतात. ॥१५॥ असो. एकदा तळ्याच्या काठांवर देशुमखांचा एक महार खंडू पाटलांपुढे निरर्थक बडबड करू लागला.॥१६॥ पाटील हा त्या गावंचा अधिकारी, सर्वेसर्वा असतो. काही काम करण्यावरून त्या दोघांत (खंडू पाटील आणि महार) कुरबुर झाली.॥१७॥ तो मऱ्या नावाचा महार होता. त्याला देशमुखांचे पाठबळ होते, त्यामुळें त्याने खंडू पाटलांस अपमानकारक उलटे उत्तर दिले.॥१८॥ त्यावर पाटील म्हणाला, " हे तुझे वागणे काही बरोबर नाही. गरिबाने कधी आपली पायरी सोडू नये. मला प्रत्युत्तर करण्याचा केवळ देशमुखांसच अधिकार आहे. तुझ्यासारख्या नोकराचा नाही, हे लक्षांत ठेव.॥१९-२०॥ एवढे सांगूनही महार काही ऐकायला तयार नव्हता आणि वर तऱ्हे तऱ्हेच्या चेष्टा करू लागला. त्याचे ते बोलणे ऐकून पाटील मनांत संतापला.॥२१॥ खरें तर बाचाबाचीचे कारण अतिशय क्षुल्लक होते. खंडू पाटलास काही कागदपत्रे ठाण्यांस पाठवायची होती. ॥२२॥ तू आत्ताच हे कागद घेऊन अकोल्यास तहसिलांच्या कचेरीत जा आणि हा टप्पा दे असे (खंडू पाटलांनी) महारास सांगितले होते. ॥२३॥ ते ऐकून महार म्हणाला, " मी काही ही कागदपत्रे घेऊन जाणार नाही. देशमुखांच्या आश्रितांवर तुमचा नेहेमीच डोळा असतो. काही असो, मी आज हा टप्पा घेऊन अजिबात जाणार नाही. तुझ्या ह्या हुकुमास मी शिमग्याच्या बोंबा समजतो." ॥२४-२५॥ असे मोठयाने बोलून, त्याने आपली मूठ वळून आपल्या तोंडासमोर हात नेऊन तसा हावभावही केला. ॥२६॥ ती त्याची कृती पाहून खंडू पाटीलाचे मन संतप्त झाले. त्यावेळीं पाटलाच्या हातांत एक भरीव वेळूची काठी होती. ॥२७॥ त्याच काठीनें त्याने महाराच्या हातावर प्रहार केला. पाटील मूळचाच सशक्त होता, त्यांत त्याने रागानेंच हा प्रहार केला. ॥२८॥ त्या मारामुळे त्या महाराचा हात मोडला आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. ॥२९॥ पाटील तो टप्पा दुसऱ्या महारास देण्यासाठी निघून गेले. तोपर्यंत इकडे काय घडले त्याचा वृत्तांत मी आतां सांगतो. ॥३०॥ तो (जखमी) महार त्याच्या नातेवाईकांनी उचलून देशमुखांच्या वाड्यांत नेला. त्याचा हात मोडलेला पाहून देशमुख आनंदले. ॥३१॥ वा ! वा ! ही तर फार छान गोष्ट झाली. आपल्याला कुरापत काढण्यासाठी ही अवचितच संधी मिळाली आहे, ही आतां हातची ना जाऊ देतां (ह्या संधीचा) उपयोग करून घेऊ या. ॥३२॥ त्यांनी त्या महारास लगेचच कचेरीत नेले आणि तेथील अधिकाऱ्यांस काही खोटेंनाटें सांगितले. ॥३३॥ कोठेही दोन पक्षांत थोडें जरी वैर असल्यास काट्यांचेच कसे नायटे होतात ते बघा. ॥३४॥ त्या महाराची फिर्याद पुस्तकांत नोंदली गेली आणि त्या अधिकाऱ्याने पाटलास पकडून आणण्याची आज्ञा दिली. ॥३५॥ उद्या पाटलाच्या पायी जड बेड्या आणि हातांत कड्या पडणार आहेत, अशी त्या शेगांवांत वार्ता पसरली. ॥३६॥ खंडू पाटलास हे समजल्यावर त्याचे धाबें दणाणले. तो अतिशय चिंतातुर झाला आणि त्याच्या तोंडचें पाणी पळाले. ॥३७॥ हे श्रीहरी, ज्या शेगांवांत मी एखाद्या वाघाप्रमाणें वागत होतो, तिथेच का असा बेडी पडण्याचा माझ्यावर प्रसंग ओढवला. (अशी तो परमेश्वरास प्रार्थना करू लागला.) ॥३८॥ अब्रुदारास अपमान नेहेमीच मरणाहूनही भयंकर वाटतो. त्याचे सारे भाऊही घाबरून गेले होते, कोणासही काही विचार सुचत नव्हता. ॥३९॥ असा चहूबाजूंनी हताश होऊन खंडू बसला असता, अकस्मात त्याला एक विचार सुचला. श्री गजानन महाराजांसच आपण आतां हे सांकडें घालावे. ॥४०॥ या संकटाचे निरसन करण्यासाठी या वऱ्हाडांत त्या साधुशिवाय खरोखर दुसरा कोणीही नाही. ॥४१॥ खंडू पाटलाचे बंधू काही लौकिक प्रयत्न करण्यास अकोल्यास गेले होते. त्याच रात्री तो समर्थांकडे सत्वर आला. ॥४२॥ श्रींकडे येता क्षणीच त्याने नमस्कार केला आणि त्यांच्या पायांवर डोके टेकविले. (आणि सांगू लागला,) महाराज माझ्यावर फार कठीण प्रसंग ओढवला आहे. ॥४३॥ काही सरकारी कामानिमित्त मी एका महारास तळ्यापाशी हातांतील काठीने मारले, हे खरे आहे. ॥४४॥ त्याचा असा परिणाम झाला की देशमुख मंडळींनी माझी मानहानी करण्यासाठी ह्या साध्या घटनेचा जणू काट्याचा नायटा केला. ॥४५॥ त्याचे निमित्त करून उद्या माझ्यावर कैदी होण्याचा प्रसंग आला आहे. हे समर्था, तुझ्याशिवाय माझ्या इज्जतीचे कोण बरे रक्षण करणार ?॥४६॥ उद्याच राजदूत इथे येणार आहेत आणि मला पायांत बेडी ठोकून घेऊन जाणार आहेत, असे आज कळले.॥४७॥ गुरुवरा, ही अशी (मानहानी) होण्यापेक्षा माझा गळा तुम्ही इथेच चिरा. ही तलवार मी तुमच्या हातांत देतो, ती घ्या आणि आतां उशीर करू नका. ॥४८॥ स्वाभिमानी माणसांस मानहानी हेच जणू मरणासमान वाटते. दयाळा, त्यांतून माझा अपराध अगदीच लहान आहे. ॥४९॥ त्या अपराधरूपी खड्याचा आतां मोठा डोंगर झाला आहे. समर्था, माझ्या अब्रूचा ह्या कठीण समयीं मान राखा.॥५०॥ जयद्रथाच्या वेळेला केवळ आपल्या स्वत्वासाठी अर्जुन अग्नींत प्राणार्पण करण्यास तयार झाला होता. ॥५१॥ त्यावेळीं भगवंताने त्याच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले. प्रभूनेंच द्रौपदीला सभेंत वस्त्रें पुरवली. ॥५२॥ त्याचप्रमाणें माझी पांचाळीरुपी प्रतिष्ठाही कौरवरूपी देशमुखांनी आता नग्न करण्यासाठी आणली आहे. तिचे (तुम्ही) रक्षण करा हो. ॥५३॥ समर्थांस एवढें सांगून पाटील रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारांचा जणू पूर वाहत होता. ॥५४॥ घरातील सर्व सदस्य आधीच फार चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या दु:खाला अंत तरी कुठला असावा बरे ? ॥५५॥ इकडे समर्थांनी त्यांच्या दोन्ही हातांनी खंडू पाटलास कवटाळून हृदयीं धरले आणि त्याचे सांत्वन करू लागले.॥५६॥ अरे ! कर्तृत्ववान पुरुषांवर अशा प्रकारची संकटे वरचेवर येतच असतात, हेच खरे ! तू त्याची अजिबात चिंता करू नकोस.॥५७॥स्वार्थदृष्टी बळावली की हे असेच कायम होते. खरी नीतीमत्ता, अगदी अणूएवढींदेखील त्यांस कळत नाही.॥५८॥ तुम्ही पाटील आणि देशमुख खरे तर एकाच जातीचे असूनसुद्धा केवळ स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांचे नुकसान करु पाहता.॥५९॥ पूर्वी कौरव - पांडवांत स्वार्थामुळेच वैरभाव निर्माण झाला हे सत्य आहे. तथापि न्यायदृष्टीनें विचार केल्यास पांडवांचा पक्ष तिथे खरा होता.॥६०॥ म्हणूनच भगवंतानें पांडवांस सहाय्य केले. सत्याच्या विजयासाठी कौरवांस मारणें जरुरीचे होते.॥६१॥ जा, तू तिळमात्र घाबरू नकोस. देशमुखानें कितीही आपला जोर लावला तरी, तुला बेडी अजिबात पडणार नाही.॥६२॥ तेच पुढें खरे झालें. खंडू पाटीलाची निर्दोष म्हणून सुटका झाली. संतांच्या मुखावाटें आलेली वचनें कधीच खोटी ठरत नाही.॥६३॥ उत्तरोत्तर श्रीसमर्थांवर पाटील मंडळींची श्रद्धा दृढ होऊ लागली. अमृताचे सेवन करण्यास कोणाला आवडणार नाही ?॥६४॥ पुढें खंडू पाटलाने प्रेमाने विनंती करून समर्थांस आपल्या घरी वास्तव्यास नेले.॥६५॥ पाटील सदनांत गजाननस्वामी समर्थ असतांना अकस्मात पाच-दहा तैलंगी ब्राह्मण तिथे आले.॥६६॥ ते तैलंगी ब्राह्मण विद्वान,कर्मठ आणि वेदपारंगत होते. परंतु, त्यांचे मन धनाच्याबाबतीत अतिशय लोभी होते.॥६७॥ समर्थांकडे काही दक्षिणा मिळेल ह्या आशेनेच तें खरे तर तिथे आले होते. त्यावेळीं समर्थ पांघरूण घेऊन निजलेले होते.॥६८॥ त्यांना जागे करण्यासाठी ब्राह्मण जटेचे मंत्र अतिशय उच्च स्वरांत म्हणू लागले.॥६९॥ मंत्र पठण करतांना त्या ब्राह्मणांनी चूक केली, पण ती त्यांनी दुरुस्त केली नाही. म्हणून श्रोते हो, गजाननाची स्वारी आपल्या आसनीं उठून बसली पहा.॥७०॥ आणि (श्री) त्या ब्राह्मणांस म्हणाले, " तुम्ही कशासाठी वैदिक झाला आहात ? या वेदविद्येला असे निरर्थक हीनत्व आणू नका रे !॥७१॥ ही विद्या केवळ पोटपाण्याची सोय नव्हें, तर खरोखर मोक्षदायी आहे. तुम्ही या डोक्याला बांधलेल्या शालीची कांही तरी किंमत ठेवा.॥७२॥ आतां मी जसे म्हणतो आहे, तसे खरे स्वर लक्षात घेऊन तुम्हीं मंत्र पठण करा. उगाचच सोंग घेऊन भोळ्या भाविकांना फसवू नका."॥७३॥ जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरुवात केली होती, तोच अध्याय समर्थांनी घडाघडा म्हणून दाखविला.॥७४॥ कोठेंही काहीही चूक न करता, स्पष्ट शब्दोच्चारांत (समर्थ अध्याय म्हणत होते.) मूर्तिमंत वसिष्ठच जणू वेद म्हणण्यांस बसला आहे, असे वाटत होते.॥७५॥ ते पठण ऐकून तैलंगी ब्राह्मण आश्चर्यचकित झाले आणि मान खाली घालून बसले. त्यांना मुख वर करण्यास धीर होईना, मनांत अतिशय लाज, भय वाटू लागले.॥७६॥ सूर्याचा उदय झाल्यावर त्या तेजापुढें कोणी दीपांचा जयजयकार करतो का ? त्यांचे महत्त्व केवळ अंधारातच असते.॥७७॥ तें ब्राह्मण मनांत विचार करू लागले," हा काही वेडा नव्हें, तर साक्षात महाज्ञानी आहे. चारही वेद यांस मुखोदगत आहेत. जणू सारे वेद यांच्या मुखातच (जिव्हेवर) वास्तव्यास आहेत.॥७८॥ हा तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. हा जातीनें नि:संशय खरोखर ब्राह्मण असावा,यांत काही शंकाच नाही. ॥७९॥ यांनी परमहंसाची दीक्षा घेतली आहे. आतां यांस कोणतेंही बंधन उरले नाही. हे तर जीवन्मुक्त सिद्धयोगी आहेत.॥८०॥ आपलें काही तरी पुण्य गाठींशी होते, म्हणून ह्या मूर्तीचे दर्शन झाले. हा तर साक्षात वामदेव आहे, दुसरी कुठलीच उपमा त्यांना द्यायला योग्य नाही. "॥८१॥ असो. दयाघन समर्थ खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणांना रुपया रुपया दक्षिणा देते झाले.॥८२॥ ते ब्राह्मण संतुष्ट होऊन दुसऱ्या गांवी निघून गेले. गांवातील ह्या उपाधीला आतां महाराज कंटाळले होते.॥८३॥ श्रोते हो, खऱ्या संतांना कधीही उपाधीची आवड नसते. दाभिंकांस मात्र उपाधी म्हणजे भूषण वाटते.॥८४॥ शेगांवच्या उत्तरेला जवळच एक मळा होता. या मळ्यांत भरपूर भाजीपाला पिकत होता.॥८५॥ तिथेच एक शिवाचे मंदिरही होते. त्याच्या आसपास लिंबांच्या वृक्षांची थंडगार सावलीही होती.॥८६॥ हा मळा कृष्णाजी पाटलाच्या मालकीचा होता. हा कृष्णाजी, खंडू पाटलाचा सगळ्यांत धाकटा भाऊ होता.॥८७॥ त्या मळ्यांत महाराज येऊन शिवालयाजवळ असलेल्या एका ओट्यावर बसले. निंबतरुंची गर्द छाया तिथे पसरली होती.॥८८॥ समर्थ कृष्णाजीस म्हणाले, " मी तुझ्या मळ्यांत ह्या श्रीशंकरांजवळ काही दिवस राहण्यासाठी आलो आहे.॥८९॥ हा भोलानाथ कर्पूरगौर, नीलकंठ पार्वतीवर अवघ्या देवांचा राजराजेश्वर आहे.॥९०॥ त्याला तुझा मळा आवडला. म्हणून मीही येथें येण्याचा विचार केला. मला तू आतां इथे निवारा करून दे." ॥९१॥ कृष्णाजीनें तें वाक्य ऐकताच तात्काळ सहा पत्रें आणले आणि ओट्यावर छप्पर केले.॥९२॥ समर्थांनी तिथे वास्तव्य केले, म्हणून ( कृष्णाजीचा ) मळा जणू तीर्थक्षेत्र झाला. राजा ज्या ठिकाणी जातो, ते स्थानच राजधानी होते.॥९३॥ महाराजांच्या बरोबर भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे होते. तें निरंतर स्वामींसेवेत तत्पर असत.॥९४॥ जेवणाखाणाची सर्व व्यवस्था कृष्णाजी पाटील स्वत: जातीनें लक्ष घालून करीत असे. समर्थांचे जेवण झाल्यावर तो प्रसाद घेत असे.॥९५॥ असो. गजानन महाराज मळ्यांत रहात असतांना एक अद्‌भुत गोष्ट घडली. दहा-वीस गोसावी फिरत फिरत तिथे येऊन पोहोचले.॥९६॥ समर्थांची महती त्यांनी आधीच ऐकली होती. त्यामुळें या मळ्यामध्ये येऊन त्यांनी तळ ठोकला.॥९७॥ ते गोसावी (कृष्णाजी) पाटलास म्हणाले, "आम्हीं तीर्थयात्रेला निघालो आहोत. (काशीहून) भागीरथीला घेऊन रामेश्वराला जात आहोत.॥९८॥ गंगोत्री, जम्नोत्री, केदार, हिंगलाज, गिरनार, डाकुर अशी अनेक क्षेत्रें आम्हीं पायी फिरत फिरत पाहिली आहेत.॥९९॥ ब्रह्मगिरी नामक गोसाव्याचे आम्हीं शिष्य आहोत. आमचे महाराजही सध्या आमच्याबरोबरच आहेत.॥१००॥ महासाधु ब्रह्मगिरी महाराज, ज्यांचा प्रत्यक्ष श्रीहरी गुलाम आहे. असे ते मूर्तिमंत सत्पुरुष तुझ्या पूर्वभाग्यानें तुझ्या घरी आले आहेत.॥१०१॥ आजच तुम्ही आम्हांस शिरापुरीचे भोजन द्यावे. गांजासेवनासाठी काही गांजाही पुरवावा.॥१०२॥ आम्हीं इथे केवळ तीन दिवसच राहू आणि चौथ्या दिवशी येथून निघू. तेव्हां पाटील, फार काही प्रयास न करता ही पर्वणी साधून घ्या.॥१०३॥ तुम्ही ह्या मळ्यात हा वेडा,पिसा आणि नंगाधूत मोठ्या कौतुकाने सांभाळला आहे. मग आम्हांस भोजन प्रसाद देण्यास मागें पुढें का पाहतां ?॥१०४॥ गाढवांस आवडीने पाळतात आणि गाईस लाथा मारतात, त्यांना का कधी कुणी सज्जन म्हणतात? याचा तुम्ही विचार करावा.॥१०५॥ आम्ही वैरागी गोसावी अवघा वेदान्त जाणतो. तुमची इच्छा असल्यास मळ्यात पोथी-प्रवचन ऐकावयास या."॥१०६॥ कृष्णाजी त्यावर उत्तरला, " उद्या तुम्हांस शिरापुरीचे भोजन घालीन. आज ह्या भाकरी आहेत, त्याच जेवणासाठी घ्याव्यात.॥१०७॥ माझा चालता बोलता कंठनीळ त्या पत्र्याच्या छपरांत बसला आहे. हवा तितका गांजा तुम्हांला तिथेच मिळेल."॥१०८॥ त्या दुसऱ्या प्रहरी गोसाव्यांनी चूण - भाकरी घेतली आणि मळ्यातील विहिरीजवळ भोजनास बसले. ॥१०९॥ त्यानंतर समर्थांच्या समोरच एका छपरात गोसाव्यांनी आपापली कडासनें लावली.॥११०॥ संध्याकाळीं त्यांचा महंत ज्याचे नाव ब्रह्मगिरी होते, तो भगवद्‌-गीता वाचू लागला.॥१११॥ इतर गोसावीही गीता श्रवणास बसले. तसेच गांवांतूनही काही लोक त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची पोथी ऐकावयास आले.॥११२॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक निरूपणासाठी घेतला होता. ब्रह्मगिरी पक्का दांभिक होता, त्यामुळें प्रवचनात स्वानुभवाचा काहीच अंश नव्हता.॥११३॥ त्याचे निरूपण ऐकून गावकऱ्यांस तें पटले नाही. "हा तर नुसता शब्दच्छल आहे." असे ते आपापसांत बोलू लागले. ॥११४॥ पोथी ऐकल्यावर तें सर्व लोक गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास पत्र्याच्या छपरांत आले आणि त्यांच्यासमोर बसले. ॥११५॥ तिथे केवळ निरूपणाचा भाग झाला, इथे पत्र्याच्या छपरांत प्रत्यक्ष स्वानुभवाचा पुरुष बसलेला आहे असे सर्व गावकरी म्हणू लागले.॥११६॥ तिकडे आपण इतिहास ऐकला, इथे प्रत्यक्ष पुरुष पाहिला. गावकऱ्यांच्या या बोलण्याचा त्या गोसाव्यास थोडा राग आला.॥११७॥ सर्व गोसावी त्या पत्र्यात गांजा पिण्यासाठी बसले होते. गांजाची चिलीम भरून ते ओढत होते.॥११८॥ पत्र्याच्या त्या छपरातच एका पलंगावर समर्थांची स्वारी बसली होती. भास्कर वरचेवर चिलीम भरून महाराजांस ओढण्यासाठी देत होता.॥११९॥ त्या चिलिमेच्या विस्तवाची ठिणगी अचानक पलंगावर पडली. ती पडतांना मात्र कोणाचेही लक्ष तिकडे गेले नाही.॥१२०॥ काही वेळ गेल्यावर तिथून धूर निघू लागला आणि बघतां बघतां तो पलंग एकदम चहू बाजूंनी पेटला.॥१२१॥ ते दृश्य पाहून भास्कर सद्‌गुरुनाथांस म्हणाला, "महाराज, हा पलंग सत्वर सोडून द्या आणि खाली उतरा.॥१२२॥ ह्या पलंगाची लाकडें सागाची आहेत,आतां ती पाण्याशिवाय विझायची नाहीत."॥१२३॥ त्यावर,' भास्करा, आग विझवायची तुला मुळींच गरज नाही. तू पाणी अजिबात आणू नकोस.' असे समर्थ वदते झाले.॥१२४॥ अहो ब्रह्मगिरी महाराज, तुम्हीं या पलंगावर येऊन बसा. तुम्हांला तर सारी भगवद्‌-गीता अवगत आहे.॥१२५॥ हे पाहा, श्रीहरीनें तात्काळ त्या (गीता)परीक्षेची वेळ आणली आहे. आतां तुम्ही ' ब्रह्मास अग्नी जाळू शकत नाही.' याचा प्रत्यय दाखवा. ॥१२६॥ "नैनं छिन्दन्ति" या श्लोकावर आत्ताच एक प्रहर प्रवचन दिलेत. मग आतां ह्या पलंगावर बसण्यासाठी का बरें शंकित आहात ?॥१२७॥ भास्करा, तू लवकर जा बरें आणि ब्रह्मगिरीच्या हातास धरून अत्यंत आदरानें या जळत्या पलंगावर बसव. ॥१२८॥ अशी आज्ञा होतां क्षणीच भास्करानें धावत जाऊन ब्रह्मगिरीचा डावा हात आपल्या हाताने धरला.॥१२९॥ भास्कराचे शरीर धिप्पाड, सशक्त आणि पिळदार होते. त्याच्या समोर तो गोसावी एखाद्या घुंगुरड्यासारखा (दुर्बल मनुष्यासारखा) दिसू लागला.॥१३०॥ तोपर्यंत पलंग चौफेर पेटून असंख्य ज्वाळा त्यांतून निघू लागल्या. त्यांहीं परिस्थितीत महाराज मात्र आपल्या आसनीं इतुकेही विचलित ना होतां स्थिर होते.॥१३१॥ कयाधूसुत प्रल्हादास अग्नींत उभें केले होते, हे श्रीव्यासांनी भागवत पुराणांत लिहिलें आहे.॥१३२॥ त्या कथेचेच जणू प्रत्यंतर श्री गजानन साधूंनी कृष्णाजीच्या मळ्यात दाखविले.॥१३३॥ ब्रह्मगिरी भास्करास म्हणू लागला," मला पलंगाजवळ नेऊ नका. मी महाराजांचा अधिकार काही जाणला नाही."॥१३४॥ पण त्याचे म्हणणें न ऐकता भास्कराने त्यास फरफर ओढत आणून आपल्या सद्‌गुरुरायांच्या समोर उभा केला.॥१३५॥ ' नैनं दहति पावक:' हे गीतेतील वचन खरें करून दाखवा, असे महाराज म्हणताच तो गोसावी फारच घाबरला.॥१३६॥ गोसावी भीत भीत बोलू लागला," मी तर केवळ पोटभरू संत आहे. शिरापुरी खाण्यासाठी मी गोसावी झालो.॥१३७॥ हे शांतीधामा,मी केलेल्या अपराधास्तव मला क्षमा करा. हे गीताशास्त्र शिकण्याचा मी उगाचच खटाटोप केला.॥१३८॥ तुला वेडा म्हणून हिणवले, याचा मला आतां पश्चात्ताप होत आहे. दातांत तृण धरून मी तुला शरण आलो आहे, तुम्हीं मला अभय द्या." ॥१३९॥ शेगांवच्या लोकांनी समर्थांस विनवणी केली, "आपणांस अग्नीपासून कदापिही भय नाही, हे खरें आहे.॥१४०॥ पण तरीही आमच्याकरतां तुम्ही लवकर (पलंगावरून) खाली उतरा, महाराज. तुम्हांस अशा स्थितींत पाहून आम्हांला धडकी भरते.॥१४१॥ हे ज्ञानजेठी, आमच्यासाठी तरी तुम्हीं खाली उतरा." गोसावीही पुरतां लज्जित झाला होता, काही न बोलता तो (तसाच उभा राहिला.)॥१४२॥ अवघ्यां लोकांच्या विनंतीस मान देण्यासाठी शेवटी गजानन महाराज खाली उतरले. तें उतरता क्षणींच पलंग कोसळून पडला. अक्षरश: एक पळही तो पलंग कोसळण्यास लागला नाही.॥१४३॥ खरें तर अवघाच जळाला होता. पण थोडें पाणी मारून, अग्नी विझवल्यावर जो काही थोडा भाग उरला होता, तो इतरांस साक्ष म्हणून दाखवायला ठेवला.॥१४४॥ पूर्ण निराभिमानी होऊन ब्रह्मगिरी महाराजांच्या पाया पडला. गंगाजलाचा स्पर्श झाल्यावर, तिथे मलिनता कशी राहील बरें ?॥१४५॥ त्याच मध्यरात्री महाराजांनी ब्रह्मगिरीस बोध केला. तू आजपासून या घेतलेल्या सोंगाचा त्याग कर.॥१४६॥ ज्यांनीं ही राख (भस्म) शरिरास लावलेली आहे, त्यांनी उपाधीचा अट्टाहास करू नये. अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा निरर्थक उपदेश करू नयें.॥१४७॥ या जगतांत नुसतेंच शब्दपांडित्य अतोनात माजले आहे. त्यामुळेंच आपल्या ह्या संस्कृतीची हानी झाली आहे.॥१४८॥ मच्छिंद्रनाथ, जालंदरनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आदि यतीं आणि संत ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा ?॥१४९॥ श्रीशंकराचार्य केवळ स्वानुभवाच्या जोरावर यती झाले, हे निश्चित ! संत एकनाथांनी प्रपंचात राहूनही ब्रह्मस्थिती अनुभवली.॥१५०॥ या भूमीवर श्री स्वामी समर्थ हेही ब्रह्मचारी आणि थोर ब्रह्मसाक्षात्कारी सत्पुरुष होऊन गेले. या सर्वांच्या चरित्रांचेच तू मनन कर.॥१५१॥ उगाचंच शिरा-पुरी खाण्यासाठी ह्या भूमीवर भटकू नकोस. असें वर्तन ठेवल्यांस इतकेही सार तुझ्या हातीं लागणार नाही.॥१५२॥ महाराजांनी असा बोध केल्यावर ब्रह्मगिरी पुरतां विरक्त झाला. प्रातःकाळींच कोणालाही, अगदी त्याच्या शिष्यांसही न भेटतां तो तिथून निघून गेला.॥१५३॥ दुसऱ्या दिवशीं ही वार्ता अवघ्या शेंगावांत पसरली. जो तो जळालेल्या पलंगाला पाहावयास त्या मळ्यात आला.॥१५४॥ हा दासगणूविरचित, श्री गजाननविजय नावाचा ग्रंथ सर्व भाविकांस ह्या भावसागरांत तारक होवों. दासगणू मनीं हीच इच्छा करतो.॥१५५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ७ इथे वाचता येतील.


May 4, 2023

स्तंभी प्रकटला नरहरी हो...


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ श्री नृसिंहाय नमः


साधारण दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी पंढरपूर येथें प्रल्हाद शिवाजी बडवे नामक एक थोर संतकवी होऊन गेले. प्रल्हादकवि म्हणून विख्यात असलेले हे संतकवी उत्तम कीर्तन करीत असत. ते श्रीहरी विठ्ठलाचे परमभक्त होते आणि स्वतः पांडुरंग त्यांच्याबरोबर बोलत असे. त्यांची अनेक पदें प्रसिद्ध आहेत.

त्यांपैकी हे एक पद - श्रीनृसिंह अवतार वर्णन करणारे. आज खास श्री नृसिंह जयंतीनिमित्त देत आहोत.

  स्तंभीं प्रकटला नरहरी हो ॥ गडगड गडगड गर्जत घोषें धोकें काळ थरारी हो ॥धृ.॥ कडकड स्तंभ कडाडित नादें गडगड गगन विदारी हो ।  घडघड रविरथ विघडत गगनीं तडतड धरणि तडाडी हो ॥१॥  कराळमुख सिंहाचें दाढा विक्राळा व्यंकटा हो । पिंगट वर्ण जटा सुभटा करिं नखपंक्ती अति तिखटा हो ॥२॥  धडधड धडधड धडकत नेत्रीं अग्नीचे कल्लोळ हो । सळसळ सळसळ वदनि सळाळी विशाळु जिव्हा लोळे हो ॥३॥  जानूवरि हरि धरि दनुजाधिप रागें उदर विदारी हो ।  काढुनि अरिउदरांतुनि अंत्रे घाली निजकंधरी हो ॥४॥  घटघट घोंटित रक्त कंठिचें वाटे काळ भुकेला हो ।  वृत्तवृकापति दिक्पति म्हणती मोठा प्रळय उदेला हो ॥५॥ सुरवर सुमनें वर्षति हर्षें गर्जति जयजयकारी हो ।  स्तविती नरकिंकर विद्याधर प्रल्हादकैवारी हो ॥६॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्रीलक्ष्मीनृसिंहद्वादशनामस्तोत्रं आणि श्री मिलिंदमाधवकृत नृसिंहावतार माहात्म्य


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


हरिः ॐ । प्रणम्य शिरसा देवं नृसिंहं भक्तवत्सलम् । सच्चिदानंदरूपोऽयं परिपूर्ण जगद्‌गुरुम् ॥

प्रथमं तु महाज्वालो द्वितीयं तूग्रकेसरी । वज्रनखस्तृतीयं तु चतुर्थन्तु विदारणः ॥१॥ पञ्चमं नारसिंहश्च षष्ठः कश्यपमर्दनः । सप्तमं रिपुहन्ता च अष्टमो देववल्लभः ॥२॥ नवमं प्रह्लादवरदो दशमोऽनन्तहस्तकः । एकादशो महारुद्रो द्वादशं करुणानिधिः ॥३॥

द्वादशैतानि नामानि नृसिंहस्य महात्मनः । मन्त्रराजेति विख्यातं सर्वपापहरं शुभम् ॥४॥ क्षयापस्मारकुष्ठादि तापज्वरनिवारणम् । राजद्वारे तथा मार्गे संग्रामेषु जलान्तरे ॥५॥

गिरिगव्यहरगोव्ये व्याघ्रचोरमहोरगे । आवर्तनं सहस्त्रेषु लभते वाञ्छितं फलम्॥६॥

इति श्रीब्रह्मपुराणे ब्रह्मनारदसंवादे श्रीलक्ष्मीनृसिंहद्वादशनामस्तोत्रं सम्पूर्णम्



श्री मिलिंदमाधवकृत नृसिंहावतार माहात्म्य :



Apr 15, 2023

श्रीदत्तप्रार्थना ( कामदा छन्द )



श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

व्यर्थ हट्टि मी सांडुनी त्रपा । बाहतों तुला ज्या नये कृपा । रंक पापि मी तूं रमापती । तैं कशी मशीं होय संगती ॥१॥ 
माझे अंगणीं घेवडा नसे । वांझमहिषिचे दूधही तसें । वाळतें जरी दारिं या मढें । धांवतें तुझें चित्त रोकडें ॥२॥ 
असतीच निंदा मदंतरीं । होति फावती तूज बा तरी । जाहला न विद्यामद मला । फावती कशी होय बा तुला ॥३॥ 
ताडिते जरी चोर हें शिर । धांवता तरी हो मुनीश्वर । गांजती जरी क्रूर सुंदरी । बाहतास तूं बा मला तरी ॥४॥
बा दिवाळिचा ये जरी क्षण । ये त्वदागमा योग्य कारण । राज्य असतां तूं पहावया । येसि बा नसें तें कपाळिं या ॥५॥
कर्में माझिया आण घातली । बा तुला तरी ती करी खुली । दीधल्या विना येसि ना जरी । अर्पि सत्य सर्वस्व ते करीं ॥६॥
कामकाक हा त्वत्पदीं वसे । यास्तव तुझा आगम नसे । भक्तमानसहंस शीघ्र या । कामकाक जाईल उडोनिया ॥७॥माझि आण दत्ता असे तुला । दाविं पाउला कीर्तनीं मला । जीवनाविना मीन तळमळें । तुजविणें तसा येथ मी लोळे ॥८॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामीमहाराजांचा पदसंग्रह 


Apr 10, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ७


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे राघवा रामा तुझा जयजयकार असो. हे मेघःश्यामा, संतजनांच्या विश्रामा, हे सीतापतें, दाशरथा तुझा जयजयकार असो.॥१॥ तुझ्याच कृपेनें सर्व वानर ह्या भूमीवर बलवान झालें. हे देवा, ज्यांनीं लंकेत जाऊन रावणाचा चक्काचूर केला.॥२॥ तुझी कृपा एखाद्यावर झाल्यास तो सर्वदा विजयी होतो. तुझा भक्त जें जें इच्छील तें तें काम सफळ संपूर्ण होतें.॥३॥ हे देवा, एखाद्यास भूपतीचे साहाय्य लाभल्यास तो कितीही नीच असला तरी सर्वांस वंद्य होतो.॥४॥ अशा अमोघ कृपेला मी खरोखर पात्र होईल का ? याचा जों मीं विचार केला, तर असे कळून आलें की ना माझ्याकडे ज्ञान आहे वा हे श्रीपती माझी भक्तीही खरीखुरी नाहीं. पांडुरंगा, अशी माझी स्थिती दयनीय आहें.॥५-६॥ तसेंच माझे मनदेखील सदा आशाळभूत असून तें कधीही स्थिर होत नाही. मनांत सतत नाना विकल्पही येऊ लागतात.॥८॥ हे दीनबंधो, तुला अगदी मनापासून पातक्याचीच आवड आहें असे पुराणांत दाखले आहेंत.॥९॥ पुण्यवानांना तारल्यास तें काय नवल बरें ? जो पापी मनुष्यास उध्दरतो तोच खरोखर थोर होय.॥१०॥ परमेश्वरा, या जगतीं तुझ्यापेक्षा कुणीही मोठा नाहीं आणि माझ्या पातकांस तू आतां चुकूनही पाहूं नकोस.॥११॥ हे नारायणा, मला सांभाळून घे अन आपल्या मोठेपणाचे रक्षण कर. हा दासगणू तुझ्या चरणीं शरण आला आहें, आतां माझी उपेक्षा करुं नका.॥१२॥ अवघें शेगांव हा मारुतीचा उत्सव साजरा करत होता. गणेशकुळीचा खंडेराव पाटील याचा पुढारी होतां.॥१३॥ हें पाटील घराणें गावांत अतिशय पुरातन व धन-कनकसंपन्न असून त्यांची भरपूर शेतीवाडीही आहें.॥१४॥ पूर्वीपासूनच यांच्या घरीं संत-सेवा होत होती. नशिबाने जमीनदारीही मिळाली. मग काय विचारता?॥१५॥ महादाजी पाटलांचे दोन औरस पुत्र होते. थोरल्या मुलाचे नांव कडताजी असें होते.॥१६॥ तर धाकटाचे नांव कुकाजी होते. या घराण्याला गोमाजी ह्या संतपुरुषाचा उपदेश व आशीर्वाद होता.॥१७॥ कडताजी पाटील ह्यांस सहा पुत्र होते तर कुकाजी भाग्यवान असूनही त्यांच्या पोटी एकही पुत्र नव्हता.॥१८॥ कडताजी पाटलांचे निधन झाल्यावर कुकाजींनीच त्यांच्या सहाही मुलांचे संगोपन जन्मदात्या पित्यासारखें केले होते.॥१९॥ कुकाजींच्या कार्यकाळांत खूपच आर्थिक भरभराट झाली. घरांमध्ये साक्षात अष्टसिद्धि नांदूं लागल्या आहेंत असेच वाटू लागलें.॥२०॥ कुकाजी पाटील ह्यांच्या नंतर खंडू पाटलाने कारभार आपल्या हातांत घेतला. त्याच्या पुढें कधीच कुणाचे काही चालत नसे.॥२१॥ या खंडू पाटलास गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी असे पांच भाऊ होते.॥२२॥ आधींच ते पाटील जमीनदार होते वर सर्व सत्ताही त्यांच्याच हातांत होती. त्यांच्या सदनामध्यें अक्षरश: पैशाचा धूर निघत असे.॥२३॥ ते सर्व बंधु तालीम करायचे, तालीम खेळायचे. हरी पाटलास कुस्तीचा खूप छंद होता.॥२४॥ उत्सव केवळ नावाचाच मारुतीचा होता, जयजयकार मात्र पाटलाचा होत असे. त्यांचा म्हणतील तो शब्द झेलणें साऱ्या गावकऱ्यांस भाग होतें.॥२५॥ शेगांवांत नेहमींच कटकटी, मारामार्‍या होत असत. पाटीलबंधू सर्व लोकांस एकाच तऱ्हेची वागणूक देत असत.॥२६॥ हा सज्जन तर तो साधुसंत आहें असे कांही ते मानत नसत. मनांत येईल तसे अद्वातद्वा ते सर्व जनांस बोलत असत.॥२७॥ असो. या पाटीलबंधूंनीं देवळात येऊन महाराजांची सतत हेटाळणी करणे सुरु केलें.॥२८॥ कोणी त्यांना ' अरे वेड्या गण्या, तुला कण्यां-ताक खाण्यास हव्यात का ? ' अश्या प्रकारचे टिंगलटवाळीच्या गोष्टी बोलून ते समर्थांस त्रास देऊ लागलें.॥२९॥ तर कोणी म्हणें तुम्ही आतां आमच्याबरोबर कुस्ती खेळा, तुम्हांस तर सर्व लोक योगयोगेश्वर असे म्हणतात तर तुम्ही आताच त्याचें प्रत्यंतर दाखवा. नाही तर आम्ही मार देऊ, ह्याचा बर्‍या बोलानें विचार करा.॥३०-३१॥ त्यांचे ते सारें बोलणें समर्थ हंसण्यावारी नेत असत. महाराजांनी त्या पाटील बंधूंस ना कधी उत्तर दिले ना कधी ते त्यांच्यावर यत्किंचित्‌ रागावले.॥३२॥ त्या मंदीरात असा तो उर्मट प्रकार नेहेमीच घडू लागला. शेवटी भास्कर पाटील समर्थांस म्हणाला, 'महाराज तुम्ही इथे राहू नका. चला, आपण आकोलीं गावी जाऊ या. ही पाटलांची पोरें खूप माजलीं आहेत, यांचा यांपुढे काही संबंध नको. हे सर्व शक्तीनें माजलें आहेत. पैशामुळें धुंद झाले आहेत.सत्तेपुढें कुणाचेच कांहीं चालत नाहीं, इथे तर यांचीच पाटीलकी आहें."॥३३-३५॥ गजानन महाराज त्यांवर उत्तरले, "भास्करा, थोडा धीर धर. ही सर्व पाटील मंडळी माझे परम भक्त आहेंत.॥३६॥ मात्र यांच्यामध्ये जराही नम्रपणा नाही. तू यांच्या अंत:करणांत थोडे डोकावून पहा, म्हणजे तुझे तुलाच कळेल.॥३७॥ ही पाटलांची मुलें माझींच लेंकरें आहेत. भास्करा, यांच्या कुळावर थोर संतांची कृपा आहे.॥३८॥ उर्मटपणा हेच जमीनदारांचे भूषण असतें. वाघाचे वजन कधी गाईच्या वजनाएवढें असते का?॥३९॥ तलवारीला मऊपणा काय उपयोगाचा बरें ? वा अग्नीनें कधी शीतलता धारण करावी का ?॥४०॥ कांहीं काळानंतर हा उर्मटपणा नक्की जाईल. पावसाळ्यातील गढूळ जल हिंवाळ्यांत कसें नितळ स्वच्छ होतें."॥४१॥ एके दिवशीं हरी पाटील मारुतीच्या मंदीरात आला आणि महाराजांस हाताने पकडून 'माझ्याबरोबर कुस्ती करा.' असे बोलू लागला.॥४२॥ तुला आतांच मी कुस्तींत चीत करीन, चल आपण तालमींत जाऊं. इथे उगाच ' गण गण गणांत बोते ' असें म्हणत असा बसू नकोस.॥४३॥ या शेगांवी तुझे प्रस्थ खूप माजलें आहें, ते आज मी खरें की खोटें आहे तेच बघतो. मला तू कुस्तीत हरविलेस तर तुला मी मोठें बक्षीस देईन.॥४४॥ समर्थांनी ते मान्य केलें. दोघेंही तालमीमध्यें गेले. त्यावेळीं समर्थांनी काय कौतुक/ गम्मत केली ते आतां जाणून घ्या.॥४५॥ श्री गजानन तालमींत जाऊन खाली बसले आणि आतां मला जागेवरून उठव असे म्हणाले. हरी, तू जर खरांच पहिलवान असशील तरच तू हे करू शकशील.॥४६॥ हरी पाटील समर्थांस उठवण्यासाठी प्रयत्न करू लागला. परंतु ते सारेच वायां गेले. समर्थ आपल्या जागेवरून मुळींच हालले नाहींत.॥४७॥ तो घामाघूम झाला. पूर्ण ताकदीने तो समर्थांसी झुंज देऊ लागला खरा, पण कुस्तीतील त्याचे सारे पेच निष्फळ झाले.॥४८॥ हरी मनांत विचार करू लागला, हा केवढा तरी सशक्त आहें ? अचल असा पर्वतही याच्यापुढें अगदीच उणा पडेल.॥४९॥ हा जरी किडकिडीत दिसतो तरी याची शक्ती मात्र एखाद्या हत्तीसारखी आहें. तरीही आजपर्यंत आमच्या साऱ्या खोडया यानें सहन केल्या.॥५०॥ याचें एकमेव कारण म्हणजे हा बलवान गजराज तर आम्ही क्षुद्र जंबुक होतो.म्हणूनच हा (दयासागर ) आम्हांवर रागावला नाहीं.॥५१॥ जंबुकाच्या चेष्टेला गजपती कधीच महत्त्व देत नाहीं. श्वानांच्या भुंकण्यांस वाघ अजिबात किंमत देत नाहीं.॥५२॥ आतां काही असो, यांच्या पायांवर डोके ठेवणे आलें. आजपर्यंत मी कुणालाही कधी नमन केले नाहीं.॥५३॥ समर्थ हरीला म्हणाले,आम्हांस आतां बक्षिस द्यावे, नाही तर तू मला कुस्तींत चीत करावेस.॥५४॥ कुस्ती हा मर्दानी षोक सर्वांहुन श्रेष्ठ असा आहें. अरे,कृष्ण-बलरामानें त्यांच्या बालपणीं अशाच कुस्त्या खेळल्या होत्या.॥५५॥ ह्याच मल्लविद्येनें त्या परमेश्वरानें मुष्टिक आणि चाणूर या कंसाच्या देहरक्षकांचा वध केला.॥५६॥ पहिली संपत्ति हें शरीर, दुसरीं तें घरदार तर तिसरी संपत्ती म्हणजे धनधान्य होय.॥५७॥ तुझ्याप्रमाणेंच पूतनारीही पाटील होता. यमुनातीरीं त्यानें गोकुळींचीं सारी मुलें बलवान केली होती.॥५८॥ तसेंच तुही करावेस. शेगांवातील लोकांचे शरीरबळ वाढवावेंस. नाही तर आपलें हे पाटील नांव तू सोडून दे.॥५९॥ हेंच मला तू बक्षीस द्यावेंस, अन्यथा आज माझ्याशी कुस्ती कर. अशा रीतीने समर्थांनीं हरीचा माज उतरवला.॥६०॥ त्यांवर हरी समर्थांस म्हणाला, आपली कृपा झाल्यांस शेगांवच्या लेंकरांस सशक्त करतां येईल.॥६१॥ हरी पाटलानें असे धूर्तपणाचें बोलणें केलें. जे मुळांत शहाणे असतात त्यांना शाळा नको असतें.॥६२॥ असो. त्या दिवसापासून, हरीने या पुण्यपुरुषाशीं उद्धट भाषण करणें सोडून दिलें.॥६३॥ त्यांचे हे असें वागणे बघून इतर बंधू बोलू लागलें, अरे हरी तू त्या जोगड्याला का बरे भितोस हें काही आम्हांस कळत नाहीं.॥६४॥ आपण पाटीलांचे पुत्र असून या गांवाचे जमीनदार आहोंत. पण तू मात्र त्या नागड्याच्या पायीं आपलें डोकें का ठेवतोस ?॥६५॥ त्या वेड्याचे यागांवीं फार थोतांड माजलें आहें. गावकऱ्यांस सावध करण्यासाठीं आपण त्याचा नायनाट केलाच पाहिजे.॥६६॥ आपण जर असें केलें नाही तर अवघे लोक वेडें होतील. साऱ्या गावांस हुशार करणें हेच पाटलाचें खरें कर्तव्य असतें.॥६७॥ ठग साधूचे सोंग घेतात आणि वेडेवाकडे वर्तन करतात. गरीब स्त्रियांना फसवतात, याचा विचार आपण केला पाहिजे.॥६८॥ सोन्यांस कस लावल्याशिवाय त्याचे सोनेपण सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांचा शांतपणा ऊसांची परिक्षा घेऊनच कळला.॥६९॥ जेंव्हा रेडा बोलता झाला, तेव्हांच ज्ञानेश्वर महाराजांचे साधूत्व कळले. परिक्षा घेतल्याशिवाय कोणासही उगाचच अस्थानीं मान देऊ नये.॥७०॥ चला, आजच आपण त्याची परिक्षा घेऊ, असे म्हणत ते सर्व ऊंसाची एक मोळी घेऊन मंदिरांत आलें.॥७१॥ हरी काहीच बोलला नाही. मात्र इतरांनी महाराजांना प्रश्न केला, "अरे वेड्या, तुला हा ऊस खावयास हवा आहे का ? ॥७२॥ जर तुझी हा ऊस खाण्याची इच्छा असेल तर तुला आमची एक अट मान्य करावी लागेल. ॥७३॥ आम्हीं या ऊसांने तुझ्यावर प्रहार करूआणि जर त्याचे वळ तुझ्या अंगावर उठले नाहीत तरच तुला योगी मानूं."॥७४॥ त्यांची ही बडबड ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत. अजाण बालकांचे बालिश चाळे सुज्ञ कधीच मनावर घेत नाहीत.॥७५॥ त्यावर मारुती म्हणाला, अरे हा तर फारच घाबरला आहे. ऊसाचा मार खाण्यासाठी हा कांहीं तयार नाही.॥७६॥ मग गणपती म्हणाला, अरे ह्याचे मौन म्हणजेच त्यानें आपणांस संमती दिली आहें. आतां काय पहातां ?॥७७॥ हें दोघां तिघांस पटले. त्यांनी हातांत ऊस घेतले अन समर्थांस मारण्यासाठी ते त्यांच्या अंगावर धावून आलें.॥७८॥ ते पाहून त्या मंदिरांत असलेले स्त्री-पुरुष घाबरून पळून गेलें. भास्कर मात्र तेवढा श्री समर्थांजवळ थांबला.॥७९॥ भास्कर त्या पोरांस समजावू लागला, " अरे तुम्हीं या ऊंसानें आज श्री समर्थांस मारूं नका.हें कांहीं बरें वर्तन नव्हे.॥८०॥ तुमचा खरे तर पाटील-कुळांत जन्म झाला आहे, त्यांमुळे दीनांविषयीं तुमचें अंतःकरण दयाळू असावें.॥८१॥ तुम्हीं यांस महासाधू असे मानत नसला तरी पण हीन दीन समजून यांना सोडून द्या.हेंच बरें होईल.॥८२॥ अरे, जे शूर शिकारी असतात ते वाघावर हल्ला करतात. उगीच हातांत बंदूक घेऊन नाकतोडा मारत नाहीत.॥८३॥ मारुतीरायानेदेखील त्या रावणाची लंका जाळली. उगीच दुबळ्यांच्या झोंपडया पाहून त्यांवर चाल केली नाही."॥८४॥ त्यावर ती पाटील-पोरें उत्तरली, तुमचे सारें बोलणे आम्ही ऐकले. शेगांवातील सारे लोक यांस अतिशय आदरपूर्वक योगयोगेश्वर असे म्हणतात.॥८५॥ त्याचा योग पाहण्यासाठीच खरोखर आम्ही इथे आलों आहोत. तुम्हीं यांत न पडतां दुरूनच मौज पहा.॥८६॥ शेतकरी कसे आपल्या शेतांत ओंब्या काठीने झोडपून काढतांत त्याचप्रमाणें तें सर्वजण हातांत ऊंस घेऊन समर्थांस मारुं लागले.॥८७॥ पण महाराज मात्र डगमगले नाहींत तर या मुलांस पाहून हसत बसून राहिलें. त्यांच्या अंगावर कोठेंही ऊसाच्या प्रहाराने वळ उठले नाहींत.॥८८॥ ते बघून पोरें घाबरलीं. त्यांच्या चरणीं नतमस्तक होऊन हा खरंच बलवान योगयोगेश्वर आहें असे म्हणू लागली.॥८९॥ महाराज त्या पाटलांच्या पोरांस बोलले," मुलांनो ! तुमच्या हातांना मला मारल्यामुळें खूपच त्रास झाला असेल.॥९०॥ तो श्रम परिहार करण्यासांठी मी तुम्हांस या ऊसाचा रस काढून पिण्यांस देतो.या असे तुम्ही माझ्यापुढें बसा."॥९१॥ असे म्हणून समर्थांनी एक ऊस हातांत घेतला आणि केवळ हातानेंच पिळून त्याचा एका पात्रामध्यें रस काढला.॥९२॥ अशा रितीने समर्थांनीं त्या ऊंसांची अवघीच मोळी पहा पिळली आणि पोरांस ताजा रस पिण्यास दिला.॥९३॥ पुण्यपुरुष श्रीगजानन महाराजांनी चरकाशिवाय ऊसांचा रस काढला. ते पाहून त्या बालकांस अतिशय आनंद झाला.॥९४॥ ही मुळींच दंतकथा नसून योगशक्ति आहें असे लोक म्हणतात. योगानें जी शक्ती प्राप्त होतें, त्यांवर मात करतां येत नाहीं.॥९५॥ पौष्टिक पदार्थांनीदेखील शक्ती येते, पण ती अशी कायम टिकत नाहीं. आपल्या राष्ट्रांस सशक्त करावयाचे असल्यांस योग शिका.॥९६॥ श्रोते हो, हेंच तत्त्व सुचवण्यासाठी त्या पाटील अर्भकांस समर्थांनी रस काढून दाखविला.॥९७॥ समर्थांस वंदन करून ती पोरें निघून गेली. हे सारे वर्तमान त्यांनी खंडू पाटलास श्रुत केलें.॥९८॥ अरे दादा, आपल्या शेगांवीचे गजानन महाराज साक्षात्‌ ईश्वर आहेंत. आम्हांस आजच त्याचा प्रत्यय आलेला आहे.॥९९॥ असें म्हणून त्यांनी सारी हकीकत त्यास सांगितली. ती ऐकून खंडू पाटीलही अंतरी चकित झाला.॥१००॥ मग तोही समर्थांच्या दर्शनांस येऊ लागला. पण त्याची वाणी वा त्याचे बोलणें मात्र यत्किंचित्‌ही मृदू नव्हतें.॥१०१॥ समर्थांस तो खंडू पाटील ' गण्या, गजा ' असें म्हणत असें. अरे-तुरे प्रकारचे हें बोलणें दोन ठिकाणीं होतें.॥१०२॥ जिथे आत्यंतिक प्रेम असते, तिथेच असे घडतें. आई-लेंकरांचे बोलणेंही अरे-तुरेचें असतें.॥१०३॥ हा एक प्रकार झाला. आतां राहिलेला दुसरा प्रकारही सांगतों, तोही तुम्ही सावधान चित्तानें ऐका.॥१०४॥ वतनदार लोकं नोकर-चाकर वा हीन-दीन यांच्याबरोबर जे संभाषण करतात तेंही असेंच एकेरी स्वरुपाचेंच असतें.॥१०५॥ अशा प्रकारें सर्वांनाच अरे तुरे म्हणण्याची खंडू पाटलांस संवय होती. ह्याचें हेच कारण की गावांतील साऱ्या जनतेस तों निःसंशय आपली लेकरेंच समजत होता.॥१०६॥ श्रोतें हो, याच संवयीनें खंडू पाटील श्रीसमर्थांस ' गण्या ' म्हणत असे. इतर कुठलेही कारण त्यांस नव्हते.॥१०७॥ जरी ' गण्या गण्या ' असे तो संबोधित होता, तरीं त्याच्या अंतःकरणांत मात्र समर्थांबद्दल अतिशय प्रेम होतें. पहा बरें, नारळाची बाहेर करवंटीं असली तरी आंत खोबरें असतें.॥१०८॥ अशाच प्रकारचा त्याचा बोलण्याचा परिपाठ होता. कुकाजीचा वृद्धापकाळ झाल्याने तोच शेगांवीचा कारभार करत असें.॥१०९॥ एके दिवशीं कुकाजी खंडूस म्हणाला, " तू प्रतिदिवशीं महाराजांच्या दर्शनास जातोस.॥११०॥ 'या भूमीवर गजानन महाराज एक साक्षात्कारी योगपुरुष आहेत.' असे मला सांगतोस. मग का रे तुझी वाणी त्यांच्यापुढे गप्प होते?॥१११॥ तुला अजून पोरबाळ नाहीं. माझाही आतां वृद्धापकाळ झाला आहें. माझ्या डोळ्यांनी मला नातवंडाचे बोल आणि खेळणे पाहू दे.॥११२॥ तू आज त्यांना विनंती कर,' हे स्वामी समर्थ गजानना, कृपा करून मला एखादे मूल द्या.'॥११३॥ तो जर खरेंच साधू असेल तर तुझे मनोरथ पूर्ण होतील आणि त्यांमुळे माझाही अवघा हेतू तडीस जाईल.॥११४॥ या त्रिजगतांत साधुपुरुषांस काहीही अशक्य नसते. तू संतलाभाचा थोडातरी आपणांसाठी उपयोग करून घे."॥११५॥ तें खंडूस पटले. एके दिवशीं मारुतीच्या मंदिरांत त्यानें समर्थांबरोबर काय बोलणें केले ते तुम्ही ऐका.॥११६॥ अरे गण्या, माझा चुलता आतां वृद्ध झाला आहे. त्याच्या मनांत नातवंड पाहण्याची इच्छा उपजली आहें.॥११७॥ तुला लोक साधु म्हणतात. तुझें दर्शन झाल्यावर मनींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असेही लोक सांगतात.॥११८॥ त्याचें आतां प्रत्यंतर दाखव. उगाच उशीर करूं नकोस. तुझ्या चरणी ज्याचें शिर आहे, तो निपुत्रिक का बरें रहावा ?॥११९॥ असे तें बोलणे ऐकून महाराज त्यास म्हणाले," आज हें उत्तम घडून आलें अन तू आम्हांपाशी याचना केली.॥१२०॥ तू सत्ताधीश आणि धनवान आहेंस, तूं प्रयत्‍नवादीदेखील आहेस. तरीही तू आम्हांप्रति ही विनंती का करत आहेस हे काही कळत नाहीं.॥१२१॥ धन आणि बळापुढे अवघेंच असहाय्य असते. मग हे मागणे धन आणि शक्तीने का साध्य होत नाही बरें?॥१२२॥ तुझी भव्य शेती आहे,पुष्कळ गिरण्या दुकानें आणि पेढयाही आहेत. या साऱ्या वर्‍हाडांत तुझा शब्द कुणीही मोडत नाहीत.॥१२३॥ मग त्या ब्रह्मदेवास, 'आपणांस एक पुत्र द्यावा' अशी आज्ञा का बरे करत नाहीस? हेच मला एक कोडे पडलें आहे."॥१२४॥ त्यावर खंडू म्हणाला, ही गोष्ट केवळ प्रयत्नांवर अवलंबून नाही. या जगीं जरी पिकें पाण्यापासून येत असली तरी पाणी पाडणें मात्र मानवाच्या हातांत नसते. दुष्काळांत या साऱ्या जमिनी अगदीच कोरड्या-शुष्क होऊन जातात.॥१२५-१२६॥ पण पाणी पडल्यावर मात्र माणूस आपलें कर्तृत्व दाखवू शकतो. अगदी तसाच हाही प्रकार आहे, तिथे केवळ मानवी प्रयत्न पुरेसे होत नाहीत.॥१२७॥ खंडू पाटील असे बोलल्यावर समर्थ हसूंन बोललें, " आतां तूं माझ्याकडे मुलाची याचना केलीस.॥१२८॥ याचना म्हणजे भीक मागणे होय. खंडू, हें तूं आज केलेंस पहा. तुला एक बालक होईल, त्याचे नांव तू भिक्या असे ठेव.॥१२९॥ जरी पुत्र देणें हे काही सर्वतोपरी माझ्या हाती नाहीं, तरी मी तुझ्यासाठीं त्या परमेश्वराला नक्की विनंती करेन.॥१३०॥ तो माझी प्रार्थना ऐकेल, त्या ईश्वराला हें काहीच अशक्य नाही. तुझी घरची परिस्थिती उत्तम आहे, तर तू ब्राह्मणांस आमरसाचे भोजन दे.॥१३१॥ ह्यां माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुला पुत्र होईल. मात्र दरवर्षी ब्राह्मणांस आम्ररसाचें भोजन घालत जा."॥१३२॥ हें समर्थ वचन खंडूने ऐकलें आणि घरीं येऊन मंदिरातील सर्व वृत्त कुकाजीस सांगितलें.॥१३३॥ ते ऐकून कुकाजीस अत्यानंद झाला. काही दिवसांनंतर समर्थ वचन खरें झालें.॥१३४॥ खंडू पाटलाची पत्नी, गंगाबाई गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर तिला पुत्र झाला. खंडू पाटील यांस आनंद झाला तर कुकाजीच्या हर्षाला कांही पारावार राहिला नाहीं.॥१३५-१३६॥ त्यांनी खूप दानधर्म केला. गरीबांस गूळ,गहू दिले तर गांवांतील बालकांस पेढे-बर्फीचा खाऊ दिला.॥१३७॥ बाळाचे थाटांत बारसें केले गेले आणि भिकू असे नांव ठेवले. पुढें बाळ शुक्लपक्षीच्या चंद्राप्रमाणें वाढू लागला.॥१३८॥ ब्राह्मणांस आम्ररसाचें भोजन दिलें. शेगांवांत अजूनही ती परंपरा चालली आहें.॥१३९॥ खरोखरच पुण्यपुरुषाची वाणी कशी असत्य होईल बरें?(गजाननाच्या कृपेने) पाटलाच्या ओसरीवर बाळ रांगूं लागला.॥१४०॥ पाटील मंडळींचा हा बोलबाला देशमुखांना काही पटला नाहीं. शेगांवांत पहिल्यापासूनच दुफळी होती.॥१४१॥ तिथे एक फळी देशमुखांची तर एक फळी पाटलांची होती. (त्या सर्वांची) अंतःकरणें एकमेकांबद्दल मुळातच दूषित, कलुषित होती.॥१४२॥ प्रत्येक जण आपापल्या डावांत एकमेकांचा सतत घात करण्याचीच इच्छा करीत असे. त्यांच्या मनांत एकमेकांबद्दल प्रेमाचा लेशही नव्हता.॥१४३॥ त्यांचे शास्त्री दोन, मंत्री दोन, शस्त्री दोन तर तंत्रीदेखील दोन होतें. श्वान जसे एकमेकांपुढें आल्यावर नेहेमीच गुरगुरतात, त्याचप्रमाणें त्या शेगांवांतसुद्धा पाटील आणि देशमुखांत सतत कुरबुर चालें. खरोखर त्यांच्यात छत्तिसाचा आंकडा होता, जो कधीही त्रेसष्टाचा होणार नाहीं.॥१४४-१४५॥ पुढें अशी गोष्ट झाली की कुकाजी नातवंडाला पाहून भीमा नदीच्या तीरी वसलेल्या पंढरींत स्वर्गवासी झाले.॥१४६॥ त्यांमुळे खंडू पाटलांचे मन अगदीच उद्विग्न झालें. तो म्हणू लागला, " आज माझें छत्र पूर्णपणे ढासळलें.॥१४७॥ हे श्रीहरी, ज्या चुलत्याच्या जीवावर मी या भूमीवर निर्भय होतों,तो माझा आधार कां रे काढून नेलास ?" ॥१४८॥ अशी ही संधी पाहून, देशमुखमंडळीना पाटील मंडळींवर बालंट आणण्यासाठी पूर्ण सवड मिळाली.॥१४९॥ श्रोतें हो, तो सारा वृत्तांत मी तुम्हांस आठव्या अध्यायांत सांगेन. ही जमीनदारी म्हणजे प्रत्यक्ष द्वेषाची खाणच आहें, हे सत्य आहें.॥१५०॥ हा दासगणूविरचित गजाननविजय नांवाचा ग्रंथ कुतर्कांस सोडून, एकाग्र होऊन श्रोतेंजन तुम्हीं ऐका.॥१५१॥शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥         

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ६ इथे वाचता येतील.