Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १९


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥१॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥२॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥३॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥४॥ जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला । या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥५॥ त्याचें गूढ कळेना । पुसण्या छाती होईना । निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥६॥ तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही । तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥७॥ तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर । मुनसफीच्या हुद्द्यावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥८॥ तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला । त्या काशिनाथपंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥९॥ असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी । गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१०॥ बुटीचा ऐसा विचार । या सीताबर्डीवर । महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥११॥ शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित । विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥१२॥ तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें । आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥१३॥ इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत । जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥१४॥ महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी । या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥१५॥ तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना । अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥१६॥ बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी । श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥१७॥ रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन । परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥१८॥ शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले । परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेंच आले परत ॥१९॥ इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळीं बरोबरी । घेऊन निघाला नागपुरीं । समर्थांसी आणावया ॥२०॥ बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत । त्या गोपाळ बुटीप्रत । येणें रीति तें ऐका ॥२१॥ अरे गोपाळा ! पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं । तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥२२॥ तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार । तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥२३॥ हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला । परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥२४॥ गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी । पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥२५॥ असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत । तों महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥२६॥ चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी । तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥२७॥ समर्थ जाऊं लागले । तें गोपाळाने पाहिलें । अनन्यभावें चरण धरिले । समर्थांचे येऊन ॥२८॥ विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया । दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥२९॥ तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेसी । तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥३०॥ येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज । पंक्तित माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥३१॥ आत्तांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी । आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥३२॥ भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ । शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥३३॥ भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी । दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥३४॥ कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें । परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥३५॥ तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं । माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥३६॥ तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें । ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥३७॥ आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला । अंती जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे तूं ॥३८॥ ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन । त्या सीताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥३९॥ हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी । ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥४०॥ त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें । शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥४१॥ उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार । त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥४२॥ तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून । शेगांवच्या मठा जाण । हरी पाटलासमवेत ॥४३॥ धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत । होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥४४॥ अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं । त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥४५॥ श्रीवासुदेवानंदसरस्वती । कर्ममार्गीं ज्याची प्रीति । कृष्णातटाका ज्यांची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥४६॥ ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार । बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्धयोगी ॥४७॥ अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥४८॥ तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥४९॥ ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥५०॥ एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥५१॥ स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥५२॥ स्वामी येतां चिटकी थांबली । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥५३॥ फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥५४॥ बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां । संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥५५॥ त्यांचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून । ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥५६॥ ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला । बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥५७॥ ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे । हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥५८॥ स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण । तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥५९॥ सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान । या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥६०॥ हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं । तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥६१॥ अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां । म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥६२॥ आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें । भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥६३॥ मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ॥६४॥ दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां । श्रवणीं पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥६५॥ मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्तिमार्गाला ॥६६॥ या अंगासह जो भक्ती करी । त्यालाच भेटे श्रीहरी । भक्तिमार्गाची न ये सरी । त्याचा विधी सोपा असे ॥६७॥ परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण । जेवीं गगनाचें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥६८॥ आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा । या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥६९॥ परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं । योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥७०॥ जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत । त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥७१॥ आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख । धौती मुद्रा त्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥७२॥ कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा । आधी योग करणारांना । तरीच तो साधेल ॥७३॥ या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें । परी तें ज्ञान प्रेमाचें । वीण असतां कामा नये ॥७४॥ मुक्कामास गेल्यावर । मार्गांचा न उरें विचार । जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥७५॥ या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत । मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥७६॥ वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी । अत्री, पाराशर, शांडिल्य मुनी । हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥७७॥ व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर । उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥७८॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र, गोरख, जालंदर । हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥७९॥ जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला । तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥८०॥ आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी । कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥८१॥ जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल । आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥८२॥ आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही । निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥८३॥ ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥८४॥ ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला । प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥८५॥ मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर । वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥८६॥ साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची । ती होती महाराजांची । मनापासून भक्तिण ॥८७॥ तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी । डाळ पीठ घेऊनी । स्वयंपाक करी अहोरात्र ॥८८॥ जे येतील तयांना । साळु घाल भोजना । येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥८९॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥९०॥ खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं । त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥९१॥ पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा । होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥९२॥ हा धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी । तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥९३॥ प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न । गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥९४॥ स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी । हजिरी ती द्यावयासी । श्रीगजाननमहाराजा ॥९५॥ तो वेदविद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता । आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥९६॥ त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती । आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥९७॥ ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान । शेवटीं समर्थांचे सेवेकारण । आत्माराम राहिला आदरेंसी ॥९८॥ प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून । चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥९९॥ समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत । पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुंच्या समाधीची ॥१००॥ मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली । शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥१०१॥ इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर । येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥१०२॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥१०३॥ ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण । ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥१०४॥ मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा । तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥१०५॥ श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत । पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजी नामें माळी होता ॥१०६॥ तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं । गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥१०७॥ उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर । खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥१०८॥ हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त । म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥१०९॥ क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी । अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥११०॥ ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन । महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥१११॥ तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां । म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥११२॥ तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर । रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥११३॥ कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची । उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥११४॥ ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण । तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥११५॥ गाढवांनी रास खाल्ली । नुकसानी पाहिजे पाहिली । खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥११६॥ मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार । वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥११७॥ दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें । उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥११८॥ ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला । दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥११९॥ मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्यवदन । तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥१२०॥ तुम्ही माझे भक्त होतां । मला राखण्या लावितां । झोपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१२१॥ ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणि । मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥१२२॥ ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून । लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥१२३॥ मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें । खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥१२४॥ ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर । आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥१२५॥ ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती । आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१२६॥ छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस । नोकरीवरुन खास । तिमाजी नोकर इमानी ॥१२७॥ ऐसें गुरुवचन ऐकिलें । मारुतीसी चोज जहालें । पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥१२८॥ शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी । असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥१२९॥ तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची । त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥१३०॥ मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर । त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥१३१॥ तो होता हमरस्ता । बाजारपेठेचा तत्त्वतां । त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥१३२॥ नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें । समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१३३॥ तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत । साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥१३४॥ ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला । लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥१३५॥ हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ । ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥१३६॥ वळ पाठपोटावरी । उठते झाले निर्धारी । परी ना हवालदार आवरी । मारता हात आपुला ॥१३७॥ ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून । आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥१३८॥ तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर । उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥१३९॥ कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी । वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ? ॥१४०॥ हें तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें । अजून तरी उघडी डोळें । माफी माग गुन्ह्याची ॥ १४१॥ हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥ १४२॥ तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले । त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥ १४३॥ एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त । होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१४४॥ नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवरा नदीचे कांठावर । तेथें हरी जाखडी असे विप्र । ऐका त्याचा वृत्तान्त हा ॥१४५॥ हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण । गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१४६॥ तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी । बसतां झाला पायांपासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥१४७॥ तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी । येऊनियां पायांपासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥१४८॥ संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण । मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥१४९॥ हे स्वामी गजानना । सच्चिदानंदा दयाघना ! । संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥१५०॥ ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त । थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥१५१॥ पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी । सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥१५२॥ ऐसें आपणासी बोललें । पुन्हां जाखड्यासी पाहिलें । जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥१५३॥ तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून । होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥१५४॥ जा आतां परत घरा । सुखें करी संसारा । करीत असावा परमेश्वरा । आठव वेड्या ! विसरुं नको ॥१५५॥ ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन । दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥१५६॥ हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं । महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥१५७॥ ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसिअरच्या हुद्यावरी ॥१५८॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले कपिलधारा तीर्थासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥१५९॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥१६०॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥१६१॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥१६२॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥१६३॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्थ । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥१६४॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥१६५॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥१६६॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥१६७॥ षोडशाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥१६८॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥१६९॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥१७०॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥१७१॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥१७२॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ? । आपुल्या नांव गांवाला । न सांगतांच गेला कीं ॥१७३॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥१७४॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढमती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥१७५॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥१७६॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । ऐसें बोलूनी झाले गुप्त । चहूंकडे पाहूं लागले निमोणकर ॥१७७॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥१७८॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥१७९॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥१८०॥ जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी । करणें पूजा अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥१८१॥ योगाभ्यास ही समोरी । त्या खड्याच्या आदरें करी । त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥१८२॥ तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडाबहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥१८३॥ एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसी । त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥१८४॥ म्हणून त्यानें समर्थांला । एकदां नवस ऐसा केला । जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥१८५॥ तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करीन अर्पण । मनोरथ त्याचें पूर्ण । केले श्रीगजाननस्वामींनें ॥१८६॥ दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली । आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥१८७॥ तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण । औषधोपचार केलें जाण । परी न आला गुण कांहीं ॥१८८॥ नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली । धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥१८९॥ ती स्थिती पाहून । तुकारामा झाली आठवण । नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥१९०॥ तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया । अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥१९१॥ ऐसा वचनबद्ध होतां क्षणीं । नाडी आली ठिकाणीं । हळुहळुं नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥१९२॥ व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण नामे कुमार । आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥१९३॥ तो नारायण अजूनी । आहे तया ठिकाणीं । बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥१९४॥ असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी । घेऊन हरी पाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥१९५॥ जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती । जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥१९६॥ पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान । गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राऊळीं ॥१९७॥ हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था । हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥१९८॥ तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर । जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥१९९॥ आतां अवतारकार्य संपलें । हें तूं जाणसी वहिले । पुंडलीक वरदा विठ्ठले । जाया आज्ञा असावी ॥२००॥ देवा ! मी भाद्रपदमासीं । जावया इच्छितों वैकुंठासी । अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥२०१॥ ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणि । अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥२०२॥ हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता । अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥२०३॥ महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर । सांगितले तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥२०४॥ तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्या भीतरीं । इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥२०५॥ चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला । तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥२०६॥ पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजी भलें । चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरी पाटलाचें ॥२०७॥ पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला । पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२०८॥ गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी । आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥२०९॥ कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रंथित । चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥२१०॥ त्याची पूजा अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण । दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥२११॥ तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला । या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥२१२॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥२१३॥ हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी । ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥२१४॥ जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले । शरीरवस्त्रांसी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥२१५॥ चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास । बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥२१६॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥२१७॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकी ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥२१८॥ शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारी प्रहर दिवसाला ॥२१९॥ प्राण रोधितां शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥२२०॥ देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्थ पाहून । लोक हळूहळूं लागले ॥२२१॥ पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥२२२॥ गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥२२३॥ अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥२२४॥ मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा, बंकटलाल । ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामींचा जो असे ॥२२५॥ श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी । विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतिं श्रोते हो ॥२२६॥ आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस । हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२७॥ ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल । नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२२८॥ गोविंदशास्त्री डोणगांवचे । एक विद्वान् होते साचे । ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतिं ॥२२९॥ त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी । तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२३०॥ त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया । पहा लोणी ठेवूनियां । येधवां मस्तकीं स्वामींच्या ॥२३१॥ लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं । जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२३२॥ तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलतां । एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२३३॥ निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित । आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥२३४॥ तें अवघ्यांस मानवलें । स्वामींपुढें आदरें भलें । भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥२३५॥ दूरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत । आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥२३६॥ तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला । लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामींचें ॥२३७॥ रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार । सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥२३८॥ मूर्ति ठेविली रथांत । मिरवणूक निघाली आनंदात । रात्रभरी शेगांवांत । तो ना थाट वर्णवे ॥२३९॥ तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळूं लागले । फुलांखाली झाकून गेले । श्रीगजानन महाराज ॥२४०॥ बर्फी पेढ्यांस नाहीं मिती । लोक वांटिती खिरापती । कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥२४१॥ ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगांवी निघून अखेर । उदयास येता दिनकर । परत आली मठांत ॥२४२॥ समाधीच्या जागेवरी । मूर्ति नेऊन ठेविली खरी । रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥२४३॥ पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर । भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नांवाचा ॥२४४॥ जय जय अवलिया गजानना ! । हे नरदेहधारी नारायणा ! । अविनाशरूपा आनंदघना ! । परात्परा जगत्पते ॥२४५॥ ऐशा भजनाभीतरीं । मूर्ति ठेविली आसनावरी । उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणें ॥२४६॥ अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण । ’जय स्वामी गजानन’ । ऐसें मुखें बोलोनी ॥२४७॥ मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी केलें द्वार । बंद भक्तांनी शेवटीं ॥२४८॥ दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ । घेऊन गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥२४९॥ खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा । सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥२५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १८


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थांची भक्तीण असे ॥१॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥२॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥३॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनकजननीला । शोक झाला अनावर ॥४॥ भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी । महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥५॥ तें मानलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी । महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥६॥ बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर । कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥७॥ तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले । अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥८॥ तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला । घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवी ॥९॥ परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं । निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥१०॥ समर्थांचा एक भक्त । पुंडलीक नामें मुंडगांवांत । त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥११॥ पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला । शेगांवांस जाण्याला । पुंडलीकाचे बरोबर ॥१२॥ त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिलें । तेच तिच्या करतील भले । निजकृपेने कल्याणा ॥१३॥ पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी । ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥१४॥ पुंडलीकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी । तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥१५॥ हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें । तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥१६॥ या दोघांचें अंतर । शुद्ध होतें साचार । नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥१७॥ मग भुला शिवराम बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही । चौघे येऊन लागले पायीं । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥१८॥ पुंडलीकासी पाहून । बोलूं लागले दयाघन । कीं बायजा तुझी बहीण । पूर्वजन्मीची पुंडलीका ॥१९॥ लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावे इजप्रती । दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥२०॥ ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मभरी । जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतिं राहिली गे ॥२१॥ तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला । माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥२२॥ ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून । गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥२३॥ घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला । पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥२४॥ भाऊ राजाराम कवर । एक होता डॉक्टर । पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥२५॥ त्यास दुर्धर फोड झाला । आणविलें मोठ्या डॉक्टराला । औषधपाणी करायाला । खामगांवा माझारीं ॥२६॥ नाना औषधें पोटांत दिली । विविध पोटीसें बांधिलीं । शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥२७॥ कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढूं लागला । वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥२८॥ भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी । शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥२९॥ आतां हाच उपाय । आठवावे सद्‌गुरुपाय । याविणें दुसरी सोय । कांही नसे राहिली ॥३०॥ पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्‌गुरुनाथ । या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नको ॥३१॥ ऐसी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं । रात्र गेली उलटोनी । सुमारे समय एकाचा ॥३२॥ तों एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली । गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥३३॥ दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी । डॉक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥३४॥ तों एक उतरला । ब्राह्मण दमणीच्या खालीं भला । दार ठोठावूं लागला । डॉक्टराच्या बंगल्याचें ॥३५॥ डॉक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं । प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥३६॥ ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान । तीर्थ अंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥३७॥ डॉक्टर भाऊ कवराला । जो कां आहे फोड झाला । हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥३८॥ प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत । मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥३९॥ तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण । त्या शोधायाकारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥४०॥ परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला । भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥४१॥ फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा । येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥४२॥ एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार । पाहा किती आहे जोर । समर्थांच्या अंगार्‍याचा ! ॥४३॥ भाऊस निद्रा लागली । व्याधी पुढें बरी झाली । हळुं हळुं शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥४४॥ दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास । माझ्या गाडी बैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥४५॥ हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून । हृदय आलें उंचबळून । त्या भाऊ कवराचें ॥४६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन । लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥४७॥ कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥४८॥ असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं । त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥४९॥ होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार । स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥५०॥ जगू आबा, पाटील हरी । बापुना व मंडळी दुसरी । सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥५१॥ त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार । येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्थ झालासे ॥५२॥ हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादजी पाटलाचा । प्रथम आशीर्वाद झाला याचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥५३॥ म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे । रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५४॥ हरी पाटलाबरोबरी । समर्थांची होती स्वारी । बापुना आणि दुसरी । माणसें पांचपन्नास ॥५५॥ आषाढ शुद्ध नवमीचा । तो दिवस होता साचा । समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥५६॥ तें भूवैकुंठ पंढरपूर । गजबजून गेलें फार । भरती येतां सागर । जेवीं जाय उंचबळोनी ॥५७॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार । श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥५८॥ या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा । भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥५९॥ श्रोते त्या समयाला । समर्थ आले पंढरीला । उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥६०॥ हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं । दर्शनाला भीड खरी । झाली असे राऊळांत ॥६१॥ एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर । बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥६२॥ बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला । म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥६३॥ स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी । दर्शनासी गेली सारी । आत्तांच मंडळी विठ्ठलाच्या ॥६४॥ मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत । राऊळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥६५॥ मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना । केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥६६॥ बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी । कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥६७॥ तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून । तेवीं येई राऊळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥६८॥ तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ । मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥६९॥ ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला । परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥७०॥ मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसाचें उपोषण । बापुनाचे अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥७१॥ शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी । फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥७२॥ बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघे जण । हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥७३॥ याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? । ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥७४॥ ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा । अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कोठूनी ? ॥७५॥ तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत । ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥७६॥ समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना । ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥७७॥ तों महाराज उभे राहिले । कटीं हात ठेविले । पाय खालीं जुळविले । समचरण दावावया ॥७८॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी । बापुनाच्या पडली दृष्टि । शीर ठेविलें पायांवर ॥७९॥ पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी । तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥८०॥ धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला । तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राऊळांत ॥८१॥ पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला । कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥८२॥ संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात । गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥८३॥ काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी । बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥८४॥ याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण । रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥८५॥ पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें । म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥८६॥ कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा । तो वर्‍हाड प्रांताचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥८७॥ तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी । त्या पंढरपूरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥८८॥ पोलिस घरांत शिरती । वारकर्‍याला ओढिती । चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥८९॥ हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी । ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥९०॥ गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी । कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥९१॥ पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत । शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥९२॥ लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥९३॥ तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर । म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥९४॥ लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया । याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥९५॥ अशा स्थितींत ये ठाईं । थांबणें हें कांहीं बरें नाहीं । चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥९६॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? । आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥९७॥ ऐसें वदून जवळ गेले । वारकर्‍याच्या करा धरलें । त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥९८॥ चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता । वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥९९॥ समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त । तईं म्हणाले सद्‌गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥१००॥ तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर । त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥१०१॥ घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळींच्या बरोबरी । चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थांसमवेत ॥१०२॥ आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी । म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥१०३॥ ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार । आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥१०४॥ पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी । मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामींच्या ॥१०५॥ एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन । त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१०६॥ तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती । म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥१०७॥ सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती । खट्टु झाला परम चित्तीं । समर्थांसी पाहातां ॥१०८॥ व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत । हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥१०९॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें । अशा पिशाला म्हणूं लागले । साधु लोक हाय हाय ॥११०॥ तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत । पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥१११॥ त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न । आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥११२॥ त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनिया । येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥११३॥ आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित । कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥११४॥ तें ऐकून रागावला । नीज समर्था बोलूं लागला । अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥११५॥ ऐसें ऐकतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला । आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्या सम ज्ञान नाहीं ॥११६॥ परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर । घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥११७॥ ऐसें बोलून कुत्र्यापासी । येते झाले पुण्यराशी । स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥११८॥ तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर । म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥११९॥ माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा । वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥१२०॥ तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमिवर । करण्या जगाचा उद्धार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥१२१॥ श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली । कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥१२२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १७


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गजाननाचे परमभक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयांचिया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥१॥ चापडगांवचे बापू कृष्ण । खटाऊ शेटाचें कुटुंब जाण । गोंडुलालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥२॥ जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांची नांवे तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥३॥ एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यांनी ठेविला ॥४॥ एक भक्त मलकापुरी । विष्णुसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥५॥ त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥६॥ तो त्या वेळी होता जवळ । करी कारभार अंगे सकळ । विष्णुसाला होते बळ । याच भास्कर पाटलाचे ॥७॥ भास्कर म्हणे मलकापुरी । चला समर्था लवकरी । भक्त विष्णुसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥८॥ मनोरथ येथील भक्तांचे । तुम्ही पुरविले असती साचे । आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥९॥ तई समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा । येत नाही जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१०॥ भास्कर बोले त्यावरी । कांही असो मलकापुरी । चला विष्णुसाचे घरी । हीच विनंती गुरुराया ! ॥११॥ ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन । स्टेशनावरी, मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥१२॥ भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी । बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥१३॥ महाराज तैसेंच बैसलें । ते न कांहीं बोलले । जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥१४॥ तो गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा । डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीति ॥१५॥ जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।  योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥१६॥ आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार । त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥१७॥ मग तो अधिकारी भला । स्टेशनमास्तराकडे गेला । म्हणे डब्यापाशी आतां चला । बायकांच्या माझ्यासवें ॥१८॥ दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें । योगीराज बसलेलें । बायकांच्या डब्यात ॥१९॥ मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीति बोलला । तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥२०॥ हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर । याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हाही ॥२१॥ तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी । मी दिली आहे तार खरी । येविषयी वरिष्ठाला ॥२२॥ आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित । मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥२३॥ स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी । बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥२४॥ तुम्ही खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें । कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥२५॥ महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणें निश्चिती । जठारसाहेबासमोर ॥२६॥ बापूसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर । डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥२७॥ व्यंकटराव देसाई । अकोल्याचे होते पाही । तेही आले त्या ठायी । कांहीं कामानिमित्त ॥२८॥ तैं देसाई म्हणती जठारास । आज कोणता खटला विशेष । तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥२९॥ जठार म्हणालें त्यातें । याचें कारण तुम्हांतें । कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥३०॥ तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून । पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥३१॥ त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं । म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥३२॥ हें ऐकतां भाषण । व्यंकटराव झाले खिन्न । बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥३३॥ श्रीगजाननसाधुची । योग्यता आहे थोर साची । मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥३४॥ तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना । तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥३५॥ जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला । याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥३६॥ कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें । तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥३७॥ त्या शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविले वकिलाला । त्या व्यंकटराव देसायाला । समर्थांसी आणावया ॥३८॥ मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोललें । या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्था धोतर ॥३९॥ ऐसा सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं । तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥४०॥ गेले नागवे कचेरीस । सवें होता भास्कर शिष्य । जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥४१॥ या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत । कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥४२॥ ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून । आणि केलें हास्यवदन । उत्तर त्यासी द्यावया ॥४३॥ तुला काय करणें यासी । चिलीम भरावी वेगेंसी । उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥४४॥ तें ऐकतां भाषण । जठार गेलें विरघळोन । जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥४५॥ हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीवन्मुक्त । नये लावितां याप्रत । गुन्हा विचारे केंव्हांही ॥४६॥ महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित । भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥४७॥ म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला । ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारांपुढें शेगांवीं ॥४८॥ समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हां ऐशा आग्रहासी । करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥४९॥ असो पुढें अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी । बापुरावाच्या सदनासी । जाऊनिया उतरलें ॥५०॥ याच वेळीं यवन जातीचा । साधु महेताबशा नांवाचा । होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरासन्निध ॥५१॥ त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीति । जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥५२॥ अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर । बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥५३॥ तो ऐशा रीती घडून आलें । महेताबशा येण्या निघाले । अकोल्यास याया भलें । समर्थांसी भेटावया ॥५४॥ तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं । त्या मनुष्यालागुनी । महेताबशा श्रोते हो ! ॥५५॥ तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला । आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महेताबशा ॥५६॥ पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून । कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरीं ॥५७॥ महेताबशाच्या संगाते । दोन चार यवन होते । अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥५८॥ दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महेताबशा होता जेथें बसला । महाराज आलें तया स्थळा । निजलीलें करुन ॥५९॥ महेताबशाचे धरुन केस । समर्थांनीं ताडिलें त्यास । त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ॥६०॥ यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण । यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥६१॥ तुझें महेताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव । द्वेषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥६२॥ ऐसा मिळतां इशारा । महेताबशा तोषला खरा । साधुच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥६३॥ जेव्हां महेताबशातें ताडिलें । तईं संगतीचे यवन भलें । कावरेबावरे होते झालें । तो प्रकार पाहून ॥६४॥ महेताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें आम्हांपासी । जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥६५॥ शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून । तों द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥६६॥ म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना । या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥६७॥ दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवुनी समर्थांप्रत । मोठया थाटांनीं मिरवित । निज सदना आणिलें ॥६८॥ परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं । तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥६९॥ त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत । मला समजले इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥७०॥ महेताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरलें । भोजनाचें कां न केलें । महेताबशाला आमंत्रण ॥७१॥ आतां घेऊन दोघांसी । बसवून एका तांग्यासी । म्हणजे ते निश्चयेसी । उभयतांहीं येतील ॥७२॥ तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवित नेलें । महेताबशाला उतरविले । मंदिराजवळील थेटरांत ॥७३॥ श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी । परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥७४॥ अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महेताबशा लोकांस म्हणे । मला तुम्ही तिकिट देणे । पंजाबचें काढून ॥७५॥ तैं शेख कडू बोलला । त्या महेताबशा फकिराला । तुम्ही कुरुमच्या मशिदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥७६॥ तो महेताबशा बोले वचन । समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण । होईल हे सत्य तुम्ही मानावें ॥७७॥ गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला । आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥७८॥ महेताबशा निघून गेले । पुन्हां न इकडे परत आले । या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनी ॥७९॥ धर्माविषयी द्वैत । संताठाई नसतें सत्य ।  तें अवघ्या धर्मांप्रत । समसमान मानिती ॥८०॥ पाहा महेताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी । परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥८१॥ शहालागीं घेतल्याविना । भोजना न गेला योगीराणा । हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टीचे श्रोते हो ! ॥८२॥ असो, या बापुरावाची । कांता एक होती साची । तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥८३॥ या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी । क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥८४॥ भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला । आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥८५॥ खर्चही झाला अतोनात । गुण न आला किंचित । अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजानन स्वामीला ॥८६॥ तुझीं पाऊलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! । तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥८७॥ ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन । केलें निजकृपे करुन । बापुराव कांतेला ॥८८॥ त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची । नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥८९॥ असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत । नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥९०॥ त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी । जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजानन महाराज ॥९१॥ पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले । आंतील जलालागीं भलें । वरच्यावरी श्रोते हो ॥९२॥ पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्ती । नरसिंग महाराज विचारती । अरे हे काय करतोस ? ॥९३॥ गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती । आणखी तीर्थे आहेत किती ? । हें पाहातों डोकावून ॥९४॥ तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ? । या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥९५॥ तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित । श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥९६॥ हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरीं । वर्षू लागले पाहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥९७॥ लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून । नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥९८॥ गंगा यमुना गोदावरी । वरती आली आहे खरी । स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥९९॥ संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी । त्यांच्या वाणीलागुनीं । असत्यता न दे परमात्मा ॥१००॥ स्नान होतां समर्थ उठलें । पाणी पहिल्यापरी झालें । विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥१०१॥ नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन । शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥१०२॥ शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १६


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गजानन माया अघटित । कोण जाणें तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलीक नामें मुंडगांवीं ॥१॥ हा शेगांवची करी वारी । समर्थांविषयीं प्रेम भारी । हमेशा त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥२॥ त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासी बसत नसे ॥३॥ ती बोलली पुंडलीकाला । तुझा जन्म वायां गेला । कां कीं तूं नाहीं केला । सद्‌गुरु तो आपणांतें ॥४॥ गजाननाच्या वार्‍या करिसी । सद्‌गुरु त्याला मानिसी । परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥५॥ तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला । या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥६॥ म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें । केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥७॥ तो भोकरे पुंडलीक । होता मनाचा भाविक । भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥८॥ त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला । जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥९॥ ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण । अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥१०॥ दोघांचा विचार झाला । पुंडलीक रात्री स्वस्थ निजला । तो तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥११॥ पुंडलीकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर । उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥१२॥ पुरुष म्हणे रे पुंडलीका । अंजनगांवासी जातोस कां ? । गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥१३॥ जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशिनाथ । तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥१४॥ कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला । लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥१५॥ मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे । नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलीका पडूं नये ॥१६॥ तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण । ' गण गण ' ऐसे बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥१७॥ आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास । ऐसे ऐकतां पुंडलीकास । आनंद अति जहाला ॥१८॥ पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून । तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥१९॥ पुंडलीक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया । नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥२०॥ बरें ! उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार । पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥२१॥ पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलीक उठून बसला । तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥२२॥ उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना । म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥२३॥ तैसेच उद्या दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी । ऐसे बोलले साक्षात्कारी । त्याचा समजू काय अर्थ ? ॥२४॥ ऐसें नाना तर्क करी । पुंडलीक आपल्या अंतरीं । तो इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥२५॥ पुंडलीक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं । मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥२६॥ मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला । तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥२७॥ तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही । आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥२८॥ झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत । दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥२९॥ तो जेव्हां मुंडगावाला । येण्या परत निघाला । तईं बाळाभाऊला । ऐसे बोलले महाराज ॥३०॥ या पादुका पुंडलीकासी । द्याया देई याच्यापासी । समर्थ आज्ञा होतां ऐशी । तैसेंच केलें बाळानें ॥३१॥ करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा । भोकरे जो का पुंडलीका । तुमच्या गांवींचा असे हो ॥३२॥ त्यास ह्या द्या नेऊन । करावयासी पूजन । तें झ्यामसिंगे ऐकून । पादुका घेतां जाहला ॥३३॥ झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलीक भेटला वेशीत । पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥३४॥ प्रसाद मला द्यावयासी । कांही दिला कां तुम्हापासी ? । हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥३५॥ सवें घेऊन पुंडलीकाला । झ्यामसिंग घेऊनी घरी गेला । खोदून विचारू लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥३६॥ पुंडलीकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची । ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥३७॥ लगेच पादुका काढिल्या । पुंडलीकाच्या हातीं दिल्या । त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥३८॥ दोन प्रहरीं पूजन । पुंडलीकानें केलें जाण । मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥३९॥ एक वाजसनिय ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून । होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥४०॥ या राजारामाप्रती । महाराजांची होती भक्ती । म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥४१॥ या कवराकारण । दोन पुत्र होते जाण । गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥४२॥ कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊ व्यवहारीं बोलती । तो हैद्राबादेप्रती । गेला डॉक्टरी शिकावया ॥४३॥ एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून । त्याचे दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥४४॥ तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं । जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥४५॥ माझ्या आहे ऐसें मनीं । आपणा करावी मेजवानी । आपुल्या आवडीचें करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥४६॥ भाकरी ती जवारीची । कांदा भाजी आंबाड्याची । ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥४७॥ तें ऐकतां बोले त्याची वहिनी । दिराप्रती हास्यवदनीं । यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥४८॥ सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? । कांहीं ना आपुल्या गेही उणें । कृपेनें गजाननाच्या ॥४९॥ मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही । तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥५०॥ भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर । ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥५१॥ भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्‍याचें चून जाण । लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥५२॥ नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला । वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥५३॥ ऐसे नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां । पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥५४॥ तों गाडी बाराची । निघूनिया गेली साची । तेणे चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥५५॥ अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला । म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥५६॥ हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा । माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥५७॥ तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण । तोंवरी महाराजांचे भोजन । होईल ऐसें वाटतें ॥५८॥ ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित । चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥५९॥ कवर गेला दर्शना । तई तो योगीराणा । न करिता भोजना । बसला होता आसनीं ॥६०॥ नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत । पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥६१॥ परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला । वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥६२॥ आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून । आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥६३॥ तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा । भोजन आज चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥६४॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला । समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥६५॥ समर्थांसी नमस्कार । केला साष्टांग साचार । उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥६६॥ त्या भाऊस पाहून । समर्थे केलें हास्यवदन । बरेंच दिलेस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥६७॥ तुझ्या भाकेंत गुंतलो । मी उपोषित राहिलों । नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥६८॥ ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी । कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥६९॥ त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण । एकीचा तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वाटिली ॥७०॥ तो प्रकार पाहातां । आश्चर्य झालें समस्तां । कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥७१॥ भाऊंनीही घेतला । समर्थप्रसाद शेगांवला । सद्‌भाव जेथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥७२॥ समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी । पास होशील पुढचे वर्षी । तूं डॉक्टरी परीक्षेत ॥७३॥ भाऊ म्हणे गुरुराया । आपली असूं द्यावी दया । यावीण दुसरें मागावया । मी न आलो ये ठायीं ॥७४॥ आपुले हे दिव्यचरण । हेच माझें धनमान । सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचे ॥७५॥ ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला । समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥७६॥ शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार । एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥७७॥ घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं । अस्तमानाचे अवसरी । दर्शना यावें मठांत ॥७८॥ चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन । कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतातें ॥७९॥ जें जें असेल दैवात । तें तें श्रोते घडून येत । एके दिनी शेतात । असतां तुकाराम आपुल्या ॥८०॥ तो एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी । नेम धरून ससे मारी । छर्रे घालून बंदुकींत ॥८१॥ तुकारामाच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला । ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्‍याच्या दृष्टीसी ॥८२॥ त्याची शिकार करण्या भली । शिकार्‍यानें आपुली । नेम धरून झाडीली । खांद्यावरील बंदुक ॥८३॥ त्यायोगें ससा मेला । एक छर्रा लागला । त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥८४॥ छर्रा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर । थकले अवघे डॉक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥८५॥ कांहीं केल्या निघेना । छर्रा तो डॉक्टरांना । होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥८६॥ ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत । तो समर्थांचा एक भक्त । ऐसे बोलला तयाला ॥८७॥ डॉक्टर वैद्य सोडा आतां । साधुचिया सेवेपरता । नाहीं उपाय कोणतां । उत्तम या जगांमध्यें ॥८८॥ कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास । झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥८९॥ तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरू केलें । अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥९०॥ ऐसी चौदा वर्षें झालीं । तुकारामाची सेवा भली । तई गोष्ट घडून आली । ऐशा रीति श्रोते हो ॥९१॥ झाडतां झाडतां कानांतून । छर्रा पडला गळून । जैसी कां ती भोकरांतून । दाबितां सुटे आंठोळी ॥९२॥ तैसे साच येथें झालें । छर्रा पडतां थांबलें । दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥९३॥ ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची । प्रचीतिवीण कवणाची । परमार्थी न निष्ठा बसे ॥९४॥ ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर । संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥९५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १५


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर । दूरदृष्टीचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१॥ वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें । धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥२॥ कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली । ती न त्यांना कोणी दिली । ऐसा होता बहाद्दर ॥३॥ तो एके वेळी अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला । लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्यायाकारणें ॥४॥ झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची । मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥५॥ दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान बडेबडे । जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥६॥ अध्यक्ष त्या उत्सवाचें । नेमिले होते टिळक साचे । नांव ऐकतां टिळकांचे । वर्‍हाड सारें आनंदलें ॥७॥ आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा । आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥८॥ अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीले । स्वयंसेवक तयार झालें । तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीति विबुध हो ॥९॥ या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला । श्रीस्वामीसमर्थ गजाननाला । म्हणजे दुधात साखर पडेल कीं ॥१०॥ शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा । समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥११॥ टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई हृदयरत्‍न । त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थांचेच विबुध हो ॥१२॥ ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें । ज्या न रुचलें ते बोललें । उघड उघड येणें रीति ॥१३॥ तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां । तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥१४॥ कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगले । गजाननाचीं पाऊलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥१५॥ खरेंखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असती एक । तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥१६॥ ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली । आमंत्रण तें द्याया भली । सभेचे श्रीगजानना ॥१७॥ येतांच दादा खापर्ड्यासी । बोलते झाले पुण्यराशी । आम्ही येऊ सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥१८॥ वेड्यापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं । सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥१९॥ स्नेही त्या टिळकांचा । अण्णा पटवर्धन नांवाचा । शिष्य नरसिंह सरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥२०॥ त्या दोघा पुरुषा पाहण्यांस । आम्ही येऊं अकोल्यास । तें ऐकतां खापर्ड्यास । अती आनंद जाहला ॥२१॥ पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा । यानें वृत्तांत जाणिला सारा । जो कां झाला अकोल्यात ॥२२॥ यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें । खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ॥२३॥ मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला । चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥२४॥ शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं । वर्‍हाडप्रांती अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपात ॥२५॥ सण अक्षयतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा । परी समुदाय जनांचा । मिळतां झाला प्रचंड ॥२६॥ मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला । म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥२७॥ परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बैसलें मंडपामधीं । साधू आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥२८॥ सभेमाजी उच्चस्थानीं । बसले होते कैवल्यदानी । गादीस लोडा टेकूनी । जीवन्मुक्त साधुवर ॥२९॥ सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकांस दिली होती जागा । त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥३०॥ आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार । त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥३१॥ सभेलागीं आरंभ झाला । हेतू प्रथम निवेदिला । मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥३२॥ " दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन । स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥३३॥ त्या धनुर्धर योद्ध्याची । वीर गाजी शिवाजीची । जन्म जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालो ॥३४॥ त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला । म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥३५॥ तेवीच आज येथे झालें । आशीर्वाद द्याया आलें । श्रीगजानन साधु भले । आपुलिया सभेस ॥३६॥ स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला । स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥३७॥ यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न । ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥३८॥ ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती । ते शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकाला ?" ॥३९॥ ऐसे टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले । गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पाहा ॥४०॥ अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत । ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥४१॥ सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली । खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥४२॥ भूपतीनें टिळकाला । एकशे चोवीसाखालीं धरिला । दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥४३॥ राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें । वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकांस्तव ॥४४॥ प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची । त्यांनीं पारमार्थिक उपायांची । केली योजना एक अशी ॥४५॥ खापर्डे अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरी । बोलते झाले ऐशापरी । ते थोडके सांगतो ॥४६॥ तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी । सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥४७॥ लगेंच बसला गाडीत । कोल्हटकर टिळकभक्त । येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥४८॥ तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते । तीन दिवस जाहलें पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥४९॥ चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झालें । तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥५०॥ ही मी देतो भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥५१॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥५२॥ ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर । समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥५३॥ ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खावयाला । वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥५४॥ तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत । स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पाहा ॥५५॥ यश तुमच्या प्रयत्नांसी । येणार नाहीं निश्चयेंसी । आपली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळील ना ॥५६॥ माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी । ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हे गूढ एक ॥५७॥ भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन । आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥५८॥ प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी । दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥५९॥ झाली शिक्षा टिळकांस । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास । तेथे जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥६०॥ हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्ते खरी । मान जगद्‌गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥६१॥ स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐसी कीर्ति टिकते । पाहा करुन चित्तात । पूर्णपणें विचार ॥६२॥ यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥६३॥ असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्पावन जातीचा । श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥६४॥ तो कॉलेजात गेला । परी इन्टर नापास झाला । म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रे वाचीत ॥६५॥ तो 'केसरी' पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र । तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥६६॥ आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला । उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥६७॥ परी द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत । घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥६८॥ तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी । जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥६९॥ त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला । तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥७०॥ चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला । त्या करवीर कोल्हापूराला । इकडे उन्हाळा विशेष ॥७१॥ दोघे बसले गाडीत । समर्थांची ऐकून कीर्त । उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥७२॥ दोघें आलें मठात । समर्थां केलें दंडवत । बैसते झाले जोडून हात । स्वामींचिया सन्मुख ॥७३॥ मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा । म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेड्या करुं नको ॥७४॥ अवघेच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिकशास्त्रात । सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥७५॥ त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं । कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥७६॥ ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे । बोलणे याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥७७॥ ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी । हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठे जाऊ नको ॥७८॥ योगशास्त्र जमल्यास करुन पाही । कोठे न आतां जाई येई । ऐसें समर्थ बोलतां पाहीं । श्रीधर चित्तीं आनंदला ॥७९॥ एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन । कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळें ॥८०॥ महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही । कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥८१॥ जा आतां मित्रासहित । आपुल्या कोल्हापुराप्रत । तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥८२॥ श्रीधर बी.ए., एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपॉल त्या नेमिलें । शिवपुरी कॉलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥८३॥ संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर । त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥८४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥