Jul 30, 2019

श्री स्वामी समर्थ - आरोग्य कवच


न चित्त कधीही चळों, नच कधी निराशा कळों I

समर्थ जय जय समर्थ जपता दिलासा मिळों II 

विशुद्ध मन राहू दे सतत या उभ्या जीवनी I

समर्थ जय जय समर्थ जप हा वसो तन-मनीं II

न रोग-व्याधी जडो न च पिशाच्चबाधा जडो I

न घात अपघात हो सकळ दुर्मतीही झडों  II

किती जडविल्या मना विषय वासना अंत ना I

समर्थ जय जय समर्थ जपता उरे अल्प ना II

झणी उसळतो किती राग हा पहा अंतरी  I

समर्थ जय जय समर्थ जपतां विझे लवकरी II 

सुटे नच तुटे कधी सतत वाढतां लोभ हा I

समर्थ जय जय समर्थ जपतां विरे हा पहा II

सदैव मी आंधळा मजसि मोह ग्रासें पुरा I

समर्थ जय जय समर्थ जपतां निरासे पुरा II

मदांध गज मी जणू उधळितो बळें जीवनी I

समर्थ जय जय समर्थ जपतां शांत हो मनी II

तुडुंब मन हे भरे मत्सरे विनाकारणे I

समर्थ जय जय समर्थ जपतां पडे त्या उणें II

असे षडरिपू मला छळती पोळती अंतरी I

समर्थ जय जय समर्थ जपतां शमती सत्वरी II


रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर




श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ४


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । कृष्ण योगेश्वराय नमः । साईनाथ नमोस्तुते ॥१॥

साईनाथ आणि स्वामी । यांत भेद न करा कुणी । विनवितो मी जोडुनी पाणि । आपुल्याची हितास्तव ॥२॥

देवता वंदन केल्याविण । कार्या प्रारंभ न करी मन । आशीर्वाद असल्याविण । यश कैसेनि येईल ॥३॥

माझिया करवी ग्रंथलेखन। करोनि घेणे तुम्ही पूर्ण । समजेन मी भाग्यवान । नातरी माझे जिणे वृथा ॥४॥

यास्तव प्रार्थी पुनः पुन्हा । स्पर्शुनी तुझ्या दिव्य चरणां । विलंब न करी दयाघना । भक्त-कामना पुरवाया ॥५॥

आहेस तूं करुणासमुद्र । करशील तूं आमुचे भद्र । कशास घेऊ शंका अभद्र । होईल कैसे म्हणोनिया ॥६॥

जय जय प्रभो स्वामिराया । आरंभितो चरित्र गाया । मलिन मन्मना उद्धराया । मार्ग मातें सुलभ गमे ॥७॥

श्रवण करावे श्रोतेजन । घडले जे जे वर्तमान । जाया निघता स्वामी, जन । जय जयकारे गर्जती ॥८॥

वायुवेगे यति चालती । भक्त त्यांसी गाठू न शकती । चालता चालता गुप्त होती । ऐसे घडले अपूर्व ॥९॥

दाही दिशा जन शोधिती । परंतु स्वामी नच भेटती । योगेश्वरांची अपूर्व रीती । बघता स्तंभित होती मुनी ॥१०॥

स्मरणपूर्वक वंदुनी यती । परतोनि मागे ऋषी जाती । परस्परांसी प्रश्न करिती । पुनश्च केव्हा भेटतील ? ॥११॥

हिमनगाच्या पायथ्याशी । स्वामी येता दिसे त्यांसी । मौन पाळूनी उग्रतपी । तपाचरण तो करीत असे ॥१२॥

हेतू तयाचा दत्तदर्शन । घडावे आपणा तप करोन । उग्र-उग्रतर योगसाधन । यास्तव तेणे चालविले ॥१३॥

समीप दिसता गुहा एक । स्वामी प्रवेशले निःशंक । व्याघ्रजोडी तिथे एक । गर्जत येई सामोरी ॥१४॥

इकडे तपस्व्यां स्वप्न पडले । दिव्य मूर्तीस पाहियले । कर जोडुनी पद वंदिले । विनम्र भावे अत्यंत ॥१५॥

वदे काय मी करु सेवा । आपुली आज्ञापिणे देवा । जन्म माझा सार्थकी लावा । हीच प्रार्थना तुम्हांसी ॥१६॥

दिव्य मूर्ती वदे त्यांसी । हेतू आपला साधावयासी । सांगतो ते करायासी । असावे आपण सुसिद्ध हो ॥१७॥

बोल ऐकता अति हर्षला । आलिंगिले पदकमलां । साश्रु नयनें तयां वदला । असे सिद्ध मी सुनिश्चित ॥१८॥

संतुष्ट झालो तव उत्तरे। सांगतो ते करणे त्वरे । विलंब करिता कार्य अपुरे । राहील ऐसे सांगतो ॥१९॥

सन्निध येथे असे गुहा । तींत स्वामी वसती महा । शरण त्यांसी जाऊनी पहा । तेचि असती दत्तात्रय ॥२०॥

नृसिंहस्वामी त्यास वदती । सामर्थ्यासी नसे मिती । कृपा केलिया तुझे वरती । परम भाग्य तव जाणावे ॥२१॥

सांगोनि ऐसे गुप्त झाले । मानसीं मुनी संतोषलें । भाग्य थोर ते फळा आले । हर्षातिरेके बोलती ॥२२॥

ऐकता स्वप्निंचा संदेश । आनंदले यति-मानस। शरण केव्हा मुनिपदांस । जाईन ऐसे म्हणे झाले ॥२३॥

निशा संपता त्वरे उठला । प्रातर्विधी उरकोनि सजला । स्नान, संध्या करोनि नमिला । भगवान श्रीसूर्यनारायण ॥२४॥

अधिर जाहला यतिदर्शना । घेवोनिया फळे फुलांना । करित स्वमनीं तर्क नाना । गुहेसन्निध पातला । २५॥

समिप येता गुहेपाशी । पाहिले त्यानें दो व्याघ्रांसी । व्याघ्रे देखितां तपस्व्यासी । गर्जती ते भयंकर ॥२६॥

व्याघ्रगर्जना पडे कानीं । मुनी पळे ते स्थल त्यागुनी । व्याघ्रस्वरुपे मृत्यु धावुनी । येतो ऐसे वाटले त्या ॥२७॥

अहो, थांबा ऐसा ध्वनी । पळता पळता पडे कानीं । बघती मागे धीर धरुनी । तोंचि देखिले अति नवल ॥२८॥

गुहेच्या त्या मुखापाशी । महान तेजस्वी मूर्तीसी । देखता थांबले विजनवासी । अद्‌भूताश्चर्य वाटले ॥२९॥

उभारोनी उभय बाहू । स्वामी पाचारिती बहू । या या इकडे नका भिऊ । व्याघ्र काही करिती ना ॥३०॥

अभय मिळता आनंदले । त्वरित जाउनी पद वंदिले । नेत्राश्रूंनी अभिषेकिले । पवित्र ऐशा गुरुचरणां ॥३१॥

सस्मित वदनें यति बोलती । न धरा कसली मनी भीति । तपःसाधनी थोर प्रगती । होईल संशय न धरावा ॥३२॥

परब्रह्म ते एक सत्य । इतर माया, मोह असत्य । ईशचिंतनीं असणे रत । हेचि तुम्हा सांगतसे ॥३३॥

व्याघ्र तोंची पदीं लोळती । यतिवर्य त्यांते गोंजारिती । प्रेमें तयांसी थोपटती । वदती त्यांसी उठा, उठा ॥३४॥

व्याघ्रांसि वदती महा मुनी । विद्धान होता विगत जन्मीं । अहंकारी मत्त दुर्गुणी । वर्तता शापिता जाहला पशू ॥३५॥

पशूंवरी त्या कृपा केली । गत जन्मीची स्मृती दिधली । मनुष्यवाणी त्यां अर्पिली । व्यक्त मानस करावया ॥३६॥

पश्चात्तापे व्याघ्र वदती । अपराध आमुचे बहुत असती । पशुयोनीतुन करा मुक्ति । शरण येतसो उद्धारा ॥३७॥

पश्चात्तापे शुद्ध झालां । बघुनी आम्हा हर्ष झाला । विद्वानकुळी जन्म तुम्हाला । लाभेल जाणा सुनिश्चित ॥३८॥

विद्वान आणि श्रीमान । निजवर्तने संतुष्ट जन । कीर्ति परिमलें भरेल भुवन । कराल तुम्ही संतसेवा । ३९॥

हर्षतिरेके गर्जले दोन्ही । श्रीपदकमलां चाटिलें त्यांनी । दयावंत त्यां वदती मुनी । सत्वर गती पावाल ॥४०॥

जाता निघोनी व्याघ्र दोन्ही । मुनि वंदिती कर जोडुनी । अगाध देवा असे करणी । पूर्वी कदापि पाहिली ना ॥४१॥

अत्यादरे सद्‌गुरु नमिला । गुरुने माथा कर ठेविला । दत्तदर्शन ते तुम्हाला । घडेल निश्चित सांगतो ॥४२॥

दिव्य जाहला चमत्कार । प्रकाश पडला सभोवार । भगवान श्रीदत्त योगेश्वर । साक्षात प्रकटले तेथेची ॥४३॥

जन्मजन्मांतरीचे ध्येय । सफल होता धरिले पाय । कृपावंत मज भेटली माय । नेत्रीं घळघळां प्रेमाश्रू ॥४४॥

साष्टांग नमने गुरु वंदिले । फल-पुष्पांनी पद पूजिले । स्तोत्रे गाउनी तयां स्तविले । प्रसन्न भगवान दत्तात्रय ॥४५॥

हर्षतिरेके तो मुनिवर । करु लागला जयजयकार । धन्य जाहलो मी पामर । आजला की दत्तदर्शने ॥४६॥

हिमनग त्यजुनी यति निघाले । जगन्नाथ या क्षेत्रीं आले । प्रातःसमयीं जाऊनी भले । घेती दर्शन देवाचे ॥४७॥

अति तेजस्वी मुखमंडल । गौरकाया अतिकोमल । आजानुबाहू नेत्र विशाल । रसाळ वाणी जणु अमृत ॥४८॥

जन आश्चर्ये बघती तयां । प्रेमे लागले पुसावया । प्रत्यक्ष ईश्वर गमले जयां । वोळंगती तें चरणांवरी ॥४९॥

अभयदानें उठविती जनां । मृदुभाषणे बोध नाना । जैसा जयाचा भाव त्यांना । त्या त्यापरी उपदेशिती ॥५०॥

धर्मशाळेमधीं येती । रुग्ण तेथे चार दिसती । अस्थिचर्म ती स्थिती बघती । येत करुणा करुणार्णवा ॥५१॥

जिवंत किंवा असती मृत । संशय ऐसा जनां येत । निशिदिनीं असती असे येथ । तोंड वासुनी जन सांगती ॥५२॥

सहाय्यहीन ती त्यांची स्थिती । बघुनी द्रवली यतिमूर्ती । जाऊनी संन्निध कर ठेविती । रुग्णमाथी तो प्रेमळ ॥५३॥

मायास्पर्शे रुग्ण वदती । कोण रक्षील आम्हांप्रती । मरणासन्न आमुची स्थिती । धाव पाव रे नारायणा ॥५४॥

नको नको रे हे जीवन । याहुनी गमे गोड मरण । परलोकीं ने रघुवंदन । विलंब आता न करावा ॥५५॥

यतिवर्य त्यांते गोंजारिती । ममतेचे त्यां शब्द वदती । स्पर्शे शुद्धीवरी येती । उठोनि बसले तात्काळ ॥५६॥

अहाहा ! देवा तुम्ही कोण । बघतां वंदिले यतचिरण । प्रत्यक्ष गमतां नारायण । यतिवेषे कीं आलाती ॥५७॥

महत्भाग्ये हे दर्शन । अश्रूंनी न्हाणिले यती-चरण। तयां मस्तकीं कर ठेवुन । अभय देती स्वामी तयां ॥५८॥

अन्नपाण्याविण उपाशी । परि न पुसिले कुणीं त्यांसी । उपचाराची बात कशाशी । लोक जाती दुरी ॥५९॥

स्वामीकृपेने पुनर्जन्म। लाभता झाला हर्ष परम । तोंचि दरवळे वास घमघम । सुग्रास ऐशा अन्नाचा ॥६०॥

अत्याग्रहे यतींद्रांसी । चला वदती भोजनासी । पावन करा पामरांसी । पंक्तिलाभे आपुल्या ॥६१॥

मुनींद्र वदले रुग्णांसी । चला सवे भोजनासी । शंका न धरा निजमानसीं । सर्व यथोचित होईल ॥६२॥

आपुली आज्ञा वदोनि उठले । स्वामींसवे भोजना बसले । षड्रसान्नें तृप्त झाले । आकंठ करिती भोजन ॥६३॥

सर्व लोकां आश्चर्य गमले । अरे हे कैसे जगले, जेवले । स्वामीकृपेचे फल हे भले । स्वामी न दिसती सामान्य ॥६४॥

भोजन करुनी पंक्ती अनंत । विडे, दक्षिणे जाहले तृप्त । उच्चासनीं यतींद्र स्थित । जाहले लोकाग्रहास्तव ॥६५॥

स्वामी बैसती आसनावरी । मंजूळ वाद्ये वाजती दारीं। पुष्पे, फळे आणुनी सारी। दिव्य पूजा करिती तदा ॥६६॥

परिमल द्रव्ये उधळिती फुले । आसंमती गंध दरवळे । जयजयकारे नभ कोंदले । ऐसा करिती महोत्सव ॥६७॥

लोक घालुनी लोटांगण । विनम्र भावे कर जोडुन । स्वामींस पुसती कोण आपण । नाम कळावे अज्ञ जनां ॥६८॥

सुहास्य वदनें सांगती स्वामी । आमुचे नाम नृसिंहस्वामी । आलो कर्दळीवनांतुनी । जात आहोत यात्रेसी ॥६९॥

करा निश्चये नाम साधन । सत्कर्मे मिळवा सदैव धन । वर्तनें तोषवा संत-सज्जन । हेचि तुम्हा सांगणे असे ॥७०॥

स्वामी उठता जावयासी । अळवणी बुवा अति त्वरेसी । पदंघ्रिकमळी निज शिरासी । ठेवुनी वदती नम्रत्वे ॥७१॥

दिलाति मातें पुनर्जन्म । विसरेन कैसे आपुले नाम । ध्यान धरितां, स्मरता नाम । दर्शन आपुले नित्य घडो ॥७२॥

बुवांसि स्वामी आश्वासिती । पूर्ण होईल आस वदती । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती । धारण करुनी असणे सदा ॥७३॥

अळवणीबुवा वृद्ध अती । ऐकतां अंतरीं आनंदती । धन्य धन्य मी असे वदती । जन्मसाफल्य जाहले ॥७४॥

बुवा जाणती योगक्रिया । वेदविद्याही प्रसन्न जयां । ईशदर्शना झिजविती काया । अन्य काही न जाणती ॥७५॥

आज्ञा घेवोनि स्वामींची । वाट धरिली बडोद्याची । कीर्तनें गायली समर्थाची। महती तयांनी आजन्म ॥७६॥

ऐसे कृपाळू स्वामिराज । दुर्बळांचे करिती काज । दुर्मीळ ऐसे महंत आज । भाग्यवंत ते अळवणी बुवा ॥७७॥

लोक दाटले सभोवार । जन्मांध आणिला श्रींसमोर । मस्तक ठेवुनी चरणांवर । अंध करी प्रार्थना कीं ॥७८॥

देवा आपुले दिव्य रुप । पहावेसे वाटते खूप । जन्मांधत्व हे महापाप । आड येते कैसे करु ॥७९॥

रुदन ऐकुनी देव द्रवले । तयाच्या नेत्रीं फिरविले । अंधत्व ते लया गेले । घडले सर्व विलक्षण ॥८०॥

जन्मांधा लाभे दिव्य दृष्टी । नेत्रांपुढे दिसे सृष्टी । आजन्म जो असे कष्टी । हर्षातिरेके नाचे तो ॥८१॥

अहाहा स्वामी धन्य झालो । अपूर्व दर्शन करुं शकलो । नातरी असतो वृथा मेलो । किड्या, मुंग्यासारिखा ॥८२॥

आपण प्रत्यक्ष जनार्दन । वदुनी घातले लोटांगण । केले आपण कृपादान । हेचि माझे महत्भाग्य ॥८३॥

सभेंतुनी श्री जात असतां । एक घडली नवल वार्ता । गलितांग अशा वृद्ध आर्ता । सदुपदेशे जागविती ॥८४॥

सभेतल्या त्या मार्गावरी । वृद्ध जर्जर ये समोरी । श्रींस जोडुनि कर, विचारी । दया मजवरी कराल का ॥८५॥

वृद्धा, तुजला हवे काय?। ईश्वरलाभास्तव उपाय । ब्रह्मविद्येचे ज्ञान गुह्य । काय हवे ते मागावे । ८६॥

वक्र काया, स्वर कंपित । साश्रु नयनें वृद्ध वदत । माझी भार्या दिवंगत । भेटेल काहो स्वप्नांतरी ॥८७॥

होती जिवाची ती जिवलग । मृत्यु करी अम्हां विलग । उदास तेणे मज हे जग । निद्रानाशे पीडलो मी ॥८८॥

स्वरुपे होती अति सुंदर । वक्तृत्व होते मनोहर । पाकक्रियेंत कुशल फार । नाम सगुणा होते तिचे ॥८९॥

अशी वृद्धाची प्रेमांधता । बघुनी द्रवले हे ऐकता । विसरलात का मजसी आता । परंतु वृद्धा तुज जाणतो ॥९०॥

वदतां काय तुम्ही स्वामी । कधी न भेटलो या जन्मीं मी । ऐसे असोनी जाणता नामीं । हे तों आश्चर्य वाटते ॥९१॥

तुजला स्मृती या जन्मीची । मजला स्मृती गत जन्मीची । होतास माझा भक्त तूंची । आप्पा तेली म्हणोनिया ॥९२॥

इह जन्मांतील खुणा त्यांना । कथन करिती यती नाना । स्तंभित झाला पटले मना । म्हणे आपण असामान्य ॥९३॥

वृद्धा तुझी रे येते दया । सोडणे आता मोह-माया । विसर आता विगत जाया । ईश्वर नामीं रत होई ॥९४॥

काळ उरला नसे फार । प्रभुसेवेचा ध्यास थोर । घ्यावा आपण अति सत्त्वर । तरिच सद्‌गती पावाल ॥९५॥

थरथर कापे विकल काया । तरिही स्मरे विगत जाया । कृपा न केलिया जाईल वाया । स्वामी अंतरीं कळवळले ॥९६॥

प्रेमार्द्रतेचा सदुपदेश । अज्ञानग्रंथींचा करी नाश । सर्व तोडिला मोहपाश । सावध झालो उपदेशे ॥९७॥

स्वामी चरणी घातली मिठी । वदें रक्षिले श्रीजगजेठी । रामनामाविणे ओठी । दुजी गोष्ट ना वदणार ॥९८॥

ऐकोनि स्वामी आनंदले । होईल आतां तुमचे भले । पश्चात्तापे दग्ध झाले । दोष तुमचे सर्वही ॥९९॥

श्रीरंगी रंगता चित्त । वासनाक्षय हो निश्चित । मोक्ष लाभेल पावता अंत । खंत आता न करावी ॥१००॥

सर्व जनां सांगती प्रेमे । विवेके करा नित्य कर्मे । भजन पूजन करा नेमे । त्यांत कल्याण सकलांचे ॥१०१॥

लोक गर्जती जयजयकार । फुले वर्षिती स्वामींवर । बघतां बघतां योगेश्वर । दिसेनासे जाहलें ॥१०२॥

ऐसा स्वामींचा अवतार । लोक करिती आश्चर्य थोर । पुढिल अध्यायीं कथा मधुर । सावचित्त व्हा ऐकाया ॥१०३॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यातला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०४॥

॥ श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु ॥


सौजन्य : https://www.transliteral.org/


Jul 18, 2019

श्री साई चरित्रामृत - १


||श्री गणेशाय नमः ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः | गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः||

|| श्री सद्गुरू साईनाथाय नमः ||


विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांचे " भारत म्हणजे महामानवांचा सागर ! महान पुण्यतीर्थ ! " हे वाक्य किती यथार्थ आहे. त्यातही महाराष्ट्रास ज्ञानदेवादी संत महात्म्यांची थोर परंपरा आहे. " ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होतो, त्या त्या वेळी मी पुन्हा धर्मस्थापना करण्यासाठी स्वतः जन्म घेतो." असे भगवंतांनी भगवदगीतेत वचन दिले आहे. तसेच भागवत पुराणांत संत हे माझीच प्रतिमा आहेत हे भगवान श्रीकृष्णांनी वारंवार सांगितले आहे. आधुनिक संत चूडामणी श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज हे जगभर मान्यता पावलेले दैवत आहे. ह्या महान अवतारी विभूतीच्या अवतारकार्याचा संपूर्ण ठाव लागणे केवळ अशक्यच ! श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर ऊर्फ हेमाडपंत विरचित ' श्री साई सच्चरित्र ' ह्या पवित्र ग्रंथात श्री साईनाथांच्या अनेक लीलांचा समावेश केला आहे. प्रत्यक्ष स्वतः श्री साईनाथांनी हेमाडपंतांस ह्या अत्यंत प्रभावशाली  ग्रंथलेखनाची साशीर्वाद अनुमती दिली होती. ह्या ग्रंथरचनेच्या प्रेरणेविषयी हेमाडपंत लिहितात : 

वर्षानुवर्षे बाबांची लीला । पाहोनि लागला मनासी चाळा । बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा । भोळ्या प्रेमळांकारणे ।।

होऊनिया प्रत्यक्ष दर्शन । निवाले नाहींत ज्यांचे नयन ।तयांसी बाबांचे माहात्म्यश्रवण । पुण्य पावन घडावे ।।

अशी ग्रंथलेखनाची इच्छा झाली तरी साईनाथांचा आशीर्वाद लाभल्याखेरीज हे लेखन निर्विघ्न होणार नाही हे जाणून हेमाडपंतांनी माधवराव देशपांडे यांस बाबांची अनुज्ञा घेण्याची विनवणी केली. त्यानुसार माधवरावांनी बाबांची प्रार्थना करताच साईनाथांनी त्यांचा भावार्थ जाणून " कथावार्तादि अनुभवांचा ।संग्रह  साचा करावा ।। दफ्तर ठेवा बरे आहे ।त्याला माझें पूर्ण सहाये । तो तर केवळ निमित्त पाहें  । लिहावें माझें मींचि कीं ।।" असा ग्रंथरचनेस आशीर्वाद दिला. आपल्या चरित्र गाथेबद्दल साईनाथ आश्वासन देतांना सांगतात, 

वरी एक सांगतो शामा । प्रेमें घेईल जो मन्नामा ।तयाच्या मी सकळ कामा ।पुरवीं प्रेमा वाढवी ।।

मग जो गाई वाड़ेंकोडें । माझें चरित्र माझें पवाड़े ।तयाचिया मी मागें पुढें ।चोहिंकड़े उभाचि ।।

कोणीही केल्या माझें कीर्तन । तयासी देईन आनंदघन ।नित्य सौख्य समाधान ।सत्य वचन मानावे ।।

जो मजलागी अनन्य शरण । विश्वासयुक्त करी मदभजन । माझें चिंतन माझे स्मरण । तयाचे उद्धरण ब्रीद माझें ।।

सारांश, हा ग्रंथ साईनाथ महाराजांच्या प्रसादाचे फळ आहे आणि भाविकांना आजही ह्या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केले असता निश्चितच प्रचिती येत आहें. 

अशाच काही कथांचा आपण ह्या साई चरित्रामृतात आस्वाद घेऊ या.   


साईबाबांचे शिरडीस प्रथम आगमन 


साईबाबा इ .स. १८५४ च्या सुमारास शिरडीस प्रथम दृष्टीस पडले ते तेथील निंबवृक्षातळीं ! शिरडीची एक ग्रामवासी, नाना चोपदाराची वृद्ध आई यांनी बाबांविषयी सांगितले होते की साधारण १६ वर्षांचा एक अतिशय तेजस्वी,गोरा-गोमटा आणि देखणा तरुण निंब वृक्षाखाली बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. 

पाहुनि सुंदर बाळरूप ।लोकां मनी विस्मय अमूप । कोंवळ्या वयांत खडतर तप । शीत आतप समसाम्य ।।

वय कोंवळे नवल स्थिती । ग्रामस्थ सकळ विस्मय पावती । गावोगावींचे लोक येती । दर्शननिमित्ती मुलाच्या ।।

त्यावेळीं बाबांचे तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून सर्व जन आश्चर्यचकित होत असत. दिवस-रात्र, ऊन-पाऊस कशाचीही पर्वा न करतां बाबा निंबवृक्षाखालीच अहर्निश वास्तव्यास होते. त्यांचे ते गोमटे रूप पाहून सर्वांच्या अंतरी प्रेम दाटत असे. 

बाह्यात्कारीं दिसे पोर । परी कृतीने थोरांहुनी थोर । वैराग्याचा पूर्णावतार । आश्चर्य फार सकळिकां ।।

मूर्तिमंत वैराग्याची ती बालमूर्ती पाहून हे आहेत तरी कोण ? कोणत्या पवित्र कुळांत ह्यांचा जन्म झाला असेल बरें ? ह्यांचे माता - पिता, गाव तरी कुठले असेल ? असे प्रश्न शिरडीवासियांस पडत होते. 

आणि एके दिवशी खंडोबाचे वारे अंगात आलेल्या दोघां-चौघांना लोक ह्या बालमूर्तीबद्दल विचारू लागले. देवाने सांगितले, " कुदळी आणा आणि ह्या ठिकाणी खणा, म्हणजे तुम्हांला या पोराचा ठावठिकाणा मिळेल." खंडोबारायानें सांगितल्याप्रमाणें निंबातळीं खणल्यावर तेथे विटांचा थर आढळला. त्याखाली असलेली जात्याची तळी दूर सारल्यावर खाली भुयारांत एका गोमुखी पाटाभोवती चार समया तेवत असलेल्या आढळल्या. ह्या स्थळीं ह्या मुलाने बारा वर्षे तप केले आहे, असे देवाने गावकऱ्यांस सांगितले. याबाबत लोकांनी खोदून खोदून विचारले असतां, 

बाबा म्हणे हें माझ्या गुरूंचे स्थान । अति पवित्र हे माझे वतन । आहे तैसेचि करा हें जतन । माना मदवचन  एवढें ।।

गुरुवार आणि शुक्रवारी । सूर्यास्ती सारवूनिया वरी । ऊद जाळील जो क्षणभरी । देईल श्रीहरि सुख तया ।।


Related image

ही साईमुखींची अक्षरें आहेत. बाबांचे म्हाळसापती आदि भक्त आणि शिरडीचे ग्रामस्थ जन ह्या पवित्र स्थानांस बाबांच्या गुरूंचे समाधिस्थान म्हणून वंदन करीत असत. तदनंतर ही बालमूर्ती सामान्य नव्हे, याची गावकऱ्यांना खात्री पटू लागली. 

बाबांचे हे असामान्यत्व प्रथम जाणले ते गणपतराव कोते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी बायजाबाई या भाविक दांपत्याने. हे दांपत्य सदहृदयीं,सात्विक,धार्मिक आणि परोपकारी होते. वैराग्याचा पूर्ण अवतार असलेल्या ह्या बालमूर्तीस पाहून पाटील दांपत्याच्या अंत:करणांत वात्सल्याचा भाव जागृत झाला. बाबांच्या वरवर दिसणाऱ्या चमत्कारिक वर्तनामुळें काही लोक त्यांना ' वेडा फकीर ' म्हणत असत. गावांतील कर्मठ, तेली अशा काही लोकांचा बाबांना प्रथमपासूनच विरोध होता. मात्र पाटील दांपत्याने पहिल्याच दर्शनापासून साईबाबांचे जे पाय धरले ते अगदी अखेरच्या क्षणांपर्यंत ! पुढें काही काळ शिरडीत वास्तव्य करून बाबा गुप्त झाले. 


चांद पाटील यांच्या वरातीसोबत शिरडीत बाबांचे पुनरागमन    


काही काळानंतर देवीदास नावाचे वैरागी शिरडीत वास्तव्यास आले.एकदा धूपखेडेगावीचा ग्रामाधिकारी  चांद पाटील, औरंगाबाद इथे कांही कामानिमित्त गेला होता. त्यावेळीं त्याची एक घोडी तिथे हरवली. महिना - दोन महिनें अथक शोध करूनही ती घोडी काही त्याला परत मिळाली नाही. त्यामुळें निराश होऊन चांद पाटील परत धूपखेड्यांस जाण्यास निघाला. पाठीवर खोगीर घेऊन तो मार्गक्रमण करत असता एका आंब्याच्या झाडाखाली कफनी आणि टोपी परिधान केलेला एक फकीर त्यास दिसला. तो तेजस्वी फकीर पाहून चांद पाटील सहजच नमस्कार करावयास पुढे आला. तेंव्हा, तो तरुण फकीर चिलीम भरत होता. ' हे खोगीर कसले आहे ?' असे विचारले असता चांदभाईने आपल्या हरवलेल्या घोडीची इत्यंभूत हकीकत त्या फकीरास सांगितली. मग तो फकीर म्हणे जा शोध त्या नाले । घोडे सापडले तात्काळ ।। अत्यंत आश्चर्यचकित झालेला चांद पाटील परत फकीरापाशी आला. फकिराने त्यास घटकाभर विश्रांती घ्यावी व ही चिलीम पिऊन मार्गस्थ व्हावे असे सुचवले. त्यानुसार चांदभाई तिथे बसला. पुढे त्या फकिराने हातांतील चिमटा मातीत खुपसून अग्नी आणि छापी भिजवण्यासाठी सटका जमिनीत मारून पाणी निर्माण केले. अशा रीतीने ती चिलीम तयार करून फकीराने स्वतःही ओढली आणि चांद पाटलासही प्यावयास दिली. हे सर्व अनुभवून हा फकीर कुणी तरी दैवी विभूती आहे, याची त्या पाटलांस खात्री पटली. त्याने त्या फकीरास आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते स्वीकारून तो तरुण फकीर दुसऱ्या दिवशी धूपखेड्यांस चांद पाटील ह्याच्या घरी गेला आणि काही काळ तिथेच राहिला. पुढें चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याचा विवाह ठरला. भावी वधू शिरडी येथील होती, त्यामुळे विवाहासाठी चांदभाईच्या वऱ्हाडासोबत बाबाही शिरडीस आले. खंडोबाच्या देवळापाशी म्हाळसापतीच्या खळ्यांत हे वऱ्हाड उतरले. हे तरुण फकीर जेव्हा गाडीतून उतरले, तेव्हा प्रथम भगत म्हाळसापतीच्या दृष्टीस पडले. तें तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून भगत आदराने ' या साई ! ' असे म्हणून स्वागतास सामोरा आला. त्यानंतर सर्व लोकही त्यांस साई - साई असे संबोधू लागले आणि अशा रितीने साईंचे ते नामाभिधान झाले. असो काही दिवसानंतर, लग्न झाले वऱ्हाड  परतलें । बाबा एकटेचि मागें राहिले । राहिले ते राहुनि गेले  । भाग्य उदेलें शिरडीचें ।।  


क्रमश: 


Jul 14, 2019

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ३


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । ललितादेवी नमोस्तुते ॥१॥

सकलांसी वंदितो भावे । संत चरित्र पूर्ण व्हावे । आशीर्वाद मज लाभावे । सकल श्रीसंत देवांचे ॥२॥

आशीर्वाद लाभल्यावर । सकल कार्य होय सुकर । ऐसे पुरावे पुराणीं फार । वाचतांना आढळती ॥३॥

वरदान मिळाले अर्जुनास । शाप बाधले ते कर्णास । सूर्यपुत्र तो असता त्यास । अपयश आले सर्वदा ॥४॥

उदाहरण हे नित्य मनीं । ठेवुनी लोळतो संत चरणीं । वरदान मज द्या ग्रंथ लेखनीं । अखंड त्यासी प्रार्थितसे ॥५॥

अनंत लहरी सागरावरी । उसळत असती वरचेवरी । गणिल तयांची संख्या खरी । ऐसा न कोणी विश्वांत ॥६॥

तैसाचि संत चरित्र सागर । चमत्करांच्या लहरी त्यावर । प्रकट होती वारंवार । लोकहिता कारणे ॥७॥

चमत्कारे लोक वळती । उपदेशाने ना ऐकती । ऐशीच असे ही जनरीती । ज्ञात सर्वांसि सत्य हे ॥८॥

नाठाळ जनां उद्धराया । चमत्कार या सुलभ उपाया-। सिद्ध योजुनी करिती दया । दाविती जनां सत्पंथ ॥९॥

अत्तराचा एक थेंब । जैसा नाशितो दुर्गंध । तैसाचि संत संबंध । घडता दुर्जन पालटे ॥१०॥

केवि वर्णू संत महती । वर्णावया ती शब्द नसती । निःस्वार्थपणे कृपा करिती । दीनोद्धारा कारणे ॥११॥

सिद्ध, साधू, संत महंत । अधर्मयोगे होत व्यथित । पृथ्वीवरी अवतरतात । धर्मं रक्षावयास्तव ॥१२॥

दृश्य-अदृश्य सृष्टींत । सिद्धांचा अधिकार बहुत । प्रसंग पडल्या जनहितार्थ । चमत्कारही करिती ते ॥१३॥

श्रेष्ठ ऐशा योगियांत । नृसिंहयती अति विख्यात । पशु-पक्ष्यांचे मनोगत । होते जाणत लीलया ॥१४॥

तैशीच आता मनोहर । कथा ऐकणे सविस्तर । मृग-मृगी त्यां भेटल्यावर । संवाद झाला श्रवणीय ॥१५॥

सानुल्या निज पाडसास । भेटण्याची धरोनि आस । मृगी निघाली शोधायास । महाभयंकर वनामध्ये ॥१६।

हिंडता-शोधिता फार थकली । क्षुधे-तृषेने व्याकुळली । वात्सल्यभावे अति तळमळली । पाडस तिचे गवसेना ॥१७॥

निजबाळाची आस धरुनी । तैशीच फिरे हरिणी वनीं । सर्वत्र पाहता धुंडाळुनी । हताश झाली अत्यंत ॥१८।

तशांत घडले दुजे नवल । मृगे गांठिले तेचि स्थल । मृगीस बघता हर्षोत्फुल्ल । मृग जाहला तेधवा ॥१९॥

परि त्यां शावक सापडेना । तेणे तयांसी अति यातना । तशांत लागे तृषा त्यांना । शोधु लागले जलाशय ॥२०॥

अंतरावरी तोंच एक । निर्झर देखिला अति सुरेख । अमृतजलीं बुडवुनी मुख । प्राशिती जल संतोषे ॥२१॥

जलप्राशनें संतोषली । तृण भक्षुनी तृप्त झाली । पूर्वस्थानीं ती पातली । पाहु लागली आश्चर्ये ॥२२॥

भव्य वृक्षाच्या छायेंत । एक मुनी प्रसन्न चित्त । सुधादृष्टिनें अवलोकित । समोरील त्यां युगुलासी ॥२३॥

कां मज बघता टक लावुनी । विसरलात का ओळख जुनी । गतजन्मीचा परिचय म्हणुनी । प्रेमपूर्वक विचारितो ॥२४॥

असता आम्ही गाणगापुरीं । होतास आमुचा सेवेकरी । तज्जन्मी तूं प्रखर खरी । अखंड सेवा केलीस ॥२५॥

होतासि तूं विप्र रोगी । पीडिलेला महारोगी । निज भक्तीने दया जागी । करिता, केला रोगमुक्त ॥२६॥

हीच मृगी भार्या होती । पतिनिष्ठ साध्वी, महासती । परंतु झाली तुज दुर्मती । संपन्न काल येतांची ॥२७॥

मुलेबाळे, धान्य-संचय । गोधन, धन ही सर्व सोय । दूध, दही, नवनीत, साय । गोकुळासम गृह होते ॥२८॥

कशासि काही नव्हते उणे । जात होते दिन मजेने । पुढे वर्तसी उन्मत्तपणें । अपमानिले साधूजना ॥२९॥

दुष्ट वर्तन असह्य झाले । शापिणे तुज भाग पडलें । पशुजन्मीं या तुज घातले । भोग भोगावयालागी ॥३०॥

ऐकता हे सिद्धशब्द । कुरंग राहिले निःस्तब्ध । वृत्त ऐकता ती हतबुद्ध । होऊनी अश्रु गाळिती ॥३१॥

स्फुरली वाणी जोडप्यासी । प्रार्थना करिती यतिवरांसी । क्षमा असावी अपराध्यासी । चरण चाटिती स्वामींचे ॥३२॥

क्षमा याचिता द्रवले यती । अश्रु नेत्रांतुनी गळती । नरदेहाची तुम्हां प्राप्ती । पुढिल जन्मीं अत्युत्तम ॥३३॥

श्रवणी पडता मधुर वाणी । भारावली ती कृतज्ञतेनी । मस्तक ठेविती यती चरणी । साश्रु नयनें पुनः पुन्हा ॥३४॥

तोचि पाडसे तिथे आली । भेट होता अति हर्षली । दयासागरें दया केली । पशूंवरी त्या अपूर्व ॥३५॥

ऐसे यतिवर्य कनवाळू । मातेहुनीही अति दयाळू । सर्व जीवांचा प्रतिपाळू । सदासर्वदा करिताती ॥३६॥

सामर्थ्य पाहता अलौकिक । आश्चर्य पावले मुनि अनेक । सर्व मिळोनी तयें एक । समारंभ तो आयोजिला ॥३७॥

हिमगिरीचे सर्व योगी । जमती प्रेमे एक जागी । सन्मानयोग्य हा थोर जोगी । ऐसे वदती ते सर्व ॥३८॥

गुहा सजविती पल्लवांनी । मृगाजिन घातले उच्चासनी । फळे, फुले मधु आणुनी । स्वागत करिती प्रेमाने ॥३९॥

उच्चासनी यति बैसता । सभेत आली अपूर्वता । स्मित वदन ते स्वामी बघता । धन्यता वाटे ऋषिजनांसी ॥४०॥

ऋषी अर्पिती सुमनमाळा । कुणी अर्पिती मधुर फळां । पर्णद्रोणीं मधु आगळा । प्राशनार्थ देती कुणी ॥४१॥

पक्षी करिती किलबिलाट । वनश्रींचे सुरम्य भाट । यतिस्तुतीचा अपूर्व थाट । बघतां तपस्वी आनंदले ॥४२॥

ऋषिगण गाती वेदमंत्र । वातावरण ते होय पवित्र । यतिवर असती पूज्यपात्र । यास्तव स्तविती मुनि सारे ॥४३॥

योगेश्वरांसी सर्व नमिती । धन्य वदती आम्ही जगतीं । असा योग्यांचा अधिपती । बघायासी न मिळे कदा ॥४४॥ 

अष्टसिद्धी वोळंगती । रात्रंदिन त्या जयां पुढती । श्रेष्ठपणासी नाही मिती । धन्य जाहलो या दर्शनें ॥४५॥

स्वर्णचंपक, बटूमोगरा । बकुल, जाई सर्वेश्वरा । चंदन, केतकी सुलसितुरा । सुगंधी पुष्पे अर्पियली ॥४६॥

केशर, कस्तुरी अंगी चर्चिती । नाना सुगंधी द्रव्ये अर्पिती । कमल पुष्पे । पदी वाहती । ऐसे पूजिती परमादरे ॥४७॥

बघुनि दिव्य हा पूजाविधी । यक्ष, गंधर्व, किन्नरांदी । नारद, तुंबर, सुरेश्वरादी । जयजयकारा करिती ते ॥४८॥

हे ना केवळ योगेश्वर । हे तो प्रत्यक्ष परमेश्वर । उत्पत्ती, स्थिती, प्रलयंकार । सर्व सत्ता इये हातीं ॥४९॥

ऋषिगण भवती दाट जमले । चरणारविंदी नम्र झाले । मार्गदर्शन पाहिजे केले । आपण देवा सदोदित ॥५०॥

आसनीं स्वामी स्थिरावले । भक्ति पाहोनि गहिंवरले । आनंदाश्रू पूर चाले । दिव्य तयांच्या नेत्रांतुनी ॥५१॥

कंठ जाहला सद्‌गदित । बोलत असता ऋषींप्रत । जपतप करिता हिमनगांत । परित्यागुनी सर्व काही ॥५२॥

अहं ब्रह्मास्मि तत्त्व कथिती । स्वामी तदार्था विशद करिती । कैवल्यमार्गा सुकर करिती । गुह्य त्यांतील सांगोनी ॥५३॥

मर्म कळतां ऋषि हर्षले । महद्‌भाग्ये यति लाभले । निज मस्तकी चरण धरिले ॥ यतिवर्यांचे सर्वानी ॥५४॥

अज्ञानाचा नाश केला । ज्ञान प्रकाशे मार्ग दिसला । शतजन्मींचा लाभ झाला । स्वामी दर्शनें सकलांसी ॥५५॥

स्वामी देती आशीर्वाद । ध्येय साधाल निर्विवाद । तुम्हासि बघतां परमानंद। आम्हासही जाहला असे ॥५६॥ 

प्रेमे बोलोनि यति उठले । गुहेमधोनी बाहेर आले । मुनिगण तदा वर्षती फुले । जयजयकार करोनिया ॥५७॥

जयजयकारे गिरिकंदर ।निनादला तो मनोहर । यतिवर्य जाता दूर दूर । साश्रु नयने बघती ऋषी ॥५८॥

धन्य, धन्य तो तपस्वीगण । जयांसि घडले यतिदर्शन । सामान्य आपण पापीजन । दर्शन कैसे घडेल की ॥५९॥

कशासि घ्यावी दुष्ट शंका । स्वामी दयार्णव नसती का?। आर्त ऐशा निज भाविका । भेटतील ते स्वप्नांतरीं ॥६०॥

आर्तता सर्वाची वाढावी । यतीश्वरांची भेट व्हावी । कल्याणप्रदं गोष्ट घडावी । सकल भक्तांच्या जीवनीं ॥६१॥

ऐसे प्रार्थोनि यतीश्वरां । पूर्ण करितो अध्याय तिसरा । संकल्पं आमुचे परमेश्वरा । पूर्ण करावे सदोदित ॥६२॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥६३॥

॥ श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु ॥



सौजन्य : https://www.transliteral.org/