दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Sep 5, 2025

श्रीगणेश प्रार्थना


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षक । भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात् ॥
द्वैमातुर कृपासिन्धो षाण्मातुराग्रज प्रभो । वरदस्त्वं वरं देहि वाञ्छितं वाञ्छितार्थद ॥


विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय । लम्बोदराय सकलाय जगद्धिताय ।  नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय । गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ॥१॥ भक्तार्तिनाशनपराय गणेश्वराय । सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय । विद्याधराय विकटाय च वामनाय । भक्तप्रसन्न-वरदाय नमो नमस्ते ॥२॥ नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नम: । नमस्ते रुद्ररूपाय करिरुपाय ते नम: । विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायकम् ॥३॥ लम्बोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥४॥ त्वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति । भक्तिप्रदेति सुखदेति फलप्रदेति । विद्याप्रदेत्यघहरेति च ये स्तुवन्ति । तेभ्यो गणेशवरदो भव नित्यमेव ॥५॥

॥ श्रीगजाननार्पणमस्तु

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Sep 2, 2025

स्वामी माधवानंदविरचित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्रीगजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता भाविकांना श्रीगजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतुकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजाननभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

याच दिव्य पोथीचे विवरण करणारा स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथ श्रीगजानन महाराजांच्या असंख्य लीलांचे, सद्‌गुरु श्रीगजाननांच्या उपदेशपर शिकवणीचे आणि समर्थांच्या भक्तांच्या भावपूर्ण अंतःकरणाचे अनेक विलोभनीय पैलू उलगडून दाखवतो. गजाननभक्तांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा, त्यातील सूक्ष्म अर्थांचे नित्य मनन-चिंतन करावे जेणेकरून श्रीगजानन विजय पोथीवाचन केवळ वाचनमात्र न राहता, भाविकांना आंतरिक समाधान तर निश्चित लाभेलच, तसेच महाराज सदैव आपल्यासोबतच आहेत अशी दृढ धारणादेखील होईल.

स्वामी माधवानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर. हे आदिनाथ, श्रीदत्तात्रेय, श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ, श्रीजालंदरनाथ यांच्यापासून सुरु झालेल्या आणि पुढे श्रीज्ञानेश्वर महाराज तसेच स्वामी स्वरूपानंद (पावस), स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या परंपरेतील ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते. अनेक संत-महात्मे यांचे वाङ्मय तसेच विविध पौराणिक कथा व स्तोत्र यांवर त्यांनी निरूपणपर लेखन केले आहे. त्यांतून व्यक्त होणारा बोध, भावार्थ आणि वाचकांना मनन करण्यास प्रेरित करणारे सोदाहरण विश्लेषण हे स्वामी माधवानंदलिखित साहित्याचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथदेखील याला अपवाद नाही. या ग्रंथाविषयी स्वामी माधवानंद लिहितात - गजानन महाराजांच्या भक्तांच्या अंतःकरणाची विलोभनीयता आणि महाराजांना द्यायची असलेली शिकवण यांवर विशेष प्रकाशझोत टाकून, चमत्कारांनी दिपलेल्या डोळ्यांना हे सर्व दिसेल, माणूस त्यांतून स्वतःसाठी योगज्ञानाच्या प्रेरणा आणि 'श्रीगजानन विजय' ग्रंथातील भक्तिरसाचा आस्वाद घेऊ शकेल यासाठी श्रीगजानन महाराजांनी हा ग्रंथ त्याच्या नावाच्या स्फुरणासह प्रकट केला अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.

  स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा विवरण ग्रंथ इथे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. सर्व गजाननभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

  " देवा, उपासना तुझी आहे. तुझ्या इच्छेने, तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या शक्तीनेच ही चालली आहे. कर्ता आणि करविता तूच आहेस. या उपासनेतून हे देवा, तू मला तुझ्या दर्शनासाठी योग्य करून घ्यावेस. याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. ऐहिक गोष्टींच्या बाबतीत जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा !", याच ग्रंथातील ही अनन्यशरणागत भावयुक्त प्रार्थना करून ही लेखनसेवा श्रीगजानन महाराजांच्या दिव्य चरणीं रुजू व्हावी, हेच मागणे गुरुवरा !

श्रीगजानन महाराजार्पणमस्तु   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Aug 28, 2025

ओवाळीतो स्वामीराया... दावी चिन्मय स्वरुपाला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते गजाननाय

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करतात, आपल्यासारख्या सामान्य जनांना सन्मार्ग दाखवितात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय या प्रासादिक ग्रंथात गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥ अनेक वेळा सांगितले आहे. अशा साक्षात्कारी संतपुरुषांचा वास त्यांच्या स्थूल देहापेक्षा सूक्ष्मांत असतो. त्यांमुळे या योगीराजांच्या समाधीनंतरही त्यांचे अवतार कार्य अखंड, अविरत सुरूच असते. किंबुहना ते सहस्त्रपटींनी अधिक कार्यरत होते. सिद्धयोगी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेऊन एक शतकापेक्षाही अधिक काळ लोटला आहे, तरीही ' मी गेलों ऐसें मानूं नका । मी आहे येथेंच ॥' या समर्थवचनांची अनुभूती आजही त्यांच्या भक्तांना येत आहे. श्री क्षेत्र शेगांव येथे दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि भक्तांकडून श्रीगजानन विजय या समर्थांच्या चरित्रग्रंथांची होणारी नित्य पारायणे या गोष्टीची साक्ष देतात. 

या दिव्य ग्रंथातील अध्याय १९ आणि अध्याय २१ मध्ये श्रीगजानन महाराजांचे निष्ठावंत भक्त रामचंद्र निमोणकर यांचा उल्लेख आहे. ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥ योगयोगेश्वर गजानन महाराजांचा त्यांना प्रसाद प्राप्त झाला आणि योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥   त्यांनी समर्थ सदगुरु श्रीगजानन महाराजांवर एक पुस्तिका लिहून ती प्रकाशित केली होती. या पुस्तिकेतील ही अतिशय सुंदर, भावपूर्ण आरती ! या सद्‌भक्ताची महाराजांच्या ठायीं असलेली भक्ती, अनन्य श्रद्धा आणि शरणागतीचा भाव या आरतीतील प्रत्येक पदांतून विनासायास व्यक्त होतात.     

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥धृ॥ देई सद्‌बुद्धी मजला । प्रेमे तव यश गाण्याला । भक्तांकिता स्वामीराया, चरण मी शरण, करुनी भय हरण दावी सुखसदन, अमित मम दोष लागुनीया । विनवितो दास तुम्हा सदया ॥१॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  जनपद मुक्ति पदान्याया । स्थली या अवतरला राया । ही जड मुढ मनुष्य काया । पदी तव अर्पियली राया । हे दिव्य वसन योगीराया । नको मज जनन, पुनरुपी मरण । प्रार्थना हेचि असे पाया ॥२॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  नेण्या आत्मतमा विलया । आलासी ज्ञान रवी उदया । करी तू ज्ञानी जना राया। निरखुनी मोह पटल माया । गजानन संतराजा, असशी बलवंत, तसा तू धिमंत । नको बघू अंत, विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दुर करु सदया ॥३॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥

    

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
मूळ स्रोत : श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )

 

Aug 27, 2025

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन - श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :

ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥


श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.

आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." 

मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्‌गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


Aug 11, 2025

अथ श्रीवसिष्ठविरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं



॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
ॐ नमः शिवाय ॥

विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय ।

कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥१॥

गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय । गङ्गाधराय गजराजविमर्दनाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥२॥ भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय । ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥३॥ चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय । मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥४॥ पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय । आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥५॥ भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय । नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥६॥ रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय । पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥७॥ मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय । मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥८॥ वसिष्ठेनकृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम् सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम् ।

शुभदं कामदं हृद्यं धनधान्यप्रवर्धनम् त्रिसन्ध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात् ॥९॥
॥ इति श्रीवसिष्ठविरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Aug 9, 2025

श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री सत्यदत्त व्रत करतांना या दिव्य स्तोत्राचे पठण अवश्य करावे.
















दत्तं वन्दे दशातीतं दयाब्धिं दहनं दमम् । दक्षं दरघ्नं दस्युघ्नं दर्शं दर्पहरं दवम्  ॥१॥ दातारं दारुणं दांतं दास्यादं दानतोषणम् । दानं दावप्रियं दावं दासत्रं दारवर्जितम् ॥२॥ दिक्पं दिवसपं दिक्स्थं दिव्ययोगं दिगम्बरम । दिव्यं दिष्टं दिनं दिश्यं दिव्याङ्गं दितिजार्चितम् ॥३॥ दीनपं दीधितिं दीप्तं दीर्घं दीपं च दीप्तगुम् । दीनसेव्यं दीनबन्धुं दीक्षादं दीक्षितोत्तमम् ॥४॥ दुर्ज्ञेयं दुर्ग्रहं दुर्गं दुर्गेशं दुःखभंजनम् । दुष्टघ्नं दुग्धपं दुःखं दुर्वासोऽग्र्यं दुरासदम् ॥५॥ दूतं दूतप्रियं दूष्यं दूष्यत्रं दूरदर्शिपम् । दूरं दूरतमं दूर्वाभं दूराङ्गं च दूरगम् ॥६॥ देवार्च्यं देवपं देवं देयज्ञं देवतोत्तमम् । देहज्ञं देहिनं देशं देशिकं देहिजीवनम् ॥७॥ दैन्यं दैन्यहरं दैवं दैन्यदं दैविकांतकम् । दैत्यघ्नं दैवतं दैर्घ्यं दैवज्ञं दैहिकार्तिदम् ॥८॥ दोषघ्नं दोषदं दोषं दोषित्रं दोर्द्वयान्वितम् । दोषज्ञं दोहपं दोषेड्बन्धुं दोर्ज्ञं च दोहदम् ॥९॥ दौरात्म्यघ्नं दौर्मनस्य-हरं दौर्भाग्यमोचनम् । दौष्ट्यत्रं दौष्कुल्यदोष-हरं दौर्हृद्यभञ्जनम् ॥१०॥ दण्डज्ञं दण्डिनं दण्डं दम्भघ्नं दम्भिशासनम् । दन्त्यास्यं दन्तुरं दंशिघ्नं दण्ड्यज्ञं च दण्डदं ॥११॥ अनन्तानन्तनामानि सन्ति तेऽनन्तविक्रम । वेदोऽपि चकितो यत्र नुर्वाग्हृद्दूर का कथा ॥१२॥ ॥ इति श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दकारादिदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

May 9, 2025

श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


सुंदर हे रूप गोजिरे सुकुमार । दिसे मनोहर, स्वामीराज ॥

एक कर कटी शोभतो साजिरा । रुद्राक्ष हो हार, गळा एका ॥

केशराची उटी, कस्तुरी ललाटी । भक्ताचे हो संकटी उभा असे ॥

सरळ नासिक शोभते वदना । रत्नाची हो खाणी, स्वामीराज ॥

वैराग्य विभूती, कौपिन शोभत । असे ते स्वरूप स्वामीराया ॥ 

चरण मृदू असे नवनीतापरी । वंदिता कैवारी, स्वामीराज ॥ 

लावण्याचा गाभा, ज्योतीची ही प्रभा । भक्तासाठी उभा, सर्वकाळ ॥ 

स्वामीसुत म्हणे, काय वर्णू रूप । खरे तीच एक स्वामीराया ॥


श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमशिष्यांत श्री. महारूद्रराव देशपांडे अर्थात श्री नानासाहेब देशपांडे (केजकर स्वामी) यांचे स्थान अग्रेसर आहे. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' असे ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी त्यांचे वर्णन केले आहे. श्रीस्वामीसमर्थांच्या कृपाप्रसादामुळे महारूद्ररावांना त्यांचे ऐहिक वैभव, सामाजिक प्रतिष्ठा पुनश्च प्राप्त तर झालेच, अन सद्‌गुरुकृपेचा चिरंतन लाभदेखील झाला. त्यायोगे त्यांच्या चित्तवृत्तींत बदल होऊ लागला. त्यांना सतत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला. असेच एकदा महारूद्रराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात गेले असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी अनेक प्रयत्न करूनही श्रीसमर्थांचे दर्शन त्यांना झाले नाही. द्‌गुरुदर्शनाचा ध्यास लागलेले हे परमभक्त तेव्हा अन्न-पाणी ग्रहण न करता राजवाड्याबाहेरच पूर्ण दिवसभर बसून राहिले. स्वामीभक्तहो, महारूद्ररावांचा तो दृढनिश्चय अन निग्रह पाहून अलौकिक अवतारी, करुणाघन स्वामी द्रवले, यांत नवल ते काय ? श्रीस्वामी महाराजांनी त्वरित सेवेकऱ्यांस आज्ञा केली, " जाव, नाना को यहाँ लेके आव ।" सेवेकऱ्यांनी तात्काळ बाहेर जाऊन विचारणा केली आणि ते महारूद्ररावांना आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन गेले. आपल्या आराध्याचे, श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन होताच या सत्शिष्याचा कंठ दाटून आला, त्यांना भावसमाधी लागली. तेव्हा, भक्तवत्सल श्रीस्वामींनी जवळच असलेला एक गोटा आणि आपल्या पायांतील जोडे महारूद्ररावांच्या दिशेने भिरकावले. श्रीस्वामींच्या पुनीत हस्ताने प्राप्त झालेला हा प्रसाद महारूद्ररावांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांनी आपल्या द्‌गुरुंचे मनोभावें दर्शन घेतले. पुढें, या प्रासादिक वस्तू त्यांनी केज येथे त्यांच्या देवघरात नित्य पूजनार्थ ठेवल्या. श्रीस्वामींचा कृपाप्रसाद असलेला हा गोटा व चर्म पादुका यांचे दर्शन भाविक आता केजच्या या मठांत घेऊ शकतात. अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज महारूद्ररावांना 'माझा नाना' असे संबोधित असत, इतुकेच नव्हें तर केजकर स्वामींची समाधीदेखील श्रीस्वामींच्या प्रेरणेने श्रींच्याच प्रिय आद्य मठांत बांधली गेली, यांतच महारूद्ररावांचे श्रेष्ठत्व अन वेगळेपण दिसून येते. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते, हे निःसंशय !

 " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृतात वर्णिलेला  हा  'दगड' म्हणजेच या पावन पादुका होत.


प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या प्रासादिक पादुका श्रीमंत महारूद्र (नानासाहेब) केशवराव देशपांडे यांनी श्री ब्रह्मचारी महाराज (मुंबई गादी) यांच्या हस्ते, शके १७९७ साली (इ.स. १८७५) गुरुवारी वैशाख शुद्ध १५ या तिथीला प्रतिष्ठापित केल्या. या मंगल घटनेला वैशाख शुद्ध तिथी १५ शके १९४७ अर्थात १२ मे २०२५ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केजतर्फे पंचकुंडी पंचायतन महायज्ञ, दीड कोटी स्वामी नामजप, अन्नदान तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य श्री हरिभाऊ तावडे उर्फ स्वामीसुत यांचे धाकटे बंधू दादामहाराज (मोरपीस) आणि त्यांची मातोश्री काकूबाई हे दोघेही या पावन पादुकांची स्थापना होत असताना स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे आजही या मठात श्री स्वामीसुतांची सांप्रदायिक परंपरा श्रद्धेने पाळली जात आहे.

साक्षात त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास स्वामीभक्तांनी शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी आणि या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा. 


श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - या सोहळ्याविषयीची सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे.


केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे यांचे चरित्र इथे वाचता येईल.



॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

सौजन्य : श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज

Apr 30, 2025

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ चरित्र आणि 'श्रीस्वामी सत्संग'


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे प्राचीन व दुर्मिळ चरित्र पुणे नगर वाचन मंदिर यांनी सर्व स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला, आरत्या, पदें, अष्टकें आणि स्तोत्र यांचे अतिशय सुंदर संकलन केलेला हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून सतत नित्योपासनेसाठी संग्रही ठेवावा असाच आहे.

*** पदामृत सागर - श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ मंडळ ***


'श्रीस्वामी सत्संग' अर्थात अँफी थिएटर, बोरिवली पूर्व इथे आयोजित केलेले श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांचे ओघवत्या शैलीतील भक्तिरसमय असे व्याख्यान प्रत्येक स्वामीभक्ताने वारंवार ऐकावे असेच आहे.

 

 

॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Mar 22, 2025

श्रीदत्ताशिष ब्लॉगवरील लेखन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


नमस्कार दत्तभक्तहो ! परब्रह्मस्वरूप श्री दत्तमहाराजांची कुठल्याही स्वरूपांत थोडीफार सेवा घडावी, याच हेतूने श्रीदत्ताशिष या ब्लॉगची निर्मिती झाली. श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचे आणि एकूणच दत्त संप्रदायांतील विविध ग्रंथ, स्तोत्र-मंत्र, व्रत-वैकल्य, विविध उपासना यांबरोबरच या संप्रदायांतील अनेक थोर संतपुरुष यांची महती/ संकलित माहिती या ब्लॉगवर दत्तभक्तांना सहजपणे उपलब्ध व्हावी, हेच त्यावेळी प्रामुख्याने उद्दिष्ट होते. हे सर्व लेख प्रकाशित करतांना प्रत्येकवेळी मूळ स्रोतांचा, लेखकांचा आवर्जून उल्लेख करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. श्रीदत्तमहाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आपला उत्तम प्रतिसादही या संकल्पास मिळत गेला.

पुढें दत्तभक्तांच्या आग्रहानुसार संस्कृतमध्ये रचलेली काही दिव्य स्तोत्रं-मंत्र यांचा भावार्थ सर्वांना कळावा आणि समजून उमजून उपासना घडावी यासाठी काही लेखन घडले. त्याचप्रमाणे श्रीगुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, श्रीगुरुलीलामृत, श्रीगजानन विजय, श्री साई सत्चरित्र यांसारख्या परम प्रासादिक ग्रंथांविषयी केलेले क्वचित थोडेफार चिंतनपर लेखही प्रकाशित केले. त्या भक्तवत्सल अत्रिनंदनाची घडलेली ही अत्यल्प लेखनसेवा ही केवळ आणि केवळ त्यांच्या कृपाशीर्वादस्वरूपाने घडली अशीच सदैव भावना असल्याने, ' इदं न मम् ' अशीच भूमिका आजवर घेतली आहे. त्यांमुळे अनेकदा कित्येक वाचकांनी या ब्लॉगवरील लेखन इतरत्र वापरले गेले आहे, हे निदर्शनास आणून दिल्यावरही आजपर्यंत कधीच खंत वाटली नाही. काही वर्षांपूर्वी श्रीशंकर भट्टलिखित आणि प. पू. हरिभाऊ निटूरकर जोशीमहाराज अनुवादित श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ वाचला आणि आपणही श्रीपाद श्रीवल्लभांच्या या लीला साररूपांत लिहाव्यात असे वाटले. जेणेकरून भाविकांच्या मनांत मूळ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा प्रासादिक ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण होईल. प्रभूंच्या प्रेरणेने या ब्लॉगवर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचे अध्याय १ ते १२ प्रकाशितही झाले. अनेक भाविकांनी ते आवडल्याची पोचही दिली. हे सर्व अध्याय इथे उपलब्ध आहेत. हे सर्व लेखन करतांना ग्रंथकारांच्या मूळ दिव्य रचनेस कधीही धक्का लागू न देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. जाणता-अजाणता काही चूक झाल्यास अथवा त्रुटी राहिल्यास ती सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मात्र श्रीदत्ताशिष ब्लॉगच्या काही वाचकांनी हा व्हिडीओ निदर्शनास आणून दिल्यावर मन व्यथित झाले.


या व्हिडीओतील मूळ अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ११ हा या ब्लॉगवर वाचू शकता.

मुळातच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षरसत्य आणि दिव्य स्पंदनाने भरलेला ग्रंथ आहे, याची ग्वाही श्रीपाद प्रभूंचे कृपांकित श्रीशंकर भट्ट व हरिभाऊ निटूरकर यांनी असंख्य वेळा दिली आहे. तसेच प्रत्येक अध्यायांची फलश्रुतीही त्यांनी स्पष्टपणे कथिली आहे. त्यामुळे या परम प्रासादिक ग्रंथाच्या मूळ मजकूरातील आशयांत बदल करण्याचा अधिकार आपल्यासारख्या सर्व-सामान्य भाविकांना नक्कीच नाही.

अर्थात ऐहिक सुखाची कामना हेच बहुधा आपले मागणे असते आणि त्यांत गैर काही नाही. मात्र, '१०० वर्षाने आला हा योग, अमुक हा वार संपण्यापूर्वी हा अध्याय ऐका, घरातून वाईट शक्तीचा नाश होईल, २४ तासांत आनंदाची बातमी कळेल ' अशी या अध्यायाची फलश्रुती ठामपणे सांगणे म्हणजे भाविक दत्तभक्तांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मूळ चरित्रग्रंथातदेखील या अध्यायाची ही अशी फलश्रुती स्वतः ग्रंथकारांनी कुठेच सांगितलेली नाही, तर दुर्गुणांपासून मुक्ती असे या अध्याय पठणाचे फल अधिकारी महात्म्यांनी कथित केले आहे. मग माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीने केवळ साररूपांत लिहिलेल्या या अध्यायाविषयी अशी ग्वाही देणे, हे खचितच योग्य नाही.


यासाठीच काही गोष्टी इथे स्पष्ट कराव्यात, असे वाटले.

  • सर्वप्रथम, श्रीदत्ताशिष ब्लॉगचा या 'God blessings-marathi' चॅनेलशी कुठलाही संबंध नाही.
  • या चॅनेलच्या ताई या अधिकारी व्यक्ती असतीलही, मात्र या ब्लॉगवरील कुठलेही लेखन इतरत्र कुठल्याही स्वरूपांत पुनर्प्रकाशित करावयाचे असल्यास ते मूळ स्वरूपांतच करावे, मूळ स्रोताचा - श्रीदत्ताशिष ब्लॉगचा उल्लेख करणे अथवा न करणे हे अर्थातच प्रत्येकाच्या स्वभावगुणांवर वा मनोवृत्तीवर अवलंबून आहे. भाविक-भक्तांच्या श्रद्धेचा असा गैरफायदा कदापिही घेतला जाऊ नये, यासाठीच हा आग्रह आहे.

श्रीदत्तमहाराज परमकृपाळू आणि भक्तवत्सल आहेत, हे खरे दत्तभक्त पूर्णपणे जाणतात. ' मला शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच !' असे स्मरतां क्षणीच प्रसन्न होणाऱ्या या ब्रह्माण्डनायकाचे ब्रीदच आहे, आणि याची अनेक दत्तभक्तांनी पुरेपूर अनुभूती घेतली आहे. अहो म्हणूनच, मनापासून केलेला नमस्कार ते प्रेमाने स्वीकारतात. आपल्या भक्ताचा अनन्य शरणागत भाव पाहून ते तात्काळ कृपा करतात, भाविकांच्या शुद्ध आचरणाने प्रसन्न होतात आणि गुरुवाक्य प्रमाण मानणाऱ्या सद्‌भक्तांचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण सहजच करतात, अशी ग्वाही अनेक संत-सज्जन-महापुरुषांनी स्वानुभवाने दिली आहे. सर्व साधकांच्या हृदयांत अशी निर्मळ दत्तभक्ती अखंड प्रवाहित राहू दे, हीच त्या अनसूयात्मजाच्या पावन चरणीं सदिच्छा!

शेवटी, थोरल्या महाराजांच्या करुणात्रिपदीमधील पुढील पदाने या लेखनप्रपंचाचा विराम घेत आहे. तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ॥ निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ॥ भगवान दत्तमहाराजांची आपल्या सर्वांवर सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना ! ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Mar 7, 2025

श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

कोणत्याही स्तोत्राचा अथवा मंत्रांचा पाठ करतांना किमान त्यातील शब्दार्थ जाणून घेऊन पाठ करावा. असा नित्यपाठ केल्याने काही काळाने साधकाचे उपासनाबळ वृद्धिंगत होते. सद्‌गुरुंच्या कृपेने मग त्या स्तोत्र/मंत्रांचा भावार्थ ध्यानांत येऊ लागतो आणि त्या ध्यानाने साधनामार्गावर योग्य दिशेने वाटचाल होऊ लागते. असा भावार्थ गोचर झाला की त्या भगवद्भक्ताची आराधना फलदायी होते. श्री स्वामी समर्थ मालामंत्राचे नित्यपठण ही अशीच एक प्रभावी उपासना आहे. अनेक स्वामीभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे. या दिव्यमंत्राचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न - ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥

आदिमाया आदिशक्ती या मालामंत्राचे माहात्म्य सांगत आहे. जगत्कल्याणासाठी प्रत्यक्ष श्रीनारायणांनी हा सर्वश्रेष्ठ मालामंत्र कथन केला.

ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥

हे भगवंता श्रीस्वामी समर्था, केवळ स्मरणमात्रें संतुष्ट होणाऱ्या, योगींमुनींनाही वंदनीय असणाऱ्या दत्तनाथा तुम्हांला मी नमन करतो. ज्ञान व आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे, ज्यांना तीन डोळे आहेत (जे शिवस्वरूप आहेत), या विश्वाचे जे ईश्वर आहेत, या चराचराला ज्यांनी व्यापले आहे, बालक, वेडा किंवा पिशाच यांच्याप्रमाणे ज्यांचा कधी कधी वेष असतो, जे महान योगी आहेत, जे परमात्मास्वरूप आहेत, जे विश्वाला चैतन्य देणारे आहेत, जे अक्षर-अविनाशी आहेत, जे मायाविकारांपासून अलिप्त आहेत, जे दोषरहित-सर्वगुणसंपन्न आहेत, जे या जगताचे मूळ आधार आहेत, जे श्रीहरी विष्णुस्वरूप आहेत, जे कारुण्यसिंधू आहेत, जे सनातन अर्थात अनादिसिद्ध आहेत अशा श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.


सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥

ज्यांची कृपा झाल्यास सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतात, सर्व दुरितें जळून जातात, सकल संचितकर्मांचा दोष नाहीसा होतो आणि सर्व विघ्नांचे सहज निवारण होते अशा श्रीस्वामीसमर्थांना नमन असो.

ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा

यानंतर तंत्रशास्त्रातील बीजांचे वर्णन केले असून त्याद्वारे विशिष्ट अभिप्सीत प्राप्तीसाठी श्री स्वामी महाराजांची प्रार्थना केली आहे.

जे संसारबंधनातून मुक्त करणारे आहेत (ॐ), जे परम ऐश्वर्य देणारे आहेत (श्रीं), जे निजजनतारक असून धर्मस्वरूप आहेत (स्वां), जे नित्य यश देणारे आहेत (मीं), जे या संसारचक्राचा छेद करणारे आहेत (सं), जे आत्मज्ञान देणारे आहेत (मं), जे विरक्ति देणारे आहेत (ओमर्थ), जे या मनुष्यजन्माच्या इतिकर्तव्यतेचे प्रबोधन करतात (नं), जे महाभय दूर करतात (मों), आणि जे केवळ भावाचे भुकेले असून भक्तजनांच्या चित्तात सदैव वास करतात त्या श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीस्वामीसमर्थांना नमस्कार असो.  

परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: )

हे भगवन्, परक्यांनी केलेल्या वाईट कृत्यांना माझ्यापासून दूर ठेव. परमंत्रांना शांत कर. परयंत्रांचा नाश कर. ग्रहभूतादि-पिशाच्चपीडा यांचे निवारण कर. दारिद्र्याला दूर पळव. (मानसिक-शारिरीक) दुःख हरण कर. माझे जीवन सुख-शांती यांनी सदैव बहरलेले ठेव. सर्व संकटांपासून संरक्षण कर. गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, सर्पदोषादि सकल दोषांचा समूळ नाश कर. माझ्यातील अहंकाराचे उच्चाटन कर. माझे मन-चित्त आणि बुद्धी तुझ्या चरणीं स्थिर कर. हे परमात्मन महादेवा, अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडधीशा, स्वामी समर्था श्रीगुरुराया तुला त्रिवार नमन असो.


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर