दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Feb 26, 2025

महाशिवरात्री पंचोपचार शिवपूजन - व्रतकथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमः शिवाय ॥

  देवांचेही देव महादेव ज्यांना पाच मुख, दहा भुजा, तीन नेत्र आहेत. ज्यांच्या हातांत शूल, कपाल, खट्टांग, तलवार, खेटक, पिनाक नांवाचें धनुष्य असून त्यांचे रूप महाभयंकर आहे. मात्र भोळा सांब भक्तवत्सल, दयाळू असून अल्पसेवेने प्रसन्न होऊन अभय व वरदान देणारे आहेत. ज्यांनी सर्वांगाला भस्मोद्धूलन केलें असून अनेक सर्प धारण केले आहेत. ज्यांच्या भाळी चंद्रकला आणि नीलकंठात कपालमाला शोभत आहे. ज्यांची मेघाप्रमाणें नीलकांति असून जे कोटीसूर्यासारखे दैदीप्यमान आहेत आणि ज्यांच्या सभोवती प्रमथादि गण आहेत असे जगदगुरु श्रीशंकर कैलासशिखरावर असतांना जगन्माता पार्वतीने त्यांना एक प्रश्न विचारला, “ हे देवेशा शंकरा, जें व्रत केलें असतां सर्व पापें नष्ट होतात आणि इष्ट मनोरथ पूर्ण होऊन अंती सायुज्य मुक्ती लाभते, असें उत्तम व्रत मला सांगा. हे परमेश्वरा, आपण मला पूर्वी अनेक व्रतें, तिथींचे निर्णय, अनुष्ठानें, दानें, धर्मकृत्यें, तसेच नानाप्रकारच्या तीर्थयात्रा यांविषयी सांगितले आहेच. परंतु सर्व पापांचा क्षय करणारें व भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे असें अत्यंत शीघ्र फलदायी व्रत मला सांगा.” आदिशक्तीने जगत्कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न ऐकून सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले, आणि म्हणाले, “ हे उमे, जें अत्यंत गुप्त आहे, जें मनुष्याला भोग आणि मोक्ष देणारें असून मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलें नाहीं असें सर्व व्रतांमध्यें उत्तम व्रत आता मी तुला सांगतों. या व्रताच्या केवळ श्रवणमात्रानें सर्व पापें नाश पावतात. माघ महिन्याच्या कृष्णपक्षांतील विद्ध नसलेली जी चतुर्दशी असते, तिला महाशिवरात्रि असे म्हणतात. या दिवशी शिवोपासना केल्यास तिचे फळ सर्व यज्ञांपेक्षाही उत्तमोत्तम मिळते. या शिवरात्रिव्रतानें जें पुण्य प्राप्त होतें, तें नानाप्रकारचीं दानें, यज्ञ, तपश्चर्या व कित्येक व्रतें करूनही प्राप्त होत नाहीं. किंबुहना, शिवरात्रीसारखें पापांचा नाश करणारें दुसरें व्रतच नाहीं. हें व्रत जाणतां घडो अथवा अज्ञानानें घडो, त्यानें मोक्षप्राप्ति अवश्य होतेच. हे व्रत ज्यांच्या हातून घडते, ते मुक्त होऊन शिवलोकाला जातात.

माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी महादेव सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने प्रगट होतात. या सृष्टीत जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्‍तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या पापांमुळे कलुषित झालेले मन शुद्ध होते. जो मनुष्य शिवरात्रीला शिवलिंगाची पाच विशेष मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्‍त होतो.
॥ ॐ सद्योजाताय नमः, ॐ वामदेवाय नमः, ॐ अघोराय नमः, ॐ ईशानाय नमः आणि ॐ तत्पुरुषाय नमः असे हे पाच मंत्र आहेत.
हे वरानने, ही शिवरात्रि सर्वमंगलकारिणी असून सर्व अशुभांचा नाश करणारी व भाविकांना त्वरित भोग-मोक्ष देणारी आहे. हे शिवरात्रिव्रत नरकयातना कसे दूर करते आणि शिवलोकाची प्राप्ती करून देते, याविषयीची पूर्वी घडलेली पौराणिक कथा तुला सांगतों, ती तू एकाग्रचित्ताने ऐक. 
पूर्वीच्या कल्पांत प्रत्यंत देशांतील पर्वताच्या मूलप्रदेशांत एक व्याध राहत होता. तो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचें पालन करीत असे. हा अत्यंत बलवान, धनुर्धारी, बद्धगोधांगुलित्राण अर्थात चर्माचे हातमोजे घालत असून सदैव मृगयेविषयीं आसक्त असे. एकदा त्याने गांवातील वाण्यांकडून उधार घेतलेले द्रव्य परत न केल्याने त्या वाण्यांनीं त्याला शिवाच्या मंदिरांत कोंडून ठेवला. कर्मधर्मसंयोगाने तो दिवस माघ कृष्ण चतुर्दशीचा होता. त्यामुळे, सूर्योदयीं त्याला महादेवाचें दर्शन तर घडलेंच तसेच त्यादिवशी व्रतस्थ भक्तांचें सदोदित शिव-शिव असे नामस्मरणराचें श्रवणही घडलें. बराच काळ त्याने त्या सर्व वाण्यांना, “ तुमचे ऋण मी लवकरच चुकते करेन.” अशी विनवणी केली आणि अखेर त्यांनी त्याला बंधमुक्त केले. नंतर तो धनुष्य घेऊन दक्षिणमार्गानें बाहेर निघाला आणि अरण्यात जात असतांना लोकांचा उपहास करूं लागला. तो बोलू लागला, “ आज नगरामध्यें सर्व लोक ‘शिव-शिव’ असा सतत नामगजर कशासाठी करत आहेत?” मनांत असा विचार करत तो व्याध शिकारीसाठी एखादा वन्य प्राणी दिसतो का? हे पाहू लागला. हरिण, सूकर, चितळे यांच्या पावलांच्या ठशांचा वेध घेत घेत तो लुब्धचित्त होऊन पर्वतासह अरण्यांत भटकू लागला. संध्याकाळ झाली तरी, त्यादिवशी एकही प्राणी त्याने लावलेल्या जाळ्यात सापडला तर नाहीच, शिवाय मृग, डुकर, चितळ हे तर कोठेंही दिसेनात, त्यामुळे तो व्याध अगदींच निराश झाला व एवढ्यांत सूर्यनारायणदेखील अस्तास गेला. दिवसभरांत अन्नाचा कणही त्याच्या पोटांत गेला नव्हता. अत्यंत क्षुधार्त झालेल्या त्याने विचार केला कीं रात्रीं या अरण्यातीलच जलाशयाच्या आसपास राहावे, आणि पाणी पिण्यासाठी जे वन्यचर येतील त्यांची शिकार करावी, आणि मग त्यायोगेच आपले व कुटुंबाचे उदरभरण करावे. मग त्याने तेथील एका सरोवराच्या तीरावर आपले जाळे पसरलें आणि तिथेच कोठेतरी लपून बसण्यासाठी जागा शोधू लागला. शिकारीसाठी त्याने जिथे ते जाळे लावले होते, त्याच्या मध्यभागी एक मोठें स्वयंभु शिवलिंग होतें व जवळच एक मोठा थोरला बेलाचा वृक्षही होता. त्या झाडावरच तो व्याध चढला आणि पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी स्पष्ट दिसावेत म्हणून त्या बेलवृक्षाचीं पानें तोडून खाली फेंकूं लागला, तीं भाग्यवशात त्या शिवलिंगावर पडूं लागलीं. सकाळपासून त्या दिवशी कोंडून ठेवल्यामुळे त्याला भोजन मिळालें नव्हते, मृगयेसाठी त्या रात्री जागरणही  घडलें. याप्रमाणे रात्रीचा एक प्रहर निघून गेला. तेव्हढ्यांत त्याला एका प्राण्याची चाहूल लागली. त्याने परत थोडी बिल्वपत्रे तोडली, अनावधानानेच, त्याच्याही नकळत तो सकाळी मंदिरात ऐकलेल्या शिव नामाचा उच्चार करीत होताच. अशा रितीने त्याच्या हातून महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरींची शिवपूजा घडली. त्या यामपूजेच्या प्रभावाने त्या व्याधाच्या एक चतुर्थांश पातकांचा नाश झाला. त्यावेळी त्या तळ्याकाठी एक गर्भार हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली त्या पारध्यास दिसली. तो तिरकमठा सावरून शरसंधान करणार इतक्यांत ती मृगी दिव्यवाणीने त्याला म्हणाली, “ हे व्याध्या  ! मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस ? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नकोस.” 
त्या हरिणीचे ते मनुष्यवाणीतील बोल ऐकून तो पारधी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “ हे मृगी, मी आणि माझे कुटुंब क्षुधेने अत्यंत पीडित असून मला ऋणमुक्तीसाठी द्रव्य संपादन करायचे आहे. म्हणूनच, मी तुला मारतो आहे. मी आजपर्यंत अनेक उत्तम, मध्यम, कनिष्ठप्रतीचे असे असंख्य जीव मारले परंतु त्या सर्व श्वापदांमध्यें अशी वाणी मात्र कधीं ऐकली नाही. तुला पाहून माझ्या हृदयांत करुणा निर्माण झाली आहे. तू कोण आहेस? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले ?”
त्यावर ती मृगी दिव्यवाणीत म्हणाली, “ हे व्याधश्रेष्ठा, माझा पूर्वजन्म वृत्तांत तुला सांगतें. मी पूर्वी स्वर्गाचा राजा इंद्र याच्या दरबारातील एक अप्सरा होतें. अनुपम रूप, लावण्य व सौभाग्य यांमुळे मी अत्यंत गर्विष्ठ झाले आणि हिरण्याक्ष नांवाच्या सामर्थ्यशाली दानवाशी मी विवाह केला. त्याच्याशीं सवहर्तमान मीं यथेच्छ भोग भोगले. त्या दुष्टाच्या सहवासामुळे मी उमापती महादेवाची आराधनाही करेनाशी झाले. मी दररोज शंकरापुढे प्रेक्षणीय असें नृत्य करीत असें. मात्र एके दिवशी भोगलालसेमुळे माझा तो नित्यनेम चुकला. आणि ‘ मज हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥’ तेव्हा मी अनन्य शरणागत होऊन प्रार्थना केली, “ हे शाप व अनुग्रह देण्यास समर्थ असणाऱ्या देवाधिदेवा, माझा भर्ता मला प्राणांहून प्रिय आहे, तो एक महाबलवान् दैत्य आहे. त्याच्या सहवासात मी शिवार्चन करणे सोडून दिले. मला क्षमा करा.” तेव्हा त्या परम दयाळू कैलासपतीने मला उ:शाप दिला, “ तू बारा वर्षे मृगी होऊन राहशील, जेव्हा एक व्याध तुझ्यावर शरसंधान करील त्यावेळीं तुला पूर्व जन्माचें स्मरण होईल व नंतर शंकराचें दर्शन घेऊन तू मोक्ष पावशील.” 
हे पूर्वजन्म कथन करून ती हरिणी पुढे म्हणाली, “ हे व्याध्या, मला आता तू सोडून दे. या स्थितीत माझा वध करणें योग्य नाहीं. हे लुब्धका, काही वेळांत दुसरी एक पुष्ट मृगी येईल, तिची शिकार केल्यास सहकुटुंब तुझें यथेच्छ भोजन घडेल. तसेच हे व्याधा, या तळ्यावर पाणी पिण्याकरितां दुसरा मृग प्रातःकाळी येईल, तो तुझ्या क्षुधाशमनार्थ नक्कीच उपयोगीं पडेल. अथवा मी घरीं जाऊन गर्भ प्रसवून मुलेबाळें माझ्या कुटुंबाच्या स्वाधीन करून इथे पुनः शपथपूर्वक येईन.” तिचें तें भाषण ऐकून व्याध मनांत आश्चर्यचकित झाला. मात्र तरीही तो त्या गर्भिण हरिणीस म्हणाला, " तू म्हणतेस ते कदाचित खरेही असेल. मात्र जर दुसरी मृगी किंवा मृग आला नाहीं, व आता मी सहज शिकार करू शकत असलेल्या तुलाही सोडली तर माझेच नुकसान होईल. कारण माझा आत्मा व विशेषतः कुटुंबाचे प्राण क्षुधेनें अत्यंत व्याकुळ झाले आहेत. परंतु प्रातःकाळीं तूं परतून येशील अशी ज्या योगे मला खात्री वाटेल, अशी तू शपथ घे. कारण पृथ्वी, वायु, सूर्य आदि सर्व देव-देवता ह्या सत्यास साक्षी असतात. त्यामुळे ज्यांना इहलोक व परलोक साधावयाचा असेल, त्यांनीं सदैव सत्याचे पालन करावे.”
त्याचे ते भाषण ऐकून गर्भाधाराने वेदनाग्रस्त झालेल्या हरिणीनें सत्य शपथ घेतली ती अशी - हे व्याधा, पुनः मी जर न येईन तर, वेदविहित कर्मे न करणाऱ्या, अनेक दुराचरण करणाऱ्या, आणि देवाचें द्रव्य, गुरूचें द्रव्य व ब्राह्मणाचें हरण करणाऱ्यांना जे पाप लागेल ते मला लागेल. असें मृगीचें भाषण ऐकून तो व्याध प्रसन्न झाला आणि त्यानें धनुष्यबाण ठेवून हरिणीला तत्काळ सोडून दिली. तिच्या त्या उक्तिप्रभावानें व लिंगाच्या पूजेनें व्याधाच्या पापाचा अजून एक चतुर्थांश भाग तत्काळ दूर झाला. हे गिरिजे, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी म्हणजेच मध्यरात्रीं शिव-शिव असें स्मरण करित असल्यामुळे त्या पारध्याला झोप आली नाहीं. 
एवढ्यांत दुसरी एक सुंदर हरिणी तेथें येत असल्याचे पाहून तो आनंदला. त्याने परत थोडी बेलाची पानें हातांनीं तोडून तीं दक्षिणभागीं टाकलीं आणि पुन्हा एकदा तीं बिल्वपत्रे शिवलिंगावर पडलीं. मग व्याधानें तिला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला आणि तो तिर सोडणार, हे त्या हरिणीने पहिले आणि ती म्हणे ‘ व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥’ हें तिचें भाषण ऐकून तो व्याध चकित होऊन क्षणमात्र विचार करू लागला, “पहिल्या हरिणीची जशी वाणी होती तशीच हिचीही आहे, हिलाही सर्व शास्त्रज्ञान अवगत असणार.” असे चिंतन करून तो त्या हरिणीला म्हणाला, “ तू धन्य आहेस !  तू पुनः येशील अशी सत्य प्रतिज्ञा कर आणि जा."
त्या हरिणीने सांगितलेली अनेक धर्मवचने ऐकून त्या व्याध्यास संतोष झाला आणि त्याने तिला सोडून दिले. त्या रात्री अतिशय थंडीनें, क्षुधेनें व गृहचिंतेनें त्याला झोंप लागली नाहीं, मुखी शिव नाम होतेच. मग तो सहज पुन्हा बेलाची पाने तोडू लागला.
थोड्याच वेळांत तिथे एक मृग आला. पहिल्या हरिणीने सांगितले होते, तसेच घडत असलेले पाहून तो पारधी हर्षित झाला. त्याने धनुष्याची प्रत्यंचा कानापर्यंत ओढून शरसंधान केलें, आणि आतां तो बाण सोडणार एवढ्यांत त्या हरिणानें व्याधाला पाहिलें. 
तोही मृग मनुष्यवाणींत बोलू लागला, “ हे व्याधा, इथे दोन हरिणी आल्या होत्या का ? त्या कोणत्या मार्गाने गेल्या ? तूं त्यांना मारले तर नाही ना ? माझी एक भार्या प्राणासारखी व दुसरी प्राण देणारी आहे. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व त्यांचे सांत्वन करून येतो.” हें त्याचें भाषण ऐकून व्याध विचार करूं लागला, “ हा हरिणसुद्धां सामान्य नव्हे, ही कोणीतरी सर्वोत्कृष्ट देवताच असावी.” मग तो त्या मृगास म्हणाला, “ दोन हरिणी माझ्यापाशीं शपथ घेऊन याच मार्गाने गेल्या. त्यांनींच तुला पाठविला असें वाटतें. आतां मी तुला त्वरित मारतों.”  
तेव्हा मृगाने विचारले, “ व्याध्या, त्या दोघींनीं तुझ्यापाशीं कोणती सत्यप्रतिज्ञा केली, कीं तुला विश्वास वाटून तूं दोघींनाही सोडून दिलेस ?” असा प्रश्न करतांच व्याधानें त्यां दोन्ही हरिणींनी सांगितलेले शास्त्रार्थ ज्ञान त्या मृगास कथन केले. ते ऐकून त्या हरिणास अत्यानंद झाला आणि तो बोलू लागला, “ हे व्याध्या, मी आता जाऊन माझी सर्व कर्तव्ये पूर्ण करून तसेच माझ्या सुहृदांची आज्ञा घेऊन शपथपूर्वक परत येईन.” त्याने सांगितलेले पापफळांचे सर्व निरूपण ऐकून व्याधाने त्यालाही जाऊ दिले. हे अपर्णे, तो हरिणही जालपाशांतून सुटल्यामुळे संतुष्ट होऊन जलप्राशन करून पुनः अरण्यांत गेला. त्या व्याधानें पुन्हा पहाटेच्या प्रहरीं बेलाची पानें तोडून शिवलिंगावर टाकलीं. अज्ञानानें का होईना, शिवरात्रीदिवशीं त्या व्याधाला उपोषण-जागरण घडलें व बिल्वपत्रांनी शिवपूजाही घडली, त्याच्या प्रभावानें सूर्योदयीं तो सर्व अघांतून तत्काळ मुक्त झाला. एवढ्यांत दुसरी एक मृगी तेथें आली. तिच्यासोबत तिचे एक लहानसे पाडस होते.  तिला पाहून व्याध्याने पुन्हा एकदा बाण धनुष्याला लावला, ते पाहून ती हरिणी दिव्यवाणीत बोलू लागली, “ हे व्याध्या, तू धर्मवचन जाणतोस. तू हा बाण सोडू नकोस, धर्माचे पालन कर. शास्त्रार्थानुसार मी अवध्य आहे, हे तुला ज्ञात आहे. एखादा धर्मशील राजा मृगयेसाठी निघाला तरी, निद्रिस्त, मैथुनासक्त, स्तनपान करणारा, किंवा व्याधिपीडित हरिण अथवा अन्य वन्य प्राणी तसेच लहान पाडसयुक्त हरिणी यांची कधीच शिकार करत नाहीं. सांप्रतकाळी, तू कदाचित् धर्म सोडून जर मला मारीत असलास तरी काही काळ जरा थांब. मी घरीं जाऊन माझें हे पाडस माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांभाळण्यास देते. आणि तुझ्याकडे परत येते. मग तू मला मार. मी जर दिलेले हे वचन पाळले नाही तर वेदादिक शास्त्रांत वर्णिलेली अनेक पापे मला लागतील.” हें तिचें भाषण ऐकून व्याध मनात विस्मित झाला आणि त्यानें त्या हरिणीलाही सोडले. त्या मृगीला आनंद झाला आणि आपल्या पिल्लासोबत ती अरण्यांत दिसेनाशी झाली.
तो व्याधही मग त्याच्या घरीं जाण्यासाठी निघाला. वाटेत जाता जाता त्या सत्यवादी हरिणांनी सांगितलेली धर्मशास्त्रातील वचनें आठवू लागला आणि या मृगांची व अन्य प्राण्यांची  नित्य हत्या करणारा मी कोणत्या गतीला जाईन बरें, असा मनोमन विचार करू लागला. तो व्याध आपल्या गृहीं परतला, त्यावेळी एक वेळच्या भोजनापुरतें सुद्धां अन्न किंवा मांस त्याने आणले नाही, हे पाहून घरातील सर्वचजण निराश झाले. त्या व्याध्याची लहान मुले, इतर सदस्य आता भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते. व्याधाचा मात्र जंगलातील त्या हरिणांनी घेतलेल्या शपथवाक्यांवर पूर्णतः विश्वास होता. “ मनुष्यवाणीने बोलणारी ती सर्व हरिणे धर्मात्मेच असून ते निश्चितच येतील, आपण मात्र यापुढे धर्मसंमत वागायचे आणि त्या मृग परिवाराची शिकार करायची नाही.” असा त्याने निश्चय केला. 
इकडे धर्मवचन ऐकून शपथांवर व्याधानें सोडलेला तो हरिण आपल्या आश्रमांत परतला. लवकरच पहिल्या हरिणीची प्रसूती होऊन तिने पाडसाला जन्म दिला. दुसर्‍या हरिणीने पतीला संतुष्ट केले. तिसऱ्या हरिणीने तिच्या लहानग्यास स्तनपान केले. अशा रितीने सर्वांचा निरोप घेऊन तो मृग आणि त्या तीन हरिणी सत्याचे पालन करीत त्या व्याध्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. तात्पर्य, पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे धर्मसंबंधाने मनोहर विचार करून कर्तव्याचे पालन करीत ते मृग कुटुंब तो व्याध जिथे होता, तिथे आले. 
व्याधाला पाहून तो मृग म्हणाला, “ व्याध्या, तू प्रथम मला मार, नंतर माझ्या या स्त्रियांना आणि त्यानंतर माझ्या मुलांना मार. आतां उशीर करूं नको. मृगांची हत्या केलीस म्हणून तुला कांहीं दोष लागणार नाहीं. कारण तुला तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ करायचा आहे. त्यायोगें आम्हांसही  मुक्तीचा लाभ होईल.”
त्या सत्यपालक मृगाचे हे बोल ऐकून तो व्याध म्हणाला, “ हे मृगराज, तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. मी तुमची शिकार करणार नाही. हे हरिणश्रेष्ठा, धर्माचा उपदेश करणारे तुम्ही सर्वचजण माझे गुरु आहात. आजपासून मी शस्त्रास्त्रे टाकली आणि धर्माश्रय घेतला.” 
तो मृग परिवार मात्र “ आम्ही शपथ घेतल्याने वचनबद्ध आहोत, आता आम्ही परत जाणार नाही. तू आम्हांस लवकर मार.” असे वारंवार म्हणू लागला. ते पाहून पश्चात्तापग्रस्त त्या व्याधानें बाणासह आपले धनुष्य तत्काल मोडून टाकलें व मृग परिवाराला त्याने नमन केले आणि त्रास दिल्याबद्दल क्षमाही मागितली.  
तोच अद्भुत घडले! स्वर्गातील देवांनीं दुंदुभी वाजविली. त्यावेळीं आकाशांतून दिव्य पुष्पवृष्टि होऊं लागली, आणि  शिवदूत त्या ठिकाणी उत्तम विमान घेऊन आले. त्या व्याध्यास ते शिवदूत दिव्यवाणीत म्हणाले, “ हे सत्त्वशीला, या विमानांत बसून तू सशरीर स्वर्गास जा. शिवरात्रिव्रताच्या प्रभावानें तुझें सर्व पाप क्षयाला गेलें. तुला महाशिवरात्रीच्या दिवशीं उपोषण घडलें, रात्रौ जागरण घडलें. अजाणतां कां होईना, दर प्रहरीं शिवाची यामपूजा घडली, त्या पुण्ययोगानें तुला आता शिवलोकीची प्राप्ती होईल.” 
पुढें ते शिवदूत वदले, “ हे धर्मपालक, सत्यवचनी मृगराजा, तूं आणि तुझ्या या तीनही स्त्रिया व पुत्र यांसहवर्तमान तुम्ही नक्षत्रपदाला जा. तें नक्षत्र तुझ्या नांवानें ( मृगशीर्ष नामाने) प्रसिद्ध होईल.” शिवदूतांचे हे भाषण ऐकून तो व्याध व तो मृग परिवार दिव्य विमानांत बसून नक्षत्रलोकाला गेले. 
हे पार्वती, त्या दोन हरिणींचा मार्ग तर अद्यापि स्पष्ट दिसतो व त्याच्या पृष्ठभागीं मण्याप्रमाणे एक नक्षत्र (व्याध) आणि त्याखाली तीन मोठीं तेजःपुंज नक्षत्रे आहेत, त्याला मृगशीर्ष असें म्हणतात. अग्रभागी दोन पाडसे, तर पृष्ठभागी तिसरी मृगी यांसहित मृगशीर्षांजवळ आलेला हा मृगराजा अद्यापही आकाशांत विराजमान दिसतो. व्याधाला शिवरात्रीदिवशीं सहजीं घडलेलें उपोषण, रात्रौ जागरण, व शिवपूजनही घडलें त्याचें असे फळ मिळाले. नकळत घडलेल्या व्रताचें जर एवढे फळ तर मग जे लोक भक्तिभावानें शुभकारक असें शिवरात्रीचें व्रत विधिपूर्वक, उपोषण-जागरणासह करतात त्याचें फल किती वर्णावे? जन्मोजन्मी केलेल्या पातकांचा नाश करणारें महाशिवरात्रीसारखें दुसरें प्रभावी व्रत नाहीं. सहस्र अश्वमेध केल्याने अथवा वाजपेय यज्ञ केल्याने जेवढे फळ प्राप्त होते, तेंच या महाशिवरात्रिव्रतानें प्राप्त होतें यांत संशय नाहीं. माघमासीं प्रयागांत स्नान करणारांला जें पुण्य लाभते व वैशाखांत द्वारावतींत स्नान करणारांला जें फळ मिळते, तपसि (ब्रह्मचाऱ्यानें) पालाशदंड घेतला असतां अथवा कार्तिकामध्यें माधवासमोर गयेस जाऊन विष्णुपदावर पिंड दिल्याने जी फलप्राप्ती होते, तोच लाभ हे महाशिवरात्रित्रत करणाऱ्या भाविकाला खरोखर प्राप्त होईल.  
॥ इति श्रीलिंगपुराणे महाशिवरात्रिव्रतकथा संपूर्णा ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

श्रीशिवोपासना : -

No comments:

Post a Comment