दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

May 15, 2024

श्रीगजानन माहात्म्य - अध्याय १५ ते २१


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अध्याय १५ ॥ 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय व्यंकटेशा वासुदेवा । मनमोहना हे माधवा । शेषशयना केशवा । गोविंदा दामोदरा नमितो तुज ॥१॥ करी पूर्ण मनोरथ । तूंची हाकिला अर्जुन रथ । अनाथांचा तूं नाथ । सखा तूंची भाविकांचा ॥२॥ असो तुज नमस्कार । हीन दीन मी पामर । जन कल्याणास्तव अवतार । अनंत रुपे नटलासी ॥३॥ भक्तवत्सला दयाघना । दावी सखयां तव चरणां । नामी रंगवी ही रसना । कवनांते या गोड करी ॥४॥ टिळक बाळ गंगाधर । राजकारणी अति चतुर । कीर्ति जाहली दूरवर । स्वातंत्र्य संग्राम गाजविला ॥५॥ लोकमान्य नर केसरी । जनतेचे हे पुढारी । शस्त्र लेखणी हीच खरी । इंग्रजांसी झुंजला ॥६॥ शिवजयंती उत्सवासी । टिळक आले अकोल्यासी । पाचारण केले गजाननासी । मंचकावरती बसविले ॥७॥ खापर्डे, दामले, कोल्हटकर । विद्वान वक्ते असतीं थोर । जनसमुह लोटला अपार । भाग्य खचित त्या नगरीचे ॥८॥ कोणा वाटे गजानन । मध्येच गातील भजन । परी धरूनी ते मौन । सभेंमाजी ते बैसती ॥९॥ राष्ट्रोद्धार हाच खरा । करवी हातें गंगाधरा । भोगीले ज्याने कारागारा । स्वातंत्र्य लढ्या कारणे ॥१०॥ पटवर्धन अप्पा साचे । राहणारे ते आळंदीचे । स्नेही तेच टिळकांचे । आले असती उत्सवासी ॥११॥ वऱ्हाडप्रांती अकोल्यासी । सभा झाली वैशाख मासी । अक्षय्य तृतीयेच्या दिवशी । सुयोग पर्वणीचा साधला ॥१२॥ सभा यशस्वी झाली खरी । टिळक गेले कारागारी । टिकास्त्र सोडिले इंग्रजांवरी । शुद्ध भाव तो अंतरीचा ॥१३॥ भूत-भविष्य-वर्तमान । जाणती हे गजानन । जन असती हे सामान्य । कर्तव्याची ना जाण तयां ॥१४॥ टिळक असता कारागारी । गजानन देती प्रसाद भाकरी । खापर्ड्यासी वदती जा सत्वरी । टिळका कारणे ती द्यावया ॥१५॥ मुंबईस गेले कोल्हटकर । प्रसाद घेऊनी भाकर । टिळक न करिती अव्हेर । कृपाप्रसाद तो स्वीकारिला ॥१६॥ मंडाल्याच्या तुरुंगात । गीतारहस्य लिहिला ग्रंथ । गजाननाचा वरदहस्त । शिरी खचितची राहिला ॥१७॥ कोल्हापूरचे करवीर । गोविंदसुत श्रीधर । काळे उपनांव साचार । गरीबीतच ते वाढले ॥१८॥ शिक्षण तेही जेमतेम । परी बुद्धी ती उत्तम । यश धंद्यामाजी हा भ्रम । द्रव्यार्जनांची नच शक्यता ॥१९॥ टोगो यामा दोघेजण । मित्र यांचे खचित जाण । सवें यांच्या विद्यार्जन । थोर गुण हा लाभला ॥२०॥ नसे कुणाची ती मदत । घरी गरीबी अत्यंत । तयां मनीं हीच खंत ।  मित्र एक भंडाऱ्यासी ॥२१॥ श्रीधराने पत्र टाकून । सविस्तर कळवी वर्तमान । मनांत होते ते कथन । मित्रासी त्या निवेदिले ॥२२॥ मित्र शिक्षक साचार । श्रीधरावरी प्रेम अपार । मजकूर वाचूनी करी विचार । मनीं निर्धार तो करीतसे ॥२३॥ ठरविती दोघे कोल्हापूर । शहर असे ते गुलजार । पत्रोपत्री व्यवहार । निश्चित तो जाहला ॥२४॥ घ्यावे गजाननाचे दर्शन । शेगांवी त्या जाऊन । रेल्वेमार्गावर ते जाण । भावना अंतरीची जाहली ॥२५॥ सद्‌गुरुचरणीं ज्यांचा भाव । पैलतीरा लावी नांव । स्टेशन ते शेगांव । गाठिलें हो त्या दोघांनी ॥२६॥ आले दोघे ते मठांत । गजानना जोडीले हात । जाणिती सकल ते संत । आशीर्वच तयांसी लाभला ॥२७॥ विचार न करणे आता । शांत ठेवा आपुल्या चित्ता । सुयश तयां चिंतीता । कार्य सफल ते जाहले ॥२८॥ लौकिकास पात्र श्रीधर । ग्राम लाभे कोल्हापूर । संत साक्षात परमेश्वर । सुपंथ भक्तास दाविती ॥२९॥ दर्शनाचा योग येतां । उचित घडले तत्त्वतां । दयाघना सिद्धहस्ता । शिरी आपल्या ठेवा सदा ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य पंचदशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १६ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ परशु असे शस्त्र हाती । कुमार जमदग्नीचा म्हणती । सपरशुराम माता ती । रेणुका ती मृगाचली ॥१॥ ताडीले तिने दुष्टांसी । संरक्षण दिले द्विजांसी । परी आता कां निष्ठुर होसी । माते अव्हेरिसी बालका ॥२॥ गजाननाचा भक्त एक । नाम त्याचे पुंडलीक । महान हा भाविक । मुंडगांवी राहतसे ॥३॥ शेगांवाची करी वारी । गजानना ध्यायी अंतरी । कृपा तीच तयांवरी । सद्‌गुरुची त्या जाहली ॥४॥ भागाबाई नामे ठाकरीण । राहत होती तिथे जाण । दंभाचार माजवून । भोंदित असे सकलांना ॥५॥ वदली ती पुंडलीका । जन्म तुझा रे फुका । शेगांवासी जासी कां? । सद्‌गुरु मानिसी वेड्यासी ॥६॥ ताप तुझा झाला बरा । म्हणुनी करिसी येरझारा । खातो कुणाच्याही घरा । पिशापरी तो राहतो ॥७॥ गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी । वेदांतासी जाणुनी । नित्य जो रंगे हरिचिंतनी । गुरु तोच खरा जाणावा ॥८॥ भागाबाई जशी सांगे । नादी तिच्या तसा लागे । अंजनगावी तिच्या संगे । जाऊ म्हणे कीर्तनासी ॥९॥ केजाजीच्या शिष्यातें । गुरु करणे ठरले होते । ऐसे मनीं येताची ते । जाण्या सिद्धची जाहले ॥१०॥ जाऊ म्हणे ती सकाळला । म्हणुन पुंडलीक झोपला । स्वप्न रात्री पडले त्याला । दिगंबर पुरुष उभा दिसे ॥११॥ शेगांवीचे गजानन । देती तयांसी दर्शन । मन जाई आनंदून । कानी तयांचे बोलता ॥१२॥ माजविती दंभाचार । लागती नादी नारी नर । वृत्ती त्यांची ती कठोर । ऐशासी गुरु का मानावे? ॥१३॥ तुझी असेल जी जी आस । पुरवीन मी तियेस । पुंडलीका लागला ध्यास । शेगांवीच्या अवलियाचा ॥१४॥ निरखून पाहता तो योगी । आला असे आपणालागी । अंजनगावचा तो ढोंगी । पुरुष तयां तो जाणवला ॥१५॥ नित्य व्हावया दर्शन । पादुका घेई तो मागून । करावया नित्य पूजन । मनीं निर्धार ठरविला ॥१६॥ पादुका तयां देऊन । महाराज पावले अंतर्धान । पुंडलीका जाग येऊन । सभोवार पाहू लागला ॥१७॥ पहाट होता खरी । भागाबाई तो उभी दारी । चाल म्हणे ती सत्वरी । अंजनगावासी जावया ॥१८॥ पुंडलीक तिज वदला । गजानन गुरु केला । पाठीराखा तो मला । दुजा न करणे गुरु असे ॥१९॥ शामसिंग मुंडगांवचा । भक्त तोही गजाननाचा । मार्ग धरी शेगांवचा । दर्शना कारणें सद्‌गुरुंच्या ॥२०॥ परतुनी जातां आपल्या गावी । महाराज वदले भेट घ्यावी । बाळाभाऊस सांगती नेण्या लावी । पादुका पुंडलीकासी द्यावया ॥२१॥ सद्‌गुरु आज्ञा घेऊन । शामसिंग गेला परतून । पादुका पुंडलीका देऊन । निघून गेला तो तेथूनी ॥२२॥ राजाराम नामे ब्राह्मण । धंदा सराफी दुकान । कृपा संतांची ती जाण । पुत्र दोन ते लाभले ॥२३॥ गोपाळ, त्र्यंबक नामे त्यांची । श्रद्धा देवावरी साची । सेवा तीच गजाननाची । भक्तिभावें त्र्यंबक करी ॥२४॥ इच्छा झाली तयां मनींं । द्यावी महाराजां मेजवानी । आवडीचे पदार्थ करोनी । भोजन आणिले गुरुराया ॥२५॥ विचार तैसा कवराचा । झुणका भाकरी देण्याचा । निर्धार होई मनाचा । स्टेशनावरी तो पातला ॥२६॥ वेळ झाला येण्या फार । गाडी निघून गेली दूर । दुसऱ्या गाडीस भरपूर । वेळ होता जाण्यासी ॥२७॥ परी न ढळला मानस । जाणे मनीं शेगांवास । झुणका भाकरी गजाननांस । कवर गेला द्यावयासी ॥२८॥ वाट पाही योगीराणा । गेला तोची दर्शना । न करिताची भोजनां । महाराज असती आसनी ॥२९॥ कवरासी त्या पाहून । हर्षित झाले गजानन । झुणका भाकरी मागून । घेती सद्‌गुरु खावया ॥३०॥ आनंदले दयाघन । कवरासी दिले अभिवचन । कार्य तव सफल जाण । होईल ऐसे सांगती ॥३१॥ भक्त मनीं आनंदला । माथा चरणीं त्याने ठेविला । परतुनी घरी गेला । तार आली असे गृहीं ॥३२॥ नोकरीचे बोलावणे । सत्य झाले गुरुकृपेनें । जो भजे तयां उणे । नच कांहीं घडतसे ॥३३॥ ऐसे येती अनुभव । जिथे भक्तिचा अभाव । तिथे कैसा हा प्रभाव । पहावया मिळेल हो? ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य षोडशोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १७ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय लक्ष्मीरमणा । शेषशायीं नारायणा । वैकुंठीचा तूंचि राणा । भक्तांकारणे प्रगटसी ॥१॥ प्रल्हादास्तव नरहरी । स्तंभामाजी श्रीहरी । हिरण्यकश्यपू असूरी । पोट विदारुनी मारिला ॥२॥ उग्ररुप तव जरी । प्रल्हादाचा कैवारी । घेसी तयां अंकावरी । भक्त सखा तूंची खरा ॥३॥ तैसी कृपा असो देवा । मुंगी साखरेचा रवा । गोड करूनी घेई सेवा । हीच विनंती तुज असो ॥४॥ भक्त प्रिय गजानना । अकोल्यासी त्या जाणा । स्वयें देऊनी दर्शना । तयां गृहीं राहसी ॥५॥ कृष्णा बापू चापडगांवी । बच्चुलालाने भेट घ्यावी । जीजाई पंडीत आणिक नवी । भक्त मंडळी असती तव ॥६॥ खटाऊच्या गिरणीत । समर्थ येती अकोल्यात । मुक्कामासी अवचित । कल्पना नसता कुणांसही ॥७॥ विष्णुसा नामें सावकार । ग्राम ज्याचे मलकापूर । घेऊनी यावे हा निर्धार । महाराजांसी आपुल्या गृहीं ॥८॥ म्हणून गेला अकोल्यास । विनविता झाला भास्करास । जो गजाननाचा शिष्य खास । केले बोलणे तयां सवे ॥९॥ दिले तयासी वचन । मलकापुरी येईन घेऊन । महाराजांसी निश्चित जाण । समाधान झाले विष्णुसाचे ॥१०॥ भास्कर विनवी सद्‌गुरुसी । जाणे असे मलकापुरासी । परी नकार देती त्यासी । अट्टाहासे तो बैसला ॥११॥ आग्रहास्तव गजानन । गाडीत बैसले जाऊन । वस्त्ररहित पाहून । कुजबुज जन करीत ते ॥१२॥ महाराज उठले तेथून । नजर त्यांची चुकवून । डबा बायकांचा पाहून । त्याच ठायीं बैसले ॥१३॥ मूर्ति पाहूनी दिगंबर । स्त्रिया घाबरल्या फार । ओढिली साखळी अखेर । कथिला वृत्तांत पोलिसाला ॥१४॥ येई अधिकारी पोलिसाचा । हात धरी महाराजांचा । यत्न त्याचा उतरविण्याचा । परी न मानिती गजानन ॥१५॥ अधिकारी गेला स्टेशनासी । सांगितला वृत्तांत मास्तरासी । स्टेशनमास्तर डब्यापाशी । घेऊन आला त्वरीत तो ॥१६॥ योगीराज गजानन । बघता द्रवले त्याचे मन । वदे जरी हे नग्न । सोडून द्यावे हो यांजला ॥१७॥ असती हे संत थोर । साक्षात भगवंत अवतार । असे खचित मी लाचार । गुन्हेगार नसती खरे ॥१८॥ अती आदरे केले नमन । महाराजा घेतले उतरून । पुढे जठार साहेब येऊन । खटला तयांवरी भरला असे ॥१९॥ व्यंकटराव अकोल्याचे । देसाई घराणे त्यांचे । कामानिमित्त येणे त्यांचे । आले असती त्या ठायीं ॥२०॥ मंडळी जमली तिथे फार । खटला ऐकण्या बंगल्यावर । देसाई नामें गृहस्थ थोर । जठार साहेबा विचारती ॥२१॥ काय असे इथे आज । समोर दिसती महाराज । आणि इतरही समाज । जमण्या हें कारण काय असे ॥२२॥ जठार वदती तयांसी । कसे न ठावे तुम्हांसी । चालविणे आहे खटल्यासी । गजाननांवरी जो भरला असे ॥२३॥ देसाई झाले मनीं खिन्न । विनंती करिती कर जोडून । भगवत् मूर्ति गजानन । खटला नका हा चालवू ॥२४॥ गजानन हा योगीराणा । वंदनीय असती अवघ्यांना । चूक झाली असे जाणा । इथे तयांसी आणविले ॥२५॥ शिष्य भास्कर सवे आला । खुर्ची दिली बसण्या त्यांला । जठार वदती स्वामींला । वस्त्राविणे फिरणे योग्य नसे ॥२६॥ महाराज होते आसनी । जठारास वदती हासुनी । गुन्हेगार आम्ही कायद्यानी । योग्य वाटे ते करा ॥२७॥ तयां वदती आपण । चिलम भरावी न लावी क्षण । ऐसे ऐकता वचन । भानावरती ते आले ॥२८॥ पांच रुपये भास्कराला । जठारांनी दंड केला । निकाल तो ऐसा दिला । महाराजा ठेविले विवस्त्र म्हणुनी ॥२९॥ एकदां अकोल्यास गजानन । असता मेहताब येऊन । एकमेका आलिंगन । देते झाले त्या ठायीं ॥३०॥ हिंदु आणि मुसलमान । भेद न त्या ठायीं जाण । कराया जन-कल्याण । सिद्धपुरुष ते खचितची ॥३१॥ नंतर गेले अकोटासी । भेट द्याया नरसिंहजीसी । जाऊनि बसती विहिरीपासी । आंत डोकावून पाहती ॥३२॥ वदती घडावे स्नान । आंत सोडूनी बसती चरण । पाणी येई उफाळून । स्नान घडले संतांसी ॥३३॥ या रे या रे सारे जण । तीर्थांमाजी करी स्नान । सकलां करिती पावन । अधिकार तोचि सद्‌गुरुंचा ॥३४॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य सप्तदशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय १८ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा । कुंडले कानी किरीट माथा । पितांबर कटी जगन्नाथा । अनंत रूपे नटलासी ॥१॥ द्वारका मथुरा वृंदावन । तुझ्या कृपेने झाले पावन । खेळगडी ते गोपगण । जगज्जीवना श्रीहरी ॥२॥ दळू लागला जनीसी । वेड लाविले मीरेसी । उभा ठाकला पंढरीसी । पुंडलीकास्तव विठ्ठला ॥३॥ युगानुयुगे भक्तगण । तिथे येती घ्यायां दर्शन । दीनानाथ दयाघन । पतितपावन तूंच की ॥४॥ बायजा नामे भक्तिण । दैवत तिचे गजानन । जातीने ती माळीण । मुंडगांव ग्राम तिचे ॥५॥ बालपणी लग्न झाले । भाग्यात होते लिहिले । संसार सुख ना लाभले । षंढ पती तिचा असे ॥६॥ माता-पित्या दुःख अती । करून द्यावा दुसरा पती । विचार येई ऐसा चित्ती । भुलाई शिवरामा वदतसे ॥७॥ शिवराम पिता त्यांवर । पत्नीस वदे न सोडी धीर । नशीबीच नसेल संसार । दोष तिचा काय असे ॥८॥ करून पाहू उपचार । भोलाई होई निरुत्तर । तारुण्याचा अवसर । बायजा सुंदर, रुपवती ॥९॥ थोरला दीर तिज पाहून । कामुक होई त्याचे मन । बायजा सवें भाषण । सप्रेमें तो करी सदा ॥१०॥ प्रयत्न केले अती त्याने । नाकारीले तयां बायजाने । पती पत्नी नाते जोडणे । कदापिही मान्य नसे ॥११॥ नित्य काळ हरी स्मरणीं । घातला असे बायजानी । मिठी घातली चरणीं । लाज राखावी प्रभूवरा ॥१२॥ जेष्ठ दीर बायजापासी । हेतू वाईट धरून मानसी । रात्रीच्या समयासी । उन्मत्त होऊनी पातला ॥१३॥ बायजा होई लाचार । परी धरुनिया धीर । सोडा म्हणे अविचार । पित्यासमान मज तुम्ही ॥१४॥ अंगावरी टाकतां हात । पडला माडीवरून त्याचा सुत । बायजा जाऊनी धावत । बालकां घेई उचलूनी ॥१५॥ खोक पडली डोक्यास । बायजा लावी औषधास । करणीचे फळ दिरास । मिळालेच ना म्हणतसे ॥१६॥ भुलाबाई आणि शिवराम पिता । शेगांवी येती तत्त्वतां । महाराजांसी विचारता । होई भाकीत बायजाचे ॥१७॥ जरी लग्न करिसी बायजाचे । पुत्र नाही नशिबी हिचे । कल्याण करणे जरी तिचे । घेऊनी जावे स्वग्रामीं ॥१८॥ जेवढे पुरुष असती कोणी । बंधू पिता समजूनी । वागणे तिचे तूं मानी । विधीलिखित सत्य हे ॥१९॥ बायजेसी झाला आनंद । नामस्मरणी परमानंद । ध्यानींमनीं तो श्रीरंग । पुंडलीका सवे राही सदा ॥२०॥ पुंडलीका समवेत । येई बायजा शेगांवात । पुंडलीक गजानन भक्त । मुंडगांव हे ग्राम त्याचे ॥२१॥ नित्य करिती दोघे वारी । गजाननाच्या दरबारी । शुद्धभाव तो अंतरी । जन निंदा ती होत असे ॥२२॥ ही राहील जन्मभरी । वृत्ती सदा ब्रह्मचारी । जनांबाई पंढरपूरी । ऐशापरी ती राहिली ॥२३॥ खामगांवला भक्त थोर । होता राजाराम कवर । फोड झाला दुर्धर । डॉक्टर अधिकारी आणविला ॥२४॥ बहुत केले उपचार । आराम नसे तीळभर । कवराने टाकिला भार । सद्‌गुरु गजाननांवरी ॥२५॥ रात्रीच्या त्या समयासी । ब्राह्मणरूपे दारासी । हाक मारी कवरासी । परी ओळख कुणा नच त्यांची ॥२६॥ तीर्थ अंगारा घेऊन । आलो शेगांवाहून । फोडासी द्यावा लावून । तीर्थ पाजून हो द्यावे ॥२७॥ देऊन तीर्थ अंगारा । गेला ब्राह्मण माघारा । फोड तो फुटला खरा । अंगारा तो लावतांची ॥२८॥ पंढरपुरा गेले जन । सवे होते गजानन । पाटील मंडळी सज्जन । सुख सोहळा तो पाहती ॥२९॥ सर्व गेले दर्शनासी । सोडूनी मागे बापुन्यासी । तो वदला गजाननासी । दर्शन मजला घडवा हो ॥३०॥ गजाननाने केली मात । स्वयें होती पंढरीनाथ । बापुन्यास पडे भ्रांत । कैसे अघटीत घडले हे ॥३१॥ मृत श्वान जागविले । भक्तगणां सुखविले । कार्य ऐसे थोर झाले । कृपेने तव गजानना ॥३२॥
॥ इतिश्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य अष्टादशोsध्यायः समाप्तः
*********************
॥ अध्याय १९ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय नंदनंदना मुकुंदा । परमानंदा आनंदकंदा । व्रजभूषणा गोविंदा । नमन तुजला श्रीधरा ॥१॥ करुणाघना राधारमणा । दीनवत्सला दयाघना । ब्रजपाला राजीवनयना । मागणे एकच तुजप्रति ॥२॥ शेगांवासी मज न्यावे । चरणीं  संतांच्या घालावे । अभयदान मज द्यावे । प्रासादिक हे लिहावया ॥३॥ शेगांवी असता संत । आला दर्शना काशीनाथ । खंडेरावाचा हा सुत । गद्रे घराण्यांत जन्मला ॥४॥ कृपा जाहली तयांवर । घरी आली असे तार । मन झाले असे आतूर । खामगांवा जावयांसी ॥५॥ तार घेऊन हातात । उभा शिपाई दारात । मजकूर पाहता त्यांत । समाधान तयां वाटले ॥६॥ हुद्दा मुनसफीचा खास । मिळाला असे हो तयांस । मोर्शी नामे ग्रामांस । जाणे लागले तयांसी ॥७॥ गजानन येती नागपूरी । बुटी गोपाळराव यांचे घरी । घराणें हे परोपकारी । संतसेवा ब्रीद साचे ॥८॥ शेगांवचे भक्तगण । महाराज जातां दुःखी मन । आणावे तयां परतून । इच्छा त्यांची तीच असे ॥९॥ शेगांवीचे लोक आले । बुटी-सदनासी ते गेले । सद्‌गुरुचरण वंदीले । गोपाळ, हरी पाटलाने ॥१०॥ वदती गजानन पाटलासी । घेऊन चला शेगांवासी । इथे न गमे आम्हांसी । सांगती ते सकळ जन ॥११॥ बुटी-गृहीं भोजन । घेऊनी निघती गजानन । आशीर्वच तयां देऊन । घरी गेले रघुजीच्या ॥१२॥ राजे रघुजी असती थोर । लौकिक तयांंचा दूरवर । केला महाराजां पाहुणचार । रामटेक मुक्काम गाठला ॥१३॥ घेऊनी रामाचे दर्शन । शेगांवी गेले गजानन । हरी पाटलासी घेऊन । समागमे भक्तांच्या ॥१४॥ धार कल्याणचे रंगनाथ । स्वामी आले शेगांवात । अध्यात्मातुनी संकेत । देत असती एकमेकां ॥१५॥ वासुदेवानंद सरस्वती । कृष्णा तटाकी ज्यांची महती । कर्म योगी ज्यांची प्रिती । सिद्ध योगी तोही असे ॥१६॥ येणार इथे भेटायासी । सांगती गजानन बाळासी । प्रेमभाव हृदयासी । ज्ञानसंपन्न तो कर्मठ ॥१७॥ स्वामी येताचि आदर । कथित केला समाचार । हर्ष झालासे अपार । हरिहर भेट ती जाहली ॥१८॥ करुनी गजानना वंदन । गेले योगेश्वर परतून । मार्ग त्यांचा असे भिन्न । आपणाहूनी खचितची ॥१९॥ सांगती बाळाभाऊसी गजानन । ईश्वर भक्तिचे मार्ग तीन । व्रत वैकल्ये अनुष्ठान । हीच अंगे कर्माची ॥२० शुद्धभाव लीनता । अंगी असावी तत्त्वतां । भजनीं पूजनी आस्था । नामस्मरण हे सत्यचि ॥२१॥ योगी मुनी जे भूवरी । कर्म मार्ग हा आचरी । तयां योगे श्रीहरी । होऊनी त्यांचा राहिला ॥२२॥ साळुबाई भक्त थोर । ग्राम तिचे वैजापूर । वाडेंघोडें माहेर । गजानन दरबारी राहिली ॥२३॥ वेदविद्येचा जाणता । गजानन ज्ञानसविता । वैदिक कुणी वेद म्हणता । चुकताची सद्‌गुरु सांगती ॥२४॥ आत्माराम वेदसंपन्न । सेवेसी अर्पिले जीवन । गजानन सेवेकारण । एकनिष्ठ भक्त तो ॥२५॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुजा नारायण जामकर । दूधच ज्याचा आहार । भक्त तीन जाहले ॥२६॥ मोरगांवी मारुतीपंत । पीक होते शेतांत । रक्षण पिकाचे करण्याप्रत । तिमाजी नामे एक होता ॥२७॥ रास होती खळ्यांत । तिमाजी झाला निद्रित । गाढवे येऊनी खात । असती धान्य ते खळ्यांतील ॥२८॥ गजानने केली लीला । जागविले तिमाजीला । गाढवे पाहता घाबरला । महाराज अदृष्य जाहले ॥२९॥ तिमाजी सांगे मालकासी । मारुतीपंत ना रागविले त्यासी । गजानन सांगती येता दर्शनासी । प्रकार घडला तो तैसा ॥३०॥ शके अठराशे सोळात । महाराज आले बाळापुरात । स्वारी बैसली आनंदात । बैठकीसमोर सुखलालाच्या ॥३१ ॥ मूर्ति होती दिगंबर । भाविक करिती नमस्कार । आला पोलीस हवालदार । मारु लागला महाराजा ॥३२॥ त्याचा परिणाम तो झाला । आप्त गेले स्वर्गाला । हवालदारही ना राहिला । पंधरा दिवसातच स्वर्गवासी ॥३३॥ पंढरपुरी येती गजानन । चंद्रभागेचे केले स्नान । विठ्ठलाचे दर्शन । घेतले मंदिरी जाऊनी ॥३४॥ जोडूनिया करां । विनविले रुक्मिणीवरां । आता द्यावा आसरा । चरणांपासी पांडुरंगा ॥३५॥ हरी पाटील त्यावेळी । होते तिथे सद्‌गुरुजवळी । आणिकही ती मंडळी । विठ्ठल दरबारी असती ते ॥३६॥ डोळ्यांतूनी वाहें पाणी । गजानना पाहिले सर्वांनी । आले शेगांवी परतुनी । चिंता मनीं वाटतसे ॥३७॥ सोडणार गजानन संगत । जाहले हे सर्वां श्रृत । मनीं सकलांच्या ती खंत । भक्त येती दर्शना ॥३८॥ गणेश चतुर्थीचे दिवशी । महाराज वदले सकलांसी । आता गणपती बोळविण्यासी । यावे तुम्ही मठांत ॥३९॥ चतुर्थीचा तो दिवस । आनंदात काढिला खास । बाळाभाऊच्या धरिले करास । आसनावरी ते बैसवले ॥४०॥ शके अठराशे बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवासरी प्रहर दिवसाला ॥४१॥ प्राण रोधिता शब्द केला । 'जय गजानन' ऐसा भला । सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवात संत तो ॥४२॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकोनविंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २० ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी शारङ्गधरा । शिरावरी या ठेवी करां । जगन्नायका विश्वंभरा । सर्व सूत्रें तुझे हाती ॥१॥ दीनानाथा श्रीपती । कुंठीत झाली असे मती । द्यावी सख्या अनुमती । कार्य हे करावया ॥२॥ पाप ताप भवभय । हारी आता देई अभय । मी वासरु तू गाय । प्रेमे पान्हा पाजी तूं ॥३॥ शामसुंदरा श्रीधरा । पतितपावना परम उदारा । पितांबर कटी मुकुटी तुरा । कंठी हार ते शोभती ॥४॥ मनां लागली हुरहुर । समाधिस्थ ते झाल्यावर । नसे द्यावया कुणी धीर । हळहळती सकळ नरनारी ॥५॥ तुटली म्हणती कुणी नाती । ऐसे कितीक जन बोलती । परी तीच असे भ्रांती । अदृष्य असती त्याच ठायीं ॥६॥ श्री गजानन शेगांवात । स्वप्नी देती दृष्टांत । भक्तालागी सुखवित । अनुभव हाची येत असे ॥७॥ कोठाडे नामे गणपत । राहत होता शेगांवात । रायली म्हणुनी कंपनीत । एजंट होता दुकानाचा ॥८॥ नित्य नेम दर्शनाचा । ‘गजानन गजानन’ बोले वाचा । परिपाठ हाच तयांचा । मठामाजी जात असे ॥९॥ अभिषेक करूनी समाधीस । भोजन घालावे ब्राह्मणांस । विजयादशमी मुहूर्तास । सिद्धता ती करी सर्व ॥१०॥ कांता वदे अन्नदान । नेहमीच करितां आपण । उद्या आहे मोठा सण । लक्ष प्रपंची असूं द्यावे ॥११॥ रात्रीस पडले तिला स्वप्न । मूर्ति गजानन पुढे नग्न । होत आहे हे प्रयोजन । यासी न अडथळा आणणे ॥१२॥ खर्च नसे अनाठायीं । ब्राह्मणां वाटणे गायीं । परमार्थ करणे ठायीं ठायीं । या सम पुण्य दुजे नसे ॥१३॥ पतीस झाली ती सांगती । आनंद न मावे त्याच्या चित्ती । पालटली तिची ती मती । कुविचार मनीं नच राहिला ॥१४॥ लक्ष्मण हरी जांजळास । अनुभव आला असे खास । बोरीबंदर स्टेशनास । संन्यासी रूपाने भेटले ॥१५॥ आजानुबाहू परमहंस । दृष्टी नासाग्री दिसे खास । बोलले असती लक्ष्मणास । गजाननाचा शिष्य अससी तूं ॥१६॥ कां होसी रे हताश । नच कळे हे आम्हांस । काळजी असे तुझी त्यास । पुण्यतिथी केलीस साजिरी ॥१७॥ पुत्रशोक बापटासी । असून आला प्रसादासी । खास म्हणून गेहासी । सत्य असेच ते सांग ना? ॥१८॥ लक्ष्मण होतसे कष्टी । खुणेच्या ऐकोनी गोष्टी । समर्थ देती तयां पुष्टी । परी कोण असेल ते कळेना ॥१९॥ आदरें केला नमस्कार । गुप्त झाले योगेश्वर । स्टेशन तेच बोरीबंदर । ध्यानीं मनीं लक्ष्मणाच्या ॥२०॥ भेट देती अनेकांना । शुद्धभाव जे ठेविती मनां । तयांंची पुरवी कामना । संत गजानन अवलिया ॥२१॥ माधव मार्तंड असे जोशी । कळंबचा तो रहिवासी । रेव्हिन्यू ऑफिसर पदविसी । ठेवी गजाननावर भरंवसा ॥२२॥ गुरुवार होता दिन । वाटे घ्यावे दर्शन । शेगांवासी जाऊन । परतून जावे स्वग्रामां ॥२३॥ शिपाई कुतुबुद्दीन । बोलला तयां कर जोडून । आले आभाळ भरून । गाडीत जाणे बरे नव्हे ॥२४॥ मन नदीस होता पूर । तरी होऊ म्हणे नदीपार । दमणी करवी तयार । शेगांवी जाण्याकारणे ॥२५॥ झंझावात सुटला वारा । वर्षा होई पडल्या गारा । उडवू पाहे वारा छपरा । घाबरले ते मानसी ॥२६॥ पुरामाजी केले रक्षण । आले धावूनी गजानन । पैलतीरी पोचवून । रक्षण केले स्मरतांची ॥२७॥ अनेकांच्या अनेक व्यथा । निवारिल्या सद्‌गुरुनाथा । तूच कैवारी दीनानाथा । अनन्यभावें भजता तुज ॥२८॥ तीर्थ-अंगारा गुणकारी । नित्य करितां तिथे वारी । जिथे गजानन हृदयांतरी । पावन होती ते भक्तगणां ॥२९॥ खऱ्या खऱ्या संतांची । सेवा न जाई वाया साची । परी निष्ठा मानवाची । जडावी लागे सत्यची ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य विंशोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय २१ ॥
॥ श्रीगणेशाय नमः॥ जय जय अनंता अद्वैता । अविनाशा भगवंता । भवभयहरणा गुणातिता । ब्रह्मांडनायका नमितो तुज ॥१॥ तूंच अससी सर्वांठायीं । नतमस्तक हे तुझिया पायीं । नारद तुंबरु तुजला ध्यायीं । जगज्जीवना जगत्पते ॥२॥ हातें घडता पातकांसी । तूंच निवारण करिसी त्यासी । धाव वेगी हृषीकेशी । भक्तवत्सला दीनबंधो ॥३॥ पतितपावन तुजला म्हणती । सतेज सुंदर लख लख कांती । चक्र सुदर्शन धरीले हाती । संहारक तूं दुष्टांचा ॥४॥ जो जो येई भेटण्यासी । चिंता नेसी तूं लयासी । जे जे आवडे देसी त्यासी । पूर्णानंद तू व्यंकटेशा ॥५॥ पाप-पुण्याची वासना । उपजविसी तूंच नारायणा । पसायदान देई या दीना । कळस अध्याय गोड करी ॥६॥ स्तोत्र कथा तुझे गाणे । गाती भक्तगण आवडीने । गजाननाची  ही स्तवने । भाव पुष्पे ही समर्पिली ॥७॥ आता असावे सावधान । कळस अध्याय हा करिता कथन । कर्ता करविता गजानन । निमित्तासी कारण दास असे ॥८॥ एकनिष्ठा असे ज्याची । सेवा करण्या गजाननाची । सार्थकता त्या जीवनाची । कृपाप्रसाद तो लाभता ॥९॥ बांधित असता मंदिर । काम करिता शिखरावर । खाली पडला एक मजूर । हाताखालचा गवंड्याच्या ॥१०॥ तीस फुटावरून खाली । देहयष्टी ती कोसळली । घडीव चिरे त्या स्थलीं । तयां वाचविती गजानन ॥११॥ एक बाई रजपुताची । राहणार ती जयपूरची । बाधा तिजला भूताची । तयां कारणे ती आली ॥१२॥ दत्तात्रयाचा दृष्टांत झाला । ती असता जयपूरला । जाई तूं रामनवमीला । शेगांवी गजानन दर्शनासी ॥१३॥ दृष्टांत झाला म्हणून । आली मुलांस घेऊन । उत्सव असता संपन्न । सभा मंडपी ती बैसली ॥१४॥ खांब तिथे दगडाचे । उभे असती मंडपाचे । भाग्य उजळण्या त्या साध्वीचे । खांब तिथे कोसळला ॥१५॥ खांब अंगावरी पडला । इजा मुळी न झाली तिला । लोकांनी तो उचलिला । वाचले प्राण त्या बाईचे ॥१६॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । परमभक्त गजाननाचा । रहिवासी तो शेगांवचा । घरी गेले गजानन  ॥१७॥ गोसाव्याचा असे वेष । मागती तयां भोजनांस । देती सद्‌गुरु हाकेस । दारासी तो पातला ॥१८॥ निरखून पाहता गोसाव्यासी । स्वामी गजानन दिसती त्यासी । धरुनिया हातासी । पाटावरती बसविले ॥१९॥ सुग्रास दिले भोजन । गोसावी पावला समाधान । आशीर्वच तयां देऊन । अंतर्धान ते पावले ॥२०॥ श्रीगजानन चरित्र । असे हे परम पावन पवित्र । निष्ठा सबळ पाहिजे मात्र । अनुभव तोची यावया ॥२१॥ गजानन चरित्र अवतरणिका । उमजावी ही अनेका । यातील आशय थोडका । अध्याय एकविसावा हा असे ॥२२॥ मंगलाचरण प्रथमोध्यायी ।  गुरुदेवाच्या वंदन पायी । निवेदन या ठायीं । सार तेच या असे ॥२३॥ माघ वद्य सप्तमीसी । संत गजानन शेगांवासी । देविदास सदनापासी । प्रगट पहा ते जाहले ॥२४॥ बंकटा सदनीं राहिले । मनोवांच्छीत पुरविले । अकस्मात निघून गेले । चिंता मनीं बंकटाच्या ॥२५॥ टाकळीकरांच्या कीर्तनांत । भाविकां दिसले संत । पितांबराकडुनी तुंब्यात । पाणी तयांंनी भरविले ॥२६॥ पुढील अध्यायी अनेका । चमत्कार येती भाविकां । पार लावी जीवन नौका । संत-कृपा तीच खरी ॥२७॥ बालक असतां अज्ञान । माता करी संगोपन । तयांपरी गजानन । भक्तगणांते सांभाळी ॥२८॥ दृढ धरा मनींं भाव । रक्षण करितां हाच देव । श्री गजानन दयार्णव । मनोरथ पूर्ण करितसे ॥२९॥ गजानना प्रिय दुर्वांकुर । एकवीस अध्याय हेच सार । भाव पुष्प चरणांवर । सद्‌गुरुंच्या या वाहिले ॥३०॥ होऊनिया शुचिर्भूत । आसनावरी व्हावे स्थित । श्रद्धाभाव ठेऊनी मनांत । चरित्र पाठ हा करावाची ॥३१॥ माधव तनय पार्वती कुमार । ग्राम ज्याचे मेहकर । मुक्काम हल्ली नागपूर । कळस अध्याय संपविला ॥३२॥ पौष वद्य द्वादशी गुरुवार । कालयुक्त नाम संवत्सर । श्रीगजानन माहात्म्य साकार । कृपेने तयांच्या जाहले ॥३३॥ श्रीगजानना सद्‌गुरुनाथा । तव चरणीं विनम्र माथा । शिरी ठेवी कृपाहस्ता । अभय दान हे मागतसे ॥३४॥ माता पिता दीन बंधू । कृपा सागर करुणा सिंधू । योगी महात्मा गजानन साधू । वंदन भावें तयांप्रती ॥३५॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य एकविंशोsध्याय: समाप्तः ॥
॥ शुभं भवतु ॥
॥श्रीगजानन महाराजार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

श्रीगजानन माहात्म्य :


No comments:

Post a Comment