दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

May 15, 2024

श्रीगजानन माहात्म्य - अध्याय १ ते ७


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अध्याय १ ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी गणनायका । लंबोदरा विनायका । वास तव त्रिलोका । गौरीसुता नमितो तुज ॥१॥ वाग्देवी देवी शारदे । कृपाप्रसाद लाभू दे । मतिमंदा बुद्धी दे । वरददायिनी हो मज ॥२॥ तैसे नमन देवांगणा । कुलदेवते संतजनां । स्थिर करी मन्मना । गजानन माहात्म्य लिहावयां ॥३॥ गजानन विजय ग्रंथ थोर । भक्तजनां आवडे फार । पारायणे करिती नारीनर । समाधान चित्ता होतसे ॥४॥ परी प्रपंचाचा भार । साहूनी करिती व्यवहार । कुणी होती लाचार । सेवा न घडे हातुनी ॥५॥ हुरहुर वाटे मनीं । रत व्हावे पारायणी । रमावे वाटे चिंतनी । नत मस्तक चरणी व्हावया ॥६॥ तयांसाठी गजानना । वाटे दिधली प्रेरणा । दुर्वांकुराची रचना । हाते करवूनी घेसी तू ॥७॥ स्तोत्ररुपी नमस्कार । पठणमात्रें चिंता दूर । अनुभविती जन साचार । प्रचिती ज्यांना येतसे ॥८॥ त्यांचीच आज्ञा म्हणून । चरित्र त्यांचे लहान । लिहावयासी कारण । निमित्तमात्र मी असे ॥९॥ मूळपोथी ओव्या फार । पारायणा लागे उशिर । तयांस्तव हे सार । थोडक्यात रचियले ॥१०॥ उपासना ही त्यासाठी । नामस्मरणें देव पाठी । भक्तां तारी तो संकटी । पापतापभयहारक ॥११॥ असा योगी गजानन । शेगांवा करण्या पावन । माध्यान्हीं बघती जन । अकस्मात पातला ॥१२॥ माघ वद्य सप्तमीसी । आला ज्ञानरवि उदयासी । सुखदायी सर्वांसी । भाविकांसी तारावया ॥१३॥ तिथे येई अग्रवाल । नाम त्याचे बंकटलाल । रत्न त्यासी वाटे अमोल । गवसले हे भाग्य त्याचे ॥१४॥ देविदास नामे सज्जन । होता तिथे एक जाण । कांही कारणे अन्नदान । घडले होते त्या गृहीं ॥१५॥ उच्छिष्ट पात्रे बाहेर । टाकिती गृहासमोर । तिथे हा योगीवर । गजानन पातला ॥१६॥ नसे कांही तयांपाशी । पाहता वेडा भासे जनांंसी । भोपळा एक पाण्यासी । वृत्ती सदा शांत ती ॥१७॥ पात्रावरचे अन्न कण । खाई एक-एक वेचून । भोपळ्यात नसे जीवन । तरी न खंत मनीं असे ॥१८॥ अन्न परब्रह्म जाणावया । केली असे त्यांनी लीलया । जनांलागी पटवावया । कृती ऐसी करितसे ॥१९॥ बंकटलाल अग्रवाल । पाहता झाला निश्चल । निघती वाचे त्या बोल । योगीच कोणी प्रगटला ॥२०॥ बंकटलाल नमिता झाला । चित्ती संतोष पावला । वृत्तांत तोच कथिला । देविदासा कारणे ॥२१॥ पंच-पक्वान्नाचे पान । देविदास ठेवी आणून । गजानन करी सेवन । सर्व एक करूनी ॥२२॥ जनां माजी दामोदर । देऊ कां म्हणे आणुनी नीर । पाणी आणावया सत्वर । जातां झाला त्या गृहीं ॥२३॥ समर्थांंनी हास्य केले । पाणी आहाळांवरी प्याले । ब्रह्म ओतप्रोत भरले । कृतिने त्या दाविले ॥२४॥ नाही तिथे भेदाभेद । रस गोडी तसा स्वाद । सर्वाठायीं ब्रह्मानंद । जाणणारे जाणती ॥२५॥

॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य प्रथमोsध्यायः समाप्तःः ॥

*********************
॥ अध्याय २ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय विघ्नहरा गणराया । एकदंता मोरया । तव कृपे लिहावया । प्रेरणा ही मिळतसे ॥१॥ दीनानाथा दीनबंधो । कृपासागरा करुणासिंधो । सुख शांती सर्वत्र नांदो । सद्‌गुरु समर्थां गुरुवर्या ॥२॥ करावया लीला वर्णन । स्फुर्तिदाता गजानन । पामर मी अज्ञान । कार्य करविती तेच हे ॥३॥ भाव जाणोनी बंकटाचा । कृपाहस्त शिरी त्यांचा । जमाव होता भक्तगणांचा । निघूनी जाती अकस्मात ॥४॥ समर्थ जातां निघुनी । ध्यास तोच नित्य मनीं । गोड न लागे अन्नपाणी । क्षीण वृत्ती जाहली ॥५॥ काय जाहले तुजसी । भवानीराम पुसे पुत्रासी । बंकटलाल पित्यासी । सांगे खोटेच पटवूनी ॥६॥ ध्यानीमनी गजानन । व्हावे वाटे ते पूजन । शोधावया धावे मन । भक्त खरा तोच असे ॥७॥ रामाजीपंत नामे एक । ग्रामामाजी लौकिक । वृत्तिचा तो सात्विक । हेतू बंकटे कथियेला ॥८॥ वयाने असती वृद्ध । भाव त्यांचा अतिशुद्ध । योगी पुरुष तो सिद्ध । असावा ऐसे वाटतसे ॥९॥ तव सुकृत सत्य जाण । तुज जाहले दर्शन । नच पुण्याई वाचून । घडे दर्शन योग्याचे ॥१०॥ रामाजीपंत देशमुख । बंकटा! दावी रे श्रीमुख । ऐक ऐक माझी भाक । सद्‌गुरुसी मज भेटवी ॥११॥ बंकटलाल लाचार । निघुन गेले दिवस चार । परी न सुटला निर्धार । गजाननासी शोधण्याचा ॥१२॥ गोविंदबुवा हरिदास । राहत होते टाकळीस । येऊनी शेगांवास । महादेव मंदिरी थांबले ॥१३॥ कीर्तनाचा होता वार । जमला तिथे जनभार । होताची नामाचा गजर । बंकटलाल प्रवेशला ॥१४॥ पितांबर नामे शिंपी एक । होता तोही भाविक । सांगे बंकट सकळीक । हेतू तोच मनांतला ॥१५॥ ऐकुनिया समाचार । योगीयां पाहती समोर । संतोष वाटे मनीं फार । धाव घेती त्या ठायीं ॥१६॥ जोडुनिया करकमला । माथा चरणीं ठेविला । भगवंतची तयांं भेटला । चित्तीं पावला समाधान ॥१७॥ वदती महाराज तयांते । द्यावे चून भाकरीते । बंकट पितांबर आनंदीते । इच्छा तिही पुरविली ॥१८॥ चून भाकरी खाता खाता । वदले पितांबरा जाई आता । नाल्यास पाणी अल्प असता । तुंबा भरुनी आण तूं ॥१९॥ घाण असे ते पाणी । खराब केले गुरांनी । दुसरीकडून आणतो भरूनी । वदतांं झाला पितांबर ॥२०॥ गजानन वदले तयांसी । दुजे जल न लगे मजसी । तेच आण वेगेसी । आज्ञा करिते जाहले ॥२१॥ तुंबा बुडेल ऐसे पाणी । नव्हते कुठेही त्याक्षणी । न भरावे ओंजळींनी । ऐसेही तयांंनी बजाविले ॥२२॥ तळवे पदीचे बुडतील । ऐसेच नाल्यासी होते जल । होऊनी मनीं निश्चल । संतवचना पाळीले ॥२३॥ मनांत करुनी स्मरण । तुंबा ठेविला असे जाण । तो तिथे खळगा होऊन । स्वच्छ पाणी दिसत असे ॥२४॥ चकित झाला पितांबर । तुंबा भरुनी साचार । उचली पाऊले झरझर । सद्‌गुरुराया देतसे ॥२५॥ खरा भाव खरी भक्ती । नामस्मरणी रंगली मती । तयां भेटला श्रीपती । उपासना फळा आली असे ॥२६॥ मनीं पावूनी समाधान । वदती तयां ऐका कीर्तन । ऐकतो मी इथे बैसून । निरुपण येता रंगात ॥२७॥ विस्मृती गोविंदबुवा झाली । गजानन वदती ओळ पुढली । अर्थबोधही त्या वेळी । विशद करूनी सांगती ॥२८॥ बंकटलाल गृहीं जातांं । वदे पित्यासी वृत्तांता । गृहा आपुल्या आणा आता । गजानना त्वरीत हो ॥२९॥ मानुनी बंकट-वचना । घरा आणिले गजानना । सोमवार प्रदोष जाणा । दिन भाग्याचा लाभला ॥३०॥ अस्ता जातां दिनमणी । पूजिले आसनी बैसवूनी । चरणी मस्तक ठेवूनी । आशीर्वच घेतला ॥३१॥ भावभक्तीचा नैवेद्य । अनेक पक्वान्नाचे खाद्य । सेवूनी तृप्त योगी सिद्ध । कृतार्थ करी भक्तासी ॥३२॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य द्वितियोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ३ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जगच्चालका भगवंता । तव कृपा तीच असता । काय उणें सांग आता । भक्त तुझा सन्निध ॥१॥ तूंच सांभाळसी भार । पतितांचा करिसी उद्धार । दीनांचा घेसी कैवार । शिरी हस्त तुझा असो ॥२॥ अग्रवालाच्या घरी । गजानन वास करी । भाव जयांचा तयांवरी । कृपाप्रसाद लाभतसे ॥३॥ दूर दूरचे येती जन । करिती तयांसी वंदन । हास्य मुख करुणाघन । वरदान तयां देतसे ॥४॥ होता ऐसे कांही दिन । उदयां येता नारायण । घ्यावया सद्‌गुरुचे दर्शन । साधू एक पातला ॥५॥ होती तिथे गर्दी फार । म्हणून उभा राहिला दूर । मनीं एकच हुरहुर । पदस्पर्श होणे शक्य नसे ॥६॥ म्लान वदनीं साचार । गोसावी तो चिंतातूर । घेऊनिया माघार । जाणे तेही बरे नसे ॥७॥ भाव तयाचा जाणून । वदले ऐका गजानन । दीनवत्सल दयाघन । बोलावूनी तयां आणावे ॥८॥ इच्छा एक त्याचे मनीं । गांजाची चिलम भरूनी । समर्थांसी अर्पण करुनी । चरणी माथा ठेवावा ॥९॥ इतुक्यामाजी करिती खुण । काढी बुटी झोळीतून । नवस तुझा घे फेडून । वाया वेळ दवडू नको ॥१०॥ गोसाव्यासी हर्ष झाला । करिता झाला विनवणीला । आठव माझा राहो भला । नित्य नेमे आपणासी ॥११॥ महाराज ठेवा चिलमिसी । ऐसे वदूनी सद्‌गुरुसी । धन्य मानी जीवनासी । नतमस्तक तो होऊनी ॥१२॥ वेदऋचा वदती गजानन । चकीत होती वैदिक ब्राह्मण । कधी गाती शास्त्रोक्त गायन । लीला अगणित दाविती ॥१३॥ चंदन चावल बेलकी पतिया । नित्य गाती भजनां याचिया । पद हेची आवडे तयां । नित्य ऐकती भक्तगण ॥१४॥ कधी वदती गण गण गणात बोते । स्वानंदाचे येता भरते । मौनधारी कधी असती ते । कधी भटकती वनी रानीं ॥१५॥ जानराव नामे शेगांवात । देशमुख घराणे विख्यात । प्रसंग त्याच्या जीवनात । व्याधीग्रस्त असे तोच हो ॥१६॥ वैद्यांनी टेकिले हात । उपचार करुनि बहुत । जवळ आला प्राणांत । मती कुंठीत जाहली ॥१७॥ घाबरुन गेले गणगोत । कुणी करिती आकांत । होती सारे भयभीत । स्थिती तयाची पाहुनी ॥१८॥ एक आप्त पुढे आला । तीर्थ अंगारा द्या हो याला । वचन ऐसे वदतां झाला । गेला बंकट सदनासी ॥१९॥ सांगितला वृत्तांत सर्वांसी । कर जोडीले समर्थांंसी । वाचवा वाचवा बाबा यासी । पदतीर्था मागितले ॥२०॥ चरणतीर्थ घेऊन । भावेंं करुनी वंदन । परत गेला तो सज्जन । जानरावा गृहीं तेधवा ॥२१॥ करवी तीर्थासी प्राशन । तीर्थ झाले अमृतपान । जानरावाचे चुकले मरण । साक्षात्कार हा घडविला ॥२२॥ कधी सौम्य कडक कधी । कधी वापरती भाषा साधी । कृपा होता टळिती व्याधी । अनुभविती ते भक्तगण ॥२३॥ समर्थांपासी भक्त एक । वृत्ती त्याची ती दांभिक । सद्‌गुरु-दर्शना येता लोक । सांगे मीच दास असे ॥२४॥ गजानन अंतर्ज्ञानी । कोण कैसा घेती जाणुनी । फळ देती जैसी करणी । सेवकासी त्या अनुभविले ॥२५॥ विठोबा माळी नाम त्याचे । सोंग घेई साधूत्वाचे । कार्य त्याचे लुबाडण्याचे । म्हणुनि तयां ताडीले ॥२६॥ लाभ होऊन संताचा । खेळ त्याच्या तो दैवाचा । ऐशापरी शेवट त्याचा । गजानना दुरावला ॥२७॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य तृतीयोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ४ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ तू गजानन सर्वेश्वर । नाम स्मरतां विघ्ने दूर । मोदक प्रिय दुर्वांकुर । परशु हाती शोभतो ॥१॥ अनंत होती अवतार । संत महात्मे भूवर । तयांकारणे साचार । सुख-समृद्धी पावती ॥२॥ आता ऐका पुढील कथा । बंकटा गृहींं तुम्ही समर्थां । बालकासवे खेळत असता । चिलम भरवी कौतुके ॥३॥ चिलीम पेटविण्या पाही । परी साधन नव्हते कांही । शोधून पाहता नाही । इलाज कुणाचा चालला ॥४॥ वैशाख शुद्ध पक्षास । अक्षय्य तृतीयेचा तो दिवस । बालक एक वदला तयांस । पाहतो जाऊन शेजारी ॥५॥ जानकीराम नामे सोनार । राहत होता थोडा दूर । मनांत येता विचार । तयां गृहीं गेला असे ॥६॥ विस्तव होता बागेसरीत । बालक झाला हर्षित । गजाननास्तव विनवित । मागे अग्नी तो तयां ॥७॥ दिवस सणाचा तो जाण । परतविला बालक विस्तवावीण । होऊनी जानकीराम क्रोधायमान । वदतां झाला तयां प्रती ॥८॥ व्यवहारिक नसे तुम्हांं ज्ञान । वाटे देव गजानन । चिलीम पेटवावी अग्नीवीण । उगाच भोंदु वाटतो ॥९॥ बालके होती चिंतातूर । मनांत करिती विचार । विस्तवावांचुनी लाचार । विन्मुख होऊनी बैसले ॥१०॥ गजानने जाणिले सर्व । सोनारास जाहला गर्व । अक्षय्य तृतीयेचे पर्व । नच विस्तव देणे त्या मनीं ॥११॥ चिलीम घेतली ती हाती । महाराज वदती बंकटाप्रती । धरी रे काडी ही वरती । चिलीम पेटविली अग्नीविणे ॥१२॥ इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला । बसविले आप्त भोजनांला । चिंचवण्याचा प्रकार भला । याच दिनी होत असे ॥१३॥ पक्वान्न वाढले पात्रांत । चिंचवणे द्रोणांत । पहा कैसे घडले अघटित । चिंचवण्यात अळ्या जाहल्या ॥१४॥ उठले लोक जेवणाविरहित । एकही घास ना पोटात । जानकीराम होई विस्मित । प्रत्यय तयां दाखविला ॥१५॥ मी माझे दाखविले अज्ञान । आता जातो तयां शरण । धावूनी धरिले चरण । क्षमायाचना मागतसे ॥१६॥ कळला तुमचा अधिकार । लोळण घेऊ पायावर । मी अजाण लेकरु पामर । कृपादृष्टी पाही आता ॥१७॥ ठेविला हस्त तयां शिरी । जाण्या सांगती माघारी । चिंचवणे होई अमृतापरी । आश्चर्यचकित तो जाहला ॥१८॥ चंदु नामे एक भक्त । राहत होता शेगांवात । आणिकही असती तेथ । सेवेमाजी स्वामींच्या ॥१९॥ चंदूस वदती महाराज । कान्होले देई मज आज । न करी इतराज । उतरंडीत तुझ्या असती ते ॥२०॥ चंदू मुकीन घरी गेला । विचारी आपल्या बायकोला । उतरंडीत असेल कां कान्हवला । असल्यास देई सद्‌गुरुसी ॥२१॥ होऊन गेला महिना एक । घरी जेवले असती लोक । परी बुद्धीसी सद्विवेक । पहा म्हणे तो तिजसी ॥२२॥ उतरंड उतरुनी पाहता । दोन कान्हवलें येती हातां । मोद जाहला तयां चित्ता । धन्य म्हणती गजानन ॥२३॥ घातले चरणी दंडवत । त्रिकालज्ञानी हा संत । सुखसमृद्धी जीवनात । तये कृपेने लाभली ॥२४॥ माधव नामे एक ब्राह्मण । आला ग्राम चिंचोलीहून । संतचरणीं होई लीन । मोक्ष साधावया कारणे ॥२५॥ अट्टाहासे करून । राहिला अन्न-पाण्यावांचून । काया जाहली असे क्षीण । मरणोन्मुख तो जाहला ॥२६॥ विनविती तयांलागी जन । सोड म्हणती उपोषण । महाराजही पाहती सांगून । परी न मानी कुणाचे तो ॥२७॥ रूपे धरूनी अक्राळविक्राळ । महाराज येती त्याचे जवळ । माधव काढता झाला पळ । वाचवा वाचवा म्हणोनिया ॥२८॥ मृत्यूस भ्याला खरोखर । समर्थांंनी केली विचार । प्रपंची त्यागीला आचार । निर्धार करी नामाचा ॥२९॥ ऐसे वदोनी गजानन । केले तयासी पावन । शुद्धभाव आचरण । उपासना जनां सांगती ॥३०॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य चतुर्थोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ५ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सद्‌गुरुनाथा सच्चिदानंदा । सुबुद्धी द्यावी मतीमंदा । तव कृपे स्वानंदा । आत्मानंदा देसी तूं ॥१॥ समर्थांंचे आले मनीं । वसंतपूजा एके दिनी । करावी ऐसे वदोनी । कार्य तेच करविले ॥२॥ बोलाविले वैदिक ब्राह्मण । करविले त्यांचे पूजन । दक्षिणा तयां अर्पण । शिष्या हातें करविली ॥३॥ वाढला शिष्य परिवार । म्हणून महाराज गेले दूर । सोडून शेगांवीचा शिवार । काननाप्रती हिंडती ॥४॥ महाराज फिरत फिरत आले । पिंपळगांवी स्थिरावले । शिव मंदिर एक भले । हेमाडपंथी पाहून ॥५॥ घालुनिया पद्मासन । बैसले समाधी लाऊन । जाहलासे अस्तमान । गुराखी गुरे नेती घरां ॥६॥ इतक्यात कुणी मंदिरात । वंदण्या आला शिवाप्रत । समर्थांं पाहिले तेथ । आश्चर्य वाटे मनीं त्याच्या ॥७॥ कळवी वार्ता सकलांस । भेट देती मंदिरास । हर्ष होई सर्वांस । सन्निध त्यांच्या बैसले ॥८॥ कुणी करिती भजन । मनोभावें पूजन । शुद्ध भाव आचरण । नैवद्यासी ठेविती पुढे ॥९॥ गुराखी गेले गांवात । समस्त जनां कळवी मात । होती सकळ हर्षित । साधुसी त्या पाहूनी ॥१०॥ राहिले तिथे काही दिवस । काळजी वाटे बंकटास । तयां मनीं तोची ध्यास । असतील कोठे गजानन ॥११॥ शेगांवीच्या बाजारी । खरेदी करण्या कांहीतरी । पिंपळगांवचे गांवकरी । मंगळवारी पातले ॥१२॥ भेट होई अकस्मात । बंकट आणि ते ग्रामस्थ । सांगती एकमेकांप्रत । महती त्या संताची ॥१३॥ पिंपळगांवी एक अवलिया । अनेक करी तो लिलया । काय वर्णावी ती किमया । संतोष मनीं बंकटाच्या ॥१४॥ बंकट येऊन विनवी तयांते । महाराज चला शेगांवाते । भक्तगण उपोषित ते । तुम्हांंस्तव राहती ॥१५॥ परत आणिले शेगांवात । गजानन महासंत । वास त्यांनी तिथ । बंकटास्तव केला असे ॥१६॥ तिथून काही दिवसात । निघून गेले अडगांवात । उन्हाळा तो रखरखीत । माध्यान्हकाळी तृषित ते ॥१७॥ पाणी न मिळे प्यावयासी । त्रास भला ग्रामस्थांसी । त्रासून ते जीवनासी । कष्ट करिती रात्रंदिन ॥१८॥ अडगांवाहून आले अकोलीस । शोधिले पाणी प्यावयास । भास्कर नांगरी शेतात । महाराज येती तयां जवळी ॥१९॥ घट भरला तयापासी । पाहता मागती जल त्यासी । नकार देऊनी वदला तयांसी । नंगापीर तू अससी रे ॥२०॥ आमच्यासाठी असे नीर । दूरुन आणिले डोईवर । जाई इथून सत्वर । वर्मी बोल तो बोलला ॥२१॥ महाराज किंचित हासले । निघून ते दूर गेले । विहीर पाहुनी थांबले । परी कोरडीच ती असे ॥२२॥ वृक्षातळी बसून । डोळे मिटून करिती ध्यान । सच्चिदानंद दयाघन । विनविता प्रभूसी जाहला ॥२३॥ विहिरीस फुटले पाझर । क्षणांत भरले तीत नीर । प्याले पाणी दयासागर । भास्कराने ते पाहिले ॥२४॥ धावून गेला तयांपासी । क्षमा करा पामरासी । ऐसे वदून चरणांसी । घट्ट धरूनी बैसला ॥२५॥ कृपा करिती तयावर । समर्थ तेचि योगीवर । देऊनिया अभयवर । सन्मार्गासी लाविले ॥२६॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य पंचमोsध्याय: समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ६ ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सगुणावरा कृपा खरी । असतां तयां काय दूरी । सदैव तूंच सहाय्यकरी । भक्तराणा उपासका ॥१॥ हाच अनुभव येई त्यासी । जो करी संत सेवेसी । ऋद्धी सिद्धी पदींच्या दासी । होऊनिया राहती ॥२॥ आता पुढील कथा सुरस । ऐका श्रोते सावकाश । भक्त नेती मळ्यांत । कणसे खावया गजानना ॥३॥ कणसे मक्याची घेऊन । बंकट येई स्वयेंहून । भाजण्या अग्नी चेतवून । सकल बैसले सभोवती ॥४॥ वृक्ष चिंचेचे अपरंपार । आगी मोहळे तयांवर । होता तिथेची धूर । पसरल्या माश्या चहूंकडे ॥५॥ गेले पळून सारेजण । राहिले एकटे गजानन । माश्यांनी अंग झाकून । गेले ऐसेची जाहले ॥६॥ महाराज असती शांत । मक्षिकांची न तयां खंत । नवल ते पाहती भक्त । सहनशीलता ती पाहूनी ॥७॥ माशा मोहोळ सर्व तेचि । रुप स्वयमेव ब्रह्म हेचि । निजलीलेने दाविले साची । आला धावूनी बंकट ॥८॥ होऊनी गेला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । काटे शरीरी अपार । बोचलेले ते पाहती ॥९॥ बंकटलाला बोले वचन । या सर्वासी कारण । मीच एक असे जाण । दुर्दैवी मी खचितची ॥१०॥ पाहूनी बंकटाची स्थिती । परतूनी मक्षिका लाविती । कौतुक तेच दाविती । सकल जनांसी तेधवा ॥११॥ काटे रुतले ते पाहून । बंकट करी पाचारण । चिमटा सोनार घेऊन । आला असे त्या ठायीं ॥१२॥ अंगीचे रुतले काटे । काढू न शकती चिमटे । मीच काढून उलटे । दाखवितो ऐसे बोलती ॥१३॥ ऐसे वदुनी गजानन । श्वास धरिती रोखून । रुतलेल्या स्थलांतून । कांटे वरती आणिले ॥१४॥ ऐसा पाहता प्रकार । आनंद झाला सकला फार । तो बघता अधिकार । चकित ते जन जाहले ॥१५॥ कणसे भाजुनिया भक्त । आनंदे बैसले खात । परतुनी गेले गावांत । जन समवेत समर्थांंच्या ॥१६॥ महाराज येती अकोटास । भेटण्या बंधू नरसिंगजीस । गुरु कोतश्या अल्लीस । मानुनी जे असती हो ॥१७॥ नरसिंग विठ्ठल भक्त । जन्म मराठा कुळांत । ईश चिंतनी सदा रत । श्रद्धा स्थान ते जनतेचे ॥१८॥ घनदाट अरण्यांत । वास करूनी एकांत । नरसिंग राहती नित्य । तयां संत हे भेटती ॥१९॥ आलिंगले एकमेकां । बैसले आसनी एका । भाव न उरला परका । हितगुज करीते जाहले ॥२०॥ प्रपंच करुनी परमार्थ । साधिला हेतू तो सार्थ । ज्ञानोपासना यथार्थ । करूनी राहिला निर्दोष तूं ॥२१॥ कर्म भक्ती योग मार्ग । याचाची घडो संसर्ग । रंगविण्या अंतरंग । हाच मार्ग सुलभ हो ॥२२॥ जैसे जैसे कथन केले । तैसेची त्याने मानिले । चरण भावेंं वंदिले । परोपकारी निःसंशय ॥२३॥ तुम्ही आम्ही सर्व एक । वृत्ती ठेवूनी सद्विवेक । संकटा झेलूनी अनेक । शांती नांदवी या भूवरी ॥२४॥ नित्य व्हावी भेटी गाठी । अपराध घालूनिया पोटी । गजानाना कृपादृष्टी । नित्य राहो आम्हांवरी ॥२५॥ अशक्य तुम्हां नसे कांहीं । योग क्रिया जाणतांही । भाव दुजा पर नाही । बंधू धाकटा मीच हो ॥२६॥ सोने जैसे बावनकसी । कमीपणा ना येई त्यासी । संत महात्मा हा गुणराशी । साक्षात्कारी तुम्हीच हो ॥२७॥ काननांप्रती दोन संत । वार्ता पसरली अकोटांत । दर्शनासाठी जन तेथ । येऊ लागती क्षणात ते ॥२८॥ तितक्या माजी गजानन । आधीच गेले निघून । दर्यापुराच्या सन्निध जाण । येऊनी राहिले शिष्यांसवे ॥२९॥ भेट देती व्रजभूषणा । वेद पारंगत विप्र जनां । शिवर गांवीं पूजनी । अर्घ्यदाना करितसे ॥३०॥ प्रातःकाळी नदी तीरी । विप्र येता सदाचारी । पूजा पात्र तया करी । योगीराज हा भेटला ॥३१॥ उदयाचली मित्र आला । तम अवघाची निमाला । ब्रह्मानंदी डोलत बैसला । योगीयां ऐशा पाही तो ॥३२॥ सूर्यासमान ती कांती । आजानबाहु गुरुमूर्ती । व्रजभूषण हर्षला चित्तीं । अर्घ्य-पाद्ये पूजिला ॥३३॥ साष्टांग केला नमस्कार । मुखे त्याचा नाम गजर । नभोदरीचा भास्कर । प्रत्यक्ष भूवरी पाहिला ॥३४॥ हृदयासी तयां लावून । दिले तयां आलिंगन । धन्यत्व पावे जीवन । आशिर्वच तया लाभला ॥३५॥ परतुनी आले शेगांवात । उत्सव मारुती मंदिरात । नाम संकीर्तन गजरांत । अन्नदाना करविले ॥३६॥ तिथेची राहती गजानन । बंकटा लावी परतून । राहण्या योग्य हे स्थान । ऐसे म्हणुनी सांगितले ॥३७॥ स्वामी राहती मंदिरी । शेगांव झाली पंढरी । भास्कर पाटील सेवा करी । गजानन तव कृपे ॥३८॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य षष्ठोsध्यायः समाप्तः ॥
*********************
॥ अध्याय ७ ॥
॥ श्रीगणेशाय नमः॥ जय जयाजी गणराया । कथन कराया तव लीलया । तूंच लाविसी लिहावया । हात धरुनिया बालकासी ॥१॥ मतिमंद मी अज्ञान । बालक तुझे हे सान । चित्ती तुजसी आठवून । लेखनाते या करितसे ॥२॥ मारुतीचा हा उत्सव । करीत होते रंकराव । पाटील नामे खंडेराव । धनिक होता थोर तो ॥३॥ संत सेवा घरी खरी । त्यात लाभली जमेदारी । उत्तम कुशल व्यवहारी । बंधूही तयांसी असती हो ॥४॥ लक्ष्मी नांदे सर्वांघरी । तरी सर्वच सेवेकरी । कीर्ती पसरली दूरवरी । उत्सवां कारणे तीच ती ॥५॥ महादजी कुकाजी कडताजी । आपआपल्या रमती काजी । घराण्या उपदेशी गोमाजी । समर्थ तेही नागझरीचे ॥६॥ कडताजीसी पुत्र सहा । पुत्रविरहीत कुकाजी हा । जन्मदात्या पित्यापरी हा । प्रेम करी सर्वांवरी ॥७॥ ऋद्धी सिद्धी राबती घरी । खंडू पाटील कारभारी । बंधू पांचजण ते जरी । सर्व मान देती तयां ॥८॥ कांही सज्जन कांही उर्मट । करिती जनांसवे कटकट । गजाननावरी रुष्ट । होऊनी छळ करिती ते ॥९॥ गजानन योगेश्वर । सहन करी साचार । जे जे कांहीं होती प्रकार । परी निरुत्तर असती ते ॥१०॥ हसण्यावरी सर्व नेती । समाधानी सदा वृत्ती । भास्कर पाटील सांगाती । सद्‌गुरुंच्या राही तो ॥११॥ सहावेना अपमान । म्हणून वदे तयां लागून । मंदिरी न रहावे आपण । भास्कर वदे परोपरी ॥१२॥ जाऊ अकोली ग्रामासी । देती त्रास हे सकलांसी । सौख्य ना मिळे जीवनासी । उन्मत्त ते राहती ॥१३॥ गजानन वदती भास्कराते । आवर घाली मनांते । परमभक्त हे आम्हांंते । सत्ताधारी जरी असती हे ॥१४॥ जमेदारासी उर्मटपण । असे खचित हे भूषण । म्हणोनिच यांचे वजन । ग्रामवासींयां वर हो ॥१५॥ पाटलामाजी नामे हरी । आला हनुमान मंदिरी । महाराजा नमस्कार करी । विनवी कुस्ती खेळण्या ॥१६॥ तूं हारशील कुस्तीत । नको पाहू माझा अंत । परोपरी विनवीत । असता न मानी तो तयांं ॥१॥ महाराज राहिले बसून । उठवी वदले त्या लागून । पहातो कैसा तूं पहेलवान । गर्व त्याचा हरावया ॥१८॥ पाटील हरी पुढे आला । बहुत यत्न करितां झाला । परी यश न मिळे त्याला । झुंजता हो समर्थांंसी ॥१९॥ गजानन वदती हरीते । नच छळावे इतराते । स्वाभिमाने कर्तव्याते । करीत राही या पुढे ॥२०॥ सद्‌गुरु समर्थां पुण्यराशी । उपकृत केले आम्हांसी । सांगितल्या परी अहर्निशी । राहू हेची सत्य असे ॥२१॥ तेव्हापासून सर्वजण । राहती नम्र होऊन । गजाननाची शिकवण । शिरसावंद्य मानिली ॥२२॥ परी होते कांहीं कुटाळ । लहर येई करण्या छळ । होऊनिया उतावीळ । संतासन्निध येती ते ॥२३॥ घेऊनी ऊसांची मोळी । पातले ते राऊळी । भावना तयांंची खुळी । करिती आग्रह ऊस खाण्या ॥२४॥ अट आमची मान्य करा । करू आम्ही उस प्रहारा । वळ अंगावरी ना जरा । दिसता मानू वंद्य तुम्हां ॥२५॥ महाराज असती मौन । तेच मानिती ते प्रमाण । हाती ऊसांते घेऊन । धावून आले अंगावरी ॥२६॥ भास्करा हृदयी तळमळ । वदे नका रे करू छळ । अंगी तुमच्या जरी बळ । रीत बरवी ही नव्हे ॥२७॥ महाराज वदती बालकांना । त्रास जाहला असेल कोणा । तरी तो शमविण्या आपणां । विश्रांतीची जरूर असे ॥२८॥ सर्वां बैसविले समवेत । ऊस घेतला हातात । रस काढिला पात्रात । हातानेच तो पिळुनिया ॥२९॥ जेवढे होते तिथे ऊस । काढिला सर्वांचा तो रस । प्यावया दिला सकलांस । श्रम परिहार करावया ॥३०॥ खंडू पाटला कळली मात । जाहला असे तोही चकीत । मार्दवता ना त्या वाणीत । अरे तुरे वदतसे ॥३१॥ गण्या गण्या गजानन । वाचे वदतां निर्मळ मन । शुद्धभाव अंतःकरण । दुजेपणा मुळी नसे ॥३२॥ खंडूजीस नव्हते मुलबाळ । निपुत्रिक वदती सकळ । कुकाजीचा वृद्धापकाळ । चिंता मनीं करितसे ॥३३॥ आळवितसे गजानना । मनीं तयांच्या तीच याचना । इच्छा दर्शवी पुत्राविना । जीवन कैसे जगावे हे ॥३४॥ वदती संत गजानन । परमेश्वरी सूत्र जाण । पुत्र होईल तुजलागून । वचन सत्य ते जाहले ॥३५॥
॥ इति श्रीगजानन माहात्म्य ग्रंथस्य सप्तमोsध्याय: समाप्तः ॥
॥ शुभं भवतु ॥ 
॥श्रीगजानन महाराजार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥


No comments:

Post a Comment