दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

May 6, 2024

श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - द्वितीयोऽध्यायः


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

जय जयाजी आनंदरूपा । जय जयाजी विश्वरूपा । जय जयाजी रूपा अरूपा । दोन्ही तूंचि विलससी ॥१॥ काय वर्णू तुझी थोरी । पुराणपुरुषा श्रीहरी । माझ्या प्रकाशोन अंतरीं । पुढे ग्रंथ बोलवी ॥२॥ तुझी सत्ता कर्तुम् । तुझी सत्ता अकर्तुम् । तुझीच सत्ता अन्यथा कर्तुम् । ख्याती हे समर्थ नामाची ॥३॥ निर्गुण असोनि सगुण होसी । भक्तसंकट निवारिसी । नाना कौतुकें खेळसी । भक्तांसहित ॥४॥ नाना सगुण रूपें घेसी । नाना चमत्कार दाखविसी । की आपुल्या दासासी । उद्धारावें म्हणोनियां ॥५॥ परी जी आम्ही आंधळे । बुद्धिरूप असोनि डोळे । व्यर्थ गेले जी, पडळें । वरी आलीं असंभाव्य ॥६॥ श्रीस्वामी समर्था । कृपा करोनियां आतां । डोळियांचे पडळ फेडावें ताता । दीनासी तारी तारी ॥७॥ समर्थसेवे जे लागले । त्या बहुजनां अनुभव आले । त्यांत मजसारखे वाया गेले । हे उचित नोहे सर्वथा ॥८॥ तुझिया सत्रीं जाण । बहुजन झाले पावन । मी रंक एक दीन । मागावया पातलो ॥९॥ ऐसें पुसाल जरी पूर्ण । कोणकोण झाले पावन । तरी सांगतों खूण । श्रीसद्‌गुरुस्वामी ॥१०॥ ब्राह्मणकूपासी आणिलें जीवन । दुजिया ब्राह्मणाकारणें । वांझ धेनू दोहून । कौतुक थोर दाविलें ॥११॥ बसप्पा तेली । तयाची कामना पूर्ण केली । दारिद्रयापासून सोडविलीं । तया स्त्रीपुरुषांसी ॥१२॥ मोहाळाहूनि जात असतां । भरुनि चालली सरिता । तेथ उदकावरून चालतां । बहुजनी देखिलें ॥१३॥ गोविंदपंतांचा समंध घालविला । पुढे अक्कलकोटीं वास केला । पाटावरी पादुका उठविल्या । टोळाच्या भक्तीकारणें ॥१४॥ जाउनी राजवाड्यांत । उंदीर  केला जिवंत । चौफुला टाकिल्या पाण्यांत । सहज लीलेने काढिला ॥१५॥ रायासी थोर वाटलें कौतुक । चरणी ठेविलें मस्तक । म्हणे, देवा तूं तारक । आम्हां जडजीवां ॥१६॥ चोळाप्पाच्या घरी राहुनी । बाळलीला खेळसी अनुदिनीं । थोर कौतुक दाविलें नयनीं । स्वामिराया ॥१७॥ एका दत्तरूपें भेटसी । एका रामरूप दाविसी । एका विठ्ठलरूपें देसी । दर्शन समर्था ॥१८॥ चाळीस पात्रांच्या सामुग्रींत । चार सहस्र पात्रे होत । मात केली रामपुरांत । थोर आश्चर्य जी ॥१९॥ सुताराचे शेतांत । तीन पात्रांचें अन्न शिजत । चाळीस सेवेकरी जेविले त्यांत । श्रीस्वामी समर्था ॥२०॥ पन्नास पात्रांचा शिधा बसलगावीं । तेथ पाचशे पात्र जेवविलीं । पिशाच्चापासून मुक्तता केली । तया शिंप्याची ॥२१॥ कडुनिंब गोड केला । ब्राह्मणाचा पोटशूळ घालविला । यवन रोगें व्यापला । मुक्त केले तयासी ॥२२॥ ठाकूरदासाचा कुष्ठ घालविला । साठ वर्षांच्या वांझेसी पुत्र दिला । विष्णुबुवांसी अनुभव दाविला । ब्रह्मसाक्षात्काराचा ॥२३॥ साळियाचें दारिद्र्य विच्छिन्न केलें । यवनासी तारिलें । बाबासी कृतार्थ केलें । संसारभयापासुनी ॥२४॥ विष्णुपंतासी साक्षात्कार । कृपा केली भीमरावावर । कबीरपंथियाचें घोर । कर्म प्रकट केलें जनांत ॥२५॥  पैठणची विठाबाई । तिजवर कृपा केली काई । रामकृष्ण सरदेसाई । संकटांपासोन सोडविला ॥२६॥ पुत्र दिधला अति शूद्रणीसी । अनुभव दिला रामाचार्यासी । गाणदेवीचे श्रेष्ठत्वासी । बुडविलें समर्था ॥२७॥ पशुपक्षी आज्ञा । तुझी पाळिती सर्वज्ञा । तेथ मानवाची कोण प्राज्ञा । की अवज्ञा करावी ॥२८॥ माने याचा मृत्यू चुकविला । वामनासी योग सांगितला । देवीरूपें विडा दिधला । तू स्वामिराया ॥२९॥ सोहनियास पश्चात्ताप झाला । ब्राह्मणाचा पोटशूळ गेला । गोविंदशास्त्री यास दिधला । द्रव्यघट ॥३०॥ तेलियासी वहिलें । लिंबीच्या हातून द्रव्य देवविलें । राधेचें रूपांतर केलें । आजि स्वामिया ॥३१॥ जगन्नाथाचा रोगपरिहार । माटेबुवाचा कीर्तन गजर । पोटदुखी बाईचा उद्धार । उपदेश वेदांती बाईसी ॥३२॥ आंधळ्या मुलास डोळे दिले । आप्पा पाटलाचें संकट निवारिलें । दाजिबा भोसले मुकले । आपुल्या वैभवा ॥३३॥ नरसाप्पावर कृपा केली । एक स्त्री पुत्र पावली । उमाबाईची कन्या आंधळी । तीसी नेत्र दिधले ॥३४॥ मुक्याला वाचा दिली । पांडु सोनारावर कृपा केली। जमादाराची मुक्तता केली । महत्संकटापासुनी ॥३५॥ रावजी पाटील संकटांत पडला । आणि तुझा धावा केला । गोविंदस्वामीस दिधला । ब्रह्मसाक्षात्कार ॥३६॥ नागूअण्णा कुलकर्णी । तयासी पावलासी निर्वाणीं । नवस फेडुनी घेसी दंडपाणी । सहस्र ब्राह्मणांचा ॥३७॥ शेषाचार्य अग्निहोत्री । तयाची करिसी खात्री । बाबा जाधवाचे परत्रीं । जाणे चुकविलें ॥३८॥ रावण्णासी सर्प चावला । तया मृत्यूपासून सोडविला । मृतपुत्र जिवंत केला । एका साध्वीचा ॥३९॥ कानफाट्या धटिंगण । सुंदराबाई व्यापिली मोहेंकरुन । चोळाप्पा गहन । द्रव्य लोभांत गुंतला ॥४०॥ बाळाप्पा तुझा दास । पावन केले काशीकर स्वामीस । तात्यासाहेब बडोद्यास । नेणार होते धरूनी ॥४१॥ कनोजा ब्राह्मणासी । स्वामीराया प्रसन्न झालासी । आणि स्वामीसुतासी । कृतार्थ केलें ॥४२॥ एक्कावन्नावे वर्षी । वाचा दिली मन्याबासी । कूपाचे उदकासी । शुद्ध केलें ॥४३॥ हडकणकरासी मोठा चमत्कार । शुद्ध केला बावडेकर । जे जे ठाकले तुझें द्वार । ते ते कामना पावले ॥४४॥ परि सकाम बहुत । निष्काम थोडे तयांत परि सर्वांचे मनोरथ । पूर्ण केले जी ॥४५॥ असंख्य उद्धरिले जीव । कोण गणील मानव । किंचित लिहिले दृष्टान्तवैभव । तुझें कोणी वर्णावें ॥४६॥ ऐसे नाना दाउनी चमत्कार । बहु केला जी जगदोद्धार । परि माझें कर्म कैसे दुस्तर । की न सोडी अद्यापि ॥४७॥ साग्र यश वर्णावयासी । अद्यापि शक्ती नाहीं कवणासी । म्हणोनि मौनेचि मिठी पायांसी । घालावी हे बरें ॥४८॥ असंख्य जीव उद्धरिले । आणि मज का तैसेचि ठेविलें । की बीज पाहिजे जतन केलें । म्हणोनियां ? ॥४९॥ परि करतों जी बहु काकुळती । माझी दया येऊ द्यावी चित्तीं । आणि सोडवावें कर्म विपत्ती । पासोनियां ॥५०॥ अचाट तुझी शक्ति । तेथ माझा उद्धार तो किती। मायबापा करावी शांती । माझिया कर्मांची ॥५१॥ श्रीस्वामी समर्था । नको अंत पाहूं आतां । थोर पावतों जी व्यथा । किती म्हणोनि सांगावी ॥५२॥ माझ्या बुद्धीचा होई जनक । माझ्या बुद्धीचा होई तारक । दिली आहे जी भाक । सांभाळी आपुली ॥५३॥ द्वारी उभा राहोनी । करकर करतों निशिदिनीं । ती पीडा एकदा वारोनी । टाकावी श्रीस्वामी समर्था ॥५४॥ दे भक्ती, दे विरक्ती । दे शांती, दे दांती । दे भाव, दे प्रीती । तुझिया चरणांची ॥५५॥ दे ज्ञान, दे ध्यान । दे स्वरूप-समाधान । पूर्ण दे मौन । या प्रपंच वार्तेचें ॥५६॥ दे शारीर वाग्तप । दे मानस तप । नको हा खटाटोप । विषयवासनेचा ॥५७॥ दे अभय, दे सत्त्वशुद्धी । दे परोपकारबुद्धी । दे अहिंसा सिद्धी । आणि लीनता भूतमात्रीं ॥५८॥ दे अमानित्व, दे अदंभित्व । दे अनिंदा, निर्मत्सरत्व । तुझे दिसो तत्त्व । भूतमात्रीं ॥५९॥ दे शरीर शक्ती । दे वाचाशक्ती । दे मानसशक्ती । तुझिया सेवेची ॥६०॥ दे प्रेम, दे कीर्तन । दे आनंद, दे भजन । दे संनिधान । तुझिया चरणांचें ॥६१॥ हे का म्यां द्यावें । तूं अभ्यासोनि घ्यावें । ऐसें जरी कल्पिसी जीवें । तरी तो अधिकार नाहीं ॥६२॥ म्हणोनि कल्पवृक्षा सूज्ञा । तुझी करितों विज्ञापना । कृपा करी अज्ञाना-। पासोनी सोडवी ॥६३॥ श्रीस्वामी समर्था । चरणी ठेविलासे माथा । भवरोगव्यथा । दूर करावी ॥६४॥ श्रीराजाधिराजा । श्रीयोगिराजा । श्रीमहाराजा । श्रीसमर्थ स्वामी ॥६५॥ जे कोणी हे स्तोत्र जपती । तयांवरी कृपा करावी निश्चितीं । आणि सोडवावें क्लेशविपत्तीं-। पासोनियां ॥६६॥ हे करुणास्तोत्र केलें । आपुलिये मतीसारखें वाखाणिलें । न्यूनपूर्ण क्षमा केलें । पाहिजे स्वामी ॥६७॥ श्रीसमर्था शरण शरण । श्रीपायीं नमन नमन । प्रीतिनंद मागे दान । याचक होवोनी ॥६८॥
॥ इति श्रीकरुणास्तोत्रस्य द्वितीयोऽध्यायः संपूर्णम् ॥
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
राजाधिराज योगिराज श्रीस्वामी समर्थ महाराज की जय  

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


अवश्य वाचा :

श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - प्रथमोऽध्यायः


No comments:

Post a Comment