दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Jan 10, 2025

श्रीसाईनाथ प्रार्थनाष्टक


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

सद्‌गुरु श्रीसाईनाथाय नमः

संतकवी दासगणूमहाराजविरचित श्रीसाई-स्तवन-मंजिरी हे साक्षात श्री साईनाथांच्या कृपेचा वरदहस्त लाभलेले स्तोत्र आहे. अनेक साईभक्तांच्या नित्यपठणांत हे स्तोत्र असते. या सिद्ध स्तोत्रांतील प्रार्थनाष्टक तर प्रत्यक्ष श्री साईंचे आशीर्वादस्वरूप असून, ते शीघ्र फलदायी आहे. भक्तिभावाने या आठ श्लोकांचे आवर्तन केल्यास भाविकांना साईकृपेची निश्चितच अनुभूती येते. विशेषतः विवाह, नोकरी, अपत्यलाभ, आरोग्यप्राप्ती या इष्ट मनोकामना साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात, असा अनेक साईभक्तांचा अनुभव आहे.

असतील जे विमल मनोरथ, परिपूर्ण सदा ते होतात ॥ शाश्वत या नियमाची, सत्यता अनुभवी मनांत ॥


॥ श्रीसाईनाथ प्रार्थनाष्टक ॥

शांतचित्ता महाप्रज्ञा । साईनाथा दयाघना । दयासिंधो सत्स्वरुपा । मायातमविनाशना ॥१॥

जातगोतातीता सिद्धा । अचिंत्या करुणालया । पाहि माम् पाहि माम् नाथा । शिर्डीग्रामनिवासिया ॥२॥

श्रीज्ञानार्का ज्ञानदात्या । सर्वमंगलकारका । भक्तचित्तमराळा हे । शरणगतरक्षका ॥३॥

सृष्टिकर्ता विरिंची तूं । पाता तूं इंदिरापती । जगत्रया लया नेता । रुद्र तो तूंच निश्चितीं ॥४॥

तुजवीणें रिता कोठें । ठाव ना या महीवरी । सर्वज्ञ तूं साईनाथा । सर्वांच्या ह्रदयांतरी ॥५॥

क्षमा सर्वापराधांची । करावी हेंचि मागणें । अभक्तिसंशयाच्या त्या । लाटा शीघ्र निवारणे ॥६॥

तूं धेनू वत्स मी तान्हें । तूं इंदु१० चंद्रकांत११ मी । स्वर्नदीरुप१२ त्वत्पादा । आदरें दास हा नमी१३ ॥७॥

ठेव आतां शिरी माझ्या । कृपेचा करपंजर१४ । शोक चिंता निवारावी । गणू हा तव किंकर१५ ॥८॥


१. मायारूपी अज्ञानाचा विनाश करणारा २. गोत्र, कुटुंब आदि उपाधि नसलेला ३. माझे रक्षण कर ४. ज्ञानरूपी सूर्य ५. भक्तांच्या हृदयरूपी सरोवरातील हंस ६. ब्रह्मदेव ७. पालनकर्ता ८. श्रीहरी विष्णु ९. महादेव शंकर १०. चंद्र ११. चंद्रकिरणांमुळे पाझरणारे रत्न १२. गंगा १३. नमस्कार करतो. १४. कृपाहस्त १५. दास

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

No comments:

Post a Comment