दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Sep 13, 2024

' योगिराज ' श्रीथोरले स्वामीमहाराज आणि प्रासादिक मंत्रोपासना


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगुरुः शरणम् ॥ ॥ ॐ श्रीमद् अमृतमूर्तये श्रीदत्तवासुदेवाय नमः ॥ श्रीतुंगभद्रेच्या तीरावर वसलेल्या हावनूर नामक गावाचा परिसर अत्यंत रमणीय व शांत आहे. श्रीदत्त संप्रदायासाठी या स्थळाचे विशेष महत्व असे की श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा विसावा चातुर्मास शके १८३२ अर्थात इ. स. १९१० साली इथेच केला होता. त्यावेळी हावनूर येथील प्रसिद्ध अशा श्रीत्रिपुरान्तकेश्वराच्या मंदिरामध्ये श्रीटेम्बेस्वामीमहाराज वास्तव्यास होते.  याच चातुर्मासात घडलेली श्रीटेम्बेस्वामीमहाराजांची ही अदभूत लीला - एका सोमवारी श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनहेतूने काही भक्त मंडळी हावेरी स्टेशनवर उतरून बैलगाडीने हावनूरला जाण्यास निघाली. त्यांतीलच एका भक्ताची पत्नी मात्र पायीच मार्गक्रमण करत होती. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा तिचा संकल्प व नवस होता. असे असले तरी बरोबरच्या मंडळींनी फारच आग्रह केला तर ती काही अंतर बैलगाडीत बसून पुढील प्रवास पायीच करत असे.  साधारण काही अंतराचा प्रवास झाल्यावर, या सर्व स्वामीभक्तांना दोन तेजस्वी बटू सामोरे आले आणि हात जोडून त्या सर्वांना त्यांनी अति विनीत होऊन प्रार्थना केली," श्रीस्वामीमहाराजांच्या रूपाने या भूतलावर अवतरलेल्या श्रीदत्तगुरुमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपण सर्व भक्तमंडळी हावनूरला निघालेले आहात. हावनूर अजून बरेच दूर आहे. इथवरच्या प्रवासाच्या श्रमाने तुम्ही फार दमलेले दिसत आहात. तेव्हा, आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात येऊन आपण सर्वांनी भोजन आणि थोडी विश्रांती घेतली तर आम्हांला फार धन्यता वाटेल." खरोखरच ती सर्व भक्तमंडळीं थकलेली होती आणि अत्यंत क्षुधाग्रस्तही झाली होती. त्याक्षणी आपल्या सद्‌गुरूंनीच या बटूंना पाठविलेले आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे अर्थातच त्या सर्वांनी त्या दोन बटूंची ती प्रेमळ विनवणी तत्काळ मान्य केली  आणि ते सर्वजण त्या बटूंच्या पाठोपाठ त्यांच्या आश्रमात गेले.  अनेक लहान-मोठ्या इमारती असलेले त्या आश्रमाचे आवार अतिशय प्रशस्त होते. त्या बटूंनी सर्व लोकांना विहिरीवर नेऊन हातपाय धुण्यास पाणी काढून दिले. त्या शीतल जलाने सर्वच भक्तमंडळींचा थकवा क्षणांत नाहीसा झाला. त्यानंतर समोरच असलेल्या श्रीगणेश मंदिरात जाऊन त्या सर्वांनी विघ्नहर्त्याचे मोठ्या मनोभावें दर्शन घेतले. थोड्याच वेळांत, त्या बटूंनी त्यांना भोजनमंदिरामध्ये नेले. त्या दालनांत हिरव्यागार केळीची लांबरुंद पाने मांडलेली होती. सभोवती सुरेख रांगोळ्या काढलेल्या होत्या व समोर सुवासिक उदबत्त्या लावलेल्या होत्या. हा थाट पाहून त्या सर्व भक्तमंडळींचे चित्त प्रसन्न झाले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर त्या दोन हसतमुख बटूंनी त्यांना अतिशय सुग्रास अन्नपदार्थ वाढावयास सुरुवात केली. त्या अतिशय सात्विक, स्वादिष्ट भोजनाने सर्वच तृप्त झाले. भोजनोत्तर त्या बटूंनी सर्वांना त्रयोदशगुणी विडेही दिले.  काही काळ त्या पवित्र स्थानी थांबून सर्वांनी विश्रांती घेतली आणि त्या बटूंचा निरोप घेऊन ती सर्व भक्तमंडळी आपल्या पुढील प्रवासासाठी हावनूरला जाण्यास निघाली. काही पावले चालून गेल्यावर त्या मंडळींनी सहजच मागे पाहिले अन काय आश्चर्य ! काही क्षणांपूर्वी ते ज्या आश्रमांत होते, जिथे त्या सर्वांनी पोटभर जेवण केले तो आश्रम, ते दोन बटू, ते गणरायाचे मंदिर असे तिथे आता काहीच तेथे नव्हते. तर त्या ठिकाणी केवळ बैलगाडीचा मार्ग अन आजूबाजूचा शेत परिसर होता. हा अद्‌भूत प्रकार पाहून ती सर्वच मंडळी दिङ्मूढ झाली. हा भास म्हणावा तर सर्वांनाच कसा झाला ? तसेच त्या सर्व भक्तमंडळींची उदरपूर्तीही झाली होती, म्हणजेच जे घडले ते सत्य होते हे निश्चितच ! संपूर्ण प्रवास मार्गात हाच विचार सर्वांच्या मनांत घोळत होता. यथावकाश सायंकाळी ही सर्व मंडळी श्रीक्षेत्र हावनूर येथे पोहोचली. ते सर्वच भक्तगण आता श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनासाठी उत्सुक होते. शुचिर्भूत होऊन त्या सर्वांनी त्यांच्या सद्‌गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. सत्संग सोहळ्यानंतर त्यातील एका भक्ताने टेम्बेस्वामीमहाराजांना दुपारी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि " हा काय  अघटित प्रकार होता ?  त्या पाठीमागचे सत्य काय ? हे जाणून घेण्यास आम्ही सर्व उत्सुक आहोत." अशी प्रार्थना केली. त्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्य, कुतूहल, आणि भीतीयुक्त भाव पाहून श्रीस्वामीमहाराज मंद स्मित करत उत्तरले, " तुमचा भक्तिभाव, दृढ श्रद्धा यांमुळे प्रसन्न होऊन त्या भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी ही लीला केली. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक रूपे धारण करणारे अत्रिपुत्र श्री दत्तात्रेय आपल्या सामर्थ्याने मनःकल्पित विश्व निर्माण करतात आणि ते विलीनही करतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते." दत्तभक्तहो, श्रीस्वामीमहाराजांनी हे सर्व त्या परब्रह्माने घडविले, असे जरी त्या भक्तमंडळींना सांगितले असले तरी, सर्वांतर्यामी स्वामींनीच आपल्या भक्तांना सृष्टीच्या उत्पत्ती-स्थिती-विलयाचा हा चमत्कार दाखविला, हे निःसंशय! श्रीस्वामीमहाराजांच्या चरित्राचे मनन, चिंतन केले असता त्यातील सर्वात् महत्त्वाचा पहिला पैलू म्हणजे  ' देव आणि भक्तांचे ऐक्य ' आपल्याला सहज लक्षांत येतो. श्रीसंतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी त्यांच्या अभंगांतून  “देव ते संत, संत ते देव" आणि  " भक्त तोचि देव, देव तोचि भक्त," असे वर्णन करून हे रहस्य प्रकट केले आहेच. अशा अनेक प्रसंगामध्ये श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराज आपल्याला करुणासागर व भक्तवत्सल स्वरूपांत दिसतात. त्यांच्या चरित्रातील असंख्य लीला अनुभवतांना आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज या दोन श्री दत्तप्रभूंच्या अवतारानंतर झालेल्या  ' योगिराज ' या श्रीदत्तावताराचीच प्रचीती येत राहते. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा ज्या भक्ताच्या पत्नीचा संकल्प होता, तिच्याकडेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी श्रीस्वामीमहाराजांनी भिक्षा ग्रहण केली आणि आशीर्वाद म्हणून त्या सौभाग्यवतीस पुढील तीन मंत्रांचा जप करण्यास सांगितले.  संपत्तीवर्धक श्लोक दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियं ।  ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्र्याच्छ्रीप्रदोऽवतु ॥ भावार्थ - दरिद्री ब्राह्मणाच्या घरी घेवड्याची भाजी खाऊन ज्यांनी त्याला विपुल संपत्ती दिली, ते लक्ष्मी प्रदान करणारे श्रीदत्तदेव दारिद्र्यापासून माझे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - १८) संततिवर्धक श्लोक दूरीकृत्य पिशाचार्तिं जीवयित्वा मृतं सुतम् ।  योऽभूदभीष्टदः पातु स नः संतानवृद्धिकृत् ॥ भावार्थ - साध्वीची पिशाचपीडा दूर करून ज्यांनी तिच्या मृतपुत्राला जिवंत केले व त्या ब्राह्मण स्त्रीचे मनोरथ पुरविले, ते वंशवेल वाढविणारे भगवान दत्तात्रेय आमचे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - २०, २१) सौभाग्यवर्धक श्लोक जीवयामास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युहा ।  मृत्युंजयः स योगींद्रः सौभाग्यं मे प्रयच्छतु ॥ भावार्थ - पतिव्रतेचा पति मृत असतां ज्यांनी त्याला जिवंत केले, ते मृत्यूचा नाश करणारे मृत्युंजय योगिराज मला सौभाग्य देवोत.(श्रीगुरुचरित्र, अध्याय - ३०, ३१, ३२)

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराजांच्या कृपेने या दिव्य आणि प्रासादिक मंत्रांचे अनुष्ठान करून पुढे त्या माऊलीस संपत्ती, संतती, सौभाग्य, दत्तमहाराजांची सेवा आदि सहजच प्राप्त तर झालेच, खेरीज तिला अखेरीस सायुज्य मुक्तीचा लाभदेखील झाला.


॥ श्री गुरुदेव दत्त ॥  संदर्भ : श्रीथोरले स्वामीमहाराज - श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती टेम्बेस्वामीमहाराज यांचे चरित्र लेखक : द. सा. मांजरेकर आणि डॉ. केशव रामचंद्र जोशी

No comments:

Post a Comment