दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Oct 10, 2019

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सच्चिदानंदा श्रीहरी, तुझा जयजयकार असो.तुम्ही आता माझ्यावर लवकर कृपा करा.तुम्हांस शरण आलेलें जे भक्तजन आहेत, त्यांच्याशी तुम्ही कधीच कठोरपणे वागत नाही.॥१॥ तूं करुणेचा सागर आहेस.तू दीनांचे माहेर आहेस. तू भक्तांसाठी खरोखर कल्पतरु वा चिंतामणीच आहेस.॥२॥ हे राघवा रामा,असा तुझा अगाध महिमा सर्व संतांनी गायला आहे. तेव्हा पुरुषोत्तमा या दासगणूवर तू क्षणाचाही विलंब न करतां सत्वर कृपा कर.॥३॥ साक्षात्कारी,दीन दुबळ्यांचे कैवारी श्रीगजानन महाराज बंकटलालाच्या घरी रहावयास आले.याचे वर्णन तुम्ही मागील अध्यायात वाचले आहे.॥४॥ दूर दुरून अनेक भक्तगण श्री समर्थांच्या दर्शनास येऊन वंदन करू लागले.जिथे मकरंद असतो तिथे मधमाश्या लगेच जमतात.त्यासाठी त्यांना कोणाच्याही आमंत्रणाची गरज नसते.॥५॥ आता एके दिवशी काय घडले, ते मी तुम्हांस सांगतो.त्यावेळी महाराज निजासनीं आनंदांत बसले होते.॥६॥ ती प्रसन्न सकाळ होती. पूर्व दिशेला नुकतेच तांबडे फुटू लागले होते.वृक्षांवर बसून पक्षी चिवचिवाट करत होते.॥७॥ कोंबडा आरवू लागला.शीतल वायू मंदपणे वाहत होता.प्रभातकाळी वृद्ध लोक शय्येवर बसून परमेश्वराचे नामस्मरण करू लागले.॥८॥ सूर्यनारायणाचे पूर्व दिशेला आनंदात आगमन होऊ लागले. त्यामुळे तम दूर गुहेत पळू लागला.॥९॥ परम भाविक सुवासिनी सडासंमार्जन करू लागल्या आणि वासरे गाईंस पाहून चर्‍हाटें तोडण्याचा प्रयत्न करू लागले.॥१०॥ अशा त्या रम्य वेळी एक साधू शेगावांत श्रीगजानन महाराजांच्या दर्शनासाठी येता झाला.॥११॥ तो गोसावी एखाद्या भणंग, भिकाऱ्याप्रमाणे दिसत होता.अर्थातच महाराजांच्या श्रीमंत भक्त मंडळींनी त्याची दखल घेतली नाही.॥१२॥ एक अतिशय जीर्ण झालेली लंगोटी त्या गोसाव्याने नेसली होती व भगवी चिंधी डोक्यास गुंडाळली होती.त्याच्या डाव्या खांद्यावर झोळी होती.॥१३॥ तर पाठीवर मृगजिनाची गुंडाळी होती. असा तो गोसावी श्रींच्या दर्शनासाठी एकीकडे कोपर्‍यांत जाऊन बसला.॥१४॥ एव्हाना महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली होती.त्या गर्दीत गोसाव्यास श्रींच्या दर्शनाचा लाभ कसा बरे होणार ?॥१५॥ तो तिथेच बसून ' भक्तगणांच्या इतक्या गर्दीत आज मला केवळ समर्थांचे चरणही दृष्टीस पडणे कठीण आहे.' असा विचार करू लागला.॥१६॥ मी काशीत असतांनाच श्री समर्थांची कीर्ती ऐकली होती. तिथेच मी स्वामींस भांग अर्पण करण्याचा नवस श्रद्धेने केला होता.॥१७॥ तो हेतु मनात धरूनच मी इथे शेगावांस आलो खरा, पण त्या माझ्या नवसाची पूर्तता येथील भक्त मंडळी करू देतील काय?॥१८॥ गांजाचें केवळ नांव जरी मी काढले तरी हे लोक मला लाथाच घालतील.मी तर फक्त माझा गांजा अर्पण करण्याचा नवस फेडण्यासाठीच शेगावांस आलो आहे.॥१९॥ ह्या माझ्या नवसाची गोष्ट मी कोणाला अन कशी सांगावी बरे? इथे जमलेल्यांपैकी एकही भक्तगण या शांभवीची आवड असलेला दिसत नाही.॥२०॥ जी वस्तु आपणांस प्रिय वा आवडती असते,तीच गोष्ट या जगात सर्वोत्तम आहे असे वाटते आणि त्यामुळे अर्थातच त्या वस्तुचाच नवस केला जातो.॥२१॥ असे नाना विचार तो गोसावी करू लागला.तो समर्थांचे दर्शन घेण्यास अत्यंत आतुर झाला होता.॥२२॥ ती त्याची मनीषा अंतर्ज्ञानी समर्थांस कळली आणि त्यांनी इतरांस त्या काशीच्या गोसाव्यास आपणासमोर आणण्यास सांगितले.॥२३॥' तो पहा, एका कोपऱ्यात बिचारा लपून बसला आहे.' हे समर्थ वचन ऐकून त्या गोसाव्यास अतिशय आनंद झाला.॥२४॥ आणि तो मनी विचार करू लागला,' खरोखरच हे संत त्रिकालज्ञानी असतात. मी जे काही मनात बोललो, ते सर्व काही यांना समजले.॥२५॥ अगदी स्वर्गलोकीच्याही सर्व कथा श्रेष्ठ अशा योगीवरांस समजतात,असे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायीं लिहिलेले आहे.॥२६॥ त्याचीच इथे मला आता प्रचीती आली.हा त्रिकालदर्शी,महात्मा साधुवर खरेच धन्य धन्य होय.॥२७॥ मी काहीही बोललो नाही, तरी हे पुण्य पुरुष माझा नवस नक्कीच जाणतील.आता काही क्षणातच मला ह्याचे प्रत्यंतर येईल.'॥२८॥ भक्तमंडळींनीं त्या गोसाव्याला महाराजांसमोर आणले.त्याला पाहून महाराज म्हणाले,"तुझ्या झोळीत काय आहे ते आता बाहेर काढ.ज्या गोष्टीचा तू नवस करून ती गोष्ट तीन महिने सांभाळलीस,त्याचे आता इथेच पारणे होऊ दे."॥२९-३०॥ हे ऐकताच तो गोसावी गहिवरला,अन समर्थांच्या चरणी त्याने माथा टेकला व स्वामींपुढे एखाद्या लहान बालकाप्रमाणे गडबडा लोळूं लागला.॥३१॥ त्यावर महाराज बोलते झाले,आता तुझे हे नाटक पुरें झाले.त्या गांजाची बुटी झोळीच्या बाहेर काढ.॥३२॥ नवस बोलतांना तुला काही लाज नाही वाटली आणि आता का हे निरर्थक चाळे करतो आहेस?॥३३॥गोसावी महाचतुर होता.दोन्ही हात जोडुन,अत्यंत नम्रतेने तो जरा भीत भीतच बोलू लागला.॥३४॥' मी बोललेला नवस फेडण्यासाठी झोळीतील गांजाची बुटी काढतो,परंतु ह्या दीन दासाची एक विनंती आपण मान्य करावी.॥३५॥ ह्या माझ्या बुटीची आपणांस नित्य आठवण रहावी.(ही बुटी आपण सतत आपल्याजवळ ठेवावी व हिचे कायम सेवन करावे.)हीच माझ्या मनीची इच्छा आहे, ती आपण माझ्यावर कृपा करून पूर्ण करावी.॥३६॥ वास्तविक ह्या बुटीची आपणांस काहीच आवश्यकता नाही,हे मी पूर्णत: जाणुन आहे.पण केवळ ह्या बालकाची आठवण म्हणुन तरी ही बुटी आपण स्वीकारावी.॥३७॥ भक्त जे जे इच्छितात, ते ते सर्व परमेश्वर त्यांना देतो.अगदी अंजनीचीच कथा आठवून पहा.॥३८॥ अंजनी एक वानरी होती. तिने शिव शंभो महादेवाला प्रार्थना केली की हे शंकरा,तुम्ही माझ्या उदरीं वानर होऊन जन्म घ्यावा.॥३९॥ ते हराने मान्य केले.शिव तिच्या पोटी महारुद्र म्हणुन जन्मास आले. अशा रितीने चंद्रमौळींनीं अंजनीचे मनोरथ पूर्ण केले.॥४०॥ तिथे अंजनीचे वानरपण शिववरदानाच्या आड आले नाही.तेव्हा माझ्या बुटीची आठवण रहावी म्हणुन तिचा तुम्ही स्वीकार करा.॥४१॥ तसेच तुम्ही साक्षात कर्पूरगौर शंकरच आहांत,म्हणून हे दयाळा,या बुटीचा असा अव्हेर करू नका.॥४२॥ ही बुटी इतरांना जरी हीन वाटली, तरी ती आम्हांस भूषणावह असेल,असे प्रत्यक्ष ज्ञानवल्ली शंकर हिच्याविषयी बोलले आहेत.'॥४३॥ यावर महाराज किंचित द्विधा झाले, पण अखेर त्यांनी होकार दिला.आई आपल्या बाळांचे वेडेवाकडे हट्ट पुरवतेच.॥४४॥ मग त्या गोसाव्याने झोळीतून बुटी काढली व हातावर घेऊन धुतली. नंतर ती चिलमींत भरून पुण्यपुरुष गजानन महाराजांना ओढण्यास दिली.॥४५॥ असा बुटीचा वृत्तांत मी तुम्हांस सकारण कथिला. त्याचे मर्म लक्षात घेऊन प्रत्येकाने विचार करावा.॥४६॥ असो. अशाप्रकारे स्वत:ला धन्य धन्य मानून तो गोसावी काही दिवस शेगावांत राहिला व नंतर रामेश्वरास गेला.॥४७॥गांजाची अशी प्रथा त्या शेगांवात पडली.पण त्यामुळे समर्थांस व्यसनाधीनता कधीच आली नाही.॥४८॥ एखाद्या पद्मपत्राप्रमाणेच ते खरोखर अलिप्त होते. अशा त्या थोर महात्म्याची कधी कुणाबरोबर तुलना होऊ शकेल काय?॥४९॥ समर्थ कधी वेदऋचा उदात्त-अनुदात्त स्वरांसहित अस्खलित म्हणत असत तर कधी त्यांचे नावही घेत नसत.॥५०॥ महाराजांचे ते स्पष्ट, अस्खलित वेदोच्चार ऐकून वैदिक ब्राह्मणही आश्चर्यचकित होत असत.केवळ यांमुळेच गजानन हे ब्राह्मण असावेत, असे खूप लोकांचे मत होते.॥५१॥ कधी कधी महाराज एखाद्या अभिजात गायकाप्रमाणे एकच पद वेगवेगळ्या रागांतून गाऊन दाखवत असत.॥५२॥' चंदन चावल बेलकी पतीया ' हे पद त्यांना अत्यंत प्रिय होते.अतिशय हर्षयुक्त स्वरांत हे पद समर्थ नेहेमीच गात असत.॥५३॥ ते कधी ' गण गण गणात ' हे भजन म्हणत असत, तर कधी नुसतेच मौन धरत असत.तर काही वेळा शय्येवरी निचेष्टित पडुन रहात असत.॥५४॥ समर्थ कधी कधी वेड्यासारखे वागतं, तर काही वेळेला वनांत भटकत असत. कधी अकस्मिकपणे एखाद्याच्या घरी जात असत.॥५५॥ असो.त्या शेगांवांत जानराव देशमुख नावाचे एक सज्जन गृहस्थ होते. ते वयोवृद्ध झाल्याने त्यांचा अंत:काळ जवळ आला होता.॥५६॥ त्यांचे शरीर व्याधीग्रस्त झाले होते,जणु काही शरीरातील सर्व शक्तीच निघून गेली होती.वैद्य सर्वतोपरी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.॥५७॥ अखेर नाडी परीक्षा करून वैद्याने त्यांच्या नातेवाईकांस कळविले की हा कठीण प्रसंग आहे खरा, पण जानराव आता ह्यांतून वाचतील अशी आशा वाटत नाही.॥५८॥ आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केले, पण तिळभरसुद्धा त्यास यश आले नाही.तेव्हा यांना आतां घोंगडयावरती काढुन ठेवलेलेच बरे.॥५९॥ हे ऐकताच अवघे नातेवाईक अत्यंत दु:खी झाले व जानराव, तू आम्हांस सोडुन जाऊ नकोस असा विलाप करू लागले.॥६०॥ तुझ्याप्रीत्यर्थ कित्येक दैवतांना आम्ही नवससायास केले, पण दुर्दैवाने एकही देव आम्हांस पावला नाही.॥६१॥ आता तर वैद्यानेदेखील हात टेकले, जेणेकरून आमचे सर्व प्रयत्नच कुंठित झाले. आता फक्त हा अखेरचा प्रयत्न एकदा करून पाहूं या.॥६२॥बंकटलालाच्या घरी एक साक्षात्कारी महापुरुष आले आहेत.त्यांच्या योगें ही शेगांव नगरी जणु प्रती पंढरपूरच झाली आहे.॥६३॥ संत-साधूंनी मनांत आणले तर काय होत नाही ? अशक्य गोष्टीही शक्य होतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मृत सच्चिदानंदबाबाला पुनर्जीवित केले.॥६४॥ आपण आता त्याची प्रचीती पाहू. चला, कोणीतरी जाऊन समर्थांना नमन करून त्यांची करुणा भाकू या. उगीचच आता वेळ दवडून उशीर करू नका कारण जानरावाचा अंतसमय अगदीच जवळ आला आहे.॥६५॥ असा विचार विनिमय झाल्यावर एक आप्त धावतच बंकटलालाच्या घरी आला आणि त्याने जानरावाची हकीकत बंकटलालास कथन केली.॥६६॥ जानराव देशमुखाचा अंत:काळ जवळ आला आहे,म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे.॥६७॥ तेव्हा कृपा करून महाराजांचें चरणतीर्थ तुम्हीं मला द्यावे.जानरावांसाठी ते तीर्थ अमृताप्रमाणे प्रभावी ठरेल असेच आम्हांस वाटते.॥६८॥ त्यावर बंकटलाल म्हणाला," ही गोष्ट काही माझ्या हातात नाही,तुम्ही माझ्या पित्याला यासाठी आदरपूर्वक विनंती करावी."॥६९॥ जसे त्याने सुचवले, तसेच त्या आप्ताने तात्काळ केले व भवानीरामांस समर्थांचे तीर्थ देण्याची विनवणी केली.॥७०॥ भवानीराम अतिशय दयाळू आणि सज्जन गृहस्थ होते. खरे सज्जन नेहेमीच दुसर्‍याचें दुःख ऐकून दु:खी-कष्टी होतात.॥७१॥ त्यांनी एका पेल्यामध्ये पाणी भरले व ते समर्थांच्या चरणांस लावले आणि समर्थांस प्रार्थना केली की हे तीर्थ मी जानरावास पिण्यास देतो.॥७२॥ समर्थांनी त्यांस संमती दिल्यावर ते तीर्थ जानरावास पाजण्यात आले, अन काय आश्चर्य ! जानरावाच्या घशाची घरघर ते तीर्थ प्राशन केल्यावर बंद झाली.॥७३॥ तो हात हालवूं लागला,त्याने डोळेही किंचित उघडले. अशाप्रकारे समर्थांच्या तीर्थाच्या प्रभावाने जानरावाच्या व्याधीस गुण येऊन उतार पडु लागला.॥७४॥ हा चमत्कार पाहून तिथे जमलेले सर्व स्त्री-पुरुष अतिशय आनंदीत झाले.सर्वांस गजानन महाराज या सत्पुरुषाचा अधिकार वा थोरवी कळून आली.॥७५॥ मग त्या नातेवाईकांनी औषधोपचार बंद करण्याचा निर्णय घेतला व केवळ समर्थांच्या तीर्थावरच भिस्त ठेवली.त्यांमुळे लवकरच जानराव व्याधीमुक्त होऊन आरोग्यवान झाला.॥७६॥ आठ दिवसानंतर जानराव पाहिल्याप्रमाणेच निरोगी व ठणठणीत झाला आणि भवानीरामाच्या घरी समर्थांच्या दर्शनांस आला.॥७७॥पहा श्रोतेहो, सर्व उपचारांत संतांचें चरणतीर्थ कसे अमृतच ठरले.खरोखर समर्थ केवळ संत नसून ह्या कलीयुगातील साक्षात परमेश्वरच होते.॥७८॥ प्रत्यक्ष श्री गजाननासारखे थोर संत शेगांवीं होते,मग ते तिथे असतांना शेगांवातील कुणीही यमसदनी जायलाच नको होते. अशी आता इथे एक शंका सहज येऊ शकते.पण हा एक कुतर्कच झाला.॥७९-८०॥ संत काही मृत्यू टाळत नाहीत तर ते निसर्गनियमाप्रमाणेच वागतात.परंतु एखादे आगंतुक संकट आल्यांस ते मात्र सहज निवारू शकतात.॥८१॥ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे गावी सच्चिदानंदबाबांस पुनर्जीवित केले.पण त्यांनी स्वत: मात्र आळंदीला संजीवन समाधी घेतली.॥८२॥ याचे रहस्य इतकेच की संत भक्तांवर आलेले गंडांतर टाळू शकतात, गंडांतर टाळणे हे थोर संताना काहीच अशक्य नसते.॥८३॥ या जगांत मृत्यूचे तीन प्रकार आहेत. त्यांची नांवें मी आता तुम्हांस क्रमवार देतो.॥८४॥ पहिला आध्यात्मिक,दुसरा आधिभौतिक आणि तिसऱ्याचे नावं अधिदैविक आहे.या तिघांत सर्वात प्रबळ आध्यात्मिक मृत्यु होय.॥८५॥ आधिभौतिकाची सुरुवात खरे तर कुपथ्यानें होते.नाना प्रकारच्या व्याधी शरीरांत निर्माण होतात.॥८६॥ त्यांचा प्रादुर्भाव झाल्यावर अखेर मृत्यु येतो.त्या मृत्युवर औषधानें मात करता येते.॥८७॥ मात्र त्यासाठी औषध देणारा कुशल शास्त्रज्ञ असला पाहिजे की ज्याला औषधींचे पूर्ण ज्ञान आहे.॥८८॥ असा एखादा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा नक्की नाश होतो.तसेच आधिदैविकास नवस सायास करून दूर करता येते.॥८९॥ तर हे भौतिक आणि दैविक असे दोन गंडांतर प्रकाराचे मृत्यु या जगी जनांस माहीत आहेत.॥९०॥ आता थोडे आध्यात्मिक मृत्युविषयी, जो कुणासही टाळता येत नाही.प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण समीप असतांना देखील अर्जुनाचा पुत्र अभिमन्यु रणांत मृत्युमुखी पडला.॥९१॥ तर जानरावाचा मृत्यु हा गंडांतर स्वरुपाचा होता, तो समर्थतीर्थ देऊन सहजच टाळला.॥९२॥म्हणजेच गंडांतर हे थोर साधूंच्या कृपेने दूर करता येते आणि तेच शेगांवात घडून आले.॥९३॥ या जगी काहीजणांचे मृत्यु हे नवसांनीं टाळता येतात, परंतु हे लोकहो, तो नवस मात्र अत्यंत श्रद्धेने केला पाहिजे.॥९४॥ पूर्ण श्रद्धा असल्यावर तीच मृत्यु टाळू शकते.खरोखर श्रद्धाच सर्व तऱ्हेने सर्वांहून श्रेष्ठ असते.॥९५॥थोर साधूचे चरणतीर्थदेखील वरील दोन प्रकारचे मृत्यु टाळू शकतात, मात्र तो खरोखरच संत असावयास हवा.॥९६॥केवळ साधुचा वेष धारण केलेला एखादा अयोग्य पुरुष असल्यास मात्र ही गोष्ट घडणे शक्यच नाही.माती ही कधीही कस्तुरी होऊ शकत नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा.॥९७॥ षड्‌विकारांचे निवारण केल्याशिवाय अंगी साधुत्व येत नाही आणि खरे साधू असल्याशिवाय असे अघटित कधीही होणार नाही.॥९८॥ म्हणून एखाद्या बहुरुप्यास ओळखणे हे आवश्यक आहे,उगाच केवळ पिवळे दिसते म्हणुन पितळेस सोने मानू नका.॥९९॥ श्री गजानन महाराज हे वेषधारी साधू नव्हते, तर ते पूर्ण साक्षात्कारी संत होते, म्हणूनच जानरावाची व्याधी समर्थांच्या तीर्थानें बरी झाली.॥१००॥जानराव देशमुख बरे झाल्यावर त्यांनी बंकटलालाच्या घरी श्री गजानन महाराजांप्रीत्यर्थ थोर भंडारा घातला.॥१०१॥तीर्थ घेऊन देशमुख बरा झाला खरा, पण स्वामींना एक पेच पडला.त्यांवर त्यांनी एक असा विचार मनांत केला.॥१०२॥ आपण कडकपणा धरल्याशिवाय ही उपाधी काही जाणार नाही,स्वार्थी प्रापंचिक काही साधुत्वाचे खरे महत्त्व जाणत नाहीत.॥१०३॥ त्या दिवसापासून दयाघन स्वामी महाराज सर्वांशी केवळ लटकेच कठोर वर्तन करू लागले.॥१०४॥ हा त्यांचा कडकपणा इतरांना असह्य झाला, पण त्यांच्या भक्तांना त्याचें काहीच वाटले नाही.॥१०५॥जसा नरसिंह अवतार इतरांस क्रूर वाटला,पण कयाधुचा पुत्र प्रल्हाद त्या रूपांस मुळीच घाबरला नाही.॥१०६॥ वाघीण इतरांस जरी भयंकर वाटली तरी तिचा बछडा तिच्याच अंगावर अगदी निर्भयपणें खेळतो.॥१०७॥ असो.आतां मी तुम्हांस अजून एक दुसरी खरी गोष्ट सांगतो.कस्तुरीच्या आसपास असलेली मातीही सुगंधित होते अन तिचे मूल्य वाढते.॥१०८॥ चंदन तरुच्या सभोवताली असलेली वृक्षवल्लीही थोडीफार सुवासित होते,अर्थात हा तर निसर्ग नियमच आहे.॥१०९॥ आता अशी सुवासित झालेली झाडे जर आपणाला चंदन समजू लागली तर त्यांच्या फजितीला निश्चितच काही पारावार उरणार नाही.॥११०॥ जिथे ऊंस उगवतो,तिथेच निवडुंगही उगवतो. तर जिथे मोगरा वाढतो तिथेच पिंगूळसुद्धा येतो.॥१११॥ जिथे साधु सज्जन या जगात असतात, तिथेच दुर्जनही असतात.हिरे आणि गारा खाणीत नेहेमीच एकत्र असतात.॥११२॥ अर्थात एकाच स्थानी आहेत म्हणुन त्यांची किंमत समान नसते.हिऱ्याचे तेज हे हिऱ्याचे भूषण असते,तर गार कधीच तेजस्वी नसते.॥११३॥ त्यामुळेच गार ही गारंच राहते व पायाखालीं तुडविली जाते. अमूल्य हिऱ्यावर अशी(पायाखाली तुडविले जाण्याची) वेळ कधीच येत नाही.॥११४॥श्री गजानन महाराजांच्या भक्तमंडळीत असाच एक दुर्जन होता. संतसेवेचा गर्व त्याच्या ठायी होता.॥११५॥ तो वर वर सेवा करीत असे,पण त्याच्या मनात भक्तीभाव नव्हता.समर्थांचे नाव सांगून तो मिठाई,पेढे स्वत: लुबाडीत असे.॥११६॥मीच केवळ समर्थकृपेस पात्र आहे व कुठलेच काम माझ्याशिवाय इथे होत नाही असे तो इतर भक्तगणांस सतत म्हणत असे.॥११७॥ स्वामी समर्थांचा जसा कल्याण तसाच मी (गजानन महाराजांचा) अत्यंत आवडता पट्टशिष्य होय.माझे सर्व हट्ट ते नेहेमीच पुरवतात.(माझा शब्द ते कधी खाली पडु देत नाहीत.)॥११८॥ मीच त्यांची चिलीम भरतो, त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी करतो,इतर सर्व कामेही मीच करतो.असा मी समर्थांचा अत्यंत आवडता आहे.॥११९॥असे तो सतत लोकांस सांगत असे व आपलीच मनमानी करीत असे.विठोबा घाटोळ माळी हे त्या अधमाचें नांव होते.॥१२०॥ महाराज साक्षात स्वत:च शिवशंकर होते,तर हा स्वत:ला नंदिकेश्वर समजू लागला.महाराजांच्या दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांशी तो सतत बाचाबाची करत असे.॥१२१॥ हे अर्थातच सर्व काही समर्थांनीं अंतर्ज्ञानाने जाणले. तर लोक हो एक दिवशी श्रींनी काय कौतुक केले ते तुम्ही ऐका.॥१२२॥ एके वेळी परगावी रहाणारी कांहीं मंडळी समर्थांच्या दर्शनासाठी शेगांवास आली होती.त्या वेळी समर्थांची स्वारी त्यांच्या शय्येवर निजलेली होती.॥१२३॥ समर्थांस जागे करण्याची कुणाचीही हिम्मत होईना,परंतु त्या मंडळीस पुढें जाण्याची घाई होती.॥१२४॥ त्यांनी आपापसात कुजबुज केली व ते विठोबाला विनंती करू लागले,' विठोबा,आम्हांस आतांच इथून परगावी जावे लागेल कारण की एक अत्यंत जरूरी काम आहे.पण महाराज तर शय्येवर अजूनही निद्रीस्तच आहेत तर हे कसे घडावे बरे? त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय काही आमचा पाय निघणार नाही. हे अत्यंत अवघड काम तुझ्याशिवाय कोणी करणे शक्यही नाही. तू समर्थांच्या सर्व शिष्यांत मुख्य व चतुर आहेस. तेव्हा आम्ही तुला हात जोडून विनंती करतो की एवढें काम तू आम्हांसाठी करावेस.'॥१२५-१२८॥ अशी आपली स्तुती ऐकून विठोबा मनांत एकदम गर्वानें फुलून गेला. त्याने त्याच क्षणी जाऊन महाराजांस उठविले.॥१२९॥ त्यांमुळे त्या मंडळींचे काम झाले पण त्या विठोबा घाटोळावर मात्र संकट ओढवलें.जसे कर्म तसेच फळ हेच खरे.॥१३०॥ समर्थांच्या हाती एक भली मोठी काठी होती,तीच त्यांनी त्या विठोबा माळ्याच्या पाठीत घातली.॥१३१॥ अन त्यावर महाराज वदले,' आपली योग्यता विसरून हा बेटा(विठोबा)माजला. ह्या लुच्च्यानें उघड उघड इथे व्यापारच आरंभिला आहे.मला मोठमोठ्या पदव्या लावतो, इथे मठांत घंटा आणून बांधतो तर कधी कधी अंगात वारं आल्यासारखे वागतो, असा हा अतिशय नीच मनुष्य आहे. त्या वर्तनाचे आज मी तुला खास हे बक्षीसच देतो.तुझ्यावर कृपा केल्यास मी प्रभूचा अपराधी होईन. सोमरसाला साखर मानूं नये, विषाला जवळ करुं नये, चोरांस निजकंठींचा ताईत कधी समजू नये.'॥१३२-१३५॥ अशा रीतीने महाराजांनी त्या घाटोळाला छडीने ठोकला. त्यानंतर विठोबा जो पळाला तो पुन्हा परतून आलाच नाही.॥१३६॥ जे का खरे संत असतात ते असेच ढोंगी भक्तांना शिक्षा करतात. इतर ढोंगी साधू मात्र अशा भक्तांमुळे वाहवत जातात.॥१३७॥ म्हणजेच अधिकार नसतांनाही ढोंगी साधू संत महात्म्याचे सोंग घेतात अन भोळ्या भक्तजनांस नादी लावतात.असे किती तरी प्रकार झाले आहेत.॥१३८॥ स्वार्थी, मतलबी त्यांना साथ देतात, त्यांचा उदो उदो करतात, त्या ढोंग्यांचे भलभलते साक्षात्कार लोकांस सांगतात.॥१३९॥ त्यामुळे दोघांचेंही काम होते,अन त्यांना अपार पैसा मिळतो.परंतु ही प्रथा काही बरी नाहीं,ह्या अशाच प्रकारांमुळे समाज रसातळास जातो.॥१४०॥ खरे संत हे ईश्वराचे निःसीम भक्त असतात, त्यांना ह्या अश्या षंढ लोकांचे सान्निध्य मुळीच आवडत नाही.॥१४१॥ एखाद्या पतिव्रतेची शेजारी कसबिण असू शकेल, हे कधी पटेल का ? तसेच सोन्याचे अलंकार काय कथिल या धातुबरोबर शोभतील काय?॥१४२॥ संत महात्मे दुर्जनांस त्यांच्या आश्रयास राहू देतात, परंतु त्यांस काही महत्व देत नाहीत. ती एक व्यक्ती या जगांत केवळ कृतकर्म भोगण्यासाठी आली आहे (असे मानतात).॥१४३॥ असे मनी समजून त्याविषयीं मौन धरतात, जसे की ही भूमी निवडुंगालाही स्थान देते.॥१४४॥ मोगरा, निवडुंग आणि शेर ही तीनही जमीनीचीं लेंकरे आहेत. पण तिघांची किंमत मात्र निरनिराळी असते.॥१४५॥ लोकं मोगर्‍याचें संरक्षण व निवडुंगाचें दहन करतात. तर शेर दारावर चिलटांसाठीं बांधून ठेवतात.॥१४६॥तसेच संत हे भूमीप्रमाणेच जरी अवघ्यांचें रक्षण करतात, तरी प्रत्येकांस त्यांच्या वेगवेगळ्या गुणांप्रमाणेच किंमत देऊन त्याचप्रमाणे ठेवतात.॥१४७॥ खरोखर विठोबा घाटोळाचें नशीब अतिशय खडतर होतें,म्हणुनच थोर साधूंचे सान्निध्य लाभूनही दैवानेच ते दूर झाले.॥१४८॥ जर त्याने ढोंग केले नसते,तर तो त्याच्या योग्यतेप्रमाणे पात्र ठरला असतां,मात्र त्याने संतांची ती योग्यता मुळीच जाणली नाही.॥१४९॥ त्याने कल्पवृक्षाखाली बसून गारगोटी इच्छिली वा कामधेनूजवळ करवंटी मागितली.॥१५०॥ थोर संतांच्या सान्निध्यात राहून असे कुणीही करू नये.तिथे केवळ सदविचारांनाच अहर्निश जागृत ठेवावे.॥१५१॥ हा दासगणूविरचित श्रीगजाननविजय ग्रंथ अवघ्यां भाविकांस हा भवसागर तरून जाण्यासाठी तारक होवो.(हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)॥१५२॥ ॥श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

No comments:

Post a Comment