दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Jan 11, 2019

श्री गुरुचरित्र अध्याय १४ - श्री सायंदेव प्रत


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II१II जय जयाजी योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील कथा विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी ऐसी II२II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न झालें श्री गुरुकृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II३II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोषें सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारोनी II४II ऐक शिष्या शिरोमणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II५II गुरुभक्तीचा प्रकार I पूर्ण जाणे द्विजवर I पूजा केली विचित्र I म्हणोनि आनंदे परियेसा II६II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त व्हावें वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II७II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव नमन करून I माथा चरणी ठेवून I नमिता झाला पुनः पुन्हा II८II जय जयाजी सद्‌गुरु I त्रिमूर्तींचा अवतारू I अविद्यामाये दिससी नरु I वेदां अगोचरु तुझा महिमा II९II विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I धरिलें स्वरूप तू मानवासी I भक्तजन तारावया II१०II तव महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I मागतो एक तुम्हांसी I कृपा करणे गुरुमूर्ति II११II माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I इहे सौख्य पुत्रपौत्री I अंती द्यावी सद्गति II१२II ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I सेवा करितो द्वारी यवनी I महाक्रुर असे तो II१३II प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी I घात करितो जो बहुवसी I याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे परियेसा II१४II जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I भेटी झाली तुमची म्हणोन I मरण कैचे आम्हांसी II१५II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभय देती तयाप्रती I विप्रमस्तकी हस्त ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II१६II भय सांडूनि त्वां जावे I क्रुर यवनातें भेटावे I संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांप्रती II१७II जोवरी परतोनि तू येसी I असो आम्ही भरंवसी I तू आलिया संतोषी I जाऊ मग येथोनिया II१८II निजभक्त आमुचा तूचि होसी I परंपरी-वंशोवंशी I अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II१९II तुझे वंशपरंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I अखंड लक्ष्मी तुझें घरी I निरोगी शतायु नांदाल II२०II ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II२१II कालांतक यम देखा I यवन दुष्ट परियेसा I ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II२२II विन्मुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपात I विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरू ध्यातसे II२३II कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I श्रीगुरूकृपा असे ज्यासी I काय करील यवन दुष्ट II२४II गरुडाचिया पिलीयांसी I सर्प कैसा डंसी I तैसी तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II२५II कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I श्रीगुरुकृपा ज्यासी I कळीकाळाचे भय नाही II२६II ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I भय कैंचे तयां दारुण I काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करील II२७II ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन करील काय I श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे भय नाही तयां II२८II ऐसियापरी तो यवन I गृहीं निघाला भ्रमें करून I दृढ निद्रा लागतां जाण I शरीरस्मरण नाही त्यासी II२९II हृदयज्वाळा होऊनी त्यासी I जागृत होवोनि परियेसी I प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II३०II स्मरण नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II३१II स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II३२II तूतें पाचारिले येथे कवणी I जावे त्वरित परतोनि I वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप देत तये वेळी II३३II संतोषोनि द्विजवर I आला ग्रामीं सत्वर I गंगातीरी जाय लवकर I श्रीगुरुचे दर्शनासी II३४II देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी भावेसी I स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II३५II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I दक्षिणदिशें जाऊ म्हणती I स्थान तीर्थयात्रेसी II३६II ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II३७II तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I संसारसागर तारका I तूंचि देवा कृपासिंधु II३८II उद्धरायां सगरांसी I गंगा आली भूमीसी I तैसा स्वामी आम्हासी I स्पर्शनें उद्धार आपुल्या II३९II भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सांडणे काय नीति I सवेचि येऊ हें निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II४०II येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II४१II कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II४२II आम्ही तुमचे ग्रामांसमीपत I वास करू हे निश्चित I कलत्र पुत्र इष्ट भ्रात I तुम्ही आम्हां भेटावें II४३II न करी चिंता असा सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I म्हणोनि हस्त ठेवीं मस्तकी I भाक देती तये वेळी II४४II ऐसेपरी सांगोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र तें II४५II समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II४६II नामधारक विनवी सिद्धासी I कारण काय गुप्त व्हावयासी I होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II४७II गंगाधराचा नंदन I सांगे गुरुचरित्र वर्णन I सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामधारकासी II४८II पुढील कथेचा विस्तार I सांगतसे अपरंपार I मन करूनि एकाग्र I ऐका श्रोते सकळिक II४९II वास सरस्वतीचे तीरी I सायंदेव साचारी I तया गुरुतें निर्धारी I वस्त्रें भूषणें दिधलीं II५०II गुरुचरित्र अमृत I सायंदेव आख्यान येथ I यवन भय रक्षित I थोर भाग्य तयाचें II५१II II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे दुष्टयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II

II श्रीगुरुदेवदत्त II श्रीगुरुदेवदत्त II श्रीगुरुदेवदत्त II II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II

II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II

No comments:

Post a Comment